“बाळासाहेब नाईक : संघाच्या साधनेतील एक सुमधुर पुष्प” - स्वामी गोविंददेव गिरी महाराज

विवेक मराठी    26-Sep-2026
Total Views |

vivek 
छत्रपती संभाजीनगर: “लोण्याचा गोळा आणि त्यात मिसळलेला चंदनाचा सुगंध याचा जसा अनुभव येईल, तसा अनुभव बाळासाहेब नाईकांच्या व्यक्तिमत्त्वाचा होता. म्हणजे लोण्याच्या गोळ्यासारखी मृदुता आणि चंदनासारखी सद्गुणांची सुगंधी झुळूक त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून सतत जाणवत असे. संघाच्या प्रवासात आम्ही अशोकजी सिंघल, जगन्नाथराव जोशी यांसारखे अनेक कठोर प्रचारक पाहिले, परंतु बाळासाहेब नाईक हे संघाच्या साधेनेतील एक सुमधुर पुष्प होते. इतक्या कठोर स्वभावाच्या, वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्तींना एकत्र बसवून त्यांच्यात समन्वयाचा सेतू निर्माण करणे ही संघाची साधना आहे, विशेषता आहे,” असे उद्गार पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले.
 
 
’साप्ताहिक विवेक’, ’विश्व हिंदू परिषद-देवगिरी प्रांत’, आणि ’निर्मलोत्तम न्यास’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाचे आणि पूजनीय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘समन्वयमहर्षी : बाळासाहेब नाईक’ आणि दीपक जेवणे लिखित ‘स्थितप्रज्ञ’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. हा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाराजांसोबत राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे, विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री स्वामी विज्ञानानंदजी, विहिंपचे सहसत्संग प्रमुख दादा वेदक आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, संविधान अभ्यासक पद्मश्री रमेश पतंगे उपस्थित होते.
 
 
महाराज पुढे म्हणाले, “बाळासाहेबांनी ज्या समन्वय मंचाची स्थापना केली, त्यावेळी त्यांनी ‘समन्वय’ हा शब्द निवडला. कारण समन्वय हा भारताच्या हृदयातच आहे. भारत सदैव समन्वय करत आला आहे आणि समन्वयाचे दर्शन घडवत आला आहे.
 
बाळासाहेबांनी आपल्या कल्पनेतून निर्माण केलेल्या एका चित्रातून समन्वयाची अतिशय सुंदर कल्पना स्पष्ट केली होती. एका बिंदूपासून वर्तुळापर्यंत अनेक छोटे-छोटे कण जातात. ते वर्तुळाच्या परिघापर्यंत पोहोचतात; पण त्या सर्वांचा संबंध मूळ केंद्राशी असतो. वर्तुळाचा परिघ कितीही मोठा होत गेला, तरी त्या सर्वांची दृष्टी जर केंद्राकडे असेल, तर समन्वय आपोआप घडत राहतो.“
”संपूर्ण विश्वाच्या समन्वयाचा मूलभूत आधार काय? यालाच पंडित दीनदयाळजींनी ‘एकात्मभाव’ म्हटले आहे. हा मूलतः भारतीय दर्शनाचा आणि त्याचबरोबर वैश्विक दर्शनाचा विचार आहे. आपण संपूर्ण विश्वामध्ये विविधता पाहतो आणि ‘विविधतेत एकता’ असा शब्दप्रयोग करतो; पण विविधतेमध्ये एकता निर्माण करण्याची आवश्यकता नाही; विविधतेमध्ये आधीपासूनच असलेल्या एकत्वाचे दर्शन घेण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला अनेक फांद्या फुटतात, असंख्य पानं येतात, फळं येतात; पण त्याचे मूळ एकच असते. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वाचे मूलतत्त्व एकच आहे, ते म्हणजे, आत्मतत्त्व. त्या तत्त्वाची अनुभूती घेणे, त्याला प्राप्त करणे, हाच अध्यात्माचा मार्ग आहे.”
 
 
”म्हणूनच आत्मज्ञान प्राप्त करणे आणि त्या आत्म्यातून सहज उद्भवणार्‍या आनंदाच्या अनुभूतीमध्ये रममाण होणे, हे सर्व धर्माचे आणि सर्व पंथांचे अंतिम गंतव्य आहे. ज्याने संपूर्ण विश्वामध्ये एकत्व पाहिले, त्याच्यासमोर करण्यासाठी काय उरते? परंतु ज्यांना हे एकत्व दिसलेले नाही, ते विनाकारण आपापसात लढत राहतात, भांडत राहतात. अशा लोकांना शांत करणे, त्यांना एकत्वाचे दर्शन घडवणे, हे ज्ञानी माणसाचे काम असते. हेच काम बाळासाहेबांनी आयुष्यभर केले. सर्व स्तरांवर केले. हेच संघकाम आहे. याच सत्याचा साक्षात्कार आपल्याला संपूर्ण जगाला करून द्यायचा आहे. विश्वाचे मांगल्य साकार करायचे आहे. त्यासाठी केवळ मृदू होऊन चालणार नाही, तर जिथे वाईटांशी भिडण्याची वेळ येईल तिथे शंखनाद करणेच गरजेचे आहे. या सर्व गोष्टींना एकत्र घेऊन चालणारे विद्यालय म्हणजे संघ आणि या संघाच्या दिव्य वृक्षावर उमललेल्या अत्यंत सुमधुर पुष्पांपैकी एक म्हणजे बाळासाहेब नाईक.”
 
