जेएनयूतील ना'लायकांना' कसे कळणार खरे नायक? 

विवेक मराठी    24-Apr-2017   
Total Views |

 

जेएनयूतील डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांचे बेजबाबदार वर्तन आणि मिलिंद कांबळे यांचे संयमी, जबाबदार वर्तन यांचा अनुभव एकाच व्यासपीठावर आल्याने तरी लोकांना योग्ययोग्यतेची साक्ष पटावी. मात्र नेहमीप्रमाणेच तथाकथित सेक्युलर प्रसारमाध्यमांमध्ये याचे वृत्त दडपले गेले. मिलिंद कांबळे यांनी त्या आंदोलक विद्यार्थ्यांना मुक्त संवादाचे केलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारले असते, तर त्यांच्या वागण्यात थोडा तरी सच्चेपणा आहे, असे मान्य करता आले असते. मात्र देशविरोधी विधाने करणाऱ्या गुरमेहर कौरला 'नायिका' मानणाऱ्या डाव्यांना मिलिंद कांबळे यांच्यातील 'नायक' कसा ओळखता येणार?


भारतातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कॅम्पस चर्चेत असतो, तो मात्र येथील डाव्या विद्यार्थी संघटनांच्या दुर्वर्तनांमुळेच. सतत आंदोलने, निदर्शने करणे, देशाच्या विरोधात सातत्याने भडक विधाने करून अन्य विद्यार्थ्यांचे मन कलुषित करणे, किंवा मग कोणाच्या तोंडून तरी अशी विधाने वदवून त्याला प्रसिध्दी देणे, तथाकथित सेक्युलर मीडियाशी गट्टी जमवून सरकारविरोधात अपप्रचार करणे, विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणणे, त्यासाठी येणाऱ्या आमंत्रितांना अपमानित करणे हेच या डाव्या संघटनांचे काम.

याचे ताजे उदाहरण म्हणजे
14 एप्रिलचे. संपूर्ण देश या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती साजरी करत होता. जेएनयूमध्येसुध्दा यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या केंद्रीय ग्रंथालयाचे नामकरण 'डॉ. भीमराव आंबेडकर केंद्रीय ग्रंथालय' असे करण्यासाठी हा कार्यक्रम होता. बाबासाहेबांची विद्वत्ता, त्यांचे ग्रंथप्रेम, त्यांची मूल्ये आणि त्यांनी देशासाठी दिलेले योगदान यांच्या स्मरणार्थ देशातील एका आघाडीच्या विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयालाच त्याचे नाव ही त्यांच्यासाठी योग्य आदरांजली आहे. त्यामुळेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या नामकरणासाठी वारंवार पाठपुरावा करत होती. घटनाकार बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशासाठीच दिशादर्शक आहेत. आपल्या विचारातून त्यांनी उच्च कोटीचे आदर्श समाजात बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण सेक्युलॅरिझमचा टेंभा मिरवणाऱ्या डाव्या विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या या आदर्शांची पायमल्ली करणारे वर्तन या कार्यक्रमादरम्यान केले. या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसलेल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेले हे विद्यार्थी कार्यक्रमात घुसले आणि घोषणाबाजी करून त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू लागले. मग त्यांनी या ग्रंथालयाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्यालाच विरोध सुरू केला.

दलित उद्योजक व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्री (डिक्की)चे अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि खासदार उदीत राज यांना या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. मिलिंद कांबळे यांनी भाषणाला सुरुवात केली. मात्र डाव्या विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि त्यांना बोलूच दिले नाही. खरे तर या डाव्या संघटनांनाकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, हे आता सगळयांनाच कळून चुकले आहे. तरीही मिलिंद कांबळे यांनी संयमाची भूमिका घेतली. त्यांनी या गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट संवाद करण्याचे निमंत्रण दिले आणि आपले म्हणणे मांडण्याचे आवाहन केले. मात्र त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करू न देताच डाव्या आणि कथित दलितवादी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी नारेबाजी सुरू केली आणि संवादही टाळला. त्यातून त्यांनी कोणते समाधान मिळवले हे तेच जाणोत.

 विद्यापीठात येणाऱ्या अशा मान्यवर निमंत्रितांना अपमानित करण्याचा असा असुरी आनंद येथील डाव्या विद्यार्थी संघटनांनी  नेहमीच घेतला आहे. त्यांनी याही आधी अनेक मान्यवर वक्त्यांना जेएनयूमध्ये येण्यास विरोध केला होता. आणि जे आले त्यांना आपले विचारही मांडू दिले नव्हते. किंबहुना येथील डाव्या संघटनांनी तशी परंपराच सुरू केली. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही जेएनयूमधून अपमानित होऊन बाहेर पडावे लागले होते. देशाचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ संशोधक भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम जेएनयूमध्ये आले असता त्यांना तर डाव्या संघटनांनी मारेकरी म्हटले होते. एका शिबिरासाठी येणाऱ्या बाबा रामदेव यांना जेएनयू परिसरातच प्रवेश करू दिला नव्हता. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनाही येथे अपमानित व्हावे लागले.

