सोन्याचे दरवाजे

विवेक मराठी    06-Nov-2015
Total Views |


****सुप्रिया अय्यर*****

एवढाएवढासा होता तेव्हा ''आई, आई'' म्हणत मागे मागे फिरायचा. दादा अन् सुब्बू खेळायला घेत नाहीत म्हणून रडायचा. त्याची समजूत घालताना जयराज अन् सुभाषला रागवावं लागायचं. ते मग नाइलाजाने कुरकुरत त्याला खेळायला घेत. तेव्हा स्वारी खुदुखुदु हसत त्यांच्यात जाऊन खेळू लागे. अन् आता आपल्या आईला रडत ठेवून निघून गेलास, तेव्हा तिला कोण समजावेल याचा साधा विचारही केला नाहीस का रे? इतरही लोक होते नं डब्यात! त्यांना कुणाला नाही, अन् तुलाच का रे त्या मुलीपुढे जाऊन उभं राहावसं वाटलं? कसं रे माझं नशीब? पवईला ऍडमिशन मिळाली तुला, तेव्हा दामलेकाकू म्हणाल्या होत्या, ''विभा, तुझी पोरं म्हणजे सोन्याची दारं आहेत तुझ्या घराला.''त्यावर विभा म्हणाली होती, ''कशाला हवीत काकू सोन्याची दारं? ठसठस लागतात येताजाता कपाळाला.''

''श्रीहरी, अभ्यासाला ऊठ.'' सुमेधाने आवाज दिला.

''माझा झालाय सगळा अभ्यास.'' झोपेतच कूस पालटत तो म्हणाला.

''कस्सा मुलगा आहे बाई हा, मला खरंच काही कळत नाही याचं.'' सुमेधा वैतागून म्हणाली.

''आई गं, खरंच झालंय माझं सगळं. हवं तर तू काहीही विचार मला.''

''कधी अभ्यास करताना दिसत नाही, अन् सगळं कसं तय्यार असतं रे तुझं?'' ती चिडलीच. विभाताई कधीच्या आपल्या खोलीत जाग्या होत्या. पहाटेचा प्रकाश आता जास्त स्वच्छ झाला होता. सुमेधा पहाटेच्या अंधारात उठून कामाला लागते, तेव्हापासनं त्या जाग्याच असतात. मायलेकाचा रोजचा संवाद त्यांच्या कानावर आला. रोज ती श्रीच्या मागे लागते अभ्यासासाठी, अन् तो कधी मनावरच घेत नाही तिचं म्हणणं. राग येतो तिला मग. अन् काळजीही वाटते श्रीची.

आता त्याचं दहावीचं वर्ष. नववीचा रिझल्ट लागल्यावर साऱ्या मित्रांनी चांगल्या टयुशन क्लासेसला नावं नोंदवली. किती धावपळ करीत होते त्या पोरांचे आई-वडील. सुमेधालाही वाटलं की श्रीहरीने अशाच चांगल्या टयुशन क्लासमध्ये ऍडमिशन घ्यावी. म्हणजे तिची अर्धी काळजी मिटली असती. हल्ली शाळेत कुठे काही श्ािकवत नाहीत म्हणे. असं कसं असेल? शाळेतले श्ािक्षक फुकट पगार कसा घेतील? त्यांना किंवा कुठल्याही विचारी, सभ्य माणसाला ते पटेल तरी कसं? असे अनेक प्रश्न विभाताईंना पडतात. त्यांनी तसं बोलून दाखवलं, तर जयराज - त्यांचा मुलगा त्यावर हसतो अन् म्हणतो, ''आई, किती साधी आहेस गं तू? तो जमाना गेला आता. फुकटाचे पगार घ्यायला कोणालाही लाज, संकोच वाटत नाही. उलट तेच श्ािक्षक खाजगी श्ािकवणीर् वगात बक्कळ कमावतात. श्रीहरीच्या शाळेत गण्ाित श्ािकवणाऱ्या कारखानीस सरांनी चार वर्षांमागे नोकरी सोडून दिली शाळेतली अन् आता खाजगीर् वग घेतात ते गण्ािताचे. दर दोन वर्षांनी कार बदलतात. श्ािकवणीच्या मुलांचा बसण्याचा हॉल ए.सी. आहे. त्यांच्याकडे ऍडमिशन घ्यायची तर रिझल्ट हातात पडल्या पडल्या धावत जावं लागतं. श्ािवाय गुणांची टक्केवारी पंचाऐंशीच्या वर लागते.''

''पण मग इतक्या हुशार मुलांना श्ािकवणी तरी कशाला हवी रे? ह्यापेक्षा आणखी किती जास्त माक्र्स मिळवायचे मुलांनी?''

''किती मिळवायचेत? Sky is the limit. शंभर टक्क्यांच्या वर गुण मिळतात हल्ली मुलांना.''

''ह्याला काय गुण म्हणायचे?''

''असंच होतंय सगळीकडे. अन् आपले चिरंजीव! एकही टयुशन नको म्हणतात.'' त्याच्या बोलण्यात उपहासच उतरून आला. विभाताईंना नाहीच आवडलं ते. अन् त्या रेटून म्हणाल्या, ''तेच चांगलं आहे.''

''ऍडमिशनच्या बाबतीत सारीकडे मार खाईल, तेव्हा डोकं ताळयावर येईल.''

''नको असं बोलूस! आहे आपला साधाबाधा, तर तसाच राहू दे ना त्याला. का उगा रेसच्या घोडयासारखं धावायला लावून तोंडाला फेस आणायचा त्याच्या?''

''त्याच्या नाही, आमच्याच तोंडाला फेस आणणार आहे तो. बघच तू.''

''काही बोलतोस वेडयासारखं.''

असे संवाद नेहमी घडतात घरात. सुमेधा त्यात कधी नसते. घरातलं काम मन लावून करणं, प्रत्येकाच्या वेळा सांभाळणं, त्यांचे डबे भरणं, वॉटर बॉटल भरणं, इलेक्ट्रिकची, पाण्याची बिलं भरणं, बँकेची कामं करणं यात तिचा दिवस भुर्रकन उडून जातो. पण तिलाही मनातून श्रीहरीची काळजी वाटतेच.

श्रेया श्रीहरीपेक्षा सहा वर्षांनी मोठी. ती दोन वर्षांची असताना, घरी आलेल्या एका ज्योतिषाने तिचा हात पाहिला तर तो अगदी डोळे विस्फारून बघत राहिला अन् जरा वेळाने म्हणाला, ''फार मोठी विदुषी होणार आहे ही मुलगी. हिला उत्तम श्ािक्षण द्या.''

त्यावर विभाताईंनी म्हटलं की, ''उत्तम श्ािक्षण म्हणजे शेवटी काय असतं? ते तर ज्याचं त्यानेच आपल्या कुवतीनुसार मिळवायचं असतं.''

''ते काय ते तुम्ही बघा. अतिशय बुध्दिमान मुलगी तुमच्या पदरात पडलीय. तिचं सोनं करणं तुमच्या हातात आहे.'' म्हणत ज्योतिषाने उपरणं झटकलं. दक्षिणा घेऊन तो र्मागस्थ झाला, तरी सुमेधाच्या डोक्यातून त्याचं भविष्य पुसलं गेलं नाही. अन् तिनं मग ध्यासच घेतला की श्रेयाला खूप चांगल्या शाळेत टाकायचं. पैशांचाही विचार करायचा नाही. प्रत्यक्ष तिला नर्सरीत टाकायची वेळ आली, तेव्हा सुमेधाने घरची सारी कामं बाजूला सारली अन् उत्तमातल्या उत्तम शाळेला जोडून असणाऱ्या नर्सरीत श्रेयाची ऍडमिशन करवली. म्हणजे मग पुन्हा पुन्हा ऍडमिशनसाठी धावपळ नको. नर्सरीतून अलगद वरच्यार् वगात ती चढणार होती. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलचं नाव तेव्हा डंक्यावर होतं. सुमेधाने त्या शाळेचे विद्यार्थी पाहिले होते. गुलाबी रंगाचा बारीक चौकडयांचा पिनॅपर अन् त्यावर पांढरा ब्लाउज, अन् लाल रंगाचा टाय, पायात पांढरे मोजे अन् काळे शूज घातलेल्या तिथल्या मुली किती स्मार्ट दिसत होत्या. श्ािवाय अगदी एवढया एवढयाशा मुली इंग्लिशसुध्दा किती छान बोलायच्या. ऐकत राहावसं वाटायचं. अन् एकमेकींशी भांडायच्यादेखील इंग्लिशमध्येच. सुमेधाने मग त्या शाळेच्या ऍडमिशनसाठी खूप धावपळ केली. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर शाळेत ऍडमिशन्स होणार होत्या. त्यासाठी पहाटेच्या अंधारात जाऊन रांगेत लागायचं तिनं ठरवलं. डोळे चोळत ती पहाटे उठली अन् जेमतेम स्वत:चं आटोपून शाळेच्या रांगेत नंबर लावायला म्हणून अंधारात निघाली, तेव्हा विभाताईंनी टोकलंच की, ''इतकी अंधाराची कशाला जातेस? निदान जयराजला सोबत तरी ने.'' ''रात्री उश्ािरा आले ते ऑफिसातून. थकले होते खूप. श्ािवाय आजही लवकर जायचं म्हणत होते. मी एकटीच जाऊन येते.'' म्हणत तिने पायात चपला सरकवल्या अन् ती घराबाहेर पडली. तिची लुना स्टार्ट झाल्याचा आवाज विभाताईंनी ऐकला. ती लूना खरं तर त्यांचीच. जुनी झालीय. पण चालते चांगली. अन् सुमेधा वापरते छोटयामोठया कामांसाठी. त्या स्वत:शीच मान झटकत म्हणाल्या, ''ज्योतिषाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून चांगली शाळा शोधायची. मुळात शाळा कधी चांगली-वाईट असते का म्हणून? अन् हुशार विद्यार्थी काय कुठही चमकतात. माझी मुलं नाही का कॉर्पोरेशनच्या शाळेत श्ािकूनही... नको. जाऊ दे त्या आठवणी.'' त्यांनी आवरलं स्वत:ला. तरीही अनेक गोष्टी तळातून तरंगत वर आल्या. त्या मग उठल्याच. जयराजला लवकर जायचंय म्हणत होती ती. श्ािवाय तिलाही उशीर लागू शकतो परतायला. त्यांनी चहाचं आधण गॅसवर ठेवलं, तेव्हा जयराज उठून स्वयंपाकघरात आला. विभाताईंना गॅसपाशी पाहून म्हणाला, ''अरेच्चा, सुमेधा कुठे गेली? तू का चहा करतेयस?''

