स्थितप्रज्ञता शिकवणारा'कासव'

विवेक मराठी    31-Oct-2017   
Total Views |

 

 

'कासव' पाहताना मनात एक प्रश्न सातत्याने येत होता, आपल्या अंडयांचे संरक्षण करण्यासाठी किनाऱ्यावर राहू न शकणाऱ्या किंवा आपल्या पिल्लांना पुन्हा कधीच भेटू न शकणाऱ्या मादी कासवापेक्षा आपले मानवी दु:ख मोठे असेल का? दुसऱ्याच्या मोठया रेघेने आपली रेघ छोटी होऊ शकते. आणि दुसऱ्याच्या दु:खाची रेघ छोटी करताना आपल्या दु:खाची रेघ मिटूनही जाऊ शकते. आजच्या काळात ही जाणीव हरवत चालली आहे. आपला बाहेरचा परीघ वाढतोय आणि मनाचा परीघ मात्र संकुचित होत चालला आहे. आपल्याला नेमके काय हवे आहे, आपण नक्की कशाच्या मागे धावतोय हेही कळेनासे होत आहे. बाहेर वेगाने खूप बदल घडत आहेत आणि त्या गतीशी जुळवून घेण्यासाठी धावणारे मन अधिक असंवेदनशील तर बनत नाही ना, अशी भीती निर्माण होत आहे.

कुरळया केसांचा, नाकेला तरुण, आपल्यातच हरवलेला, आजूबाजूचे भान नसलेला किंवा ते ठेवण्याची गरजही वाटत नसलेला आणि खोल गेलेल्या डोळयात फक्त एकच भाव.... निराशेचा!! मानवेंद्र... मानव... निश्...! समुद्रकिनाऱ्यावरच्या मोठ्ठाल्या कासवाच्या कवचावर डोके ठेवून पहुडलेला... त्या कवचाची निश्चलता, शांतता अनुभवणारा... एरव्ही त्याच्या स्वत:च्या आत केवळ उसळणाऱ्या लाटाच असाव्यात.. असंबध्द, नकारात्मक विचारांच्या..! अशा लाटांचा सामना करण्याची वेळ अनेकांच्या आयुष्यात येते. काही त्या प्रवाहात खोल आतपर्यंत ओढले जातात, कोणाला तरी त्यातून बाहेर काढणारा आधार मिळतो, तर कोणी आपली पूर्ण शक्ती लावून त्यातून किनाऱ्याला लागतो. निराशा... अंधाराइतकीच दाट... गूढ... भयावह! या अंधारातून बाहेर पुन्हा प्रकाशात येण्याची प्रक्रिया अधोरेखित करण्याची प्रक्रिया 'कासव'चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

'कासव'विषयी लिहिण्यास तसा बराच उशीर झालाय. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर लगेचच त्याची दखल घ्यावीशी वाटली होती. मात्र चित्रपट पाहण्याचा योग जुळला नव्हता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो पाहता आला. कथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय सर्वच दृष्टीने चित्रपट उत्कृष्ट झाला आहे. त्यातही सिंधुदुर्गातील समुद्रकिनारा आणि त्याला कॅमेऱ्याची मिळालेली उत्तम साथ यामुळे चित्रपटात साधेपणा असूनही अनेक दृश्ये सुंदर चित्रित झाली आहेत. 'कासव' प्रदर्शित झाल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत हा महत्त्वाचा विषय पोहोचू शकेल. गल्लाभरू चित्रपटांचे ग्लॅमर या चित्रपटाला नसल्याने अजूनही फार कमी चित्रपटगृहांतून तो प्रदर्शित होत आहे. लवकरच तो छोटया पडद्यावरही दाखवला जाईल. चित्रपटाचे नुसते रसग्रहण हा या लेखाचा उद्देश नाही, तर ज्या विषयावर हा चित्रपट आहे त्यावरचे विचारमंथन करण्यासाठी हा लेखप्रपंच आहे.

