लोककलेच्या संस्कृतीधनाचे वारसदार...

विवेक मराठी    27-Jun-2017
Total Views |


अमित, लक्ष्मण, प्रविण यांच्या या धडपडीत आज अनेक तरुण कलाकार सहभागी होत आहेत. विशेषत: जॅझ, हिपहॉपचा प्रभाव असलेल्या आजच्या काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोककलेविषयी आवड निर्माण करण्यात त्यांना यश मिळत आहे. लोककलांचे हे संस्कृती संचित कसे जपून ठेवायचे? राणेसरांसमोरील या प्रश्नासाठी हे तरुण कलाकार उत्तर म्हणून समोर आले आहेत. हा वारसा आपण पुढे चालवू हा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे.

भारताला सांस्कृतिक विविधतेचे वरदान लाभले आहे. येथील लोककलांची परंपरा या विविधतेतूनच समृध्द झाली. महाराष्ट्रातच गोंधळ, बहुरूपी, वासुदेव, वाघ्या-मुरळी, कोळी नृत्य, कोकणातील दशावतारी, जाखडी नृत्य, विविध भागांतील आदिवासी नृत्य आदी कलांचा वारसा पहायला मिळतो. पूर्वी या लोककला केवळ विशिष्ट भागापुरत्या किंवा विशिष्ट जनजातींसाठी मर्यादित होत्या. साधारण 1960नंतर, म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात मोठया प्रमाणात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडू लागले. त्याचा परिणाम येथील लोककलांवरही होऊ लागला. या काळात जनमानसात लोककलांविषयी रुची निर्माण झाली आणि अभ्यासकांचेही लक्ष या क्षेत्राकडे वळले. त्यातून अनेक लोककलांचा प्रसार आणि अभिजातीकरण होऊ लागले. मात्र गेल्या 2-3 दशकांत आधुनिकीकरणाची जादूई कांडी फिरली. बदलत्या काळात मनोरंजनाची माध्यमे बदलली, व्यक्त होण्याची साधने अधिक आधुनिक झाली, कलाविष्काराच्या जगतावरही पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा वाढला. या सगळयात लोककलांचा हा वारसा हरवत चालला. मात्र आजही काही जण या लोककलांच्या संवर्धनासाठी धडपडत आहेत. कौतुकाची बाब म्हणजे या मूठभर लोकांमध्ये काही तरुणही आहेत.

अमित घरत, लक्ष्मण पडवळ, प्रवीण कदम आणि त्यांचा मित्रपरिवार लोककलांचे जतन आणि प्रसार करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. 2009-10मध्ये सह्याद्री वाहिनीवर झालेल्या 'धिना धिन धा' या नृत्यस्पर्धेत लक्ष्मण आणि अमित यांचे ग्रूप स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ही नृत्यस्पर्धा त्यांचे आयुष्य बदलणारी ठरली. याचे कारण म्हणजे या कार्यक्रमाचे परीक्षक असलेले लोककला अभ्यासक सदानंद राणे यांचे मार्गदर्शन त्यांना स्पर्धेदरम्यान आणि त्यानंतरही कायम मिळत राहिले.

लक्ष्मण पडवळ चिपळूणमधील चिवेली गावचा. भोई समाजाचा. शालेय शिक्षण गावीच झालेले. त्यामुळे गावच्या मातीत रुजलेला. जाखडीमधील धुमाळी हा या भागात प्रामुख्याने केला जाणारा नृत्यप्रकार. पाऊस सुरू झाला, रंगशाळेतील गणेशाच्या मूर्तींना आकार येऊ लागला की कोकणात जाखडी करणाऱ्या तरुणांच्या गटांचाही जोरदार सराव सुरू होतो. गौरी-गणपतीच्या सणात सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यात लक्ष्मणही सहभागी होत असे. शिक्षणासाठी तो मुंबईत आला. पण आपल्या मातीतील जाखडी, पालखी नृत्य यांसारख्या लोककलांविषयीची ओेढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

