****कर्नल (डॉ.) अनिल आठल्ये (नि.)******
जुन्या शीतयुध्दाची अप्रत्यक्ष झळ आपण सहन केली आहे. लष्करी तळांच्या मोबदल्यात अमेरिकेने आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानला भरघोस लष्करी मदत दिली. ह्या मदतीमुळे आपल्या एक तृतीयांश असलेल्या पाकिस्तानला आपल्याशी सर्व क्षेत्रांत बरोबरी करण्याची मानसिकता निर्माण झाली. आपली काश्मीरमधली डोकेदुखी काही प्रमाणात ह्या शीतयुध्दाचीच परिणती आहे. आज अमेरिकेची जागा चीनने घेतली आहे. अमेरिकेप्रमाणेच चीन पाकिस्तानला लष्करी व आण्विक शस्त्रांच्या क्षेत्रांत मदत करत आहे. वरवर पाहिले, तर स्थिती जुन्या शीतयुध्दासारखीच आहे, असे म्हणता येईल.
भारत देश मूलतः आत्मकेंद्री देश आहे. अगदी सम्राट समुद्रगुप्ताच्या काळातसुध्दा जेव्हा रोमचे साम्राज्य हूणांच्या हल्ल्यासमोर हतप्रभ झाले होते व भारताने हूणांचे आक्रमण थोपवले होते, तेव्हासुध्दा आपले राज्य सीमेपलीकडे वाढवण्याचा कोणताच प्रयत्न केला गेला नाही. हजारो वर्षांच्या भारताच्या इतिहासात भारताने परकीय देशांवर हल्ला केल्याचे उदाहरण सापडणे कठीण आहे. राजा राजेंद्र चोला यांनी श्रीलंकेवर अनेक आक्रमणे नक्कीच केली. परंतु भारतवर्षाच्या व्याख्येनुसार श्रीलंका परकीय देश मानला जात नाही.
दक्षिण पूर्व आशियात - म्हणजे व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया व इंडोनेशियांत भारतीय पोहोचल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे जागोजागी मिळतात. योग्यकर्ता ह्या इंडोनेशियातल्या प्राचीन शहराजवळ पाचव्या व सहाव्या शतकांतले भव्य शिवमंदिर आजही उभे आहे. जुन्या बोर्निओ व आता कालीमंथन द्वीपावर समरिंदा शहरात पल्लव लिपीतला एक प्राचीन शिलालेख उपलब्ध आहे. (सध्या तो जकार्तास्थित संग्रहालयात आहे.) त्यावरून पल्लव राजांच्या काळात भारतीय इथे पोहोचल्याचा पुरावा मिळतो. अर्थातच आपल्या दुर्दैवाने गेली 60 वर्षे चाललेल्या 'सेक्युलर' इतिहासाच्या मक्तेदारीमुळे हा शिलालेख वाचण्याचा व त्यांचे भाषांतर करण्याचा प्रयत्नच केला गेला नाही, ही गोष्ट अलाहिदा!
परकीय भूमीवर आक्रमण न करणे ही एक स्तुत्य गोष्ट आहे आणि भारतीयांना त्याचा सार्थ अभिमान असायला हवा. परंतु त्या शांतिप्रेमाची दुसरी बाजू अशी की परदेशात काय चालले आहे त्यात भारतीयांना रस नव्हता. इस्लामी आक्रमणापुढे पूर्ण पर्शिया (आजचा इराण) नतमस्तक झाला, तिथली भारताइतकीच प्राचीन संस्कृती नष्ट झाली, त्याकडे भारतीयांनी लक्षच दिले नाही.
अगदी अर्वाचीन काळ बघितला, तरी हेच सत्य सामोरे येते. 1781मध्ये मराठा व इंग्रज युध्द सुरू होते. इंग्रजांविरुध्द फ्रेंच लोकांची मदत घेण्याकरता मराठयांचे वकील झैनुल बेग यांना नाना फडणीसांनी मॉरिशसला पाठवले होते. त्याच सुमारास इंग्रज सेना अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुध्दात पूर्णपणे अडकली होती आणि भारतातल्या घडामोडींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नव्हता! इंग्रजांना भारतातून घालवून देण्याची ही सुवर्णसंधी होती. मी त्या युध्दांचा जेव्हा अभ्यास केला, तेव्हा असे लक्षात आले की इंग्रजांच्या त्या अवघड स्थितीची भारतीयांना कल्पनाच नव्हती. मराठयांच्या दप्तरातल्या त्या काळच्या एकाही दस्तावेजात अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दाचा उल्लेखसुध्दा आढळत नाही.
आज एकविसाव्या शतकात त्या सर्व इतिहासाची उजळणी करण्याचे कारण म्हणजे आज जगात घडत असलेल्या स्थित्यंतराबद्दल आपण अनभिज्ञ आहोत असे वाटायला लागले आहे. जगातल्या त्या बदलांचे भारतावर काय दूरगामी परिणाम होणार आहेत, याबाबत देशात कोणत्याही माध्यमातून चर्चा होताना दिसत नाही.
