तर्काच्या गर्दीत हरवलेली भाबडी श्रद्धा आणि ‘हनुमान अंश’

विवेक मराठी    26-Sep-2026   
Total Views |

hanuman ansh movie
तर्काच्या चौकटीत अडकलेल्या मनाला कधीकधी निवांतपणाची गरज भासते. तंत्रज्ञानाच्या गदारोळात आपण बर्‍याच गोष्टींच्या मागे धावत असतो; पण त्या धावपळीत आत कुठेतरी शांततेचा शोध सुरू असतो. भावना आणि नि:शंक श्रद्धा यांमधील धूसर होत चाललेला धागा पुन्हा कसा गवसतो, यासाठी विशाल चतुर्वेदी दिग्दर्शीत नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा सिनेमा पाहायला हवा.
पूर्वी जेव्हा टीव्हीवर ’रामायण’, ’महाभारत’ यांसारख्या मालिका बघितल्या जायच्या किंवा ’संत तुकाराम’सारखे सिनेमे बघितले जायचे, तेव्हा सर्वच ते अतिशय भक्तिभावानं बघायचे. टीव्हीवर रामायण लागलं आणि रामाच्या भूमिकेतले अरुण गोविल दिसले की, लोक त्यांना हार घालायचे. तेव्हा त्यात काहीही विचित्र वाटायचं नाही. टीव्हीवरचा रामही रामच वाटायचा. ज्ञानेश्वर माउली भिंत चालवायचे, रेड्याच्या तोंडून वेद वदवायचे आणि आपण तोंडात बोट घालून ते प्रसंग बघायचो. सुदाम्याचे पोहे खाऊन कृष्ण तृप्त व्हायचा आणि सुदामा घरी परतला की त्याचं घर दैवत्वानं भरून गेलेलं असायचं. तुकारामांची गाथा तरायची, पुष्पक विमान यायचं आणि त्यांना वैकुंठाला घेऊन जायचं, तेव्हा नकळत हात जोडले जायचे.
 
 
अर्थात मी ह्यातील चमत्कारांविषयी बोलत नाहीये. तर त्या भावाविषयी बोलत आहे. तो एक वेगळाच काळ होता.
भक्ती आणि कल्पना, देव आणि गोष्ट, चमत्कार आणि श्रद्धा या सगळ्यांमध्ये आपण अगदी सहजपणे वावरत होतो. मनावर तर्काची, शंकेची, चर्चेची इतकी गर्दी नव्हती. ‘हे कसं शक्य आहे?’ हा प्रश्न तेव्हा पडत नसे. सगळ्या गोष्टी समजून घेण्याची घाई नव्हती. काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात, एवढंच कदाचित मनाला माहीत होतं. मग आपण मोठे झालो आणि मोठे होता होता आपल्यातलं काहीतरी मागे पडलं. प्रत्येक गोष्टीमागचं कारण शोधू लागलो. प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू लागलो. सोशल मीडियाने तर श्रद्धेलाही वादाचा विषय करून टाकलं. कधी अति-तार्किकतेचा अभिमान, कधी आपल्या बुद्धिमत्तेचाच नकळत अहंकार.
 
 
आणि अशा वेळी ’हनुमान अंश’सारखा सिनेमा येतो. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा सुरुवातीपासूनच एखाद्या पारंपरिक ‘बायोपिक’सारखा वाटत नाही. इथे मोठमोठ्या घटना नाहीत. आयुष्याला नाट्यमय बनवण्यासाठी उगाचच प्रसंगांची गर्दी केलेली नाही. सततचे ट्विस्ट नाहीत. मोठा खलनायक नाही. प्रेक्षकांना भारावून टाकण्यासाठी भव्य सेट्स, अफाट स्पेशल इफेक्ट्स किंवा मोठमोठे चमत्कारही नाहीत. कथा साधी आहे.कदाचित आजच्या सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर खूपच साधी; पण कदाचित याच साधेपणात या सिनेमाचं खरं सामर्थ्य आहे.
 
