भारतीय मूल्ये जपणारी भारत विकास परिषद

स्रोत: विवेक मराठी    दिनांक31-Jan-2018   

राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठयांचा आदर, सेवाभाव या संस्कारांशिवाय घडणाऱ्या पिढीचे आणि त्या देशाचे भविष्य अंधारातच म्हणावे लागेल. या अंधाराच्या चाहुलीने सजग झालेली भारत विकास परिषद सातत्याने अनेक संस्कार प्रकल्प देशव्यापी स्वरूपात राबवत असते. असाच एक उपक्रम नुकताच कांदिवली येथे राबवण्यात आला होता, तो म्हणजे 'भारत को जानो' ही स्पर्धा. दर वर्षीपूर्ण भारतातील शालेय विद्यार्ध्यांसाठी ही स्पर्धा घेतली जाते.

आजच्या बदललेल्या सामाजिक वातावरणात संस्कारांचे महत्त्व हरवत चालले आहे. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठयांचा आदर, सेवाभाव या संस्कारांशिवाय घडणाऱ्या पिढीचे आणि त्या देशाचे भविष्य अंधारातच म्हणावे लागेल. या अंधाराच्या चाहुलीने सजग झालेली भारत विकास परिषद सातत्याने अनेक संस्कार प्रकल्प देशव्यापी स्वरूपात राबवत असते. असाच एक उपक्रम नुकताच कांदिवली येथे राबवण्यात आला होता, तो म्हणजे 'भारत को जानो' ही स्पर्धा. दर वर्षीपूर्ण भारतातील शालेय विद्यार्ध्यांसाठी ही स्पर्धा घेतली जाते.

या स्पर्धेत सुमारे 10 लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग घेतात. भारताची संस्कृती, धर्म, इतिहास, विज्ञान, संविधान, साहित्य, धर्मग्रंथ, खेळ, तात्कालिक घटना या सगळया विषयांचा समावेश या स्पर्धेतील प्रश्नांमध्ये असतो. या स्पर्धेच्या तयारीसाठी परिषदेतर्फेच 'भारत को जानो' हे पुस्तक छापण्यात येते. या पुस्तकाच्या हिंदी, इंग्लिश व गुजराती भाषांमधील 3 लाख प्रती विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातात.

1963 साली भारत विकास परिषदेची स्थापना झाली. तेव्हापासून भारतीय मूल्यांवर आधारित काम करण्याचे व्रत संस्थेने घेतले आहे. ते आजही अविरत सुरूच आहे. सीताराम पारिक हे परिषदेचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. डॉ. एस.सी. गुप्ता हे राष्ट्रीय उपाध्यक्ष, ओमप्रकाश कानूनगो हे राष्ट्रीय वित्त मंत्री, सुरेश जैन हे राष्ट्रीय संगठन मंत्री आहेत. 

राष्ट्रप्रेम जागवणारी आणखी एक स्पर्धा परिषदेतर्फे घेण्यात येते - राष्ट्रीय समूहगान स्पर्धा. 10 डिसेंबर 2017 रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णजयंती समूहगान स्पर्धेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्याच हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे अन्यही अनेक कार्यक्रम परिषद राबवत असते. 'गुरु वन्दना-छात्र अभिवंदना' या कार्यक्रमाद्वारे गुरूंचा आदर करण्याचा भारतीय संस्कार मुलांमध्ये बिंबवला जातो. दरवर्षी 26,000 शाळांमध्ये हा कार्यक्रम केला जातो आणि त्यात सुमारे 10 लाख विद्यार्थी सहभागी होतात.

या व्यतिरिक्त सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून अनेक उपक्रम भारत विकास परिषद सातत्याने राबवत असते. 'राष्ट्र देवो भव', 'नरसेवा हीच नारायण सेवा' हे संस्थेचे ब्रीदच आहेत. संस्थेने वर्षभर राबवलेल्या रक्तदान महामोहिमेत 70,000 युनिट रक्त उपलब्ध करून दिले. लष्करातील सैनिकांना आणि सरकारी रुग्णालयातील गरीब रुग्णांना रक्ताचा पुरवठा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. याशिवाय नेत्रदान शिबिर, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, पॅथॉलॉजी लॅब, रुग्णवाहिका, जेनरिक मेडिकल स्टोअर आदी माध्यमांतून देशाच्या विविध भागांत आरोग्य सेवा दिली जाते.

विवाहाचा न परवडणारा खर्च हा अनेक कुटुंबांसाठी कर्जाचा बोजा वाढवणारा ठरतो. परिषदेने आतापर्यंत एक हजार सामूहिक विवाह आयोजित करून अशा कुटुंबांना दिलासा दिला आहे. हरियाणासारख्या राज्यात परिषदेने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'सारखी मोहीम राबवून लोकांची मानसिकता बदलली.

परिषदेने आतापर्यंत जास्तीत जास्त विकलांगांना जयपूर फूट देऊन त्यांना सक्षम केले आहे. संस्थेचे असे असंख्य उपक्रम भारतभर सुरू असतात. जिथे नैसर्गिक आपत्ती असेल, लोकांना मदतीची गरज असेल तेथे परिषदेचे सदस्य मदतकार्यासाठी धावून जातात.

सरकारकडून कोणतेही अनुदान न घेता सदस्यांच्या आणि लोकांच्या सहभागातून या सर्व कार्याचा खर्च केला जातो, हे विशेष. हे सर्व करताना केवळ सेवाभाव एवढीच आमची भावना असते, ही आमची सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही हे काम करत राहतो, अशी भावना परिषदेचे कार्यकारी सदस्य व्यक्त करतात.

9594961851