स्वातंत्र्यपूर्व काळात निजामशाहीतील संघर्षातून माजलगावच्या ‘श्री ढुंढीराज टेंबे गणेश’ या बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झाली. या परंपरेला 126 वर्षे पूर्ण होत आहेत. ही शतकोत्तर भक्ती केवळ धार्मिक नियमांमध्ये अडकून राहिली नाही; तर पुरासारखे नैसर्गिक संकट असो वा कोरोना महामारी...प्रत्येक आपत्तीच्या काळात ‘श्री ढुंढीराज टेंबे गणेश’ हा बाप्पा शहराच्या मदतीला धावून आलेला आहे.
माजलगावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात ’श्री ढुंढीराज टेंबे गणेश मंडळा’चे स्थान अत्यंत मानाचे आहे. शतकाहून अधिक काळाची परंपरा, श्रद्धेचे केंद्रस्थान, ऐतिहासिक वारसा आणि समाजोपयोगी कार्याची जोड यांमुळे टेंबे गणेश मंडळ हा सामाजिक एकात्मतेचे आणि सामूहिक जबाबदारीचे स्थान आहे. सन 1901मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.
स्थापनेच्या पहिल्या वर्षापासूनच म्हणजे सन 1901पासून श्री टेंबे गणपतीची स्थापना श्रीराम मंदिरात होत असे. श्रींची प्रतिष्ठापना श्रीराम मंदिरात करून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. पुढे शतकी वर्षाच्या निमित्ताने याच मंदिरातील गणेशमूर्तीची सन 2000साली भाविकांच्या आग्रहाखातर नित्यदर्शनासाठी कायमस्वरूपी प्रतिष्ठापना करण्यात आली. काळानुरूप श्रींच्या दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन मंडळाने मंदिराच्या बाजूला असलेली जागा खरेदी केली. त्या ठिकाणी भव्य वास्तूचे बांधकाम करण्यात आले. भाविकांची वाढती संख्या आणि उत्सवाचे विस्तारणारे स्वरूप लक्षात घेऊन पंचदिनात्मक गणेशोत्सव याच भव्य जागेत सुरू करण्यात आला. शहरासोबतच तालुक्यातील सर्वांत जुने, ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरा जोपासणारे मंडळ म्हणून मंडळाची ओळख आहे.
मंडळाच्या संघर्षातून जन्मलेली धार्मिक परंपरा
श्री टेंबे गणेशाचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळाशी जोडलेला आहे. त्या काळात संपूर्ण मराठवाडा निजामशाहीच्या अखत्यारीत होते. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी आवश्यक होती त्यामुळे गणेशोत्सवाची मिरवणूक एका ठिकाणी अडविण्यात आल्याचे मंडळाकडून सांगितले जाते. त्यानंतर मंडळाच्या धाडसी कार्यकर्त्यांनी घोड्यावरून हैदराबाद गाठून परवानगी मिळविल्याचा इतिहास सांगितला जातो. या घटनेनंतर गणेशाची स्थापना भाद्रपद शुद्ध एकादशीला करण्याची परंपरा सुरू झाली आणि ती आजही कायम आहे. ही घटना एका धार्मिक परंपरेची सुरुवात होतीच; त्याबरोबर संकटाच्या काळात संघटितपणे उभे राहण्याची, आपले हक्क जपण्याची आणि सामूहिक इच्छाशक्ती दाखविण्याची प्रेरणा देणारी होती. त्यामुळे टेंबे गणेशाच्या इतिहासात श्रद्धेबरोबरच धैर्य, संघटन आणि सामाजिक बांधिलकी यांनाही महत्त्वाचे स्थान आहे.
‘टेंबे’ नावामागेही आहे, इतिहास
टेंबे गणेश या नावामागेही माजलगावच्या जुन्या सामाजिक जीवनाची आठवण दडलेली आहे. निजामकाळात विजेची सुविधा नव्हती एका भक्ताने, ’मला वंशाचा दिवा लागू दे. मी, तुझ्या मिरवणुकीत टेंबा धरून उभा राहील,’ असा नवस केला. यातून पुढे नवसपूर्तीची परंपरा आली असल्याचे मंडळाकडून सांगितले जाते. मिरवणुकीत टेंबे घेऊन सहभागी होण्याची परंपरा कायम आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श
आज पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना टेंबे गणेश मंडळाची पारंपरिक पर्यावरणपूरक मूर्ती विशेष उल्लेखनीय ठरते. मंडळाच्या स्थापनेपासूनच श्रींची मूर्ती आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने माती व नैसर्गिक घटकांपासून तयार करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मातील परंपरा आणि आधुनिक पर्यावरण-जागरूकता यांचा सुरेख संगम येथे सुरुवातीपासूनच पाहायला मिळतो. गणेशोत्सव साजरा करताना निसर्गाचे नुकसान होऊ नये, हा विचार समाजापर्यंत पोहोचविणे हीदेखील एक प्रकारची समाजसेवाच आहे.
