
***रमेश पतंगे****
शेवटी देशाचे संरक्षणाचा विचार म्हणजे सैन्यदलापुरता मर्यादित नसून तो त्याच्यापेक्षा व्यापक आहे. राष्ट्रपुरूष डॉ. बाबासाहेब आपल्यापुढे तो विचार सर्वांगाने मांडताना दिसतात.समाजाने आणि शासनाने या विचाराचे अनुशीलन केले पाहिजे.
राष्ट्रीय सुरक्षेचा विषय हा अतिशय गंभीर विषय आहे. इंग्रज तसे परके, भारतात त्यांना कायमचे राहायचे देखील नव्हते, तरीदेखील ते भारताच्या संरक्षणाचा बारकाईने, गंभीरपणे आणि दूरदृष्टीने विचार करीत असत. भारतावर अफगाणिस्थानमार्गे रशियाचे आक्रमण होईल, याची सतत भीती इंग्रजांना वाटत असे. हे आक्रमण कसे रोखता येईल, हा त्यांच्या परपारष्ट्रीय नीतीचा एक भाग असे. भारत आणि रशिया यांच्यामध्ये अफगाणिस्तान असावा, तो स्वतंत्र असावा किंवा तिथली राजवट आपल्या हाती नसावी, असा इंग्रजांचा प्रयत्न चाले. त्यासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तानमध्ये जाऊन तीन युध्दे खेळली. पहिले युध्द 1839 ते 1842 असे चालले. आणि त्यात पाच हजार ब्रिटिश सैनिक मारले गेले. दुसरे युध्द 1878 ते 1880 या साली झाले. आणि तिसरे युध्द 1919 साली झाले. भारताच्या संरक्षणाची एवढी चिंता करण्याचे इंग्रजांना काही कारण नव्हते. परंतु एकदा राज्यकर्ते झाली की, राज्यकर्त्यांची म्हणून काही कर्तव्य असतात, ती त्यांना पार पाडावी लागतात.
इंग्लंड, अमेरिका, फ्रांस हे देश आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचा विचार पुढची शंभर-दोनशे वर्षे डोळयासमोर ठेऊन करीत असतात. त्याची सर्वाेत्तम दोन उदाहरणे आहेत. जेम्स मन्रो हे अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष होते. तेव्हा अमेरिका आजच्या सारखी महासत्ता नव्हती. अमेरिकेकडे समर्थ नाविकदलही नव्हते. तरीही जेम्स मन्रोने अमेरिकन परराष्ट्रीय धोरणाचा दस्तावेज प्रकाशित केला. त्याला मन्रो डॉक्ट्रीन असे म्हणतात. यात मन्रो म्हणतात की, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका (संपूर्ण अमेरिका खंड, केवळ अमेरिका देश नव्हे.) यामध्ये युरोपातील कोणत्याही सत्तेने कसलीही लुडबुड करता कामा नये. आणि त्यांनी केली तर अमेरिका त्याचा प्रतिकार करेल. हा दस्तावेज 1823 साली प्रकाशित झाला. अमेरिकन परराष्ट्रीय धोरणाचा हा कणा आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही. क्युबात रशियाने क्षेपणास्त्रे आणून ठेवली, हे अमेरिकेच्या लक्षात आल्याबरोबर अमेरिकेने संपूर्ण क्यूबाची नाकेबंदी केली आणि रशियाचे कोणतेही जहाज आल्यास ते बुडविले जाईल, अशी धमकी दिली. देशाच्या संरक्षणाचा असा विचार करावा लागतो.
अरब देशाच्या उलाढालीच्या बातम्या आपल्याकडे रोज येतात. 1916पर्यंत अरबस्तानात इराक, सिरिया, लिबिया, सौदी अरेबिया, कुवेत वगैरे एकही देश नव्हता. होता तो एक अरबस्तान होता. या अरबस्तानाचे तुकडे करून हे वेगवेगळे देश करण्याचे काम इंग्रजांनी, फ्रेंचांनी केले. या दोन देशाच्या परराष्ट्रीय मंत्र्यांनी, ज्यांची नावे आहे, स्काईज आणि पिकॉट गुप्त समझोता केला. खोलीत बसून नकाशावर रेषा मारल्या आणि हे सर्व देश निर्माण केले. ते आपापसात लढत राहातील, त्यांच्या स्थैर्यासाठी ते आपल्यावर पूर्णपणे अवलंबून राहातील, हे त्यांनी पाहिले. या परिस्थितीत आजही काहीही फरक झालेला नाही. अरब देश एकमेकांशी लढतात, मुसलमान मुसलमानांना कापतात आणि त्यांच्या तेलावरचे लोणी पाश्चात्त्य राष्ट्र खात असतात. राष्ट्रीय संरक्षणाचा असा विचार वेगवेगळे देश करीत असतात.
