धगधगत्या राष्ट्रप्रेरणेचे प्रतिरूप

स्रोत: विवेक मराठी    दिनांक25-Jul-2016   

माणसात गुणदोष असायचेच. दोष बाजूला ठेवा. गुण घ्या. ते आपल्यात आणण्याचा प्रयत्न करा नि पुढे सरका.'' हिंदू समाजामध्ये अशी राष्ट्रप्रेरणा निर्माण व्हावी असा ज.द. च्या सगळया संभाषणांचा, लेखांचा, पुस्तकांचा मुख्य हेतू असायचा.शरीर आणि मन दोन्ही साथ देत नसताना ज.द. आणखी बारा वर्षे, म्हणजे एक तप जगले आणि त्या एका तपात त्यांनी आणखी चौदा पुस्तके लिहिली. विद्वान, विचारक मंडळींमध्ये सहसा न आढळणारे ज.दं.चे वैशिष्टय म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा.


वारकरी संप्रदायात एक पध्दत आहे. एका वर्षाच्या अवधीत ज्ञानेश्वरीचे एक पारायण पूर्ण करायचेच. मुळातच गीतेचे 700 श्लोक आहेत. त्यावर भाष्य करणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या एकूण 9033 ओव्या आहेत. त्यांचे एक पारायण एका वर्षात पूर्ण होण्यासाठी रोज किती ओव्या वाचायच्या, याची सांप्रदायिक पध्दत ठरलेली आहे. गेली कित्येक शतके लाखो वारकरी त्यानुसार पारायण करीत आहेत.

एकदा गप्पांमध्ये या गोष्टीचा उल्लेख करून ज.द. जोगळेकर मला म्हणाले, ''मी अशीच शिस्त गेली कित्येक वर्षे पाळतो आहे. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ग्रंथ मी अखंड वाचत असतो. रोज अमुक पाने असे काही ठरवलेले नाही, पण एका वर्षात समग्र सावरकर लेखनाचे एक आवर्तन झाले पाहिजे, हे मी कटाक्षाने पाळतो.''

योगायोग असा की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारधनाचे वार्षिक वारकरी असणारे जोगळेकर परवा आषाढी एकादशीला - म्हणजे 15 दुलै 2016 या दिवशी अनंताच्या यात्रेला निघून गेले. आज हा स्मरणलेख लिहिताना त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या असंख्य स्मृती माझ्या मनात जाग्या होत आहेत. त्यांची-माझी प्रत्यक्ष ओळख तशी उशिराच झाली... या अर्थाने की, ते त्या वेळी सत्तरीच्या उंबरठयावर होते.

आमच्या गावदेवी-गिरगाव भागात डॉ. गंगूताई पटवर्धन उर्फ डॉ. शोभा जोगळेकर उर्फ ताई आणि 'सेवाधाम' हे त्यांचे रुग्णालय खूप प्रसिध्द होते. जाणते लोक ताईंचा उल्लेख 'ए गायनॅकॉलॉजिस्ट पार एक्सलन्स' अशा शब्दामध्ये करीत असत. आणि ज.द. जोगळेकर कोण? तर ''ताईंचे मिस्टर, ते हिंदुत्वावर लेखबीख लिहीत असतात ते..'' अशा शब्दात मी ज.दं.चा पहिला उल्लेख ऐकलेला मला आठवतो.

ते बहुधा 1988-89साल असावे. रामजन्मभूमी आंदोलनाने जोर धरला होता. शिवाजी पार्कसमोर सावरकर स्मारक उभे राहत होते. तिथे हिंदुत्व, राष्ट्रीयत्व अशा काहीतरी विषयावर कार्यक्रम होता. मुंबईच्या इतिहास संकलन समितीचे प्रमुख डॉ. रवींद्र रामदास यांच्या बोलावण्यावरून मी तिथे गेलो होतो. त्या वेळी डॉ. रामदास यांनी ज.दं.शी माझी ओळख करून दिली. त्या पहिल्याच ओळखीत गप्पा मारताना ज.द. मला म्हणाले, ''मल्हार, मला भेटत राहा. वाचनाची आवड असणाऱ्या तुझ्या मित्रांनाही घेऊन ये. आपण हिंदुत्वावरच नव्हे, तर अन्य विषयांवरही गप्पा मारू. मला उत्तम इंग्लिश चित्रपटही आवडतात. पण लक्षात ठेव, मी आज आहे, उद्या नसेनही. कारण मला एक हार्टअटॅक येऊन गेलाय. पुढचे आयुष्य म्हणजे बोनस लाइफ.''