कोकणातील खाडीपट्टयात प्रदूषण झाल्यामुळे आणि शेतीतील अपुऱ्या उत्पन्नामुळे कोकणी माणूस नोकरीधंद्यासाठी मुंबईकडे वळला. त्यामुळे तेथील लोककला हळूहळू लुप्त होऊ लागल्या. या लोककलांना चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याची आणि त्यांना अधिकाधिक लोकांसमोर सादर करण्याची गरज त्याला जाणवू लागली. त्यासाठी त्याचे प्रयत्नही सुरू होते. याच दरम्यान प्रवीण कदम याच्याशी मैत्री झाली. प्रवीणचे गावही कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील. प्रवीण जरी मुंबईत वाढलेला असला, तरी कोकणातील संस्कृतीशी त्याची नाळ कायम जोडलेली. गौरी-गणपतीसाठी आणि इतरही वेळी गावी जाण्यासाठी पायाला चाके लावणाऱ्या चाकरमान्यांपैकी तो एक. त्यामुळे लक्ष्मणच्या धडपडीला त्याने मनापासून साथ दिली. त्यातून 'अथर्व-वेद कलामंच' सुरू झाला. त्यात अनिकेत पवार, सिध्देश वैद्य आदी तरुणही सहभागी झाली. या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातच नव्हे, तर दुसऱ्या राज्यांमध्येही जिथे जिथे लोककलांसाठी व्यासपीठ, स्पर्धा असेल तिथे आपल्या लोककला सादर केल्या. केवळ कोकणातील लोककलांवर लक्ष केंद्रित न करता ही मंडळी सर्वच लोककलांचा अभ्यास करू लागली. आदिवासी (वनवासी) लोककलांविषयी या तरुणांना विशेष प्रेम जाणवू लागले. ते या लोककलांचा विशेष अभ्यास, निरीक्षण करू लागले.

डिसेंबर 2016मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने प्रभादेवीच्या पु.ल. देशपांडे अकादमीत 'आदिरंग' या वनवासी लोकनृत्य सोहळयाचे आयोजन केले होते. या महोत्सवात महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओदिशा, मणिपूर, लेह-लडाख, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, केरळ आदी राज्यांतील वनवासी लोककलांचे सादरीकरण झाले. त्यात 700हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता. वनवासी संस्कृतींचे दर्शन घडवणारी प्रदर्शनेही महोत्सवात होती. हा महोत्सव पाहताना वनवासी लोककला हा किती मोठा विषय आहे हे लक्ष्मण आणि प्रवीण यांच्या लक्षात आले. त्यांना जाणवले की, देशभरातील वनवासी लोककलांमध्ये खूप वैविध्य आहे. अगदी त्याच्या संगीतापासून ते त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाद्यांच्या निर्मितीपर्यंत ही विविधता आढळते. वनवासी जनजातींमधील नृत्य आणि संगीत हे आनंद व्यक्त करण्यासाठी आणि सामूहिक स्वरूपातील असते. मात्र त्यांच्याविषयीच्या अभ्यासाच्या अभावाने नृत्य सादर करणारे त्यात आपल्याला हवे तसे बदल करतात. 'अथर्व-वेद'चा भर मात्र लोककलांचे मूळ स्वरूप जतन करण्यावर आहे.

आजच्या बदलत्या काळातील तरुणांच्या मनात लोककलांविषयीची भावना काय आहे असे विचारले असता लक्ष्मण सांगतो, ''या क्षेत्रात आवड निर्माण होणे गरजेचे असते. आम्हाला लोककलांविषयी गोडी वाटते. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना लोककलांविषयी भरपूर माहिती उपलब्ध होते. मात्र अनेकदा चुकीची माहितीही दिलेली असते. ती माहिती वाचून लोककलांवर आधारलेले नृत्यप्रकार बसवले जातात. ते योग्य नाही. आम्ही प्रत्येक लोककलेविषयीचा पूर्ण अभ्यास करण्यावर भर देतो. त्याचे मूळ स्वरूप जतन करण्याचा आमचा प्रयत्न असतो.''