''श्रेयाच्या ऍडमिशनसाठी गेली ती भल्या पहाटे अंधारात.''

''एकटीच?''

''हो.''

''मला का नाही उठवलं?''

''मी म्हटलं तिला, तर म्हणाली की खूप थकला आहेस तू. श्ािवाय आजही लवकर जायचंय ऑफिसात.''

'' खरंय ते. पण म्हणून काय एकटीने जायचं..''

''चांगली शाळा म्हणजे काय रे?''

''अगं, तिथली श्ािकवण्याची पध्दत, मुलांना टॅकल करण्याची पध्दत वेगळी असते. मुलांच्या कलाकलाने घेतात. श्ािवाय स्टँडर्ड असतं अशा शाळांना. तिथं श्ािकलेली मुलं एकदम चंट, स्मार्ट होतात. इंग्लिश फाडफाड बोलतात.''

''म्हणजे चांगली शाळा होय?''

''असंच समज.''

''श्ािवाय फीपण खूप घेत असतील ना रे?''

''ते तर विचारूच नकोस.''

''पण तुम्ही तिघंही तर कॉर्पोरेशनच्या शाळेत जात होतात. कुठं कोणापेक्षा मागं राहिलात म्हणून? उलट...'' त्या गप्प झाल्या.

आईच्या गप्प होण्याचे संदर्भ त्यालाही माहीतच होते. तोही गंभीर झाला.

त्याला लवकर जायचं म्हणून विभाताईं आंघोळ करून स्वयंपाकाला लागल्या. साडेतीन वर्षांची श्रेया उठून आली अन् आई कुठेय म्हणून विचारू  लागली, तर त्यांनी हातातलं काम बाजूला ठेवून तिला कडेवर उचलून घेतलं.

''आई शाळेत गेली राजा.''

''कशाला?''

''आमची श्रेयू आता मोठी झाली नं, तिला शाळेत जायचं आहे, त्यासाठी म्हणून...'' तिच्यापर्यंत ते काही पोहोचलं नाही.

''मला दूध..'' विभाताईंनी तिला दूध दिलं. स्वयंपाकाच्या ऐसपैस ओटयावर तिला स्वत:जवळ बसवून घेऊन त्यांनी कणीक मळायला घेतली. जयराज स्नान करून आला, तोवर त्यांचा स्वयंपाक झाला होता. खरं तर सुमेधाने घरातल्या कामाचा भार उचलल्यामुळे त्यांच्या वाटयाला रोज तसं काम कमीच असतं. कधीकधी तर त्यांना वाटतं की आपण बहुधा विसरूनच जाऊ कामं करणं. पण एकदा कामाला भिडलं की सगळे रिफ्लेक्सेस जागे होतात अन् हातांना गती येते. त्या स्वत:शीच हसतात. यांच्या जाण्यानंतर इतकी वर्षं नोकरी करून घर सांभाळलं. कोण होतं म्हणून मदतीला? तीन पोरांचे डबे, वॉटरबॅग्ज, स्वत:चं सगळं आवरून साडेनऊला घराबाहेर पडावं लागायचं. त्यासाठी म्हणून मुद्दाम वय वाढलेलं असतानाही लुना श्ािकले. बससाठी वाट बघण्याचा वेळ वाचला. मुलांना घरामागच्या कॉर्पोरेशनच्या शाळेत टाकलं.

जयराज स्नान करून आला. त्याने शेल्फमधली थाळी काढली अन् ओटयाजवळ उभं राहून स्वत:च्या हाताने भाजी-वरण वाढून घेतलं.

''अरे, मी वाढते नं!''

''असू दे गं! तू पोळी वाढ गरम.''

जयराज जेवत असतानाच सुमेधाच्या लुनाचा आवाज आला.

''आली वाटतं! काय झालं कुणास ठाऊक ऍडमिशनचं.'' विभाताई म्हणाल्या. सुमेधा वाऱ्याच्या वेगाने घरात श्ािरली अन् जयराजला जेवताना पाहून म्हणाली, ''मला माहीतच होतं की आईंनी केलंच असेल तुमच्या वेळेत सारं?''

''हो ना? मग कशाला येवढी धावतपळत आलीस? बैस जरा.'' विभाताई.

''काय झालं ऍडमिशनचं?'' जयराज.

''झाली.''

''काँग्रेट्स.'' त्याचाही स्वर आनंदी होता.

''थँक्स.'' म्हणताना तिला मनापासून आनंद झाला.

''आई, तुम्ही पहाटे म्हणालात मला, एवढी अंधाराची कशाला जातेस म्हणून. मलाही वाटलं की आपण फार लवकर तर जात नाहीय ना? पण एवढया अंधाराची गेले, म्हणून जमलं बघा ऍडमिशनचं.''

खरंच. केवढी मोठी लढाई जिंकली होती तिने. श्रेयू आता नर्सरीपासूनच उत्तम शाळेत जाणार होती. त्या छोटयाशा गोष्टीचा आनंद घरात पसरून राहिला. कितीतरी दिवस तो आनंद पुरला. आल्यागेल्याला सुमेधा ऍडमिशनची गोष्ट रंगवून सांगत राहिली. विभाताईं प्रत्येक वेळेस तिच्या त्या निष्पाप आनंदाच्या साक्षीदार होत्या. अन् मग त्याला छेद देणाऱ्या, नको असणाऱ्या इतरही आठवणी - जाणीवपूर्वक गाडून टाकलेला भूतकाळच - त्याच भूतकाळाची अवचित जागी झालेली भुतं फेर धरून डोळयापुढे वेडीवाकडी नाचायला लागतात. विभाताईंना वाटतं की मोठ्ठयाने ओरडून सांगावं त्या भुतांना की, शांतपणे जगू द्या मला. मी सारी भुतावळ मागे सोडून आलेय. मग का तुम्ही वारंवार माझ्या मागावर राहता? घरात हळुवार झुळकीसारखे पसरणारे छोटेछोटे आनंदही माझ्यापासून बळजवरीने हिसकावून घेता.. पण मनातली भुतं पिच्छा पुरवतात. पोरांची शाळा, शाळेच्या आठवणी अन् बरंच काही, जे स्वीकारताना मन विकलं होतं. पण मानगुटीवर बसलेली भुतं तिथून खाली उतरायला तयारच नाहीयेत.

***

ज्योतिषाच्या सांगण्यावरून खूप हुशार म्हणून श्रेयाला उत्तमातल्या उत्तम शाळेत घातलं. पण तिला कुठे काय विशेष चमक दाखवता आली म्हणून? पण विशेष चमक दाखवणं म्हणजे काय मेडिकल, इंजीनियरिंगलाच ऍडमिशन मिळायला हवी का? होम सायन्सला ऍडमिशन घेतली तिने, तर किती सुंदर पेंटिंग्ज करते. तिची चित्रांची निवड अगदी बघण्यासारखी असते. तिने केलेलं उमर खय्यामचं पेंटिंग तर प्र्रदशानातून कुणी चोरूनच नेलं म्हणे.

श्रीहरीच्या ऍडमिशनच्या वेळी का कुणास ठाऊक - कदाचित श्रेयाच्या अनुभवाने शहाणी झाल्यामुळे असेल, पण सुमेधाने चांगल्या शाळेचा अट्टाहास सोडून दिला अन् त्याला घराजवळच्याच विद्याभारती शाळेत घातलं. त्या शाळेचं नाव काही फारसं देदीप्यमान नव्हतं. विभाताईंना खूप हायसंच वाटलं. मनात आलं, 'बरं झालं, त्याच्याबाबत एखादा ज्योतिषी काही भविष्य वर्तवून गेला नाही ते.'