सोविएत संघाच्या अस्तानंतर काही काळ जगात फक्त एकच महासत्ता होती, ती म्हणजे अमेरिका! परंतु त्यानंतरच्या दशकात चीनच्या आर्थिक प्रगतीमुळे तो देश अमेरिकेच्या तुल्यबळ होणार अशी शक्यता दिसू लागली. अमेरिका व चीन यांच्यादरम्यान अनेक मुद्दयांवर मतभेद आहेत. भविष्यकाळात त्या दोन देशांमध्ये 'नवे' शीतयुध्द सुरू होणार की काय, अशी अनेकांना शंका वाटते. आपणही त्यावर पोपटपंची करून नवीन शीतयुध्द वगैरे म्हणायला सुरुवात केली.
जुन्या शीतयुध्दाची अप्रत्यक्ष झळ आपण सहन केली आहे. लष्करी तळांच्या मोबदल्यात अमेरिकेने आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानला भरघोस लष्करी मदत दिली. ह्या मदतीमुळे आपल्या एक तृतीयांश असलेल्या पाकिस्तानला आपल्याशी सर्व क्षेत्रांत बरोबरी करण्याची मानसिकता निर्माण झाली. आपली काश्मीरमधली डोकेदुखी काही प्रमाणात ह्या शीतयुध्दाचीच परिणती आहे. आज अमेरिकेची जागा चीनने घेतली आहे. अमेरिकेप्रमाणेच चीन पाकिस्तानला लष्करी व आण्विक शस्त्रांच्या क्षेत्रांत मदत करत आहे. वरवर पाहिले, तर स्थिती जुन्या शीतयुध्दासारखीच आहे, असे म्हणता येईल.
आजच्या परिस्थितीत व जुन्या शीतयुध्द काळातल्या परिस्थितीत एक फार मोठा फरक आहे. पाकला शस्त्रपुरवठयामागे त्या देशाला केवळ 'किंमत' देण्याचा अमेरिकेचा हेतू होता. भारताला प्रत्यक्षरित्या धोका निर्माण करण्याचा हेतू त्यात नव्हता. चीनची पाकिस्तानला आज दिली जाणारी मदत ही केवळ भारताच्या विरुध्द सामरिक संतुलन बनवण्याकरता दिली जात आहे. दोन्ही मदतीत हा मोठा महत्त्वाचा गुणात्मक फरक आहे.
येत्या काही दशकांतच चीन अमेरिकेच्या तोडीस तोड लष्करी शक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. जुन्या शीतयुध्दकाळात महाशक्तींशी आपला प्रत्यक्ष संबंध किंवा विवाद नव्हता. एका ठरावीक स्तरावर भारताने दोन्ही महाशक्तींशी आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला 'अलिप्ततावाद' असे नाव देऊन आपल्या परराष्ट्र धोरणाचा तो पाया बनवला गेला. परंतु बदललेल्या परिस्थितीत अलिप्ततावादाच्या धोरणाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. आज एक महाशक्तीशी - चीनशी आपले अनेक प्रश्नांवर मतभेद आहेत व चीन भारताच्या एका राज्यावर - अरुणाचल प्रदेशावर आपला हक्क सांगत आहे. अशा परिस्थितीत चीन-अमेरिका शीतयुध्दातही आपण 'अलिप्त' राहू असे म्हणणे हास्यास्पद आहे. जुन्या अलिप्ततावादाला खोलवर गाडून टाकण्याची गरज आहे. चीनचा सामना करणे आपल्याला भाग आहे आणि मग त्यामुळे आपण अमेरिका, जपान व व्हिएतनाम यासारख्या इतर चीनविरोधी देशांशी जवळीक साधणार, हे साहजिकच आहे.
त्या सर्व बदललेल्या समीकरणांत रशिया व भारत यांच्या संबंधांवर नक्कीच ताण पडला आहे. भारताने अमेरिकेशी लष्करी क्षेत्रात जवळीक साधल्यामुळे रशियाने पाकिस्तानला शस्त्रे विकण्याची तयारी दर्शवली आहे. ते खरोखर प्रत्यक्षात येते की केवळ रशियाच्या दबावतंत्राचा एक भाग आहे, हे लवकरच कळेल. युक्रेन व क्रिमिया विलयामुळे अमेरिका-रशिया संबंध ताणलेले आहेत. त्यातच सीरियात हाफिझ असदच्या प्रत्यक्ष मदतीस येऊन, आपण आजही एक महासत्ता आहोत हे दाखवून देण्याचा रशियाने प्रयत्न केला आहे. भारताने युक्रेन विवाद व क्रिमियाचा विलय या संदर्भात रशियाचीच पाठराखण केली आहे. सीरियातसुध्दा भारत व रशिया एकाच बाजूला आहेत. परंतु अमेरिकेच्या विरोधामुळे रशियाने चीनशी जवळचे संबंध स्थापन करून आपली डोकेदुखी वाढवली आहे, ह्यात शंका नाही.