अमित आणि लक्ष्मण दोघांची भेट 'धिना धिन धा'च्या निमित्ताने झाली. त्यानंतर मात्र वेगवेगळया वाटांवरच्या या वाटसरूंना आपले ध्येय एकच असल्याचे जाणवले, ते म्हणजे कलेची जोपासना. अमितची कहाणी थोडी वेगळी. मुंबईत वाढलेल्या अमितसाठी सुरुवातीपासून नृत्य हेच पॅशन होते. इंदुमती लेले यांच्याकडून शास्त्रीय नृत्याचे धडे घेतल्यानंतर 2003पासून अमितने नृत्य दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपल्या करिअरला सुरुवात केली. त्याच्या केंद्रस्थानीही लोकनृत्यच होते. नृत्यात सुयोग्य असे मॉडिफिकेशन करून सादर करणे ही अमितची खासियत आहे. या क्षेत्रातही करिअर करता येऊ शकते हा विश्वास त्याने ठेवला आणि त्याचे फळही त्याला मिळत आहे. त्यासाठी त्याने बेस्टमधल्या नोकरीवरही पाणी सोडले आणि याच क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा निश्चय केला. त्यातून याच क्षेत्रातील एका वेगळया करिअर पर्यायाचा शोध त्याला लागला.

''माझा प्रेमविवाह होता. माझ्या सासरच्यांना सरकारी नोकरी असलेला मुलगा पाहिजे होता, म्हणून मी बेस्टमध्ये नोकरीला लागलो. त्याच वेळी नृत्य क्षेत्रात विविध स्पर्धांमध्ये उतरत होतो. दोन्ही क्षेत्रांचा मेळ बसवणे कठीण जात होते. शारीरिक त्रासही होत होता. याच क्षेत्रात स्वत:चे काही तरी करू शकेन असा आत्मविश्वास निर्माण झाला. त्या वेळी मी बेस्टची नोकरी सोडली आणि स्वत:चे कॉस्च्युमचे दुकान सुरू केले. त्यासाठी जागा भाडयाने घेतली. दुकानाच्या निमित्ताने या क्षेत्रात माझा संपर्क वाढत गेला. लोककला सादर करणारे कलाकार आमच्याकडून कपडे घेऊन जाऊ लागले. कधीकधी मोठया संख्येने या पोषाखांची मागणी असे. मग तितके पोषाख तयार करून द्यावे लागायचे. असे करताना कपडयांची संख्या वाढत गेली आणि दुकानही वाढले. कथकली, मोहिनीअट्टम यांसारख्या पारंपरिक नृत्यप्रकारांसाठीही आमच्याकडे ड्रेसची मागणी होऊ लागली. उमेश जाधव, दीपाली सय्यद यांसारख्या नावाजलेल्या नृत्य दिग्दर्शकांनीही आमच्या या दुकानाला भेट दिली.''

या व्यवसायाच्या निमित्ताने अमितने लोककलांचा वेगळया अंगाने अभ्यास सुरू केला. त्याविषयी तो सांगतो, ''धिना धिन धा'च्या वेळी आम्ही जाखडी सादर केली होती. त्यासाठी मी पोषाख तयार केला होता. नृत्याचा पोषाख तयार करताना लोक नेटवर त्या वेषभूषेचे फोटो शोधतात आणि त्याला जुळून येईल अशी वेषभूषा करतात. फार कमी जण ऑथेंटिक कॉस्च्युम तयार करतात. पण मी प्रत्येक वेषभूषेचा अभ्यास करून स्वत: पोषाख तयार करू लागलो. त्यामुळे माझ्याकडच्या पोषाखांना मागणी वाढली.''

