मराठवाडयात परिवर्तनाचे वारे वाहू लागले

06 Dec 2016 13:44:00

मराठवाडयातील जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतील 28 पालिकांच्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या वर्चस्वाला हादरे बसले आहेत. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या पारंपरिक मतपेटया आजच्या घडीला थोडया सरकत आहेत, पण ते एक मोठे वेगळे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. मात्र भाजपा-सेनेच्या राजकीय वर्तुळातील समीकरणेदेखील बदलत चालली आहेत आणि ती नक्कीच या सर्व परिस्थितीमध्ये मराठवाडयातील शहरांचा चेहरामोहरा बदलणारी ठरतील.
राठवाडयातील जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतील 28 पालिकांच्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या वर्चस्वाला हादरे बसले आहेत. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. मात्र अधिक सजगता, स्पष्टता, आक्रमक भूमिका घेऊन जमिनीवरील कार्यकर्ते जोडले नसल्यामुळे तुलनेत भाजपच्या वाटयाला कमी यश मिळाले आहे, शिवसेनेच्या राजकीय खेळींचा परभणी जिल्ह्यातील राजकारणात पक्षाला तात्पुरता उपयोग झाला, तर उस्मानाबादमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. मात्र एकंदरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आणि काँग्रेसचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे.

जालना पालिकेच्या निवडणुकीत भाजपा-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून नगरसेवकपदासाठी लढले. मात्र नगराध्यक्षपद भाजपाकडून घेऊन शिवसेनेने अक्षरश: रिकामे सोडून दिले. ऐन वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादीच्या शकुंतला कदम यांना सेनेच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले आणि त्यानंतर नाइलाजास्तव भाजपाच्या वतीने चार दिवसांनंतर कदम यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. याचा परिणाम म्हणून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कैलास गोरंटयाल यांचा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने (54 हजार) विजय झाला आहे. पालिकेच्या सभागृहात भाजपाचे संख्याबळ वाढले. 11 अधिक 1 पुरस्कृत असे 12, तर सेनेचे 11, काँग्रेसचे 29 व राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक विजयी झाले आहेत.

परतूर पालिकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाच्या मंदाकिनी बबनराव लोणीकर यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या उमेदवार विमलताई जेथलिया यांच्या विरोधात जोरदार लढत दिली. मात्र काँग्रेसच्या परंपरागत मतांचे अचानक मतदानपूर्व शेवटच्या रात्रीत ध्रुवीकरण झाले. भाजपाच्या हातून नगराध्यक्षपद तेराशे मतांनी निसटले. मात्र एकमेव नगरसेवक असलेल्या परतूरमध्ये भाजपाचे 8, शिवसेनेची शून्य संख्या 2 नगरसेवकांपर्यंत गेली, काँग्रेस 10 हे विशेष.

अंबड पालिकेत भाजपाच्या संगीता कुचे यांनी स्वबळावर नवा  इतिहास रचला. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. राजेश टोपे व काँग्रेसचे प्रभावी नेते बाबूराव कुलकर्णी यांच्या पिढयानपिढयांच्या वंशपरंपरागत राजकारणाला मोठा हादरा देत नगराध्यक्षपद खेचून घेतले. माजी आमदार विलास खरात यांनी स्थानिक पातळीवरील राजकारणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात वर्षभरापासून उभारलेल्या संघर्षामुळेच भाजपाच्या विजयाची वाट मोकळी झाली.

भोकरदन पालिकेत काँग्रेसच्या वर्चस्वाला छेद देण्यात भाजपाला यश आले नाही. काँग्रेसच्या मतपेढीच्या मतांच्या प्राबल्याचा विजय झाला. काँग्रेसच्या मनीषा देशमुख या विजयी झाल्या.

जालना जिल्ह्यात एमआयएमच्या उमेदवारांना फारसे कुठेच मतदान मिळाले नाही. ओवैसींची एक सभा झाली.

मराठवाडयातील सर्वाधिक चर्चा झालेल्या बीडमध्ये एमआयएमच्या उमेदवारांना मिळालेल्या यशाचे गमक शोधण्याची गरज आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) नंतर एमआयएमचे बीड नगरपालिकेत दहा नगरसेवक विजयी झाले आहेत, तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपा, सेना आणि शिवसंग्राम आणि काकू नाना आघाडी परस्परविरोधी लढले. या ठिकाणी महायुती झाली असती, तर चित्र वेगळे दिसले असते.

माजलगावमध्ये आ. आर. टी. देशमुख, मोहन जगताप आणि बाबूराव पोटभरे यांनी केलेल्या भाजपा पुरस्कृत जनविकास आघाडीच्या हातात पूर्ण सत्ता आली आहे. साहेल चाऊस यांचा विजय लक्षणीय आहे.

घारूरमध्ये भाजपाचे डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या विजयाने कार्यकर्ते उत्साहात आहेत, तर गेवराईमध्ये भाजपाचे 19पैकी 18 नगरसेवक विजयी झाले. नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांच्या विजयाने आ. लक्ष्मण पवार यांनी भाजपाच्या जनमताचा आधार वाढवला आहे.


परळीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची सरशी झाली. सरोजिनी हालगे या विजयी झाल्या. ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे मुंडे यांच्या कार्यक्षेत्रातील या निकालाची चर्चा झाली.

अंबेजोगाईमध्ये परंपरागत काँग्रेसच्या मतांचे राजकारण झाले आणि रचना सुरेश मोदी विजयी झाल्या. भाजपाच्या स्थानिक पातळीवरील मतांची टक्केवारी चांगली वाढली आहे आणि 7 नगरसेवक विजयी झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील माजी मंत्री सुरेश वरपुडकर आणि माजी मंत्री रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वर्चस्वाला मतदारांनी नाकारले आहे. पाथ्रीमध्ये आ. बाबाजनी दुर्रानी यांनी सलग सातव्या वेळी पालिका शंभर टक्के स्वत:च्या प्रयत्नाने ताब्यात घेतली आहे.

पूर्णा येथे राष्ट्रवादीचे मावळते अध्यक्ष विशाल कदम यांना शिवसेनेने प्रवेश देऊन पालिकेवर भगवा फडकवला. मानवतमध्ये शिवसेना विजयी झाली. गंगाखेड पालिका भाजपाच्या हातून निसटली. अंतर्गत राजकीय बदलाचे वारे काँग्रेसचे उमेदवार विजय तापडिया यांच्या मदतीला धावून आले. सोनपेठमध्ये काँग्रेसची सरशी झाली.

उस्मानाबादच्या राजकारणात शिवसेनेच्या वतीने स्थानिक पातळीवरील अचानक निवडणुकीच्या पूर्वी प्रवेश दिलेल्या आणि विजयी झालेल्या नंदूराजे निंबाळकर यांच्यासोबत भाजपाच्या नितीन काळे यांची कडवी झुंज झाली. भाजपा 8, सेना 11, राष्ट्रवादी 17 नगरसेवक विजयी झाले आहेत.

नळदुर्गमध्ये राष्ट्रवादीच्या रेखा जगदाळे यांनी पंचरंगी लढतीत एकहाती सत्ता काबीज केली आहे. कळंब येथे राष्ट्रवादीच्या सुवर्णा मुंडे यांनी गाफील काँग्रेसचा पराभव केला. भूम येथे राष्ट्रवादीच्या सुप्रिया वारे यांनी काँग्रेसला पराभूत केले आहे. तुळजापूर येथे राष्ट्रवादीच्या अर्चना गंगने विजयी झाल्या आहेत. उमरगा येथे पालिका त्रिशंकू झाली आहे. काँग्रेस 8, भाजपा 7 व सेना 4 असे नगरसेवक विजयी झाले आहेत, तर नगराध्यक्ष काँग्रेसच्या प्रेमलता टोपगे या विजयी झाल्या आहेत. मुरूम येथे काँग्रेसने 17पैकी 15 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अनिता अंबर यांचा विजय लक्षणीय आहे. हिंगोली शहरातील सामाजिक समन्वयाच्या बेरजेचे यश भाजपाच्या विजयाचा पाया रचणारे सिध्द झाले आहे. बाबाराव बांगर हे नगराध्यक्ष झाले आहेत. कळमनुरीमध्ये 15 वर्षांची काँग्रेसची सत्ता सेनेचे नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे यांनी खेचून घेऊन 9 नगरसेवक विजयी केले आहेत. वसमत येथे समाजवादी पक्षाच्या सायकलच्या उमेदवाराने साडेपाच हजार मते घेतली आणि शिवसेनेच्या विजयाची वाट मोकळी झाली. श्रीनिवास पोरावार हेही बहुरंगी लढतीत जिंकले आहेत.

शेकडो वर्षे जुलमी निजामाच्या रझाकारी राजवटीत राहिलेल्या मराठवाडयात भारताच्या स्वातंत्र्ययुध्दात सरदार वल्लभभाई पटेलांनी केलेल्या पोलीस ऍक्शननंतर मोठया गावात तालुका स्थानावर मुस्लीम समाजाच्या लोकसंख्यांचे मोठे ध्रुवीकरण झाले आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) आणि त्यानंतर बीडमध्ये एमआयएमच्या वाढीचे हे एक मोठे कारण आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या पारंपरिक मतपेटया आजच्या घडीला थोडया  सरकत आहेत, पण ते एक मोठे वेगळे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयाचा परिणाम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडयात वेगळा दिसण्याची ही स्वाभाविक कारणे आहेत. मात्र भाजपा-सेनेच्या राजकीय वर्तुळातील समीकरणेदेखील बदलत चालली आहेत आणि ती नक्कीच या सर्व परिस्थितीमध्ये मराठवाडयातील शहरांचा चेहरामोहरा बदलणारी ठरतील.

 9423731480

 

Powered By Sangraha 9.0