 
म्हणून एक महत्त्वाची गोष्ट केली आहे. त्यांनी बाबांना ‘देवत्व सिद्ध करण्याचा’ प्रयत्न केलेला नाही. त्यांच्याभोवती एखादं भव्य, अलौकिक सिनेमॅटिक विश्व उभं करण्याऐवजी त्यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग, काही माणसं आणि काही अनुभव यांच्यामधून त्यांचं व्यक्तिमत्त्व हळूहळू उलगडत जातं. ”Divine Detour : That Changed My Life” ह्या त्यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. लेखक-दिग्दर्शक, कथा, पटकथा आणि संवाद असे सर्व काही त्यांनीच हाताळले आहे.
...आणि बायोपिक म्हणून हा साधेपणा मला फार आवडला.कारण एखाद्या संताचा जीवनपट म्हणजे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक चमत्कारांची यादी असायलाच हवी, असं नाही. उलट, प्रेम, सेवा आणि दया एखाद्या साध्या माणसाला संतत्व देतात. चमत्कार नाही तर इष्टदेवाप्रती संपूर्ण समर्पण, मनाचे पावित्र्य, भाबडेपणा आणि समोरच्या व्यक्तीप्रती अपार करूणा इतकंच प्रत्यक्ष देव व्हायला पुरेसं असतं. बाकी सर्वकाही आपसूक घडून येतं. सिनेमामध्ये चमत्कार दाखवले असतील तरी ते ह्या मनाच्या शुद्धतेहून मोठे होत नाहीत. सिनेमा मानवी भावांनाच मोठे दर्शवतो. त्यामुळेच दाखवलेल्या अनेक प्रसंगांमध्ये फार मोठी नाट्यमयता नाही आणि तरीही ते भावतात.
 
 
बाबांची भूमिका करणार्‍या शोभिनव सत्यांचं कामही याच कारणामुळे लक्षात राहतं. त्यांच्या अभिनयात फारसा आविर्भाव नाही. ते सतत ‘मी संत आहे’ असं सांगत नाहीत. देहबोली, चेहर्‍यावरचा निवांतपणा आणि संवादांमधला सहजपणा यांतून व्यक्तिमत्त्व उभं राहतं. लहानपणीच्या बाबांची भूमिका करणारा व्हिहान शेडगे आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसणारे कलाकारही ही सलगता टिकवून ठेवतात.
 
 
चंदन आनंद यांनी साकारलेला डॉ. राम नंदन भोसले हा आणखी एक महत्त्वाचा धागा आहे. कारण भक्ती ही केवळ मंदिरात किंवा आश्रमात घडणारी गोष्ट नाही; ती एखाद्या माणसाच्या आयुष्यात कशी प्रवेश करते, त्याला आतून कशी बदलते, हे दाखवण्यासाठी असा मानवी संदर्भ आवश्यक असतो.
 
 
हा सिनेमा मनातला शांत भाव जागृत करायला आणखी एक कारणही आहे ते म्हणजे त्याचं चित्रण. फार बजेट नसूनही अत्यंत नैसर्गिक वातावरण हे त्या साधेपणात भरच घालतं. कधी डोंगर, कधी जंगल, कधी धुकं, कधी रस्ते, कधी एखादं छोटंसं गाव... आणि बरोबरीने एखाद्या characterप्रमाणे सोबत असतं ते म्हणजे पाणी-नदी! सिनेमात नदीचे असे खूप सीन आहेत, ज्यामध्ये ती एखाद्या साक्षीदाराप्रमाणे आहे. कॅमेरा निसर्गाकडे केवळ ‘सुंदर दृश्य’ म्हणून बघत नाही. त्या सगळ्या शांततेला कथेत एक वेगळीच जागा मिळते. त्यामुळे सिनेमा पाहताना अनेकदा संवादापेक्षा एखादा लांब शॉट जास्त काही सांगून जातो.
 
 
कदाचित म्हणूनच या सिनेमाचा कमी बजेट हा त्याची मर्यादा न वाटता त्याच्या सौंदर्याचाच एक भाग वाटतो. उपलब्ध माहितीनुसार चित्रपट अतिशय माफक बजेटमध्ये बनवला गेला; तरी खूप प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचला आहे आणि खूप व्यवसाय केला आहे.
 
