सेमीकंडक्टर भारताची तंत्रज्ञानात्मक झेप

विवेक मराठी    26-Sep-2026   
Total Views |
Semiconductors
सेमीकंडक्टर आता इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील घटक राहिलेले नाहीत; ते अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या सामर्थ्याचा आधार बनले आहेत. भारताने उत्पादन, डिझाइन आणि गुंतवणुकीत घेतलेली झेप तंत्रज्ञानात्मक स्वायत्ततेचा पाया मजबूत करत असून, जागतिक सेमीकंडक्टर मूल्यसाखळीत भारताचे स्थान वेगाने बदलत आहे.
आजच्या जगात कोणत्याही आधुनिक अर्थव्यवस्थेची कल्पना सेमीकंडक्टरशिवाय करणे अशक्य आहे. मोबाईल फोनपासून वाहनांपर्यंत, दूरसंचार उपकरणांपासून संरक्षण यंत्रणांपर्यंत, डेटा सेंटरपासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालींपर्यंत आणि इलेक्ट्रिक वाहनांपासून औद्योगिक स्वयंचलित यंत्रणांपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या तंत्रज्ञानामागे चीप आहे. त्यामुळे सेमीकंडक्टरची उपलब्धता हा आता उद्योगाचा प्रश्न राहिलेला नाही; तो आर्थिक सामर्थ्य, पुरवठा साखळीची सुरक्षितता आणि राष्ट्रीय तंत्रज्ञानात्मक स्वायत्ततेचा प्रश्न बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगाने होणारा विस्तार या महत्त्वाला आणखी मोठे परिमाण देत आहे. एआयसाठी आवश्यक असलेल्या उच्च क्षमतेच्या संगणकीय पायाभूत सुविधांपासून डेटा सेंटरपर्यंत सर्वत्र चिप्सची मागणी वाढत आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज, 5-जी आणि पुढील पिढीतील दूरसंचार, स्वयंचलित वाहने, रोबोटिक्स आणि संरक्षण तंत्रज्ञान यामुळे ही मागणी दीर्घकाळ वाढत राहण्याची शक्यता आहे. भारत सरकारनेही सेमीकंडक्टरला आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक सामर्थ्याचा पाया म्हणून स्पष्टपणे मान्यता दिली आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर भारताची अलीकडील वाटचाल महत्त्वाची ठरते. डिसेंबर 2021मध्ये मंजूर झालेल्या सेमिकॉन इंडिया कार्यक्रमासाठी 76 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सुरुवातीचा उद्देश भारतात सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादनाचे पायाभूत पर्यावरण उभे करणे हा होता. फेब्रुवारी 2026पर्यंत या कार्यक्रमांतर्गत 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती आणि त्यांच्याशी संबंधित गुंतवणुकीचा आकार सुमारे 1.6 लाख कोटी रुपये होता. त्यात दोन फॅब आणि आठ पॅकेजिंग प्रकल्पांचा समावेश होता. पुढील टप्प्यात मंजूर प्रकल्पांची संख्या 12 झाली आणि एकूण गुंतवणूक 1.64 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली. सहा राज्यांमध्ये या प्रकल्पांचे जाळे उभे राहत आहे.
 
 
या आकड्यांकडे फक्त गुंतवणूक म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. सेमीकंडक्टर उद्योगाची वैशिष्ट्येच अशी आहेत की, एका प्रकल्पाभोवती अनेक पूरक उद्योग निर्माण होतात. चीप तयार करण्यासाठी आवश्यक उपकरणे, विशेष रसायने, वायू, सिलिकॉन वेफर्स, सबस्ट्रेट्स, पॅकेजिंग साहित्य, चाचणी सुविधा, लॉजिस्टिक्स, अभियांत्रिकी सेवा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांची मागणी निर्माण होते. त्यामुळे 1.64 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, ही त्या प्रकल्पांच्या थेट आकारापेक्षा व्यापक औद्योगिक परिसंस्थेला चालना देणारी ठरते. भारताचा उद्देश चीप आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच, चीपभोवती निर्माण होणार्‍या संपूर्ण मूल्यसाखळीत आपली भूमिका वाढवणे हा आहे.
 