बघता बघता तो नववी पास झाला. तेही बऱ्यापैकी मार्कांनी. सुमेधाच्या अन् जयराजच्या अपेक्षा वाढल्या. जरा लक्ष दिलं तर हा नक्कीच चांगले माक्र्स मिळवेल. पण त्याने तर ठाम सांगून टाकलं की ''मला नाही लावायचा टयुशन क्लास दहावीसाठी.'

विभाताई आता थकल्यायत. घराचा सर्ंपूण भार सुमेधावर आहे. पण हातातलं काम सुमेधावर सोपवता आलं तरी मनातले विचार कोणावर सोपवणार? त्याचं ओझं तर आपलं आपल्यालाच पेलावं लागतं ना! सारं काही सुरळीत सुरू असताना कुठल्यातरी क्षुल्लक कारणाने सारा तळ ढवळून निघतो. विभाताई जुन्या आठवणींनी बेचैन होतात. आठवणींची माळ गळयापाशी घट्ट आवळली जाते. त्यांचा श्वास गुदमरू लागतो. ती गुदमर वाढत जाते... वाढत जाते...

वयाच्या सहाव्या वर्षी जयराजला घरामागच्या कॉर्पोरेशनच्या शाळेत टाकलं. शाळेत तीन वर्षं व्यवस्थित जाणारा मुलगा चौथ्यार् वगात गेला, तर त्याच्यार् वगश्ािक्षिकेने तक्रार केली की जयराज शाळेत नियमित येत नाही. त्या वेळी सुभाष त्याच्या पाठच्या वर्गामध्ये, तिसरीत होता अन् पाच वर्षांचा विश्वास घरीच होता. काय करावं कळेना. विभाने सुभाषला जरा गोंजारून विचारलं, तर तो म्हणाला की ''शाळेत जाताना पार्क लागला की जयू पार्कात चालला जातो.'' श्रीकांतच्या मरणाच्या धक्क्यातून ती जेमतेम सावरू बघत होती. घरावर अजूनही त्यांच्या मरणाचं सावट होतं. सारी घडीच विस्कटली होती. तीन पोरांना घेऊन यापुढची वाटचाल एकटीने करण्याचं प्रचंड दडपण मनावर होतं. अन् जयूने हा नवीनच प्रॉव्लेम निर्माण केला. कंपॅशनेट ग्राउंडवर तिला श्रीकांतच्या ऑफिसात जॉइन होऊन जेमतेम सहा महिने झालेले अन् नोकरीसह मुलांना सांभाळताना ती पार मेटाकुटीला आलेली. आताशा क्षुल्लक गोष्टीही खूप मोठया वाटू लागल्या होत्या. मग मुरलीलाच बोलावून घेतलं सिरोंचाहून. तेही आले महिनाभराची सुट्टी घेऊन. मुरली श्रीकांतच्या पाठचा भाऊ. वयाने विभावरीपेक्षा एखाद वर्षाने लहान असेल. तिने त्यांना सांग्ाितलं की ''जयराज शाळेत जायला बघत नाही.'' मुरलीने मग सूत्रं हातात घेतली. शेजारच्या दामलेकाकू एक दिवस संध्याकाळच्या मागच्या अंगणातल्या कुंपणाजवळ येऊन तिच्याशी सहजच गप्पा मारताना म्हणाल्या, ''अग विभावरी, तुला माहितीय का, तुझ्यामागे जयराजच्या शाळेत जाण्याची काय गम्मत असते ते?''


''का? काय झालं?'' विभावरीने चमकून विचारलं.

''अगं, तो सारखा नाही म्हणतो शाळेत जायला. मग त्याचे मुरलीकाका त्याला जबरदस्तीने घराबाहेर काढतात तर तो भोकाड पसरतो अन् त्यांना म्हणतो की तुम्ही चला शाळेपर्यंत मला पोहोचवायला.''

'मग?''

''ते नाही म्हणतात. हा ठप्प उभा राहतो रस्त्यात.''

''पुढे?''

''मुरलीकाका त्याच्याजवळ जातात अन् त्याला पुन्हा समोर पिटाळतात. तर हा पठ्ठा परत समोर जाऊन उभा राहतो. मग काका पुन्हा तेवढं अंतर त्याच्यामागे.. असं करत करत तो शेवटी काकांना नेतोच शाळेपर्यंत. सगळया शेजाऱ्यांना इतकी गम्मत वाटते काकापुतण्याची. पण एक आहे हं, चुकूनही ते कधी मारत नाहीत त्याला.''

ते सारं सांगताना दामलेकाकूंना हसू आवरत नव्हतं. विभावरीनेही ते हसण्यावारी घेतल्यासारखं दाखवलं.

पण आत एक वेदना चरचरत गेली की नसते श्रीकांत हार्टअटॅकने गेले, तर कशाला मी कंपॅशनेट ग्राउंडवर नोकरी घेतली असती? किती सुरक्षित दिवस होते ते! त्यांनी नोकरी करायची अन् मी घर सांभाळायचं. पण.. आयुष्यावर सहजपणे येऊन पडलेलं हे दाट काळं दु:ख. अन् त्याच अंधार सावलीचं सावट संसारावर. ती त्यातून स्वत:पुरती सावरू  बघत होती अन् तेव्हाच नेमके अर्धवट कळत्या-नकळत्या वयाच्या जयराजच्या मनावर झालेले आघात तिच्यापर्यंत पोहोचलेच नव्हते. घरची बदललेली परिस्थिती. आत्ताआत्तापर्यंत घरी असणाऱ्या आईचं घराबाहेर पडून ऑफिसमध्ये जाणं, घरातल्या त्या बैठकीच्या खोलीतली बाबांची अनुपस्थिती, अभ्यासाकडे दुर्लक्ष, श्ािक्षिकेनेर् वगात सगळयांसमोर केलेला ओरडा, क्वचित प्रसंगी थोबाडीत मारणं.. अन् मग जयूची शाळेला दांडी.. असंच सगळं चक्र.. एकातून दुसऱ्याचा उद्भव..

मुरलीची महिनाभराची रजा संपत आली. जयराजही आता व्यवस्थित शाळेत जाऊ लागला. मुरलीने त्याची विस्कटलेली घडी एव्हाना सावरून दिली.र् वगश्ािक्षिकेशी त्याच्या संदर्भात समजुतीचं बोलून आला. तिनेही जयराजला वर यायला हात देणं किती महत्त्वाचं आहे ते समजावून सांग्ाितलं. त्यामुळे विभाला बराच दिलासा मिळाला. अन् मुरलीने आणखी एक महिना रजा वाढवून घेतली. त्याने तसं तिला सांग्ाितलं. तेव्हा आश्चर्य वाटून ती म्हणाली, ''आत्ता कशाला वाढवून घेता रजा? पुन्हा गरज लागली की मिळणार नाही.''

''पाहू पुढे..''

मुरलीची वाढवलेली रजा संपली, अन् निघण्याचा दिवस अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला.

संध्याकाळची वेळ. सूर्याची किरणं मवाळ झाली होती. त्याचा एक लांब पट्टा पश्चिमेकडल्या दारातून आत घुसलेला. मागच्या दारी असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली मात्र गर्द सावली. ऑफिसातून आली की विभावरी या झाडाच्या सावलीत निवांत बसून चहा पिते. तिथेच झाडाच्या खोडाला दोन खर्ुच्या टेकवून ठेवल्या आहेत. हल्ली तिच्या जोडीला मुरली येऊन बसतो. आजही ती ऑफिसातून आल्यावर दोघे आंब्याखाली चहा पीत बसले. चहा पितापिता मुरलीच्या विरळ झालेल्या केसांकडे तिचं लक्ष गेलं.

''दोन दिवसांनी निघेन मी वहिनी.''

''संपली रजा?''

''हो.''

''बरं वाटत होतं तुम्ही घरात होतात तर.''

''हूँ. मलाही.''

''कसं आहे भाऊजी सिरोंचा?''

''कुठल्या अर्थाने?''

''म्हणजे एकटे राहता ना तुम्ही तिथे, म्हणून विचारलं.''

''खूप मागासलेला भाग आहे. नव्या सुधारणांपासून अलिप्त. धो धो पाऊस बरसतो, तेव्हा इतर गावांशी संपर्क तुटतो.''

''अरे बापरे! अन् काही इमर्जन्सी आली तर?''

''बोटीने पार जायचं.''

''बाई गं! अन् तिथेतुम्ही एकटे राहता..''

''सवय झाली आता.''

