@सुधा कानडे
9867598224
युवा पिढीचे सध्याचे गतिमान आयुष्य, विवाहाच्या वेळी त्या वयात स्वतःची तयार झालेली मते, शिक्षणासाठी लांब वसतिगृहावर एकटे राहण्याची झालेली सवय, कामाच्या वेळेची अनिश्चितता, काळानुसार असलेले वेगवेगळे ताण तणाव हे सगळे लक्षात घेतले तरी सुद्धा, जर विवाह करून संसार करायचा असेल तर काळानुरूप वैवाहिक सुखी सहजीवनाचा विचारही आवश्यक आहे.
रोजच्या जीवनात, दूध कोणी आणायचे? छोटीला शाळेच्या बसवर कोणी सोडायचे? मावशीकडे जायचे आधीच ठरले होते, मग वेळ का नाही काढला? आज मित्राकडे/मैत्रिणीकडे जायलाच हवे आहे का? ... असे छोटे छोटे विषय स्वाभाविकपणे वादाला कारणीभूत होतात; पण ते तेवढ्या वेळेपुरते राहिले तर ठीक; परंतु काही वेळेला सामंजस्याचा अभाव आणि इगो यामुळे हे वाद विकोपाला जातात. त्या नंतर एकमेकांना सोडण्याची भाषा सुरू होते. अशा वेळेस, नक्की काय चुकते? याचा योग्य पद्धतीने विचार व्हायला हवा.
खरं तर, सुखी सहजीवन, यशस्वी सहजीवन हा विषय प्रत्येकाच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा असतो. जबाबदारीने विचारपूर्वक हे सहजीवन सुखी करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. त्यातही ज्यांनी प्रेमविवाह केलेला असतो, त्यांनी जोडीदाराची निवड स्वत:हून केलेली असते. त्यामुळे सहजीवन आनंदी, समाधानी करण्याची जबाबदारी या दोघांची जास्त असते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात, आजकाल ’वेळच नसतो हो’ किंवा ’वेळ मिळतच नाही हो’ असे म्हणत रोजच्या व्यवहारात मेसेजेस टाकून दिवस संपतो. काही घडत नाही तोपर्यंत आपलं बर चाललंय याला सहजीवन म्हणत नाहीत.
पूर्वीच्या काळी अवतीभवती घरात भरपूर माणसे, लहान मुलं असत. कौटुंबिक जबाबदार्याही जास्त, कधीतरी पैशाची चणचण असे. अशा अनेक अडचणींवर मात करून 50 वर्षे आदर्श संसार करणारेही होतेच व आहेत. त्याप्रमाणे आताच्या काळातील अडचणी विचारात घेऊन, योग्य उत्तरे शोधून, संसाराची वाटचाल समर्थपणे केली पाहिजे. म्हणजे सहजीवन अधिक आनंदी होऊ शकेल.
मानवी नातेसंबंध प्रेम, समजुतदारपणा, सहकार्य आणि परस्परांच्या मदतीने अधिक घट्ट होतात.
पतिपत्नीने नुसतं जोडीने राहणे, एकत्र राहणे म्हणजे सहजीवन असते का?
तर तसे नाही. आनंदी सहजीवन अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पहिले वर्ष रोमांचकारी असते; परंतु पुढे ते तसेच राहत नाही. या पुढे या सहजीवनात अनेक विषयांना, परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यासाठी आपली पात्रता, सामर्थ्य, जाणीव अधिक वाढवावी लागते. तरच सहजीवन यशस्वी होऊ शकते .
यशस्वी सहजीवनासाठी परस्परांनी (एक दुजे के लिये)
1. प्रेम व परस्परांवर विश्वास
2. आदर, सन्मान
3. एकमेकांच्या मतांचा स्वीकार आणि गुण व दोषांसहित स्वीकार (acceptance)
4. समजुतदारपणा व तडजोड (understanding and adjustment)
5. सहकार्य (co-operation)
6. बंधनात राहूनही स्वातंत्र्य देणे
7. मनमोकळा सुसंवाद
या सात वचनांनी, सात पावलांनी (सप्तपदी), सात फेरे यांनी सहजीवन सुखी होते.
पतिपत्नीच्या नात्यात एकमेकांना आधार वाटला पाहिजे(मैं हूँ ना!). काही कारणाने टूरवर किंवा कुठेही लांब असलात तरी, मनाने एकमेकांजवळ असल्याची भावना खूप महत्त्वाची असते.
काही वेगळ्या जोडीदारांमध्ये, इतरांपेक्षा थोडे वेगळे म्हणजे-
1. उशीरा लग्न झालेले.
2. वयात अधिक अंतर असलेले.
3. कुटुंबामध्ये अधिक जबाबदारी असलेले उदाहरण- आर्थिक जबाबदारी, भावंडांचे शिक्षण, लग्न इत्यादी.
