मधुमेहाचं वर्गीकरण

13 Sep 2016 17:32:00

मधुमेह म्हणजे मधुमेह, त्याचं कसलं वर्गीकरण? असा विचार कुणाचाही मनात डोकावू शकतो. ते बरोबरदेखील आहे. म्हणूनच सुरुवातीलाच हे स्पष्ट करायला हवं की रक्तातलं ग्लुकोज वाढणं ही परिणती आहे. ग्लुकोज वाढण्यामागे अनेक कारणं, अनेक आजार असू शकतात. आपण जेव्हा त्या कारणांचा शोध घेतो, तेव्हा मधुमेहाचा उपचार करणं अधिक सोपं होतं. म्हणून वैद्यकीय तज्ज्ञांनी हा घाट घातला आहे. तर चला, आज या वर्गीकरणातून आपल्या हाती काही लागतंय का, याचा धांडोळा घेऊ या.


धुमेह का होतो, याकडे पाहिलं की त्याच्या वर्गीकरणाचं रहस्य उलगडायला फारसे श्रम पडत नाहीत. मधुमेह का होतो हे पाहताना या कारणांचा सविस्तर ऊहापोह आपण केलेला आहेच. त्यांची थोडीशी उजळणी करू.

इन्श्युलीन रेझिस्टन्स हा शब्दसमुच्चय तुम्हाला नवीन नाही. पुरेसं इन्श्युलीन असूनदेखील ते नीट काम करत नसल्याने जी परिस्थिती उद्भवते, त्या संदर्भात हा शब्दप्रयोग केला जातो. तो झाला म्हणजे इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशींवर अधिक इन्श्युलीन बनवायचा ताण पडतो. कारण काहीही करून रक्तातलं ग्लुकोज नॉर्मल राखणं महत्त्वाचं असतं. हा ताण जेव्हा असह्य होतो आणि इन्श्युलीन बनवायची बीट पेशींची क्षमता मागणीच्या तुलनेत कमी पडते, त्या वेळेस मधुमेह होतो हे आपण पाहिलं आहे. मधुमेहाचं वर्गीकरण या दोन आणि दोनच संकल्पनांभोवती फिरतं. त्यात एकतर इन्श्युलीन रेझिस्टन्स नॉर्मल असून इन्श्युलीन बनवायची बीटा पेशींची क्षमता कमी झालेली असल्याचं दिसतं किंवा बीटा पेशी नॉर्मल असूनसुध्दा आत्यंतिक इन्श्युलीन रेझिस्टन्समुळे भरमसाठ मागणी वाढली, म्हणून त्या कमी पडल्या, असं कळतं. साहजिकच ज्या ज्या आजारांमध्ये या दोनांपैकी एक परिस्थिती उद्भवेल, त्या त्या आजारांमध्ये मधुमेह डोकावेल, हे कळणं कठीण जात नाही.

आता मधुमेहाच्या वर्गीकरणावर एक नजर टाकू, म्हणजे ही गोष्ट चांगलीच अधोरेखित होईल. मधुमेह चार गटांत विभागला गेला आहे. प्रथम अर्थातच टाइप वन मधुमेह. यात इन्श्युलीन बनवणाऱ्या स्वादुपिंडातल्या बीटा पेशींवर आपलीच रोगप्रतिकारशक्ती हल्ला करते आणि त्या पेशींचा नायनाट करते. पेशीच नाहीत, तर इन्श्युलीन कुठून येणार? म्हणजे इथे इन्श्युलीन रेझिस्टन्स असो की नसो, ज्या मंडळींमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यांना आज ना उद्या मधुमेह होणारच, हे निश्चित आहे. प्रश्न राहिला तो या बीटा पेशी किती काळात नष्ट होतात, हा. बहुधा त्या काही दिवसांमध्येच नष्ट होतात. त्यामुळे टाइप वन मधुमेह केवळ काही दिवसांमध्ये होतो. अचानक एक दिवस मुलं खूप लघवी करू लागतात. त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि ती बेशुध्द पडतात.

याचा एक उपगट आहे. त्याला 'लेटन्ट ऑॅटोइम्यून डायबिटिस ऑॅफ द ऍडल्ट' किंवा 'लाडा' (LADA) असं म्हणतात. बीटा पेशी नष्ट होण्याची प्रक्रिया तीच, फक्त वेग कमी. काही दिवसांच्या ऐवजी या पेशी काही महिन्यांत किंवा वर्षात नष्ट होतात, एवढाच काय तो फरक. म्हणूनच लाडा झालेल्या मंडळींमध्ये मधुमेह अचानक उद्भवत नाही. ही मंडळी अचानक बेशुध्द होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाहीत.