उत्सवातून समाजसेवेची वाटचाल
गणेशोत्सव म्हटले की, आज अनेक ठिकाणी रोषणाई, सजावट, मिरवणूक आणि मनोरंजन यांना प्राधान्य दिले जाते. मात्र टेंबे गणेश मंडळाच्या परंपरेत उत्सवाला समाजोपयोगी उपक्रमांची जोड देण्याची भूमिका दिसून येते. विविध वर्षांमध्ये मंडळाकडून समाजोपयोगी कार्यक्रम, धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संदेश देणारे देखावे आयोजित केले जात असल्याचे वृत्तांतांमधून दिसते. यामुळे गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारे व्यासपीठ ठरतो. समाजातील विविध घटकांना एका छताखाली आणणे, तरुणांना संघटित करणे, सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करणे आणि सामूहिक सहभागाची भावना निर्माण करणे, हीच या परंपरेची खरी ताकद म्हणावी लागेल.
सामाजिक एकतेचा संदेश
टेंबे गणेशाची सर्वांत मोठी ताकद म्हणजे मंडळाच्या भोवती निर्माण होणारी सामाजिक एकजूट. माजलगावातील विविध गणेश मंडळे, नागरिक आणि कार्यकर्ते एकत्र येण्याची परंपरा या मंडळामुळे अधिक दृढ झाली आहे. विशेषतः 2020मध्ये कोरोना महामारीच्या काळात माजलगावातील सर्व गणेश मंडळांनी एकत्र येऊन ‘एक शहर, एक गणपती’ या संकल्पनेला मान्यता दिली आणि ’श्री ढुंढीराज टेंबे गणेश मंडळा’चीच स्थापना करण्याचा निर्णय घेतला. ’संकटाच्या काळात उत्सवापेक्षा सामाजिक जबाबदारी मोठी आहे,’ हा संदेश या निर्णयातून देण्यात आला. ही घटना टेंबे गणेश मंडळाच्या सामाजिक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. हजारो लोकांना आकर्षित करणारा उत्सव असतानाही सार्वजनिक आरोग्य आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन उत्सवाचे स्वरूप मर्यादित करण्याचा निर्णय घेणे, ही सामाजिक संवेदनशीलतेची चुणूक दाखवून देते.
तरुणांसाठी संस्काराचे केंद्र
टेंबे गणेश मंडळाची आणखी एक महत्त्वाची सामाजिक भूमिका म्हणजे तरुण पिढीला सकारात्मक कामाशी जोडणे. गणेशोत्सवाच्या आयोजनातून तरुणांना नियोजन, संघटन, शिस्त, जबाबदारी, सहकार्य आणि नेतृत्व यांचे प्रत्यक्ष धडे मिळतात. मंडळाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणारा तरुण केवळ उत्सव साजरा करणारा कार्यकर्ता राहत नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची मानसिकता त्याच्यात निर्माण होते. सामाजिक प्रश्नांवरील देखावे, जनजागृतीपर कार्यक्रम, धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम आणि सार्वजनिक व्यवस्थापन या माध्यमातून अनेक पिढ्यांनी सामूहिक कार्याचा अनुभव घेतला आहे.
जागतिक संकटातही जबाबदारीची जाणीव
कोरोना काळातील मंडळाची भूमिका विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. कोरोना काळात मंडळातर्फे तब्बल 128 दिवस शहरातील उपेक्षित, वंचित पालावर राहणारे लोक यांना सकाळ आणि संध्याकाळ गरम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मंडळाचे कार्यकर्ते स्वतः अन्न तयार करून ते वाटप करत असत. कोरोनाच्या काळात गणेशोत्सव दरम्यान मिरवणूक आणि सामाजिक देखावे रद्द करून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. भाविकांना गर्दी टाळता यावी यासाठी आरतीचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. ’धर्म आणि परंपरा जपताना समाजाची योग्य काळजी, सामाजिक आरोग्य व सुरक्षितता यांना प्राधान्य देणे,’ हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे.
मंडळाचे सामाजिक कार्य
गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, गरजूंच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि तरुण पिढीला विधायक कार्याची दिशा देणे, हे टेंबे गणेश मंडळाच्या सामाजिक कार्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. उत्सवाच्या काळात होणार्या उपक्रमांमधून ‘देवासाठी केलेली सेवा ही समाजसेवेतही रूपांतरित झाली पाहिजे’, हा विचार रुजविण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यातून दिसून येतो.