पुढे मी एशियाटिक ग्रंथालयाचा सभासद झालो आणि मग खऱ्या अर्थाने आमच्या गप्पांच्या मैफली सुरू झाल्या. गप्पा म्हणजे तो एक प्रकारे बौध्दिक वर्गच असायचा. शनिवारी अर्धा दिवस ऑफिस झाले की मी आणि जयसिंग ठाकूर एशियाटिकमध्ये पोहोचायचो. मग हिंदुत्व, इस्लाम, ख्रिश्चानिटी, युध्दशास्त्र, वैचारिक अध्ययन - इंटलेक्चुअल परसूट म्हणजे नेमके काय, आपण हिंदुत्वप्रेमी यात कसे कमी
पडतो. अशा विषयांवर गप्पा व्हायच्या. जयसिंग ठाकूरचा व्यासंग दांडगा. क्वचित एखाद्या मुद्दयावर तो जोगळेकरांशी असहमती दर्शवायचा. जोगळेकर त्वरित ग्रंथालयाच्या अंतर्भागात शिरायचे. काही मिनिटांच्या अवधीतच ते आपल्या मुद्दयाला समर्थन देणारे पुस्तक घेऊन बाहेर यायचे नि नेमके पान, नेमका परिच्छेद काढून तो मोठयाने वाचून दाखवायचे. ही विलक्षण फोटोग्राफिक मेमरी हे आमच्यासाठी असे शिक्षण होते की, जे कुठल्याही शाळेत कितीही पैसे मोजून मिळणार नाही.

व्यासंग, स्मरणशक्ती याबरोबरच जोगळेकरांचा तर्कशुध्द युक्तिवादही जबरदस्त होता. ते उत्कृष्ट वकील होतेच मुळी. एका संवादात जयसिंग ठाकूर त्यांना म्हणाला, ''आता असे संशोधन पुढे येत आहे की हिटलर आणि जपान यांचा गुप्त करार झाला होता. जर जर्मनी-जपान युती युध्दात जिंकली असती, तर पूर्वेकडचे जगजपानच्या ताब्यात आणि पश्चिमेकडचे जग जर्मनीच्या ताब्यात जाईल असा हा करार होता. मग सावरकरांनी सुभाषबाबूंना त्याच जर्मनी-जपानशी युती करायला कसे उद्युक्त केले? जपानने सुभाषबाबूंना गुंडाळून ठेवून भारतावर वर्चस्व मिळवले असते. म्हणजे आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून जपानच्या गुलामगिरीत पडलो असतो, नव्हे का?''

पुढच्या क्षणाला जोगळेकरांचे उत्तर आले, ''जयसिंग, मल्हार, तुम्ही नीट वाचन करत नाही रे! डिसेंबर 1940च्या मदुरा इथल्या भाषणात सावरकर सांगतायत की, या युध्दात इंग्लंडचा पराभव होऊन त्याला आपले साम्राज्य जर्मनीच्या हातात सोपवावे लागेल अशी शक्यता जवळजवळ नाही. आता पाहा, या काळात जर्मन सेना सर्वत्र इतक्या वेगाने आगेकूच करत होत्या की, हिटलर जिंकणार अशी जगातल्या सगळया राजकीय अभ्यासकांची जवळजवळ खात्री झाली होती. आणि त्याच 1940च्या डिसेंबरात सावरकर हे सांगतायत. मला वाटतं इंग्लंड हरणार नाही याची खात्री त्या वेळी सावरकर सोडून फक्त चर्चिललाच होती. (हे बोलताना ओठांवर एक मिस्कीलपणा झळकला होता.) आणि तरीही नंतरच्या काळात सावरकर सुभाषबाबूंना जर्मनी-जपानकडे पाठवतायत. याचाच अर्थ ते फार खोल, फार सूक्ष्म राजकारण असले पाहिजे. अजून तरी आपल्याला ते ज्ञात झालेले नाही.'' आणि मग आणखीनच मिस्कीलपणे हसत ते पुढे म्हणाले, ''आणि समजा, धरून चला की सुभाषबाबूंना असा सल्ला देण्यात सावरकर चुकले. मग काय झालं? माणसाच्या हातून चुका होतात. तुमच्या काँग्रेसवाल्यांनी चुकांवर चुका करून देश तोडला. आजही देशाची वाटच लावतायत. आमच्या सावरकरांना एवढी एक चूक करायचीपण परवानगी नाही?'' आमच्या तिघांच्या हास्यकल्लोळात प्रसंग संपला.

