मधुमेह आणि पचनसंस्थेचे अन्य प्रश्न

14 Dec 2017 13:13:00

 

मधुमेह स्वादुपिंडातल्या बीटा पेशींशी संबंध असलेला आजार आहे. त्यामुळे स्वादुपिंड दाह अथवा पँक्रियाटायटिस त्या मानाने फारच कमी प्रमाणात दिसतो, याचं आश्चर्य वाटतं. परंतु जेव्हा जेव्हा तो उद्भवतो, तेव्हा तेव्हा रुग्णाला हैराण मात्र करतो. पचनसंस्थेशी संबंधित मधुमेहातली खूप लोकांमध्ये दिसणारी समस्या म्हणजे यकृतात (लिव्हरमध्ये) साचलेली चरबी. कुठल्याही कारणाने सोनोग्राफी केल्यावर अनेकांना रिपोर्ट मिळतो 'फॅटी लिव्हर'. मधुमेह आणि पोटाचे प्रश्न यांचा खूप मोठा संबंध आहे. दुर्दैवाने मधुमेह झाल्यावर लोक मूत्रपिंड, पाय, डोळे, मज्जातंतू यांची जितकी काळजी करतात, तितकं लक्ष यांच्याकडे देत नाहीत.

 धुमेहामध्ये पचनाशी निगडीत आणखी दोन प्रमुख प्रश्न म्हणजे वारंवार शौचाला होणं आणि अगदीच शौच न होणं. दोन्हीमध्ये 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' अशी परिस्थिती असते.

केवळ मधुमेह या एकाच कारणाने वारंवार शौच होत नसल्याने त्याचा नीट संदर्भ लावणं आवश्यक ठरतं. वेगळया शब्दात सांगायचं तर होणारा प्रश्न इतर कुठल्याही आजाराशी संबंधित नाही, याची खातरजमा सगळयात आधी करून घेतली पाहिजे. त्या कामात काही ठोकताळे कामाला येतात. एकेक करून इतर कुठलीही कारणं या जुलाबांमागे नाहीत, हे प्रथम ठरवायचं. साहजिकच इतर कोणतंही कारण नाही, म्हणजेच हे जुलाब मधुमेहामुळेच आहेत, असं त्रैराशिक मांडता येतं.

खरं तर मधुमेहात जे शौच होतं, त्यांना जुलाब हा शब्ददेखील योग्य नाही. कारण यामध्ये जुलाबाइतका पाण्याचा अंश असतोच असं नाही. फक्त दिवसातून अनेकदा जावं लागतं. हे शौच साधारण रात्रीचं होत नाही, दिवसातून अनेकदा जावं लागतं. यात आमांशही नसतो. इतर कारणांनी होणाऱ्या जुलाबांमध्ये ज्या प्रकारे शरीरातलं पाणी कमी होतं किंवा व्यक्ती कृश होते, तिचं वजन कमी होतं असंही मधुमेहात जे शौच होतं त्यात दिसत नाही. मग प्रश्न येतो की हे जुलाब होण्याचं कारण काय?

अनेक अभ्यासांमध्ये यामागच्या इंगितावर थोडाबहुत प्रकाश पडला आहे. मुळात जेव्हा रुग्णाचा मधुमेह बराच काळ अनियंत्रित राहतो, त्या वेळी मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्याची कार्यक्षमता मंदावते. आतडयांचं आकुंचन-प्रसरण मज्जासंस्थेच्या कार्यक्षमतेशी निगडित असल्याने तेही कमकुवत होतं. मधुमेहात रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असतेच. त्यात या हळूहळू आकुंचन-प्रसरण पावणाऱ्या आतडयांमुळे रोगजंतू आतडयांमध्ये आपलं बस्तान बसवतात. आतडयात इन्फेक्शन झाल्याने जुलाब होणं अपेक्षित असतं.

