‘स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास।’संतकवयित्री जनाबाईंची अभंगवाणी

विवेक मराठी    26-Sep-2026   
Total Views |

vivek
संतकवयित्री जनाबाईंची अभंगवाणी ही एका कष्टकरी, श्रमिक वर्गातील महिलेची भावकविता आहे. स्त्रीसुलभ भावभावनांचे उत्कट शब्ददर्शन आहे. भक्ती आंदोलनातील वारकरी पंथाने स्त्रीवर्गाला दिलेल्या स्थानाचे व मानाचे ते दर्शन आहे. जनाबाई ‘दासी’ म्हणवून घेण्यात धन्यता मानते. कारण ती गुलामगिरी किंवा वेठबिगारी नसून उच्चतम पारमार्थिक अवस्था आहे. जनीचे अभंग, ‘दासीजनी ते संतपदी आरूढ जनाबाई’ अशा व्यक्तिविकासाची धवलगाथा आहे. उपेक्षित, वंचित स्त्रीवर्गात आत्मविश्वास जागविणारी प्रेरक हितगुज आहे.
सकल स्त्रीवर्गाला परमार्थाच्या मार्गातील ‘धोंड’ (अडथळा) समजले जात होते. त्या बिकट काळात -
‘स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास।‘
 
असा समस्त स्त्रीवर्गाला आत्मविश्वासयुक्त दिलासा व प्रेरणा देणारी तेराव्या शतकातील ज्ञानेश्वर-नामदेव संत मंडळातील एक साक्षात्कारी संतकवयित्री म्हणजे जनाबाई! रूढीग्रस्त बिकट परिस्थितीत, अत्यंत संकुचित समाजव्यवस्थेत भक्ती सामर्थ्याच्या जोरावर ‘डोईवरचा पदर आला खांद्यावरी।’ म्हणत ‘पुरुषांच्या बरोबरीने पारमार्थिक समतेचा झेंडा फडकविणारी बंडखोर संतकवयित्री,’ असे जनाबाईंचे तेराव्या शतकातील भक्ती आंदोलनात प्रमुख स्थान आहे. ‘बाई, मी लिहिणे शिकले सद्गुरू रायापाशी।’ म्हणत तिने त्या काळात आपल्या साक्षरतेचा उद्घोष केलेला आहे; पण या सार्‍या पैलूंकडे अभ्यासकांचे लक्षच गेलेले नाही.
 
बहुतेक अभ्यासकांनी-लेखकांनी एक निरक्षर, धुणीभांडी करणारी नामदेवांची दासी, मोलकरीण असेच तिचे चित्र रंगवले. हा साक्षात्कारी संतकवयित्री जनाबाईंवर एक प्रकारचा अन्यायच आहे.तिची बहुविध प्रकारांनी, बहुविध विषयांनी संपन्न आशयघन भक्ती काव्यरचना, (अभंगवाणी) तेराव्या शतकातील भक्ती साहित्यातील मौलिक अक्षर संपदा आहे. जनाबाईंच्या नावावर साडेतीनशेच्या वर अभंग आहेत. ते अभंग जनाबाईंनी दळणकांडण आदी कष्टाची कामे करीत केलेल्या, भक्तिसाधने द्वारा प्राप्त पारमार्थिक सामर्थ्याचे विलोभनीय-प्रासादिक शब्ददर्शन आहे.
 
 
‘दासी’ ही पारमार्थिक अवस्था
 
जनाबाई या संत नामदेवांच्या 15 जणांच्या मोठ्या परिवारातील एक आहेत. अशा अर्थाचा त्याचाच एक अभंग प्रसिद्धही आहे.संत नामदेवांपेक्षा त्या सहा ते सात वर्षांनी मोठ्या आहेत. तरी त्यांनी नामदेवांची आध्यात्मिक अधिकारस्थिती पाहून त्याचे शिष्यत्व स्वीकारलेले होते आणि आपले सारे जीवन गुरू नामदेवांना समर्पित केलेले होते. म्हणून त्या स्वाभिमानाने, गर्वाने स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत होत्या. ‘दासी’ म्हणजे मोलकरीण, सेविका नव्हे; तर गुरूंचे पारमार्थिक दास्यत्व स्वीकारलेली शिष्या. जसे संत ज्ञानदेव स्वतःला श्रीगुरू निवृत्तीनाथांचे शिष्य, या अर्थी ‘निवृत्तीदासु’ म्हणून घेतात, जसे रामाचे दास ‘रामदास’.
 
