****मंदाकिनी गोडसे****
संघकार्यकर्त्यांसाठी असंख्य प्रेरक गीतं रचली गेली. त्यातून अनेक जण घरादारावर जुळशीपत्र ठेवून देशकार्यासाठी बाहेर पडले... या प्रेरणादायी गीतांचे रचयिते अनेक आहेत... संघातील प्रथेप्रमाणे त्यांची नावं कोणाला माहित नाहीत...गोडसे सर हे अशाच अनाम कवींपैकी एक...अर्पित होउनि जावे। विकसित व्हावे॥ ...हे त्यांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले गीत...जे अनेकांच्या जगण्याची प्रेरणा आहे.
एक संवेदनाशील कवी, कोमल मनाचा भावकवी, त्याच वेळी एक कणखर राष्ट्रसेवक, वज्रादपि कठोराणी वृत्तीचा, समाजासाठी कटिबध्द असूनही स्वतःसाठी विरक्त, उदासीन, प्रसिध्दिपराङ्मुख..असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत...त्यांच्या सहधर्मचारिणीने रेखाटलेलं हे उत्कट व्यक्तिचित्र..एका निष्ठावान संघ स्वयंसेवकाचं,अनेक पिढया घडविणाऱ्या एका संवेदनशील शिक्षकाचं आणि या दोन्ही पैलूंना झळाळी देणाऱ्या त्यांच्यातल्या प्रतिभावंत कवीचं...
''तुमचं आपलं बरं बाई - कपडयांचा खर्च कमी. सर काय हाफपँटच वापरतात नेहमी! ऐटी तर नाहीतच काही!''
घोळक्यातल्या बाईचे हे शब्द स्तुती होती की टिंगल.. मला समजत नव्हतं - तशी मीही नवीनच होते ना त्या मंडळीत.
त्या मोठया घरच्या गोतावळयात सारा लग्नमंडप भरून गेला होता आणि लग्नघटिका जवळ येत असूनही नवरदेव आत फार अस्वस्थ होता. त्याला खात्री होती - 'सर येणार, नक्की येणार. पण कुठे अडकलेत!
एवढयात सायकल बाहेरच लावून अर्धी खाकी चड्डी, इन केलेला शर्ट असे सर लग्नमंडपातल्या गर्दीतून वराचा शोध घेत आत आले आणि थोडयाच वेळात छान, दुटांगी, डौलदार धोतर नेसलेला नवरा मुलगा प्रसन्न वदनाने बोहल्यावर उभा राहिला.
सरांचं धोतर नेसणं होतंच तसं नेटकं सुंदर! स्वतः धुतलेलं शुभ्र धोतर, एकही सुरकुती नसलेला झब्बा.. शाळेत सणसमारंभात हाच पोशाख. एरवी अर्धी चड्डी.
''सर, तुम्ही फुलपँट घालू लागलात की पहिली पँट मी तुम्हाला शिवणार''
किती विद्यार्थ्यांनी, ते मोठे झाल्यावर त्यांना सांगितलं होतं. पण त्यांना ही संधी मिळाली नाही. त्यानी मात्र अनेकांना छान लफ्फेदार धोतर नेसवलं, नेसायला शिकवलं.
जून 1975.. देशात अणीबाणी जाहीर झाली. सारं राष्ट्र आंदोलनमय झालेलं. जनशक्तीला जाग आलेली. रोज नव्या नव्या बातम्या येत होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडसारख्या छोटया गावातही देशात काहीतरी विपरीत होत आहे, याची जाणीव लोकांना होऊ लागली होती.
12 फेब्रुवारी 1975. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वनभोजनाला घेऊन गेलेले आम्ही, दिवसभरानंतर सायंकाळी घरी परतलो होतो. एवढयात गावच्या पोलीस स्टेशनमधून पकड वॉरंट घेऊन एक अधिकारी व दोन पोलीस घरी आले.
घरी पोलीस.. हा तसा आमच्यासाठी नवखाच मामला! ''एका सज्जन बुध्दिमान शिक्षकाला अटक करीत आहोत'' हे सांगणंही खरं तर त्यांना अवघड वाटत होतं. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आलं. लगेच निघायचं होतं. पोलीस यांच्यासह बाहेर पडले. मला रडू फुटलं, तर साडेतीन वर्षांचा रवी धीटपणे म्हणाला, ''बाबा, तुम्ही भिऊ नका. आई, रडू नको, मी आहे ना!'' त्याच्या त्या उत्स्फूर्त बोलांनी सारेच भारावले.
आज नकळत मन कालपटाची पानं फडफडवत चाळीस वर्षं मागे गेलं आहे. मनाच्या कपाटातून अनेक आठवणी बाहेर येत आहेत. साडेतीन वर्षांचा छोटा मुलगा, दुसऱ्या अपत्याची चाहूल लागलेली, डोक्यावर नव्यानेच बांधलेल्या घराच्या कर्जाचा भार, तो थोडा हलका व्हावा म्हणून सांभाळलेल्या दोन म्हशी, वासरं, गोबर गॅस प्लँटसाठी केलेली सुरुवात, माझी पूर्ण वेळची शाळेची नोकरी!
किती कसोटी पाहणारे होते ते दिवस! पण किती हिम्मत दिली त्या प्रतिकूल परीस्थितीने! शरीरकष्टांना तर सीमाच नव्हती. आधी नाशिक जेल - घरातून बाहेर पडले ते थेट नाशिक, त्यानंतर ठाणे - राजबंदी क्रमांक 227, ठाणे मध्यवर्ती कारागृह.
'भारत माता की जय' असं सुरुवातीलाच सुंदर अक्षरात लिहिलेली, सेन्सॉरच्या रेघोटया ओढलेली अनेक पत्रं-कविता, कधी कुणाबरोबर दिलेली चिटोरी.. आज सारं माझ्यापुढे मांडून बसले आहे. पिवळे पडत चाललेले ते कागद जिवाभावाने जपून ठेवलेले! एका कालखंडाचे साक्षीदार!!
देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास वाचला होता. ब्रिटिशांची दडपशाही, अनेकांचा कारावास, अमानुष छळ, अनेकांची बलिदानं.. तो इतिहास वाचतानाही मन अनेकदा कासावीस व्हायचं. आणि आज या दुसऱ्या स्वातंत्र्यलढयाचा आपणही एक अल्पसा भागीदार झालेलो! हुकूमशाहीचा, दडपशाहीचा वरंवटा कसा असतो याचा अनुभव घेतो आहोत! खेडयातलं जीवन, वैद्यकीय सोयी नाहीत, घरी कुणाचा आधार नाही, या वेळी जिद्दीने घेतलेल्या शिक्षणाचा आणि ध्येयवादाने स्वीकारलेल्या शिक्षिकेच्या नोकरीचा मोठा आधार वाटला. कुणापुढे हात पसरावा लागला नाही. बाकी ताण असंख्य होते.
12 मे 1976. रात्री एकाएकी वारा वादळ सुरू झालं. समुद्रकाठचं गाव आमचं. सोसाटयाचे वारे, लाईट आधीच गेलेले. बाहेर म्हशींची वैरण भिजेल म्हणून मी काळजीत आणि एकाएकी पोटात दुखू लागलं. त्या प्रसववेदना आहेत हे लक्षात आलं. माझ्या विव्हळण्याने छोटा रवी जागा झाला. घाबरला, तरीही तो म्हणाला, ''आई, कंदील घेऊन आपण आपटे डॉक्टर काकांकडे जाऊ या. मी तुझ्यासोबत येतो. घाबरू नको.''
एरवी अंधाराला घाबरणाऱ्या त्या अजाण मुलाचे ते निष्पाप बोल आजही जसेच्या तसे आठवतात. माझी एकच प्रार्थना देवाला! देवा, थोडं उजाडू दे! रात्रीची अंधारात मी कुठे जाऊ?
कळा सोसत पहाट झाली. रवीला समजावून मी चालत दवाखाना गाठला. एकमेव सरकारी दवाखाना. बारा मैल दूर असलेल्या माहेरी आईला निरोप दिला. ती एका पायाने अधू. ती आली, तोवर रूपालीचा जन्म झालेला आणि इकडे रवीबाळाने सूतशेखर मात्रेची आख्खी मोठी गोळी सहाणेवर उगाळून मोठं भांडं भरून माझ्यासाठी औषध करून ठेवलं होतं.
तिकडे 'पॅरोल'साठी पुन्हा पुन्हा अर्ज करूनही यांना पॅरोल मिळाला नव्हता. जन्मानंतर दहा महिन्यांनी यांनी लेकीला पाहिलं. यांच्या सव्वा वर्षाच्या कारावासात मी एकदाही त्यांना भेटायला जाऊ शकले नव्हते. आईने मात्र वर्षभर माझ्यासोबत राहून मला बहुमोल साहाय्य केलं. अकराव्या दिवसापासून घरी आल्यावर म्हशीचं दूध काढण्यापासून, गोबर गॅस प्लँटचं काम पूर्ण करून घेऊन, त्यातलं शेण कालवण्यापर्यंत सर्व कामांचा भार मी पेलत होते. त्यात कोणीतरी कुठूनतरी 'चौकशी' करण्यासाठी येऊन टपकायचा!
आज देशभर स्थित्यंतर झालं आहे. परंतु दुसऱ्या स्वातंत्र्यलढयासाठी, लोकशाहीसाठी माझ्यासारख्या असंख्य भगिनींनी अनेक प्रकारचं योगदान दिलं आहे. न बोलता, तक्रार न करता! अनेक प्रकारचे चटके बसले. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. त्यातून काही जणी 'कणखर' झाल्या. पायाचे पत्थर होणं सुखाचं नसतं. अनेक बंधूंनी अविश्रांत वणवण केली. घरदार, आईवडील, मानमरातब, कौटुंबिक प्रेमपाश - सारे मोह टाळले. स्वतःचा विचार सदैव दूर ठेवला.

त्यातल्याच एका 'पत्थराची' मी अर्धांगिनी! वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांना या 'राष्ट्रीय प्रेमाची' बाधा झाली. कोवळया आयुष्यात भेटलेल्या या अद्भुत प्रभावी संघटनेने, राष्ट्रप्रेमाचे, त्यागाचे, विशुध्द आचरणाचे, विचारांचे असंख्य कार्यकर्ते घडवले.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून बी.ए. झाल्यावर, माझ्या एका खिशात सेंट्रल एक्साईज ऑफिसरच्या पदाचां नेमणूकपत्र होतं आणि दुसऱ्या खिशात देवगडच्या डॉ. टेंकशे सरांचं पत्र.. शाळेत संस्कृत शिक्षकाच्या पदावर रुजू होण्याचं! आर्थिक परिस्थिती बिकटच होती. अर्थार्जन अत्यावश्यक होतं. तरीही आतून कुणीतरी हाक दिली.. देशकार्य करायला दुसरं आमंत्रण अधिक पूरक आहे. खेडयापाडयात काम करण्याची गरज आहे.
