'पेपर गणेश'चा पर्यावरणस्नेही पर्याय

विवेक मराठी    31-Jul-2017   
Total Views |


प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण लक्षात घेऊन अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. पर्यावरणस्ेही पर्यायांचा याहीपेक्षा वेगळा विचार करण्याचा प्रयत्न काही मूर्तिकार करताना दिसतात. रोहित वस्ते या मुंबईकर तरुणाला काही वर्षांपूर्वी अशीच एक वेगळी कल्पना सुचली. कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनविण्याची. वजनाला हलक्या आणि मजबूत, तरीही आकर्षक अशा या पेपर गणेशमूर्ती पाण्यामध्ये 100 टक्के विरघळतात.

माजात पर्यावरणाचे भान काही प्रमाणात तरी निर्माण व्हायला लागलेय, हे गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. गणेशोत्सवात ज्या कारणांमुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते, त्यासाठी अन्य पर्यायांचा विचार होऊ लागला आहे. देखाव्यातूनही पर्यावरणाच्या रक्षणाचे संदेश दिले जातात. त्यातही पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण लक्षात घेऊन अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. याहीपेक्षा वेगळा विचार करण्याचा प्रयत्न काही मूर्तिकार करताना दिसतात. कुंडीतच उभारला जाणारा ट्री गणेश, तुरटीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती, गोमय गणेश अशा वेगळया कल्पनांचा त्यातूनच जन्म झाला. रोहित वस्ते या मुंबईकर तरुणाला काही वर्षांपूर्वी अशीच एक वेगळी कल्पना सुचली. कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनविण्याची.

गेली दहा वर्षे रोहित कॉस्च्युम डिझायनिंग क्षेत्रात आहे. या क्षेत्रात त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. कलेची जाण होतीच. आवड म्हणून तो गणेशमूर्ती बनवू लागला. 10-12 वर्षांपासून त्यांचा परिवार गणेशमूर्ती बनविण्याच्या व्यवसायात आहे. कॉस्च्युम डिझायनिंगमधील आपले काम सांभाळून रोहित हा व्यवसायही करत होता. गणेश विसर्जनानंतर काही दिवस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोडतोड झालेल्या अवस्थेत किनाऱ्यावर आलेल्या दिसतात. आपल्या लाडक्या गणरायाची ही विटंबना पाहताना रोहितला खूप वाईट वाटायचे. त्यासाठी मूर्तिकार म्हणून आपण काय करू शकू, याचा विचार तो करू लागला. हल्ली मुंबई-पुण्यासारख्या कॉस्मॉपॉलिटन शहरांमधील लोकांनाही हळूहळू पर्यावरणाचे महत्त्व लक्षात यायला लागलेय, असे त्याला जाणवले. मात्र इकोफ्रेंडली गणेशमूर्ती म्हणजे शाडूच्या मातीची गणेशमूर्ती एवढेच लोकांना कळत होते. रोहितने काहीतरी वेगळया पर्यायाचा विचार करताना मातीच्या मूर्तींमधील दोषांचा अभ्यास केला.

''मातीच्या मूर्ती वजनाला जड असल्याने लोक त्या घ्यायला घाबरतात. चुकून धक्का लागला तरी त्या तुटण्याची भीती असते. म्हणून मी कागदाच्या लगद्यापासून गणपती बनवायचे ठरविले. असे प्रयत्न याआधीही काही जणांनी केले होते. मी त्याविषयीची माहिती जमविली, अभ्यास केला. मात्र कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनविण्याच्या रूढ प्रक्रियेतही काही दोष असल्याचे मला आढळले. त्यात काही बदल करण्याची गरज होती. त्यासाठी मी दोन वर्षे प्रयत्न केले. त्यात लाखोंचे नुकसान झाले. अखेर पूर्णपणे निर्दोष अशा इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्यात मला यश आले,'' अशा शब्दात रोहित त्याच्या धडपडीविषयी सांगतो.


