एल निनोचे भाकीत आणि यावर्षीचा विस्कळीत मान्सून

विवेक मराठी    04-Sep-2026
Total Views |
- डॉ. श्रीकांत कार्लेकर
 99764769791
 

vivek 
 
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2026च्या सध्या चालू असलेल्या नैऋत्य मान्सून हंगामात एल निनो परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
जून 2026मध्ये या एल निनोची परिस्थिती सौम्य होती आणि जुलै 2026मध्ये ती मध्यम पातळीपर्यंत तीव्र झाली होती. 2026मधील मान्सून हंगाम संपूर्ण देशभरात एकसारखा सक्रिय राहिलेला नाही, तर भारतातील विविध प्रदेशांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय तफावत दिसून आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तवला होता की, जून ते सप्टेंबर या कालावधीत देशाला त्याच्या दीर्घकालीन सरासरी पर्जन्यमानाच्या सुमारे 90% पाऊस मिळू शकेल आणि त्यामुळे हा मान्सून ’सामान्यपेक्षा कमी’ या श्रेणीत मोडतो. तथापि, पावसाचे आगमन यावर्षी असमान लयीत झाले आहे. उत्तर, ईशान्य आणि पश्चिम भारतातील काही भागांना मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा सामना करावा लागत आहे, तर दक्षिण आणि मध्य भारतातील अनेक जिल्हे अजूनही अपुर्‍या पावसाशी झुंज देत आहेत. असे असले तरी अनेक राज्यांमध्ये पावसाचा तुटवडाही नोंदवला गेला आहे.
 
भारतात नैऋत्य मोसमी पाऊस 4 जून 2026 रोजी सुरू झाल्यापासून सतत, कोरडा काळ आणि जोरदार पावसाचा कालखंड यामध्ये हिंदकळतो आहे. मान्सूनमधील कोरडा काळ आणि पावसाचा काळ ही सामान्य बाब आहे; पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरड्या वेळा आणि सक्रिय काळातील अतिवृष्टी ही वाढती चिंता आहे.
 
 
या वर्षाचा हा अनियमित मोसमी नमुना, विषुववृत्तीय प्रदेशात महासागरात मजबूत होत असलेल्या एल निनो घटनेमुळे आणि हरितगृह वायू उत्सर्जनामुळे होणार्‍या या तापमान वाढीमुळे प्रभावित होऊ शकतो. जग या आधीच औद्योगिकपूर्व कालखंडापेक्षा सुमारे 1.4 अंश सेल्सियसने उष्ण झालेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ’नॅशनल ओशनिक अँड अटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’च्या ताज्या अद्ययावत अहवालानुसार, यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान अत्यंत तीव्र किंवा सुपर एल निनो तयार होण्याची 81% शक्यता आहे.
 
 
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) दररोजच्या पावसाच्या आकडेवारीनुसार 29 जून ते 9 जुलै दरम्यान आणि नंतर 19 ते 24 जुलै दरम्यान, संपूर्ण देशात पावसाचे प्रमाण सामान्य ते त्यापेक्षा अधिक होते आणि मान्सून सक्रिय टप्प्यात होता. आणखी एक सक्रिय टप्पा 28 जुलैपासून सुरू झाला; कारण त्यावेळी पूर्वेकडील किनार्‍यावर तयार झालेला तीव्र, कमी वायुभार प्रदेश जमिनीकडे सरकत होता. सामान्यपणे सक्रिय मान्सूनच्या टप्प्यामध्ये संपूर्ण देशात पावसाचे प्रमाण एकसमान राहत नाही. त्याच टप्प्यात, काही भागात अत्यंत जास्त पाऊस पडतो तर काही ठिकाणी फार कमी पाऊस पडतो. अनेक भागांमध्ये दोन सक्रिय टप्प्यानंतरही, 27 जुलै रोजी भारतात सर्वत्र पावसातील तुटवडा 16% होता. IMDच्या मते पूर्व आणि ईशान्य भारतात पर्जन्य तुटवडा सर्वाधिक म्हणजे 30% इतका होता, त्यानंतर दक्षिणेकडील भागात तो 29% आणि मध्य भारतात सामान्य पेक्षा 4% कमी पाऊस, तर वायव्य पश्चिम भारतात 10% तुटवडा होता. पाऊस किती असमान होता ते पर्जन्यातील राज्य आणि जिल्हास्तरीय आकडेवारी दाखवत होतीच.
 