आपल्या देशाच्या राष्ट्रीय हितसंबंधाचा विचार 1947 सालापासून सुरू झाला. आपल्या दुर्दैवाने आपल्याला जे राज्यकर्ते लाभले ते आदर्शवादात जगणारे, स्वप्नरंजनात मग्न असणारे आणि जगावर मॉरल पोलिसिंग करणारे निघाले. राष्ट्रीय हितसंबंधांचा विचार आपल्या हिताचे काय आणि आपल्या तोटयाचे काय, याच कसोटिवर करावा लागतो. तेथे कुठलाही आदर्शवाद आणून चालत नाही. आपले हितसंबंध कोठेकोठे आहेत, याची जपवणूक करावी लागते. आणि तशी धोरणे आखावी लागतात.
राष्ट्रीय सुरक्षेचा विचार आपल्यासारखी सामान्य माणसे फार खोलवर करीत नाहीत. आपल्या दृष्टीने देशाची सुरक्षा म्हणजे देशांच्या सीमांची सुरक्षा, ही सुरक्षा ठेवण्यासाठी उत्तम प्रकारचे सैन्य आणि शस्त्रास्त्रे असले म्हणजे खूप झाले. परंतु राष्ट्रनेता देशाच्या सुरक्षेचा विचार असा करीत नाही, त्याची दृष्टी अतिशय व्यापक असते. कोणत्याही देशाच्या दोन सीमा असतात. 1) भौगोलिक सीमा 2) हितसंबंधाच्या सीमा. भौगोलिक सीमा नकाशात दाखविता येतात. या सीमांना नावे ही असतात. उदा: भारत आणि चीन यांच्या सीमारेषेला मॅकमोहन सीमारेषा म्हणतात. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमारेषेला डुरान्ड सीमारेषा म्हणतात. या सीमांवर चौक्या-पहारे बसविलेले असतात.
हितसंबंधाच्या सीमारेषा नकाशावर दाखविता येत नाहीत. उदा: अमेरिकेच्या हितसंबंधाच्या सीमारेषा पृथ्वीवर कोठे नाहीत हे दाखवावे लागेल. या सीमांचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेने प्रचंड नाविक दल उभे केले आहेत. वेगवेगळया देशात अमेरिकेचे सैन्यतळ आहेत. अमेरिका कोरियात सुध्दा लढाई करेल, व्हिएतनाममध्ये करेल आणि मध्यपूर्वेतही करेल. यापैकी कुठल्याही भागातून अमेरिकन भूमीवर आक्रमण करण्याची शक्यता शून्य असते. मग अमेरिका या भागात लढाई कशासाठी करते? अमेरिकेला दिर्घकालीन राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही युध्दे करावी लागतात.
भारताच्या भौगोलिक सीमारेषा पाकिस्तान, चीन, नेपाल, भूतान, ब्रह्मदेश, बांग्लादेश या देशांना जोडलेल्या आहेत. या सीमासुरक्षा संबंधात बाबासाहेबांचा दृष्टिकोन काय होता, हे पाहणे ज्ञानवर्धक ठरेल. 1947 साली पाकिस्तानची निर्मिती झाली. ही निर्मिती होत असताना बाबासाहेबांनी त्यावर आपले परखड विचार मांडलेले आहेत. त्याचा थोडक्यात सारांश असा- पाकिस्तानची मागणी जरी तर्कावर टिकणारी नसली, भारताच्या भौगोलिक ऐक्याला बाधक असली तरी जर मुसलमान त्यावर आडून बसले तर पाकिस्तान देण्याशिवाय पर्याय नाही. अखंड भारतात सतत मुसलमान कटकट करीत राहतील, त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांना पाकिस्तान द्यावे आणि लोकसंख्येची आदलाबदल करावी.
