''भारतीय झाडांचं महत्त्व जाणा'' - विक्रम येंदे

विवेक मराठी    15-May-2017
Total Views |

'ग्रीन अंब्रेला' ही संस्था उन्हाळयात 'सीड कलेक्शन' हा उपक्रम राबवते. म्हणजेच विविध झाडांच्या बिया गोळा करून त्यांची रोपटी बनवायची आणि मग रस्त्यांच्या कडेला किंवा उपलब्ध असलेल्या मोकळया जागेत त्यांची लागवड करायची. या उपक्रमात विशेषतः भारतीय झाडांच्या बिया गोळा करण्यावर भर  दिला जातो. भारतीय झाडेच का? या प्रश्नाचे उत्तर देताना संस्थेचा अध्यक्ष विक्रम येंदे सांगतो, ''भारतीय झाडं आयुर्वेदिकदृष्टया तर उपयुक्त असतातच, शिवाय विविध प्राणी, पक्षी, कीटक यांचे ते अधिवास असतात. या झाडांपासून त्यांना मोठया प्रमाणात अन्न मिळतं.''

मोठया प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि त्यातून झालेला पर्यावरणाचा ऱ्हास याची जाणीव उन्हाळयाच्या रखरखाटात अधिक तीव्रतेने होते. भर उन्हातून तापलेल्या रस्त्यावरून चालताना आजूबाजूला सावलीसाठी एखादे झाड दिसणेही मुश्कील होते. दर वर्षी शासनाकडून, प्रशासनाकडून, सेवाभावी संस्थांकडून मोठया प्रमाणात वनीकरणाचे उपक्रम राबवले जातात. मात्र समारंभपूर्वक लावल्या गेलेल्या या रोपटयांचे पुढे होते तरी काय? त्यांचा अपेक्षित परिणाम का दिसून येत नाही? आपल्याकडची झाडे, जंगले कुठे लोप पावली आहेत? हे प्रश्न यानिमित्ताने पडतात.

''वनीकरणाच्या उपक्रमात कोटयवधी झाडं लावल्याचं आपण ऐकतो. मात्र योग्य काळजी न घेतल्याने त्यापैकी 50-60 टक्के झाडं पावसाळयाआधीच मरतात. दुसरं म्हणजे अशा उपक्रमात 80 टक्के विदेशी झाडं लावली जातात. त्याचा परिणाम आपल्या जंगलांवर होतो. आधीच आपली जंगलं मोठया प्रमाणात तोडली जात आहेत. ही जंगलं तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. त्यात आपण लावत असलेल्या विदेशी झाडांमुळे परिपूर्ण परिसंस्था तयार होत नाही. विदेशी झाडांवरती कीटक किंवा पक्षी निवास करत नाहीत. तसंच या झाडांचं परागीभवन करणारे जीव आपल्या हवेत नाहीत. त्यामुळे अशी झाडं कितीही मोठया संख्येने लावली तरी जंगल तयार करता येणार नाही'' असे एक लॉजिकल विवेचन विक्रम येंदे करतो. विक्रम हा निसर्गावर निस्सीम प्रेम करणारा तरुण. 'ग्रीन अंब्रेला' या संस्थेचा तो अध्यक्ष आहे. या समस्येला उत्तर म्हणून ही संस्था उन्हाळयात 'सीड कलेक्शन' हा उपक्रम राबवते. म्हणजेच विविध झाडांच्या बिया गोळा करून त्यांची रोपटी बनवायची आणि मग रस्त्यांच्या कडेला किंवा उपलब्ध असलेल्या मोकळया जागेत त्यांची लागवड करायची. या उपक्रमात विशेषतः भारतीय झाडांच्या बिया गोळा करण्यावर भर  दिला जातो.

नुकतेच - म्हणजे 6 मे रोजी संस्थेच्या सदस्यांनी विविध जंगलांतून गोळा केलेल्या बियांचे विक्रोळीतील नर्सरीमध्ये रोपण केले. यात आसाना, ऐन, अर्जुन, अंकोळा, बकुळ, पळस, पांगारा, काटेसावर, शिवण, नागचाफा, शिरीष, बहावा, चारोळी, बिब्बा, कांचन, उंडण, मेढशिंग, साग, महारुख, शेमट, मोह, कहांडोळ, बारतोंडी, कळम, शिसव, आपटा, रिठा, खैर, बेल, कवठ, अंबोडी, हेदू, हुंब, टेंभुर्णी, कुंभा आदी देशी बियांचा त्यात समावेश होता. यापासून तयार होणारी रोपे पुढच्या वर्षीच्या वृक्षरोपणासाठी संस्था वापरणार.