IMDच्या माहितीनुसार, 1 जून ते 27 जुलै दरम्यान एकोणीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची कमतरता नोंदवली गेली. मेघालयमध्ये 56% इतकी सर्वाधिक कमतरता नोंदली गेली. लडाख, इथे 196% इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. काही राज्यांमध्ये थोड्या काळात प्रचंड पाऊस झाल्यामुळे अचानक पूर आणि भूस्खलनाचे प्रकार पाहायला मिळाले. आसाममध्ये जरी 30% पावसाची कमतरता होती तरी तिथे 12 जिल्ह्यांमध्ये पूर आले होते. ’स्फिअर इंडिया’ या संस्थेच्या सांख्यिकीनुसार 25 जुलैपर्यंत 856 गावांमध्ये 700,000हून अधिक लोक प्रभावित झाले होते. आसाममध्ये येणारे पूर मोठ्या प्रमाणात नागालंडमधून आसामकडे वाहणार्‍या नद्यांमुळे आले. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश जे अतिवृष्टी, अचानक पूर किंवा भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत त्यात मिजोराम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे.
 
 
या वर्षाच्या मोसमी पावसाच्या गुंतागुंतीत सक्रिय असलेला आणखी एक घटक म्हणजे जून आणि जुलै दरम्यान पश्चिमी अडथळे किंवा विक्षोभ (western disturbances) सुरू राहणे. पश्चिमी अडथळे हे समशीतोष्ण कटिबंधीय वादळी वारे असून भूमध्य प्रदेशातून पूर्वेकडे सरकत येत वायव्य भारतात हिवाळ्यात पावसाचे प्रमाण वाढवतात. साधारणपणे मान्सूनमध्ये ते कमी सक्रिय असतात पण 2025 व 2026मध्ये, हे मोसमी हंगामातही सक्रिय राहिले. यावर्षी, हिमालयात अतिवृष्टी आणि भूस्खलन तेव्हा घडले जेव्हा पश्चिमी अडथळे मोसमी पावसाबरोबर सक्रिय झाले. हे प्रकार विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये जास्त दिसून आले, जिथे दोन्ही प्रणाली सक्रिय होत्या. ह्या सर्व घटकांनी मिळून मोसमी पावसात अनियमित उतार-चढाव निर्माण केले.
 
 
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, नैसर्गिक मान्सूनमधील बदल, अधिक तीव्र होणारा एल निनो आणि पश्चिमी विक्षोभ व जागतिक तापमानवाढ यामुळे या वर्षीचा हा असमान व विस्कळीत मान्सून तयार होत आहे. सामान्य परिस्थितीत, व्यापारी वारे (Trade winds) प्रशांत महासागरात, विषुववृत्तीय प्रदेशात, पूर्वेकडील दक्षिण अमेरिकेकडून पश्चिमेकडील आग्नेय आशियाकडे वाहतात, ज्यामुळे समुद्राच्या उष्ण पृष्ठभागाचे पाणी पश्चिमेकडे ढकलले जाते व पश्चिम पॅसिफिकमध्ये उष्ण पाणी जमा होते, जे तेथील उष्णकटिबंधीय पाऊस आणि ढगांच्या निर्मितीस चालना देते. जेव्हा हे वारे अगदी उलटे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वळतात तेव्हा पश्चिम पॅसिफिकमध्ये साठलेले उष्ण पाणी पूर्वेकडे, दक्षिण अमेरिकेकडे वाहते. याला ’एल निनो प्रवाह’ असे म्हटले जाते. एल निनो ही एक चक्रीय घटना असून काही वर्षांच्या अंतराने ती पुन्हा पुन्हा कार्यरत होते. ही यंत्रणा सात वर्षांतून एकदा कार्यरत होते, असे पूर्वी वाटत होते; मात्र नवीन संशोधनानुसार व हवामानाच्या सातत्याने घेतलेल्या आकडेवारीनुसार आता असे लक्षात येते आहे की,ही घटना 4 ते 5 वर्षांतून एकदा घडते आहे. या चक्रीय घटनेत सातत्य आढळत नसल्यामुळे तिचे भाकीतही नेमकेपणाने करता येत नाही.
 
 
एल निनोमुळे, प्रशांत महासागरात पश्चिमेकडे ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, आफ्रिका व भारतात दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवते. भारतात मोसमी पाऊस पुढे जातो किंवा खूप कमी पडतो. पश्चिम प्रशांत महासागराच्या प्रदेशात अन्नद्रव्यात घट होते, प्रवाळ हानी होते, झूप्लांकटन आणि मासे यांची संख्या घटते आणि असंख्य जलचरांचा संहार होतो. मध्य पॅसिफिक महासागरावरील विषुववृत्तीय समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरकाच्या तीव्रतेच्या आधारावर एल निनो घटनांचे सामान्यतः सौम्य, मध्यम, तीव्र किंवा अति तीव्र असे वर्गीकरण केले जाते. ऑक्टोबर-डिसेंबर 2026च्या हंगामात एल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि तो अति तीव्र श्रेणीपर्यंत पोहोचू शकतो. तथापि, त्याची नेमकी तीव्रता आणि भारतीय प्रदेशावरील परिणाम हे समुद्र आणि वातावरणाच्या एकत्रित परिस्थितीच्या उत्क्रांतीवर अवलंबून आहेत.
 