 
‘दास्य’ ही पारमार्थिक वृत्ती-अवस्था आहे; पण ही गोष्ट अनेक अभ्यासकांना कळलीच नाही. त्यांनी ’दासी’ म्हणजे मोलकरीण, असा अर्थ करून जनाबाईंच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर फार मोठा अन्याय केला आहे. ‘दासी जनी’, ‘नामयाची दासी’ या जनाबाईंच्या स्वनामधन्य नाममुद्रा आहेत. त्या आनंदाने, स्वाभिमानाने ‘दासी जनी’ म्हणवून घेतात. त्यांच्या अनेक अभंगांचा शेवट याच नाममुद्रेने होते. स्वतःचे थेट नाव घेता जनाबाई ‘नामयाची दासी’ म्हणतात. त्यातून त्यांच्या आत्मलोपी, गुरू समर्पित वृत्तीचे भावदर्शन होते. ‘मी तो समर्थाची दासी।’ म्हणणारी जनाबाई समजण्यास आपणास ‘शिवं भूत्वा शिवं यजेत्’ या उक्तीप्रमाणे जनी होऊनच जनीचा ठाव घेता येईल. जनाबाईंचे सम्यक यथार्थ भावरूप दर्शन घडेल.
 
होय ! जनाबाई साक्षर होती
 
संत ज्ञानदेव-नामदेवांची आध्यात्मिक थोरवी आपण सर्वजण जाणतो. अशा ज्ञानदेवांना ‘सखा’, ‘माझा’ म्हणण्या इतपत जनाबाईंनी आध्यात्मिक उंची गाठलेली होती. ‘विवेक सागर। सखा माझा ज्ञानेश्वर।’ हा तिचा अभंग खूप काही सांगणारा आहे. संत नामदेव तर तिचे सद्गुरूच होते. त्यांची ‘प्राणसखा’, ‘मायबाप’ अशा अनेक नावांनी जनी स्तुती गाते.
 
धन्य मायबाप नामदेव माझा ।
 
तेणे पंढरीराजा दावियेला ।
 
होते जगामध्ये निंद्य ।
 
ते त्वा केले वंद्य ॥
 
गुरू संत नामदेवा विषयींचा जनाबाईचा हा कृतज्ञोद्गार, संतांनी तळागाळातील उपेक्षित स्त्रीवर्गाला पारमार्थिक क्षेत्रात कसा वाव व अवकाश दिला होता याचे द्योतक आहे. सुरुवातीच्या आत्मपर अभंगात,‘मी तो अज्ञानाची राशी।’,‘मतिमंद दासी’,‘अडकले अविद्येच्या राती’ असे स्वस्थितीचे वर्णन करणारी जनाबाई आपणास दिसते. या ओळी म्हणजे तिच्या ठायीची ‘अज्ञानाची जाणीव’ व ‘ज्ञानाची सुप्त ओढ’ दर्शवितात. अज्ञानाची जाणीव हीच ज्ञानाची पहिली पायरी असते. पुढील काही अभंगातून ‘स्वामी लागी धीट ऐसी। म्हणती शिकवी दासी जनी।’, ‘बुद्धि शिकवणे माते’ अशी विद्यार्थी मनस्थितीतील जनी आपणास भेटते. आणि अखेर तिच्या साधनेला सिद्धी लाभते, ती साक्षर होते. तिचा आनंद ‘बाई, मी लिहिणे शिकले सद्गुरुरायापाशी।’ या अभंगातून ओसंडून वाहताना पाहून आपणही थक्क होतो आणि अशा जनाबाईला अनेक अभ्यासक, लेखक, ‘निरक्षर दासी’ म्हणतात. तेव्हा त्यांच्या अपूर्णज्ञानी धाडसाची कीव करावी वाटते.
 
 
चरित्रात्मक ठोस माहितीची उणीव
 
संत जनाबाईंचे साधार, सविस्तर, साद्यंत चरित्र उपलब्ध नाही. तिच्या स्वतःच्या अभंगातील काही उद्गार, संत नामदेवांचा जनीविषयीचा एक अभंग आणि संतचरित्रकार महिपतींच्या नामदेव चरित्रात येणारी जनाबाईंची माहिती, अशा अत्यंत त्रोटक आधारावरून जनाबाईंचा जीवनपट समजून घ्यावा लागतो. प्राप्त आख्यायिका, कथांच्याप्रमाणे, मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी काठचे ‘गंगाखेड’ हे जनाबाईंचे जन्मगाव मानले जाते. संत नामदेवांचे मूळगाव ‘नरसी’ याच भागात आहे.
 