अशा वेळेला, अशा जोडीदारांच्या सहजीवनाचा अधिक सतर्कतेने वेगळा विचारही करावा लागतो. त्यासाठी सुसंवाद आणि अधिक स्पष्टता असण्याची गरज असते.
नवीन काळातील जोडीदारांनी ’वरील सात वचनांबरोबरच’ काळानुसार विचार करणे आवश्यक आहे. विचार करतांना अयोग्य हट्ट किंवा दुराग्रह नसावा. नियम हे सुनियोजनासाठी असावेत. त्यात कठोरता नसावी व परिस्थितीनुसार लवचीकता असावी.
1. वेळेचे नियोजन- एकत्र बसून वेळेचे नियोजन करावे. जो वेळ उपलब्ध आहे तो जोडीदाराला, आईवडलांना, मुलांना कसा देता येईल? हा वेळ जर कमी असेल तर ’क्वांटिटी ऑफ टाईम’ पेक्षा ’क्वालिटी ऑफ टाईम’चा विचार करावा. म्हणजे योग्य दिशेने विचार करावा. वेळ अमूल्य असतो. आयुष्यातील गेलेला वेळ कधीच परत येत नाही.
2. आर्थिक नियोजन- आर्थिक जबाबदार्या लक्षात घेऊन (वादविवाद होऊ न देता) योग्य पद्धतीने आखणी व नियोजन केले पाहिजे. ’तुझा पैसा’, ’माझा पैसा’ असे न म्हणता आपला पैसा असा विचार करावा.
एकमेकांच्या आर्थिक व्यवहारांची स्पष्टता असावी.
3. घरातील कामाची विभागणी - कामाची विभागणी योग्य पद्धतीने करावी. कुठलेही काम करण्याची तयारी असावी. कधी घरकामाची बाई आली नाही, पाहुणे येणार असतील, मूल आजारी असेल इत्यादी, तर अशा परिस्थितीत हा संसार दोघांचा असल्याने, दोघांनी मिळून एकमेकांच्या साथीने, सहचर्याने घरकामे करावी.
4. जोडीदाराबरोबरील वादविवाद - दोन व्यक्ती एकत्र राहिल्या की थोडाफार वाद होतोच. वादविवाद झालाच तर त्याचे रूपांतर वादळात होऊ नये याची दोघांनीही दक्षता घ्यावी.
* मन दुखावेल असे एकमेकांना टोकाचे बोलू नये.
* अयोग्य शब्द टाळावे. संयमित भाषा वापरावी.
* दुसर्याची चूक दाखवताना टोकाचा संताप नसावा. भावनेचा अतिरेक टाळावा.
* वादामध्ये मुलांचा उपयोग करून घेणे टाळावे.
* आपल्या स्वतःच्या स्वभावाला प्रत्येकाने थोडी मुरड घालणे आवश्यक आहे.
* जोडीदाराकडून अपेक्षा जरूर असाव्यात; पण इतक्याही असू नयेत की ज्याचे ओझे होईल.
* तू-तू,मी-मी करू नये. आपला इगो (अहंकार) बाजूला ठेवावा, त्यासाठी मनाची पक्की तयारी करावी लागते. घर म्हणजे युद्धभूमी नव्हे. म्हणून रबर तुटेल इतकं ताणू नये.
* घरातील वातावरण गंभीर व दडपणाचे न राहता खेळीमेळीचे राहील असे पाहावे.
* बाहेरील जगात डोकावून बघितले तर अनेक प्रकारची दुःख दिसतात त्यापेक्षा आपली दुःखे लहान आहेत असे लक्षात येते व आपण खूप सुखी आहोत असे समजते.
* संसार सुखासाठी काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो.
* कुटुंब संस्था टिकविणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते.
5. मुलांचे संगोपन - मूल जन्माला घालणे तुलनात्मक सोपे असते; परंतु मूल वाढविणे व मोठे करणे फार कठीण असते. संगोपन करताना काळानुरूप येणार्या कोणत्या अडचणी आहेत हे लक्षात घ्यावे. या विषयावर एकमेकांशी सतत संवाद असावा. सहजतेने चांगले व संस्कार करावे. गरजेनुसार योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा. आजी-आजोबा आणि नातवंडे यांना एकमेकांचा सहवास लाभावा. मुलाला वाढविणे हा वादाचा मुद्दा होऊ नये. त्याला वाढवताना सहज व स्वाभाविक आनंद दोघांनाही मिळाला पाहिजे. सुजाण आणि सजग पालकत्व हा स्वतंत्र विषय आहे.
6. पालकांची जबाबदारी - या सहजीवनामध्ये पालकांची जबाबदारी व त्यांच्या संबंधी विचार हा तितकाच महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे हा विषयही खूप कौशल्याने व जबाबदारीने पेलला पाहिजे. त्यासाठी समतोल (balance) राखावा लागतो. वृद्ध पालकांच्या देखभालीचे नियोजन करावे.
