ख्रिश्चन धर्म सोडूनही अध्यात्म टिकवून धरणारा 'नेदरलँड'

विवेक मराठी    06-Dec-2016
Total Views |

पाश्चात्त्य जगातील अर्थसत्तांना जसे धक्के बसत आहेत, त्याचप्रमाणे धर्मसत्तांनाही हादरे बसत आहेत, त्यामुळे एका निराळयाच विस्कळीततेच्या काळाला आरंभ झाला आहे. माणसे मोठया प्रमाणावर ख्रिश्चन धर्म सोडत आहेत, पण परमेश्वराचे अस्तित्व मानण्यावर ठाम आहेत. नेदरलँडमधील काही घटनांच्या आधारे घेतलेला या स्थितीचा वेध...


युरोपातील प्रत्येक देश 'ख्रिश्चनधर्मीय' म्हणून शतकानुशतकांची असलेली त्यांची ओळख कशी संपवत चालला आहे, याच्या दररोज नव्या घटना उजेडात येत आहेत. अर्थात हा विषय फक्त धर्मापुरता मर्यादित राहिलेला नाही. युरोप-अमेरिकेची आजपर्यंतची जी जी सामर्थ्याची स्थाने होती, ती सारी विस्कळीत होताना दिसत आहेत. केवळ आर्थिक साम्राज्याच्या जोरावर साऱ्या जगाच्या बाजारपेठांच्या मुसक्या बांधणाऱ्या या महासत्तांना मोठया लोकसंख्या असणाऱ्या देशांकडून आव्हान मिळू लागले आहे. चीन, भारत आणि रश्ािया या देशांत सामान्य माणसाच्या परिश्रमाला महत्त्व देणाऱ्या सत्तांचे वर्चस्व आल्याने महासत्तांच्या देशात त्यांच्या अर्थव्यवस्थाच प्रभावहीन झाल्या आहेत. अमेरिकेत ट्रंप निवडून येणे ही बाब पारंपरिक महासत्तांचा बोलबाला संपून सामान्य माणसाच्या म्हणण्याचा बोलबाला सुरू होण्याचे लक्षण आहे. पाश्चात्त्य देशांत अर्थसत्ता आणि धर्मसत्ता यांचा दैनंदिनी कामकाजात संबंध नसला, तरी त्यांच्या महासत्तांचे ते आधार आहेत. जी बाब अर्थसत्तांची, तीच बाब तेथे धर्मसत्तांची होऊ घातली आहे. या संदर्भात जे मोठया ख्रिश्चन देशांत घडत आहे, तेच युरोप-अमेरिकेतील छोटया छोटया देशांतूनही घडत आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाने व जगात तिसरे जग म्हणून सव्वाशे देशांचा गट आहे, त्या प्रत्येक देशाने या साऱ्या घटनांची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.. त्याचे कारण केवळ एकेकाळच्या महासत्ता कशा हीनदीन होत आहेत, हे बघणे यासाठी ते महत्त्वाचे आजिबात नाही. अजूनही तिसऱ्या जगातील सव्वाशे देशांवर चर्च संघटनांचा पगडा आहे. भारतात चर्च संघटनांनी येथील जेहादी दहशतवाद आणि माओवादी संघटना यांच्या दहशतवादी कारवायांत महत्त्वाची म्हणजे र्मार्गदशनाची भूमिका घेतली आहे, याचे शकडो पुरावे 'ब्रेकिंग इंडिया' या पुस्तकाने दिले आहेत. याच दहशतवादी कारवायांत तामिळी चळवळींना आणि ईशान्येतील दहशतवाद्यांना जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारतातील या दहशतवादी संघटनांच्या अप्रत्यक्ष पाठीशी असणारे जे राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यावरही या पाश्चात्त्य संघटनेचेच वर्चस्व आहे. ब्रिटिश काळापासून भारतावर जी पाश्चात्त्य शक्तींची पकड आहे, तिची पकड त्यांच्या वतीने पक्की ठेवली आहे. पाश्चात्त्य महासत्तांतील अर्थसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यात सध्या जो विस्कळीतपणा आला आहे, त्यातून त्यांचे जोखड उखडून टाकण्याची ही वेळ आहे. ही बाब जगातील सव्वाशे देशांना लागू होते आहे.

