कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कोरडवाहू शेतीला नवी दिशा

विवेक मराठी    25-Sep-2026
Total Views |
@डॉ. वसंत देशमुख
वरिष्ठ शास्त्रज्ञ, दीनदयाळ शोध संस्थान, अंबाजोगाई
-----------
@ प्रमोद रेणापूरकर
कृषी अभियंता, दीनदयाळ शोध संस्थान, अंबाजोगाई
 

krushivivek 
हवामानाच्या बदलत्या चक्रव्यूहात शेती टिकवून ठेवणे हे कोरडवाहू शेतकर्‍यांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे. नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी आणि प्रत्येक कृषी निर्णय अधिक अचूक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ अपरिहार्य ठरत आहे. पारंपरिक अनुभवाला डेटा आणि संगणकीय विश्लेषणाची जोड दिल्यास शेतीचा पोत बदलून पीक उत्पादन प्रक्रियेत भरघोस वाढ करता येते. या संदर्भात ‘दीनदयाळ शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई’ यांच्यावतीने ‘शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर 21 ऑगस्ट 2026 रोजी ‘ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विविध तज्ज्ञांनी अखच्या कृषी उपयोगांवर मार्गदर्शन केले आणि आधुनिक तंत्रज्ञान स्थानिक शेतीच्या गरजांशी जोडण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
हवामानातील बदल, अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर ही आजच्या शेतीसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. कोरडवाहू शेतीमध्ये पावसाची अनिश्चितता आणि उपलब्ध पाण्याची मर्यादा अधिक तीव्र असल्याने प्रत्येक कृषी निर्णय अचूक, शास्त्रीय आणि वेळेवर घेणे आवश्यक ठरते.
 
 
या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) कृषी निर्णय प्रक्रियेला माहिती आधारित स्वरूप देणारे महत्त्वाचे तंत्रज्ञान ठरत आहे. हवामान, माती, पिकांची अवस्था आणि पूर्वीच्या नोंदी यांचे विश्लेषण करून योग्य वेळी योग्य कृषी सल्ला देण्याची क्षमता AI आधारित प्रणालींमध्ये निर्माण होत आहे.
 
 
अंबाजोगाईतील AI आधारित कृषी प्रणालीस्थानिक गरजांपासून सुरुवात
 
बीड जिल्ह्यात दीनदयाळ शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने AI आधारित कृषी प्रणालीचे लोकार्पण अंबाजोगाई येथे करण्यात आले. या प्रणालीमध्ये हवामान, माती आणि पिकांशी संबंधित माहितीचे संकलन व विश्लेषण करून शेतकर्‍यांना अधिक अचूक आणि वेळेवर निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाचे केंद्र अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी आहेत. बीड जिल्ह्याच्या कृषी परिस्थितीत सोयाबीन, तूर आणि आंबा ही महत्त्वाची पिके असून, स्थानिक हवामानाशी सुसंगत कृषी सल्ला या पिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
 
 
 
हवामान केंद्रापासून निर्णय-साहाय्य प्रणालीपर्यंत
 
कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात स्थापित स्वयंचलित हवामान केंद्रातून तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वार्‍याचा वेग आणि पानावरील आर्द्रता यांसारख्या घटकांची माहिती मिळते. या माहितीचे पिकांच्या वाढीच्या अवस्थेशी विश्लेषण करून हवामानाशी सुसंगत कृषी संदेश शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.सोयाबीन, तूर आणि आंबा या पिकांमध्ये पेरणी, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन आणि फवारणीचे नियोजन याबाबत योग्य वेळी सल्ला देणे हा या प्रणालीचा प्रमुख उद्देश आहे. हवामानाचा अंदाज, उपलब्ध माहिती आणि पिकांची अवस्था यांचा एकत्रित विचार केल्यास अनावश्यक फवारण्या, खतांचा अतिरिक्त वापर आणि प्रतिकूल हवामानातील शेती कामे टाळण्यास मदत होऊ शकते.
 