 
याच कारणामुळे ’सेमिकॉन 2.0’ हा पहिल्या टप्प्यापेक्षा वेगळा आणि व्यापक टप्पा ठरतो. जुलै 2026मध्ये केंद्र सरकारने सेमिकॉन 2.0ला 1 लाख 27 हजार 500 कोटी रुपयांच्या परिव्ययासह मंजुरी दिली.
 
 
 
या कार्यक्रमाचे सहा प्रमुख आधारस्तंभ आहेत : चीप डिझाइन, यंत्रसामग्री व साहित्य, नवीन फॅब, प्रगत पॅकेजिंग, संशोधन आणि प्रतिभा विकास. म्हणजेच भारत आता उत्पादनाच्या एका टप्प्यावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण सेमीकंडक्टर मूल्यसाखळी उभारण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
धोरणापासून उत्पादनापर्यंत
 
औद्योगिक धोरणाची खरी परीक्षा घोषणांमध्ये नसते; तर ती उत्पादन सुरू झाल्यावर होते. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताने आता या महत्त्वाच्या टप्प्यावर प्रवेश केला आहे. सप्टेंबर 2026मध्ये झालेल्या सेमिकॉन इंडिया 2026मध्ये भारताने धोरण, मंजुरी आणि प्रकल्पांच्या पुढे जाऊन व्यावसायिक उत्पादनाच्या दिशेने झालेली प्रगती जगासमोर मांडली. या परिषदेत 52 देशांतील प्रतिनिधी आणि 600हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले. पाच व्यावसायिक सेमीकंडक्टर युनिट्सनी उत्पादन सुरू केल्याचे सरकारने सांगितले. मोहालीतील सीडीआयएल सेमीकंडक्टर आणि सुरतमधील सुची सेमीकॉनच्या व्यावसायिक उत्पादन रेषांचे उद्घाटनही या काळात झाले.
 
 
यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारत सेमीकंडक्टर बनवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर आता प्रत्यक्ष उत्पादनातून मिळू लागले आहे. मायक्रॉन, कायनेस आणि सीजी सेमी यांसारख्या प्रकल्पांमधून व्यावसायिक उत्पादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पॅकेजिंग आणि चाचणीच्या क्षेत्रात भारताने प्रत्यक्ष क्षमता उभारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुढील फॅब्रिकेशन क्षमतेसाठी आवश्यक औद्योगिक, तांत्रिक आणि मनुष्यबळाचा पाया रचला जात आहे. मात्र, या प्रगतीचे मूल्यमापन करताना एक महत्त्वाची वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागेल. भारतात काही सेमीकंडक्टर युनिट्सचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले असले, तरी मोठ्या प्रमाणावरील प्रगत फॅब्रिकेशनमधून चीप उत्पादन अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा गुजरातमधील मोठा फॅब हा त्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याच्या वेळापत्रकाकडे संपूर्ण उद्योगाचे लक्ष लागले आहे.
 
 
ही वस्तुस्थिती भारताच्या वाटचालीतील मर्यादा दाखवते, पण त्याच वेळी पुढील संधीही स्पष्ट करते. सेमीकंडक्टर उद्योगात पॅकेजिंगपासून फॅब्रिकेशनपर्यंत प्रत्येक पायरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य आणि तंत्रज्ञान आवश्यक असते. त्यामुळे सुरुवातीला पॅकेजिंग, चाचणी आणि डिझाइनमध्ये क्षमता निर्माण करून त्यानंतर अधिक प्रगत फॅब्रिकेशनकडे जाणे, ही औद्योगिक परिसंस्था उभारण्याची प्रक्रिया आहे. भारताला जागतिक पातळीवरील मोठ्या उत्पादकांशी स्पर्धा करायची असेल तर गुणवत्ता, सातत्य, उत्पादनक्षमता, ऊर्जा उपलब्धता, पाण्याची उपलब्धता, पुरवठा साखळी, संशोधन आणि तांत्रिक मनुष्यबळ या सर्व क्षेत्रांत एकाच वेळी गुंतवणूक करावी लागेल.
 