आपण वंचितांचे आणि शोषितांचे कैवारी असल्याचे भासवणाऱ्या या डाव्या संघटनांना प्रत्यक्षात मात्र त्यांच्यविषयी काडीचीही सहानुभूती नसते. उलट ते परावलंबीच कसे राहतील याचसाठी त्यांनी प्रयत्न केले. केवळ जेएनयूमध्येच नव्हे, तर ज्या भागांत डाव्या संघटनांचे प्राबल्य आहे, अशा सर्वच भागांत हा अनुभव दिसून येतो. वंचितांना दुर्बल ठेवण्यातच त्यांचा फायदा असतो. त्यामुळे त्यांचा आवाज दडपून टाकण्याचे प्रयत्न ते करत असतात.


'अभिव्यक्तिस्वातंत्र्य' हा डाव्यांचा आणि स्वत:ला सेक्युलर म्हणवणाऱ्यांचा परवलीचा शब्द आहे. एखादी व्यक्ती जर देशाविरोधात, भारतीय सैन्याविरोधात, सरकारविरोधात गरळ ओकत असतील, तर हे लोक त्या व्यक्तीच्या 'अभिव्यक्तिस्वातंत्र्या'साठी रस्त्यावर उतरतात. याच 'अभिव्यक्तिस्वातंत्र्या'चा हक्क घेऊन सोशल मीडियावरही त्यांच्या उठवळ प्रचाराचा पूर येतो. मात्र आपल्या विचारांशी प्रतिकूल असणाऱ्या प्रत्येकाची अभिव्यक्ती दडपून टाकण्यासाठी या डाव्या संघटना जंग जंग पछाडतात. बरे, ज्यांच्यामुळे त्यांना हा 'अभिव्यक्तिस्वातंत्र्या'चा हक्क मिळाला, त्या भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महनीयता मान्य करायलाही हे कम्युनिस्ट विचारधारेचे लोक तयार नाहीत. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे बाबासाहेबांना सर्वात प्रिय असलेले लोकशाहीतील मूल्य आहे. लोकशाही व्यवस्था आणि लोकशाहीचे आचरण याविषयी  डॉ. आंबेडकरांना असलेली आपुलकी संविधान सभांमध्ये झालेल्या वादविवादात स्पष्टपणे समोर आली होती.

जगभर ज्या व्यक्तीला 'महामानव' म्हणून सन्मानले जाते, त्यांच्या मूल्यांना त्यांच्याच भूमीत पायदळी तुडवले जात आहे. बाबासाहेबांनी अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण पूर्ण केले, तेथील ग्रंथालयात त्यांचा पुतळा उभारण्यात आला. मात्र आपल्याच देशातील विद्यापीठाच्या ग्रंथालयाला बाबासाहेबांचे नाव देण्यास विरोध करणाऱ्या लोकांचा संकुचितपणा यानिमित्ताने उघड पडला.

या कार्यक्रमाला मिलिंद कांबळे यांच्यासारखी बाबासाहेबांचा खरा वारसा चालवणारी व्यक्ती अतिथी म्हणून लाभणे हे त्या कार्यक्रमाचे सद्भाग्य होते. ज्यांना बाबासाहेबच कळले नाहीत, त्यांना मिलिंद कांबळे यांचे कर्तृत्व माहीत असणे कठीणच आहे. दलित समाजातून आलेले मिलिंद कांबळे यांनी समाजातील भेदभावाशी लढत उद्योग क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थी परिषदेच्या मुशीत तयार झालेले कांबळे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून बांधकाम व्यावसायिक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. उद्योग क्षेत्रात यशाचे शिखर गाठतानाच आपल्या दलित बांधवांनाही त्यांनी उद्योग क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी प्रेरित केले. डिक्कीच्या माध्यमातून त्यांना संघटित केले. आज डिक्कीचे मोठे जाळे तयार झाले आहे. त्यातील प्रत्येक सदस्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. समाज बदलण्यासाठी संघर्ष आवश्यक असतोच; पण हिंसाचार, आंदोलने केवळ हेच संघर्षाचे मार्ग नसतात, विधायक मार्गाने होणारा संघर्ष अधिक शाश्वत असतो, हे कांबळे यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले. त्यामुळेच तरुण वयात ते पद्मश्रीचे मानकरी ठरले. डाव्या विद्यार्थ्यांचे बेजबाबदार वर्तन आणि मिलिंद कांबळे यांचे संयमी, जबाबदार वर्तन यांचा अनुभव एकाच व्यासपीठावर आल्याने तरी लोकांना योग्ययोग्यतेची साक्ष पटावी. मात्र नेहमीप्रमाणेच तथाकथित सेक्युलर प्रसारमाध्यमांमध्ये याचे वृत्त दडपले गेले.

मिलिंद कांबळे यांनी त्या आंदोलक विद्यार्थ्यांना मुक्त संवादाचे केलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारले असते, तर त्यांच्या वागण्यात थोडा तरी सच्चेपणा आहे, असे मान्य करता आले असते. मात्र देशविरोधी विधाने करणाऱ्या गुरमेहर कौरला 'नायिका' मानणाऱ्या डाव्यांना मिलिंद कांबळे यांच्यातील 'नायक' कसा ओळखता येणार?                            

9833109416