 
भव्यता नसली तरी वातावरण आहे. दिमाख नसला तरी प्रामाणिकपणा आहे आणि सर्वात महत्त्वाचं-दाखवण्याची घाई नाही.सिनेमा आपल्याला काही सिद्ध करून दाखवत नाही. तो तर्काने पटवून देत नाही. तो एवढंच म्हणतो-अडचणीच्या प्रसंगी ‘मी आहे.’ कदाचित भक्तीचा सगळ्यात साधा अर्थ हाच असावा.
 
 
आयुष्य नेहमी तार्किक नसतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याकडे नसतं. प्रत्येक संकटावर आपली बुद्धी, आपली ताकद, आपली योजना पुरेशी पडत नाही. म्हणूनच कधी ना कधी कुणाच्या तरी चरणी पडावं लागतं. डॉक्टर असो, समुपदेशक असो, मित्र असो, अगदी ज्योतिषी किंवा एखादा अदृश्य आधार. भक्ती म्हणजे स्वतःला दुबळं समजणं नाही. अहंकारातून थोडा वेळ बाहेर पडणं आहे आणि हनुमान अंश हेच अगदी हळू आवाजात सांगतो; पण त्याचबरोबर नीम करोली बाबा प्रयत्नवादाचाही पुरस्कार करतात. आजारांवर वैद्याकडे जाण्याचा सल्ला देतात, तर अनेकांना मानसिक आधार देतात.
 
 
सगळ्यात शेवटी मात्र या सिनेमाबद्दल मला सांगावसं वाटतं ते म्हणजे याची गाणी. अगदी मनापासून सुंदर. ’ह्रिदयमे जिनके सीताराम...’ हे गाणं पुन्हा एकदा लेखन, कंपोज आणि गायन सर्वकाही विशाल चतुर्वेदी ह्यांचेच आहे. ’जब जिद पे आयी पार्वती’, ’मैने तेरेही भरोसे’, ’आवागमन मिटा दो भोले शंकर’, ’जय हनुमान’, ’हे खरारी’, ’सियावर रामचंद्र की जय’ ही सर्व गाणी भावविश्वाचा एक अतूट भाग बनून परिपूर्ण अनुभव देतात. खास करून ’ह्रिदयमे जिनके सीताराम...’ हे पद सिनेमा संपल्यानंतर मनात राहतं. ते एक भावना म्हणून राहतं.
 
 
आपण कितीही मोठे झालो, कितीही प्रश्न विचारले, कितीही तर्क केले, तरी मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात अजूनही एक मूल आहे. ज्याला चमत्कारावर विश्वास ठेवायला आवडतो. ज्याला हनुमानाचं नाव ऐकलं की नकळत हात जोडावेसे वाटतात. कदाचित म्हणूनच ’हनुमान अंश’ इतका भिडतो. प्रत्येकाच्या आत असा एक कोपरा असतो ज्यावर काळाच्या ओघात तर्काचे, शंकेचे, अहंकाराचे आणि असंख्य वादांचे थर चढलेले असतात; पण तो विझलेला नसतो. फक्त झाकला गेलेला असतो. ’हनुमान अंश’ आपल्या मनातला तो कोपरा पुन्हा उघडतो. आपल्याला पुन्हा त्या दिवसांत नेतो आणि सिनेमा संपल्यावर मनात एकच भावना उरते - काही गोष्टींवर प्रश्न विचारण्याआधी, काही गोष्टी समजून घेण्याआधी, काही गोष्टी सिद्ध करून घेण्याआधी...कधी तरी पुन्हा एकदा फक्त हात जोडून पाहावं. कारण नि:शंक श्रद्धा ही कदाचित हरवत चाललेली गोष्ट आहे.आणि ती हरवू नये म्हणून, कधी-कधी एखादा साधासा सिनेमा पुरेसा असतो.
 

अ‍ॅड. विभावरी बिडवे

बी. ए. (मानसशास्त्र), एल एल. बी. पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतर विषयक वकिली सुमंत्र सेंटर ह्या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत. कोथरूड, पुणे येथील वस्त्यांमध्ये सदर संस्थेतर्फे उपचारात्मक अभ्यासिका चालविल्या जातात. पूर्वी दिव्य मराठी मध्ये थोडे कायदेविषयक व इतर लिखाण. इतरत्र स्फुट लेखन.