स्मशानभूमीत वृक्षारोपण
मंडळाच्या सामाजिक उपक्रमांमध्ये स्मशानभूमीत वृक्षारोपण हा विशेष उल्लेख करावा असा उपक्रम आहे. सामान्यतः वृक्षारोपणासाठी शाळा, रस्त्यांच्या कडेला, उद्याने किंवा सार्वजनिक मोकळ्या जागांची निवड केली जाते. मात्र स्मशानभूमीसारख्या ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा विचार हा सामाजिक जाणीव अधिक व्यापक करणारा आहे. मृत्यू ही जीवनाची अंतिम सत्यता असली तरी निसर्गाशी असलेले नाते कायम राहते. स्मशानभूमीत लावलेले वृक्ष पुढील अनेक वर्षे सावली, शुद्ध हवा देत राहतात. त्यामुळे श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत मंडळाने समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
आपत्तीच्या काळात मदतीचा हात
समाजासमोर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट उभे राहिले की मदतीसाठी पुढे येणे हीच खरी सामाजिक बांधिलकी. पूर, अतिवृष्टी, दुष्काळ, महामारी किंवा इतर आपत्तींच्या काळात संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्याची भूमिका मंडळाने सातत्याने घेतली आहे. मुख्यमंत्री निधीत मंडळाने आतापर्यंत एक लाख पन्नास हजार रुपयांचा भरघोस निधी दिला आहे.
रक्तदानातून जीवनदानाचा संदेश
‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन हा मंडळाच्या सामाजिक कार्यातील आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. रक्ताची गरज ही कोणत्याही धर्म, जात, पक्ष किंवा वर्गाचा विचार न करणारी गरज आहे. अपघातग्रस्त, प्रसूतीतील महिला, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण किंवा गंभीर आजाराने उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी रक्ताचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. गणेशोत्सवाच्या उत्साहाला रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमाची जोड देऊन तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे, ही काळाची गरज आहे. उत्सवातील ऊर्जा समाजाच्या आरोग्यासाठी वापरण्याचा हा उपक्रम टेंबे गणेश मंडळाच्या सामाजिक दृष्टीकोनाचे दर्शन घडवतो.
हार-फुलांऐवजी वह्या-पुस्तकांचे दान
’टेंबे गणेश मंडळा’ने गणेशोत्सवात श्रींना हार-फुले अर्पण करण्याच्या पद्धतीला विधायक पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हार-फुलांऐवजी वह्या-पुस्तकांचे दान करण्याचा आग्रह मंडळ सतत करत असतो. फुलांचा सुगंध काही काळ टिकतो; मात्र एका विद्यार्थ्याच्या हातात दिलेले पुस्तक त्याच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकते. त्यामुळे हारफुलांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच रकमेतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी साहित्य उपलब्ध करून देणे, ही सामाजिक संवेदनशीलतेची जाणीव आहे. शिक्षणापासून वंचित किंवा आर्थिक अडचणींमुळे आवश्यक शैक्षणिक साहित्य घेऊ न शकणार्या विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. ‘हार नको, शिक्षणाला हातभार द्या’ हा संदेश समाजात रुजविण्याची क्षमता या उपक्रमात आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
समाजाची प्रगती ही केवळ आर्थिक विकासाने होत नाही; तर शिक्षण आणि गुणवत्तेच्या बळावर समाज पुढे जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाला प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा उपक्रमही महत्त्वाचा ठरतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर यश मिळविता येते, हा विश्वास अशा सत्कारातून निर्माण होतो. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना भविष्यात आणखी मोठे यश मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणे, ही मंडळाची सामाजिक गुंतवणूकच म्हणावी लागेल.
जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचा सन्मान
एखादा मोठा उत्सव एका दिवसात उभा राहत नाही. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत, त्याग, संघर्ष आणि असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान असते. ’श्री टेंबे गणेश मंडळा’ची आजची व्यापक ओळख निर्माण करण्यात जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचा आणि मंडळाच्या विस्तारासाठी झटलेल्या व्यक्तींचा मोठा वाटा आहे. या कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची आठवण पुढील पिढीसमोर ठेवणे, हा कृतज्ञतेचा संस्कार आहे. ज्यांनी वेळ, श्रम आणि ऊर्जा मंडळासाठी दिली, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत उत्सवाची परंपरा जिवंत ठेवली आणि ज्यांच्या प्रयत्नांमुळे मंडळाचा विस्तार झाला, अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव मंडळाकडून सतत करण्यात येतो.
आज हजारो भाविक श्री टेंबे गणेशाचे दर्शन घेतात; मात्र या गर्दीमागची खरी शक्ती केवळ श्रद्धेत नाही, तर एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याच्या आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करताना एखाद्या गरजूच्या चेहर्यावर हास्य आणण्याची प्रेरणा मिळावी, एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला हातभार लागावा, एखाद्या रुग्णाला रक्त मिळावे, संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार मिळावा हीच टेंबे गणेशाच्या सामाजिक परंपरेची खरी शिकवण आहे. म्हणूनच श्री ढुंढीराज टेंबे गणेश हा माजलगावचा केवळ मानाचा गणपती नसून, तो माजलगावच्या सामाजिक अस्मितेचा, सामूहिक जाणिवेचा आणि सेवाभावाचे केंद्र आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.