या प्रयत्नातून तयार झालेल्या मूर्ती जुन्या पध्दतीने तयार झालेल्या मूर्तींपेक्षा वेगळया कशा? याचे उत्तर देताना रोहित सांगतो. ''मूर्तींसाठी कागदाचा लगदा हे माध्यम वापरले जात असताना रंगही पर्यावरणस्नेही वापरण्याची काळजी आम्ही घेतो. म्हणजेच जलाधारित (वॉटर बेस्ड) रंगांनी मूर्ती रंगवितो. तसेच गोंदही नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेला वापरतो. शिवाय या मूर्ती वजनाने खूपच हलक्या असतात. लहान मुलेही ती सहज उचलू शकतात. कागदाच्या वापरामुळे त्या मजूबतही असतात. त्यामुळे हाताळताना तोडफोड होण्याची शक्यता फारच कमी असते. आमच्या मूर्तींची अशी दुहेरी वैशिष्टये आहेत.''

रोहितनेही या मूर्तींचा आकारही 1 ते 3 फुटांपर्यंत मर्यादित ठेवला आहे. साधारण 2 ते 3 किलो इतकेच या मूर्तींचे वजन असते. शिवाय इकोफ्रेंडली मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या तुलनेत कमी आकर्षक असतात. त्यांना गुळगुळीतपणा आणण्यात आणि त्यांच्यावर कोरीव काम करण्यात मर्यादा येतात. मात्र रोहितमधल्या कलाकाराने त्यावरही मात केलीआहे. त्याने बनविलेल्या मूर्ती पाहिल्यावर त्या कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या आहेत हे लक्षातही येणार नाहीत, इतक्या त्या सुबकआणि आकर्षक दिसतात.

ज्या मुख्य उद्देशाने रोहितने या मूर्ती साकारण्यास सुरुवात केलीहोती, तो म्हणजे विसर्जनानंतर मूर्तींची होणारी विटंबना आणि जलप्रदूषण थांबविणे. या मूर्ती सहा तासांच्या आत पाण्यामध्ये 100 टक्के विरघळून जातात. तसेच घरच्या घरी त्यांचे विसर्जन केल्यास कागदाचा लगदा पुनर्निमितीसाठीही वापरता येतो.

कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या या मूर्तींना पर्यावरणप्रेमींकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे रोहित सांगतो. ु.झरशिीॠरशिीह.लाि ही त्याची वेबसाइट आहे. ई मार्केटिंगचे माध्यम वापरल्याने देशाबाहेरूनसुध्दा या मूर्तींना मागणी होत आहे. तसेच होम डिलीव्हरीची सुविधाही आहे.

किमतीच्या बाबतीत मात्र या मूर्ती तुलनेने महाग म्हणाव्या लागतील. रोहित सांगतो, ''गणेशोत्सवात लोक गणेशमूर्तीपेक्षा सजावटीला आणि रोशणाईला जास्त महत्त्व देतात. त्यासाठी अधिक खर्च करतात. पर्यावरणस्नेही मूर्ती बनविताना खर्च अधिक होत असल्याने किंमतही थोडी जास्त असते. मात्र विसर्जनानंतर मूर्तींची होणारी तोडफोड, विटंबना यांमुळे लोकांच्या भावना दुखावतात. तसेच प्रदूषणामुळे निसर्गाचीही हानी होते. या गोष्टींचा विचार केल्यास मूर्तींसाठी होणारा खर्च तुलनेने कमी असल्याचे लक्षात येईल.''


रोहितच्या मार्गदर्शनाखाली सध्या 5-6 जणांची टीम या गणेशमूर्तींच्या निर्मितीत सहभागी आहे. जागा आणि मनुष्यबळ या दोन समस्या रोहितसमोर आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींविषयीची जनजागृती. निसर्गाचे जतन करून साजरा केलेला गणेशोत्सव हीच खरी गणेशवंदना आहे, हा मूठभर लोकांनी स्वीकारलेला विचार घराघरात पोहोचण्याची गरज आहे.

सार्वजनिक मंडळांमध्ये तर असे पाऊल उचलणारे खूपच कमी जण आहेत. गणेशोत्सवाच्या देखाव्यात पर्यावरणाच्या रक्षणाचा सामाजिक संदेश देणारी मंडळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भव्य-दिव्य मूर्तींचा आग्रह धरताना दिसतात. त्यामुळे मग गल्लोगल्लीच्या राजांच्या मूर्ती विसर्जनानंतर ज्या अवस्थेत किनाऱ्यावर दिसतात, ते चित्र खरोखरीच दयनीय असते. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनीही पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींना प्राधान्य दिल्यास रोहितसारख्या कलाकारांच्या प्रयत्नांचे खऱ्या अर्थाने चीज होईल.

 

रोहित वस्ते

९८२०८२८८०४ 
www.PaperGanesh.com