भारतीय झाडेच का? या प्रश्नाचे उत्तर देताना विक्रम सांगतो, ''भारतीय झाडं आयुर्वेदिकदृष्टया तर उपयुक्त असतातच. शिवाय विविध प्राणी, पक्षी, कीटक यांचे ते अधिवास असतात. या झाडांपासून त्यांना मोठया प्रमाणात अन्न मिळतं. शहरांमध्ये जी झटपट वाढणारी झाडं लावली जातात, त्यांच्यावर पक्ष्यांना, कीटकांना अन्न मिळत नाही. त्यामुळे अशा झाडांवर जीवविविधतेचं संवर्धन होत नाही. शिवाय ही झाडं मोठया प्रमाणात जमिनीतील पाणी शोषून घेतात. ही झाडं पटकन वाढणारी असली, तरी त्यांच्यापासून फारशी सावलीही मिळत नाही.''

बहुतांश भारतीय झाडे मुंबई आणि नजीकच्या परिसरातील जंगलात (उदा. जिजामाता उद्यान, ठाण्याला येऊर भागात किंवा कर्नाळयाच्या अभयारण्यात किंवा तुंगारेश्वरच्या परिसरात) आढळतात. निवड केलेल्या झाडांच्या फळण्याचा-फुलण्याचा काळ याकडे लक्ष ठेवावे लागते. त्यानुसार त्या भागात जाऊन बिया गोळा कराव्या लागतात. या वर्षी 15 हजार ते 20 हजार रोपे तयार करण्याचे आपले लक्ष्य असल्याचे विक्रम सांगतो. 

याव्यतिरिक्त वर्षभर 'प्लान्ट रेस्क्यू' उपक्रमही संस्था राबवत असते. अनेकदा सोसायटयांच्या भिंतीवर वड-चिंचेची रोपटी उगवतात. त्याचा सोसायटयांना त्रास होता. त्यामुळे अनकेदा लोक ती रोपटी काढून फेकून देतात. संस्थेचे सदस्य अशी झाडे काढून आणून ती नर्सरीत वाढवतात. अशा रेस्क्यू मोहिमांसाठी 25000 रोपटयांचे लक्ष्य संस्थेने ठेवले आहे.

''गेल्या दोन वर्षांत रेस्क्यू केलेल्या झाडांचे रोपण पूर्व द्रुतगती मार्गावर कांजूर ते भांडूप या पट्टयात केलं आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा आम्ही रेस्क्यू करून लावलेली वड आणि पिंपळाची झाडं तुम्ही पाहू शकता. या वर्षी कांजूरमार्ग ते विक्रोळी किंवा घाटकोपरपर्यंतच्या पट्टयात अशा झाडांचं रोपण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या आमच्या मोहिमेचं यश बघून या वर्षीही अनेक जणांनी त्यात सहभाग घेतला. हा मार्ग पी.डब्ल्यू.डी.च्या अखत्यारीत येतो. त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडं काही कारणांमुळे मरून गेली. म्हणून त्याजागी आम्ही ही रेस्क्यू केलेली झाडं लावली,'' अशी माहिती विक्रम देतो.

निसर्गाविषयीच्या त्याच्या ओढीची पार्श्वभूमीही रंजक आहे.  ''माझं बालपण ठाण्यात गेलं. ठाण्याच्या बेडेकर विद्यामंदिरात शिक्षण झालं. त्या वेळी ठाणे झाडांनी समृध्द होतं. आम्ही येऊरच्या जंगलात वगैरे फिरायला जात असू. त्यामुळे तेव्हापासूनच पर्यावरणाविषयी आवड निर्माण झाली होती. बेडेकर कॉलेजमध्ये असताना मी तेथील 'नेचर क्लब'चा सदस्य होतो. त्या क्लबच्या अनेक उपक्रमांतून झाडांविषयीचं कुतूहल वाढत गेलं. त्यानंतर एका सामाजिक संस्थेसाठी काम करत होतो. हे सगळं करताना देशी झाडं आणि विदेशी झाडं यांमधील फरक लक्षात आला. वटपौर्णिमेला सगळीकडे वडाच्या फांद्या तोडल्या जात असल्याचं पाहिलं होतं. या समस्येवर उत्तर शोधत असताना माझ्याच बिल्डिंगच्या भिंतींमध्ये वडाची रोपटी आलेली आढळली. तिथून मित्रांच्या मदतीने अशी झाडं रेस्क्यू करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर 2010पासून 'ग्रीन अंब्रेला'ची सुरुवात झाली. या संस्थेचे सध्या 25 सदस्य सक्रिय आहेत.''