या तंत्रज्ञानाच्या युगात जगत असल्याचा आपल्याला कोण अभिमान असतो. प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर, दूरदूरच्या व्यक्तींना जोडू शकणारी संपर्काची अद्भुत, तत्पर साधने, व्यक्त होण्यासाठी ई-जगाचे मुक्त व्यासपीठ. माणसा-माणसांना जोडणारे इतके दुवे तयार होऊनही काहीतरी बिघडलेले आहेच. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार भारतातील 5 कोटी लोक नैराश्यग्रस्त आहेत. त्यातही तरुणांची संख्या लक्षणीय आहे. तरुणांमधील वाढत्या आत्महत्या वारंवार विचार करायला लावत आहेत. पाश्चात्त्य देशांतील स्थिती तर याहीपेक्षा वाईट आहे. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळेच कदाचित सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्गज दिग्दर्शक जोडगोळीला आणि स्वत: मानसोपचारतज्ज्ञ असलेले निर्माता डॉ. मोहन आगाशे यांना या विषयावर चित्रपट करावासा वाटला असावा. याआधीच्या'अस्तु'मध्ये या टीमने वृध्दापकाळातील स्मृतिभ्रंशावर प्रकाश टाकला होता. नैराश्याची समस्या ही त्या मानाने अधिक व्यापक - म्हणजे पौगंडावस्थेपासून पुढील सर्व वयोगटांमध्ये हमखास आढळणारी.

मन या अमूर्त संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न संत-महंतापासून ते शास्त्रज्ञांपर्यंत अनेकांनी केला. तसा तो या चित्रपटाच्या निमित्तानेही केला गेल्याचे दिसते. मन दुखावते म्हणजे शरारातील कोणता अवयव दुखावतो? मनाला बरे वाटते म्हणजे नक्की कोणत्या अवयवाची वेदना जाते? माझे मन मला सांगते, पण त्याचा आवाज ऐकू येत नाही, मन घाबरते, बावरते, खुलते, उदासीन होते असे दैनंदिन जीवनात सतत बोलले जाते. मात्र या मनाचे आपल्या शरीरातील नक्की स्थान निश्चित करता येत नाही. मेंदूचे विविध भाग, मज्जारज्जूंचे जंजाळ या सगळयात ते अदृश्य रूपात असावे. त्याची जाणीव हाच त्याच्या अस्तित्वाचा पुरावा. मनाच्या विकारांवर उपचार करणे हे त्यामुळेच अधिक आव्हानात्मक आहे. मनोविकार ओळखणे हे त्याहीपेक्षा कठीण. नैराश्य हा मनोविकार आहे हे अद्यापही अनेकांना उमजत नाही. नैराश्य येण्यामागच्या कारणांचा विचार केला, तर मेंदूतील 'केमिकल लोच्या'इतकेच अन्य घटकही त्याला अधिक जबाबदार असल्याचे दिसते. सभोवतालची वेगाने बदलणारी परिस्थिती, कौटुंबिक वातावरण, बिघडलेले नातेसंबंध, सातत्याने येणारे अपयश, प्रेमभंग, अपराधीपणाची भावना, भीती यांपैकी कोणत्याही कारणांमुळे नैराश्य येऊ शकते.

 वेगाने बदलणारी जीवनशैली नैराश्याचे प्रमुख कारण - डॉ. राजेंद्र बर्वे,  मानसोपचारतज्ज्ञ 