देशाच्या संरक्षणासंदर्भात बाबासाहेबांचे मत होते की, भारतीय सैन्यदलात मुसलमानांची संख्या प्रमाणाबाहेर झाल्यास देशाच्या संरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतो, 'थॉटस् ऑन पाकिस्तान' या ग्रंथात ते म्हणतात, 'If India is invaded by a foreign power can the muslims in the army be trusted to defend India?''
जर भारतावर विदेशी शक्तीने आक्रमण केले असता, सैन्यातील मुसलमान भारताच्या संरक्षणासाठी लढतील का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचे उत्तर देताना ते म्हणतात,'ज़र सैन्यातील मुसलमान पाकिस्तानच्या संकल्पनेने भारावलेले असतील तर ते आंतक निर्माण करतील आणि देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आणतील.'
हाच विषय त्यांनी बहिष्कृत भारतच्या आग्रलेखात 1929 साली मांडलेला आहे. 'ज़ो कोणी आशिया खंडाच्या नकाशाकडे पाहील त्याला कळून येईल की, हा देश कसा बेचकडीत सापडला आहे. एका बाजूने चीन व जपान या भिन्न संस्कृतीच्या राष्ट्रांचे वेष्टण पडले आहे. या दोहोंच्या माऱ्यांत सापडलेल्या या देशाला फार जपून वागले पाहिजे असे आम्हास वाटते. या सर्व राष्ट्रांचा एक संघ तयार होईल व आपण सर्व एका खंडातील लोक या भावनेने प्रेरीत होऊन गुण्यागोविंदाने ती नांदतील अशी आशा करण्यास आज तरी काही सबळ कारण दिसत नाही........... या परिस्थितीत चीन व जपान या दोहोंपैकी कोणांकडून ही जर मारा करण्यात आला तर त्यात पराजय कोणाचा होईल. हे जरी सांगता आले नाही तरी त्यांच्या माऱ्याला सर्व लोक एकजुटीने तोंड देतील याबद्दल कोणालाही खात्री देता येईल. पण स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानावर जर टर्की, परशिया किंवा अफगाणिस्तान या तीन मुसलमान राष्ट्रांपैकी कोणी एकाने जर मारा केला तर त्या प्रसंगी सर्व लोक एक जुटीने तोंड देतील याची खात्री कोणी देईल काय? आम्हास तरी देता येत नाही. हिंदु मुसलमान लोकांचा ओढा मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्रांकडे असणे अगदी साहजिक आहे. हा ओढा इतका बेसुमार बळावला आहे की मुसलमानी संस्कृतीचा प्रसार करून मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे व होतील तितके काफीर देश त्याच्या अमलाखाली आणणे हे त्याचे ध्येय होऊन बसले आहे. या विचारांनी पछाडल्यामुळे पाय हिंदुस्थानांत असले तरी त्यांचे डोळे तुर्कस्थानकडे अगर अफगाणिस्तानकडे लागलेले आहेत. हिंदुस्थान देश आपला आहे याबद्दल ज्यांना अभिमान नाही व त्यातील निकटवर्ती हिंदु बांधवांविषयी ज्यांना बिलकूल आपलेपणा नाही असे मुसलमान लोक मुसलमानी परचक्रापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यास सिध्द होतील असे धरून चालणे धोक्याचे आहे असे आम्हास वाटते. '' संदर्भ- बहिष्कृत भारत-पृष्ठ क्र. 177

पाकिस्तान अस्तित्त्वात आल्याबरोबर 1948 साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. एक तृतीयांश काश्मिर त्यांनी गिळंकृत केला. पं. नेहरू यांनी काश्मिर प्रश्नाचा विचका करून ठेवला आहे. बाबासाहेब हयात असताना काश्मिरसंबंधी सार्वमताचा विषय सातत्याने चर्चेत असे. काश्मिरी जनतेने भारतात राहायचे की पाकिस्तानात जायचे याचा मतदान करून निर्णय करावा, हा नेहरूंचा विषय होता. बाबासाहेबांनी त्याला प्रखर विरोध केलेला आहे. काश्मिरचे तीन भाग होतात, 1) जम्मू-जेथे हिंदुची बहुसंख्या आहे. 2) लडाख- जेथे बौध्द बहुसंख्य आहेत.3) काश्मिरघाटी - जेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. बहुसंख्य मुसलमानांबरोबर हिंदु आणि बौध्दांना जोडू नये सार्वमत घ्यायचे झाले तर ते फक्त घाटीतील मुसलमानांचे घ्यावे. हिंदु आणि बौध्दांना त्यांच्या इच्छेविरूध्द पाकिस्तानात पाठवू नये,पंजाब आणि बंगालच्या बाबतीत हीच चूक केली आहे, ती पुन्हा करू नये असे बाबासाहेबांचे मत होते. त्यांचे आणखी एक मत होते ते म्हणजे मुसलमान बहुल घाटी पाकिस्तानला देऊन टाकावी. बाबासाहेबांचे हे मत त्यावेळी देखील देशाला मान्य होण्यासारखे नव्हते आणि आजही मान्य होण्यासारखे नाही.
देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात चार गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. 1) देशाचे परराष्ट्रीय धोरण 2) देशातील अंतर्गत आर्थिक व्यवस्था 3) सामाजिक ऐक्य 4) सैन्यदले. यापैकी सैन्यदल याविषयी देशात सातत्याने भरपूर चर्चा चालते. यासाठी त्यावर काही लििहण्याची आवश्यकता आहे असे नाही. या अंकातही अन्य लेखात त्याबद्दल लििहले गेलेले आहे. देशाचे परराष्ट्रीय धोरण आखण्यात गाढवपणा केला तर त्या देशाचे कसे हाल होतात, याचे नेहरूकालीन भारतासारखे चित्र अन्य कुठेही सापडणार नाही. परराष्ट्रधोरणाचा पाया राष्ट्राचे हितसंबंध आणि व्यवहारवाद असावा लागतो. तेथे आदर्शवादाला काहीही किंमत नसते. आदर्शवादाच्या बाता करायच्या असतात, जगभर फिरून प्रवचने द्यायची असतात पण त्या आदर्शवादासाठी राष्ट्रहिताला बळी द्यायचा नसतो. नेहरूंचे परराष्ट्रीय धोरण याच्या विपरीत होते. बाबासाहेब नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणाचे कठोर टिकाकार होते. नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणावर आघात करताना बाबासाहेब म्हणतात,'भारताला स्वातंत्र्य लाभले त्या दिवशी जगातील साऱ्या राष्ट्रांचे संबंध मित्रत्त्वाचे होते व ती राष्ट्रे भारताचे शुभ इच्छित होती. आजची परिस्थिती अगदी उलट आहे. आज भारताला खरा मित्र कुणी नाही. सर्व राष्ट्रे भारताची शत्रू नसली तरी भारतावर फार नाराज आहेत. भारताच्या हिताकडे ती पाहत नाहीत. याला काँग्रेस सरकारचे धरसोडीचे परराष्ट्रीय धोरण कारणीभूत आहे. भारताचे काश्मीरबद्दल धोरण, युनोमध्ये कम्युनिस्ट चीनच्या प्रवेशाबद्दल घिसाडघाई आणि कोरियन युध्दाबद्दल अनास्था यांबद्दल गेल्या तीन वर्षातील पोरकट धोरणाच्या पाठपुराव्यामुळे इतर राष्ट्रांनी भारताकडे पाठ फिरवली आहे.' संदर्भ- चां.भ. खैरमोडे खंड-10-पृष्ठ क्र. 170
आदर्शवादाच्या आहारी जाऊन पं. नेहरू यांनी दोन घोडचूका केल्या. 1) त्यांनी तिबेटचे दान चीनला देऊन टाकले. 2) चीनबरोबर पंचशील विषयावर समझोता केला. या दोन्ही घोडचूका देशाला फार महागात पडतील हे बाबासाहेबांनी कोणाच्या रागा-लोभाची पर्वा न करता मांडल्या. पं. नेहरू यांनी एक हास्यास्पद विषय आपल्या हाती घेतला होता तो म्हणजे, चीनला राष्ट्रसंघात प्रवेश देण्याचा. त्यासाठी पं. नेहरू आंतराष्ट्रीय स्तरावर धडपड करीत होते. बाबासाहेब प्रश्न करतात,'चीनचा प्रश्न घेऊन आम्हाला संघर्ष करण्याचे कारण काय? स्वत:ची लढाई लढण्यास चीन समर्थ आहे. कम्युनिस्ट चीनचा पक्ष घेऊन आपण अमेरिकेला कशासाठी शत्रू करीत आहोत?' राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता अमेरिकेशी शत्रुत्त्व करणे भारताला काही एक कारण नव्हते.
