शिकागो ते न्यूयॉर्क -एक ऐतिहासिक प्रवास

विवेक मराठी    03-Sep-2026   
Total Views |
Chicago, New York

Chicago to  New York
न्यूयॉर्क येथील ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ आणि ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ परिषदेच्या व्यासपीठावरून दि. 29 ऑगस्ट 2026रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे भाषण झाले. मोहनजी यांचे भाषण म्हणजे स्वामी विवेकानंदांनी 1893साली जे भाषण केले, त्याचा कालसापेक्ष विस्तार आहे. त्यामुळे हे भाषणदेखील ऐतिहासिक भाषण ठरले. भारताच्या जीवनलक्ष्याचा प्रवास स्वामी विवेकानंदांपासून सुरू झाला, असे मानले तर मोहनजींच्या रूपाने हा प्रवास आता एक निश्चित दिशा घेऊन निघाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
शिकागो येथे स्वामी विवेकानंदांचे सर्वधर्म परिषदेत ऐतिहासिक भाषण झाले. भारतात या भाषणाचा परिणाम हिंदू समाजाची चेतना जागृत होण्यात झाला. न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील इन्फोसिस थिएटरमध्ये आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ आणि ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ परिषदेच्या व्यासपीठावरून दि. 29 ऑगस्ट 2026रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे भाषण झाले. त्यांचे हे भाषणदेखील ऐतिहासिक भाषण ठरले. विवेकानंदांच्या भाषणाने हिंदू चेतना जागृत झाली, मोहनजींच्या भाषणाने विश्व मानव चेतनेचा प्रवास सुरू झाला असे म्हणायला हरकत नाही. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले, तेव्हा भारतातील हिंदू झोपलेला होता. मोहनजी भागवत जागृत हिंदूचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत गेले. विवेकानंद म्हटले तर एकटेच होते. मोहनजी भागवत हे जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचे सरसंघचालक आहेत. एका शक्तीस्थानावर आहेत. त्यांचे भाषण जसे एका व्यक्तीचे भाषण आहे, तसे ते एका शक्तीचे प्रकटीकरण आहे.
 
 
मोहनजी यांचे भाषण म्हणजे स्वामी विवेकानंदांनी 1893साली जे भाषण केले, त्याचा कालसापेक्ष विस्तार आहे. स्वामीजींनी आपल्या भाषणात सर्वधर्म समानतेचा एक विषय मांडला आणि महिम्न स्रोत्रातील ‘रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव’ हा श्लोक उद्धृत केला. मोहनजींनीसुद्धा हा श्लोक आपल्या भाषणात उद्धृत केला आहे. मोहनजींचे भाषण अनेक दृष्टीने ऐतिहासिक आहे. त्यातील पहिला विषय असा की, जागतिक व्यासपीठावरून भारताच्या जन्मध्येयाचा त्यांनी ऊहापोह केला. प्रत्येक राष्ट्राचा एक जीवनहेतू असतो. भारताचा जीवनहेतू विश्वमानवाला मानवधर्माची शिकवणूक देण्याचा आहे. मोहनजींनी ‘भद्रं इच्छन्तः ऋषयः स्वर्विदः, तपो दीक्षां उपसेदु: अग्रे!, ततो राष्ट्रं बलं ओजश्च जातम्, तदस्मै देवा उपसं नमन्तु!!’ हा श्लोक उद्धृत केला. त्याचा भावार्थ असा,‘राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया - तसेच राष्ट्रीय सामर्थ्य आणि चैतन्याचा आविष्कार - ही सृष्टीच्या आरंभी आत्मज्ञानी ऋषींनी जगाच्या कल्याणाच्या उदात्त भावनेतून केलेल्या तपस्येतून उगम पावली आहे. म्हणूनच, प्रत्येकाने नम्रतेने या राष्ट्राची सेवा करावी.’
 


Chicago to  New York 
 
मोहनजींच्या भाषणासाठी अमेरिकेतील सर्व धर्मांचे नेते, संघ स्वयंसेवक, त्यांचा परिवार आणि स्थानिक नागरिक जमलेले होते. तेथील अनिवासी भारतीयांना उद्देशून त्यांनी एक संदेश दिला, तोही अतिशय महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, तुम्हा सर्वांची कर्मभूमी अमेरिका आहे. म्हणून अमेरिकेच्या हिताचाच तुम्ही विचार केला पाहिजे. भारत ही तुमची जन्मभूमी असली आणि तिच्याविषयी तुमच्या मनात आदरभाव असला तरीही कर्मभूमीशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असा त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ आहे. भारताची तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. या अपेक्षापूर्तीसाठी भारताचा जीवनहेतू कोणता, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
 
 
भारताचे वैशिष्ट्य विविधतेत एकता असे आहे. भारतात सर्व प्रकारची विविधता आहे, परंतु आंतरिक एकतेचे सूत्र सर्वांना एकत्र बांधून ठेवणे हे आहे. ही विविधता घेऊन आपण जगतो. विश्वातही मानवसमूह आहेत, त्यांच्यात वेगळेपण आहे. परंतु मानव म्हणून आपण सर्व एक आहोत. या विविधतेमुळेच एकता सुशोभित होते. हा भारतीय विचार आपण सर्वांनी जगला पाहिजे. सर्वांप्रती स्नेह बाळगला पाहिजे. दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाची दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी अशी आपण प्रार्थना करतो, माणूस नष्ट व्हावा अशी आपली प्रवृत्ती नाही. एक भारतीय म्हणून हा आपला विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवला पाहिजे. भारताची हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे.
 