व्यवसायाच्या जोडीला अमितचे नृत्य दिग्दर्शनही सुरूच आहे. विविध शाळांच्या, महाविद्यालयांच्या, तसेच अन्य नृत्यस्पर्धांसाठी किंवा सोहळयांसाठी तो नृत्य दिग्दर्शन करतो. त्याशिवाय दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांसाठीही त्याने नृत्य दिग्दर्शन केले आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट'सारख्या लोकप्रिय रिऍलिटी शोसाठीही कोरिओग्राफी करण्याची संधी त्याला मिळाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचलनातील महाराष्ट्राच्या नृत्यपथकासाठी या वर्षी अमितने कोरिओग्राफी केली होती आणि या पथकाला तिसरे पारितोषिकही मिळाले. त्याशिवाय विविध स्टेज शोमधून अमित वेगवेगळया भूमिका साकारतो. आतापर्यंत त्याने शिवाजी महाराज, गौतम बुध्द, मल्हार, महादेव अशा अनेक भूमिका वेषभूषेसह उत्तम वठवल्या आहेत. आपला व्यवसाय, छंद सांभाळतानाच अमित दहिसरच्या पूर्ण प्रज्ञा हायस्कूलमध्ये नृत्यशिक्षक म्हणून नोकरीही करू लागला. या सगळयातून त्याला अर्थिक स्थैर्य मिळाले. पूर्वी नृत्याच्या सरावासाठी जाताना खिशात पैसे नसल्यामुळे वरळी ते चर्चगेट हे अंतर पायी जाणाऱ्या अमितकडे आज टू-व्हीलर आणि फोर-व्हीलर दोन्ही आहेत. कलेवर निस्सीम प्रेम केले आणि जे मी मागितले ते सर्व आपल्याला मिळाले, अशी कृतज्ञता तो व्यक्त करतो. अमितचा स्वतंत्र ग्रूप असला, तरी एखाद्या कार्यक्रमाची गरज असेल तसे लक्ष्मण, प्रवीण आणि अमित एकमेकांची मदत घेतात.

लोककलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या या तरुणांना ऐन उमेदीच्या काळात सदानंद राणे यांच्यासारख्या लोककला अभ्यासकाचे आणि 'धिना धिन धा'चे निर्माते राज पंचभाई यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी या मुलांना लोककलांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. राणे सरांनी 1972 सालापासून लोककलांसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याआधीही लहानपणी ते वडिलांसोबत लोककलांच्या कार्यक्रमांना जायचे. त्यानंतर लोककला सादर करणाऱ्या एका ग्रूपमध्येही ते सहभागी होते. वेगवेगळया भागांतील लोककलांचे ते निरीक्षण करीत असत. त्या वेळी आताप्रमाणे कॅमेरा, प्रिंट अशी डॉक्युमेंटेशनची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. मग चित्रे काढून एखाद्या लोककलेत कशा प्रकारचा पोषाख घातला गेला आहे, कशा प्रकारची वाद्ये वापरली आहेत त्याची नोंद राणे करू लागले. पुढच्या काळात कॅमेराही घेतला आणि छायाचित्रे काढून जमवू लागले. तसेच 1975पासून वृत्तपत्रांमध्ये लोककलांसबंधी आलेल्या माहितींची कात्रणे काढू लागले. लोककलांसंबंधी जी काही माहिती उपलब्ध होईल ती ते जमवू लागले आणि स्वत:च्या शब्दात लिहूनही ठेवू लागले. ही माहिती पुढच्या पिढयांपर्यंत पोहंोचवण्यासाठी तिचे डॉक्युमेंटेशन होणे गरजेचे आहे, याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी या माहितीला पुस्तक स्वरूपात आणण्याचे प्रयत्न त्यांनी शासन दरबारी केले. परंतु त्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही.