पाश्चात्त्य देशांच्या धर्म या अंगाने विस्कळीत होण्याच्या प्रक्रियेतील अमेरिका, युरोपातील महत्त्वाचे देश आणि ऑस्ट्रेलिया या देशातील स्थिती यापूर्वी आपण पाहिली. या संदर्भात बाल्टिक देश, स्कँडिनेव्हियन देश, लॅटिन अमेरिकन देश, न्यूझीलंड, फिलिपिन्ससारखे देश यातील या संदर्भातील घटना तेवढयाच महत्त्वाच्या आहेत. ईशान्य युरोपातील 'नेदरलँड' हा काही मोठा देश नाही. पण तेथील विचारवंतांनी त्यांच्या देशातील धर्म बाबतीतील अनेक सूक्ष्म बाबींचाही अभ्यास केला आहे, ते आता बोलू लागले आहेत. त्या देशातील एक वृत्तपत्र 'एन एल टाइम्स' यांनी जानेवारी 15मध्ये घेतलेल्या एका अभ्यास पाहणीत असे आढळून आले की, त्या देशात धर्म मानणाऱ्यांपेक्षा न मानणाऱ्यांची संख्याच अधिक आहे. ही स्थिती तर युरोपातील अनेक देशांत आहे. पण नेदरलँडचे वैश्ािष्टय म्हणजे 'धर्माला न मानणारेही अनेक जण परमेश्वराला मानत आहेत.' अशा लोकंासाठी तेथे 'ऍग्नॉस्टिक' अशी संज्ञा वापरली जाते. नेदरलँडमधील 53 टक्के लोक अजूनही 'मृत्यूनंतर जीवन आहे' असे मानतात आणि चाळीस टक्के लोक स्वत:ला धार्मिक समजण्याऐवजी आध्यात्मिक समजतात. तेथील सरकारच्या सोशल ऍंड कल्चरल प्लॅनिंगच्या पाहणीनुसार असे लक्षात आले की, तेथे देव मानणाऱ्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. इ.सन 2012च्या पाहणीमध्ये असे दिसत होते की, धर्माला न मानणाऱ्यांपेक्षा धर्माला मानणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण नंतर परिस्थिती वेगाने बदलली. तेथील एक मानसशास्त्रज्ञ जॉक वॅन सान यांच्या म्हणण्यानुसार एकविसाव्या शतकात जी जीवनशैली सामान्य माणसापर्यंत पोहोचली आहे, त्या परमेश्वराचे अस्तित्व मानण्यापासून आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार हा विषय अधिक प्राधान्याचा बनत आहे. त्याच्या व्यक्तिगत जीवनात विज्ञानाचा अधिक प्रभाव झाल्याने अन्य बाबींना कमी महत्त्व येऊ लागले आहे. पण युरोपातील अन्य देश व नेदरलँड यामधील एक लक्षणीय फरक म्हणजे युरोपातील तरुण पिढी आध्यात्मिकतेकडे अधिक झुकलेली आहे. तरुणांच्या आध्यात्मिकतेकडे झुकण्याच्या निरीक्षणातून काही निष्कर्ष काढणे घाईचे होईल, तरीही हे निरीक्षण महत्त्वाचे आहे, असे या अहवालासाठी संशोधन करणाऱ्या चमूने बोलून दाखवले.