कोल्हापुरात तोपर्यंत खासबाग मैदानावर सकाळीच जाऊन काही खोडसाळ लोकांनी मुद्दाम करून ठेवलेले प्रातर्विधी हातात दोन पत्रे घेऊन साफ करायचे आणि शाखा लावायची. किती चालणं! घरी जेवणापुरता आणि कॉलेजमध्ये लेक्चर्सपुरता. बाकी सर्व जनसंपर्क! कॉलेजची सर्व वर्षं अर्ध्या चड्डीत वावरणारा माझा नवरा क्वचितच कधी असे अनुभव सांगून जायचा.
पुण्याला ओबीसी कँप लागला. मुलांनी शिबिराला यावं म्हणून त्यांना तयार करणं, त्यांच्या आईबाबांना तयार करणं, त्यांची मानसिक तयारी करणं, गणवेशाची तयारी करणं.. असंख्य कामं. एक गरीब मुलगा असा भेटला, प्रवासखर्चही करणं त्याला अशक्य. सारीच वानवा दोघांकडेही. पण अर्ध्या चड्डीला कोणताच अडथळा अडवत नव्हता कोल्हापूर ते पुणे सायकल प्रवास.. त्या बालस्वयंसेवकाला डबलसीट घेऊन.. चंद्रप्रकाशात पहाटे सायकल दामटायला सुरुवात.. जिवाची बाजी लावून शिबिरात वेळेवर उपस्थित.
पुढे आयुष्यभर 'तिचीच' साथ! त्या दोन चाकांवरून हजारो किलोमीटर्स प्रवास झाला. देवगडला आल्यावर तर असंख्य दुर्गम गावात - जिथे पाऊलवाटा, घाटया, साकव, होडया, तरी याशिवाय त्या काळी मार्ग नव्हते! अशा ठिकाणी जाऊन पोहोचायचं. कधी होडीतून, तर नदीत वाळूचा बांध पडला असला तर खांद्यावरूनही सायकल वाहून न्यायची.
मार्गी होत्या लाख आपदा, पण ध्येयावरची दृष्टी कधी ढळली नाही. पंचावन्न वर्षापूर्वीचा तो काळ. कोकण खूपच मागे. भौतिक सोयीना पूर्ण वंचित. शिक्षणाच्या सोयी नाहीत, रस्ते नाहीत, आर्थिक ओढगस्त.. अशा वेळी मुलांच्या घरोघरी जाणं, त्यांना धीर देणं.. आज असंख्य विद्यार्थी भारावून सांगतात, ''शालेय वयात गोडसे सर भेटले नसते, तर आज आम्ही कुणीच नसतो.'' मी यांना खूपदा म्हणत असे, ''मी तुमच्या आयुष्यात आलेय खरी, पण तुमची खरी 'सखी' ती सायकल!'' दर रविवारी दोन-तीन तास त्या सायकलीचं तेलपाणी करून घासून पुसून तय्यार करून ठेवायची... पुढचा आठवडाभर पळवण्यासाठी!
वयाच्या पस्तिशीत त्यांनी विवाहाचा विचार केला, तोही आईवडिलांचा विचार करून. मला कधी माहीत नाही यांनी माझ्यासाठी कधी फुलांचा गजरा आणला, सणावारी साडी घेतली - दागिने हा विषय तर दूरच होता - कधी फिरायला, मौजमजा करायला गेलो. मी काव्यवेडी, निसर्गप्रेमी. यांच्या लखलखीत गुणवत्तेचा आदर करणारी. भक्तिभाव असलेली. पण ती सारी 'गुणवत्ता' फार उच्च ध्येयांसाठी 'समर्पित' होती, हे मला कसं कळावं?
'अर्पित होऊनी जावे...
विकसित व्हावे' हा तिचा पिंड होता.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात लिहिलेल्या अनेकांना प्रेरणा देणाऱ्या त्या अत्यंत भावस्पर्शी गीताचा कागद - साधा वहीचा कागद आता माझ्या पुढयात आहे.
'देशार्थ होईल त्यागी विरागी
होईल संक्रांत तेव्हा खरी..'
त्यांचीच रचना ही. त्यामुळे कित्येक सणांना हे घरात नसायचेच!
वणवण करून, सायकल दामटून दमूनभागून घरी आल्यावर हे बघता बघता झोपी जात. जेवणात ना आवडीनिवडी... ना खास फर्माइशी... खूपशी वर्ष खानावळीतच अन्न वाटयाला आलेलं.
नाकारू कशाला? खूपदा मी चिडत होते. वैफल्य येत होतं. निराशेने काळवंडून जायला होत होतं. नोकरी, घरकाम यात स्वतःला गुंतवून घेत होते. घरातलं वातावरण, मामंजी-सासूबाई, कडक शिस्त.. मला समजतच नव्हतं. मी कविवृत्तीची. कविता सुचणारी. निसर्गवेडी. अत्यंत प्रतिकूलतेत असंख्य अडचणींना तोंड देत, केवळ मेरिट स्कॉलरशिपवर जिद्दीने पदवीधर झालेली. साहित्याची रसिक चाहती. पण मला 'कविता' कुठे भेटतच नव्हती. हे रसायन काही वेगळंच होतं. माहेरहून आणलेल्या ट्रंकेच्या तळाशी असलेली माझी कवितांची डायरी बाहेर काढण्याचं धाडसही करू शकत नव्हते. मग कविता एकत्र वाचणं, त्यांचा आनंद घेणं कुठलं? अनेक वर्षं मी माझ्यातल्या कवियत्रीला दडपूनच ठेवलं! संसारात आपण फार गुंतून जाऊ असं वाटून हे असे अलिप्त वागत होते का? पण कोणाच्या विवाहप्रसंगी, वास्तुशांत-मुंज वगैरे प्रसंगी पाकिटाबरोबर देण्यासाठी ''चार ओळी लिहून द्या ना!'' म्हणून मी आर्जवून सांगत असे. हे त्यावर काहीच बोलत नसत. पण ऐन वेळी, कानामात्रेचाही बदल करावा न लागणाऱ्या अगदी सार्थ ओळी एकाद्या कागदावर तर कधी बसच्या तिकिटावरसुध्दा उमटायच्या -
सद्भावांचे सुंदर मंदिर
इथे उभे हे एक नवे घर!
वास्तु नवी ही शाश्वत व्हावी
व्यथितांचा आधार बनावी
भावफुले ही फुलत रहावी
सुगंध जावा सतत घरोघर!
किंवा -
नव्या घराने जुना वारसा।
नव्या दमाने नित्य जाणावा।
नव्या पिढीने जुन्या पिढीप्रत।
कृतज्ञतेचा मंत्र जपावा॥
अशासारख्या उत्स्फूर्तपणे स्फुरलेल्या त्या ओळी माझं मन आनंदाने भरून टाकीत. मग हळूच एकदा चांगला पेपर, स्केच पेन्स वगैरे पुढे करीत मी म्हणे...
''आता हे जरा देण्याजोगं करून द्या नं'' आणि मग त्याच सहजतेने सुरेख वलयं, पानं, फुलं मुक्तहस्ताने रेखीत त्यात त्या ओळी सजून जायच्या.
अशा शुभेच्छांच्या अनेक भेटी, अनेकांनी आपल्या त्या त्या कार्यक्रमांच्या आल्बममध्ये जपून ठेवलेल्या आहेत आणि त्या स्वतःच्या शुभेच्छा पत्रातही वापरल्या आहेत.
मला वाटतं 1963 साल असावं. मी तेव्हा रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये विद्यार्थिनी म्हणून वसतिगृहात राहत होते. आमच्या कॉलेजच्या क्रीडांगणावर अटलबिहारींची जाहीर सभा होती. सारं मैदान लोकांनी खचाखच भरून गेलं होतं.
आणि सभेच्या सुरवातीलाच दूरवरून खणखणीत भावगर्भ सूर आले.
'कालगतीहून बलवत्तर ही पौरुषशाली मनें।
याच मनांच्या अमित बलावर लाख झुंजवू रणें॥'
फक्त काही क्षणच ते शब्द, ते स्वर, तो सूर ऐकून सर्वांच्या अंगावर सरसरून काटा आला. मलाच नव्हे, तर त्या विशाल जनसमुदायाला तो स्वर असा जाऊन भिडला! त्या शब्दसुरांची ताकदच विलक्षण होती!
मला माहीत नव्हतं हा स्वर, हे शब्द कोणाचे आहेत. असंख्य लोकानाही माहीत नव्हतं. पण तो आवाज मात्र मनाला जाऊन भिडला होता.
पुढे खूप वर्षांनी कळलं की ते शब्द, तो सूर, तो स्वर.. पुढे आपला जीवनसाथी झालेल्या गोडसे सरांचेच होते. एवढंच नव्हे, नंतर त्या आठवणीचा उत्तरार्धही त्यानी सांगितला -
- हे गीत संपताच अटलजींनी ''वाह कविराज, आपने तो कमाल कर दिया।'' म्हणत यांना स्वतःजवळ बसवून घेतलं आणि आपल्या खिशाचं पेन या तरुण स्वयंसेवक-कवी-गायकाच्या खिशाला लावलं!

ही आठवण यानी इतक्या सहजपणानं सांगितली.. मी कळवळून म्हटलं, ''केवढा हा सन्मान! अहो, थोडं मिरवा तरी.. किती सुंदर गुणसंपदा देवाने तुम्हाला दिली आहे. सुंदर रूप, सुंदर स्वर, सुंदर हस्ताक्षर, उत्तम ड्रॉईंग, सखोल ज्ञान, आगळी शब्दकळा, बरवे कवित्व...
थोडा गर्व करावा, मिरवावं! मुद्देसूद नेटकं वक्तृत्व हे तर तुमचं वैशिष्टय!
खरं तर कुठल्या कुठे पोहोचला असतात तुम्ही या गुणांच्या बळावर! पण...?''
