@प्रा.अंबादास मेव्हणकर
7821814384
DUSU 2026च्या निवडणूक निकालाच्या विजयाकडे पाहिले तर हा केवळ एका विद्यार्थी संघटनेचा विजय नसून तरुणांमधील ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेचा आणि ABVPच्या वर्षानुवर्षांच्या प्रत्यक्ष रचनात्मक कार्याचा हा विजय मानला जात आहे. म्हणूनच आजच्या भारतातील Gen Z ने राष्ट्रहित आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असणार्या ‘अभाविप’ला पहिली पसंती दिल्याचे या निवडणुकांच्या निकालामधून स्पष्ट झाले आहे.
देशाच्या राजधानीत असलेले प्रमुख शिक्षणाचे केंद्र म्हणजे दिल्ली विद्यापीठ आणि याच दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (DUSU) 2026च्या निवडणुकीच्या निकालांनी पुन्हा एकदा देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर तरुण मतदारांचे महत्त्व वाढवले आहे. या निकालानंतर देशभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि Gen Z न यांच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी संघाच्या चारपैकी तीन प्रमुख पदांवर दणदणीत विजय मिळवत शैक्षणिक परिसरातील राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, तर उपाध्यक्ष पदावर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)ला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. त्यामुळे शीर्ष निर्णय घेणार्या नेत्यावर निकालानंतर टीका होत आहे, तर अन्य डाव्या विचारांच्या संघटना या निवडणुकीत कुठेहीचर्चेत किवा स्पर्धेत असल्याचे दिसले नाही. या निकालाच्या अनुषंगाने दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन, राहुल गांधी यांचे ’छात्रो की गूँज’ कार्यक्रम आणि देशभरातील तरुणांनी राष्ट्रवादी विचारांना दिलेले समर्थन या सर्वांचा मागोवा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हा केवळ एका विद्यार्थी संघटनेचा विद्यापीठ निवडणुकीतील विजय नसून तरुणांमधील ’राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेचा आणि ABVPच्या वर्षानुवर्षांच्या प्रत्यक्ष रचनात्मक कार्याचा हा विजय मानला जात आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये विद्यार्थी निवडणुका अनेक वर्षापासून बंद आहेत; मात्र, पंजाब, आसाम, दिल्ली, केरळम्, पश्चिम बंगाल व उत्तराखंड अशा काही राज्यांमध्ये प्रत्यक्ष पद्धतीने छात्र संघ निवडणुका होतात. यामध्ये देशाच्या राजधानीच्या ठिकाणी असलेले दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी निवडणुकांसाठी अतिशय नावाजलेले आहे. दिल्ली विद्यापीठाशी एकूण 91 संलग्न/घटक महाविद्यालये जोडलेली आहेत. विद्यापीठामध्ये 16 विद्याशाखा आणि 86हून अधिक शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. दिल्ली विद्यापीठाचा परिसर राजधानीच्या महत्त्वाच्या ठिकाणी पसरलेला आहे. त्यामुळे देशभरातून या विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. विशेषत: उत्तर भारतातील राजस्थान, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुका फक्त विद्यापीठापुरत्या मर्यादित नसून त्याचा देशातील राजकीय वातावरणावर मोठा परिणाम दिसून येतो.
DUSU 2026- पदांचे निकाल आणि मतांचा तक्ता
नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार आणि दुसर्या क्रमांकावर मत मिळालेल्या उमेदवारांची मतदानाची आकडेवारी खाली दिली आहे. त्याचबरोबर उमेदवारांच्या पक्ष संघटनेचा सुद्धा उल्लेख केला आहे. खालील मतदानाच्या तक्त्याचे नीट निरीक्षण केले तर लक्षात येते की या निवडणुकीत अध्यक्ष व संयुक्त सचिव पदासाठी उमेदवारांमध्ये ’काटे की टक्कर’ बघायला मिळाली तर उपाध्यक्ष पदावर दीपांशू शोकीन या अपक्ष उमेदवाराने विक्रमी मताने विजय मिळवला; मात्र अध्यक्ष व संयुक्त सचिव या दोन्ही जागांसाठी मतमोजणीच्या एकोणिसाव्या फेरीपर्यंत प्रचंड रस्सीखेच बघायला मिळाली. त्यानंतर शेवटच्या काही फेरीमध्ये अभाविपला बढत मिळाली आणि अध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव अशा तीन महत्त्वाच्या पदांवर विजय मिळाला. यातून हे लक्षात येते की मतदान करताना सुशिक्षित Gen Zने अतिशय विचारपूर्वक आपले मतदान केले आहे.