 
याच ठिकाणी जागतिक कंपन्यांचा भारताकडे वाढणारा कल महत्त्वाचा ठरतो. सप्टेंबर 2026मध्ये अमेरिकेतील अ‍ॅप्लाइड मटेरियल्सने भारतात पुढील दशकात 5 अब्ज डॉलर, म्हणजे सुमारे 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. ही गुंतवणूक संशोधन, पुरवठा साखळी आणि मनुष्यबळाच्या विस्ताराशी संबंधित आहे. सेमिकॉन इंडिया 2026मध्ये 600हून अधिक कंपन्यांचा सहभाग आणि 52 देशांचे प्रतिनिधित्व हेही भारतातील बदलत्या परिसंस्थेचे द्योतक आहे. याचा अर्थ भारताने जागतिक सेमीकंडक्टर बाजारात आपले स्थान निश्चित केले आहे, असा अंतिम निष्कर्ष काढणे हे योग्य होणार नाही. तथापि, भारताकडे आता जागतिक कंपन्यांना आकर्षित करणारे तीन महत्त्वाचे घटक एकत्र येत आहेत आणि ते म्हणजे मोठी आणि वाढती देशांतर्गत बाजारपेठ, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठा मनुष्यबळ आधार आणि सरकारची दीर्घकालीन औद्योगिक धोरणात्मक बांधिलकी. या तिन्ही घटकांना उत्पादनक्षमता आणि संशोधनाची जोड मिळाली, तर भारताची भूमिका फक्त ग्राहक बाजारपेठेपुरती मर्यादित राहणार नाही.
 

vivek 
 
 
चीपपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत
 
सेमीकंडक्टर क्षेत्राचा सर्वांत मोठा दीर्घकालीन परिणाम कृत्रिम बुद्धिमत्तेवर होणार आहे. एआयच्या जगात अल्गोरिदम महत्त्वाचे आहेतच; पण त्या अल्गोरिदमना चालविणारी संगणकीय क्षमता त्याहून अधिक महत्त्वाची आहे. उच्च क्षमतेचे प्रोसेसर, मेमरी, नेटवर्किंग चिप्स आणि ऊर्जा-कार्यक्षम संगणकीय प्रणाली यांची उपलब्धता एआयच्या विस्ताराचा पाया आहे. त्यामुळे एआयमध्ये स्वावलंबनाच्या चर्चेला चिप्सपासून वेगळे ठेवता येत नाही. स्वत:ची एआय मॉडेल्स विकसित करूनही ती मोठ्या प्रमाणावर चालविण्यासाठी आवश्यक संगणकीय पायाभूत क्षमता परदेशी पुरवठ्यावर अवलंबून ठेवली, तर तंत्रज्ञानात्मक स्वायत्तता अपूर्णच राहते.
 
 
भारताची ताकद या ठिकाणी त्याच्या डिझाइन क्षमतेत दिसते. अधिकृत माहितीनुसार, भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक चीप-डिझाइन मनुष्यबळाच्या जवळपास 20 टक्के मनुष्यबळ कार्यरत आहे. भारतात जगातील सेमीकंडक्टर क्षेत्रातील सुमारे 7 टक्के ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स असून, 24 चीप-डिझाइन प्रकल्पांना सुमारे 900 कोटी रुपयांच्या मूल्याचे समर्थन मिळाले आहे. तसेच 500 संस्थांमधील एक लाखांहून अधिक अभियंत्यांना प्रगत चीप-डिझाइन साधनांचा प्रवेश देण्यात आला आहे. त्यात 400 शैक्षणिक संस्था आणि 100 स्टार्टअप्सचा समावेश आहे. या परिसंस्थेत 300हून अधिक चीप डिझाइन विकसित झाल्याचे सरकारने नमूद केले आहे.
 