अशा ह्या सतत बदलत्या जागतिक समीकरणांत आपली भूमिका काय असावी, याचा भारताला पुनर्विचार नक्कीच करावा लागणार आहे.
परंतु हे सर्व करण्याआधी काही वैचारिक जळमटे दूर करण्याची गरज आहे.
गेल्या वर्षीं ह्याच सुमारास मी अमेरिकेत जवळजवळ महिनाभर प्रवास केला. ह्या वर्षी गेल्या महिन्यांतच रशियामध्येही एक महिनाभर संपूर्ण प्रदेशात रेल्वेने प्रवास केला. एक पर्यटक म्हणून हे दोन्ही प्रवास केले. प्रवासाचे उद्दिष्ट काहीही असले, तरी एक सामरिक विश्लेषक ह्या नात्याने असणाऱ्या संवेदना शाबूत होत्या. ह्या सर्व प्रवासामुळे काही भौगोलिक व सामरिक तथ्ये समोर आली.
अमेरिकेत मी जवळजवळ 4000 कि.मी. बसने प्रवास केला व 7 राज्ये पाहिली. अमेरिकेचा अफाट विस्तार, भौगोलिक व नैर्सगिक साधनसंपत्ती किती आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यातच बोस्टनसारख्या शहरांत राहून हेसुध्दा बघितले की जगभरातल्या शास्त्रज्ञांकरिता व तंत्रविशारदांकरिता अमेरिका आजही एक मोठे आकर्षण आहे. जगभरातल्या हुशार व तरुण वर्गाकरिता अमेरिका आजही 'मक्का' आहे. तिथला सर्वसमावेशक समाज, सुदृढ लोकशाही व हुशारी ओळखण्याची प्रथा ह्यामुळे भविष्यकाळातसुध्दा अमेरिका महाशक्तीच राहणार आहे, हे सिध्द होते. बाकी देशांनी प्रगती केल्यामुळे ते व अमेरिका यांच्यातले अंतर कमी होणार हे नक्की; परंतु अमेरिकेचा ऱ्हास होत आहे वगैरे म्हणणे चुकीचे आहे.
योगायोगाने गेल्याच महिन्यात रशियातही अशाच प्रकारे 10,000 कि.मी. प्रवासात रशियाच्या अमाप साधनसंपत्तीचा थोडा परिचय झाला. आज रशियाने कम्युनिस्ट शासन पध्दती पूर्णपणे मोडीत काढली आहे. रशियाचा जुना इतिहास पुन्हा स्थापित केला गेला आहे. जागोजागी आज जुन्या झारचे - विशेषतः पीटर द ग्रेटचे पुतळे दिसतात. कम्युनिस्ट राजवटीत नष्ट केलेली सर्व चर्चेस आज परत पुनर्जीवित केली गेली आहेत. मात्र अमेरिकेसारखी सुबत्ता अजून तिथे नाही. बहुतांश छोटया शहरांत रस्ते व इतर साधने भारतासारखी दिसली. परंतु त्याचबरोबर शहरात आधुनिक सोयी अगदी प्रगत देशांप्रमाणे आहेत.
रशिया भौगोलिकदृष्टया भारताच्या पाचपट मोठा आहे. परंतु तिथली लोकसंख्या मात्र जेमतेम 22 कोटी आहे. अशा ह्या कमी लोकवस्तीच्या व अफाट नैसर्गिक साधने असलेल्या देशाची सीमा चीनसारख्या अफाट लोकसंख्येच्या देशाला भिडलेली आहे.
भविष्यकाळात लष्करी दृष्टीने सुदृढ झालेला चीन रशियाच्या ह्या अफाट भूमीवर हक्क सांगणार, ह्याची रशियन लोकांना सुप्त जाणीव नक्कीच आहे. जगाच्या इतर भागांप्रमाणे इथेही चिनी पर्यटक मोठया संख्येने पोहोचले आहेत. परंतु त्यांच्याकडे काहीशा संशयित नजरेनेच बघितले जाते. रशियात भारतीय लोकांची प्रतिमा मात्र आपले मित्र अशीच आहे. अगदी छोटया गावातसुध्दा बॉलीवूडचे सिनेमे लोकांना आवडतात. सर्वसाधारण रशियन लोकांत इस्लामी दहशतवादाची भीती घर करून आहे. जागोजागी दहशतवादविरोधी पोस्टर्स आढळतात.
भारत व रशिया यांना जवळ आणणारे असे अनेक दुवे आहेत. भविष्यकाळात आपल्या अतिपूर्वेच्या प्रांतांना चीनचा धोका आहे, हे काही जाणकार उघडपणे बोलून दाखवतात.
येत्या काही वर्षांत अमेरिकेशी जवळीक साधताना राशियाशी असलेले आपले पारंपरिक संबंध जपण्याची तारेवरची कसरत आपल्याला करावीच लागेल. येऊ घातलेल्या नव्या शीतयुध्दात तथाकथित 'अलिप्त' भूमिका घेण्याच्या सोयीस्कर नीतीचा पर्याय आपल्याला नाही.