राणे सर सांगतात, ''मी 70च्या दशकात लोककलांचा अभ्यास करायला सुरुवात केली. या मधल्या काळात या क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. विशेषत: पोषाखात. खरे तर बदल झाले पाहिजेत, पण तसे करताना त्याच्या मूळ संकल्पनेला धक्का लागता कामा नये, त्याची ओरिजिनॅलिटी राहिली पाहिजे, असे मी आजच्या तरुण कलाकारांना सांगत असतो. उदाहरणार्थ, स्टेजवर शेतकरी सादर करताना हल्लीची मुले पँटवर सदरा आणि डोक्यावर फेटा अशी वेषभूषा करतात. तसे न करता सुती धोतराऐवजी सिल्कचे धोतर घातले तरी चालेल. कोकणातील बाल्या नृत्यामध्ये पूर्वी कलाकार धोतर घालायचे, त्याही आधी नुसतेच रुमाल गुंडाळायचे, नंतर नंतर हाफ पँट घालून बाल्या नृत्य सादर केले जाऊ लागले. 'धिना धिन धा'मध्ये एका ग्रूपने बाल्या नृत्याच्या गाण्याची आधुनिक आवृत्ती असलेली सीडी बघून नृत्य बसवले होते. त्या वेळी मी त्यांना हे बरोबर नसल्याचे सांगितले. मात्र मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सीडीमध्ये त्याचा इतका वेगळया स्वरूपातील आविष्कार असतो, ज्याची कॉपी नवे कलाकार करता. पण हे चुकीचे आहे, असे आम्ही कोणाकोणाला सांगणार?''

अमित, लक्ष्मण, प्रवीण यांच्या या धडपडीत आज अनेक तरुण कलाकार सहभागी होत आहेत. विशेषत: जॅझ, हिपहॉपचा प्रभाव असलेल्या आजच्या काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोककलेविषयी आवड निर्माण करण्यात त्यांना यश मिळत आहे. लोककलांचे हे संस्कृती संचित कसे जपून ठेवायचे? राणे सरांसमोरील या प्रश्नासाठी हे तरुण कलाकार उत्तर म्हणून समोर आले आहेत. हा वारसा आपण पुढे चालवू हा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे.

''या मुलांना आता लोककलांविषयी आवड निर्माण झाली आहे. आता जिथे जिथे लोककला सादर होतात, तिथे ते जातात. तेथे सादर होणारे नृत्य, गाणी, त्यात वाजवली जाणारी वाद्ये, पोषाख यांचे निरीक्षण करतात. आपण सादर करत असलेल्या नृत्यात आवश्यक असेल तेथे थोडेफार मॉडिफिकेशनही करतात. लोककला क्षेत्रात कोरिओग्राफी करणारे फार कमी जण आहेत. तसे नृत्य बसवण्याची खुबी फार कमी जणांना अवगत असते. आमच्यामध्ये अमितसारखे चांगले नृत्य दिग्दर्शक आहेत.'' मुले तयार होत असल्याचे समाधान राणे सर व्यक्त करतात.

आज ही मुले देशात कुठेही लोककलांसाठी व्यासपीठ उपलब्ध असेल, तरी तेथे जाऊन सादरीकरण करतात. तसेच अन्य लोककलांचा अभ्यास करतात. मात्र अशी व्यासपीठे फारच कमी आहेत. चित्रवाहिन्यांवर सादर होणाऱ्या नृत्यस्पर्धांमध्ये काही तरी हटके हवे असते. अशा वेळी त्या लोककलांची मोडतोड करून सादरीकरण केले जाते. त्यातून मूळ कलेला धक्का पोहोचतो याची जाणीव फार कमी जणांना असते. लोककलांचा अभ्यास करून त्यांच्या मुळाशी गेले, तर खूप मोठे संस्कृतीधन सापडले. मात्र तसे करू इच्छिणाऱ्या तरुण कलाकारांची आज गरज आहे. लक्ष्मण, अमित, प्रवीण, त्यांच्या मित्रमंडळींना हे संस्कृतीधन गवसले आहे आणि ते धन पुढच्या पिढयांना समृध्द करेल, हे नक्की!

9833109416