चौकटीबाहेरची शाळा

12 Sep 2016 17:57:00

मोकळयावर सगळयाच गोष्टी मोकळया होतात. चार गटांचा चौकडा. मी मध्ये थांबते. भिंती नसल्याने सगळयाच गटांवर लक्ष ठेवणं सोपं जातं... सर असले, तर बहुधा हीच रचना असते वर्गाची. अगदी प्रार्थनेलाही गोलातच उभी राहतात मुलं. मला वाटतं नियम मुलं घडण्यासाठी, शिकण्यासाठी आहेत. ज्या रचनेतून मुलं चांगली शिकतात ती रचना हा नियम मानू या. सर, काळ बदललाय. आपण किती मागास आहोत.


गळयांनी बदल स्वीकारला, तर खूप मजा येते. सगळे जण बदल केव्हा स्वीकारतील? सगळे एका व्यासपीठावर येऊन विचार केला, तर! असं घडतंच असं नाही. मग काम करताना खूप अडचणी येतात. अधिकारी क्षेत्रात आपल्याकडे एक चढण आणि उतरण असते. अधिकारी एकमेकांच्या संपर्कात असतात तेव्हा त्यांना तिथले प्रोटोकॉल, चढण यांचं भान असतं. पण अधिकारी नसलेल्या एका समूहापुढे जेव्हा एक अधिकारी (पद कोणतंही असो) येतो, तेव्हा तो आपण अगदी उच्चपदस्थ अधिकारी आहोत असं वावरतो आणि ते स्वाभाविक असावं. हे कागद, ते कागद, ही माहिती, ती माहिती अशी भराभर मागणी करतो. समोरच्यांची धांदल उडते. मनात एक भीतीच वावरू लागते.

मला वाटतं, अशा वेळी अधिकाऱ्यांनी दोन भाग करावे कामाचे. शिक्षक म्हणून समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्यांचं काम समजून घेणं, काहीच काम होत नसेल तर समजावून देणं, प्रात्यक्षिक दाखवणं, त्यांच्या नोंदी घेणं, कामात बदल सुचवणं. दुसरा भाग म्हणजे तेव्हा कागदपत्रांबद्दल भेट देणं, सतत कागद न मागता काय काय कागद केव्हा केव्हा लागणार आहेत याची माहिती वर्षारंभी देणं. यामुळे कदाचित शिक्षकांनाही अधिक काम करायला उमेद मिळेल. आपल्या या अध्यापनीय कामाची नोंद घेतली जातेय याचा आनंद होईल. कागदापेक्षा मूल काय घडतंय याचं खरं रूप समजेल. दर्जा सुधारण्याला सुरुवात होईल. उगाचच सगळयांच्या मनात कामाचं एक साचेबंद रूप तयार झालंय. कुणी स्वत:ला बदलायचं ठरवलं तरी भीती वाटते, तर कुणी सांगितलंय हे नसते बदल करायला? आतापर्यंत शिकवत आलोच ना, शिकतायत ना पोरं? अशी धारणा ठाम होते. 'साहेबांना जे लागतं ते करावं' हा विचार पक्का होतो.

अशा वेळी कधीकधी ज्या गमती घडतात, त्याही बरंच काही शिकवून जातात. त्या शाळेत मुलं छान गोलात बसली होती नि बाईसुध्दा मुलांच्यात होत्या. बाईंनी पंजाबी ड्रेस घातल्याने मुलं त्यांना ताई म्हणत होती. बाईही नाचत होत्या. मुलंही नाचत होती. सगळे खूप आनंदात होते. खेळ चालले होते. माहोल आनंदाचा होता. इतक्यात साहेब आले. आले ते तसेच ऑफिसमध्ये. बाईंना मुलं सोडेनात. नवा खेळ दाखवत बाईंनी स्वत:ची सुटका केली नि बाई कार्यालयात आल्या. दोन-शिक्षकी शाळा. एक शिक्षक रजेवर, पण बिघडलं काहीच नाही. सगळे वर्ग गुंतलेले होते. ''तुम्हाला मी आलेलो कळलं नाही? ऑफिसमध्ये यायला किती वेळ लागला?''  ''येतच होते. मुलांना मध्येच सोडता येईना. मुलंही सोडेनात. सॉरी.''