त्याशिवाय संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळया उद्यानांमध्ये औषधी महत्त्व असलेली झाडे लावली जातात. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला 'नक्षत्रवन' हा त्यातलाच एक उपक्रम आहे. नक्षत्रवनांमध्ये 27 नक्षत्रांप्रमाणे 27 औषधी आणि उपयुक्त झाडे लावली जातात. या वर्षी कळव्याला साकेत परिसरात वनखात्याच्या अखत्यारीत नक्षत्रवन साकारत आहे. नक्षत्रवनांसाठी संस्थेला लोकांकडूनच विचारणा होते. ज्या परिसरात झाडांची योग्य काळजी घेतली जाईल, जिथे ती व्यवस्थित वाढतील, तिथे नक्षत्रवन बनवले जाते.

''काही धार्मिक कारणांमुळे अशी आयुर्वेदिक उपयुक्तता असलेली झाडं लावण्याचा लोकांचा आग्रह असतो. मात्र आमचा हेतू आध्यात्मिक किंवा धार्मिक नसून निसर्गाची सेवा म्हणून आम्ही हे काम करतो. कारण अशा झाडांमुळे माणसांना तर फायदा होतोच, त्याचबरोबर पक्षी, प्राणी, कीटक यांनाही निवारा आणि अन्न मिळतं. एखाद्या टेकडीवर किंवा ग्रामीण भागामध्ये जाऊन पर्यावरणासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था असतात. आम्ही शहरी भागातील हवा कशी शुध्द ठेवता येईल या दृष्टीने प्रयत्न करतो. आपण जिथे राहतो, तिथलं पर्यावरण आधी सुदृढ झालं पाहिजे. आम्ही जिथे काम करत आहोत, त्या पूर्व द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठं डंपिंग ग्राउंड तयार होत आहे. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठया प्रमाणावर होत आहे. झाडांच्या माध्यमातून काही प्रमाणात तरी हवा शुध्द राहील,'' असा विश्वास विक्रम व्यक्त करतो.

मुंबईसारख्या शहरात असे उपक्रम राबवताना अडचणी तर येतातच. नर्सरीसाठी जागा ही 'ग्रीन अंब्रेला'समोरची सर्वात मोठी समस्या आहे. कळव्यामध्ये तीन वर्षे संस्थेची नर्सरी होती. मात्र स्थानिक नगरसेवकाने त्या उद्यानाच्या जागेत शौचालय बनवायला घेतल्याने नर्सरी तेथून हटवावी लागली. या वर्षी विक्रोळीत गोदरेजने दिलेल्या जागेत नर्सरी तयार केली आहे.

संस्थेच्या विविध उपक्रमात ज्यांना पर्यावरणाच्या विषयात स्वारस्य आहे असे सुजाण नागरिकही सहभाग घेत असतात. काही जण आपापल्या विभागात झाडांच्या बिया गोळा करतात किंवा काही जण सोसायटयांच्या भिंतीवर आलेल्या वड-पिंपळाच्या रोपटयांची माहिती संस्थेला देतात. विक्रम सांगतो, ''अनेकांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करायचं असतं, मात्र आपण नक्की काय केलं पाहिजे हे त्यांना समजत नसतं. अशांनी किमान आपल्या आजूबाजूच्या झाडांचे जतन होत आहे की नाही याकडे लक्ष ठेवलं तरी खूप मोठी मदत होऊ शकेल. अनेकदा झाडांच्या खोडांवर जाहिराती लटकवण्यासाठी खिळे ठोकले जातात. त्यामुळे झाडांना इजा होते. तसंच जंगलांमध्ये झाडांच्या खाली साचलेल्या पालापाचोळयाचं खत तयार होऊन त्यांना अन्न मिळतं. काँक्रिटीकरणामुळे झाडांच्या मुळांना अन्न-पाणी मिळत नाही. मध्यंतरी करंजाच्या झाडांवर मिलीबगची लागण होऊन हजारो वृक्ष मेले होते. अशा घटनांकडे  नागरिकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. इमारतींचं बांधकाम करताना बिल्डर आजूबाजूची झाडं तोडत असतात. असं काही आढळल्यास पालिकेला किंवा आम्हाला कळवावं. इतकंच नव्हे, तर प्लास्टिक न वापरणं, दैनंदिन व्यवहारात पाण्याची बचत करणं अशा छोटया छोटया गोष्टी करूनही आपण पर्यावरणाच्या संवर्धनात हातभार लावू शकतो.''

निसर्गसंवर्धनाच्या कामातील योगदानासाठी संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विक्रमलाही ठाणे महापालिकेचा ठाणे गुणिजन पुरस्कार मिळाला आहे. मात्र आपल्या हयातीत डेरेदार वृक्षांच्या छायेतील महामार्ग पाहिलेले आणि सध्याच्या बदललेल्या चित्राने व्यथित झालेले एखादे आजोबा जेव्हा संस्थेच्या कामाचे कौतुक करतात, त्या वेळी मिळणारे समाधान विक्रमला अधिक महत्त्वाचे वाटते.

 

 विक्रम येंदे

9833988166