''अजूनही लग्नाचा विचार का नाही करत? डोक्यावरचे केसही किती विरळ झालेयत. नंतर मुलगी मिळणं कठीण जाईल.'' आत्ताच तर खरं म्हणजे वय वाढलंय, असं तिला म्हणायचं होतं. मुरलीला ते कळणं काही अशक्य नव्हतं. तिच्या म्हणण्यावर मुरली गंभीर हसला फक्त. नेहमीसारखं त्याने पार उडवून नाही लावलं. तिला त्याचंही नवल वाटलं. एरव्ही लग्नाचा विषय काढला की भाऊजी आक्रसून जातात. आपण जरा जास्तच जोर लावून म्हटलं तर उठूनच जातात. त्या मानाने आजचं हे वागणं फारच सौम्य.

''किती इंटेरियरमध्ये बदल्या होतात तुमच्या. असे एकटे राहता. किती काळजी वाटायची सासूबाईंना तुमची.''

खर्ुच्यांखाली सरकवून ठेवलेले चहाचे कप वाळून गेले होते. जयराज, सुभाष अन् विश्वास तिघेही खेळून परत आले. विभा चहाचे कप घेऊन उठलीच. मुलांना भूका लागल्या असतील! तिने विचार केला.

त्यांचं खाणंपिणं आटोपेस्तोवर संध्याकाळ सरकून गेली अन् रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ येऊन ठेपली.

रात्रीची जेवणं आटोपली. शाळा, खेळ सारं अंगभर झाल्यामुळे मुलांना झोप अगदी आवरत नव्हती. जेवण झाल्यावर तिघेही पटापट आपापल्या अंथरुणावर झोपायला पळाले.

विभावरीने मागची आवराआवर केली. दुसऱ्या दिवशीसाठी भाजी चिरून ठेवली. मुलांच्या डब्याची तयारी केली. हॉलमध्ये सकाळचा श्ािळा पेपर वाचत बसलेला मुरली उठून स्वयंपाकघरात आला. माठातलं पाणी ग्लासात घेऊन प्यायला. तेव्हा विभाची कामं आटोपत आली होती. मुरली जरा वेळ तिथेच रेंगाळला.

''काही हवं होतं का तुम्हाला भाऊजी?''

''जरा बोलायचं होतं.''

''बोला ना.''

''मघा तुम्ही लग्नाबद्दल विचारत होतात.''

''बरं, मग?''

मुरली गप्प.

''पाहून ठेवलीय का मुलगी?''

''म्हटलं तर हो, म्हटलं तर...''

''म्हणजे?''

''वहिनी, दामलकाकूंकडे एक मुलगी दिसते हल्ली.. ती.. तुम्ही विचारा काकूंना''

''अगबाई! चंदाबद्दल म्हणता होय?'' विभाच्या डोळयात आश्चर्य उमटून आलं.

''चंदा नाव आहे तिचं?''

''हो. पण ते नाही हो शक्य.'' विभावरीने पहिल्या पायरीवरच नकारघंटा वाजवली.

''का? काय झालं?''

''अहो, पुतणी आहे ती दामलेकाकूंची दूरची. बिचारीचे यजमान गेलेत एक वर्षापूर्वी ऍक्सिडेंटमध्ये. तालुक्याच्या गावाला राहते ती. तिथे श्ािक्षणाच्या फारशा सोयी नाहीयेत, म्हणून काकू मुद्दाम इथे घेऊन आल्या. मॅट्रिक झालीय. ट्रेनिंग करतेय इथे डिप्टीचं. ते झालं की काका एखाद्या शाळेत लावून देणार आहेत नोकरी तिला. फार गोड मुलगी आहे. पण किती लहान वयात काय नश्ािबी आलं बिचारीच्या. तिच्याकडे पाहिलं की वाटतं - आपण निदान काही वर्ष संसार तरी करू शकलो. पण ह्या मुलीने काय करायचं? अवघी तेवीस वर्षांची आहे बघा. जेमतेम दोन वर्षं झाली लग्नाला.''

''मला माहीत नव्हतं वहिनी. तिच्याकडे पाहूनही वाटलं नाही की..''

''अहो, किती लहान आहे ती वयाने. कसं वाटेल असं काही असेल म्हणून? आण्ाि एक मुलगीही आहे तिला दहा महिन्यांची.''

''काय?''

''हो ना! त्या मुलीला आपल्या आई-वडिलांजवळ ठेवून आलीय.''

मुरली मग तिथे थांबलाच नाही. पाठमोरा तो जात असताना विभा म्हणाली, ''पण आपल्याला दुसरी बघता येईल ना भाऊजी मुलगी.''

मुरली परत आक्रसलाच. त्याने वळूनही पाहिलं नाही. रात्रीच्या अंधारात अंथरुणावर पडल्यापडल्या दूरदेशी निघून गेलेली लग्नाची स्वप्नं त्याला छळत राहिली. नियतीच्या अजब न्यायाचीही गम्मत वाटली. प्रथमच ज्या मुलीकडे पाहून आतून लग्न करावंसं वाटलं, त्या मुलीच्या मस्तकावर हे अजब आयुष्य कोरलं गेलेलं असावं? काय अपराध तिचा? अन् आपल्याला नेमकी तीच अशक्त, हडकुळी आकृती देखणी वाटावी? नेमकी तीच मुलगी आवडावी, हा कुठला योगायोग?

रात्री मुरली अस्वस्थ होता. आजपर्यंत लग्नाची इच्छा एवढया तीव्रतेने मनात कधी जागली नाही. अन् ह्या मुलीत असं काय वेगळं आहे की तिच्याकडे पाहताना आतून काही उसळी मारून यावं? अन् ती आपली असावी.. फक्त आपलीच.. ही अशी ओढ एखाद्याबद्दल वाटू शकते? तो तर प्रत्यक्ष अनुभवतच होता. रात्र सारी कूस पालटण्यात अन् निःश्वास सोडण्यात गेली. पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. सकाळी जाग आली, तेव्हा डोक्याकडल्या खिडकीतून सूर्याच्या किरणांनी खोलीत घुसखोरी केली होती. तो डोळे चोळत उठला. स्वयंपाकघरातून विभावरीच्या कुकरच्या श्ािट्टयांचा आवाज येत होता.

बघता बघता श्रीकांतदादाला जाऊन तीन वर्षं झाली. लहान विश्वास तेव्हा दोन वर्षांचा होता. दादाच्या जाण्याने वहिनी पार कोसळली. तिचंही वय तेव्हा फार नव्हतं. वहिनीचं आण्ाि आपलं वय जवळपास सारखंच. खरं तर ती लग्न होऊन आली, तेव्हा मैत्रिणीसारखीच जास्त वाटली. दादाच्या जाण्यानंतर ती कोलमडलेली पाहून खूप काळजी वाटत होती. पण सावरली. मुलांकडे पाहून तिने आपल्या दु:खाचं गाठोडं पाठीवर भिरकावलं. दादाच्या ऑफिसमध्ये तिला कंपॅशनेट ग्राउंडवर नोकरी मिळाली. तीन पोरांचं सारं करताना स्वत:कडे लक्ष द्यायला तिला फुरसतही मिळत नाही. अन् म्हणून तिने बोलावलं की आपण तत्परतेने इथं येतो. कारण त्यापलीकडे फारसं काय करू शकतो आपण? मनातले विचार झटकून मुरली उठलाच.

मोठा जयराज आता दहा वर्षांचा झालाय अन् त्याच्या पाठचा सुभाष साडेआठ वर्षांचा. दोघांमध्ये फक्त दीड वर्षांचं अंतर. त्यामुळे ते जोडीनंच वाढताहेत, खेळताहेत. सुभाषच्या पाठचा विश्वास. त्या दोघांमध्ये साडेतीन वर्षांचं अंतर. मोठया दोघांनाही विश्वासची लुडबुड नको असते खेळताना. पण विभा त्यांना सक्तीच करते त्याला सोबत घेऊन खेळण्याची. त्यांचा मग नाइलाज होतो.

आत्ताही शाळेची घाई असताना जयराज-सुभाष अंगणात झाडाखाली काहीतरी करण्यात दंग होते. विश्वास बाजूला उभा राहून दोघांचं खेळणं मुकाटयाने बघत होता. आंघोळीला जायला एकही जण येईना, म्हणून विभावरी अंगणात गेली, तसे मोठे दोघे सावध झाले अन् अंगावरची माती झटकून उठून उभे राहिले.

''शाळेत नाही का जायचं? केव्हाची आवाज देतेय, एक्काचाही पत्ता नाही.'' ती ओरडलीच. तिघेही मग मुकाटयाने आत जाऊ लागले.

''अन् करत काय होतात सकाळी अंगणात? केवढी माती झालीय कपडयांवर?'' त्यावर कोणीच काही बोललं नाही. जयराज तर सरळ न्हाणीत जाऊन आंघोळीच्या दगडावर बसला. सुभाष उगाचच घरात फिरत राहिला. विश्वास आईजवळ घोटाळत राहिला.

''आई गं!''

''हं?''

''आम्ही..''

''तुम्ही काय?''

''म्हणजे दादा अन् सुब्बूनी..''

''दादा अन् सुब्बूनी काय?''

ब्रश करून स्वयंपाकघरात श्ािरणारा मुरली म्हणाला, ''वहिनी, कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज येतोय सारखा.''