देशाचे परराष्ट्रीय धोरण ठरविताना भांडवलशाही आणि संसदीय लोकशाही यांच्यात फरक केला पाहिजे असे बाबासाहेबांचे नेहरूंना सांगणे होते. भांडवलशाहीचा विरोध हा समजण्याासारखा आहे, परंतु याचा अर्थ हा नव्हे की, भांडवलशाहीला विरोध करता करता आपण हुकूमशाहीचा पुरस्कार करावा. बाबासाहेबांचा स्पष्ट संकेत कम्युनिस्ट चीनकडे आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची हुकूमशाहीची सत्ता होती (आजही आहे) चीनला संयुक्त राष्ट्रसंघाचे कायमस्वरूपी सदस्य बनविण्याचा उपद्वयाप करण्याऐवजी भारताने स्वत:लाच राष्ट्रसंघाचे (म्हणजे सुरक्षा सभेचे) कायमस्वरूपी सदस्य करण्याच्या मागे लागावे. 1951 साली बाबासाहेबांनी व्यक्त केलेले मत आहे. आजही भारत सुरक्षासंघाचा सदस्य नाही. भारताचे परराष्ट्रीय धोरण कसे आहे, याविषयीचे बाबासाहेबांचे मत त्यांच्याच भाषेत This quizotic (Quixotic) policy of saving the world is going to bring about the ruination of India and the sooner this suicidal foreign policy is reversed the better for India. - याचा भावानुवाद असा- जगाला वाचविण्याचा हा क्विकझोटीक उपद्वयाप भारताच्या मुळावरच येईल. म्हणून या आत्मघातकी धोरणाचा लवकरात लवकर त्याग केला पाहिजे. 'क्विकझोटीक' याचा अर्थ अत्यंत हास्यास्पद उचापती शौर्याचा आव आणून जो करतो त्याला डॉन क्विकझोट म्हणतात. कल्पनेच्या राज्यातील हा अफाट सरदार आहे.
माओने पंचशीलाचा स्वीकार केला असे पं. नेहरू यांनी सांगितले. चीन पंचशील पाळणार नाही, चीन हुकूमशाही देश आहे, विस्तारवादी आहे, त्याच्यापासून भारताला धोका आहे, या गोष्टी बाबासाहेब सांगत राहीले. ते म्हणतात,'माओचे पंचशील पं. नेहरू यांनी गंभीरपणे घेतले हे पाहून मला आश्चर्य वाटले. पंचशील हा बुध्द धर्माचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. माओचा पंचशीलावर जर विश्वास असेल तर आपल्या देशातील बौध्द बांधवांना माओ वेगळी वागणूक देईल. राजकारणात पंचशीलाचे काही काम नाही आणि कम्युनिस्ट राजकारणात त्याहूनही नाही. सगळे कम्युनिस्ट देश दोन तत्त्वांना प्रमाण मानतात. पहिले तत्त्व नैतिकता अस्थिर असते, नितिमत्ता जगात काही नसते, आजची नितिमत्ता उद्याची नितिमत्ता नसते.' याचा अर्थ असा की, चीनच्या कुठल्याच बोलण्यावर क़वडीचाही विश्वास ठेवू नये. आज चीन एक बोलेल आणि त्याच्या विरूध्द उद्या बोलेल. बाबासाहेबांची दुरदृष्टी इतकी मोठी आहे की, 1951-52 साली ते जे काही सांगून गेले त्याचे प्रत्यंतर चीनच्या संदर्भात आजही आपण घेत असतो. चीनवर अजिबात विश्वास ठेवता कामा नये असे बाबासाहेब आग्रहपूर्वक सांगत राहीले. शेवटी चीनने भारतावर 1962 साली आक्रमण केलेच आणि चीनने बाबासाहेबांचे म्हणणे खरे करून दाखविले. (बुध्द पंचशील म्हणजे 1) हत्या न करणे 2) चोरी न करणे 3) व्यभिचार न करणे 4) खोटे न बोलणे 5) मद्यपान न करणे )