 
पॅसिफिक महासागरात एल निनो तयार होत असल्याच्या बातमीमुळे 2026 हे वर्ष, हवामानाच्या दृष्टीने मोठे बदल घडवणारे ठरणार आहे, असे दिसते आहे. या वर्षीचा ’एल निनो’हा ’सुपर एल निनो’ असेल असे म्हटले गेले असले तरी जागतिक हवामान संघटना (WMO) किंवा भारतीय हवामान विभाग (IMD) यांच्याद्वारे जाहीर केलेल्या विविध श्रेणीत ’सुपर एल निनो’ नावाची कोणतीही श्रेणी अधिकृतपणे परिभाषित श्रेणी नाही.
 
 
गेल्या काही वर्षांतील अनियतपणामुळे आपल्याला सध्याचा भारतीय मान्सून पूर्णपणे समजलेला आहे, असे म्हणता येत नाही. तो जागतिक हवामान प्रणालींशी कसा जोडलेला आहे; आणि हवामान बदलामुळे जगातील सागरी प्रवाह, वार्‍याची दिशा आणि पर्जन्य प्रणालींमध्ये होणार्‍या बदलांचे परिणाम नेमके काय होतात हेही आपल्याला अजून नीटसे समजलेले नाही.
 
 
हे वर्ष 2026, हवामानाच्या दृष्टीने खूपच बदल घडवणारे ठरणार आहे. सर्वप्रथम, पॅसिफिक महासागरात एल निनोची निर्मिती होत असल्याचे हवामान शास्त्रज्ञांतर्फे सांगितले जात आहे. एल निनोमुळे भारतीय मान्सून कमकुवत होतो, असे यापूर्वीच लक्षात आले आहे. आता हे जवळपास निश्चित झाले आहे की, या वर्षीचा हा एल निनो एक ’अतिशय तीव्र’ स्वरूपाची घटना असेल, कारण समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने जास्त होण्याची शक्यता आहे.
 
 
समुद्रातील उष्णतेच्या या तीव्र लाटेमुळे वातावरणीय दाब प्रणाली आणि जेट प्रवाह अस्थिर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या घटना अधिक तीव्र होतील. या घटना हवामान बदलाच्या सर्व दीर्घकालीन परिणामांव्यतिरिक्त असतील ज्या पृथ्वीचे, विशेषतः समुद्राचे तापमान आधीपासूनच वाढवत आहेत व हवामान अधिक अस्थिर बनवत आहेत. या तापमान वाढीमुळे 2026 हे वर्ष खूपच तापदायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली असण्याची आहे.
 
 
यावर्षी ऑगस्टमध्ये एल निनो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या काळात सरासरीपेक्षा कमी मान्सून पर्जन्याचा अंदाज वर्तवला आहे. अतितीव्र एल निनोच्या अशा परिणामांची तीव्रता कमी करू शकणारी एक दुसरी हवामान घटना म्हणजे हिंदी महासागरातील द्विध्रुव (इंडियन ओशन डायपोल (IOD) प्रणाली. याला अनेकदा ’इंडियन निनो’ असे म्हटले जाते. त्याचाही विचार यावर्षीच्या मॉन्सून बाबतीत करणे गरजेचे आहे.
 
 
ह्या प्रणालीची तीव्रता पूर्व आफ्रिकेजवळचा पश्चिम हिंदी महासागर आणि इंडोनेशियाजवळचा पूर्व हिंदी महासागर यांच्यातील तापमानाच्या फरकाच्या आधारे मोजली जाते. सकारात्मक खजऊमध्ये पश्चिमी आघाडीवर पाणी अधिक उष्ण असते, ते, भारतात पाऊस कमी पडणे, दुष्काळ पडणे अशा तीव्र एल निनोच्या वाईट परिणामांना निष्प्रभ करू शकते. तथापि, यावर्षी भारतीय हवामान विभागाने तटस्थ खजऊ परिस्थितीचा अंदाज वर्तवला आहे आणि मान्सून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातच IOD मध्ये असा सकारात्मक बदल होण्याची शक्यता वर्तविली आहे
 