''असेल. पिल्लावळ खूप वाढलीय कुत्र्यांची.''

'अगं, घुसमटल्यासारखं केकाटतंय.''

''दादानी, सुब्बूनी..''

''काय? सांग ना.''

''ते पिल्लू झाडाखाली..''

आंघोळ करून नुकताच बाहेर आलेला जयराज धावत विश्वासजवळ आला अन् त्याने विश्वासच्या तोंडावर घट्ट हात दाबून धरला.

''काहीतरी नक्की केलंय पोरांनी..'' विभाच्या मनात घंटी वाजली.

पिल्लाच्या केकाटण्याचा आवाज आता क्षीण होत चालला. जयराजला विचारण्याच्या भानगडीत न पडता ती धावत अंगणात गेली. झाडाखाली पोरांनी माती उकरून खड्डा करून त्यावर परत माती सारली होती. तिथे ती गेली. तिथूनच आवाज येत होता. तिने माती बाजूला सारली. आत दबलेलं कुत्र्याचं पिल्लू अंग झटकत बाहेर आलं अन् ते तिथून जिवाच्या आकांताने पळत सुटलं.

''काय तरी पोरांचे उद्योग..'' म्हणत ती पाठमोरी वळली, तर मुरली तिच्यामागे येऊन उभा होता.

''बघा कसे खेळतात तर! सगळया मुलांपेक्षा या पोरांचं खेळणं काही वेगळंच असतं. कुठून यांच्या डोक्यात असले खेळ येतात मला काही कळत नाही.'' मुरलीला त्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावी ते कळलं नाही.

घरात श्ािरल्यावर तिने जयराजला अन् सुभाषला जवळ बोलावून विचारलं की, ''का गाडलं तुम्ही कुत्र्याच्या पिल्लाला?''

त्यावर सुभाषकडे बोट दाखवत जयराज म्हणाला,''याने सांग्ाितलं मला असं करायला.''

''तुला स्वत:चं काही डोकं आहे की नाही? अन् तू रे, तू का सांग्ाितलंस दादाला असं करायला?''

''ते पिल्लू सारखं सारखं उन्हात बसत होतं. मी त्याला झाडाच्या सावलीत आणून ठेवलं तर ते पळून जात होतं. म्हणून त्याला..''

''म्हणून त्याला गाडून टाकलं? अन् ते मेलं असतं म्हणजे?''

''शाळेत जायच्या आधी आम्ही त्याला बाहेर काढणार होतो नं.'' अतिशय निरागस चेहऱ्याने सुभाष बोलला. त्यावर काय म्हणावं ते विभावरीला कळेना. तिने मग पुन्हा असं न करण्याची तंबी दिली अन् ती घरात वळली. या सगळया घोळात बराच वेळ गेला. आता सगळं भराभर आटोपायला हवं होतं. ती मग कामाला भिडलीच. मुरलीसाठी तिने चहाचं आधण ठेवलं. पाण्याला उकळी फुटेपर्यंत कणीक भिजवली. कुकर उतरवून भाजीसाठी कढईत तेल तापायला ठेवून चहा गाळला. मुरली चहाचा कप घ्यायला आला, तोवर तिने भाजी फोडणीला टाकली. स्वत:साठी केलेला अर्धा कप चहा पिऊन पोळया करायला सुरुवात करायची होती. चहाचा कप हातात घेऊन ती ओटयाला टेकून उभी राहिली. मुरलीही तिथेच तिच्या बाजूला चहा पीत उभा राहिला. त्याचे दोनचार घोट घेऊन होईस्तोवर तिचा चहा संपून तिने पोळयांसाठी तवा ठेवला.

''वहिनी..''

'' हं?''

''तुम्ही विचारा दामलेकाकूंना. माझी तयारी आहे.''

''तिच्या मुलीसह तिला स्वीकाराल?''

''हो.'' तो ठामपणे म्हणाला.

''बघा बरं! अन् तरीही नाही म्हणाली, तर?''

''विचारायला काय हरकत आहे पण?''

''बघते. आज ऑफिसातून आले की जाते काकूंकडे.''

संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर ती दामलेकाकूंकडे गेली, तेव्हा काकू तांदूळ निवडत होत्या. तिला पाहून तोंडभरून ''ये'' म्हणाल्या. त्यांच्याकडे विषय कसा काढावा ते तिला कळेना. पण भाऊजींना जायला अगदी एकच दिवस राहिलाय. विचारायलाच हवं, म्हणून ती काकूंशी बोलली. त्यावर काकू म्हणाल्या,

''हो' नाही म्हणणार ती. यापूर्वी विचारलं होतं ग तिला. एकदोन स्थळं होती हाताशी. मुलीसह पत्करण्याची तयारी होती. पण नाहीच म्हणाली दर वेळी.''

''पुन्हा एकदा बघा ना प्रयत्न करून.''

''तुझ्यासमोरच विचारते तिला, थांब.'' म्हणत त्यांनी चंदाला हाक मारली.

''काय काकू?''

''चंदा, ही विभावरी आलीय बघ तुझ्याकडे.''

''माझ्याकडे?'' तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यच उमटून आलं.

''विभाचा दीर मुरली आलाय इथे. त्याला तुझ्याशी लग्न करायचंय.'' काकू अगदी विषयालाच भिडल्या.

''माझ्याशी?'' चंदा ते ऐकून कावरीबावरीच झाली.

''हो, तुझ्याशी. त्याला सांग्ाितलंय सगळं विभावरीने.''

''तरीदेखील?''

''हो. तरीसुध्दा तयार आहे तो लग्नाला. अविवाहित आहे तो. आतापर्यंत नाहीच म्हणत होता लग्नाला. पण तुझ्याशी करायचंय म्हणतो.''

''भलतंच काहीतरी?'' म्हणताना तिला आठवलं, गेल्या महिन्या-दीड महिन्यांपासून शेजारच्या घरातील त्याची नजर आनंदमग्नतेने आपल्याला न्याहाळत असते. ती नजर कधी बोचरी, लंपट वाटत नाही. पण अस्वस्थ मात्र करते. सुरुवातीला ते ध्यानात आलं, तेव्हा ती हडबडलीच होती. पण आतून आतून कुठेतरी सूक्ष्म अशा आनंदलहरी.. ज्या ती निकराने परतवीत होती. अन् त्यातून हे सगळं अतक्र्य, अशक्यप्राय, कल्पनाही करवत नाही असं..

''काकू, तुम्हाला माहितीय सारं..'' म्हणताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव फारच केविलवाणे वाटले विभावरीला.

''मुरली अतिशय चांगला, सज्जन मुलगा आहे बरं का गं! अगदी लहान होता तेव्हापासून मी पाहिलंय त्याला. श्ािवाय हुशार किती! दारव्हेकरांची सगळी फॅमिलीच खूप हुशार, बरं का गं! श्रीकांतही असाच हुशार होता बघ. दृष्टच लागली विभावरीच्या संसाराला.'' दामलेकाकूंच्या बोलण्यात प्रामाण्ािक कळकळ अन् जिव्हाळा होता. पण चंदाला ते सारं ऐकण्यात काही रस नव्हता. उपचार म्हणून ती तिथे बसली. विभावरीने संभाषणाची सूत्रं स्वत:कडे घेऊन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तिचं वय किती लहान आहे अन् तिच्यासारख्या तरुण मुलीला एका मुलीसह जगणं हे अशक्य नसलं तरी सोपं नाहीच. अन् अनायसे भाऊजींसारखा मुलगा (खरं तर माणूस) लग्नाचं विचारतोय, तर तिने विचार करायला हरकत नाही.

त्यावर चंदाने विभावरीला थेटच विचारलं, ''तुम्हाला जर कोणी लग्नाचं विचारलं, तर तुम्ही हो म्हणाल?''

तिच्या त्या भेदक प्रश्नाने विभावरी हडबडलीच. तरीही सावरून म्हणाली, ''तुझ्या-माझ्या वयात फरक आहे.''

''तरीही तुमचं वय फारसं नाहीच. जेमतेम पस्तीसच्या असाल.''

तिच्या त्या सडेतोड प्रश्नानंतर विभावरीकडे बोलण्यासारखं काही श्ािल्लक नव्हतं. तरीही तिच्या मनात आलंच की एका मुलीसह स्वीकारणं अन् तीन मुलांसह स्वीकारणं यात किती फरक आहे कळतंय का तुला? पण विभावरीने स्वत:ला आवरलं.

विभावरी घरी आली ते चंदाचा नकार पदराला बांधूनच. मुरली तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला. ती सरळ न्हाणीघरात गेली. तिने तोंडावर थंड पाण्याचे सपके मारले. पायांवर पाणी घेऊन पदराला हात तोंड पुशीत ती बाहेर आली, तेव्हा मुरली पुस्तक वाचत सोफ्यावर बसला होता. ती बाजूच्या खुर्चीवर टेकली. मुरलीने हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. त्याला कुठल्या शब्दात सांगावं याचा विचार विभावरी करीत होती, तर तोच म्हणाला,

''नाहीच जमलं नं?''