 
ही आकडेवारी भारताच्या भविष्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. कारण उत्पादन संयंत्र उभारण्यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक आवश्यक असते; परंतु चीप डिझाइनमधील कौशल्य ही दीर्घकाळ टिकणारी बौद्धिक संपदा निर्माण करू शकते. भारतातील अभियंते आज जागतिक कंपन्यांसाठी चीप डिझाइन करत आहेत, ही बाब महत्त्वाची आहेच; परंतु त्याच कौशल्याचा वापर भारतीय गरजांसाठी विकसित होणार्‍या चिप्समध्ये झाला तर त्याचे आर्थिक मूल्य आणखी वाढू शकते. संरक्षण, अंतराळ, दूरसंचार, ऊर्जा, वाहन उद्योग, कृषी तंत्रज्ञान आणि एआय यांसाठी देशाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन चीप डिझाइन करण्याची क्षमता म्हणजे तंत्रज्ञानात्मक स्वायत्ततेचा अधिक खोल स्तर.
 
 
याच दिशेने भारतात प्रगत डिझाइन क्षमताही विकसित होत आहेत. नोएडा आणि बंगळुरू येथे तीन नॅनोमीटर तंत्रज्ञानावर काम करणार्‍या डिझाइन सुविधांचा विकास झाला आहे. दोन नॅनोमीटरच्या दिशेनेही डिझाइनचे काम सुरू असल्याची माहिती सरकारने दिली आहे. याचा अर्थ भारत मोठ्या प्रमाणावरील चीप उत्पादनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच उच्चस्तरीय डिझाइन क्षमतेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही दोन्ही क्षेत्रे परस्परपूरक आहेत. डिझाइन आणि उत्पादन यांच्यातील दरी कमी झाली, तर भारतात निर्माण होणार्‍या बौद्धिक संपदेचे व्यावसायिक मूल्यही देशांतर्गत वाढवता येईल.
 
 
एआयच्या संदर्भात याचे आणखी एक महत्त्व आहे. जगातील काही मोजक्या कंपन्या उच्च क्षमतेच्या एआय चिप्सच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव ठेवतात. जागतिक राजकारणात तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी यांचे संबंध अधिक गुंतागुंतीचे होत असताना चिप्सची उपलब्धता ही रणनीतिक बाब बनली आहे. चीन, अमेरिका, तैवान, दक्षिण कोरिया, जपान आणि युरोप यांच्यातील सेमीकंडक्टर स्पर्धा ही त्यामुळे औद्योगिक स्पर्धा असूनही तिच्यामागे राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक स्वायत्ततेचे मोठे प्रश्न आहेत. भारताने या क्षेत्रात प्रवेश करण्याचे कारण याच व्यापक बदलात शोधावे लागते.
 

vivek 
 
तंत्रज्ञान, रोजगार आणि अर्थव्यवस्थेचा पुढचा टप्पा
 
सेमीकंडक्टर उद्योगाचा परिणाम फक्त तंत्रज्ञानावर होणार नाही. त्याचा संबंध भारताच्या आर्थिक वाढीशीही आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने 7.8% वाढ नोंदवली. त्यानंतर मूडीजने आर्थिक वर्ष 2026-27साठी भारताच्या वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा अंदाज 6 टक्क्यांवरून 7टक्क्यांंपर्यंत वाढवला. वाढीमागे गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असल्याचे या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. त्याच वेळी उच्च ऊर्जा किमती आणि एल निनोमुळे महागाई वाढण्याचा धोका असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
सेमीकंडक्टर उद्योग या आर्थिक चित्रात कुठे बसतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हा मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करणारा उद्योग आहे. त्यासाठी उच्च कौशल्याचे मनुष्यबळ लागते. त्याच्याभोवती पूरक उत्पादन क्षेत्र तयार होते. त्यामुळे या क्षेत्रात झालेली गुंतवणूक उत्पादनक्षमता, रोजगार आणि निर्यात क्षमता या तिन्हीवर परिणाम करू शकते. ’सेमिकॉन 2.0’मधून सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीशी संबंधित प्रस्ताव आणि बांधिलकी समोर आल्याचे केंद्राने सप्टेंबरमध्ये सांगितले आहे. या प्रक्रियेत जवळपास एक लाख नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या आकड्यांचा अर्थ प्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला असा नसून, मंजूर आणि प्रस्तावित परिसंस्थेतून अपेक्षित संधी असा घ्यावा लागेल.
 