 
जनाबाईंच्या आईचे नाव ‘करुंडबाई’ तर वडलांचे नाव ‘दमा’ होते. त्यांना अनेक वर्षे मूलबाळ नव्हते. अगदी उतारवयात नवसाने त्यांना जनीच्या रूपाने कन्यारत्न प्राप्त झाले. माता-पिता दोघेही पंढरीचे वारकरी होते. तसेच संत नामदेवांचे वडील ‘दामा शिंपी’ हेही पंढरीचे नियमित वारकरी होते. परभणी भागातून येणार्‍या एकाच दिंडीतील ’विठ्ठलभक्त’ म्हणून दामा शिंपी व दमा दोघांत कौटुंबीक जिव्हाळ्याचे संबंध होते. अशी एक अख्यायिका आहे की, विठ्ठलाच्या दृष्टांतानंतर दमा आपली कन्या जनी हिला नामदेवांचे वडील दामा शिंपी यांना पालनपोषण करण्यास देतो आणि नामदेव परिवारासमवेत जनी पंढरपूरनिवासी होते. नामदेव परिवारातील एक घटक बनून जाते ते निर्वाणापर्यंत.
 
 
संत जनाबाई पूर्वजन्मात कृतयुगात ‘पद्मिनी’, त्रेतायुगात ‘मंथरा’ तर द्वापार युगात ‘कुब्जा’ होती. कलियुगात ती ‘जनाबाई’ म्हणून जन्मली होती. तिचा गुरू नामदेवांशी चौयुगांचा संबंध विधिलिखित होता. त्यामुळे जनाबाईंना ’नामदेवांच्या वडलांना दे’, असा जनाबाईंचे वडील ‘दमा’ यांना स्वप्नदृष्टांत झालेला होता. संत जनाबाईंच्या एका अभंगातच तिच्या या पूर्वजन्माचा स्पष्ट उल्लेख असून त्या युगांमध्ये संत नामदेव, ‘प्रल्हाद’(सत्ययुगात), ‘रामभक्त अंगद’ (त्रेतायुगात), ‘कृष्णभक्त उद्धव’ (द्वापारयुगात) होते असे जनी म्हणते. (तो अभंग जिज्ञासूंनी गाथेत पाहावा) एक पूरक माहिती म्हणजे जनी जसे आपले तीन पूर्वजन्म कथन करते तसे संत बहिणाबाईंनी एका अभंगात आपल्या 13 पूर्वजन्मांचे कथन केलेले आहे.
 
 
जनाबाईंच्या अभंगवाणीची वैशिष्ट्ये
 
संतकवयित्री जनाबाई यांच्या नावावर सुमारे 350 अभंग उपलब्ध आहेत. मुक्ताबाई, सोयराबाई, निर्मला, कान्होपात्रा या संतकवयित्रींपेक्षा जनाबाईंची अभंग संपदा संख्यात्मकदृष्ट्या खूपच मोठी आहे. संत तुकाराम शिष्या संतकवयित्री बहिणाबाई हिच्या नावावर 750 अभंग असून तिची स्वतंत्र अभंगगाथा आहे. संख्यात्मक विचार करता जनाबाई दुसर्‍या क्रमांकावर आहेत. संत जनाबाई सर्व अभंग गुरू संत नामदेवांच्या गाथेचाच एक भाग आहे. अलीकडे मात्र श्रद्धावंतांच्या मागणीनुसार जनाबाईंचे अभंग वेगळे काढून ‘स्वतंत्र’ अभंगगाथा प्रकाशित झाल्या आहेत. त्यापैकी एक अभंगगाथा संकलन व संपादन करण्याचे भाग्य मलाही लाभलेले आहे. त्या संकलनासाठी मला ‘पुणे नगर वाचन मंदिर’ या शताब्दी पूर्ण केलेल्या मान्यवर संस्थेचा पुरस्कारही मिळालेला आहे.(जिज्ञासूंनी ‘संतकवयित्री जनाबाईंची अभंगागाथा आणि विचारविश्व’ हे ’स्नेहल प्रकाशन’द्वारे प्रकाशित पुस्तक जरूर पहावे.)
जनाबाईंचे 350 अभंग वेगवेगळ्या 25 ते 26 विषयांवरील रचना आहेत. आपल्या अभंगात त्या ज्ञानेश्वर, नामदेव, सेना, चोखामेळा, पुंडलिक याविषयी लिहितात पण स्वतःबद्दल फारसे लिहित नाहीत. हे अलिप्तपण प्रकर्षाने जाणवते. 300 ते 350 अभंग लिहिणार्‍या जनाबाईने स्वचरित्रात्मक अभंग न लिहिल्याने अभ्यासकांची गैरसोय होत असली तरी भारतीय संस्कृतीतील पूर्वपरंपरेनुसार ऋषी, मुनी वा संतांनी स्वतःबद्दल काहीच लिहिलेले नाही. तशीच आत्मलोपी वृत्ती आपणास जनाबाईंच्या ठायी दिसते, हे आत्मलोपीपण हेच तिचे मोठेपण आहे.
 