याच संदर्भात जगभरातील 57 देशांत जो अभ्यास प्रकल्प झाला, त्याचा संदर्भ या अभ्यासक चमूने घेतला आहे. युरोपीय देशांबरोबरच त्यात आश्ाियातील चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश होता. चार वर्षांपूर्वी घेतलेल्या त्या आंतरराष्ट्रीय संशेधन अहवालाला आज सोन्याचे महत्त्व आहे. त्यांचा निष्कर्ष असा की, त्या सत्तावन्न देशांत परमेश्वरावर विश्वास न ठेवण्याची प्रवृत्ती वेगाने वाढते आहे. त्याचप्रमाणे त्यांनी असेही निरीक्षण नोंदविले की, ही प्रवृती फक्त या 57 देशांपुरती मर्यादित नाही, तर ती साऱ्या जगातच वाढते आहे. त्यांच्या माहितीनुसार परमेश्वरावर विश्वास न ठेवण्याचे जगातील प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले आहे. तरीही त्यांचे म्हणणे असे की, जगात आज 59 टक्के लोक परमेश्वरावर विश्वास ठेवणारे आहेत. या विषयाला भारतीय संस्कृतीचा एक संदर्भ देणे आवश्यक आहे. कोणत्याही एका पंथाला न मानता परमेश्वराला मानणे व अध्यात्म आणि उपासना यांच्या माध्यमातून त्यांचा स्वीकार करणे ही बाब धर्मसंकल्पनेचा भाग आहे. जगातील 'रिलीजन' या कल्पनेत ते येत नाही. जगातील सत्तावन्न देशांचा जो पाहणी अहवाल आहे, तो जगातील एक प्रसिध्द समाज अभ्यास संस्था 'रेड सी' या संस्थेने केला होता. त्यात आश्ाियातील चीन, जपान आणि दक्षिण कोरिया हे देश होते. जगातील एक्कावन्न हजार लोकांना त्यांनी विचारलेला प्रश्न असा असे की, 'तुम्ही कोण्या मठ-मंदिरात किंवा चर्च-मश्ािदीत जाता, याबाबत काहीही माहिती देण्याऐवजी  आम्हाला असे सांगा की, तुम्ही धार्मिक व्यक्ती आहात, धार्मिक नाही आहात की, निश्चितपणे निरीश्वरवादी - ऍथेइअिस्ट - आहात.' या प्रश्नावलीला जगातून आलेली उत्तरे एका नव्या अभ्यासाला गती देणारी होती. त्यात 13 टक्के लोकांनी 'आम्ही ठामपणे निरीश्वरवादी आहोत' असे उत्तर दिले. 59 टक्के लोकांनी ते ठामपणे परमेश्वराला मानणारे असल्याचे सांग्ाितले व 23 टक्के लोकांनी आपण धर्म न मानणारे आहोत, असे सांग्ाितले. यातील निरीश्वरवादी आणि धर्म न मानणारे यातील फरक आधी स्पष्ट करणे आवश्यक आहे. निरीश्वरवादी म्हणजे ईश्वराचे अस्तित्व ठामपणे अमान्य असणारे आणि धर्म न मानणारे म्हणजे धर्मावर विश्वास नसला, व जगात धर्म ही कल्पना वास्तवातील नसली, तरी जगाला नियंत्रित करणारी किंवा जगातील सुसूत्रतेला आधार देणारी काहीतरी अदृश्य शक्ती असावी, असे त्यांना वाटते. धर्म न मानणाऱ्यांची संख्या इ.सन 2005मध्ये 9 टक्के होती, ती आता 23 टक्के झाली आहे. रेड सी ही आयर्लंडमधील अभ्यास संस्था आहे. ब्रिटनने युरोपीय संघटनेमधून बाहेर पडायचे किंवा स्वतंत्र राहायचे, याबाबत या संस्थेने घेतलेल्या पाहणी सर्वेक्षणाचे निष्कर्ष त्याच्या मतदानाआधीच अचूक आले होते. जगातील अन्य ठिकाणची निरीक्षणे आणि रेड सी या संस्थेने जगभर घेतलेला पाहणी अहवाल यात महत्त्वाचा फरक म्हणजे त्यांच्या मते 'धर्माला न मानणाऱ्यांत महिलांची संख्या अधिक' आहे. जगभरचा अनुभव असा की, महिला या पुरुषांपेक्षा अधिक श्रध्दाळू असतात. वरील पाहणीत 14 टक्के महिला या ऍथेइस्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पुरुषांचे प्रमाण 12 टक्के आहे. त्यातीलही आणखी एक निरीक्षण म्हणजे ज्यांचे श्ािक्षण विद्यापीठाच्या पदवीपर्यंत झाले आहे, त्यांच्यात मात्र निरीश्वरता 19 टक्के आहे, पण त्याच पातळीचे - म्हणजे विद्यापीठातून उच्च श्ािक्षण घेऊन बाहेर पडलेल्या 65 वर्षांवरील लोकांत मात्र परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे प्रमाण 66 टक्के आहे. जगातील सर्वात अधिक असे निरीश्वरवाद्यांचे प्रमाण असलेला प्रथम क्रमांकाचा देश म्हणजे चीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथे 47 टक्के निरीश्वरवादी आहेत. त्यानंतर क्रमांक लागतो तो जपानचा. औद्योग्ािक क्रांतीचा अनुभव घेतलेल्या जपानमध्ये 31 टक्के निरीश्वरवादी आहेत. त्यानंतर चेक रिपब्लिक 30 टक्के, फ्रान्स 29 टक्के, दक्षिण कोरिया 15 टक्के, जर्मनी 15 टक्के, नेदरलँड 14 टक्के, ऑस्टि्रया 10 टक्के, ऑस्ट्रेलिया 10 टक्के आणि आयर्लंड 10 टक्के अशी स्थिती आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांची जी यादी या संस्थेच्या पाहणीतून निर्माण झाली आहे, तीही अशीच लक्षवेधी आहे. त्यात आफ्रिकेतील घाना या देशाचा प्रथम क्रमांक लागतो. त्या देशात 96 टक्के लोक ईश्वरभक्त आहेत. नायजेरिया या देशातील 93 टक्के लोक परमेश्वरावर विश्वास ठेवणारे आहेत. हे दोन्ही देश पश्चिम आफ्रिकेतील आहेत, तर आर्मेनिया हा देश पश्चिम आश्ाियात आहे. त्यानंतर फिजी बेटे, म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडाचा ईशान्य भाग. तेथील ईश्वराधिष्ठितता 92 टक्के आहे. पुढचा क्रमांक मेसिडोनिया देशाचा आहे. तेथे 90 टक्के लोक परमेश्वराला मानतात. हा देश ग्रीसच्या उत्तरेला आहे. त्यानंतर रोमानिया हा पूर्व युरोपमधील देश आहे. हा देश दीर्घकाळ सोव्हिएत युनियनमध्ये असूनही तेथे परमेश्वराचे अस्तित्व मान्य असे. त्यानंतर इराक (88 टक्के) आहे. त्यानंतर केनिया (88 टक्के), पेरू (86 टक्के), ब्राझिल (85 टक्के) अशी स्थिती आहे. युनायटेड स्टेट्समध्ये 22 राज्ये आज ख्रिश्चन म्हणून अल्पसंख्य असली, तरी एकूण 60 टक्के ईश्वरनिष्ठ आहेत. तेथे तीस टक्के परमेश्वराला न मानणारे आहेत, पाच टक्के लोकांनी आपण ठामपणे निरीश्वरवादी असल्याचे नमूद केले आहे. अर्थात हा अहवाल चार वर्षांपूर्वीचा आहे. ईश्वरावर विश्वास ठेवणे ज्या देशात सर्वात अधिक वेगाने कमी झाले, तो देश आहे आयर्लंड. तो 2005मध्ये 69 टक्के आस्तिक होता. तोच देश इ.सन 2012मध्ये 47 टक्के आस्तिक आहे. त्या देशाच्या धर्म पाळण्याच्या टक्केवारीत आणखी घट झाली आहे. तेथे रोमन कॅथलिक पंथाचे लोक असणे हा दीर्घकाळ प्राधान्याचा विषय होता, तरीही लहान मुलांबाबत काही आक्षेपार्ह घटना घडल्याने त्या पंथाला वेगाने घरघर लागली आहे. या साऱ्या आकडेवारीला येणाऱ्या काळात धर्म आणि रिलीजन यांच्या संदर्भात फार महत्त्व येणार आहे.