''नाही.''

''तू आलीस तेव्हाच लक्षात आलं.''

''पण भाऊजी, दुसरी मुलगी पाहू नं आपण.''

''वहिनी, आता लग्नाचा विषयच नको.''

''पण तिच्यासाठी लग्न न करण्याइतके तुम्ही तिच्यात कधी गुंतलात? तुम्हा दोघांमध्ये असं काही नव्हतंच, तर..''

''एकतर्फीसुध्दा असू शकतं नं वहिनी काही?''

''पण म्हणून लग्नच नाही करायचं?'' मुरली तिथून उठूनच गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघत राहिली अन् मनात म्हणाली, ''दामलेकाकू चंदाला सांगत होत्या की दारव्हेकर फॅमिली खूप हुशार आहे. पण काकू, तुम्हाला माहीत आहे का की या हुशार असणाऱ्या दारव्हेकर फॅमिलीमध्ये एक न कळणारा असा सूक्ष्म विक्षिप्तपणा आहे, जो कुणाला सांगताही येत नाही, पण सहवासाच्या माणसाला कळत जातो. श्रीकांतना ऑफिसमध्ये प्रमोशन नाकारलं गेलं, तेव्हा किती मनाला लावून घेतलं त्यांनी. नोकरीच सोडायला निघाले होते. तेव्हा तर मला सगळं ब्रह्मांड कोसळल्यागत झालं होतं. किती लहान होती मुलं तेव्हा! अन् त्यात श्रीकांतने जर नोकरी सोडली, तर कसं होईल पुढे? खूप रडले मी. घरात एखाद्याचा मृत्यू व्हावा इतकी धाय मोकलून रडले. तेव्हा चिडले ते माझ्यावर. म्हणाले, ''नोकरी सोडली म्हणून काही घरी बसणार नाही मी. काही ना काही करीनच.''

एक असह्य ताण दोघांमध्ये, त्यातून मग मौन.. घरात वाढत गेलेला ताण, त्यातून जाणवणारी अस्वस्थता. रात्री अंथरुणावर पडल्यावरही दोघांची तोंडं दोन दिशांना.. त्यातच मग श्रीकांतला आलेला अटॅक.. सारं संपून गेलं. त्याक्षणी खूप वाईट वाटलं. स्वत:चाच राग आला. कदाचित मी नसतंच धरलं एवढं ताणून, तर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला असता, दुसरीकडे कुठेतरी नोकरी केली असती किंवा स्वत:चं काही उभं केलं असतं. तेवढी धमक निश्चित होती त्यांच्यात. अन् तरीही जे होणारच असतं, ते नसतंच टळलं तर? पुढे काय केलं असतं मी? निदान नोकरीचा राजीनामा दिला नव्हता, म्हणून मला त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. जिथे ते बॉस म्हणून वावरले, त्याच ऑफिसमध्ये मी क्लार्क म्हणून नोकरी पत्करली. पण तीही तेव्हा महत्त्वाचीच होती. एरव्ही माझ्यासारख्या फक्त बी.ए. ग्रॅज्युएट असणाऱ्या बाईला, अन् सरकारी नोकरीचं वय निघून गेलं असताना इतकी सुरक्षित नोकरी कशी काय मिळाली असती? किती कठीण होतं सारं.. दामलेकाकू ज्या दारव्हेकर फॅमिलीला हुशार म्हणून वाखाणतात, त्यांच्याच वागण्याच्या या तऱ्हा. कुणाला सांगता येण्यासारखं काही आहे का यात? पण सहवासाच्या माणसाला त्रास होतोच नं!

चंदाचा नकार पदरात बांधलेला दिवस पुढे सरकून गेला. दुसऱ्या दिवशी मुरली सिरोंचाला जाणाऱ्या गाडीत बसला. जाण्यापूर्वी शांत होता. कालपासून त्याने काहीही त्रागा केला नव्हता. चेहऱ्यावर कुठलेही अतृप्त, असंतुष्ट भाव उमटलेले दिसले नाहीत. जणू काही रोजच्यासारखाच तोही एक दिवस उगवला अन् मावळला. पहाटे निघताना ''येतो वहिनी'' म्हणाला. पोरं तेव्हा झोपेत होती. विभा दारापर्यंत पोहोचवायला गेली. रिक्षा मिळेस्तोवर दारातच थांबली. रिक्षात बसून मुरली निघाला, तरी ती तिथेच उभी होती. मनाला रुखरुख लागली होती. पहिल्यांदा आपणहून लग्न करतो म्हणाले अन् तेही अशा मुलीशी, की जिथून होकाराची अपेक्षाच नव्हती. तिला तरी दोष कुठे देता येतो म्हणून?

एका रांगेत असणारी चार घरं पार करून रिक्षा वळणाच्या रस्त्याला लागली. मुरलीने मागे वळून पाहिलं. विभाने हात हलवला. मुरलीनेही निरोपाचा हात हलवला. घरात वळताना विभाचं लक्ष सहजच दामलेकाकूंच्या अंगणातल्या प्राजक्ताच्या झाडाकडे गेलं. तिथे खूप दाटोळा झाला होता झाडांचा अन् त्या गर्द झाडीतून एक पदर वाऱ्याच्या झुळकीसारखा हळुवार सळसळत मागच्या अंगणात गेला. विभाचं पाऊल जमिनीत घट्ट रुतलं.

बयो! होकार देण्याचं धाडस दाखवतीस, तर एक विरागी आयुष्य र्मागी लागलं असतं गं!                            ***

 

दिवस, महिने, वर्ष, वर्षापाठी वर्षं.. अनेक वर्षं मागे पडली. जयराज काही फारसा हुशार नव्हता शाळेत. पहिल्या दहा नंबरात असायचा. क्वचित कधी मागे जायचा. थोडं लक्ष द्यावं लागायचं. विभा स्वत: बसून त्याचा अभ्यास करून घ्यायची. त्यासाठी तिने एक वेळ ठरवून घेतली. शाळेतून परतल्यावर पोरं मैदानावर खेळायला जात. तिकडून येईस्तोवर सात वाजत असत. तोवर विभाचा स्वयंपाक आटोपलेला असे. त्यानंतर एक तासपर्यंत ती मुलांना जवळ घेऊन बसत असे. त्यांच्या अभ्यासाची, गृहपाठाची विचारपूस करणं, अभ्यास घेणं असं सारं करताना तिला कळत गेलं की एकटया जयराजकडे लक्ष देण्याची गरज आहे. सुभाष अन् विश्वासचं विशेष काही पाहावं लागत नाही. दोघेहीर् वगात पहिल्या नंबरात असतात. त्यांचे रिझल्ट्स ऐकले की दामलेकाकू म्हणत, ''पोरं किती हुशार आहेत विभा तुझी. अगदी घराला असणारी सोन्याची दारंच. म्हातारपणाची काळजी नाही बघ तुला काही. श्ािकून मोठ्ठी बनतील पोरं तुझी.''

त्यावर ती सहजच म्हणायची, ''काकू, अहो कॉर्पोरेशनच्या शाळेत श्ािकणारी मुलं कुठे इतकी चमकणार आहेत? वासरात लंगडी गाय शहाणी, एवढंच काय ते.''

''अग, घराण्याची म्हणून काही देणगी असते की नाही? तुझ्या मुलांना ती वारसाहक्काने मिळालीय बघ.'' ती मनात म्हणायची, ''तसंच जर असेल, तर फक्त हुशारीच मिळू दे वारसाहक्काने. इतर काही नको. त्यापेक्षा हुशार नसली माझी मुलं तरी चालेल मला. खरंच चालेल.''

मुलं हुशार नसू देत असं देवाकडे मागणं मागणारी ती जगातली एकमेव आई असेल, या कल्पनेने तिला हसू यायचं. पण त्या हसण्यातही एक वेदना तर होतीच.

चंदा रोज डोळयांपुढे दिसते. ट्रेनिंग झाल्यावर म्हटल्याप्रमाणे दामलेकाकांनी खरंच तिला शाळेत नोकरी लावून दिली. शाळा नवीच होती. सुरुवातीला अगदी कमी पगार मिळायचा. पैसे पुरावेत म्हणून चंदा लांबच्या शाळेत पायी जायची. किती चांगली मुलगी आहे चंदा! एवढया तरुण वयात वाटयाला असे भोग आलेत. पण कधीही विचलित झालेली दिसली नाही. उलट प्राप्त परिस्थितीवर घट्ट पाय रोवून उभी राहिल्यासारखी वाटते.

अनेक वर्षांच्या ओळखीने विभाशी तिचं चांगलं सूत जमलंय. एकदा विभाने तिच्या खंबीर असण्याचं कौतुक तिच्यादेखत केलं तर म्हणाली, ''विभाताई, तुमच्याचकडून श्ािकले मी सारं.''

