परिवर्तनशील सेवाकार्याची पन्नाशी

18 Apr 2017 15:36:00

*** विवेक वैद्य** * 

आधी जनसंघाचे जिल्हा संघटनमंत्री आणि पुढे कल्याणचे नगराध्यक्षपद भूषवणाऱ्या माधवरावांना दामूअण्णांनी तळासरीला जाण्याचे सांगताच तत्काळ नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन माधवराव तळासरीत आले. 1967 साली तळासरीमध्ये प्रतिकूल वातावरणात वनवासी विकास प्रकल्पाला सुरुवात झाली. या प्रकल्पांतर्गत येथील वनवासी बांधवांसाठी अनेक सेवाकार्ये राबवण्यात आली. त्यातून झालेले बदल आज पन्नास वर्षांनंतर या परिसरात पाहायला मिळत आहेत. 16 एप्रिलपासून या प्रकल्पाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. हा पन्नास वर्षांचा इतिहास एका परिवर्तनाचा, अडचणींवर मात करत पुढे जाणाऱ्या जिद्दीचा इतिहास आहे.

माझ्यासमोर दोन लग्नपत्रिका होत्या. एक होती शहरात असलेल्या माझ्या मित्राने पाठवलेली! दुसरी होती तळासरी प्रकल्पाच्या शेजारच्या पाडयावरची! मित्राने पत्रिकेत लिहिले होते, 'कृपया अहेर आणू नये', आपल्या शुभेच्छा आपली उपस्थिती हाच अहेर वगैरे. पाडयावरच्या लग्नपत्रिकेत लिहिले होते - 'लग्नकार्यात बियर क्वार्टरची सोय नाही.' लग्न म्हणजे ताडी, दारू हे समीकरण या भागात आजही लागू आहेच. अहेर आणू नयेत ही फार पुढची पायरी झाली. पण 'लग्नकार्यात बियर क्वार्टरची सोय नाही' हे छापण्याइतका बदल घडायला पन्नास वर्षे जावी लागली. पन्नास वर्षांपूर्वी तळासरी भागामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सेवा प्रकल्प सुरू करण्याचे ठरले. हा पन्नास वर्षांचा इतिहास एका परिवर्तनाचा, अडचणींवर मात करत पुढे जाणाऱ्या जिद्दीचा इतिहास आहे.

तळासरी प्रकल्पाचा इतिहास

1966 साली वनवासी क्षेत्रातील आव्हानांना, समस्यांना तोंड देण्यासाठी सेवा प्रकल्पाच्या आधारे काम सुरू केले पाहिजे, हे रा.स्व. संघाचे तत्कालीन महाराष्ट्र प्रांत प्रचारक बाबाराव भिडे यांचे आवाहन विभाग प्रचारक असलेले दामूअण्णा टोकेकर यांनी स्वीकारले आणि कल्याणला येऊन 11,000 रुपये जमा करून थेरोंडा (पालघर जिल्हा) येथे जमीन घेऊन शेती प्रकल्पाला सुरुवात केली.

1966 साली प्रयाग येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या अधिवेशनात प्रत्येक प्रांतामध्ये सेवाकार्य सुरू करण्याचे ठरले. तत्कालीन मुंबई प्रांताने महामंत्री दादासाहेब आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली तळासरीला सेवा प्रकल्प सुरू करण्याचे ठरले. तळासरीला ख्रिश्चनांचे काम सुरू होऊन तोपर्यंत सुमारे 55 वर्षे झाली होती. साम्यवादी विचारधारा घेऊन आलेल्या कॉ. गोदावरी परुळेकरांना सुमारे 10 वर्षे झाली होती. अशा या तळासरीमध्ये विश्व हिंदू परिषदेने 1967 साली सेवाप्रकल्प सुरू करण्याचे ठरवले. स्व.दामूअण्णा टोकेकरांनीच माधवराव काणेंना तळासरीला जाण्यासाठी तयार केले.