शिवाय मधुमेहात आतडयांची पाणी व क्षार शोषून घेण्याची शक्ती कमी होते. न शोषलेलं पाणी शौचावाटे बाहेर पडतं. अन्नाचं पचन करणारे पाचक रस मधुमेहात कमी पाझरतात. साहजिकच न पचलेलं अन्न शौच बनणार. मधुमेहात होणाऱ्या जुलाबांमागची कारणं अशी अनेकविध आहेत. आपण दिवसभर खात असलो, तरी दिवसातून एखाद-दोन वेळच उत्सर्जन करायला शौचकूपात जातो. कारण आपली आतडी शौच धरून ठेवतात. ते धरून ठेवायला स्फिन्क्टरसारखी यंत्रणा आतडयांमध्ये असते. योग्य वेळ आणि जागा मिळाली की ही स्फिन्क्टर खुलतात आणि आतला मळ बाहेर जातो. आपल्या आतडयांची शौच धरून ठेवण्याची स्फिन्क्टरची ताकद मधुमेहात कमी होते. म्हणून दिवसातून अनेक वेळेला जाणं भाग पडतं. स्फिन्क्टर आपलं काम नीट करत नसल्याने कधीकधी कपडयातच अल्प शौच होण्याची भीती असते.

गमतीची गोष्ट म्हणजे मधुमेहात अनेकदा रुग्णाला जुलाबाच्या एकदम विरुध्द म्हणजे बध्दकोष्ठ होतं. पुन्हा कारणं तीच. परंतु आता आतडयांचं आकुंचन-प्रसरण कमी झाल्याने शौच ज्या प्रकारे पुढेपुढे सरकायला हवं, तसं सरकत नाही. अन्नाचा आतडयातील प्रवास मंद गतीने होतो. आपल्या शरीराचं वैशिष्टय म्हणजे जितका काळ अन्न मोठया आतडयात घालवेल, तितकं त्यातलं पाणी शोषलं जातं. शौच दगडासारखं कठीण कठीण होत जातं. असं घट्ट शौच बाहेर पडताना त्रास होणारच. ज्यांची वयं जास्त आहेत अशांमध्ये हे जास्तच दिसणार, यात शंका नाही. कारण मुळात वाढत्या वयानुसार अनेकांना बध्दकोष्ठ सतावत असतं, त्यात ही मधुमेहाची भर पडते.

पचनसंस्थेशी संबंधित मधुमेहातली खूप लोकांमध्ये दिसणारी समस्या म्हणजे यकृतात (लिव्हरमध्ये) साचलेली चरबी. कुठल्याही कारणाने सोनोग्राफी केल्यावर अनेकांना रिपोर्ट मिळतो 'फॅटी लिव्हर'. कित्येकदा रिपोर्ट वाचून मंडळी घाबरून जातात. याला 'नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज' असं म्हटलं जातं. हे दुधारी अस्त्र आहे. 90 टक्के लोकांमध्ये फॅटी लिव्हर हे केवळ वाचून सोडून द्यायचं निदान असतं. मुळात ते निदानदेखील म्हणता येत नाही. कारण बहुधा रक्तातलं ग्लुकोज वाढलं की त्या वाढीव ग्लुकोजचं चरबीत रूपांतर होतं आणि ती अतिरिक्त चरबी त्वचेच्या खाली न साचता, स्नायू, यकृत अशा जागा मिळेल त्या ठिकाणी आपलं बस्तान बसवते. खाण्यातलं कार्बोहायड्रेटसचं आणि चरबीचं प्रमाण कमी केलं, ग्लुकोजवर नियंत्रण मिळवलं की प्रश्न सुटतो. फॅटी लिव्हर आयुष्यभर कुठलाही त्रास देत नाही. पण सगळयाच लोकांमध्ये असं घडत नाही. काही जण इतके सुदैवी नसतात. त्यांचं लिव्हर दिवसेंदिवस बिघडत जातं आणि पुढेमागे सिऱ्होसिस ऑॅफ लिव्हरसारखा जीवघेणा आजार होऊ शकतो.

