भालचंद्र कुलकर्णी
9822882509
‘जनता सहकारी बँके’चे माजी अध्यक्ष, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे माजी अध्यक्ष, ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’चे माजी विश्वस्त, ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे माजी विश्वस्त, ‘सहकार भारती नागरी बँक विभागा’चे मार्गदर्शक, ‘मोरया हॉस्पिटल-चिंचवड’चे माजी विश्वस्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद केशव खळदकर यांचे वयाच्या 84व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहणारा हा लेख.
आयकर खात्यातून उपायुक्त पदावरुन 1994मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अरविंदरावांचा स्वभाव बहुदा सरकारी नोकरीमुळे ‘अरे ला कारे’ म्हणण्याचा, काहीसा रागीट वाटावा असा होता. मात्र जी-जी मंडळी त्यांच्याजवळ गेली त्यांना अरविंदरावांनी आपलेसे करुन टाकले, मित्र बनवले होते. अत्यंत स्पष्टवक्ते असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांनी कोणालाही साधा ओरखडादेखील येऊ दिला नाही. हे कसब त्यांच्या ठायी होते, ज्याला त्यांच्यातील आध्यात्मिक बैठकीचं अधिष्ठान होते. नेहमी हसतमुख आणि उत्साहाने काम करणार्या अरविंदरावांनी कधीही कशाचीही अपेक्षा ठेवलेली नव्हती. मान-अपमान याच्या फार बाहेर होते ते. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवत त्यांनी कामाला, कर्तव्याला सर्वाधिक महत्त्व दिले. भावना आणि व्यवहार यात त्यांनी कधीही गल्लत होऊ दिली नाही. दिखाऊपणाला त्यांनी कधी महत्त्व दिले नाही. वेळेचे महत्त्व त्यांच्याबरोबर काम करणार्यांना निश्चित जाणवले असेलच. वेळ पाळण्याची सवय नसलेल्यांना अरविंदरावांचा राग पुरता जाणवायचा.
खळदकर मूळचे सासवडजवळच्या पारगाव-नेमाणे येथील. त्यांची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि सोपानदेव या भावंडांवर भक्ती होती, प्रेम होतं. ’ज्ञानेश्वरी’ आणि ’दासबोध’ हे ग्रंथ जवळपास त्यांचे मुखोद्गत होते. यातील अनेक संदर्भ त्यांनी अनेकदा रोजच्या व्यावहारिक जीवनात वापरले. संतसाहित्यातून मिळालेलं सार त्यांनी अनेकदा आपल्या भाषणांमधून आणि गप्पांमधून सर्वांना वाटलं. मराठी, इंग्रजीबरोबरच संस्कृत भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. अनेक पुस्तके ते कायम वाचत असत आणि अनेकांना वाचनाची प्रेरणा देत असत. ज्या व्यक्तीला (त्याच्या नोकरी, व्यवसायानुसार) जे पुस्तक वाचण्याची गरज आहे, असे त्यांना वाटे, तेव्हा-तेव्हा ते मुद्दाम फोन करून कळवत असत आणि पुढच्या भेटीत त्याची चौकशीदेखील करत असत. समोरच्या माणसाचा चेहरा बघूनच ते सांगायचे की, ’काही अडचण आहे का? किंवा आज फार खूश दिसताय, काही विशेष?...’ इतका मनकवडा स्वभाव असलेले अरविंदराव खरोखरच मनस्वी प्रेमळ होते, फणसासारखे. बाहेरून काटेरी वाटावे असे आणि आतून रसरसशीत मधाळ असलेले.
पुस्तक खरेदी करा..
त्यांनी वकिली, कर सल्लागार म्हणून केलेला व्यवसाय असो की त्यांनी स्वीकारलेली एखादी संस्थेची सामाजिक जबाबदारी असो, त्यांची कोणतेही कार्य तडीस नेण्याची हातोटी मात्र जबरदस्त होती. विविध विषयांचा व्यासंग असलेले अरविंदराव तल्लख बुद्धिमत्तेचे कुशल प्रशासक होते. त्यांच्या चाणाक्ष नजरेतून कुठलीच गोष्ट सुटत नसे. चुकीचे आणि अव्यवहार्य असे काहीच त्यांना खपत नसे. त्यासाठी त्यांना कसलीच तडजोड मान्य नसायची. मात्र पुढे ’जनता सहकारी बँके’चे नेतृत्व करताना आपल्या स्वभावाला त्यांनी थोडीफार मुरड घातली होती, त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी.