अशी कितीतरी सुगंधी स्मरणे. जोगळेकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एकनिष्ठ अनुयायी होतेच, तसेच सगळयाच विचारकांबद्दल आणि विशेषत: राष्ट्रनिर्मात्यांबद्दल त्यांना अतिशय आदर होता. सावरकरांप्रमाणेच लोकमान्य टिळक, न.चिं. केळकर, डॉ. मुंजे, छत्रपती शिवराय, नेपोलियन बोनापार्ट, प्रिन्स बिस्मार्क, केमाल पाशा, कार्डिनल रिशेल्यू, चर्चिल, स्टॅलिन, हिटलर, रुझवेल्ट, जनरल रोमेल, जनरल पॅटन, जनरल जॉर्ज मार्शल, जनरल गुडेरिन अशा असंख्य तत्त्वज्ञ, विचारक, मुत्सद्दी, सेनानी, राजनेत्यांच्या चरित्रांचा त्यांनी फार बारकाईने अभ्यास केला होता. त्या सर्वांबद्दलच्याच असंख्य छोटया-छोटया कथा, किस्से त्यांच्या सदैव अगदी जिभेवर असायचे. आपला मुद्दा पटवताना ते अशा किश्शांचा अतिशय मार्मिकपणे वापर करायचे. अनेकदा तर अशा किश्शांनी संवादात इतकी रंगत यायची की, जोगळेकर आणि टिळक, सावरकर, नेपोलियन, चर्चिल ही सगळी मंडळी वर्षानुवर्षे एकत्र भेटत असावीत नि गप्पा मारत असावीत असे वाटायचे.

एकदा मी त्यांना विचारले, ''चर्चिल भारताबद्दल, गांधी-नेहरूंबद्दल अत्यंत आकसाने बोलायचा. तरी तुम्हाला तो का आवडतो?'' जोगळेकर पटकन उत्तरले, ''चर्चिल टिळक- सावरकरांना भेटला नाही ना! किमान तो मला भेटला असता तरी भारत आणि भारतीयांबद्दल त्याला एवढा आकस वाटला नसता.''

''आणि असे पाहा,'' ते पुढे म्हणाले, ''चर्चिल आता मरून गेला आहे. त्याला भारताबद्दल आकस वाटायचा, हे आपण विसरू नये. पण ते मनाच्या एका कप्प्यात, एक माहिती म्हणून लक्षात ठेवायचे. आठवायचे काय, तर चर्चिलची विलक्षण राष्ट्रप्रेरणा. खरोखरच, हिटलर आणि इंग्लडचा संपूर्ण पराभव यांच्यामध्ये फक्त चर्चिल या एकाच व्यक्तीचा अडथळा होता. चर्चिल या माणसाने आपल्या अफाट कर्तबगारीने, हिटलरला पराभूत करूच करू, अशी जिद्द इंग्लिश राष्ट्राच्या मनात निर्माण केली. मला आकर्षण आहे चर्चिलच्या या राष्ट्रप्रेरणेचे, चर्चिल या माणसाचे नव्हे. माणसात गुणदोष असायचेच. दोष बाजूला ठेवा. गुण घ्या. ते आपल्यात आणण्याचा प्रयत्न करा नि पुढे सरका.'' हिंदू समाजामध्ये अशी राष्ट्रप्रेरणा निर्माण व्हावी असा ज.द. च्या सगळया संभाषणांचा, लेखांचा, पुस्तकांचा मुख्य हेतू असायचा.

सन 2004मध्ये डॉ. शोभा जोगळेकर उर्फ ताई यांच्या निधनाने खरे म्हणजे ज.द. खचले होते. त्यांचे स्वत:चेच वय त्या वेळी 83 होते. शरीर तर थकले होतेच, पण ताईंच्या जाण्याने ते मनाने अतिशय विव्हळ झाले होते. पण खरा योध्दा हा कधीच हार मानीत नसतो. शरीर आणि मन दोन्ही साथ देत नसताना ज.द. आणखी बारा वर्षे, म्हणजे एक तप जगले आणि त्या एका तपात त्यांनी आणखी चौदा पुस्तके लिहिली. विद्वान, विचारक मंडळींमध्ये सहसा न आढळणारे ज.दं.चे वैशिष्टय म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा. ''माझी ही पुस्तके नि त्यातले माझे प्रतिपादन 'परफेक्ट' आहे, असा माझा अजिबात दावा नाही.'' ते म्हणायचे, ''तुम्ही आणखी चांगले लिहा. माझे विवेचन मागे पडेल इतके चांगले लिहा. पण सतत वाचा. लिहा. आपल्या हिंदू समाजाला बलदंड करा.''

ज.द. जोगळेकर ही राष्ट्रप्रेरणा आता वार्धक्याने वयाच्या 94व्या वर्षी कालाधीन झाली आहे. विनम्र अभिवादन.

7208555458