तिने भाऊजींना नाही म्हटल्याची खंत वाटेनाशी झाली. काही नवीन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की तिने काही भाऊजींना नाकारलं नव्हतं. तिला मुळात पुन्हा लग्नाच्या वाटेलाच जायचं नव्हतं. मग भाऊजींच्या जागी दुसऱ्या कोणीही, कितीही श्रेष्ठ माणसाने तिला विचारलं असतं, तरी ती नाहीच म्हणाली असती. स्वत:ची मूल्यं अन् निष्ठा सांभाळत ती जगत होती. एक सुनिश्चित र्माग सापडला होता. त्यावर पावलं स्थिरावली होती. आयुष्याला स्थैर्य आलं होतं. चंदा नावाचा एक अध्याय तिथेच संपला होता. पण भाऊजींच्या मनातून तो कुठे पुसला गेला म्हणून? वयाच्या तेहतिसाव्या वर्षी त्यांनी प्रथम लग्नाचा विचार केला अन् जिच्या संदर्भात केला, तिने नाही म्हटल्यावर त्यांनी पाठच फिरवली त्या विषयाकडे. बदलीच्या गावी फिरत राहतात. प्रमोशन्स होताहेत. कधी सिरोंचासारखं एकांडं गाव नश्ािबी येतं. कधी त्याहूनही अधिक एकांडं. पण त्यांची तक्रार नसते कधी. अधूनमधून इथे येतात. चंदाचा विषयही कधी काढत नाहीत. रजा संपली की बॅग उचलून चालू लागतात. त्यांच्या तशा वागण्याने काळजात चरचरतं अन् मग रागही येतो या विक्षिप्तपणाचा. दारव्हेकरांच्या फॅमिलीला बुध्दिमत्तेसोबत मिळालेला हा शाप म्हणायचा का?

जयराजचा मॅट्रिकचा रिझल्ट लागला. त्याला काही फारशी चमक दाखवता आली नाही. हायर सेकंडक्लासचे माक्र्स मिळाले. त्याने स्वत:हूनच कॉमर्सला जायचा र्निणय घेतला. विभाला तो मान्यच होता. ती पेढे घेऊन दामलेकाकूंकडे गेली, तेव्हा काकू म्हणाल्या, ''कमी पडले का गं मार्क जरा?''

''काकू, तो नापास तर नाही ना झाला? माझ्यासारख्या बाईच्या मुलाने, महापालिकेच्या शाळेत श्ािकणाऱ्या मुलाने ह्याहून किती जास्त उडी मारायची?''

विभाच्या त्या 'माझ्यासारख्या' म्हणण्याला अनेक संदर्भ लगडून आले. माझ्यासारखी विधवा बाई, श्ािवाय नोकरी करणारी, अर्थातच मुलांसाठी पुरेसा वेळ न देऊ शकणारी, भाराभर पैसा खर्च न करू शकणारी अशा बाईचा मुलगा पास झालाय. खूप गुण नाही मिळवू शकला, तरी तो नापास तर नाही ना झाला?

तिच्या म्हणण्याचा मथितार्थ ध्यानात येऊन दामलेकाकू खजील झाल्या. ''तशा अर्थाने नाही गं म्हटलं मी. तुमच्याकडे सारेच जण हुशार आहेत ना, म्हणून वाटलं बघ.''

''काकू, तो माझ्यावर गेला असणार. मी काही फारशी हुशार नव्हते शाळा-कॉलेजात. होते आपली सर्वसाधारण.''

''असू दे, असू दे. कॉमर्सला चांगलं नाव काढेल बघ तो.'' काकूंनी माघारच घेतली.

''मला फार अपेक्षा नाहीच आहे काकू त्याच्याकडून. त्याने फक्त स्वत:चं नीट करण्याइतपत श्ािकावं, नोकरी करावी, संसार करावा. तेवढयात खूश असेन मी.''

काकूंनी तिच्या हातावर साखर ठेवली. तिने वाकून त्यांना नमस्कार केला, तसं तोंडभरून आशीर्वाद देत त्या म्हणाल्या, ''यशस्वी होईल जयराज. आमच्या दोघांचे आशीर्वाद अन् शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी.''

''तेवढंच मला पुरेसं आहे काकू.''

जयराज कॉमर्स कॉलेजमध्ये रुळेस्तोवर सुभाष मॅटि्रकला आला. कॉर्पोरेशनच्या शाळेतून चौथी पास झाल्यावर ज्या साध्याशा मराठी मीडियमच्या शाळेत तिने जयराजला टाकलं होतं, तिथेच तिने सुभाषलाही ऍडमिशन घेतली. आठवीपर्यंत त्या शाळेत श्ािकल्यावर अचानक त्याने स्वत:च शाळा बदलण्याचा र्निणय घेतला. आठवीचा रिझल्ट लागण्याच्या दोन दिवस आधी त्याने तिला सांग्ाितलं, ''आई, मला शाळा बदलायची आहे.''

''का रे?''

'' इथल्या शाळेत नववीपासून बायलॉजी नाहीय. मला बायलॉजी घ्यायचं आहे.''

''कशाला?''

''मला डॉक्टर व्हायचं आहे.'' त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास अन् निर्धार पाहून ती आश्चर्यचकित झाली. हा सगळा बदल केव्हा झाला या मुलात?आपल्याला कळलंही नाही.

''कुठल्या शाळेत ऍडमिशन घेणार आहेस?''

''न्यू ईरा हायस्कूलला.''

''पण तिथे तर फक्त हुशार मुलांनाच ऍडमिशन मिळते.''

''मी नाहीय का हुशार?'' त्याने थेटच विचारलं.

ती हडबडलीच. सावरून घेत म्हणाली, ''तसं नव्हतं म्हणायचं रे मला. पण तू ज्या शाळेत श्ािकतो आहेस, तिथे वरचा नंबर येणं म्हणजे काही फार कठीण गोष्ट नाहीये.''

त्यावर तो काही बोललाच नाही. ''श्ािवाय किती दूर आहे शाळा ती. मी पाहून घेईन.'' म्हणून तो निघूनच गेला.

त्याचा रिझल्ट घ्यायला दोन दिवसांनी तो शाळेत गेला. खूप वेळ झाला तरी शाळेतून परतलाच नाही. विभाला काळजीच वाटायला लागली. ती तर किती उत्सुकतेने त्याची वाट बघत होती. आज तिने रजा घेतली. सकाळी आठ वाजता रिझल्ट आणायला शाळेत गेलेला मुलगा दुपारचे दोन वाजले तरी परतला नाही, तेव्हा तिला हुरहुर वाटू लागली. विश्वासला तिने पलीकडल्या गल्लीतल्या सतीशकडे चौकशीला जायला सांग्ाितलं. सतीश सुभाषच्या र्_वगातला. विश्वास दाराबाहेर पडला, तर त्याला सुभाष येताना दिसला. ''आई, सुब्बू आला गं!'' विश्वासने ओरडून सांग्ाितलं. विभा लगबगीने दाराशी आली. एप्रिल सरला होता. वैशाखाचा चटका जाणवू लागला होता. दुरून येणारा सुभाष तिला दिसला. तो जवळ आला, तेव्हा त्याचा चेहरा तांबरलेला होता. गाल लाल झाले होते.

''कुठे रे होतास इतका वेळ? अन् रिझल्ट काय लागला?''

अतिशय थंडपणे त्याने मार्कलिस्ट विभाच्या हातात दिली. त्याचा एकूण आविर्भाव पाहून मार्कलिस्ट घेताना तिच्या छातीत धडधडत होतं. तिने मार्कलिस्टवर नजर टाकली. तोर् वगात पहिला आला होता. ती बघतच राहिली. तसं त्याचं पहिलं येणं तिच्यासाठी काही नवीन नव्हतं. पण त्याने घरी यायला केलेला उशीर अन् त्याचा चेहरा.. ती चपापलीच होती ना.

''छान पास झालास रे.'' ती कौतुकाने म्हणाली.

''हूं!'' तो थंड होता.

''शाळेतून निघायलाच इतका उशीर लागला का?''

''नाही. शाळेतून तर दहा वाजताच बाहेर पडलो.''

''मग कुठे गेला होतास?''

''न्यू ईरा हायस्कूलमध्ये.''

''क्काय?'' काही न कळून विभा म्हणाली.

''ऍडमिशन घेऊन आलो शाळेत. त्यांना फक्त टी.सी. नेऊन द्यायचा आहे.''