हा 'पण' काय असतो? तो कुणाला कुठे थांबवतो? हा प्रश्न मला नेहमीच पडायचा. पण एकदा असंच साध्या वहीच्या जुनाट कागदावर लिहिलेलं सुंदर अक्षरातलं यांचं हे गीत हाती आलं आणि या प्रश्नांचं.... 'पण'चं उत्तरही मिळालं. ते गीत -
अर्पित होउनि जावे। विकसित व्हावे॥
परिसरातल्या अणुरेणूतुन। अविरत वेचुनि तेजाचे कण।
रसगंधांशी समरस होऊन। हृदयकमल फुलवावे॥1॥
सुंदर मी परि नच शोभेस्तव। जनहितहेतुक मम बलवैभव।
समष्टिसाठी सकलहि सौष्ठव। हे नित हृदयि धरावे॥2॥
दीप असें मी उजळाया तम। असे जाणुनी होऊनि निर्मम।
कणकण देउनि जळता क्षणभर। आसमंत उजळावे॥3॥
रूप, रंग वा असो गंधही। यातिल मासे काहिच नाही।
श्रेयाचा मज नको लेशही। निर्माल्यात विरावे॥
.... अर्पित व्हावे...॥4॥
'ठाणे मध्यवर्ती कारागृह' हे या गीताचं जन्मस्थान! जन्माला येतानाच सुंदर, भावमधुर चाल घेऊन आलेलं हे गीत अनेकांना भावलं, अनेकांना प्रेरणा देणारं झालं. अनेकांच्या लेखांचं ते शीर्षकगीत झालं. अनेक जण त्यावर भरभरून बोलले. पण या गीताच्या जन्मदात्याचं नाव कुणालाच माहीत नव्हतं.
त्या मूळ गीताचा कागद आता माझ्यासमोर आहे. त्याचा स्पर्श, त्या मागची भावना, त्यानुसार जगणारा माझा जोडीदार.. त्याचं अस्तित्व मी अनुभवते आहे. 'ठाणे मध्यवर्ती कारागृह 1976'
अनेक राष्ट्रभक्तांच्या नशिबी तुरुंगवास आला. असीम मनोधैर्यावर त्यानी तो सत्कारणी लावला. व्यक्तिगत दुःखांना कवटाळून, गोंजारत न बसता उत्तम साहित्यनिर्मिती केली.
कारागृहात लिहिलेल्या अशा अनेक अर्थपूर्ण, व्याकरणशुध्द, कधी प्रासंगिक कवितांचे कागद माझ्यासमोर आहेत.
विवाहाने बायकांना अनेक भौतिक सुखं मिळतात. समृध्दी मिळते. मला काय मिळालं? लौकिक अर्थाने काहीच नाही. उलट साध्या साध्या गोष्टीतलेही अनेक अपेक्षाभंगच!
पण याचं असं एखादं गीत, त्यामागची तपस्या, त्यांनी स्वीकारलेल्या कटंकमय मार्गावरचा प्रवास, हे सारं अनपेक्षीतपणे समोर येतं, मनाला जाणवू लागतं, तेव्हा साऱ्या खंती, साऱ्या तक्रारी, सारे सल कुठल्याकुठे विरून जातात.
अशी यांची अनेक गीतं! त्याखाली नाव नाही, गाव नाही, तारीख? वार? काळाच्या पटावर यांच्या नोंदी कशा राहणार? केलेल्या कामाच्या.. अविरत भ्रमंतीच्या.. पेरलेल्या विचारांच्या.. भोगलेल्या कष्टांच्या.. घडवलेल्या जीवनांच्या.. व्यक्तिगत त्यागाच्या.. तपस्येच्या.. अनेक गोष्टी... घटना.
कालांतराने कागद विस्मृतीत जातील, पण त्यामागचा शुध्द भाव, प्रेरणा, चैतन्य, राष्ट्रप्रेम?
नासिक रोड कारागृहात असताना 'गुढीपाडवा' आला. वर्षारंभ! सरांना गीत स्फुरले. साऱ्यांनी तेथे ते गायिले.
घराघरावर गुढी डोलते।
पराक्रमाची साक्ष सांगते।
बलोपासना घेऊनिया व्रत।
तेजोमय हे करिता जीवित।
या राष्ट्रास्तव सतत कार्यरत।
विजिगीषेने पौरुष खुलते।
याच शक्तिचा देण्या अनुभव
इथे जन्मले केशव, माधव
क्षणाक्षणाला अद्भुत अभिनव
कंठामधुनी गीत लहरते॥
मूळ गीतातल्या या काही ओळी.
एक बरं होतं. कारागृहात कैदी, बंदी झालेले अनेक जण आत एकमेकांना भेटू शकत होते. चर्चा, कार्यक्रम, व्याख्यानं चालू होती. विशेष म्हणजे त्यात संघाशिवायचेही अनेक संघटनांचे कार्यकर्ते होते. विचारांची देवाणघेवाण होत होती. सरांच्या अभ्यासू, चिंतनशील, उत्तम मुद्देसूद वक्तृत्वाला तिथे खूपच मोठा श्रोतृवर्ग मिळाला होता.
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे अ.भा.वि.प.चे विद्यार्थी कार्यकर्ते समोर बसून मनःपूर्वक हे विचारामृत प्राशन करीत होते.
तिथे यांच्या कलाकौशल्यालाही निवांत वेळ मिळाला होता. सुंदर रेखाटनं करावीत.. साबणाच्या वडयांवर सुरेख कोरीवकाम करून अनेकांना त्यांनी त्या भेट दिल्या.
बागकाम करावे. स्वयंभू प्रतिभेलाही अंकुर फुटावेत आणि मजेदार कवितांनीही जन्म घ्यावा.
तेथे काही जण बागकामही करीत. त्यातूनच सुचलेली सरांची ही थोडी वेगळी कविता -
केव्हातरी बागेवरी, फुलतील गुलाबी मखमली।
सध्यातरी वाटेवरी या साचलेल्या दलदली॥
अरविंद आणि सतीश हे श्रमती इथे आवर्जुनी।
दत्ता कदम ओठीवरी सोडीत आज्ञा गर्जुनी ॥
प्रा. कोलते हे सुचविती बहुरम्य नीटस योजना।
अन तेच निर्माते असे भासे पहा इतरेजना॥
तोटीस पाईप जोडुनी पाटात पाणी खेळले।
भरपूर ओलित जाहले नाही उन्हाने वाळले॥
हे खर्चता पाणी असे खिडकीतुनी पाहील तर।
होईल चिंतामग्न भारी ठा.न.पा.चा मेंबर॥
मोठी इथे झाडे नको हा जेलरांचा कायदा।
खुरटीच ठेवा रोपटी वाढून नाही फायदा॥
ही हॉलवाल्यांची फुले कैसे पटावे खोल्यांस हे।
केले कुणी, नेले कुणी झगडा असा चलता रहे॥
अन रामपारी येऊनी फडके-निवासी चोरटे।
नेतील खुडुनी ही फुले मग व्यर्थता सारी पटे॥
येतील जेव्हा ती फुले पळवीन मी ती तोडुनी।
हा बेत घोळू लागला गुल्कंद-बोधांच्या मनी॥
पण बाग ही फुलण्याअधी 'सय्यद' सुटोनी जाइल।
त्याच्या श्रमांची याद का कोणास येथे राहील?॥
पूर्ण एक वर्ष तीन महिने घरादारापासून दूर जेलमध्ये असलेल्या माझ्या पतीला मी एकदाही भेटायला जाऊ शकत नाही. छोटया मुलांची, घराची नोकरीची जबाबदारी एकटीने पेलताना दमछाक होत होती. आधार फक्त होता आईचा!
सणावारी अनेकदा डोळयातून कसलाच बंध न पाळता अश्रू वाहू लागायचे. आधीच हळवं असलेलं मन अधिकच हळवं व्हायचं, व्याकूळ व्हायचं. तेव्हांच्या स्वातंत्रलढयाच्या हकीगती वाचल्या होत्या. पण ती तळमळ, ते बंदिवास.. त्याविषयी आत्मीयतेनं वाचलेलं फक्त. पण या दुसऱ्या लढयात ती तळमळ अल्पांशाने का होईना, मी अनुभवली, सोसली.. तशीच त्यांनीही तिकडे ती सोसली. ठाणे कारागृहातून शुभेच्छा आल्या -
जरी मी घरात नाही
तरि अंतरात आहे।
तव दीप अंतरीचा
मज साथ देत आहे॥
घरटयात आपुल्या तू
कर साजरी दिवाळी।
रात्रीतूनी पहाटे
उगवे नवी नव्हाळी॥
एक संवेदनाशील कवी, कोमल मनाचा भावकवी, त्याच वेळी एक कणखर राष्ट्रसेवक, वज्रादपि कठोराणी वृत्तीचा, समाजासाठी कटिबध्द असूनही स्वतःसाठी विरक्त, उदासीन, प्रसिध्दिपराङ्मुख..
सुरुवातीला मला खूपदा राग यायचा. पावलोपावली अपेक्षाभंग व्हायचे. रडू यायचं. तशी मला या संघाबद्दल थोडीशी माहिती होती. राष्ट्र सेविका समितीच्या कामाची थोडी ओळख होती. शिबिराला गेले होते. पण या कार्यात पुरुषवर्ग इतका झोकून देतो, समर्पित होतो, हे यांच्याशी विवाह झाल्यानंतरच लक्षात येऊ लागलं. अवघड होतं समजून घेणं! काही गोष्टी पटतही नव्हत्या. खूप दिवस विमनस्कतेत गेले. लग्न झाल्यावर काहीच दिवसात माझ्या भावाच्या विवाहासाठी आम्ही कोल्हापूरला गेलो. पहिलाच एकत्र प्रवास. रस्त्यात पावलोपावली यांना कुणी ना कुणी भेटतं होतं. त्यांच्याशी बोलताना मी बरोबरच आहे याचं त्यांना भानही नव्हतं. उभं राहून, चालून माझे पाय भरून आले होते. मला एक साडी घ्यायची होती. खूप वेळाने मी हळूच तो विषय काढला. तेव्हा महाद्वार रोडवरचं गोखल्यांचं साडीचं दुकान दाखवून त्यांनी मला 'तिथे जाऊन साडी घे' म्हणून सांगितलं आणि आपण कुणा स्वयंसेवकबंधूला भेटायला गेले. मी नवखी! साडी न घेताच मी मुक्कामी परत गेले. अशा किती गोष्टी..