माधवरावांचा मोठेपणा

माधवराव काणे संघाचे स्वयंसेवक! कल्याणच्या छोटया-मोठया कार्यक्रमांत भाग घेणारे कार्यकर्ते! ऐन वेळी गोवा मुक्ती चळवळीत सहभागी होऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारे! आधी जनसंघाचे जिल्हा संघटनमंत्री आणि पुढे कल्याणचे नगराध्यक्षपद भूषवणाऱ्या माधवरावांना दामूअण्णांनी तळासरीला जाण्याचे सांगताच तत्काळ नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन माधवराव तळासरीत आले. चाळीस वय हे राजकारणात काही निवृत्तीचे वय नाही, तरीही माधवरावांनी जनसंघाची पणती सोडून ज्ञानाची पणती तळासरीच्या घराघरात लावण्याचे ठरवले. कल्याणसारखे शहर सोडून तळासरीसारख्या एका छोटयाशा खेडयात माधवराव आले. प्रसिध्दीचे क्षेत्र सोडून सेवाकार्यासारख्या टीआरपी नसणाऱ्या क्षेत्रात आले. खासदार चिंतामण वनगांच्या शब्दात सांगायचे, तर ''कळ सावरून खाली उतरून माधवराव पायाचे दगड बनले.'' अनुकूल क्षेत्र सोडून प्रतिकूल क्षेत्रात आले. प्रतिकूलता किती होती ते पुढे येईलच; पण वाट बिकट होती, नागमोडी होती, काटयाकुटयांची होती.

वसतिगृह प्रारंभ

17 एप्रिल 1967 रोजी एका भाडयाच्या घरामध्ये 7 विद्यार्थ्यांना घेऊन माधवरावांनी वसतिगृह सुरू केले. त्या वेळी त्यांना भंडारी गुरुजी, बाबा कुलकर्णी, अंधेर गुरुजी, लक्ष्मण कर्वे, शेंडये, डॉ. अष्टीकर, सोमनाथ वाणी अशांची मदत मिळत गेली. पुढे दोन वर्षांनी अप्पा जोशी आणि त्यांच्या पत्नी वसुधा जोशी यांची साथ मिळाल्याने मुलांचे आणि मुलींचेही वसतिगृह जोमाने सुरू झाले. 1972 साली तत्कालीन महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी पावणेदहा एकर जागा दिल्याने स्वत:च्या जागेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वसतिगृहाच्या स्वतंत्र इमारती उभ्या राहिल्या. गोशाळा सुरू झाली. 1975 साली साप्ताहिक दवाखाना सुरू झाला.

विरोधाला पुरून उरले

साम्यवाद्यांच्या बालेकिल्ल्यात काम करणे तर सोडाच, उभे राहणेही कठीण होते. दामूअण्णा टोकेकरांना 'या भागात दिसलात तर तंगडी मोडू' असा दम मिळाल्यावर दामूअण्णांनी 'ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी' असे उत्तर दिले होते. तळासरीत वैचारिक संघर्षापेक्षा जो आपल्यापेक्षा वेगळे काम करील (विरुध्दसुध्दा नव्हे) त्याच्यावर, त्याच्या घरावर दगडांचा वर्षाव करायचा. काही विद्यार्थ्यांचा दोष एवढाच होता की ते विश्व हिंदू परिषदेच्या वसतिगृहात शिकले होते. 14 ऑगस्ट 1991 रोजी तळासरी प्रकल्प समूळ नष्ट करायचा या एकाच भावनेने साम्यवाद्यांकडून जोरदार हल्ला करण्यात आला. त्यात अप्पा जोशी, वसुधाताई जोशी, हरेश्वर दादा वनगा याना प्रचंड मारहाण करण्यात आली. प्रकल्पाचे खूप मोठे नुकसान करण्यात आले. जबरदस्त दहशत सर्वत्र पसरवण्यात आली. 26 जानेवारी 1997 रोजी विद्यमान खासदार चिंतामण वनगा यांच्या घरावर, गावावर फार मोठा हल्ला करण्यात आला. पोलिसांना या ठिकाणी गोळीबार करावा लागला. 2009 साली एका कार्यकर्त्याने रिक्षाचालकांची संघटना बांधण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याच्याच घरातील रॉकेल घेऊन त्याचे घर पेटवून देण्यात आले. ही ठळक उदाहरणे! छोटया छोटया हल्ल्यांची तर गणतीच नाही.