 
मोहनजींनी आपल्या भाषणात विश्वमानवापुढील ज्या समस्या आहेत, त्यांना स्पर्श केला. एकमेकांचा द्वेष करीत जगण्यात मानवता नाही. मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. त्याला योग्य काय, अयोग्य काय हे समजते. मानवातील एकतेचा शोध घेणे ही योग्य दिशा आहे. आपापसात संघर्ष करीत राहणे, हा चुकीचा विचार आहे. आपण किती धन अर्जित करतो हे जसे महत्त्वाचे तसेच किती धन दान करतो, हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या करिअरसंबंधी विचार करणे ठीक आहे, परंतु करिअर म्हणजे केवळ पैसा कमविणे नाही. दुसर्‍याचा विचार करणे, दुसर्‍याच्या सुख-दुःखात सहभागी होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
 

Chicago to  New York 
 
संघाविषयी अनेक भ्रम राजकीय स्वार्थासाठी पसरविले जातात. त्यात एक भ्रम असा आहे की, संघाची शक्ती वाढल्यास मुसलमान असुरक्षित होतील. भारतात या भ्रमाला मोहनजींनी अनेक वेळा उत्तर दिले आहे. न्यूयॉर्कच्या भाषणातदेखील त्यांनी सांगितले,“जर कोणत्याही हिंदूला वाटत असेल की, भारतात एकही मुस्लीम नको, तर ती व्यक्ती हिंदू असू शकत नाही”. मोहनजींचे हे प्रतिपादन संघाला शिव्या घालणार्‍यांची झोप उडविणारे आहे. त्यांना ते पचविणे फार अवघड आहे. म्हणून त्याचे श्लेष काढून ते कथानक रचण्याचा व्यवसाय बंद करतील असे नाही. भारताची सनातन वैचारिक भूमिका मानवजात एक असल्याची आहे. धर्म अलग असले तरी अंतिम सत्य एकच आहे आणि त्याकडे जाण्याचे मार्ग अलग अलग आहेत. सर्व मार्ग सत्य आहेत. स्वामी विवेकानंदांच्या या वाणीचा आजच्या संदर्भात मोहनजींनी पुनरुच्चार केला.
 
 
अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात जीवन, स्वातंत्र्य, आणि सुखाचा शोध असे शब्द आहेत. प्रश्न असा येतो की, सुख कशात आहे? इंद्रियांचे भोग पुरविणे म्हणजे सुख आहे का? की त्यापलीकडे काही सुख आहे? आपला सनातन विचार भौतिक गरजांच्या पूर्ततेत चिरंतन सुख आहे असे मानीत नाही. आवडता पदार्थ खाऊन त्या क्षणापुरते सुख लाभते; पण तो पदार्थ खाण्याची इच्छा काही संपत नाही. कायमचे सुख देण्याचे सामर्थ्य भौतिक पदार्थात नाही. मानसिक सुखाला अध्यात्माची गरज आहे आणि ही गरज भारत पूर्ण करू शकतो. अमेरिकेचे वर्णन ’भोगभूमी’ असे केले जाते. तिथे भौतिक सुखाची रेलचेल आहे. अशा भूमीत भौतिक सुख हेच अंतिम सुख आहे असे मानू नका, त्यापलीकडे मानवाशी त्याच्या विविधतेसहित एकरूप होणे, हेच खरे सुख आहे, हे मोहनजींनी सांगितले.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार करता ‘हिंदू राष्ट्राच्या जीवनलक्ष्याचा क्रमबद्ध विकास म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, अशी व्याख्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने केली. या जीवनलक्ष्याच्या क्रमबद्ध विकासक्रमातील न्यूयॉर्क येथील कार्यक्रम हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा संघ सुरू केला, तेव्हा त्यांनी या विचाराचे बीजारोपण केले. त्या बीजाचे पुढे रोप झाले. हळूहळू वाढत तो वृक्ष झाला आणि त्याच्या शाखा आता सर्व जगभर पसरल्या आहेत. भारतीय समाजजीवनात आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये जाणविण्याइतके परिवर्तन घडले आहे. विविध कामांच्या माध्यमातून विविधतेची जपवणूक करीत मानव एकतेचा विचार जगत लाखो कार्यकर्ते आज काम करीत आहेत. ही त्यांची तपश्चर्या आहे. या तपातून एक सामर्थ्य निर्माण होत चालले आहे. आणि त्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व मोहनजी भागवत हे आज करीत आहेत. म्हणून त्यांचे शब्द हे भारताच्या वैश्विक लक्ष्याची जाणीव करून देणारे ठरतात. भारताच्या जीवनलक्ष्याचा प्रवास स्वामी विवेकानंदांपासून सुरू झाला, असे मानले तर मोहनजींच्या रूपाने हा प्रवास आता एक निश्चित दिशा घेऊन निघाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.