 
शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद
 
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ हवामान अंदाजापुरता मर्यादित राहिलेला नाही. पीक व्यवस्थापन, कीड-रोगनिदान, मृदाआरोग्य, सिंचन नियोजन, खत व्यवस्थापन, बाजारभावाचे विश्लेषण आणि कृषी निर्णय प्रक्रिया अशा अनेक क्षेत्रांमध्ये AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. या संदर्भात ’दीनदयाळ शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई’ यांच्या वतीने ‘शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर 21 ऑगस्ट 2026 रोजी ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विविध तज्ज्ञांनी AIच्या कृषी उपयोगांवर मार्गदर्शन केले आणि आधुनिक तंत्रज्ञान स्थानिक शेतीच्या गरजांशी जोडण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
 
 
krushivivek
 
बारामतीच्या प्रयोगातून मिळालेले अनुभव
 
’अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या कृषी विज्ञान केंद्र, बारामतीमार्फत हवामान व पावसाच्या अंदाजाची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोबाईल SMS सेवा तसेच क्षेत्रनिहाय खत शिफारस करणारे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्याचे काम करण्यात आले आहे. ’कृषी विज्ञान केंद्र, बारामती’चे मृदाशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी ऑनलाईन संवादादरम्यान AI आधारित कृषी प्रयोगांची माहिती दिली. त्यांच्या मते, ’ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने मागील शंभर वर्षांतील कृ्रषिविषयक माहितीचे संकलन करून मशीन लर्निंगच्या माध्यमातून विश्लेषण करण्यात आले. त्यावर आधारित ADTने ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट, Map My Crop आणि Fasal यांच्या सहकार्याने अख आधारित ऊस शेतीचा प्रयोग राबविला.’
 
 
पुढे ’वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे’ यांच्या सहकार्याने राज्यातील 42 साखर कारखान्यांच्या माध्यमातून सुमारे 1,000 शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये ऊस पिकासाठी AI च्या वापराची प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रयोगात योग्य लागवड कालावधी व जात निवड, जमिनीची घटती सुपीकता, खत-औषधांचा वाढता वापर, पाण्याचा अतिरिक्त वापर, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, कमी साखर उतारा, तोडणीचा योग्य कालावधी आणि वाढता उत्पादन खर्च यांसारख्या आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपाय शोधण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
 
 
AI आधारित ऊस शेती : प्रयोगातील नोंदविलेले निष्कर्ष
 
सादरीकरणात नमूद केलेल्या निष्कर्षांनुसार AI आधारित पद्धतीमुळे ऊस उत्पादनात सुमारे 40 टक्क्यांपर्यंत वाढ, साखर उतार्‍यात सुमारे दोन टक्क्यांची वाढ, खतांच्या वापरात 40 ते 50 टक्के घट आणि पाण्याच्या वापरात 50 टक्क्यांपर्यंत बचत साध्य झाल्याचे दाखविण्यात आले.‘हब आणि स्पोक’ मॉडेलमध्ये किमान 25 शेतकर्‍यांचा समूह तयार करून प्रशिक्षण देणे, स्वयंचलित हवामान केंद्रे व विविध सेन्सर्स बसविणे, मातीतील ओलावा मोजणे, उपग्रह प्रतिमा वापरणे आणि Fasal सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोबाईल अ‍ॅपवर पाणी कधी द्यायचे, फवारणी कधी करायची आणि पावसाची शक्यता काय आहे यासंबंधी सूचना देणे अशी कार्यपद्धती यशस्वीपणे वापरण्यात आली.
 
 
AI आणि नॉन AI प्लॉटच्या तुलनेत सादरीकरणात पाण्याच्या वापरात आणि उत्पादनाच्या कालावधीत फरक दाखविण्यात आला. पाटपाणी पद्धतीत एकरी सुमारे 1.5 ते 2 कोटी लीटर, ठिबक सिंचनात सुमारे 1.25 कोटी लीटर आणि AI आधारित ठिबक सिंचनात सुमारे 84 लाख लीटर पाणी लागल्याचे नमूद करण्यात आले. AI आधारित पद्धतीतील रोपे सुमारे 18 दिवसांत, तर नॉन अख रोपे सुमारे 25 दिवसांत तयार झाल्याचे दाखविण्यात आले. एका वाणात अख प्लॉटमध्ये सुमारे 150 मे. टन/एकर, तर नॉन AI प्लॉटमध्ये 68 मे.टन/एकर उत्पादन दाखविण्यात आले. तथापि, हे आकडे ADTच्या स्वतःच्या प्रयोगांवर आधारित असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, इतर भागांमध्ये त्यांचा वापर करण्यापूर्वी स्थानिक परिस्थितीत स्वतंत्र चाचण्या घेणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 
 
