सुरेशरावांचे जीवनएक आदर्श पाठयपुस्तक - मा. भय्याजी जोशी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक08-Aug-2016   

 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह आणि माजी अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुरेशराव केतकर यांचे शनिवार, दि. 16 जुलै 2016 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या मासिक श्राध्ददिनानिमित्त साप्ताहिक विवेक एक विशेष पुरवणी प्रकाशित करत आहे... 'स्मरण... एका दधिचीचे!'

त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडून दाखवणाऱ्या लेखांबरोबरच, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणाऱ्या संदेशांचा समावेशही या पुरवणीत करण्यात आला आहे. परदेशातील संघ कार्यकर्त्यांकडून आलेले हे संदेश आहेत.

सुरेशरावांचा मृत्यू दु:खद आहे की सुखद असा प्रश्न पडतो. कारण त्यांच्या अखेरीच्या काळात त्यांना जी विकलांगता आली, ती दु:खद होती. आदर्शांच्या सर्व मानदंडांनुसार आखलेले असावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

सामाजिक जीवनातले मोती म्हणून सुरेशरावांचा उल्लेख करायला हवा. जसा भक्त देवाची भक्ती करता करता स्वत:च देव बनतो, तसे सुरेशराव संघकाम करता करता स्वत:च संघ झाले. संघ समजून घ्यायचा असेल तर संघाचा कार्यकर्ता समजून घ्यावा लागतो. संघ समजून घेण्यासाठी सुरेशरावांचे जीवन एक आदर्श पाठयपुस्तक आहे. संपूर्ण आयुष्यात संघकार्य सोडून त्यांनी दुसरे काहीच केले नाही. बँकेत खाते नाही, पुस्तके नाहीत, भाषणाच्या ध्वनिफिती नाहीत, फोटोही फारसे नाहीत. कधी काढू दिले नाहीत. आदर्शत्वाच्या सर्व कसोटया त्यांनी पार केल्या होत्या.

त्यांच्या परीसस्पर्शाने अनेकांच्या जीवनाचे सोने झाले. ते स्वभावाने कठोर होते, त्याचप्रमाणे साधेपणाची परिसीमाही त्यांनी गाठली होती.

सुरेशरावांच्या या आदर्शवत जीवनाचे अनुकरण केले पाहिजे, पण नक्कल करून चालणार नाही... तशी नक्कल करायला कोणाला जमणारही नाही. त्यांचा स्वभाव गंभीर होता. तसे ते रसिक होते. पण त्या रसिकतेत ते कधी गुंतून पडले नाहीत. रसिकतेला कर्तव्याच्या वर जाऊ दिले नाही. गप्पागोष्टीतही संघच विषय, वायफळ गप्पा नाहीत. स्वत:साठी कधी काहीही मिळवले नाही. वरवर कोकणातल्या नारळासारखे टणक वाटणारे सुरेशराव अंतरंगात मधुर खोबऱ्यासारखे होते, हे त्यांच्याजवळ गेल्यावरच कळायचे. 'दुरून डोंगर साजरे' अशी मराठीत म्हण आहे. पण सुरेशराव जवळूनसुध्दा साजरेच होते.

1969च्या संघ शिक्षा वर्गात ते मुख्य शिक्षक होते. त्या वेळी काही जणांकडून शिस्त मोडली गेली. त्या वेळी अस्वस्थ झालेले सुरेशराव मी बघितले आहेत.

सतत काहीतरी शिकणे हा त्यांचा स्वभाव होता. संघातला योगचाप (लेझीम) बदलला, तरीही त्यांनी नवीन पध्दत पूर्णपणे शिकून घेतली. नवीन स्वयंसेवकांकडून शिकून घेतले. ही मानसिकता शेवटपर्यंत ठेवली. सुरुवातीला जेमतेम 20 मिनिटे बोलू शकणाऱ्या सुरेशरावांनी स्वत:ला बदलले आणि आवश्यकतेप्रमाणे एक तासभरसुध्दा बोलायला शिकले. संघकार्यासाठी स्वत:ला अनुकूल बनवत दणकट शरीर आणि कणखर मन त्यांनी विकसित केले.

नेत्यावर अढळ विश्वास म्हणजे काय, हे सुरेशरावांनी दाखवून दिले. काहीही न खातापिता सलग 20-20 तास प्रवास करायचे. प्रवासाची चोख योजना. सहसरकार्यवाह असताना केंद्रीय बैठकीत तीन दिवस त्यांना कधी झोपलेले पाहिले नाही.


नर्मविनोद हे त्यांचे एक वैशिष्टय होते. अ.भा. किसान संघाचे ते काही काळ पालक होते. एकदा एका कार्यकर्त्याचे भाषण होते. सुरेशरावांनी सांगितले की ''मी तुझे भाषण ऐकायला येणार आहे.'' त्याला टेन्शन आले. तो म्हणाला की ''तुम्ही नका येऊ. तुम्ही सांगितले आहे अगदी तसेच बोलणार आहे.'' सुरेशराव म्हणाले - ''तेच ऐकायला येणार आहे की मी सांगितले तेच बोलतो आहेस की नाही!''

सुरेशराव कठोर होते, तसेच मनाने फारच हळवे होते. त्या व्यवहाराला आत्मीयतेचा ओलावा होता. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीत चित्रफितीचे काम त्यांच्याकडे दिले होते. तिच्या गुणवत्तेसाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले. संस्कार हे मनाच्या गाभ्यापर्यंत झाले पाहिजेत, याचे उदाहरण म्हणजे सुरेशराव केतकर.

अखेरच्या आजारपणात मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी वेळेपूर्वी स्नान करून, धूतवस्त्रे नेसून, गंध लावून व्हील चेअरवर तयार होते. बोलण्याचे मुद्दे काढून ठेवले होते. इतका व्यवस्थितपणा!

हल्ली अनेक लोक म्हणतात की ज्यांच्यासमोर वाकावे अशी माणसे आणि ज्यांच्या पायाला हात लावावे असे पाय मिळत नाहीत. माझा अनुभव अगदी वेगळा आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या आयुष्यात सुरेशरावांसारखी माणसे तर भेटलीच, तसेच त्यांच्या मार्गाने जाण्याची प्रेरणासुध्दा आम्हाला मिळाली.

त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन!

शब्दांकन : हर्षवर्धन खरे