 
जनाबाईंची अभंगसृष्टी तिच्या लौकिक आणि अलौकिक अशा जीवनानुभूतीचा मनोज्ञ संगम आहे. त्या अभंग रचनांवर तिचे पारमार्थिक गुरू नामदेव आणि संतसांगाती संत ज्ञानदेव यांचे संस्कार स्पष्ट दिसून येतात. वारकरी संत मंडळींची चंद्रभागेच्या वाळवंटात होणारी कीर्तने-प्रवचने-भजन हे तिच्या बहुश्रुतपणाने मुख्य साधन आहे. दैनंदिन जीवनातील कष्टाची कामे करीत करीत तिने केलेली ‘नामस्मरण भक्ती’ हेच तिचे पारमार्थिक आत्मबल आहे. हाताने कष्टाचे काम आणि तोंडाने सततचे हरिनाम. हेच तिचे जीवन आहे. तिने ना कधी पूजापाठ केले, ना व्रतवैकल्ये केली.केवळ ‘हरिनाम’ घेतले. नामस्मरण भक्ती केली. साध्या, सहज सोप्या अशा नामभक्तीत केवढी शक्ती आहे, ते तिने सकल महिला वर्गाला दाखवून दिले आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. ‘स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास।’ हा तिचा अभंगचरण त्या आत्मविश्वासाचेच एक शब्दरूप आहे.
 
 
संतकवयित्री जनाबाईंच्या विविध प्रकारच्या अभंग काव्यरचनेमध्ये आपणास ‘करूणापर अभंग’, ‘भक्तवत्सलता’, ‘संतस्तुती’, ‘कृष्णजन्म’, ‘नामभक्तिपर अभंग’, बालक्रीडेचे अभंग’, ‘काला’, ‘ज्ञानेश्वरस्तुती’, ‘संत सेना चरित्र’, ‘संत नामदेव चरित्र’ ‘हरिश्चंद्र आख्यान’, ‘थालीपाक’, ‘तीर्थावळी’, ‘प्रारब्धगती’, ‘पारणे’, ‘पदे’, ‘कूट अभंग’ आणि ‘काकड आरती’ अशी विषयाची विपुलता आढळते. संत नामदेवांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या जीवनाची जनाबाई सर्वसाक्षी आहे. त्यामुळे नामदेवांच्या जीवनातील अनेक तपशील आपणास जनाबाईंच्या अभंगातून मिळतो. तिने ‘ज्ञानेश्वरी’ स्तुतीपर केलेले अभंग तिच्या साक्षरतेची व आस्वादक समीक्षेची ओळख आहे.
 
 
भाव अक्षराच्या गाठी। ब्रह्मज्ञाने गोमटी।
हे माय ज्ञानेश्वरी । संतजना माहेश्वरी॥
 
जनाबाईने अभंगातून स्वतःबद्दल फारसे लिहिले नसले तरी संत नामदेव-ज्ञानदेव आदी संतांमुळे आपले पारमार्थिक जीवन सफल सुफल सार्थकी लागल्याची धन्यता ती मोठ्या अभिमानाने व्यक्त करते.
 
धन्य धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश।
 
हे तिचे धन्यतेचे उद्गार ‘दासी जनी ते संत जनी’ या व्यक्तिविकासाच्या पुरुषार्थाचीच ग्वाही आहे. थोर समीक्षक कुरुंदकर, डॉ.सुहासिनी इर्लेकर आदी अभ्यासक संशोधकांनी जनाबाईंच्या अभंगाचे विशेष कौतुक केलेले आहे. आशय आणि अभिव्यक्ती यांचे अनोखे अद्वैत जनाबाईंच्या अभंगाचे खास वैशिष्ट्य असल्याचे सर्व समीक्षकांचे मत आहे; पण ही झाली आधुनिक समीक्षा. प्रत्यक्ष जनाबाईंचे समकालीन संत ज्ञानेश्वर, जनाबाईंच्या अभंगवाणीची आध्यात्मिक समीक्षा, गौरव करताना म्हणतात, “‘जनीचे बोल स्वानंदाचे डोल.’“
 
संतकवयित्री जनाबाईंच्या अभंगवाणीतील ‘विचार विश्व’ व्यापक आहे तसेच जाणकारांना थक्क करणारे आहे. त्या विचार विश्वाचा साक्षेपी वेध हा स्वतंत्र ग्रंथाचाच व्यापक विषय आहे. या छोट्याशा लेखात तो अपेक्षित नाही. जिज्ञासू वाचकांनी जनाबाईंची अभंगगाथा मूळातून वाचावी आणि भारतीय ज्ञान परंपरेतील तेराव्या शतकातील मराठीच्या उषःकालातील अक्षरलेणे मनाचे डोळे करून पाहावे.
 
लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व उपासक तसेच ’साईलीला’ आणि ’एकता’ या मासिकाचे माजी संपादक आहेत.

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.