अरविंदरावांचे महाविद्यालयीन काळातले मित्र म्हणजे स्व. मदनदासजी देवी (पूर्व सहसरकार्यवाह, रा.स्व.संघ). त्यांच्यामुळेच त्यांना संघकार्याची विशेष आवड निर्माण झाली. तरुणपणात त्यांना संघाचा परिचय झाला आणि ते संघाचे होऊन गेले. त्यांचा विवाह झाला तो संघ कार्यकर्त्याच्या घराशीच. कल्याणच्या गोखले कुटुंबातील विद्याताईंशी. ज्यांची समर्थ आणि सावलीसारखी साथ त्यांना अखेरपर्यंत होती. त्यांची सुविद्य आणि प्रतिभावान मुले सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारा चिन्मय, खाजगी कंपनीत वरिष्ठ स्तरावर काम करणारा अमित, अर्चना आणि वरदा या लेकी, नातवंडे अशा कुटुंबवत्सल अरविंदरावांनी आपले समाजकार्य कुठेही घरच्या कार्यक्रमांमध्ये आडवे येऊ दिले नाही. तिथेही त्यांची उपस्थिती तितकीच हवीहवीशी आणि उत्साहवर्धक असायची.
आयकर विभागातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर अरविंदरावांनी ’स्वदेशी जागरण मंच’च्या कामाला सुरुवात झाली आणि त्यांचा एका अर्थाने आर्थिक संस्थांशी संबंध येऊ लागला. दरम्यानच्या काळात देशातील सुप्रसिद्ध आणि प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या ’डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे नियामक मंडळाचे अध्यक्षपदही भूषविले, ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ’भांडारकर संस्थे’चेही ते विश्वस्त राहिले. चिंचवडच्या ’मोरया हॉस्पिटल’चे विश्वस्त म्हणूनदेखील त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. कोणतेही पद ही मोठी जबाबदारी असते, ती प्रामाणिकपणाबरोबरच निष्ठेने निभावणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणायचे आणि प्रत्यक्षातही वागायचे.
त्याचवेळी म्हणजे 1996मध्ये ’पुणे जनता सहकारी बँके’च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ते निवडून आले. ज्या मंडळाचे नेतृत्व ज्येष्ठ बँकर वि.श्री. दामले आणि हरिभाऊ मिरासदार यांच्याकडे होते. तेथूनच त्यांनी बँकिंगचे धडे गिरवले. अरविंदराव नेहमी म्हणत असत, की ’मला इन्कम टॅक्स कळतो; पण बँकिंग नाही.’ जे आपल्याला माहीत नाही, ज्याचे ज्ञान आपल्याला नाही, हे मोकळेपणाने मान्य करण्याइतका मोठेपणा त्यांच्या ठायी होता.
’पुणे जनता सहकारी बँके’चे 1997पासून संचालक व 2001पासून ते अध्यक्ष राहिले होते. त्यांच्याच कार्यकाळात ’जनता सहकारी बँक’ आर्थिक अडचणीतून बाहेर आली, ज्याचे रिझर्व्ह बँकेनेदेखील विशेष कौतुक केले होते. जनता बँकेचा 1997 ते 2011 असा खडतर आणि धास्तावणारा काळ होता, ज्यावेळी अरविंदराव पहाडासारखे उभे होते. बँक या संकटातून जात असताना अरविंदररावांच्या समर्थ नेतृत्वाखाली संचालक मंडळाने धाडसी निर्णय घेतले आणि त्याची अचूक अंमलबजावणी केली. मार्च 2002मध्ये सुमारे 2800 कोटींचा व्यवसाय असलेल्या जनता बँकेने मार्च 2014 अखेर 10 हजार कोटींचा टप्पा पूर्ण करून बहुराज्यीय दर्जाही मिळवला आणि खर्या अर्थाने या बँकेने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली, ज्याचे आजही बँकिंग क्षेत्रात संदर्भ दिले जातात. या सर्व काळात त्यांना बरोबरीने साथ दिली ती विजय भावे, सदानंद जोशी, सदानंद भागवत, जयंत काकतकर, जगदीश कश्यप या आणि अशा सर्वच अधिकारी मंडळींनी. त्याचबरोबर संचालक मंडळातील हरिभाऊ मिरासदार, संजय लेले, सुधीर पंडीत, जगदीश कदम, डॉ. मुकुंद तापकीर या ज्येष्ठ संचालकांनी आणि अन्य सहकार्यांनी अरविंदरावांना खंबीरपणे साथ दिली. अरविंदराव नेहमी म्हणत, ’त्यागी आणि समर्पित सेवक, निष्ठावान खातेदार, संयमी भागधारक (सभासद) आणि धाडसी व अचूक निर्णय घेणारे नि:स्वार्थी संचालक मंडळ आणि कुशल व अनुभवसंपन्न मुख्य कार्यकारी अधिकारी या पाच घटकांच्या अथक परिश्रमाने आणि समर्पणामुळेच जनता बँकेचे ‘टर्न अराऊंड’ झाले.’ यशाचे सर्व श्रेय त्यांनी कायम या पाच घटकांनाच दिले. स्वत:ला कधीही नाही.
तडफेने आणि धडाकेबाज पद्धतीने त्यांनी जनता बँक अडचणीतून केवळ बाहेर काढली नाही; तर तिचा मोठा विस्तारही केला. या बँकेच्या कारकिर्दीचा धांडोळा घेणारे, अडचणीतून मार्ग काढणारे अनेक मुद्दे, आठवणी त्यांनी शब्दबद्ध केल्या आहेत, एका विशेष अशा यशोगाथेतून, ज्याचे शीर्षक आहे - ‘नवल वर्तले’, तेही श्री ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दातलेच! ‘नवल वर्तले’हे पुस्तक विशेष गाजले. मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित झालेले हे पुस्तक बँकिंग क्षेत्रात अभ्यासासाठी घेतले जाते. अरविंदरावांच्या जीवनातले जनता बँक हे एक ‘महापर्व’होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अरविंदराव सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी लिहिलेली ’शेअर बाजाराशी मैत्री’, ’जोडोनिया धन शेअर्स व्यवहारे’, ’गुंतवणुकीचे शास्त्र’ ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय झाली. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या. शेअर मार्केट, गुंतवणूक, बँकिंग आणि सहकार या विषयांवर अनेकदा व्याख्याने दिली आणि विविध नियतकालिकांमधून विपुल लेखनही केले. संतसाहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांचे निधन म्हणजे ’बँकिंग आणि सहकाराचा चालता-बोलता इतिहास हरपल्याची’ अनेकांची भावना आहे. सहकार भारतीच्या कामातदेखील अरविंदरावांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरी बँकांच्या अभ्यासाबाबत, बँकिंग प्रशिक्षणाबाबत ते आग्रही असायचे. सहकार भारतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक नागरी सहकारी बँकांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. एकाचवेळी अनेक संस्थांवर काम करत कुठेही कुरकुर न करणारे आणि कामाप्रती आपली निष्ठा, कर्तव्यता जपणारे अरविंदराव सदैव आठवणीत राहतील.
कुठल्याही क्षेत्राबद्दल अरविंदराव नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगायचे, त्या म्हणजे - ’ग्राहक सर्वात महत्त्वाचा आणि पैसा विचारपूर्वक खर्च करावा’, ’खर्च नेहमी कमी ठेवावा’. किती साधे शब्द! पण त्यामध्ये उद्योजकतेचे किती मोठे तत्त्वज्ञान दडले आहे, हे लक्षात येते. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. उपलब्ध साधनांचा विचारपूर्वक वापर करा. अरविंदरावांनी दिलेला हा सल्ला किती मोलाचा आहे, हे लक्षात येते. आज अरविंदराव आपल्यात नाहीत. अत्यंत चोख व्यवहार, कायद्याची, नियमांची प्रचंड जाण, बँकिंग क्षेत्रातलं अत्यंत ’व्हिजनरी’ नेतृत्व आणि समाजभान जपणारा सत्शील ‘माणूस’ म्हणून अरविंदरावांची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल. कितीही खडतर असले तरीही कार्य तडीस नेणारे अरविंदराव हीच त्यांची ओळख कायम राहील. अरविंदरावांना भावपूर्ण श्रद्धांजली!
लेखक ’सहकार सुगंध’ या
साप्ताहिकाचे संपादक आहेत.