दुसरा गट अर्थातच टाइप टू मधुमेहाचा. आपल्याकडे 98 टक्के लोकांत दिसणारा. यात बीटा पेशी इन्श्युलीन रेझिस्टन्सवर मात करण्याइतपत इन्श्युलीन बनवू शकत नाहीत, तेव्हा मधुमेह होतो.

वर्गीकरणाच्या तक्त्यात तिसरं स्थान आहे ते गरोदरपणातल्या मधुमेहाचं. खरं तर यात टाइप टू मधुमेहाप्रमाणेच इन्श्युलीन रेझिस्टन्स आणि इन्श्युलीन बनवायची बीटा पेशींची क्षमता यांचं गणित चुकलेलं असतं. परंतु वर्गीकरणाच्या तक्त्यात याला वेगळा पाट दिला गेलाय. याचा कारण म्हणजे मधुमेहाच्या इतर कारणांपेक्षा हा वेगळा आहे. यात निदान करण्याची पध्दत, उपचार, स्त्रीवर तसंच गर्भावर होणारे परिणाम वगैरे निराळे असल्याने असं करण्याची गरज पडली आहे. पुन्हा यातही उपगट आहेत. आधीपासून मधुमेह असलेली स्त्री गरोदर राहणं आणि गरोदरपणात पहिल्यांदा मधुमेह असल्याचं दिसणं या दोन भिन्न गोष्टी झाल्या. त्यामुळे त्यांच्यात थोडातरी फरक करणं आवश्यक ठरतं.

आता राहिला तो चौथा गट, सेकंडरी मधुमेहाचा. यात ज्या ज्या कारणांनी मधुमेह होऊ शकतो, त्या त्या सगळया आजारांना कोंबण्यात आलंय. यादी छाती दडपून जाईल इतकी मोठी आहे. पण तसं घाबरून जाण्याचं जराही कारण नाही. जेवढी ही यादी लांबलचक आहे, तितक्या प्रमाणात हे प्रकार प्रत्यक्षात दिसत नाहीत. जेमतेम एक-दोन टक्के मधुमेही लोकांमध्ये यापैकी कुठलातरी प्रश्न दिसतो. यातले काही आजार तर इतके दुर्मीळ आहेत की नुसती मधुमेहाची प्रत्यक्ष प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या आयुष्यातदेखील तशी एखादी केस येतेच असं नाही.


या यादीची सुरुवात बीटा पेशींच्या काही जेनेटिक आजारांनी होते. बीटा पेशींच्या कामात जे प्रोटीन्स अथवा एन्झाइम्स मदत करतात, त्यांच्या जीन्समध्ये कोणतातरी बिघाड झाला की असं होऊ शकतं. जीन्समध्ये असलेला दोष प्रोटीनच्या अथवा एन्झाइमच्या जडणघडणीत उतरतो. ती मंडळी आपलं काम चोख बजावू शकत नाहीत. त्यामुळे असं होतं. पुढे कधीतरी आपण मोडी वगैरे प्रभृतींची ओळख करून घेणार आहोत. हे सगळे या गटाचे रहिवासी आहेत.

जीन्समध्येच दोष असलेला यादीतला दुसरा उपगट म्हणजे इन्श्युलीनचं कामकाज नीट चालवणाऱ्या प्रोटीन्सच्या जीन्समध्ये असणारा दोष ज्या आजारांत दिसतो, अशा आजारांचा समूह. 'लेप्रेचावनिझ्म' असं काहीसं अडनिडं नाव असलेला पण खूपच दुर्मीळ आजार या गटात मोडतो. तसे या गटात दिसणारे बहुसंख्य आजार दुर्मीळच आहेत. परंतु ज्या बाळांमध्ये लेप्रेचावनिझ्म दिसतो, ती फार काळ - म्हणजे जेमतेम दीड-दोन महिनेदेखील जगू शकत नाहीत, म्हणून त्याची आठवण झाली, इतकंच. 

