मी, समता अनय फणसळकर. सध्याचा मुक्काम छत्रपती संभाजीनगर. माझं माहेर धुळे येथील. वडील बीएड कॉलेजला उपप्राचार्य; तर आई सेवानिवृत्त परिचारिका. घरातील वातावरण समाजवादी. वडील राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते. शेवटची सहा वर्षे ते राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यामुळे तोपर्यंत तरी आमचा संघाशी दुरान्वयानेही संबंध आला नाही; पण लग्न होऊन सासरी आले. तर इकडचं सगळं वातावरण संघाचं होतं. ह्यांचे काका पण धुळ्यातच असायचे. ते ’नाना’ या नावाने सर्वांना परिचयाचे होते.
आमचे लग्न ठरायच्या वेळी, माझ्या माहेरी घरी कल्पना होती की मुलाकडील मंडळी संघवाले आहेत. आणि यांच्याही घरचे म्हणायचे की ’मुलगी तर समाजवाद्यांची आहे. लग्न कसं ठरवायचं?’ पण शेवटी घरात राजकारण हा विषय काढायचा नाही, असे ठरवून लग्न ठरले. माझे सासरे बालस्वयंसेवक होते. लहानपणी ते पुण्यात असताना शाखेमध्ये त्यांना गो.नी. दांडेकर गोष्टी सांगायला यायचे. तर प्रख्यात गायक सधुीर फडके त्यांच्याबरोबर शाखेत असायचे.
धुळ्याला ह्यांच्या काकांच्या घरी सर्व स्वयंसेवक, प्रचारक यांचा राबता असायचा. प्रचारक मंडळी घरी जेवायला असायचे. भैयाजी जोशी, रमेश पांडव इत्यादी सर्वजण घरी यायचे.
माहेरच्या घरचं वातावरण एकदम संघविरोधी. आमच्या घरी त्याकाळी एस.एम. जोशी, ना.ग.गोरे, मधु दंडवते, भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, बापूसाहेब काळदाते, अभिनेत्री स्मिता पाटील यांची आई, तसेच मेधा पाटकर वगैरे ही मंडळी घरी यायची. रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे घरीच राहायचे. लग्नानंतर सासरी छत्रपती संभाजीनगर येथे आले. हे राष्ट्रीयकृत बँकेत असल्यामुळे शाखेत जाऊ शकत नसत. पण घरातील वातावरण विचार हे सर्व संघाचे. कॉलेज जीवनात हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. त्यामुळे बौद्धिक काय असते त्यांना माहिती होते. सासरे हे सेवानिवृत्त होते. ते कधी कधी घराजवळ रणजित प्रभात शाखेत जायचे. संघाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला तर ते हमखास जायचे. दरम्यानच्या काळात ह्यांचा संघ शाखेशी काही संबंध आला नाही. शाखेत जायची इच्छा असायची, पण शक्य नव्हते. 2012/13 साली त्यांची धुळ्याला बदली झाली. रिटायरमेंटला अजून दहा वर्षे बाकी होती. रोज सकाळी फिरायला जायचे तर रस्त्यात त्यांना शाखा लागायची. धुळ्यात काकांच्या घरी नेहमी जाणं येणं असायचं, त्यामुळे चुलत भावांच्या मित्रांशी त्यांची चांगली ओळख होती. एक दिवस हिम्मत करून हे धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात लागणार्या समर्थ प्रभात शाखेत गेले. तिथे त्यांचे जुने मित्र भेटले. तेव्हापासून दर शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी शाखेत जायला लागले. गंमत अशी की, माझे वडील त्यांच्या सेवादलाच्या शाखेत जायचे आणि हे त्यांच्या संघाच्या शाखेत जायचे. पण कधीही यावरून विषय काढला नाही. नंतर यांची छत्रपती संभाजीनगरला बदली झाली. धुळ्याच्या शाखेत जाण्याच्या सवयीमुळे इकडे आल्यावरही शाखेत जायला लागले. गणवेश पण आणून ठेवला होता, पण आईने सक्त ताकीद दिली की तू रिटायर झाल्यावर हे सर्व कर आणि मग रिटायर झाल्यावर हे गणवेश घालून कार्यक्रमाला, उत्सवाला जायला लागले.
केवळ स्वयंसेवकांनी नव्हे, तर संघ जाणून घेणाऱ्या प्रत्येकाने आणि संघपरिघाच्या बाहेरील प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचले पाहिजे…
आम्ही संघात का आहोत…
संघ कार्यात सक्रिय झाले. शाखा सुटल्यावर सगळी स्वयंसेवक मंडळी घरी चहापाणी नाश्त्याला येऊ लागली. संघाचे सगळे वरिष्ठ अधिकारी घरी येऊ लागले. आम्ही राहत असलेल्या डॉ. हेडगेवार नगराचे, मा. नगर संघ चालक म्हणून त्यांच्याकडे दायित्व आले. एक दिवस ज्येष्ठ स्वयंसेवक वामनराव देशपांडे यांच्यामार्फत निरोप आला की जेष्ठ प्रचारक कै. मधुभाई कुलकर्णी यांनी भेटायला बोलावले आहे. त्याप्रमाणे हे त्यांना जाऊन भेटले, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी मधुभाईंनी गप्पांच्या ओघात तुझ्या शाखेत जेव्हा येईन, तेव्हा तुझ्या घरी नक्की येईन असा शब्द दिला आणि तो दिवस आम्ही अनुभवलाही. एवढ्या थोर व्यक्तीचे चरण आमच्या घराला लागले याचा खूप आनंद झाला. एकदा पद्मश्री रमेशजी पतंगे यांचा शाखेवर प्रवास होता. शाखा सुटल्यावर तेही घरी आले. एवढा मोठा लेखक घरी आल्याचे आम्हाला अप्रूप वाटले. असे अनेक वेगवेगळे प्रचारक, विस्तारक किंवा जेष्ठ स्वयंसेवक घरी येऊ लागले. घरी बैठका होऊ लागल्या. यांचा पण प्रवास ठिकठिकाणी होऊ लागला. वेगवेगळ्या बैठका, उत्सव, संमेलन यामध्ये यांचा वेळ जाऊ लागला. मी म्हणते, रिटायरमेंटनंतर हे बँकेपेक्षा जास्त व्यग्र झाले. सर्व प्रकारचे संघ वाङ्मय, चरित्र, विवेकसारखं साप्ताहिक घरी येऊ लागलं आणि ते वाचण्याची गोडी निर्माण झाली आणि अशा तर्हेने घर संघमय झाले.