 
हिंदी महासागरातील द्विध्रुव (IOD) ही एक संयुक्त महासागर-वातावरण हवामान घटना आहे. प्रादेशिक पर्जन्यमान आणि हवामानातील बदलांना चालना देण्यात ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या घटनेच्या सकारात्मक टप्प्यात आफ्रिकेजवळचा पश्चिम हिंदी महासागर असामान्यपणे उष्ण होतो. खोल, थंड पाण्याच्या वाढलेल्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे सुमात्रा/इंडोनेशियाजवळचा पूर्व हिंदी महासागर थंड होतो. विषुववृत्तावर पूर्वेकडील वारे अधिक तीव्र होतात, ज्यामुळे आर्द्रता पश्चिमेकडे ढकलली जाते आणि पूर्व आफ्रिकेवरील पर्जन्यवृष्टी वाढते, तर इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियावरील पर्जन्यवृष्टी कमी होते. हे वारे अनेकदा भारतीय मान्सूनला आधार देतात आणि त्याला अधिक बळकट करतात. नकारात्मक टप्प्यात परिस्थिती उलट होते. इंडोनेशियाच्या किनार्‍याजवळ सरासरीपेक्षा जास्त उष्ण पाणी जमा होते आणि पश्चिम बाजूस थंड पाणी जमा होते. पश्चिमेकडील वार्‍यांचा जोर वाढल्याने इंडोनेशिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये पावसाचे प्रमाण वाढते तर पूर्व आफ्रिकेत आणि भारतात पाऊस कमी होण्याची शक्यता वाढते. तटस्थ टप्प्यात संपूर्ण हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीच्या जवळपास राहते आणि पूर्व-पश्चिम तापमानात फारसा फरक नसल्यामुळे, त्याचा प्रादेशिक हवामानावर नगण्य प्रभाव पडतो.
 
 
IOD स्वतंत्रपणे कार्य करत नाही. पॅसिफिकमधील एल निनो सोबत त्याची वारंवार आंतरक्रिया होते. सकारात्मक खजऊ भारतातील मान्सूनला कोरड्या करण्याच्या एल निनोच्या, परिणामांना अंशतः निष्प्रभ करू शकते. एल निनोच्या वेळी येणारा नकारात्मक आयओडी आर्द्रतेची कमतरता गंभीरपणे वाढवू शकतो, ज्यामुळे भारतातील दुष्काळाची परिस्थिती अधिक तीव्र होते. डायपोल मोड इंडेक्स (DMI) वापरून या प्रणालीची तीव्रता आणि टप्प्याचा मागोवा घेता येतो. त्यातून पश्चिम आणि पूर्व हिंदी महासागरामधील तापमानातील विसंगतीचा फरक मोजला जातो. यावर्षी मान्सून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात खजऊमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता असल्यामुळे भारतात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
प्रादेशिक हवामान प्रणाली, चक्रीवादळी प्रवाह आणि अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रांमधील आर्द्रता एल निनोच्या नेहमीच्या कोरडेपणाच्या प्रभावावर मात करत असल्यामुळे, भारतातील मान्सून सध्या तात्पुरत्या कालावधीसाठी सक्रिय राहतो आहे. खरे म्हणजे 2026मधील आत्तापर्यंतचा मान्सूनचा हंगाम प्रत्यक्षात एकसमान सक्रिय कधीच नव्हता; एका स्थिर, सामान्य देशव्यापी पर्जन्य वृत्तीऐवजी स्थानिक वातावरणीय घटकांमुळे जून 2026मध्ये पर्जन्यमानातील 40% इतक्या लक्षणीय त्रुटी पासून ते जुलैमध्ये तीव्र, सक्रिय वाढीच्या अवस्थेपर्यंत त्यात चढ-उतार दिसून आले.
 
 
पॅसिफिक महासागराच्या तापमानात सर्वत्र वाढ असूनही, भारतांत वारंवार चक्रीय वार्‍यांची निर्मिती झाली आणि मान्सून काळात कमी वायुभार पट्ट्याच्या निर्मितीमुळे जूनच्या अखेरीस आणि जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडला. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्हींकडून येणार्‍या उच्च आर्द्रतेच्या प्रवाहाने, एल निनोमुळे सामान्यतः निर्माण होणार्‍या वातावरणीय दाबाचा तात्पुरता प्रतिकार केला.
 
 
शास्त्रज्ञांच्या मते एल निनो सध्या एकटाच कार्यरत नसून वाढते जागतिक तापमान आणि सतत बदलणारे सागरी प्रवाह, या घटना हवामानाच्या दृष्टीने तणावपूर्ण असलेल्या या वर्षांमध्येही अत्यंत स्थानिक स्वरूपाच्या पण मुसळधार पावसाच्या घटनांना कारणीभूत ठरल्या आहेत.
 
(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत)