टिटवाळा येथील श्री महागणपतीला विवाहविनायक असेही संबोधले जाते. त्यामागे असलेल्या पौराणिक कथेसोबत मंदिराचे आध्यात्मिक आणि सामाजिक काम लक्षात घेतले तर मंदिर व्यवस्था व कामात कालसापेक्ष बदल झाले आहेत. यातून समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे याची अनुभूती मंदिरात येते.
बापुरीच्या नजीक असलेले गणेशभक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे टिटवाळा येथील श्री महागणपती. लोकलची अचूक वेळ, कामाच्या वेळा, प्रपंचाचे अन्य व्याप या तारेवरच्या कसरतीतून शांतता अनुभवण्यासाठी मुंबई आणि तिच्या उपनगरांसह नवी मुंबई, वसईसारख्या महानगरांमधून गणेशभक्त भक्तिभावाने टिटवाळ्याला महागणपतीच्या दर्शनासाठी येतात. वीकेंड, मंगळवार, चतुर्थी, अंगारकी, भाद्रपद आणि माघी गणपती या विशेष दिवसांत तर दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी होते.
काळानुरूप देश झपाट्याने विकासाच्या दिशेने अग्रेसर होत आहे. त्यात निसर्गरम्य परिसरातील आणि चारही बाजूने डोंगराच्या कोंदणातील टिटवाळा हे टुमदार गावही विकासाच्या रथात आरूढ झाले आहे, याची साक्ष आता टिटवाळ्यात पाऊल ठेवताच जाणवते. मध्यरेल्वेच्या टिटवाळा स्टेशनपासून दोन मैलांवर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी शेअरिंग रिक्षासोबत पूर्वानुभूती अनुभवण्यासाठी टांगेदेखील सज्ज आहेत. काळानुरूप बदलात कुठेही मंदिराच्या पावित्र्याला आणि पवित्र वास्तूला धक्का लावला गेला नाही, हे विशेष. त्यामुळेच मंदिरात पोहचताच सात्विक ऊर्जेची अनुभूती भक्तांना येते.
मनाजोगा जोडीदार मिळावा म्हणून देखील अनेक तरुण-तरुणी नवस करतात. म्हणून ‘विवाहविनायक’ अशीदेखील या गणपतीची ओळख आहे. त्याचबरोबर इतर अनेक नवस पूर्ण झाल्याने टिटवाळ्याचा सिद्धिविनायक अथार्र्त महागणपती नवसाला पावणारा आहे अशी ख्याती झाली आहे. त्यामुळे दर्शनाला येणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. बाहेरच्या लोकांनी टिटवाळ्याच्या महागणपतीला जसं आपलंसं केलं, तसंच गावातील लोकांनीही त्याला ग्रामदैवताचा मान दिला, त्यामागे मंदिराचा अतिशय प्राचीन इतिहास आहे.
पौराणिक इतिहास
महाकवी कालिदास यांनी लिहिलेल्या ’अभिज्ञान शाकुंतलम्’ या नाटकातील राजा दुष्यंत-शकुंतला यांची प्रेमकथा सर्वश्रुत आहे. या प्रेमनाट्यातील बहर, विरह आणि पुनर्मिलन ज्या स्थळी घडले, ते स्थान म्हणजे टिटवाळा. पुराणानुसार टिटवाळ्यातील कण्वमुनींच्या हंगामी आश्रमात अप्सरा मेनका-विश्वामित्र यांची कन्या व कण्वमुनींंची मानसकन्या शकुंतलाही राहत होती.
महाभारतातील चंद्रवंशी पौरव (कुरू) वंशाचा हस्तिनापूरचा प्रख्यात राजा दुष्यंत शिकार मोहिमेदरम्यान आश्रमात आला असता शकुंतलेला पाहताक्षणीच तो प्रेमात पडला. त्यानंतर त्यांनी गांंधर्व विवाह करून प्रेमाची खूण म्हणून अंगठी देऊन परतला.
एकदा दुष्यंताच्या मधुर आठवणीत रममाण झालेल्या शकुंतलेचे आश्रमात आलेल्या दुर्वास ऋषींकडे झालेले दुर्लक्ष आणि यावरून संतप्त झालेल्या दुर्वासांनी शकुंतलेला दिलेला शाप आणि नंतर दुष्यंताला झालेले प्रेमाचे विस्मरण हे नाट्य घडले. शकुंतलेच्या प्रेमविरहाचे दु:ख आश्रमावर पसरले. त्या दोघांच्या पुनर्मिलनासाठी विघ्नहर्त्या गणेशाचे व्रत करण्याविषयी कण्वमुनींनी तिला सांगितले. कण्वमुनींनी शकुंतलेला व्रताच्या वेळी पूजनासाठी जी गणेश मूर्ती दिली, ती आज टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिरात असलेली वरदायिनी मूर्ती होय.
पेशव्यांच्या गणेशभक्तीची साक्ष
महाराष्ट्राने परकीयांची अनेक आक्रमणे शौर्याने झेलली, परतवली, परंतु आपल्या श्रद्धास्थानाचे पावित्र्य राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. याच आक्रमणकाळात ही गणेशमूर्ती तलावात लपविली गेली. माधवराव पेशवे हे विश्रांतीसाठी टिटवाळ्यास येत असत. तेव्हा त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी पेशव्यांचे कारभारी रामचंद्र मेहेंदळे यांच्याकडे असे. अशाच व्यवस्थेच्या वेळी तलावाच्या खोदकामात मेहेंदळेंना गणेशमूर्ती सापडली. त्याच दरम्यान माधवरावांंनाही स्वप्नदृष्टांत झाला. माधवरावांनी तलावाकाठीच या गणेशमूर्तीसाठी सुबक असे मंदिर बांधले. तेच हे टिटवाळ्याचे सुप्रसिद्ध श्री महागणती मंदिर होय.
माधवराव पेशवे यांनी वर्षासन व थोडी जमीन देऊन जोशी यांना मुख्य अर्चक म्हणून नेमले. तेव्हापासून आत्तापर्यंत टिटवाळ्याच्या महागणपतीची पूजादी सेवा जोशी कुटुंबाचे वारसदार भक्तिभावाने करीत आहेत. पेशव्यांनी बांधलेला तलाव आणि महागणपतीचे मंदिर हे पेशव्यांच्या गणेशभक्तीची साक्ष देतात.
श्री महागणपती आणि मंदिर परिसर
टिटवाळ्याच्या श्री महागणपतीची मूर्ती अत्यंत प्रसन्न अशी आहे. ती शेंदूरचर्चित तीन फूट उंच असून आसनस्थ आहे. या चतुर्भुज मूर्तीच्या एका हातात परशु, एका हातात रूद्राक्ष माळा, एका हाती कमलपुष्प व गदा, आणि एका हातात मोदक आहे. मस्तकावर दोन गंडस्थळे, नेत्रात लाल माणके, मोदकस्पर्शी सोंड, गळ्यात जानवे कंठी व सर्प तसेच विशाल उदराला सापाचा विळखा, आसनाखाली स्वरकिन्नर आणि दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी विराजमान आहेत.
माधवराव पेशव्यांच्या हस्ते तलावाकाठी वसलेल्या या गणेशाच्या मंदिर आवारात आता शमी वृक्ष असून त्याच्या भोवती पार बांधला आहे. मंदिराच्या आवारात सुबक दीपमाळ, तुळशीवृदांवन आणि भक्तांच्या सोयीसाठी विहीर, हॅण्डपंप, पाणपोई व शौचालय बांधले आहे. पूजामंडप, दर्शनरांगेसाठी स्वतंत्र व्यवस्था, तसेच मंदिराच्या सुरुवातीला शंकराची पिंड, पार्वती, उजव्या सोंडेचा गणपती आणि महादेव मोरेश्वर जोशी (बुवा वेणगावकर) यांच्या पादुका आहेत. 1966साली मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यानंतरही भक्तांच्या सोयीसाठी अनेक छोटे-मोठे बदल केले गेले. मंदिराच्या आवारातच एक प्रदर्शनी व विक्री केंद्र आहे. महानगरपालिका आणि सध्याचे विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने सुशोभीकरणादरम्यान तलावाभोवती अष्टकोनी दगडी बांध घालून घेतला, आता गर्दीच्या वेळी भक्तांची रांग याच तलावाभोवती फिरवली जाते. भक्तांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी विश्वस्त मंडळ दक्ष असते.
धार्मिक कार्यक्रम
मंदिरात पहाटेपासून पूजाअर्चा चालू होतात. पहाटे गणेशमूर्तीच्या बाजूला बसून स्वहस्ते पूजा करता येते. त्रिकाल आरती असते. नव्याने उभारलेल्या पूजामंडपात अभिषेक, पूजा, सत्यविनायक, गणेशयाग, गणहोम, सत्यनारायण पूजा, आदी धार्मिक कार्यक्रम निरंतर चालू असतात. माघी जयंती मोठ्या उत्साहात पार पडते. त्या दरम्यान कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पंचक्रोशीत गणरायाची पालखी निघते. तर भाद्रपदात गणेशभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. अशा या विशेष दिवसांत महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
श्री महागणपती विश्वस्त मंडळ
माधवराव पेशव्यांनी जोशी कुटुंबाला मुख्य अर्चक नेमले. शिवाय ब्रिटिशांनी दिलेल्या 1856सालच्या सनदीतदेखील जोशी कुटुंबाचा उल्लेख मुख्य अर्चक म्हणून आहे. पेशव्यांनी नेमलेल्या आणि ब्रिटिशांनी दिलेल्या सनदीत जोशी कुटुंब मुख्य अर्चक हे स्पष्ट नमूद केले तरीही विश्वस्त मंडळाच्या पारदर्शकतेसाठी व साहाय्य तसेच सल्लामसलतीसाठी एक देवस्थान समिती आहे. विश्वस्त मंडळात सुभाष उर्फ रामचंद्र त्रिबंक जोशी, सुनील मोरेश्वर जोशी, प्रसाद गोविंद जोशी, चंद्रकांत सदाशिव जोशी, प्रफुल्ल पद्माकर जोशी, योगेश मार्तंड जोशी आणि मोहन मधुकर जोशी हे कुटुंबातील सात सदस्य आहेत. तर देवस्थान समितीत डोंबिवलीचे सीए शेखर पटवर्धन, ठाण्याच्या डॉ. श्रुती बोरवणकर आणि टिटवाळ्यातील स्थानिक असलेले गणेश विद्यालयातील माजी मुख्याध्यापक विवेक पुराणिक आहेत. देवस्थान समितीची नेमणूक धर्मदाय आयुक्त यांनी केली आहे, अशी माहिती विश्वस्त मंडळातील सुभाष जोशी यांनी दिली.
सामाजिक उपक्रम
श्री महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून विश्वस्त मंडळ कायम तत्पर असते. वेगवेगळ्या माध्यमातून मंदिराचे विश्वस्त मंडळ सामाजिक सलोख्याचे कार्य करीत असते. दुर्धर आजारांसाठी तसेच काही शस्त्रक्रियांसाठी लागणारे आर्थिक साहाय्य मंदिरातून कायम केले जाते. वेळोवेळी मेडिकल कॅम्पचे आणि रक्तादान शिबिरांचे आयोजन केले जाते. टिटवाळा येथील आरोग्यसेवेची गरज ओळखून ’क्रिएटिव्ह ग्रुप’ या सामाजिक संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘श्री महागणपती हॉस्पिटल’ला देखील मंदिरातर्फे भरीव आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. टिटवाळा गावाच्या बाजूस अनेक जनजाती समूहाचे पाडे आहेत. या समाजाचे हातावरचे पोट आणि त्यात कोविडसारखी महामारी अशा वेळेस मंदिराच्या वतीने त्यांना अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवण्यासोबत आरोग्यविषयक प्रबोधन केले गेले.
सुशोभीकरणाच्या वेळी मंदिराने तलावाभोवती बांधलेल्या मार्गिकेचा उपयोग स्थानिक लोक जॉगिंगसाठी आणि योगासनांसाठी करतात. त्याशिवाय मंदिराच्या आवारात योगासनाच्या वर्गासाठी एक स्वतंत्र खोली आहे. पूर्वी टिटवाळा गावसदृश असल्यामुळे मुंबईतून येणारे भाविक जेवणाचे डबे घेऊन येत असत. म्हणून भाविकांच्या जेवणासाठी एक धर्मशाळा बांधली होती. कालपरत्वे भाविकांच्या खाण्याची व्यवस्था करणार्या अनेक सोयी मंदिराभोवती झाल्या. त्यामुळे धर्मशाळेचे रूपांतर मंगलकार्यात करण्यात आले. याच ठिकाणी वर्षातून चार वेळा होमगार्डचे (पुरूष-महिला) प्रशिक्षण असते. तसेच कधी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पोलिसांची व जवानांच्या राहण्याची सोयही इथे करण्यात येते.
पूर्वी टिटवाळ्यात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा होती. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दोन मैलांचा प्रवास करून स्टेशनपर्यंत जावे लागत होते. एमटीडीसीने गणेश शिक्षण प्रसारक मंडळाला चार एकर जागा देऊ केली. त्या जागेवर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने शालेय इमारत बांधून दिली आहे. बालवाडी ते बारावीपर्यंत शिक्षण आता एका छताखाली घेेता येते. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपही मंदिराच्या वतीने केले जाते.
पर्यावरण जागृतीसाठी मंदिर विश्वस्त मंडळाने पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे व एन्व्हायरो व्हिजील मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गायण (पर्यावरण, पर्यटन व शिक्षण) नावाने मंदिर ट्रस्टच्या टिटवाळा-रूंदे रस्त्यावरील बारा एकर जागेवर निसर्ग उद्यानाचेे भूमिपूजन केले आले.
भविष्यकालीन योजना
श्री महागणती टिटवाळा हे फार प्राचीन मंदिर आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांना अध्यात्माबरोबर आपल्या प्राचीन ज्ञानाचीही ओळख व्हावी असे विश्वस्त मंडळाला वाटते. याच अनुषंगाने वेदपाठशाळा उभारणार आहेत. मंदिराच्या सुरुवातीला असलेल्या छोट्या मंदिरवजा जागेतील शंकर-पार्वती, उजव्या सोंडेचा गणपती, महाराजांच्या पादुका यासाठी बाजूचीच जागा खरेदी करून एक स्वतंत्र मंदिर उभारणार आहेत. भाविकांचा वाढता ओघ पाहता प्रसादालय उभारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पाणपोई व शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था करणार आहेत.
’नक्षत्रवृक्ष’ ही संकल्पना भारतीय ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद आणि पर्यावरणशास्त्र यांचा सुंदर संगम आहे, हे जाणून भविष्यकाळात नक्षत्र उद्यान साकारणार असल्याची माहिती सुभाष जोशी यांनी दिली. या संदर्भात आयुर्वेद वाचास्पति वैद्य परिक्षित शेवडे यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. (वैद्य परिक्षित शेवडे यांची सध्या ’सा. विवेक’मध्ये ‘नक्षत्रवृक्षमाला’ ही लेखमाला चालू आहे.) त्याचबरोबर लांबचा प्रवास करून येणार्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी निवासव्यवस्था आणि धर्मशाळाही नजीकच्या भविष्यकाळात बांधणार आहेत.
मंदिराच्या एकूण व्यवस्थापनासाठी होणार्या खर्चाबाबत विचारले असता, ’गणेशभक्तांनी दानपेटीत टाकलेली रक्कम आणि देणगी तसेच भाडेतत्त्वावर दिलेल्या मंगलकार्यालयातून येणारी रक्कम हाच आर्थिक स्रोत असला तरी येणार्या काळात श्री महागणपती व गणेशभक्ताच्या सेवेत तसेच सामाजिक कार्यात कसलीही उणीव ठेवणार नाही,’ असे आश्वासक उद्गार विश्वस्त मंडळाचे सुभाष जोशी यांनी काढले. अशा या पौराणिक तसेच कालसापेक्ष बदलांची साक्ष असणार्या टिटवाळा श्री महागणपती मंदिरास आवर्जून भेट द्यावी.