 
सेमीकंडक्टर क्षेत्राचा दुसरा आर्थिक परिणाम आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या क्षमतेत आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन झपाट्याने वाढत असताना त्यासाठी लागणार्‍या चिप्सची मागणीही वाढणार आहे. देशांतर्गत उत्पादन वाढले तर आयातीत मूल्यवर्धनाचा काही भाग देशातच राहू शकतो. त्याचबरोबर भारतात तयार झालेल्या चिप्सचे निर्यातक्षम उत्पादन विकसित झाले तर भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीला अधिक उच्च मूल्याची जोड मिळू शकते. त्यामुळे सेमीकंडक्टर हा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या पुढील टप्प्याचा पाया ठरू शकतो. यासाठी मात्र उत्पादन सुरू झाले म्हणजे काम पूर्ण झाले असे मानता येणार नाही.
 
 
सेमीकंडक्टर उद्योगात सातत्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान अद्ययावत ठेवणे, उत्पादनातील दोषांचे प्रमाण कमी करणे, उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध करणे आणि जागतिक ग्राहकांचा विश्वास मिळवणे या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. भारताने पहिला टप्पा म्हणून उत्पादनक्षमता उभारली आहे. पुढील टप्प्यात या उत्पादनाला जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि खर्चक्षमता द्यावी लागेल. त्यासाठी विद्यापीठे, संशोधन संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योग यांच्यातील सहकार्य वाढवावे लागेल. याच संदर्भात भारतातीलकॉर्पोरेट क्षेत्रातील सामाजिक गुंतवणुकीचे आकडेही व्यापक आर्थिक बदलाचा एक वेगळा संकेत देतात. क्रिसिलच्या विश्लेषणानुसार आर्थिक वर्ष 2024-25मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचा सीएसआर खर्च 17.5 टक्क्यांनी वाढून 22 हजार 563 कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षी 19 हजार 208 कोटी रुपये होता. सीएसआर खर्चाची नोंद करणार्‍या कंपन्यांची संख्या 20 टक्क्यांनी वाढून 2 हजार 13 झाली. त्यातील शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी 9 हजार 182 कोटी रुपये खर्च झाले.
 
 
या सीएसआर वाढीचा थेट संबंध सेमीकंडक्टर उद्योगाशी जोडणे योग्य ठरणार नाही. परंतु कौशल्यविकास, शिक्षण आणि तंत्रज्ञानाधारित रोजगार यांची वाढती गरज लक्षात घेतली तर हा व्यापक बदल महत्त्वाचा ठरतो. भविष्यात सेमीकंडक्टर आणि एआयसारख्या क्षेत्रांसाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यामध्ये उद्योग आणि शिक्षण संस्थांची भागीदारी निर्णायक ठरू शकते. भारताकडे मोठी तरुण लोकसंख्या आहे; परंतु ती उच्च तंत्रज्ञानाच्या अर्थव्यवस्थेसाठी तयार करण्याचे आव्हान तितकेच मोठे आहे. चीप बनविणार्‍या कारखान्याइतकेच महत्त्वाचे काम त्या कारखान्यासाठी अभियंते, तंत्रज्ञ, संशोधक आणि डिझायनर तयार करण्याचे आहे.
 