गावपातळीवर IoT, स्थानिक डेटा आणि AI
 
कृषी विस्तार अधिकारी डॉ.सचिन चव्हाण यांनी गावपातळीवर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबत स्वतःच्या अभ्यासावर आधारित मार्गदर्शन केले. त्यांच्या मते AI, डेटा आणि तंत्रज्ञानासोबत शेतकर्‍यांच्या स्वतःच्या नोंदींनाही महत्त्व आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली आहे. काही गावांमध्ये ग्रामपंचायत निधीतून IoTउपकरणे बसवून त्यातून मिळणारी माहिती मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाविस्तार अ‍ॅपद्वारे कृषी विद्यापीठांच्या शिफारशीही शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.
 
स्वतःच्या शेतातील कामे, हवामान आणि विविध निरीक्षणांची दैनंदिन नोंद ठेवून तयार केलेल्या निर्णय-साहाय्य प्रणालीमध्ये तापमान, थंडी, उष्णता आणि इतर हवामान घटकांचा समावेश करण्यात आला. AIची मदत घेतल्यानंतर या प्रणालीची अचूकता आणि उपयुक्तता वाढल्याचे सांगण्यात आले. मजूर, बियाणे, खते, औषधे, यांत्रिकीकरण आणि इतर निविष्ठांच्या खर्चाचे नियोजन करण्यासाठीही AI सक्षम निर्णय-साहाय्य प्रणाली उपयोगी ठरते.
 
 
शेतात AI तंत्रज्ञान, उपकरणे किंवा सेन्सर्स बसविल्याने सर्व समस्या आपोआप सुटत नाहीत. शेतकर्‍यांचा अनुभवाधारित स्थानिक डेटा, AIकडून मिळालेल्या सल्ल्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्याचा परिणाम यांचा सातत्याने मागोवा घेणे आवश्यक आहे. अपेक्षित परिणाम न मिळाल्यास प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
 
 
कोरडवाहू भागात ही बाब अधिक महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, उपकरणाने पाणी देण्याची सूचना दिली तरी संबंधित शेतात पाणी उपलब्ध नसेल किंवा ठिबक सिंचनाची सुविधा नसेल, तर त्या सल्ल्याची अंमलबजावणी शक्य होणार नाही. त्यामुळे उपग्रह मॅपिंग, मर्यादित संख्येतील सेन्सर्स आणि क्षेत्राच्या आकारमानानुसार उपकरणांची मांडणी करून खर्च कमी करण्यावर संशोधन आवश्यक आहे. प्रत्येक शेतात स्वतंत्र उपकरण बसविण्याऐवजी शेतकरी समूह किंवा क्लस्टरच्या माध्यमातून उपकरणे बसविण्याचा पर्याय अधिक व्यवहार्य ठरू शकतो. तंत्रज्ञानावरील गुंतवणूक पाच वर्षांच्या कालावधीत वसूल होईल का, याचेही नियोजन शेतकर्‍यांनी करणे आवश्यक आहे.
 
 
तूर आणि सोयाबीनसाठी AI : मराठवाड्यातील पुढील प्रयोग
 
मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि इतर संस्थांच्या सहकार्याने तूर पिकावर प्रयोग सुरू आहेत. सुमारे 50 शेतकर्‍यांसोबत कोरडवाहू शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुरीचे उत्पादन कसे वाढविता येईल, याचा प्रयोग केज येथील बारामती आणि ’कृषी विद्यापीठ, परभणी’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असल्याचे नमूद करण्यात आले. याच धर्तीवर कोरडवाहू सोयाबीन शेतीसाठीही प्रयोग करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मराठवाड्यातील शेती अनेकदा तुकड्या-तुकड्यांत विभागलेली असून सलग क्षेत्र उपलब्ध नसते. त्यामुळे अशा भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीत AIतंत्रज्ञान प्रभावीपणे कसे वापरता येईल, यावर स्वतंत्र प्रयोग आणि स्थानिक मॉडेल विकसित करणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कृषी सल्ला उपलब्ध करून दिल्यास प्रत्येक शेतकर्‍याच्या मोबाईलमध्ये स्थानिक कृषी सल्लागारासारखी निर्णय-साहाय्य व्यवस्था उपलब्ध होऊ शकते. या दिशेने संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे.
 