7. आम्ही दोघे - विवाह बंधनामुळे दोन कुटुंबे एकत्र येतात. एकमेकांच्या पालकांचा, नातलगांचा आदर करावा. वैवाहिक जीवनात ’तू आणि मी’ असे नसून आम्ही दोघे असा विचार असावा. आमचे आईवडील, आमचे नातलग, आमचे मूल, आमचा पैसा, आमचे घर, आमचा संसार अशी भाषा असावी.
विचारांमधील हा साधा बदल मोठा फरक घडवून आणू शकतो. या व्यतिरिक्त अजूनही दोन विषय महत्त्वाचे आहेत.
1. प्रसारमाध्यमांचा प्रभाव ः अलीकडील काळात समाजावर प्रसारमाध्यमांचा प्रभाव आणि त्यांचे परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसतात. टिव्ही, मोबाईल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, गेम्स इत्यादी ’आभासी जगाच्या’ प्रभावाने स्पर्धा, अपेक्षा, ईर्षा जास्त प्रमाणात वाढत आहे. तसेच जीवनशैलीचा दर्जा घसरत आहे. माणूस एकटा पडत चाललाय.
या आभासी जगताचा (Virtual World) सहजीवनावरही खूप गंभीर परिणाम होतोय. सध्याच्या काळात मोकळा वेळ मुळातच कमी असतो. तो वेळ जर Virtual Worldसाठी वापरला आणि सतत हातात मोबाईलचा वापर केला तर ’सहवास आणि संवाद’ याच्या अभावी सहजीवनावर गंभीर परिणाम होतात. म्हणून आपल्या हातात रिमोट आहे हे लक्षात ठेवावे व दक्षता घ्यावी. आभासी माध्यमांच्या आहारी न जाता (कामाच्या ठिकाणचा महत्त्वाच्या फोन व्यतिरिक्त) विशेषेकरून, काही काळ ठरवून या माध्यमांपासून लांब राहिले पाहिजे आणि हा वेळ जोडीदाराला, मुलांना दिला पाहिजे. सहवास आणि संवाद वाढविला तरच सहजीवनातला आनंद वाढेल. अन्यथा गेलेला तारुण्याचा काळ कधीच परत येणार नाही.
2. पर्यटन ः अलीकडे प्रत्येक शनिवार-रविवार घराबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा बाहेर जाण्याने मनोरंजन होते व क्षणैक आनंद मिळतो. फ्रेश होण्यासाठी एखाद्या सुट्टीला जरूर बाहेर जावे; परंतु काही वेळेला सुट्टी घरातच एकत्रितपणे घालवावी. एकत्र जेवावे, विचारांची देवाणघेवाण करावी. गेल्या आठवड्यातील राहिलेले विषय पूर्ण करावे. पुढील आठवड्याचे प्लॅनिंग करावे.
सुसंवादाला पर्याय नाही. कारण संवाद (Communication) हा माणूस जोडण्याचा पूल आहे. या वेळेचा उपयोग मनं जुळवण्यासाठी करावा. त्यामुळे पुढील सहप्रवास अधिक सुकर होईल.
पतिपत्नी हे दोघे जीवनसाथी असतात. संसारात सतत अडचणी येतच असतात. या येणार्या अडचणींना दोघांनी मिळून सामोरे जावे.
दोघेही संसाररथाची दोन चाकं असतात. दोघेही समान असतात. त्यामुळे दोघांचेही व्यक्तिमत्त्व व विकास महत्त्वाचा असतो. विकासासाठी एकमेकांना प्रोत्साहन द्यावे व मदत करावी. प्रसंगी एकमेकांचे कौतुक (appreciation) करावे त्यामुळे जोडीदार सुखावतो. दोघेही एकमेकांना परस्परपूरक असावे.
दोघांमध्ये मैत्रीचेही नाते असावे. एकमेकांच्या बंधनात राहूनही, मोकळा श्वास घेता येईल असे स्वतंत्र अवकाशही जोडीदाराला दिले पाहिजे. दोघांनीही आपापली स्पेस सांभाळता सांभाळताच एकमेकांच्या भावजीवनामध्ये संपूर्णता विलीन होण्याची कला साध्य केल्यास वैवाहिक जीवन आनंदी होईल हे ध्यानात घ्यावे.
आदर्श संसारासाठी आपल्या समोर समर्थपणे संसार पेलूनही, सामाजिक कार्य करण्यार्या जोडप्यांचा आदर्श आपण नेहमी ठेवावा. विवाह करणे तसे सोपे आहे; पण एकमेकांना समजून घेऊन, सांभाळून, मुलांची व आईवडिलांची जबाबदारी पेलून संसाररथ चालविणे कठीण आहे. हे कठीण असले तरी संसार यशस्वी व समाधानी होण्यासाठी हे आव्हान पेलणे दोघांसाठीही हितकारकच असणार आहे. शेवटी कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. दोन अपूर्ण व्यक्तींनी नेहमीकरीता एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना आदर व प्रेम देणे आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, म्हणजे सुखी वैवाहिक जीवन होय.