समाज जोडणारे उपक्रम

अशा वातावरणातही शांतपणे समाज जोडणारे राखीबंधन, मकरसंक्रांती यासारखे सण साजरे करून प्रकल्पाने एकत्वाचे वातावरण निर्माण केले. दहीहंडी, श्रीगणेशोत्सव, नवरात्र यांसारखे उत्सव विरोध पत्करून वाढू लागले. खासदार चिंतामणजी वनगा म्हणतात, ''प्रेत राखावे तसे आम्ही गणपतीपाशी थांबत असू. कुणी दर्शनही घेत नव्हते. विसर्जनाला आम्ही दोघेच असायचो. एकाच्या हातात मूर्ती, बरोबर एक जण!'' पन्नास वर्षांनंतरचे तळासरी परिसरातले गणेशोत्सवाचे दर्शन थक्क करणारे आहे. महालक्ष्मी यात्रेत 10 दिवस पाणपोई, आरोग्य शिबिरे, सामुदायिक विवाह, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रमही खूप केले गेले. एका बाजूला विरोध होता, दुसऱ्या बाजूला आव्हाने होती. अंधश्रध्दा, कुपोषण, व्यसनाधीनता, बेरोजगारी, अशिक्षितपणा अशी न संपणारी यादी!

सुरू असलेले विविध प्रकल्प

'ज्ञानबा'नंतर 'तुकाराम' म्हणायचे हे माहीत नसलेला समाज, कुठल्याही क्षुल्लक कारणावरून होणारी आत्महत्या हे सर्व लक्षात घेऊन गणेशोत्सव, सायं उपासना, हनुमान मंदिर, सत्संग यांच्या आधारे श्लोक, नामसंकीर्तन, भजन शिकवले जाऊ लागले. माधव कथाकथनमाला, बालमेळावा, रामायण परीक्षेच्या आधारे बालमनावर संस्कार केले जाऊ लागले. शेती, भाजीपाला, रोपवाटिका, गांडूळखत, वनौषधी विभागातून अर्थार्जनाचे संस्कार होऊ लागले. 'माजी विद्यार्थी संघाच्या' माध्यमातून क्रीडा महोत्सव, गुणवंत विद्यार्थी सत्कार, स्पर्धा परीक्षा माहिती केंद्र असे उपक्रम राबवले जाऊ लागले. त्रैमासिक वनसखाच्या माध्यमातून जनसंपर्क होऊ लागला. सेवा पर्यटन केंद्र उभे राहिले.

पन्नास वर्षांची उपलब्धी

तळासरी प्रकल्पानंतर प्रत्येक 25-30 किलोमीटरवर एकेक सेवा प्रकल्प विविध संस्थांच्या माध्यमातून माधवरावांच्या प्रेरणेने, पुढाकाराने उभे राहिले. या सर्वांच्या त्यागातून, कष्टातून जे परिवर्तन झाले, त्यामुळे आजच्या वनवासीबहुल पालघर जिल्हा नागालँड, मिझोराम होण्यापासून दूर राहिला. गडचिरोली किंवा छत्तीसगड यासारखे नक्षलवादी क्षेत्र इथे प्रभावी बनले नाही. अजूनही पहिली किंवा दुसरी पिढी शिकते आहे. पण अशिक्षित आईवडिलांमध्ये शिक्षणाचे महत्त्व निर्माण झाले. शिकलेल्यांनी स्वत:च्या बहीण-भावंडांना शिकवले, महिलांचे बचत गट उभे राहिले. भातशेतीबरोबरच मोगरा शेती, फळशेती होऊ लागली. चांगले काय, वाईट काय हे कळायला लागले.

आगामी योजना

परिवर्तन जरी दिसू लागले असले, तरी ही पहाटच आहे. आणखी खूप काही बाकी आहे. काळाच्या ओघात काही नवीन प्रश्नही निर्माण झाले आहेत. या दृष्टीने धार्मिक शिक्षण, परावर्तन, ग्रामविकास, सेवाकार्य या क्षेत्रात काम करायचे प्रकल्पाने ठरवले आहे. 'परिसर अध्ययन केंद्र' उभारायचे आहे. वसतिगृहाची नवीन इमारत, जलकुंभ, बालोद्यान, संरक्षक भिंत अशाही काही योजना आहेत.

रा.स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केशवराव केळकर म्हणायचे, की ''वैयक्तिक मॅचिंगकडे आपण खास लक्ष देतो. सामाजिक मॅचिंगचा विचार आपण कधी आणि कसा करणार?'' तेव्हा हे सामाजिक मॅचिंग साधण्यासाठी 'शहरवासी, वनवासी, आम्ही सारे भारतवासी' हे प्रत्यक्षात येण्यासाठी वनवासी क्षेत्राला भेट द्या. इथे आपले सहर्ष स्वागत होईल.

(प्रकल्प प्रमुख, वनवासी विकास प्रकल्प, तळासरी)

9272607818

 

Powered By Sangraha 9.0