मला एकदा एका विद्यार्थ्याने एक सुंदर डायरी भेट दिली. मी यांना म्हटलं, ''पहिल्या पानावर काही छान लिहून द्या ना!'' यांनी श्लोक लिहून दिला. सुंदर अक्षरात -
अर्थानाम् अर्जने दुःखम् । दुःखम् तेषां विसर्जने ।
आये दुःखम् , व्यये दुःखम् । किमर्थ अर्थसच्छयः ॥
अणीबाणीत जेलमध्ये असताना कुणी भेटायला गेलेल्या गृहस्थांबरोबर यांनी घरी एक भेट पाठवली. त्यात साबणाच्या वडीवर चाकूने कोरून अप्रतिम कोरीवकाम केलेल्या दोन वडया होत्या. त्याखाली एक कागदाची घडी होती. मला वाटलं पॅकिंगसाठीचा कागद असेल. नंतर केव्हातरी मी तो कागद काढला, तर त्यात एक सुंदर दीर्घकाव्य होतं. तेही हिंदीत लिहिलेलं -
'ए जवाहरकी शहेजादी ।
तू काहेकी समाजवादी ॥
हिंदीतली यांची एक प्रदीर्घ कविता. खरं तर हिंदी ते जेलमध्येच शिकले. कॅरम शिकले जेलमध्ये. नॉनस्टॉप पाचशे सूर्यनमस्कार घालण्याबद्दल त्यांना 'ज्ञानेश्वरी' बक्षीस मिळाली.
'नमस्ते सदा वत्सले हिंदुभूमे' या प्रार्थनेवर ठाण्याच्या जेलमध्ये ते पूर्ण एक महिना दररोज बोलत होते. व्याख्यान देत होते. त्याला प्रत्येक शब्दाची सार्थता, त्याचे विवरण करणारी ती फार उद्धोधक भाषणं होती. आजही कुणी कुणी त्याची आठवणी काढतात. त्याच्या टिपणांचे हे कागदच मला सांगतात की ती किती अभ्यासपूर्ण असतील.
घरी कधी गप्पाटप्पा, एरवी इतरांना मनोरंजक वाटणारे विषय चघळणं, गावगप्पा, स्वतःविषयी काही बोलणं-सांगणं नसायचंच. स्वभावही नव्हता आणि वेळही नव्हता. जेलमधल्या भाषणांचे, गीतांचे हे कागद परतताना मला वाटतं एकोणचाळीस वर्षांच्या आमच्या सहजीवनातही मला न सापडलेल्या अशा अनेक अमोलिक गोष्टी हरवून गेल्या असतील. खूपदा यांचा मितभाषीपण, प्रसिध्दिविन्मुखता मला दोष वाटायचे. अलिप्तपणा सलत राहायचा.
*****
कुठला तरी आदिवासी भागातला एक मुलगा यांच्या बराकीत स्थानबध्द होता. सर सारखं काय वाचतात, काय लिहितात याचं त्याला कुतूहल वाटायचं. तो सारखा यांच्याभोवतीच असायचा. तुम्ही काय लिहिता, मला सांगता? असा हट्ट त्याने केला. तेव्हा यांनी घरी लिहिलेलं पत्र त्याला वाचून दाखवलं. तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, ''किती छान लिहिलं आहे तुम्ही! मलाही घरची आठवण येते. मलाही पत्र पाठवायचं आहे.''
''मग लिही नं.. मी तुला आंतर्देशीय पत्र देतो, तू लिहून काढ.''
''नको, सर तुम्हीच लिहून द्या.'' त्याचा आग्रह.
मग त्याच्या घरची सर्व माहिती विचारून घेऊन यांनी त्याला एक छान मजकुराचा कागद लिहून दिला. वाचूनही दाखवला. कोरं पत्र दिलं आणि ''आता तू हा मजकूर तुझ्या अक्षरात लिही'' म्हणून सांगितलं.
दोन दिवसांनी तो लिहिलेलं पत्र घेऊन आला. ''हं, आता वाचून दाखव.'' हे म्हणाले.
''सर, तुम्ही वाचा. मला वाचता येत नाही.''
हे चकित झाले. ''अरे, तुला वाचता येत नाही, तर मग लिहिलंस कसं?''
''तुमची अक्षरं बघून मी तश्शी या कागदावर काढली.'' हे आश्चर्याने थक्क झाले. सारा मजकूर त्या पत्राप्रमाणे नीटनेटकेपणाने त्या मुलाने जसाच्या तसा उतरवला होता. पण त्यातलं एक अक्षरही त्याला वाचता येत नव्हतं.
जेलमधल्या चौदा महिन्यांच्या कालातील असे असंख्य प्रसंग! प्रसंगपरत्वे कधीकधी हे सांगायचे.
''तुम्ही या सर्व आठवणी लिहून काढा. शब्दबध्द करा. प्रसिध्दी म्हणून नव्हे, तर हा इतिहास आहे. आपल्या मुलांसाठी, अनेकांसाठी.. हा एक दस्तावेज आहे.'' पण यांनी काही ते मनावर घेतलं नाही.
आज वाटतं, अनेक वर्षांची या संघटनेतील अगणित लोकांची वाटचाल, त्यांचा सर्मपणभाव, त्याग, जिद्द, निखळ ध्येयवाद आणि त्याचबरोबर त्यांच्या कुंटुंबीयांचाही त्यात असलेला सहभाग जगाला ज्ञात व्हावा. 'अर्धी चड्डी' हा हिणवून उल्लेख करण्याची कोणाची हिंमतच होणार नाही. कुठलाही बदल, क्रांती ही अशा असंख्यांच्या मनोबलातून आणि त्याग-तपस्येतूनच होत असते. पणती पणती तेवते, जळते, तेव्हाच 'स्वयंसेवक ते पंतप्रधान' ही वाट प्रकाशमान होते. ही वाटचाल प्रदीर्घ असते. अनेकांनी त्याला प्रकाश पुरवलेला असतो.
जेलमध्ये असताना होळी पौर्णिमा झाली. अशाच साध्या कागदावर पेन्सिलीने लिहिलेल्या सरांच्या कवितेतल्या काही ओळी.
सगळं जग एक'स्टेज आहे आमच्याभोवती 'केज' आहे.
लुच्चे स्वार्थी राजे बनले आमच्या माथी तुरुंग आहे.
याद राखा! इथे कोंडलेला एकेक माणूस 'सुरुंग' आहे.
क्रांतिनाटय घडत आहे. जनतेची झोप उडते आहे.
या नात्यात आमचा 'पार्ट' 'पार्ट' नाही, 'होल' आहे.
काव्य थोडं मोठं आहे, पण त्याचं मोल अनमोल आहे. ते मुळातूनच वाचायला हवं. त्याचा एक पार्ट फक्त दिला आहे.
बिकट वाट वळणांची ही सतत चालताना
तत्त्व आणि वास्तवतेचा मेळ घालताना
सरळपण मनाचे माझ्या त्यातुनी टिकावे॥
अशी विशुध्द विचारधारा लिहिणारे गोडसे सर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकेच विशुध्द आचरण करीत होते. देशाचा माथा उन्नत करणारे, देश वैभवाला पोहोचवणारे तरुण निर्माण व्हावेत म्हणून झटत होते.
असे 'दिवाने' अनेक असतील. त्यांना भूक-तृषेचे भान नव्हते ध्येयाचीही एक जबरदस्त नशा असते. मी ऐन तारुण्यात ती पाहिली आहे. संबंध दिवसाचे कामकाज करून शाळा सुटल्यावर संध्याकाळी मातीच्या रस्त्याने वीस किलोमीटर सायकल चालवीत ते कुणी आजारी विद्यार्थ्याला औषध पोहोचवायला जायचे. कित्येक मुलांच्या घरी त्यांच्या केंबळयाच्या घरात पत्रावळीवर डाळभात जेवायचे. कसलाही भेदभाव न मानता. प्रसंगी त्याच्या आईबाबांनाही त्यांनी साहाय्य केले. मुंबईला इंटरव्ह्यूला जायला चांगला शर्ट नाही म्हणून खंतावलेल्या विद्यार्थ्याला स्वतःच्या अंगातला शर्ट काढून देणारे, वर्गात शिस्तीसाठी कठोर असणारे पण बाहेर त्यांच्याशी पाठच्या भावाप्रमाणे, मित्रत्वाने वागणारे, तत्वासाठी फायद्याचा विचार न करता वनवास पत्करणारे, कुणाविषयी कधीही एकही वावगा शब्द न येता आपला विषय उत्तमपणे मांडणारे, समर्थ रामदास, नामदेव, तुकाराम विवेकानंद आदींवर अभ्यासपूर्ण लेखन आणि व्याखाने देणारे गोडसे सर अनेकांच्या स्मरणात ठसलेले आहेत.
'जय जय रघुवीर समर्थ' ही त्यांची लेखमाला स्थानिक साप्ताहिकात प्रसिध्द होत होती. खूप जणांना ती भावली. रत्नागिरी आकाशवाणीवरून कित्येक दिवस त्यांचे संस्कृत वार्तापत्र प्रक्षेपित होत होते. 'अथा तो शब्द जिज्ञासा' - चित्पावनी बोलीचा अभ्यास, संस्कृत स्तोत्रांचे मराठी रूपांतर.. बहुआयामी अशी प्रतिभा त्यांना लाभली होती. संस्कृतमध्ये काव्य करण्याचे, संवाद करण्याचे प्रभुत्व होते.
घरचे व्याप कमी म्हणून की काय, अणीबाणीतल्या यांच्या जेलवासात मी इकडे माझं एम.ए.चं रजिस्ट्रेशन केलं. जेलमध्ये किती दिवस राहावे लागेल याचा काहीच थांगपत्ता तेव्हा लागत नव्हता. तिकडे त्यांनीही विद्यापीठाशी संपर्क साधून एम.ए.चा अभ्यास सुरू केला. मग माझ्यामागे आणखीनच एक व्याप लागला. पुस्तकं मिळवून त्यांच्याकडे पाठवायची. त्यांनी अभ्यास चालूच ठेवला. सुटून आल्यावर परीक्षा दिल्या आणि प्रथम वर्ग मिळवला. एक वर्षाच्या अंतराने मलाही. परीक्षा देऊन फर्स्ट क्लास मिळवता आला. त्या अवघड काळातली ही शैक्षणिक प्रगती विशेष होती. कसोटीची होती. ज्ञानार्जनाची तळमळच ती करू शकली. हे मुलांचे लाड करत नाहीत, त्यांना अभ्यासाला बसवत नाहीत, वेळ देत नाहीत या चारचौघींसारख्या माझ्याही तक्रारी असत.
''त्याना सुखाने शिकू दे'' हे यांचे या सर्व तक्रारींवरचे उत्तर असे. रवींद्र देवगडसारख्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून एस.एस.सी.ला बोर्डात एकोणतिसावा आला. पुढे आय.आय.टी. पवईला सिलेक्ट झाला.