बीटा पेशी स्वादुपिंडात असतात. त्यामुळे स्वादुपिंडात आजूबाजूला काही घडत असेल, तर त्या कशा सुखी राहणार? स्वादुपिंडाच्या अनेक आजारांत मधुमेह होतो तो बीटा पेशी बळी पडल्यानेच. स्वादुपिंडाचा दाह किंवा वैद्यकीय भाषेतला 'पँक्रियाटायटिस' हा या आजारातील लीडर. दारूच्या आहारी गेलेल्या अनेकांना पँक्रियाटायटिस होत असल्याने तो तसा दुर्मीळ वगैरे नाही. शिवाय काही कारणाने स्वादुपिंडाला इजा झाली, कॅन्सरसारखा आजार झाला, तरी त्याची परिणती मधुमेहात होऊ शकते. याही बाबी दुर्मीळ नाहीत. मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या देशात दिसणारा फायब्रोकॅल्क्युलस पँक्रियोपॅथी हा आजार. दक्षिणेकडच्या राज्यांत हा बऱ्यापैकी दिसतो. तिथल्या विशिष्ट आहाराशी याचा संबंध आहे, असा संशय व्यक्त केला जातोय. स्वादुपिंडाच्या मारेकऱ्यांमध्ये इतर काही आजार आहेत. ते अगदीच दुर्मीळ नसले, तरी अपवादानेच दिसतात.

पुढचा उपगट आहे औषधांचा. यात प्रमुख आहे ते स्टिरॉइड. काही अपरिहार्य कारणाने स्टिरॉइड घ्यावं लागलं, तर गोष्ट निराळी. परंतु कित्येक लोक जाणतेपणी किंवा अजाणतेपणी स्टिरॉइड घेतात. विशेषत: वजन वाढवण्यासाठी ते घेणारी मंडळी कमी नाहीत. अशा लोकांनी त्यांना मधुमेह आणि रक्तदाब होऊ शकतो, हे लक्षात घेऊनच स्टिरॉइड घ्यायचं की नाही ते ठरवावं. काही आयुर्वेदिक औषधांमध्येही स्टिरॉइड असल्याचं आढळून आलं आहे. रक्तदाबावरच्या काही औषधांमुळेसुध्दा मधुमेह व्हायची शक्यता बळावते. सुदैवाने हा गंभीर नसतो. तरीही तुम्ही तुमच्या डॉक्टरांसोबत चर्चा केलेली बरी.

काही संसर्गदेखील (इन्फेक्शन्सदेखील) मधुमेहाला निमंत्रण देऊ शकतात. त्यात जर्मन मीझल्स आणि सायटोमेगॅलोव्हायरस हे व्हायरल आजार महत्त्वाचे आहेत.

बीटा पेशी आणि त्यातून स्रवणारं इन्श्युलीन हा आपल्या शरीरातल्या हॉर्मोन सिस्टिमचाच एक भाग आहे. त्यामुळे इतर हॉर्मोनच्या ग्रंथींमध्ये दोष निर्माण झाला, तर कुठेतरी मधुमेहाला निमंत्रण मिळू शकतं. अर्थात यात इन्श्युलीन रेझिस्टन्स वाढवणाऱ्या हॉर्मोन्सचा भरणा जास्त आहे. बहुतेक आजारात शरीर अधिक स्टिरॉइड बनवतं आणि त्यामुळे मधुमेह होतो, असं दिसतं. परंतु थाययरॉईड ग्रंथीचा स्राव वाढल्याने होणारा 'हायपरथायरॉईड' हा प्रश्न मधुमेहाचं कारण ठरू शकतो, हे आपल्याला माहीत हवं.

आपली रोगप्रतिकारशक्ती कधीकधी इन्श्युलीन रिसेप्टरला धोका देते. इन्श्युलीन पेशीला जुडण्यासाठी या रिसेप्टरची आवश्यकता असते. तिलाच धोका झाला, तर इन्श्युलीन आपलं काम करूच शकणार नाही आणि आपल्याला मधुमेह होईल. सुदैवाने हा प्रकार फारच दुर्मीळ आहे म्हणून बरं.

जीन्समुळे होणाऱ्या डाउन्स सिंड्रोमसारख्या काही आजारांतदेखील मधुमेह होण्याची शक्यता बळावते. तेही तसे क्वचितच दिसतात. त्यामुळे त्यांचीही चिंता करण्याचं तसं कारण नाही.

अबब! मधुमेहाच्या वर्गीकरणाची केवढी ही यादी! यातले आजार सररास दिसले असते, तर मनुष्य जमातीची काही खैर नव्हती.   

9892245272

 

Powered By Sangraha 9.0