''अरे, पण कशी मिळाली ऍडमिशन?'' तो शांतपणे सांगू लागला. ''मी त्या शाळेत गेलो. तिथल्या चौकीदाराला म्हटलं की मला हेडमास्तरांना भेटायचं आहे. तर तो जाऊच देईना. म्हणाला की साहेब कामात आहेत. कुणालाच भेटत नाहीत. मी त्याला म्हटलं, केव्हा भेटतील? तर म्हणाला, दुपारी दोनच्यानंतर. मग मी तिथेच पायरीवर बसून राहिलो. तर त्याने विचारलं की काय काम आहे तुझं साहेबांकडे? मी त्याला सांग्ाितलं की मला ऍडमिशन हवीय नववीच्यार् वगात. तो म्हणाला की इथे कोणाला ऍडमिशन वगैरे नाही भेटत. मी विचारलं, का नाही भेटत? तर तो काही बोलला नाही अन् बाहेरच निघून गेला कुठेतरी. तेव्हा मी तिथेच पायरीवर बसून होतो. तेव्हा समोरच हेडमास्तरांचं ऑफिस दिसत होतं. वाटलं की आपणच आत जाऊन त्यांच्याशी बोलावं. पण नाही गेलो. तिथेच बसून राहिलो पायरीवर. तो चौकीदार परत आला अन् मला पाहून चाटच पडला. जा नं बाबा घरी, काऊन खालीपिली बसून राह्यला? तो म्हणाला. मला भेटायचं आहे सरांना. मी पुन्हा तेच सांग्ाितलं. घरी जाऊन मायबापाले संग घिऊन ये. का? ऍडमिशन तर मला हवी आहे. कोठून अशे पोरं येतेत काही समजत नाही. चाल नीघ, जा घरी.. तो मला हुसकावून लावत होता. माझाही आवाज चढलाच मग. मी म्हटलं की मी सरांना भेटल्याश्ािवाय नाहीच जाणार. आतून हेडमास्तरांनी चौकीदाराला हाक मारली अन् विचारलं, काय गडबड आहे बाहेर?  साहेब एक पोरगं आलं हाये बाहेर. तुम्हाले भेटायचं म्हंते. त्याले जा म्हंतो त् आयकतच नाही. तो म्हणाला. पाठवून दे आत, ते म्हणाले.''

'' मग?'' तिच्या आवाजाच कमालीचं औत्सुक्य.

''त्यांनी विचारलं मला, काय रे! बाहेर काय दंगा करीत होतास? मी सांगितलं, दंगा नव्हतो करत सर. तुम्हाला भेटायला म्हणून गेल्या दीड तासांपासून पायरीवर शांत बसलो होतो. पण चौकीदार हाकलून लावायला लागला. तेव्हा मग.. बरं. कशाला भेटायचं होतं मला? त्यांनी विचायलं. सर, मला ऑडमिशन हवी या शाळेत नवव्यार् वगात. का? सर मी ज्या शाळेत श्ािकतो तिथं बायलॉजी नाहीय. मला बायलॉजी विषय हवाय. कशाला हवाय तुला बायलॉजी? सर, मला डॉक्टर व्हायचं आहे. 'किती माक्र्स मिळाले या वर्षी? मी मार्कलिस्टच ठेवली त्यांच्या टेबलवर. त्यांनी मार्कलिस्ट पाहिली अन् म्हणाले, जा, दिली तुला ऍडमिशन. टी.सी. घेऊन ये शाळेतून अन् ऍडमिशन फी बारा रुपये घेऊन ये. तरी मी उभाच राहिलो. तसे ते म्हणाले, आता काय? सर, नक्की दिली ना ऍडमिशन? मी विचारलं. का? असं का विचारतोस? मी टी.सी. घेऊन आलो अन् मग तुम्ही नाही म्हणाला तर?'' विभाला हसूच आलं. ''सरही असेच हसले अन् म्हणाले, नक्की दिली. टी.सी. घेऊन ये.''

सुभाषचं सारं सांगून झालं होतं. त्याच्या त्या अचाट धाडसावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावी ते विभावरीला कळेच ना. एक नोंद मात्र तिच्या मनाने घेतली. दारव्हेकरांचे जीन्स आहेत हे. काहीतरी वेगळेपण तर असणारच ना!

ती विचारात मग्न असताना तो तिला काही विचारत होता.

''काही म्हणालास?''

''नाहीय का मी हुशार?'' त्याने विचारलं.

तिने त्याला घट्ट पोटाशी घेतलं अन् म्हणाली, ''जरा कमी हुशार असतास तरी चाललं असतं रे मला.'' तिच्या बोलण्यातला खरा अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीणच होतं.

दामलेकाकूंना जेव्हा त्याच्या ऍडमिशनचं कळलं, तेव्हा त्यांचा ऊर अगदी भरूनच आला. त्या विभावरीला म्हणाल्या,

''हुशार तर आहेतच ग मुलं तुझी, पण कर्तबगारदेखील होतील.''

''कुणास ठाऊक, काय काय वाढून ठेवलंय नश्ािबात ते!''

''अशी हिम्मत हरल्यासारखी का बोलतेस?''

''हिम्मत हरून कसं चालेल काकू? पण जे मला आतून कळतं ना, ते मी नाही पोहोचवू शकत कोणापर्यंत.''

बायलॉजीसाठी शाळा बदलणाऱ्या सुभाषला मॅट्रिकला मेरिट मिळाला. हेडसरांची मुलगी मार्कांच्या बाबतीत त्याच्या पुढे होती. पण ती कशी पुढे होती ते त्याच्यासह सगळयांनाच माहीत होतं. या शाळेत आल्यापासून तो कधीहीर् वगात पहिला आला नव्हता. त्याला प्रत्येक निकालाच्या वेळी प्रचंड मनस्ताप होई. हातातली मार्कलिस्ट फाडून टाकावीशी वाटे.र् वगातले बाक धाडधाड पाडून टाकावेसे वाटत. संतापाचा राक्षस डोक्यात थैमान घालू लागे अन् त्या प्रत्येक वेळेस हेडमास्तरांनी ऍडमिशन देताना दाखवलेला चांगुलपणा आठवे. रागाचे बुरूज ढासळत जात अन् स्वत:ला समजावताना तो म्हणे, एक दिवस नक्कीच मी या सगळयांच्या वर असेन.

मेडिकलला ऍडमिशन मिळाली, त्याच्यासोबत सरांच्या मुलीला - उल्काला ऍडमिशन मिळाली. त्याला आता मुक्त, स्वतंत्र वाटू लागलं. उल्का आपल्याच क्लासमध्ये असण्याचं टेन्शन वाटेनासं झालं अन् मेडिकलच्या पहिल्या वर्षाचा रिझल्ट लागला. त्याचे सगळे विषय निघाले अन् उल्का दोन विषयात अडकली. सुभाषच्या आतून एक सूक्ष्म आनंदाची लहर अलगद तरंगत आली. त्याला कळत होतं की हा असा आनंद होणं योग्य नाहीये. पण गेली तीन वर्षं सतत होणाऱ्या मनस्तापाचा तो उद्रेक होता. उल्का आता त्याच्याशी लढणार नव्हती. ती त्याच्यार् वगात असली तरीही... अन् आता त्याला स्वत: ला सिध्द करण्याची गरजही उरली नव्हती. एक अंतर.. जे त्याला स्वत:ला फार पूर्वीच कळलं होतं ते..

सुभाष M.S. Surgeryची पदवी घेऊन मेडिकल कॉलेजातून बाहेर पडला, तेव्हा जयराजचं लग्न होऊन वर्ष झालं होतं. जयराजने B.Com नंतर M.Com. केलं. बँकेत नोकरी मिळाली. नोकरीत दोन-तीन वर्षांत स्थिरस्थावर होऊन लगेच त्याने सांगून आलेल्या दोन-तीन मुलींमधून सुमेधाला पसंत केलं अन् रूढार्थाने ज्याला साधंसुधं म्हणता येईल अशा आयुष्याला सुरुवात केली. विभावरी आतून सुखावली. तिला निश्चिंतही वाटलं. कुठल्यातरी अनाकलनीय संकटातून मुक्त झाल्याची ती भावना कुठून मनात आली, त्याचे स्रोत ती स्वत:च जाणत होती अन् ती त्यांना दूर लोटू बघत होती. स्वत:ला जे सतत वाटतं ते खोटंच ठरू दे, असं ती मनोमन म्हणायची. तरीही जाणवायचा अदृश्याचा विळखा. कधी अन् केव्हा तो आवळला जाईल याचं भय होतं. पण आत्ताचे क्षण तर आनंदाचे होते, समाधानाचे होते.

विश्वासला मेरिटवर I.I.T. पवईला ऍडमिशन मिळाली. लोक आता विभावरीच्या खणखणीत हुशार मुलांकडे आकर्षित होऊ लागले. सुभाषसाठी तर रांगच लागली मुलींची. U.P.S.C. पास होऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सर्जरी डिपार्टमेंटला तो लेक्चरर म्हणून जॉईन झाला.

कोतवालांच्या मुलीचा फोटो पाहून विभावरीने म्हटलं, ''सुब्बू, चांगली वाटतेय रे मुलगी. पाह्यची का?''

''तुला योग्य वाटत असेल तर बघ.''

''अरे, पण तुला काय वाटतंय फोटो बघून?''

''मला काही कळत नाही गं. तू बघ ना काय ते!''

विभावरीने कोतवालांकडे कळवलं की विचार करता येऊ शकतो.

संध्याकाळची वेळ होती. दारात एक अनोळखी प्रौढ गृहस्थ येऊन उभे होते. सुमेधाने त्यांना ''कोण हवंय?'' म्हणून विचारलं तर म्हणाले, ''मी कोतवालांकडून आलोय.''

त्यांना बसायला सांगू