सध्या समाजात, त्यातही तरुणांमध्ये नैराश्यग्रस्ततेचे प्रमाण वाढल्याचे दिसते. त्यामागची कारणे काय आहेत? बदलती जीवनशैली त्यासाठी कितपत कारणीभूत आहे? 
तरुणांमध्येच नव्हे, तर सर्वच वयोगटांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. विशेषतः किशोरवयीन मुला-मुलींमध्येही नैराश्यग्रस्ततेचे प्रमाण वाढत आहे. जे सामाजिक बदल घडत आहेत, त्यांचा परिणाम आपल्याला वेगळया प्रकारे जाणवत आहे. जीवनमान बदलले आहे. अनेक प्रकारची साधने आपल्या हाती आली आहेत. याचबरोबर जीवनाची गती फार वाढली आहे आणि कोणत्याही गोष्टीसाठी ऍडजस्टमेंट करण्याचा अवधी मिळत नाही. सर्वसाधारणपणे नैसर्गिक बदल हा हळूहळू, एका मर्यादित स्वरूपात होत असतो, त्या मानाने सध्या होत असलेले बदल हे खूपच वेगाने होत आहेत. आपल्याला काही समजण्याच्या आधीच हे बदल होत आहेत. त्यामुळे या बदलाशी जुळवून घेणे जमत नाही. या बदलाशी जुळवून घेण्यासाठी लागणारी मानसिक समजही आपल्याकडे नाही आणि आपले मेंदू तेवढे तयारही नाहीत. आपण वापरत असलेला मानवी मेंदू अशा प्रकारच्या झटपट बदलाला स्वीकारू शकत नाही. त्यामुळे 'मालऍडॉप्टेशन' आणि 'मालऍडजस्टमेंट' सगळीकडे दिसून येते. घटस्फोट किंवा आत्महत्या यांचे वाढते प्रमाण हे त्याचेच परिणाम आहेत. हे बदल स्वीकारू शकत नसल्यामुळे आपली शक्ती कमी पडते आणि त्यातून नैराश्याचा/डिप्रेशनचा अनुभव यायला लागतो. केवळ बदलती जीवनशैलीच याला कारणीभूत आहे असे आपण म्हणू शकत नाही, मात्र ते प्रमुख कारण आहे. आपल्या मेंदूची जनुकीय संरचना आणि बाहेरचे वातावरण हे एकत्र येतात (आम्ही त्याला एनिजेनेटिक असे संबोधतो) तेव्हा नैराश्याची लक्षणे दिसू लागतात. 

नैराश्याची लक्षणे काय असतात

कमीत कमी 2-3 आठवडे मनात उदास, दु:खी, निराश असे भाव येणे. नेहमीच्या व्यवहारात आपण करत असलेल्या छोटया छोटया गोष्टींमधील स्वारस्य कमी होणे. एरव्ही आपण छोटया छोटया गोष्टीतून आनंद घेत असतो. आपली नेहमीची बस जरी वेळेवर मिळाली, तरी आपल्याला आनंद होतो. नैराश्यामध्ये अशा छोटया छोटया गोष्टींमधील आनंद, रस कमी होतो. वारंवार रडू येते, चिडचिड होते, झोप कमी लागते किंवा जास्त लागते. मनात सातत्याने नकारात्मक विचार दाटून येतात आणि त्या नकारात्मक विचारांचे काय करायचे ते समजेनासे होते. शारीरिक तक्रारीदेखील  जाणवायला लागतात. जुन्या जुन्या गोष्टी आठवून अपराधी वाटायला लागते. लक्ष एकाग्र करता न येणे हे नैराश्याचे आणखी एक लक्षण आहे. ही सर्व क्लिनिकल डिप्रेशनची लक्षणे आहेत. पूर्वी स्पर्धात्मक वातावरणामुळे येणारा ताणतणाव एका विशिष्ट वयोगटापुरताच मर्यादित होता. ही वयोमर्यादा आता खूप खाली आली आहे. मुलांना किशोरवयातच तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी पालकांनी मुलांच्या वागण्यात काही बदल आढळल्यास वेळीच लक्ष द्यावे, त्यांना समजून घ्यावे.  आपल्या रोजच्या जगण्यातही छोटया छोटया गोष्टीतून आपल्याला नैराश्य येते, चिडचिड होते. मात्र लवकरच त्याचा विसर पडून आपण पूर्वपदाला येतो.
 नैराश्य हा मानसिक आजार आहे का
नैराश्य हा 100 टक्के मानसिक आजार आहे. मात्र लोकांना त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. कोणी थोडे निराश दिसले की लोक त्याला सल्ले द्यायला सुरुवात करतात किंवा त्याने आपली विचारसरणी बदलली पाहिजे असा आग्रह करू लागतात. खरे तर अशा लोकांवर मानसोपचार होणे गरजेचे असते. कारण नैराश्याची तीव्रता लक्षात घेऊन त्यानुसार मानसोपचारतज्ज्ञ उपचार करतात. 
आपल्या स्वत:मध्ये किंवा जवळच्या व्यक्तीमध्ये नैराश्याची लक्षणे आढळल्यास काय करावे?
 
अनेकदा स्वत:मधील नैराश्याची लक्षणे स्वत:च्याच लक्षात येत नाहीत. मात्र आपले जवळचे मित्र,कुटुंबीय, सहकारी आपल्या वृत्तीत झालेला बदल लक्षात आणून देऊ शकतात. नैराश्यग्रस्त माणसाचा चेहरा मलूल, निरुत्साही दिसतो. सुरुवातीला ती व्यक्ती आपल्यातील हा बदल नाकारू शकते. मात्र अशी लक्षणे जाणवायला लागली की त्याचा विचार करा. त्याची दखल घ्या, ते नाकारू नका. आपल्या आजूबाजूच्या, जवळच्या व्यक्तीत असा बदल झाल्याचे आढळल्यास सहजपणे, शांतपणे त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याच्याशी संवाद साधावा. आपण त्याच्या वागण्याचे अर्थ लावायला जातो, ते चुकीचे आहे. मात्र हा संवाद अतिशय ठामपणे केलेला असावा. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करू नये, त्याची उलटतपासणी करू नये. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण न करता त्याला सहकार्य करावे. वैद्यकीय उपचार हे गरजेचेच आहेत. हल्ली लोक डॉक्टरपेक्षा गूगलवर जास्त विश्वास ठेवतात. अनेकदा इंटरनेटवर दिलेले सल्ले हे फारच कॉमन सेन्सवर आधारलेले असतात आणि ते सार्वत्रिक असतात. मात्र डॉक्टर प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याच्यावर उपचार करतात. तसेच डॉक्टर तुमच्याशी संवाद साधून अधिक चांगल्या प्रकारे निदान करू शकतात.

 

 

एकाकीपणाच्या भावनेतून येणारे नैराश्य आणि नैराश्यामुळे वाटणारे एकटेपण या परस्पर संलग् अवस्था. आजूबाजूला खूप माणसे असूनही अनेकदा हे एकाकीपण जाणवते. आपले कुणीच नाही असे वाटायला लागते. जगणे निरर्थक वाटायला लागते. असा पॅच कधी ना कधी तरी प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. या जाणिवेची तीव्रता आणि दीर्घता जितकी जास्त, तितकी ती नैराश्याच्या वाटेवर दूरपर्यंत घेऊन जाते. जानकी (इरावती हर्षे) ही नैराश्याच्या अशाच लाटेत वाहून प्रयत्नाने किनाऱ्यावर पोहोचलेली. सर्व भौतिक सुखसोयी, कुटुंब असूनही एकाकीपणाचा अनुभव घेणारी जानकी आपल्या मनाचे समाधान शोधत कोकणातील या समुद्रकिनारी येऊन स्थिरस्थावर होते. तेथील ऑलिव्ह रिडले या कासवांच्या प्रजातीच्या संवर्धनात ती दत्ताभाऊंच्या (डॉ. मोहन आगाशे) मार्गदर्शनाखाली काम करू लागते. या कामामुळे तिला मानसिक अस्वस्थतेतून बाहेर पडण्यास मदत होते. स्वत:कडे आणि आजूबाजूच्या परिस्थितीकडे तटस्थपणे पाहण्याचा दृष्टीकोन तिला मिळतो. आपल्या पूर्वानुभवातून, तिच्या घरी पाहुणा बनून राहिलेल्या मानवची (आलोक राजवाडे) अवस्था ती समजून घेते. त्याच्या त्या अवस्थेच्या कारणांमागचा शोध घेत राहते. त्याच्या प्रतिसादावर अवलंबून न राहता संयमाने त्याच्याशी संवाद साधत राहते.

मानव मात्र बराच काळ तिच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नाही. त्याचे अबोलपण, सर्वांपासून दूर, उदास राहणे, स्वत:ची ओळख सांगावीशी न वाटणे, संवादाची भीती वाटणे, स्वत:विषयी केवळ नकारात्मक बोलणे, शब्दाविना नुसतेच सूर आळवणे, छोटयाछोटया गोष्टीवरून व्हॉयलंट होणे, त्याने केलेला आत्महत्येचा प्रयत्न या साऱ्या गोष्टी त्याच्या आंतरिक वेदनेची तीव्रता दाखवतात. त्याच्या त्या अवस्थेचे कोणतेही ठळक कारण दिसत नाही. जानकीसोबत त्याच्या सावत्र आईच्या (रेणुका दफ्तरदार) झालेल्या भेटीत किंवा एका प्रसंगात जानकीच्या प्रश्नांना मानवने दिलेल्या अर्धवट उत्तरांत संभावित कारणांचे कोलाज मात्र दिसते. लहान वयात हरवलेले मातृछत्र, वडिलांपासून दूर राहावे लागणे, कळत-नकळत हातून घडलेल्या चुकांमुळे आलेली अपराधीपणाची भावना, मित्रमंडळींचे त्यांच्या त्यांच्या आयुष्यात व्यग्र होणे,काहीही करण्याची अनिच्छा... अशी अनेक किंवा यातील एखादे कारण त्याच्या त्या अवस्थेला कारणीभूत असू शकते.

जानकीचा ड्रायव्हर आणि साहाय्यक यदू (किशोर कदम), नोकर बाबल्या आणि छोटा अनाथ मुलगा परशू (ओम्कार घाडी) ही या चित्रपटातील आणखी काही पात्रे. नैराश्याच्या भरात जगण्याचे भान हरवलेल्या व्यक्तीला मनोरुग्ण म्हणून लेबल लावणारा यदू, बाबल्या सर्वसामान्य जनसमुदायाचे प्रतिनिधित्व करतात. मानवला एक कानाखाली ठेवून देऊन वठणीवर आणले पाहिजे असे यदूला वाटते, तर जानकीला मानवी आयुष्यातील परस्परावलंबित्व आणि संवादाची अनिवार्यता कळून चुकली आहे आणि ती त्याच मार्गाने मानवला बरे करण्याचा प्रयत्न करते. एखाद्याविषयी पूर्ण माहिती नसतानाच त्याच्याविषयी नकारात्मक मत तयार करणाऱ्यांची, त्यानुसार लेबल लावणाऱ्यांची संख्याच समाजात अधिक आढळते. याउलट नैराश्यग्रस्त व्यक्तीला सहवेदनेच्या, माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याचा प्रयत्न करणारी जानकी,दत्ताभाऊ यांसारखी माणसे मात्र अभावानेच पाहायला मिळतात.

जानकी अजूनही तिच्या भूतकाळाशी, त्यातून आलेल्या एकाकीपणाशी झुंजत असते. मात्र मानवच्या तुलनेत ती बरीच स्थिर आहे. माणसा-माणसातील नात्याची, संवादाच्या गरजेची जाणीव असणाऱ्या जानकीला आजच्या काळात कुटुंबाची व्याख्या बदलली पाहिजे असेही वाटते. केवळ रक्ताच्या नात्यांपेक्षा मनाने एकत्र आलेल्यांचे कुटुंब असायला हवे, हा तिचा दृष्टीकोन वैयक्तिक अनुभवातून तयार झालेला असला, तरी तो अधिक लॉजिकल आहे. संयम ढळू न देता मानवशी संवाद साधताना ती एक प्रकारे त्याला संवादाची गरज समजावून देत असते.प्रत्यक्ष संवाद वाढायला हवा - सुनील सुकथनकर, दिग्दर्शक 

याआधी 'अस्तु' चित्रपटात वृध्दापकाळातील स्मृतिभ्रंश या विषयावर आपण प्रकाश टाकला होता.'कासव'साठी नैराश्य हा विषय का हाताळावासा वाटला? 
आम्ही आमच्या अनेक चित्रपटांतून मानसिक आजारांचा विषय मांडला आहे. देवराई स्किझोफ्रेनियावरचा आहे, तर बाधा चित्रपटातून आम्ही ग्रामीण भागातील मानसिक आजाराचा विषय हाताळला होता. डॉ. मोहन आगाशे जवळजवळ 2-3 वर्षांपासून नैराश्य या विषयाचा विचार करत होते. असे प्रश्न मांडणारी आणि कथात्मक पध्दतीने हाताळलेली कलाकृती खूप बारकाव्यांसह जेव्हा लोकांपर्यंत पोहोचते, तेव्हा लोक खूप गांभीर्याने त्याचा विचार करायला लागतात असं लक्षात आलं. 'अस्तु'च्या अनुभवाच्या आधारे नैराश्यावर आपण एक चित्रपट बनवावा अशा विचारानेच डॉ. आगाशेंनी सुमित्राताईंशी चर्चा केली. सुमित्राताईंना ही कल्पना खूप आवडली. आमच्याबरोबर काम करणाऱ्या तरुण मुलांशी बोलताना, त्यांच्या मित्रमंडळींचे प्रश्न त्यांच्याशी बोलून समजून घेताना असं लक्षात आलं की हा प्रश्न खूप गंभीर आहे. ते पटकन वरकरणी लक्षात येत नाही. नैराश्यग्रस्त व्यक्ती खाली मान घालून बसून राहिली आहे, असे प्रत्येक वेळी होत नाही. कित्येकदा आपल्या नेहमीच्या भेटीतल्या एखादा तरुण/तरुणीमध्ये खूप बदल झालाय, त्याने करिअरच सोडून दिलंय किंवा अशा प्रकारचं एखादं उदाहरण समोर येतं. या सगळयाचं मूळ अनेकदा डिप्रेशनमध्ये असतं. वरकरणी सगळं सुखाचं आहे असं वाटत असताना अशा गोष्टी का घडतात हे कोणालाच समजत नाही. ना त्याला, त्याच्या घरच्यांना, मित्रमंडळींना कोणालाच कळत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी टीम सपोर्टही उभा राहत नाही. असा सगळा विचार करून चित्रपट करण्याचं ठरलं. चित्रपट बनवताना सुमित्राताईंच्या मनामध्ये सुरुवातीला एकसंध कथानक येतं आणि मग त्यामध्ये आपल्याला हवे ते मुद्दे कसे येतात ते तपासून पाहिलं जातं. 

या विषयाचा विशेष अभ्यास करावा लागला का

सुमित्राताईंची पार्श्वभूमी सोशल रिसर्चची असल्यामुळे या विषयावर त्यांचं वाचन, चर्चा सुरूच असतं. एखाद्या विषयाबाबत आज मानसोपचारतज्ज्ञ काय बोलताहेत, अलीकडे त्याबाबत काही नवं संशोधन झालं आहे का, याबाबत त्या माहिती घेत असतात. डॉ. आगाशे आणि या विषयातील अन्य तज्ज्ञांशी त्यांची चर्चा चालू असते. चित्रपटनिर्मितीची सर्व प्रक्रियाच अभ्यासपूर्ण असते. स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर ते अनेक तज्ज्ञांना वाचून दाखवलं जातं. नैराश्याची समस्या अनेकदा खूप गंभीर होत जाते आणि त्यासाठी औषधोपचार महत्त्वाचे असतात, हे खरं आहे. पण अनेकदा मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध नसतात, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्याला कशा प्रकारची वागणूक द्यायला हवी यावर आम्ही चित्रपटात प्रकाश टाकला आहे. चित्रपटातील घटना कोकणातील एका गावात घडत आहे, तिथे मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध नाहीत. त्या मुलाला अन्य लोकांकडून जी वागणूक मिळते, त्यामुळे त्याला त्याच्या अवस्थेतून बाहेर पडण्यास हळूहळू मदत होते. 

'कासव' हे प्रतीकरूप म्हणून का वापरावंसं वाटलं?
 
विनोबाजींनी गीताईमध्ये म्हटले आहे की, 'घेई ओढुनि संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासव तो अंगी तेंव्हा प्रज्ञा स्थिरावली'.  ज्याप्रमाणे कासव सभोवतालच्या परिस्थितीची भीती वाटली की आपली सर्व इंद्रिये कवचात ओढून घेतो आणि जेव्हा परिस्थिती घाबरण्याजोगी नसेल तेव्हा ते हळूच बाहेर येतं, तसं नैराश्यग्रस्त व्यक्तीचं होत असावं, असं एक प्रतीकरूप मनात आलं होतं. दुसरं म्हणजे चित्रपटात दाखवलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचं संवर्धन पाहताना लक्षात आलं की या कासवांची मादी किनाऱ्यावर अंडी घालून परत समुद्रात जाते. त्यामुळे त्यातून पिल्लं बाहेर पडेपर्यंतच्या काळात त्यांची काळजी घ्यावी लागते. पिल्लं अंडयातून बाहेर पडली की ती मोकळया महासागरात जातात. तिथे मग त्याच्या मदतीला कोणी येणार नसतं. नैराश्यग्रस्त व्यक्तीलाही त्याच्या कोषातून बाहेर येईपर्यंतच्या काळात जपावं लागतं, नंतर तो त्याच्या आयुष्याच्या महासागरात जाण्यास तयार होतो. 

वाढत्या नैराश्यग्रस्ततेचं जे समाजावर सावट पडत आहे
, त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या सामाजिक बदलांची गरज आहे, असं आपल्याला वाटतं? 
व्यक्ती-व्यक्तींमधील प्रत्यक्ष संवाद वाढायाला हवा. सोशल नेटवर्किंगवरचे आभासी संपर्क या प्रत्यक्ष संपर्कांची जागा घेऊ शकत नाहीत. सुमित्राताईंनी चित्रपटात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाआहे की, कुटुंबसंस्थेला आपण खूप महत्त्व देतो. पण बऱ्याचदा रक्ताच्या नात्यातून किंवा विवाहसंस्थेतून निर्माण झालेली नाती माणसाला आणखी एकटं करतात. कुटुंबसंस्थादेखील एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होण्यासाठी कारणीभूत ठरते. कुटुंबातील इतर व्यक्ती तिला समजून न घेता तिला दोष देत राहतात. त्यामुळे कुटुंबसंस्थेची व्याख्या आजच्या काळात बदललली पाहिजे. जी माणसं एका विचारांची असतील, एकमेकांना समजून घेऊ शकतील, त्यांनी एकत्र येऊन कुटुंब तयार केलं पाहिजे. मग ते मित्रमैत्रिणी असतील, लग् झालेले-न झालेले असतील, वेगवेगळया गावात राहणारे असतील, मात्र मनाने जोडलेले असतील.

 

संवाद... नैराश्यावरचा किंवा कोणत्याही मानसिक आजारावरील उपचारातील सर्वात महत्त्वाचा घटक. इतरांबरोबरचा आणि स्वत:च्या आतलाही. मात्र तो दिशादर्शक असला पाहिजे.  जानकी स्वत:च्या उपचारातही स्वयंसूचनेचा वापर करताना दिसते. उदा. 'हाही काळ जाईल' किंवा 'जे समोर दिसत आहे ते आणि तेवढेच सत्य आहे का?' हे मंत्र कोणत्याही टोकाच्या मनोवस्थेतून बाहेर पडण्याचा सहजमार्ग ठरावेत. अर्थात त्यासाठी प्रत्येकाने आपण स्वत:शीही संवाद करण्याचे विसरतोय का, हे आधी चाचपडून पाहिले पाहिजे. त्याचबरोबर ''भजी खाऊची तेव्हा भजी खाऊची आनि चाय पिऊची तेव्हा चाय पिऊची. दोन्ही एकदम कोंबलो तर ठसको लागतलो'' हे छोटया परशूचे त्याच्या जगण्यातून तयार झालेले तत्त्वज्ञानही नवा दृष्टीकोन देणारे आहे.

जानकीच्या आणि अन्य सगळयांच्या आपुलकीमुळे, प्रेमामुळे  मानव हळूहळू त्याच्या कोषातून बाहेर येऊ लागतो. जानकी, यदू, परशू यांच्याशी त्याचे बंध जुळू लागतात, निष्क्रियता कमी होऊ लागते,त्याच्या अकारण आळवण्याला सूर, शब्द सापडतात. मात्र हे सर्व बदल संथपणे, कूर्मगतीनेच होतात आणि तेच अपेक्षित आहे. नैराश्यातून बाहेर येण्याची प्रक्रिया नक्कीच वेगवान नसते. त्यात सातत्य मात्र गरजेचे असते. शेवटच्या एका दृश्यात जानकीला अमेरिकेला जावे लागल्याचे कळल्यावर मानव एकदम व्हॉयलंट होऊन परशूवर चिडतो. मात्र ही अवस्था फार काळ टिकत नाही. तो पुन्हा परशूजवळ येतो. आपल्यात होणारा  बदल दाखवताना आपल्याला जोरजोराने रडता आले नाही याची खंत आलोक राजवाडेने या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या एका मुलाखतीत कबूल केली आहे. आत कोंडून ठेवलेल्या भावनांना वाट करून देण्याची गरज प्रत्येकालाच जाणवते. नैराश्यातून बाहेर येण्यासाठी तीच महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

कासव हे या चित्रपटात प्रतीकरूपाने आले आहे. बालकथेतील सशाला हरवणाऱ्या संथ आणि संयत कासवाचे आपल्याला नेहमीच कौतुक वाटते. विष्णूचा अवतार म्हणून हिंदू पुराणात त्याला विशेष महत्त्व आहे. या चित्रपटात दिग्दर्शकांनी ते वेगळया अर्थाने दाखवले आहे. कासव ज्याप्रमाणे भीती वाटली की आपले सगळे अवयव कवचाखाली ओढून घेते, त्याप्रमाणे नैराश्यग्रस्त माणूसही आपल्या कोषात जातो. चित्रपटाच्या वेगवेगळया फ्रेममध्ये कासवाची वेगवेगळी प्रतीकरूपे जाणवली असती. मला मात्र ते स्थितप्रज्ञता शिकवणारे रूपक म्हणून दिसले. निराशेतून बाहेर येण्यासाठी माणसाला संवादाची गरज असते आणि मन-इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी स्थितप्रज्ञतेची. स्थितप्रज्ञता म्हणजे आत्मसंवादाची सर्वोच्च पायरी. सुख, दु:ख, यश, अपयश काहीच शाश्वत नाही हे कळून चुकले असते. प्रत्येक गोष्टीकडे - एवढेच नव्हे, तर आपल्या मनाकडे, आपल्या विचारांकडे तटस्थपणे पाहण्याची वृत्ती उरते आणि त्यातून निरपेक्ष कृती घडते. ही वृत्ती प्राप्त करणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असे मानून भारतीय अध्यात्माची संपूर्ण बैठक आहे. मात्र फार कमी जण या अवस्थेस प्राप्त होतात.

किनाऱ्यावर अंडी घालून पुन्हा समुद्रात जाणाऱ्या कासवाकडे निसर्गत:च ही स्थितप्रज्ञता असावी. आपल्या अंडयांविषयीचा, त्यातून येऊ घातलेल्या पिल्लांचा कोणताही लोभ, मोह न ठेवता कासव मादी पुन्हा समुद्रात जाते. दु:खाची, वेदनेची भळभळणारी जखम चिरंतन वागवणाऱ्या अश्वत्थाम्याचा उल्लेखही चित्रपटात असाच प्रतीकरूपाने येतो. आपण आपल्याच दु:खात किंवा आनंदात हरवलेले असताना आजूबाजूचे भानही विसरून जातो. प्रत्येकाला आपलेच दु:ख मोठे वाटते. त्या दु:खाला कुरवाळताना निराशेच्या खाईत आपण कधी लोटले जातो, हेच कळत नाही. 'कासव' पाहताना मनात एक प्रश्न सातत्याने येत होता, आपल्या अंडयांचे संरक्षण करण्यासाठी किनाऱ्यावर राहू न शकणाऱ्या किंवा आपल्या पिल्लांना पुन्हा कधीच भेटू न शकणाऱ्या मादी कासवापेक्षा आपले मानवी दु:ख मोठे असेल का?दुसऱ्याच्या मोठया रेघेने आपली रेघ छोटी होऊ शकते. आणि दुसऱ्याच्या दु:खाची रेघ छोटी करताना आपल्या दु:खाची रेघ मिटूनही जाऊ शकते. आजच्या काळात ही जाणीव हरवत चालली आहे. आपला बाहेरचा परीघ वाढतोय आणि मनाचा परीघ मात्र संकुचित होत चालला आहे. आपल्याला नेमके काय हवे आहे, आपण नक्की कशाच्या मागे धावतोय हेही कळेनासे होत आहे. बाहेर वेगाने खूप बदल घडत आहेत आणि त्या गतीशी जुळवून घेण्यासाठी धावणारे मन अधिक असंवेदनशील तर बनत नाही ना, अशी भीती निर्माण होत आहे. अशा वेळी वाटते, संवेदना नष्ट होण्यापेक्षा नैराश्याचाही अनुभव यावा कधीतरी, मात्र त्यातून बाहेर पडण्याइतके मन खंबीर असले पाहिजे. अनेकदा त्या अनुभवातून होणारे परिवर्तन आयुष्याला नवी दिशा देणारे ठरू शकेल. जीवन संपवण्याचे टोक गाठण्याइतकी दुर्बलता मात्र नको. त्याऐवजी आत्मपरीक्षण, संवाद, सहवेदना, परोपकार, स्थितप्रज्ञता या पायऱ्यांवरून संथपणे, संयतपणे चालत राहू.... कासवाप्रमाणे.      

9833109416