बाबासाहेब हयात असताना आंतराष्ट्रीय क्षेत्रात अनेक घटना घडत होत्या. भारतावर परिणाम करणाऱ्या यातील काही घटना अशा- 1) सुएझ कालवा संघर्ष 2) कोरियन युध्द 3) व्हिएतनाम युध्द 4) सिटो, आणि सिंटो करार. भारताच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या या घटना आहेत. बाबासाहेब फार दूरचा विचार करून या घटनांचा विचार करीत असत. भूमध्य सागर आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा इजिप्त देशामध्ये जो कालवा आहे त्याचे नाव सुएझ कॅनल असे आहे. 1859 साली फ्रांसच्या इंजिनियरने हा कालवा खणायला सुरूवात केली. त्याची लांबी 165 कि.मी. आणि रूंदी 48 मीटर इतकी आहे. हा कालवा खणल्यामुळे भारत आणि युरोपचे अंतर साडेचार हजार मैलाने कमी झाले आणि अफ्रिका खंडाचा वळसा वाचला. 1956 साली इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष नासर यांनी या कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. ते इंग्लड, फ्रांस आणि अमेरिकेला आवडले नाही आणि त्यांनी इजिप्तवर बाँम्बहल्ले केले. पं. नेहरू यांनी नासर यांना पाठिंबा जाहीर केला, बाबासाहेबांनी त्याचा विरोध केला, त्यांचे विचार असे होते,'सुएझ कालवा आंतराष्ट्रीय नियंत्रण मंडळाच्या ताब्यात असावा, तो इजिप्तच्या ताब्यात असू नये. भारताचा परराष्ट्रीय व्यापार या कालव्यातूनच चालतो, उद्या इजिप्त भारताचा शत्रू झाल्यास भारताची स्थिती काय होईल? ' इजिप्त मुस्लिम देश आहे, पाकिस्तान मुस्लिम देश आहे, इजिप्त पाकिस्तानचा दोस्त आहे, असे संबंध लक्षात घेतले असता, बाबासाहेबांची दुरदृष्टी लक्षात यायला हरकत नाही.
कोरिया आणि व्हिएतनाम या देशात कम्युनिस्टांची आक्रमणे वाढत चालली होती. उत्तर कोरिया कम्युनिस्टांनी बळकावला होता. व्हिएतनाम देखील बळकावण्याच्या मार्गावर होते. बाबासाहेब कम्युनिस्टाचे कट्टरविरोधी होते, त्याची तीन कारणे होती-1) कम्युनिझमचे आर्थिक तत्त्वज्ञान त्यांना मान्य नव्हते. 2) कम्युनिस्ट हुकूमशाह होते, बाबासाहेब लोकशाहीवादी होते. 3) कम्युनिस्ट हिंसक आणि कोणतीही नितिमत्ता न पाळणारे होते. अशा कम्युनिझमचा प्रसार जगभर होणे मानवतेला घातक आहे असे त्यांचे मत होते. आपण अमेरिकेशी सहकार्य केले पाहिजे अशी त्यांची दृष्टी होती.
अमेरिकेने कम्युनिझमला रोखण्यासाठी दक्षिण पूर्व आशिया खंडातून देशांचा एक संघ तयार केला. मनीला कराराप्रमाणे हा संघ तयार झाला, त्याचे नाव 'सिटो' असे झाले. सदस्य देशांनी परस्परांशी सैनिकी सहकार्य करावे. एकावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतीस यावे. असाच दुसरा करार बगदाद करार म्हणून ओळखला जातो, त्याला 'सिंटो' करार असे म्हणतात या दोन्ही करारात पाकिस्तान सहभागी झाला. भारत सहभागी झाला नाही. पं. नेहरू यांचा अमेरिका द्वेष आणि रशिया प्रेम याला कारणीभूत झाले. त्याच्या जोडीला भंपक आदर्शवाद होता. बाबासाहेबांना ही गोष्ट अजिबात आवडत नसे, आपल्या संरक्षणासाठी असल्या वेगवेगळया करारात आपण सामील झाले पाहिजे असे त्यांचे मत होते. बर्नाड शॉ यांचे एक वचन बाबासाहेबांनी दिले आहे. तो म्हणतो,' ग़ुड आयडियाज आर गुड बट वन मस्ट नॉट फरगेट दँट इट इज ऑफन डेंजरस टू बी टू गुड' बाबासाहेबांचे सर्व इशारे धाब्यावर बसविल्यामुळे आजही आपण जगात एकाकीच आहोत.