''हे तुझ्या आईचं श्रेय'' म्हणून त्यांनी मला मोठेपणा दिला आणि खरोखरच मुलांच्या ऐन शिक्षणाच्या काळात हे घरापासून लांब होते. अणीबाणीत जन्मलेल्या (12 मे 1976) रूपालीने मला अगदी गर्भवासापासून खूपच सोबत केली. ती मुलगी नाही, तर माझी जिवाभावाची मैत्रीण झाली. हुशार, हरहुन्नरी, कलानिपुण विनम्र अशी रुपाली बारावीला बोर्डात 10वी आली. रिझल्ट लागले, तेव्हा ती आणि मी देवगडला नव्हतो. पुढील अभ्यासक्रमांच्या चौकशींसाठी पुण्याला गेलो होतो. हे एकटेच घरी होते. साऱ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करीत होते. एवढयात कुणी एक मित्राचा मुलगा पुण्यालाच जायला निघाला होता. आमच्याकडे त्या वेळी फोन वगैरे काहीच नव्हते. यांनी चटकन कागदावर रिझल्ट लिहिला आणि सोबत उत्स्फृर्त ओळी
तो निरोप येता कानी
आभाळ ठेंगणे झाले।
इवलेसे 'रुपडे' माझे
बोर्डात दहावे आले॥
नाचलो गरगरा फिरलो
गाण्याच्या घेत लकेरी।
बागेत फुलांच्या भवती
तालात मारली फेरी॥
चातुर्य, कला, उद्योग,
आधीच इथे जमलेले।
जोडिता नवे यश आता
चांदणे सुगंधी जाले॥

31 मे 93चा तो कागद मला आजही सांगतो आहे.. एक सहृदय पिता याहून अधिक लाड काय करणार? पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून रूपाली सकाळच्या पुण्याला 'साप्ताहिक सकाळ' विभागात काम करू लागली. सकाळी 7च्या बातम्या आकाशवाणीवरून देऊ लागली. थोरामोठयांच्या मुलाखती घेऊ लागली. तिची प्रगतीची विस्तारक्षेत्रं वाढत असताना आम्ही सुखावत होतो.
हे एकदा पुण्याला गेले असताना रूपालीला सहज म्हणाले, ''मला 'पुलं'ना भेटायचं आहे एकदा. बघ तुला जमलं तर..!'' रूपाली हरहुन्नरी. तिने सुनीताबाईंना फोन लावला. त्या नाहीच म्हणाल्या. मग रूपालीने चिकटीने फक्त दहा मिनिटांची वेळ मागून घेतली. एकतर्फी नुसती भेट ठरली होती ती. 'पुलं' त्या वेळी कंपवाताने आजारी होते.
ही दोघं ठरल्या वेळी पुलंकडे गेली. प्राथमिक बोलणं झालं. रूपाली म्हणाली, ''माझे बाबा कवी आहेत. गातातसुध्दा!'' पुलं 'ऐकवा' म्हणाले, यांचा स्वर लागला आणि यांनी आपली नवीन कविता गायिली.
परतीर दिसू लागाला विसाव्यासाठी
घर एक बांधु या आठवणींच्या काठी!
तारुण्य ओसरे विरले स्वप्नमहाल ।
वास्तवी निमाले अद्भुत मायाजाल ।
देतील दिलासा अनुबंधांच्या गाठी ॥ घर एक...
संघर्ष संपले आता नुरला त्वेष ।
मन निवले आता हवा कशाला जोष ?
र्_ईष्येत धावणे आता कशाच्या पाठी? घर एक ...
जे दिले घेतले भले बुरे जे केले ।
भोवरे वादले शमली वणवे विझले ।
तेल-वात उरली आता समईसाठी ॥ घर एक....
शर्यती नको अन् नको अता हव्यास ।
सौजन्यावरती फक्त हवा विश्वास।
'या बसा' असावे शब्द शेवटी ओठी ।
घर एक बांधु या आठवणींच्या काठी ॥
पुलंचा चेहरा उजळून निघाला होता. सुनीताबाईही ऐकत होत्या. पुलंनी यांना जवळ बोलावून घेतलं. यांचा हात आपल्या कंपित हातात धरून ठेवला आणि म्हणाले, ''अजून एक.'' यांनी आपली आणखी एक कविता ऐकवली. सुनीताबाई एकदम मोकळेपणी बोलू लागल्या. दहा मिनिटांची ठरलेली भेट चाळीस मिनिटांवर गेली. रूपालीने डोळे भरून तो सोहळा पाहिला आणि नंतर मला मन भरून सांगितला. यांची पुणे सकाळमधली सुभाषितं वाचून पुण्यातले साठ वर्षांपूर्वीचे यांचे विद्यार्थी यांना शोधण्यासाठी सकाळ ऑफिसमध्ये आले. यांचा पत्ता शोधून काढला आणि यांना भेटण्याचा परमानंद त्यांनी अनुभवला. त्या वेळी सरांनी त्यांना लिहिलेली सुंदर पत्रंही त्यांनी सोबत आणली होती. माणसं काय काय जपतात!
जेलमध्ये तर काही जण आपल्या नोकरीधंद्याची पर्वा न करता भेटायला येतच होते.
मार्च 1977.. देशात निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पुढे विस्मय वाटावा असे निवडणुकांचे निकाला जाहीर होत होते.
राजबंद्यांची सुटका झाली होती. ठाणे मध्यवर्ती कारागृहाबाहेर यांचे अनेक विद्यार्थी हार आणि कार घेऊन उभे होते. ''सर, तुम्हाला कुठे कोणाला भेटायचं आहे सांगा. आम्ही तुमच्यासाठी वेळ मोकळा ठेवलेला आहे.''
यांचा धाकटा भाऊ दिल्लीला एअर फोर्समध्ये स्क्वॉड्रन लीडर होता. सैन्यदलात असल्याने सव्वा वर्षात त्याच्याशी कसलाही संपर्क ठेवता आलेला नव्हता. आई-बाबा त्या वेळी त्याच्याकडेच होते. पहिल्यांदाच या मुलाकडे ते गेले होतो. सुटकेनंतर त्यांना भेटायला हे दिल्लीला गेले. जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं होतं. कारागृहात यांच्याबरोबर श्रीयुत रवींद्र वर्माही होते. आताच्या जनता सरकारमध्ये ते गृहमंत्री झाले होते.
हे त्यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेले. बाहेर खूप माणसं त्यांना भेटायला वेटिंग रूममध्ये बसली होती. यांनी एका कागदावर आपलं नाव लिहून तो तिथल्या कर्मचाऱ्याबरोबर आत पाठवला.
ते नाव वाचलं मात्र, वर्माजी स्वतः खुर्चीतून उठून यांना न्यायला केबिनच्या दारापर्यंत आले. हाताला धरून खुर्चीत बसवलं. गप्पागोष्टी झाल्या. जेलमध्ये यांची व्याख्यानं, गीतं त्यांनी ऐकली होती.
''गोडसेजी, बताइये.. मै आपकी क्या सेवा करूँ?''
''सेवा? नही, नही। मै सिर्फ आपसे मिलने के लिए आया हूँ।''
''अरे, कुछ माँगो तो.. मै आपको दे सकता हूँ।'' यांनी विनम्रपणे हात जोडले. साऱ्या स्थित्यंतरानंतरचा तो आनंद अपूर्व होता.
''मुंबईत एकदा फ्लॅट नाही का मागून घ्यायचा सवलतीत!''
ही हकिगत ऐकल्यावर इकडे कुणीतरी म्हणाले, तेव्हा हे फक्त हसले.
समाजसेवेच्या मार्गावर
आज टाकले पहिले पाऊल
दूर कुठेतरी अज्ञातातून
यशस्वितेची लागे चाहूल!
अशी सुरुवातीची सरांची कविता
परस्परांचे विचार घेऊन।
प्रयत्नमार्गी पाऊल रोवून।
श्रध्देसंगे बुध्दी जोडून।
उभे करू हे सिध्द मनोबल॥
ध्येय धरुनिया अभंग निश्चल! अशा आंत रिफ
ऊर्जेने वाटचाल करणाऱ्यांची ही जमात -
समाज माझा मीहि तयाचा।
जाणिव घेई ठाव मनाचा।
आज जरी तम भवती दिसते।
समोर परी उजेळ अरुणाचला॥
असा आशावाद अभंग ठेवणारा! हा फक्त काव्यापुरता नव्हता. खूपदा यांना मी छेडीत असे, रागावत असे. वयातलं, विचारातल अंतर होतंच ना! आता मला ती माझीच अपरिपक्वता, पोरकटपणा वाटतो. तेव्हा मात्र त्रास व्हायचा, हे खरं!
सर रागीट होते. पण तो राग आततायी नव्हता. त्याला वैचारिकतेची जोड होती. त्यामुळेच उठणारे तरंग विध्वंसक नव्हते. एकादी गोष्ट नाही म्हणजे नाही यावर ते सदैव पक्के असत. कधीकधी मला तो 'अतिरेक'ही वाटायचा. त्यामुळे काही माणसंही दुखवायची. हळूहळू लेखनमार्गावर माझ्याही पदमुद्रा उमटू लागल्या. विवाहानंतर वीस-बावीस वर्षांनी ट्रंकेच्या तळाशी असलेली कवितांची डायरी मी वर काढली. कथेचा फॉर्मही सापडू लागला. 1990 ते 2004 या दरम्यान अनेक दिवाळी अंकांतून माझ्या कथा प्रसिध्द झाल्या. नामवंत संपादकांची पत्र येऊ लागली. यांनाही त्याविषयी कुठेतरी जाणवू लागलं. उघड कौतुक करण्याचा पिंड नव्हता.
पण दिवसभर नोकरी, घरकाम, सारं सांभाळून मध्यरात्री एकटीच मी कोऱ्या कागदांच्या हाकांना साद देत होते. पुस्तकं प्रसिध्दी ह्या गोष्टी दूरच होत्या. त्याही पूर्वी यांच्या काही कविता एकत्र करून मी साहित्य संस्कृती मंडळाकडे पाठवल्या होत्या. पण तिथे त्या पडून राहिल्या. कारण कोणी 'जाणता' मर्मज्ञ नव्हता. पुढे बऱ्याच वर्षांनी तो 'भावलेणी' नावाने असिध्द झाला. पण त्यांची मांडणी, चित्रं यांना मुळीच आवडली नाहीत. स्वतः कलावंत असल्याने ते नाराजच झाले.