 
शेतकर्‍यांचा वाढता प्रतिसाद
 
AI आधारित कृषी सल्ल्याबाबत शेतकर्‍यांमध्ये उत्सुकता वाढत आहे. केज तालुक्यातील बनसारोळा येथील शेतकरी पंडित काकडे यांनी AI आधारित कृषी सल्ल्यात जैविक निविष्ठांच्या वापराबाबत शिफारसी उपलब्ध झाल्यास नैसर्गिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चात आणखी बचत होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
हदगाव, जि. नांदेड येथील शेतकरी सुषमा देव यांनी नैसर्गिक शेतीमध्ये अखचा उपयोग कितपत होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर वैयक्तिक पातळीवरील ओलावा संवेदक, उपग्रहाधारित माहिती आणि AI विश्लेषण यांच्या आधारे अधिक अचूक शिफारसी तयार करता येऊ शकतात, असे मार्गदर्शन करण्यात आले.
 
अंबाजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी येथील ’जिजाऊ महिला शेतकरी गटा’ने सोयाबीन पिकासाठी सुमारे 15 शेतकर्‍यांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच केज तालुक्यातील कानडी बदन येथील ’कृषिप्रधान शेतकरी गटा’नेही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
 
 
चर्चेदरम्यान विविध शेतकरी मंडळांनी AI आधारित सामूहिक शेती करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
 
 
सोयाबीन, तूर आणि आंबा यांसोबत पेरूसारख्या इतर पिकांमध्येही अखचा वापर करता येईल का, यावर संशोधन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे’ येथील प्रा.डॉ.ब्रिजेश अय्यर यांनी कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाईच्या सहकार्याने विविध पिकांमध्ये अखआधारित प्रयोग आणि संशोधन करण्याची भूमिका व्यक्त केली आहे.
 
 
कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाईचे प्रकल्प संचालक डॉ.उपेंद्र कुलकर्णी यांच्या मते, ’अधिकाधिक शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करू लागल्यास तंत्रज्ञानावरील खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. तंत्रज्ञानातील गुंतवणूक वाढली तरी पाणी, खते, कीटकनाशके आणि इतर निविष्ठांचा अनावश्यक वापर कमी झाल्यास एकूण उत्पादन खर्चावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.’
 
 
भविष्यातील शेतीची दिशा
 
कृत्रिम बुद्धिमत्ता हे शेतकर्‍याची जागा घेणारे तंत्रज्ञान नाही; ते शेतकर्‍याच्या अनुभवाला वैज्ञानिक माहितीची जोड देणारे निर्णय-साहाय्य साधन आहे. स्थानिक हवामान, माती, पिकांची अवस्था आणि पूर्वीच्या नोंदी यांचे एकत्रित विश्लेषण करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास AI मदत करू शकते. बीडसारख्या मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती असलेल्या जिल्ह्यात हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधिक आहे. स्वयंचलित हवामान केंद्र, खेढ, उपग्रहाधारित माहिती, मोबाईल अ‍ॅप आणि AI यांची सांगड घालून स्थानिक, हवामान-अनुकूल आणि शेतकरी-केंद्रित कृषी सल्ला प्रणाली विकसित करता येऊ शकते.
 
 
अधिक अचूक माहिती, वेळेवर निर्णय, निविष्ठांचा कार्यक्षम वापर आणि उत्पादनातील स्थैर्य या दिशेने AI नवी शक्यता निर्माण करत आहे. मात्र या शक्यतांचे प्रत्यक्ष परिणाम स्थानिक परिस्थितीतील शास्त्रीय चाचण्या, खर्च-लाभ विश्लेषण, शेतकरी सहभाग आणि सातत्यपूर्ण विस्तारकार्य यांच्या आधारेच निश्चित करता येतील. कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी शेती अधिक माहिती आधारित, निर्णयक्षम आणि हवामान-अनुकूल करण्याच्या दिशेने ही महत्त्वाची वाटचाल आहे.
 
 
लेखक : डॉ. उपेंद्र कुलकर्णी - संचालक, दीनदयाळ शोध संस्थान, अंबाजोगाई
डॉ. प्रमोद काळे - सेवानिवृत्त प्राध्यापक, शासकीय तंत्रनिकेतन, छत्रपती संभाजीनगर