ABVPचा हा विजय तरुणांच्या मनातील राष्ट्रवाद आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सतत आणि शाश्वत पद्धतीने काम केल्याचे फळ असले तरीही दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीतील अन्य काही पैलू समजून घेणे आवश्यक आहे. या निकालांमागे काही प्रमुख गोष्टी स्पष्टपणे दिसतात.
राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रभाव
1949पासून अभाविप ही ’ज्ञान, शील, एकता’ हा मंत्र घेऊन देशभरात विद्यार्थीहितासाठी काम करणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना नेहमी राष्ट्राचा विचार आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व कार्यकर्त्यांमध्ये बिंबवले जाते. त्याचप्रमाणे आजचा तरुण वर्ग (Gen Z) हा केवळ पोकळ आश्वासनांवर विश्वास ठेवणारा नाही तर तो प्रश्न विचारणारा आणि त्याचे योग्य समाधान सांगणारा आहे. विश्लेषण आणि सत्यता तपासून नंतर निर्णय घेण्याची क्षमता आजच्या तरुण पिढीमध्ये आहे.
’राष्ट्र प्रथम’ ही विचारसरणी, भारताचा जागतिक स्तरावरील वाढता प्रभाव, सांस्कृतिक अभिमान आणि ’विकसित भारत’ या गोष्टींसोबत आजचा Gen Z न स्वतःला जोडताना दिसत आहे. अभाविपने हाच राष्ट्रवादी विचार तरुणांच्या भाषेत त्यांच्यापर्यंत यशस्वीपणे पोहोचवला आणि त्याच्या या मांडणीला मोठ्या प्रमाणात मतदानाच्या माध्यमातून पाठींबा मिळाल्याचे दिसून आले. पंजाब विद्यापीठातही अभाविपने सलग दुसर्या वर्षी अध्यक्षपदावर आपला उमेदवार निवडून आणला आहे. दिल्ली आणि पंजाब या दोन प्रमुख विद्यापीठांमधील हे यश भारतातील कॅम्पसमध्ये अभाविप आणि राष्ट्रवादी विचारसरणी अधिक मजबूत असल्याचे दाखवून देत आहे.
Gen Z विचारसरणीचे देशभरातील आकलन केल्यास लक्षात येते की आजचा तरुण ’राष्ट्र प्रथम’ या भावनेसह उत्तम दर्जाचे शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञानातील प्रगती, स्टार्टअप्स आणि करिअरच्या संधी याचाही विचार करतो आणि त्यात सहभाग सुद्धा घेतो. अभाविपच्या निवडणुकीच्या अजेंड्यात या सर्व घटकांचा समावेश असल्याने तरुणांनी अभाविपच्या उमेदवारांना पसंती दिली. भारतातील Gen Z हा राष्ट्रहित आणि सोबतच स्वतःचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी अत्यंत जागरूक आणि व्यावहारिक आहे, हेच यावरून दिसून येते.
अखंड संघटनात्मक कार्य
विद्यार्थी राजकारण हे केवळ निवडणुकीच्या काळात केलेल्या सोशल मीडिया प्रचारावर चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अभाविपची ताकद त्यांच्या वर्षभर चालणार्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी-कल्याणकारी उपक्रमांत आपल्याला दिसते. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील मदतीपासून ते वसतिगृहांच्या प्रश्नांपर्यंत, बस सुविधा यशस्वीपणे मिळवून देणे, नीट परीक्षा आंदोलनात प्रमुख भूमिका आणि कार्यकर्त्यांचा थेट विद्यार्थ्यांशी असलेला दैनंदिन संपर्क या संघटनात्मक कार्याच्या प्रभावामुळे विजयाचे सातत्य अभाविप राखत असल्याचे दिसते.