यातील एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, युरोपातील या नेदरलँडसारख्या छोटया आणि स्कँडिनेव्हियन देशांचा स्वत:चा असा स्वतंत्र स्वभाव आहे. या देशांचे वैश्ािष्टय म्हणजे गेल्या पाच शतकांच्या काळात जेव्हा अनेक देशांत प्रत्येक युरोपीय देशाच्या स्वत:च्या वसाहती होत्या, तेव्हा या देशांच्या तेवढया मोठया प्रमाणावर वसाहती नव्हत्या. त्यातील काही देशांनी काही जमवाजमव केली होती, पण ती फार काळ टिकली नव्हती. जगावरील युरोपीय वसाहतींचा काळ सोळाव्या शतकात सुरू होतो व विसाव्या शतकांच्या मध्यापर्यंत चालतो. पण या देशांना शे-दीडशे वषर्ांचाच काळ मिळाला. नेदरलँडला जी जबाबदारी मिळाली, ती आफ्रिकेतून गुलाम गोळा करायचे आणि अन्य देशांना विकायचे. आफ्रिकेत, अमेरिकेत व आश्ाियातही नेदरलँडच्या काही वसाहती होत्या. प्रामुख्याने आजचे न्यूयॉर्क शहर हे दीर्घ काळ डच - म्हणजे नेदरलँडवासीयांच्या ताब्यात होते. भारतात आक्रमण करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या उभारणीत या देशाचा महत्त्वाचा भाग आहे. युरोपच्या आजच्या उभारणीत या छोटया देशांची काही निश्चित अशी भूमिका आहे. युरोपीय देशांना - ब्रिटिश, पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांना अनेक देशांत अनेक शतकांपर्यंत वसाहती करता आल्या व त्यांची लूट करता आली, तेवढे या छोटया देशांना जमले नाही. हे छोटे देश काही ब्रिटनसारखे महासत्ता होण्याच्या स्पर्धेत कधीच नव्हते. पण पुढील पाच-सहा शतके पुरेल एवढे वैभव त्यांनी मिळवून ठेवले आहे. तेथे आज ख्रिश्चन धर्म सोडण्याच्या घटना मोठया प्रमाणावर होताना दिसत आहेत. कोलंबसच्या धर्माच्या नावावर वर्चस्व निर्माण करणाऱ्यांत एक पाऊल पुढे असणारा हा देश ख्रिश्चन धर्म सोडण्यातही एक पाऊल पुढे आहे. तरीही परमेश्वराला मानण्याची आपली भूमिका जपताना दिसत आहे. पुढील शतकात पाश्चात्त्य जगातील लोकमानसाचे दान काय पडत आहे, हे समजण्यास वरील घटना उपयोगी पडणार आहेत.

9881717855