तरीही त्यामुळे न दुखवता आता खूपदा मला ते विचारू लागले, ''तुझं काही फेअर करायचं असलं तर दे.'' मी सुचेल तेव्हा मनातलं भराभर कागदावर उतरवीत गेलेली असायची. मी शाळेत गेले की हे अत्यंत सुंदर अक्षरात व्याकरणशुध्द, नेटकं असं ते सारं कॉपी करून ठेवायचे. माझे डोळे भरून यायचे, वाटे - असेच ठेवावेत हे कागद.. कुठे पाठवूच नयेत. त्यांच्या उपस्थितीत माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशनांचे सोहळेही झाले. कधी कुणा नवोदिताच्या कविता तपासायला यायच्या, कुणी चित्पावनी बोलीचं व्याकरण विचारायचा, कधी मालवणी बोलीत हे सुंदर कविता लिहायचे, कोणी कधी संस्कृतच्या अभ्यासासाठी भगवद्गीतेचे पाठांतर करण्यासाठी यायचे.. जे करायचे, द्यायचे ते उत्तम. दुसरा शब्द नाही. हेळसांड, थातूरमातूर काही नाही. शाळेत असताना तर दर वर्षी संमेलनात नवीन स्वागतगीत, ईशस्तवन तालस्वरंासह सादर! स्वतः बासरी, हार्मोनियम वाजवायचे. पूर्वी घोषपथकात सहभाग होताच. जिल्ह्याचे शारीरिक प्रमुख, बौध्दिक प्रमुख म्हणून काम केलेलं होतं. कणकवळीला झालेल्या एका राज्यस्तरीय शिक्षक संमेलनात सरांनी साडेसातशे विद्यार्थ्यांचं एक सामूहिक, स्वरचित पद्य इतकं सुंदर बसवलं होतं..
सूत्रधार तू विश्वाचा तुझे द्त आम्ही।
अन्य आस नाही चित्ती, रमू तुझ्या कामी॥
गिरी दऱ्या सागर सरिता, रम्य भूप्रदेश।
जिथे तिथे काहीतरि तू निर्मिसी विशेष।
शिल्पकार तू विश्वाचा तुझे हात आम्ही (1) अन्य आस ...
नभःपटावरती खुलती सूर्य चंद्र तारे।
क्षितिजधरे वरि वर्णांचे मांडिसी पसारे।
चित्रकार तू विश्वाचा, तुझे रंग आम्ही -- (2) अन्य ...
नित्य निर्झरांची गाणी खळाळता कानी।
वेणुवनी वीणासंगे विहगवृंद - वाणी।
गीतकार तू विश्वाचा, तुझे सूर आम्ही ... ॥3॥
असं ते गीत सर्वांवर आपला ठसा उमटवून गेलं. कागद कसा वापरावा, पेन कसं धरावं, पुस्तक कसं वाचावं, बोलावं कसं, विशेषणं कुठे कशी वापरावीत, कपडयाची घडी कशी करावी, जेवावं कसं? शब्दांचे उच्चार कसे करावेत इतक्या बारीकसारीक गोष्टी ते सहज सांगून जायचे. काही बाबतीत ते हट्टी होते. श्रध्दा होती, पण अवडंबर नव्हतं.
ईश्वरा स्वप्नास या तू वास्तवी आकार दे।
शिल्प हे घडवावया अमु्च्या करी सामर्थ्य दे॥
त्यांचीच प्रार्थना!
पुत्र मातीचे आम्ही, मातीत राबावे सुखे।
कष्टता आनंद वाटे, कार्य होवो नेटके।
धावण्याची आस पोटी आणि ओठी गीत दे।
ही त्या प्रार्थनेचा ध्यास होता.
विसरून अपुले अवघे मीपण
मंगल परमेश्वर चिरवन्दन॥
अशी विनम्रता होती.
नागपूरच्या योगाभ्यासी मंडळाचे संस्थापक परमपूज्य योगमहर्षी जर्नादनस्वामी यांचे सख्खे काका. अनेक विद्यात पारंगत. योगप्रसारासाठी आयुष्य वेचणारे. अनेकांचे मार्गदर्शक, अयाचित संन्यांसी, अनेक सांसारिक लोकांना मोलाचे मार्गदर्शन देणारे. नागपूरला त्यांच्या पुण्यतिथीला आम्ही गेलो होतो. सर तेथे म्हणाले. ''मीही खरा याच मार्गाने जायचा, पण वाट थोडी वेगळी झाली. मला फार लहान वयात संघ भेटला. मी त्यात दंग झालो.''
नव्या युगातील परमेशाचे अभिनव हे वरदान
तयाचे नाव असे विज्ञान!
विज्ञानाचे आणि कलेचे।
क्षेत्र वेगळे तरी जवळचे।
करुनी पोषण परस्परांचे।
समर्थतेने उभ्या जविना देतिल नव परिमाण ॥
अशा प्रगत विचारधाराही त्यांच्या कवितेत उतरते.
माणूस कितीही गुणी असला, तरी त्याच्या आयुष्याची वाट सरळ, साधी, सोपी असतेच असं नाही. मार्गात अनेक संकटं आली. हितशत्रू भेटले, स्वार्थी, लुबाडणारे, उपयोग करून घेणारे.. पण सर कुणाला दूषणं देत बसले नाहीत. अगदी परमावधीचे आघात झाले, तरीही त्यांची स्थिर वृत्ती ढळली नाही. हा एक आसाधारण पैलू होता. मी व्याकूळ होणारी, कोसळणारी, रडणारी.. पण आजही एकटेपणात आधार वाटावा अशी त्यांची एक कविता माझ्यासमोर आहे.
अंधार साराच दाटे सभोती।
परी मी न आशा मुळी सोडली॥
अमर व्हावीत अशी सुंदर गीतं सरांनी अनेक प्रसंगी लिहिली. त्यांची प्रतिभा बहुप्रसव नव्हती. पण लिहायचे तेव्हा ते अगदी सहजस्फूर्त आणि बलशाली असायचं. त्यात कानामात्रेचाही बदल करावा लागत नसे. शिवरायांच्या राज्यारोहण समारंभाला तीनशे वर्षं झाली. विजयदुर्गावर त्रिशतसांवत्सरिक महोत्सव होता. सरांनी अत्यंत ओजस्वी अशी एक संगीतिका लिहिली..
ऐका हो.... तुटले परदास्याचे बंध
धूम.... धडाड.... धूम.. हो रायगडावर नाद .... (2)
त्या संगीतिकेतील सात-आठ गाणी स्वरबध्द करून इथल्या गुणवान लोकांनी सादर केली. शिवरायंाचा परक्रम, चातुर्य, रणनीती, स्वराज्यप्रेम.. सारं सांर त्या गीतात उतरलं आहे.
किल्ल्यांचे वळले दिल्लीकडे दरवाजे।
जणु शिवरायांची इच्छा त्यांना उमजे।
ते दूर न आता उरले काश्मिर सिंध!
धूम धडाड् ... !
आमच्या शाळेत गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव व्हायचा. त्या वेळीही अशीच एक सुंदर संगीतिका स्वरबध्द, शब्दबध्द झाली.
मथुरेच्या बंदीत अवतरे अनुपम सौख्यनिदान
जन्मले जगमोहन भगवान।
कंस, देवकी, वासुदेव, गोप.. साऱ्यांच्या मुखातून उमटणारी ही श्रीकृष्णजीवनाचे सार सांगणारी संगीतिका अप्रतिम आहे.
लोकमान्यांसाठी त्यांनी लिहिलेलं गीत तर एक ऊर्जस्वल 'मार्चिंग साँग' व्हावं असं आहे.
दुदुंभि दणाणती, तुतारी भेरी वाजती
धन्य धन्य लोकमान्य, दशदिशाही गर्जती।
स्वतंत्र जाहलो आम्ही पुष्य हे तुझे असे।
नाही तू जरी इथे स्मृती तुझी मनीवसे॥
राष्ट्र अर्जुनास तू जाहलास सारथी....॥
गीत मोठं आहे. या अशा अर्थपूर्ण रचना खूप मोठया प्रमाणात सर्वदूर पोहोचाव्यात असं मला वाटायचं. वेळोवेळी अशा अनेक रचना झाल्या. त्यानाही माहीत नसेल आपण किती लिहिलं.. ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न मुद्दाम होऊन त्यांनी कधी केले नाहित. प्रसिध्दिपराड्ःमुखता अनेकदा कलेला मारक ठरते. तरीही वाटतं, योग्य गोष्टींचा योग्य सन्मान व्हायलाच हवा. आपल्यासाठीच नव्हे, तर समाजासाठीही त्याची गरज असते. सत्कार्यांना प्रेरणा त्यातूनच मिळते. मी खूप वेळा म्हणत असे, ''तुम्हाला एक जबरदस्त व्यसन आहे. ते म्हणजे 'निर्व्यसनी' असण्याचं! अतिउच्च विचार करण्याचं!
देवाने दिलेल्या अनेक सुंदर गोष्टींच्या बळावर तुम्ही कुठल्या कुठे जाऊन पोहोचला असता! सभोवती पाहा - काही विशेष गुणवत्ता नसतानाही माणसं कशी भाव खात असतात. मातीच झाली ना तुमच्या साऱ्या गुणांची, साऱ्या गुणांची?''
या माझ्या बोलण्यावर सर सहजपणाने म्हणाले, 'या मातीतूनच सारं रुजतं ना! तसेच अनेक गुणवंत रुजतील, वाढतील, मायभूचे पांग फेडतील, समाजाला उन्नत करतील! तसे ते रुजावेत म्हणून माती सकसच असायला हवी!''
विसरुनी अपुले अवघे मीपण।
मंगल परमेशा चिर वन्दन॥
नववर्णांची निरुपम काया।
सप्तसुरांची सुमधुर माया।
तुझीच म्हणुनी तुझिया पाया।
होऊनि नतमस्तक करू अर्पण॥
असं स्वतःच्या कवितेतच नव्हे, तर जीवनातही आचरणाऱ्या जोडीदाराजवळ मी कसला त्रागा करणार?
सरांनी विद्यार्थ्यांच्या जगात अनेकविध प्रकल्प राबवले. परिसरातल्या पायी सहली, सायकलवरून सहली, अनेकविध शिबिरं, श्रुतलेखन, हस्ताक्षर, वाचन, उच्चारण यासाठीचे प्रकल्प.. त्या काळात आजच्यासारखी विद्यार्थ्यांना चारी वाटांनी ज्ञान मिळण्याच्या सोयी नव्हत्या. कित्येकांची आर्थिक स्थितीही अगदी जेमतेम असे. दूरवरून पायी चालत शाळेला यावं लागे. अशा वेळी निरपेक्षपणे त्यांच्यासाठी केलेलं थोडं काही अगदी उमेद देणारं, धीर देणारं असे. घरी जाऊन चौकशी करणारे, चुकत असला तर कान पकडणारे, चुकांचे परिणाम समजावून सांगणारे गोडसे सर मुलांना खूप आधार वाटायचे. आज जेव्हा मोठे झालेले, आयुष्यात विविध तऱ्हांना सामोरे जाणारे विद्यार्थी भेटायला येतात, तेव्हा कळतं - सरांनी खरंच या मातीत काय पेरलं होतं.