तिकीट वाटपातील समतोल
कोणत्याही निवडणुकीत योग्य उमेदवार योग्य वेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणे आवश्यक असते आणि हे काम अन्य संघटनापेक्षा अभाविपने नियोजित पद्धतीने केल्याचे दिसून येते. जातीय समीकरण आणि भाईचारा, पैसा, लॉबिंग, राजकीय दबाव या घटकांना थारा न देता विद्यार्थी हितासाठी काम करणार्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन अभाविप स्पष्ट संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवते. तर अन्य विरोधक याच समीकरणाच्या चक्रात अयोग्य निर्णय घेऊन अक्षम उमेदवारांना तिकीट देतात. उपाध्यक्ष या जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला तो NSUI या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून अपक्ष लढला, तर संयुक्त सचिव या जागेवर दुसर्या क्रमाकांचे मत घेतलेला विशेष यादव हा उमेदवारसुद्धा NSUI या संघटनेचा उमेदवार राहिला असता.
Gen Zच्या मतदानाचा राजकीय कल
आजच्या Gen Zतरुण मतदारांचा कल समजून घेतल्यास या निवडणुकीचे निकाल समजून घेण्यास मदत होईल. DUSU 2026च्या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबर रोजी 40.46% मतदान झाले, जवळपास 1.51 लाख तरुणांनी मतदान केले जे मागील तीन निवडणुकीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे निवडणुकीची मतदान प्रक्रिया आणि लोकशाहीवरील तरुणांचा विश्वास वाढत असल्याचे दिसते. Gen Z विचारसरणीचे देशभरातील आकलन केल्यास लक्षात येते की आजचा तरुण ’राष्ट्र प्रथम’ या भावनेसह उत्तम दर्जाचे शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञानातील प्रगती, स्टार्टअप्स आणि करिअरच्या संधी याचाही विचार करतो आणि त्यात सहभाग सुद्धा घेतो. अभाविपच्या निवडणुकीच्या अजेंड्यात या सर्व घटकांचा समावेश असल्याने तरुणांनी त्यांना पसंती दिली.
नकारात्मक राजकारणाला नकार
राहुल गांधी व काँग्रेसच्या छात्रों की गूँज या अभियानाला आणि एकूणच त्यांच्या विचारसरणीला शून्य जागा देऊन नकारात्मक राजकारणाला दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतदानाचा विचार केला तर लक्षात येते की, NSUIपेक्षा अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत चांगला लढा दिला; मात्र आजही NSUI या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेला तरुणाचा पाठींबा मिळाला नाही. म्हणजेच पेपरफुटी, बेरोजगारी आणि शैक्षणिक मुद्द्यांवरून विरोधक म्हणून NSUI विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली. नुकतेच दिल्लीत आंदोलन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टी यांचा या निवडणुकीत कुठेही प्रभाव दिसला नाही. SFI आणि अन्य डाव्या संघटना या निवडणुकीत नाममात्र शिल्लक असल्याचे दिसून आले. यावरून दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी निवडणुकीत नकारात्मक नॅरेटिव्हचा पराभव आणि राहुल गांधी आणि NSUI यांना तरुणाईचा स्पष्ट नकार असल्याचे दिसून आले. तर याउलट तरुणांचे प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडवणे, योग्य उमेदवारांना तिकीट देणे, स्थानिक संपर्क व राष्ट्रीय विचारांना घेऊन सोबत काम करणे या सकारात्त्मक राजकारणाने अभाविपला विजय मिळवून दिला.
या निवडणुकीमुळे देशभरात सर्वत्र तरुणांमध्ये राष्ट्रवादी विचार आणि सांस्कृतिक आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आहे. केवळ आंदोलने किंवा विरोधाचे राजकारण करण्यापेक्षा वर्षभर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन रचनात्मक काम करणार्या अभाविप या संघटनेला Gen Zने विजयाचा कौल दिला आहे. ‘कृतीविण वाचाळता व्यर्थ आहे’ या म्हणीप्रमाणे राजकीय पक्षांनी नकारात्मक पद्धतीने कितीही राष्ट्रीय अभियाने चालवली तरी प्रत्यक्ष कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क नसेल तर त्या अभियानांचे मतांमध्ये रूपांतर होत नाही हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. भारतातील Gen Z हा राष्ट्रहित आणि सोबतच स्वतःचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी अत्यंत जागरूक आणि व्यावहारिक आहे. राष्ट्रीय हिताशी जोडलेली आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करणारी ’अभाविप’ हीच आजच्या तरुण भारताची पहिली पसंती असल्याचे या विद्यार्थी निवडणुकांच्या निकालामधून स्पष्ट झाले आहे.