इथे प्रश्न असतो ते कोण सुदैवी आणि कोणाचं नशीब तितकं बलवत्तर नाही, हे कसं समजायचं? बरं, लिव्हरचे काही तपास केले - विशेषत: एन्झाइम्स तपासले - तर ते फारसे वाढलेले नसतात. बिलिरुबिन बहुधा नॉर्मल असतं. अशा वेळी आडमार्गाने अटकळ बांधण्यावाचून पर्याय नसतो. प्लेटलेट अथवा इतर काही तपासण्या लिव्हरच्या बाबतीत थोडा तरी अंदाज देऊन जातात. फायब्रो स्कॅनसारख्या तपासण्या सर्वत्र उपलब्ध असतातच असं नाही. बार्ड (BARD), फायब्रो स्कोअर (Fibroscore) आणि  http://nafldscore.com या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला एन ए एफ एल डी स्कोअर या गोष्टी आपला आजार बळावणार की नाही याचा अंदाज बांधायला बऱ्यापैकी उपयोगाला येतात. जवळपास ऐंशी टक्के लोकांमध्ये हो की नाही असं रोखठोक उत्तर देता येतं. याला खर्चदेखील येत नाही. अर्थात यकृताचा बारीकसा तुकडा काढून तो तपासणं - लिव्हर बायोप्सी कारणं सर्वात चांगलं. निदानाचं ते गोल्ड स्टँडर्ड म्हणता येऊ शकतं. पण त्यातही थोडाबहुत धोका असल्याने तो शेवटचा मार्ग म्हणायला हवा.

इथे एक मुद्दा आवर्जून मांडावासा वाटतो. लिव्हर हे आपल्या शरीराचं रासायनिक केंद्र आहे. आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक रसायनाची विल्हेवाट लावायचं काम लिव्हर करत असतं. आपण घेत असलेली औषधं हीसुध्दा रसायनांचं मिश्रण असतात. त्यात काही आपल्या लिव्हरला इजाही करू शकतात. म्हणून लिव्हरचा प्रश्न असताना डॉक्टर इन्श्युलीन सुरू करण्याचा सल्ला देतात. बरेच रुग्ण हा सल्ला मानत नाहीत. कृपया असं करू नका. इन्श्युलीन हे शरीराच्या कुठल्याही इंद्रियाला दुखापत न करणारं एकमेव औषध आहे, हे लक्षात असू द्या. तुमच्या लिव्हरच्या बाबतीत कोणताही प्रश्न निर्माण झाला असेल, तर तुम्ही घेत असलेल्या सगळया औषधांची माहिती डॉक्टरांना द्या. अगदी आयुर्वेदिक औषधांचीदेखील. कारण ती लिव्हरला इजा करणार नाहीत याची कोणतीही खात्री तुम्ही देऊ  शकत नाही.

मधुमेहात पित्ताशयात खडे होण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं. मध्यम वयाच्या मधुमेही स्त्रियांमध्ये हे अंमळ जास्त असतं. पोटात दुखणं, वारंवार ऍसिडिटीचा त्रास होणं ही याची मुख्य लक्षणं. अर्थात प्रत्येक वेळी पित्तखडयांचं निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करून ते काढून टाकलेच पाहिजेत असं नाही. किंबहुना मधुमेहात अशा शस्त्रक्रिया कधीकधी महागात पडू शकतात. मधुमेहात शस्त्रक्रियेदरम्यान समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते, प्रसंगी जिवावर बेतू शकतं याची जाणीव शस्त्रक्रियेला होकार देताना असली पाहिजे. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं अशी अवस्था होईल.

मधुमेह स्वादुपिंडातल्या बीटा पेशींशी संबंध असलेला आजार आहे. त्यामुळे स्वादुपिंड दाह अथवा पँक्रियाटायटिस त्या मानाने फारच कमी प्रमाणात दिसतो, याचं आश्चर्य वाटतं. परंतु जेव्हा जेव्हा तो उद्भवतो, तेव्हा तेव्हा रुग्णाला हैराण मात्र करतो. पोटात कळा येतात असं सारखं सारखं पोटदुखीने हैराण व्हायला लागेल, तेव्हा पित्तखडे आणि पँक्रियाटायटिस लक्षात ठेवायला हवं.

पाहिलंत? मधुमेह आणि पोटाचे प्रश्न यांचा किती मोठा संबंध आहे ते. दुर्दैवाने मधुमेह झाल्यावर लोक मूत्रपिंड, पाय, डोळे, मज्जातंतू यांची जितकी काळजी करतात, तितकं लक्ष यांच्याकडे देत नाहीत.

9892245272

 

Powered By Sangraha 9.0