 
भारताच्या सेमीकंडक्टर धोरणाची कसोटी म्हणून तीन गोष्टींकडे पाहावे लागेल. पहिली म्हणजे मंजूर प्रकल्प वेळेत प्रत्यक्ष उत्पादनात आणणे. दुसरी म्हणजे फॅब्रिकेशनपासून पॅकेजिंग, साहित्य, उपकरणे, डिझाइन आणि संशोधनापर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी देशात विकसित करणे. तिसरी म्हणजे या परिसंस्थेतून भारतीय कंपन्यांची स्वतःची बौद्धिक संपदा, जागतिक ग्राहक आणि निर्यात क्षमता निर्माण करणे. या तीन गोष्टी साध्य झाल्या तर सेमीकंडक्टर क्षेत्र भारताच्या औद्योगिक रचनेत मूलभूत परिवर्तन घडवू शकते. भारताची तंत्रज्ञानात्मक स्वायत्तता म्हणजे जगापासून वेगळे होणे नव्हे. जागतिक कंपन्यांशी सहकार्य करताना स्वतःची क्षमता निर्माण करणे, विविध देशांशी तंत्रज्ञान भागीदारी वाढवणे आणि जागतिक पुरवठा साखळीत स्वतःची निर्णायक भूमिका निर्माण करणे, हीच तिची व्यवहार्य दिशा आहे.
 
 
आज भारतासमोरची संधी मोठी असली, तरी आव्हानही तितकेच मोठे आहे. सेमीकंडक्टर उद्योगात चीन, तैवान, दक्षिण कोरिया, अमेरिका, जपान आणि युरोपने अनेक दशकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर आपली क्षमता स्थापित केली आहे. भारतालाही सातत्यपूर्ण धोरण, मोठी गुंतवणूक, उच्च दर्जाचे संशोधन आणि दीर्घकालीन औद्योगिक संयम आवश्यक आहे. एखादा प्रकल्प सुरू होणे ही सुरुवात आहे; जागतिक दर्जाची परिसंस्था उभी राहणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टरच्या बाबतीत भारताने एका महत्त्वाच्या वळणावर प्रवेश केला आहे. 76 हजार कोटी रुपयांच्या पहिल्या कार्यक्रमापासून 1 लाख 27 हजार 500 कोटी रुपयांच्या ’सेमिकॉन 2.0’पर्यंत झालेली वाटचाल ही धोरणाच्या विस्ताराची ठोस खूण आहे. 1.64 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे मंजूर प्रकल्प, सुरू झालेले व्यावसायिक उत्पादन, वाढणारी चीप-डिझाइन क्षमता आणि जागतिक कंपन्यांचा वाढता सहभाग ही त्याची प्रत्यक्ष चिन्हे आहेत.
 
 
पुढील काही वर्षांत भारताची खरी परीक्षा या संख्यांना उत्पादन, निर्यात, पेटंट, उच्च कौशल्याच्या रोजगार आणि जागतिक पुरवठा साखळीतील स्थानात रूपांतरित करण्याची असेल. सेमीकंडक्टरमधील भारताची वाटचाल ही निव्वळ एका उद्योगाची वाढ नाही, तर तंत्रज्ञानात्मक स्वायत्ततेची पायाभरणी आहे. 1.64 लाख कोटी रुपयांची मंजूर गुंतवणूक, वाढते उत्पादन आणि जागतिक कंपन्यांचा सहभाग ही सुरुवात आहे. खरी कसोटी या क्षमतेचे रूपांतर जागतिक दर्जाच्या उत्पादन, बौद्धिक संपदा, रोजगार आणि निर्यातीत करण्याची आहे. चिपवर नियंत्रण म्हणजे भविष्यातील अर्थव्यवस्था आणि सामरिक सामर्थ्यावर अधिक नियंत्रण. भारताने ही शर्यत सुरू केली आहे; आता तिचा वेग आणि सातत्य निर्णायक ठरणार आहे.

संजीव ओक

 वृत्तपत्र सृष्टीत दोन दशकांपेक्षा अधिक काळ कार्यरत. आंतरराष्ट्रीय, भू-राजकीय, अर्थविषयक घडामोडी, ऊर्जा तसेच परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक. स्तंभ लेखनासह ललित लेखनाची आवड.