मीही बँकेतली नोकरी सोडून ध्येयवादाने शिक्षिका झालेली होते. सरांना पूरक असंच काम, घर सांभाळून करत होते.
आवडत्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात मला काही ना काही उल्लेखनीय करता येत होतं. वाचन हा आवडता छंद होताच. दोन वर्षं एम.एड.चा अभ्यास करून शैक्षणिक क्षेत्रातली मास्टर्स डिग्री चांगल्या गुणांना प्राप्त केली.
रवींद्र आधी शिक्षण (आय.आय.टी. पवई), नंतर बडोदा, दिल्ली, मुंबई, बेंगलोर असा दूरच असायचा. रूपालीही आपल्या कार्यक्षेत्रात रमली होती.
देवगडला आम्ही दोघंच. मोठं घर, आवार, बाग.. सर 92 सालीच निवृत्त झाले होते. त्यांना आता मोकळा वेळ होता.
माझ्या कथा, ललित लेख, मुलांसाठीचं वाङ्मय बऱ्यापैकी प्रसिध्द होत होतं. आकाशवाणी रत्नागिरीवर अनेकदा भाषण, कथा, कविता प्रक्षेपित करायची संधी मिळत होती. श्री. मधु मंगेश कर्णिकांनी स्थापन केलेल्या 'कोकण मराठी साहित्य परिषदेच्या देवगड शाखेची मी अध्यक्ष होते. आमचा देवगड तालुका अनेक नामवंत साहित्यिकांची जन्मभूमी. आम्ही 'लेखकाच्या गावी - त्याचे साहित्यिक श्राध्द' अशा तऱ्हेचे सुंदर कार्यक्रम आखले. त्या त्या गावातील सर्वाना गावकऱ्यांना एकत्र करून, त्या लेखकाच्या नातेवाइकांना आमंत्रित करून त्यांच्या साहित्याच्या आढावा घेणारे सुंदर कार्यक्रम सादर केले. या कामी मला यांची खूपच मदत झाली. नेटके आणि दर्जेदार कार्यक्रम होण्यात यांची भूमिका महत्त्वाची होती.
मला सभा-संमेलनाला जायचं असायचं. शैक्षणिक उपक्रम तर होतेच. आता मी कुठे गेले की स्वयंपाकघरात पूर्वी कधीच न डोकावणारे सर चहा करून घेऊन लागले. कुकर लावायला शिकले. नामस्मरण, बागकाम तर होतंच.
पतीपत्नीच्या नात्याचं खरं उन्नयन मला वाटतं आयुष्याचं उत्तरायण सुरू झाल्यावरच होतं. व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे थोडे मृदू होऊन ते नातं समजूतदारपणाच्या, खऱ्याखुऱ्या साहचर्याच्या परिपक्व अवस्थेवर येऊन स्थिरावतं. फक्त तोपर्यंत दम धरावा लागतो. कुणाला एकाला थोडी अधिक पड खावी लागते. माझ्या 'आभाळपक्षी' कथासंग्रहाला पुणे साहित्य परिषदेचा दि.बा. मोकाशी पुरस्कार मिळाला. नांदेडचा डॉ. प्रसाद बन पुरस्कार, इचलकरंजीच्या आपटे ग्रंथालयाचा आशाताई सौंदत्तीकर पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा वि.सी. गुर्जर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, धर्मभास्करचा पुरस्कार असं बरंच नाव झालं. सरांनी त्याची दखल घेतली. संघाचे लोक स्वतःच्या कार्यकर्तृत्वाविषयी फार अभिमानी आणि महिलांच्या बाबतीत बरीचशी उपेक्षाच करणारे असतात, या माझ्या तक्रारीचा सूर आता नरम होऊ लागला होता.
1996ला मला आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार मिळाला. 1998ला राज्य पुरस्कार मिळाला. रवींद्र, रूपाली, हे स्वतः, माझे काही विद्यार्थी, संस्थेचे लोक यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात तो पुरस्कार स्वीकारताना मला आनंद झालाच. पण मला मात्र मनोमन वाटत राहिलं की हा सन्मान खरा सरांचा व्हायला हवा होता. तेच खरे सर्वार्थाने या सन्मानाला अधिक पात्र आहेत.
मध्यंतरी मुलांचे विवाह, त्यांच्या संसाराची सुरुवात, माझी शाळा, गृहस्थाश्रमातली काही कर्तव्यं पार पाडण्यात गेली. घरच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या. बाकी व्याप होतेच. आता थोडं निवांत जगण्याचा विचार, आवडत्या गोष्टीना अधिक वेळ देण्याचा विचार करीत होते...
परंतु दैव काही वेगळंच चिंतीत होतं. 1998मध्ये रूपालीचा विवाह झाला. तिचं आवडतं पुणं! तिला तिथेच राहणारा साथी मिळाला. तिची साप्ताहिक सकाळमधली नोकरी, आकाशवाणी सारं ठीक चाललं होतं. 7 जून 2002.. तिला पहिलं कन्यारत्न झालं. त्याचदरम्यान मीही सेवानिवृत्त झाले. आम्ही आजी-आजोबा झालो. आनंद होणाऱ्या गोष्टी होत्या.
पण सव्वा वर्षाने तिला स्तनामध्ये गाठ आली. जावयांचं ऑफिसही मुंबईला गेलं. सतत कशात ना कशात व्यग्र असणाऱ्या तिला... त्या गाठीचं चुकीचं निदान झालं. तज्ज्ञ डॉक्टरांनी ''त्या' मिल्क ग्लँड्स' आहेत, आपोआप जातील'' सांगितलं. मॅमोग्राफीचे रिपोट्र्स नॉर्मल आले... आणि तरीही कन्सरने आपले मृत्युपाश तिच्याभोवती टाकायला सुरुवात केली आणि आमची सुरू झाली एक झुंज....
मी तिच्यासोबत पुण्याला. सर घरी एकटे! सव्वा वर्षांची छोटी सई! कधी हॉस्पिटलची पायरीही न चढलेल्या आम्ही दोघी, धैर्याने साऱ्या प्रसंगाना सामोऱ्या जात होतो. ''मी बरी होणार. आई, तू काळजी करू नको... तू तुझ्या लेखनाला वेळ दे! मला तुझी तीच ओळख जास्त आवडते!'' म्हणून ती एवढीशी पोर मला धीर देत होती. हे मध्ये केव्हातरी भेटायला यायचे.
प्रयत्नांची शर्थ चालू होती.. सर्जरी, केमोज, रेडिएशन...
अत्यंत उत्साही, कार्यक्षम, बुध्दिमान, लाघवी अशी ती मुलगी.. मला लेखनासाठी सतत प्रेरणा देणारी, माझ्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात उत्साहाने वावरणारी, कुणाच्याही मदतीला तत्परतेने पुढे जाणारी...
एक वर्ष आठ महिने अत्यंत धैर्याने ती या दुखण्याशी झुंजत होती. सर्व दाहक उपायातून जात होती. प्रभूकुंजमध्ये जाऊन लताबाईंची एक प्रदीर्घ मुलाखत घेऊन तिने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उद्धाटनाच्या वेळी साप्ताहिक सकाळसाठी लेख लिहिला होता. आणखीही अनेक कव्हर स्टोरीज, नामवंतांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
त्याच रुग्णालयात वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी, तीन वर्षांच्या सईला मागे ठेवून तिने अखेरचा श्वास घेतला. 29 ऑगस्ट 2005.. हे वर्ष आम्हाला घायाळ करून गेलं. हा आघात आमच्यासाठी जीवघेणा होता. आम्ही कोलमडून गेलो.... सारं भग्न वाटू लागलं.
सर आधीच अबोल. स्वतःच्या व्यथा कधी कुणाला न सांगणारे. आम्ही जगत होतो, पण त्यातला सारा रसच सुकून गेला होता.
रूपालीच्या आठवणी, तिचं साहित्य, कविता सारं गोळा करून ते शब्दांकित करण्यात मी माझा दुःखभार हलका करू पाहत होते. 'प्रिय रूपा' म्हणून हाकारत ते मी पूर्ण केलं.
सर मात्र -
'तू नको वाकून पाहू... दुःख माझे खोल आहे.
तू नको समजूत घालू, शब्द येथे फोल आहे!' म्हणत - आतल्या आत आक्रंदत होते.
तुझ्या हरपल्या व्यक्तित्वाचा
क्षणाक्षणाला वेध नवा।
हृदय मारिते असंख्य हाका
एकतरी प्रतिसाद हवा॥
काळाच्या त्या पडद्यामागुनि।
बघ डोकावून जरा तरी।
मोरपिसासम शब्द तुझा तो।
जरा फिरू दे मनावरी॥
त्यांचे हे शब्द, सारे उमाळे फोल ठरवणारं हे दुःख! या दुःखाने खूप खोल जखमा केल्या उभयतांना! कधीच बऱ्या न होणाऱ्या! आजही ते सारे शब्द माझ्या अश्रूत न्हाऊन निघतात. माझी मुलगी नव्हे, तर जिवाभावाची मैत्रीण होती ती!
आधीच कारावासाचा परिणाम यांच्या प्रकृतीवर झाला होताच. त्यानंतरही काही विपरीत घटना घडल्याच. तरुण वयात केलेली अखंड वणवण! संघकार्यासाठी केलेला हजारो किलोमिटर्सचा सायकल प्रवास आणि आता गुणी मुलीचं अकाली जाणं... सरांची प्रकृती खालावतच चालली. बाकी कोणताही आजार नव्हता. स्मरणशक्ती उत्तम होती. ताप, डोकेदुखी, पोटदुखी, रक्तदाब, मधुमेह यातलं काहीही नाही. फक्त थोडे अधिक श्रम झाले की धाप लागायची. ऑक्सिजन घेण्याची फुप्फुसांची क्षमता कमी झाली होती.
सर मौजमजेसाठी कधी फिरलेच नव्हते.
अंदमानला जाऊन एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीला वंदन करून येण्याची आस होती. आमचा घरचा ग्रांथसंग्राह खूप मोठा आहे. अनेक उत्तमोत्तम पुस्तकं सर्वांनीच वाचलेली. सावरकरांचे सर्व वाङ्मय हृदयात ठसलेलं.