 
”बाळासाहेबांसारख्या अनेकांनी अनेक वर्ष पश्चिम बंगालच्या लोकमनाची जी मशागत केली त्याचे फलित म्हणजे 2026मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेले परिवर्तन. अशा प्रकारचे परिवर्तन सर्वत्र घडविण्याची हिंमत आणि तयारी करायची असेल तर, सर्व प्रकारचा त्याग करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. हे केल्याशिवाय आपल्या जीवनाची सार्थकता नाही. हा क्रांतिकारी युगाचा काळ आहे, आणि हीच परिवर्तनाची अमृतवेल आहे. हे परिवर्तन घडविण्यासाठी कोण कोण सिद्ध आहेत? हा प्रश्न आज बाळासाहेब त्यांच्या अत्यंत प्रसन्न हास्याने जणू आपल्याला विचारत आहेत. केवळ बाळासाहेबांच्या स्मरणार्थ ग्रंथ प्रकाशित करून ते प्रसन्न होणार नाहीत, तर आपल्याला धैर्याने आणि निश्चयाने त्यांना एक वचन द्यायचे आहे. ‘होय, आम्ही तेच करू जे आपण केले. जे आपल्याला अभिप्रेत होते, तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करू.”’
 
 
”‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे म्हणणारी एकही जीभ भारतामध्ये राहू नये, अशा प्रकारचे परिवर्तन आपल्याला घडवायचे आहे. यातूनच विश्वाचे कल्याण साध्य होईल. विश्वाच्या कल्याणासाठी भारत समर्थ होणे आवश्यक आहे आणि भारताच्या सामर्थ्यासाठी हिंदू समाज संघटित राहणे आवश्यक आहे. केवळ ‘बटेंगे तो कटेंगे’ एवढेच म्हणणे योग्य नाही. तर ‘बटेंगे तो कटेंगे’ हे सत्य आहे; पण ‘घटेंगे तो भी कटेंगे’- हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे.”
 
 
”हे सर्व आपण का करायचे आहे? तर ती परमात्म्याची पूजा आहे आणि ही पूजा विधीवत शिकविणारे केंद्र म्हणचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. माझ्या दृष्टीने संघ ही केवळ एक सामाजिक संस्था नाही, तर संघ हा एका आध्यात्मिक अधिष्ठानावर उभा असलेला संघटनात्मक प्रवाह आहे, आणि त्या प्रवाहातील एक मोती म्हणजे बाळकृष्ण उत्तमराव नाईक.”
 
 
“भारतीय संस्कृतीचे जे महान वैशिष्ट्य आहे, ते समन्वय हेच आहे. निरनिराळ्या विचारधारांचा, संकल्पनांचा अत्यंत सुंदर असा मेळ घालायचा आणि सर्वांतील चांगलं घेऊन मार्गक्रमण करायचे हे काम बाळासाहेबांनी कृष्णभावाने पूर्ण केले. तसेच भगवान गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातील ब्रह्मभाव प्रत्यक्ष जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब,” असे गौरवोद्गार पद्मश्री रमेश पतंगे यांनी काढले.
 
 
“मृदूता, सहजपणा, साधेपणा, विनयशीलता हे बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे सुवर्णालंकार होते. संघाने त्यांना ज्या ज्या जबाबदार्‍या दिल्या त्या सर्व क्षेत्रात बाळासाहेबांनी आपल्या निरलस कार्याचा ठसा उमटविला. सेवा आणि सत्संग या दोन जीवनमूल्यांचा आधार घेऊन त्यांनी पश्चिम बंगाल ढवळून काढला आणि केष्टोदा म्हणून ते नावारूपाला आले, त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे,” असे उद्गार दादा वेदक यांनी काढले.
 
 
“पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट आणि नक्षलांचे राज्य होते. अशा भागात बाळकृष्ण नाईक प्रचारक म्हणून आले. संघशाखेच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून तिथल्या लोकांची मनं त्यांनी जिंकली आणि बंगालचे ’केष्टोदा’ झाले. त्यांनी सुरू केलेले ’वर्ल्ड बुद्धिस्ट कल्चरल फाऊंडेशन’चे काम त्यांच्या प्रेरणेने आम्ही सुरू ठेवले आहे, हीच आमच्याकडून त्यांना श्रद्धांजली,” असे स्वामी विज्ञानानंदजी म्हणाले.
 
 
“खांद्यावर भगवा घेऊन बाळासाहेबांनी रात्रंदिवस कष्ट केले. समन्वय साधत संपूर्ण जग फिरले. कुठलीही लालसा, अपेक्षा न ठेवता आपले जीवन संघासाठी वाहिले, देशासाठी वाहिले. अपार कष्ट करून शेवटी कुशीनगर येथे आपला देह ठेवला. त्यांच्या कार्याला शतश: प्रणाम,” असे उद्गार हरिभाऊ बागडे यांनी काढले.
 
 
ग्रंथाचे प्रास्ताविक दिलीप कस्तुरे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती संभाजीनगरचे विवेकचे प्रतिनिधी राजीव जहागीरदार यांनी केले, तर डॉ. प्रदीप जब्दे यांनी आभार प्रदर्शन केले.