देशाच्या संरक्षणासंदर्भात बाबासाहेबांनी आग्रहपूर्वक सांगितले की, भारताला दुसरी राजधानी हवी आणि ती दक्षिणेत हवी. ते म्हणतात,'राष्ट्राचे लष्करी संरक्षण आणि सत्तेच्या यंत्रणेत समान वाटा या दृष्टीने दक्षिणेत भारताची उपराजधानी असणे अवश्य आहे. माझे फार दिवसांचे मत आहे की हैद्राबाद, सिंकदराबाद व बोलाराम हा सर्व भाग मध्यवर्ती सरकारने ताब्यात घेतला पाहिजे व तेथे उपराजधानी कायम केली पाहिजे. दिल्लीला बसून सरकार राज्य हाकू म्हणते तेव्हा मला त्याच्या लष्करी निपुणतेचे हसू येते. आमचे राष्ट्र लष्करी बनवावयाचे असेल तर दक्षिण भारतात उपराजधानी ठेवणे संरक्षणाच्या दृष्टीने किमान गरजेसाठी अवश्य आहे. आज मध्यवर्ती सरकारात उत्तर भारतीयांचे वर्चस्व आहे. अध्यक्ष व पंतप्रधानांची दोन प्रांतातील बडया व्यक्तीत आळी-पाळीने अदलाबदल होत राहाणार आहे. दक्षिण भारतातील सामान्य लोक सध्या सुध्दा नोकऱ्याकरिता दिल्लीला जाणे शक्य नाही व यंत्रणेत त्यांना वाटा मिळणेही त्यामुळे दुरापास्त आहे. भारतीय सर्व एक हे जरी खरे असले तरी व्यवहारात ही भावना निरर्थक आहे. राजकारणात हे औदार्य अंगलट येते व भोळयाभाबडयांचा घात होतो. यासाठी हैद्राबादेत उपराजधानी आली तर दक्षिण भारतीयांना सरकारी यंत्रणेत स्थान मिळेल. सत्तेत इकडील लोकांनाही भाग घेता येईल. आमच्या डोक्यात हा व्यवहार येत नाही.''संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे भाग 3- 1946 ते 1956
देशाची अर्थव्यवस्था अतिशय उत्तम असावी लागते, केवळ सैन्यदले असून उपयोगाचे नाही. 1990 पर्यंत रशिया महासत्ता होता, 1990 साली रशियाचे दिवाळे वाजण्याची वेळ आली. रशियाने सैन्यशक्तीच्या जोरावर जे देश आपल्या ताब्यात ठेवले होते ते स्वतंत्र झाले , रशिया फुटला. बाबासाहेब यांनी अनेक वेळेला आर्थिक लोकशाही आणि आर्थिक समानतेबद्दल आपले विचार मांडले आहेत. घटनासमिती समोरच्या अखेरच्या भाषणात बाबासाहेबांनी देशाच्या संरक्षणासंदर्भात अतिशय मौलिक विचार मांडलेले आहेत ते म्हणतात,'आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात सामाजिक आणि आर्थिक संरचेनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारीत राहणार आहोत, आपण जर ती अधिक काळ पर्यंत नाकारीत राहीलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही.'
राष्ट्रीय संरक्षणाचा सर्वात मोठा विषय सामाजिक ऐक्याचा असतो. सामाजिक ऐक्य निर्माण होण्यासाठी सामाजिक लोकशाही निर्माण झाली पाहिजे. सामाजिक लोकशाही याचा अर्थ समाजाची रचना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्त्वांवर झाली पाहिजे. यापैकी बंधुतेचे तत्त्व सर्वात महत्त्वाचे आहे. सर्व भारतीयांनी परस्परांवर सख्या भावाप्रमाणे प्रेम केले पाहिजे असे बाबासाहेब सांगून गेले. हे सामाजिक ऐक्याचे मुलभूत तत्त्व आहे, सामाजिक ऐक्य असेल तर तो समाज कसलेही परकीय आक्रमण सहन करीत नाही आणि त्याचा पराभव करतो. इंग्लड, रशिया, जपान,फ्रंास, जर्मनी या देशांचे इतिहास ही गोष्ट ठळकपणे सांगतात.
शेवटी देशाचे संरक्षणाचा विचार म्हणजे सैन्यदलापुरता मर्यादित नसून तो त्याच्यापेक्षा व्यापक आहे. राष्ट्रपुरूष डॉ. बाबासाहेब आपल्यापुढे तो विचार सर्वांगाने मांडताना दिसतात.समाजाने आणि शासनाने या विचाराचे अनुशीलन केले पाहिजे.
- रमेश पतंगे