''मुलांना काय कळतंय साहेब आलेले! तुम्हाला कळायला हवं. नवीन आहात. शिकून घ्या. पुन्हा असं करू नका.'' बाई काहीच बोलल्या नाहीत. ''कागद आज देणं अवघड आहे. उद्या सर आले की ते मुलांकडे वळतील. मी कागद करून देईन...'' ''आज हवे होते.'' ''सर, मुलांना वेगळा उपक्रम दिलाय. मध्ये ब्रेक नको. चला तुम्हीसुध्दा.'' बाई होकार-नकाराची वाट न बघता बाहेर पडल्या. मागे साहेब. ''सर, पहिला गट तोंडी गणित तयार करतोय. दुसरा गट शब्दांची आगगाडी करतोय. तिसरा गट वाक्यांची ट्रेन करतोय. चौथा गट गोष्ट तयार करतोय...'' मुलं इतकी मजेत होती की कुणी आलंय याकडे त्यांचं लक्षही नव्हतं.

''हे काय? मुलांना वर्ग सोडून बाहेर का आणलंत? कुणाला काही लागलं तर! लक्ष कसं ठेवणार?'' ''उलट सर, मोकळयावर सगळयाच गोष्टी मोकळया होतात. चार गटांचा चौकडा. मी मध्ये थांबते. भिंती नसल्याने सगळयाच गटांवर लक्ष ठेवणं सोपं जातं... सर असले, तर बहुधा हीच रचना असते वर्गाची. अगदी प्रार्थनेलाही गोलातच उभी राहतात मुलं. फक्त तेव्हा गोल मोठा असतो.'' साहेब काही बोलले नाहीत. पण त्यांना वर्ग सोडून बाहेर आणणं पसंतही पडलं नाही. साहेब गटविकास अधिकारी. केंद्रप्रमुख आलेच तेवढयात. पुन्हा दोघं ऑफिसमध्ये. ''सर, या खूप ऍक्टिव्ह आहेत. प्रयोगशील आहेत...'' ''हो का?'' ''यामुळे काय साध्य झालं याची नोंदही ठेवतात.'' ''कागदांच्या बाबतीत काय म्हणाल्या?'' ''उद्या देते.'' ''देणार नाहीत...'' ''रेकॉर्ड कसं करायचं?'' ''हं...''

''हे असं गोलात बसणं, मुलांना सारखं वर्गाबाहेर काढणं बरोबर नाही. पोषाखही बघा...'' ''सर, तुम्ही बोला त्यांच्याशी! त्यांची मत समजून घ्या. अर्थात शाळा सुटल्याशिवाय त्या तुम्हाला वेळ नाही देणार. शेवटचा काही वेळ कम्पल्सरी खेळासाठी असतो. तेव्हा बोलू...'' ''साहेब मी का त्या?'' पुन्हा शांतता.

मुलं खेळायला मोकळी झाली. बाई ऑफिसमध्ये येताना गट बदलून गटप्रमुख नेमून आल्या. गटप्रमुखांना त्यांची जबाबदारी माहीत होती. त्यामुळे सगळया वातावरणातच समजूतदारपणा होता. ''नमस्कार सर! काय म्हणताय?'' ''हे सगळंच वेगळं आहे बाई इथे. हे आपल्या नियमात बसतं का? तुमचा पोषाख, मुलांचं वागणं, मुलांची बसण्याची रचना...'' ''सर, मला वाटतं नियम मुलं घडण्यासाठी, शिकण्यासाठी आहेत. ज्या रचनेतून मुलं चांगली शिकतात ती रचना हा नियम मानू या. सर, काळ बदललाय. आपण किती मागास आहोत. हा पोषाख मुलांबरोबर खेळायला, धावायला, ऊठबस करायला सोपा जातो. कम्फर्टेबल वाटतं. सर मुलंही आता आईला, ताईला याच पोषाखात बघतात... सर, गोलात बसलं की मुलांना मुलांची तोंडं दिसतात. पाठ नाही. चेहरा बोलतो. कळतंय, न कळतंय समजतं. सगळे जण एकमेकांकडे बघतात, लक्ष ठेवतात, काळजी घेतात. वेडंवाकडं वागलं कुणी तर ओरडतात. छान वाटतं मुलांना... मुलं मुलांची, मुलांकडून शिकतात. मी म्हणेन, तुम्ही किमान एक दिवस आमच्याबरोबर घालवावा. तुमचेही विचार कळतील, तुमचा रोलही आता बदलला आहे...''

हे म्हणजे अतीच होतं. एक नवागत शिक्षिका तथागत साहेबांना त्यांचा रोल सांगणं, आपल्या कामामागची भूमिका सांगणं... नाही का?

9403693275

renudandekar@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0