2007मध्ये 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात 'भारतभ्रमण' या प्रवासी संस्थेमार्फत आम्ही चैन्नईमार्गे अंदमानला गेलो. अंदमानला गेलो, पण तिथे त्याना त्रास वाटू लागला. पाऊसही खूप होता. अशक्तपणा आला होता. ट्रेनचा प्रवास, ए.सी. डबा यांचाही त्रास झाला.
सर्वांनीच त्यांची काळजी घेतली.
स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीत आम्ही सर्व जण जमलो होतो. सर्वांनी स्वातंत्र्यदेवीचं स्तोत्र गायिलं.
'हे मातृभूमी तुजला मन वाहियेले
तेथे मला संपूर्ण कविता म्हणता आली कधीकाळी वाचलेली असूनही!
यांनी त्या कोठडीतच बसून खिशातल्या कागदावर सुंदर अक्षरात आपलं मन शब्दांकित केलं.
तो वीर विनायक जिथे राहिला होता।
त्या पायरीवरी आज टेकितो माथा।
अणुरेणू इथले घेऊ उरात भरून।
आठवू तयाच्या पराक्रमाची गाथा।
तत्शतांश तरी हातून करावे काही।
इतुकेही आम्हां अजुनी जमले नाही।
खङ्गासम तुमची वाणी तळपत होती।
एकेक शब्द तो अमुची भगवद्गीता॥
बहुधा हेच त्यांचे शेवटचे गीत असावे. आम्ही त्या ओळी मोठयाने वाचल्या... ''हे मातृभूमी तुजला मन वाहिले'' म्हणणाऱ्या त्या थोर कवी-देशभक्ताशी तशाच दुसऱ्या कवीची भेट होत होती. तिथल्या भिंतीनाही ते समजत होतं. सोबतच्या सर्वांनी, मन लावून मी कथन करीत असलेली 'काळया पाण्याची' कथा ऐकली, 'सागरा प्राण तळमळला', 'जयोस्तुते'चं गान केलं. ती चिमुकली कोठडी... तिचा कणकण भावविभोर झाला आहे, असंच आम्हांला वाटत होतं.
त्यानंतर सव्वा वर्षं हे चिरंजीव रवींद्रकडेच राहिले. डॉक्टरांनी कसलीही दगदग करायला मनाई केली होती. 2008च्या डिसेंबरला आम्ही देवगडला आलो.
'सर घरी आले' या बातमीनेच आमच्या घरासमोर मंदिरासारख्या लोकांच्या रांगा लागल्या. सर्वांशी बोलून, विचारपूस करून हेही खूपच उत्साहित झाले. जानेवारी वीसशे नऊ झालं. 11 जानेवारीला संरांना 75 वर्षे पूर्ण होणार! गावच्या लोकांनी 14 जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी त्यांचा सत्कार करायचा, असं ठरवलं.
परंतु तो सत्कार स्वीकारायलाही सर राहिले नाहीत. 13 जानेवारीलाच सायंकाळीच रवींद्र आणि मी जवळ असतानाच यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशार्थ होशिल त्यागी विरागी,
होईल संक्रांत तेव्हा खरी।
सरांचंच गीत - 'श्रेयाचा मज नको लेशही' म्हणणारे सर अखेरच्या सत्काराआधीच गेले. त्यांच्या शोकसभेतली ही उचित प्रतिक्रिया! ''गावातला अखेरचा विद्वान हरपला. कुठल्याही क्षेत्रातली काही शंका आली तर ती कोणाला विचारणार आता?'' अशी हळहळ साऱ्यांनाच व्यक्त केली.
यांच्या जाण्याने पुन्हा एकदा मी विरहव्यथांच्या भोवऱ्यात सापडले. आता डोळे पुसणारं कुणी नव्हतं. मुलगा दूर बंगलोरला. आपल्याकडे येण्याचा त्याचा आग्रह. पण हे घर!....
आम्ही उभयतांनी जिवाचं रान करून उभं केलेलं. सगळं तरुण वय त्याचं कज फेडण्यात, विविध कामं, शरीरकष्ट करण्यात घालवलेलं. इथल्या असंख्य आठवणी, सरांनी स्वतः सुतारकाम शिकून केलेल्या वस्तू, फुलझाडं, मुलांचे जन्म, त्यांचं बालपण, शिक्षण... काळीजकुपीतल्या इथल्या साऱ्या सुखदुःखांच्या आठवणी सोबत घेऊन मी इथेच राहिले. सर माझे पती होते. पण त्याआधी ते माझे गुरू होते आणि आयुष्यभर मी त्यांना गुरुस्थानीच मानलं!
आणि त्यांनीही ज्यांना 'परमोच्च गुरू' मानलं, ते त्यांचे सख्खे काका परमपूज्य जनार्दनस्वामी - ज्यांचा सहवास त्यांना लहानपणी लाभला, आमच्या विवाहाला आशीर्वाद द्यायला ते स्वतः नागपूरहून देवगडला आले होते, त्यांनी आपलं सारं जीवन, आपली काया लोकांसाठी, त्यांना योगाभ्यासातून आरोग्यदायी जीवन प्राप्त करून देण्यासाठी उपयोगात आणली, त्यांच्या जीवनाची - विशेषतः आमच्या मूळ गाव कवठी-कुडाळ परिसरातल्या कोकणभूमीसाठी माहिती व्हावी, म्हणून लेखनाला सुरुवात केली. त्यातूनच 'एका योगियाची कहाणी' पुस्तकरूपात आली. नागपूरला योगाभ्यासी मंडळाच्या आश्रमात आठ दिवस राहता आलं.
संसाराच्या रामरगाडयातही सरांचे अनेक कागद मी जिवाभावाने जपून ठेवलेत. जेलमधली पत्रं, अनेकांना दिलेल्या काव्यमय शुभेच्छा.. त्यातल्या काही माझ्या पाहण्यातही आलेल्या नसतील. सुरुवातीची कवितांची वही तर कुणी वाचायला नेली ती परत दिलीच नाही. त्या वेळी मी त्यांच्या आयुष्यात आलेली नव्हते ना!
आज एकटं राहत असताना, खूपदा एकाकीपणाने जीव गुदमरू लागतो. मन सैरभैर होतं. उदासीनता घेरून येते. अणीबाणीने तेव्हा लोकांना भांबावून टाकलं होतं. कधीकधी वाटतं -
देशातली त्या वेळची अणीबाणी, देशात शिस्तबध्दता आणण्याच्या, राष्ट्रप्रेमाच्या विशुध्द हेतूने आणली गेली असती, तर खूप काही चांगलं घडलंही असतं. सरसकट सर्वांची धरपकड करून, त्यांना अमर्याद कालासाठी तुरुंगात डांबून सर्व स्वातंत्र्यांचा संकोच करून 'मेरा भारत महान' होऊ शकला नाही. राज्य करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे, हेच पुन्हा एकदा सिध्द झालं. तुरुंगातील लोकांचं मनोधैर्य, भूमिगत राहून जनमत तयार करणाऱ्यांचे परिश्रम, सेन्सॉरशी मुकाबला करणाऱ्यांचं, लोकशाही जपणाऱ्या साऱ्यांचंच हे ध्रुवीकरण होऊ शकतं, याचा प्रत्यय आला.
माझ्यासारख्या अनेकींना या अणीबाणीने कणखर बनवलं. कौटुंबिक परीघाच्या बाहेर जाऊन विचार करायला प्रवृत्त केलं. आमच्या ऐन तारुण्यातली सत्तरीच्या दशकातली ही एक अभूतपूर्व घटना होती. आता चाळीस वर्षं उलटून गेली आहेत. यातली अनेक कार्यकर्ती माणसं काळाच्या पडद्याआड गेली आहेत. पण एक नक्की खरं आहे की, माणसं जातात तेव्हा त्यांच्याबरोबर सारंच काही संपून जात नाही. गुणी माणसं मागे खूप काही ठेवून जातात.
माझ्या पुढयातली ही पत्रं.. कवितांचे, गीतांचे हे जीर्ण कागद, त्यावरच्या सुंदर अक्षरातल्या विशुध्द बाव जागवणाऱ्या, अर्थगर्भ ओळी माझ्या सोबतीला येतात. स्नेहल लोचनांनी कुणीतरी आपली सोबत करीत आहे असं वाटतं. ही सोबत माझ्यासाठी अमूल्य ठेव आहे.
'हॅरी बेलफॉन्ट' नावाच्या गायकाचा एक सवाल पुन्हा पुन्हा आठवतो.
''गायकाला तुरुंगात डांबता येईल, पण गीताला तुरुंगात कसे डांबणार?''
सेन्सॉरच्या कचाटयातून यांची काही पत्रं घरापर्यंत आलीच नाहीत. आली, त्यावर कितीतरी उभ्या आडव्या रेघोटया मारलेल्या असायच्या. पण अग्राभागी मनातले झळाळणारे भाव, 'भारत माता की जय' या उद्धोषणेवर कुणालाच फुली मारता आलेली नव्हती. आज एकाकीपणाच्या, मध्यरात्रीसुध्दा या विचारांचं बल, उमेद देतं.
सरांच्याच ओळी पुन्हा मनःपटलावर उमटू लागतात. एका ध्येयवादी शिक्षकाची, समर्पित स्वयंसेवकाची, एका निर्मळ, विशुध्द विचारांच्या देशभक्त नागरिकाची ऊर्जस्वल कविता आणखीही कोणीतरी समजून घ्यावी असं वाटू लागतं. घायाळ मनाला कुणीतरी सावरायला येतं. मार्ग सुचवतं. तीही यांची कविताच असते.
अंधार साराच दाटे सभोती
परी मी न आशा मुळी सोडली।
तमा भेदुनी पार जाईल ऐशी
मला दृष्टी माझ्या गुरूंनी दिली॥
कराया निघालो, भले माणसांचे
मनी क्षुद्र हेतू मुळीही नसे।
नसे मी महात्मा, तसा ना दुरात्मा
परी अंतरी शुध्द आत्मा वसे॥
दिले नेमुनी हे मला कार्य ज्याने
असे ठाम विश्वास त्याच्यावरी।
कधी कोसळे हे मनोधैर्य माझे
तरी धीर देऊन तो सावरी॥
हे विचारधन जतन करावं, 'अर्पित होऊनि जावे, विकसित व्हावे' म्हणताना, हे गुरुऋण मनात दाटून येतं.
'श्रेयाचा मज नको लेशही, निर्माल्यात विरावे' अशीच विचारधारा जगणारा माझा 'अर्धी चड्डीवाला जीवनसाथी!' या विचारधारेची शब्दपूजा बांधताना हेच मनात येतं - माझ्यासाठी हे निर्माल्यच शिरोधार्य आहे!
- 09421264008