राहुल गांधी, भाजपाचे प्रचारक

विवेक मराठी    31-Oct-2018   
Total Views |

राफेलमध्ये घोटाळा झाला आहे असे म्हणणे म्हणजे बोफार्सच्या घोटाळयाची आठवण करुन देणे आहे. मोदी पैसा खात नाहीत आणि कुणाला खाऊ देत नाहीत, हे जगाला माहीत आहे. राहुल गांधींना देखील माहीत आहे. मग तरी ते राफेलचा विषय का करतात? मोदींचे पारडेजड व्हावे यासाठी तर नाही ना?

नरेंद्र मोदी यांचे स्टार कॅम्पनेर कोण आहेत? तुम्ही उत्तर द्याल की, अमितभाई शहा आहेत. ते आहेतच, पण त्यांच्यापेक्षा अधिक जोमाने हे काम राहुल गांधी करीत आहेत. मध्यप्रदेश निवडणुक प्रचारात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला की त्यांचे नातेवाईक पनामा घोटाळयात अडकले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विरुध्द अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याचे ठरविले आहे. पनामा घोटाळयात पाकिस्तानचे पंतप्रधान मियाँ नवाज शरीफ यांचे पंतप्रधान पद गेले आणि नशिबी तुरुंगवास आला. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्याचा या घोटाळयाशी काही संबंध नाही. पण राहुल गांधींनी त्यांचे नाव घेतले. स्लीप ऑफ टंग झाले असे नंतर म्हटले. हे त्यांनी मुद्दाम केले असेल का? कारण या प्रसिध्दीचा फायदा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनाच होणार आहे.

राफेल घोटाळयावर ते रोज बोलत असतात. राफेल म्हटले की बोफार्सची आठवण येते. त्या बोफार्समध्ये राजीव गांधी यांना पंतप्रधान पद गमवावे लागले. राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी आणि त्यांचे नातेवाईक यांचे हात बोफार्स घोटाळयात गुंतलेले आहेत. क्वात्रोची याला देशातून पळून जाऊ देण्यात आले. बोफार्सचा पैसा त्याच्याकडे होता. हा सोनियाचा नातेवाईक. राफेलमध्ये घोटाळा झाला आहे असे म्हणणे म्हणजे बोफार्सच्या घोटाळयाची आठवण करुन देणे आहे. मोदी पैसा खात नाहीत आणि कुणाला खाऊ देत नाहीत, हे जगाला माहीत आहे. राहुल गांधींना देखील माहीत आहे. मग तरी ते राफेलचा विषय का करतात? मोदींचे पारडेजड व्हावे यासाठी तर नाही ना?

राहुल गांधी सध्या देवळात जातात. त्यांची आई कॅथोलिक आहे. ती कधी देवळात गेल्याचे लोकांनी पाहिले नाही. मानसरोवराची यात्रा करुन राहुलजी आले. मी शिवभक्त असल्याचे ते सांगतात. काँग्रेसच्या प्रचारासाठी मुस्लिम नेत्यांना ते बोलावित नाहीत. काँग्रेसची प्रतिमा हिंदुविरोधी झाली आहे, ती त्यांना दुरुस्त करायची आहे. मोदींची प्रतिमा अस्सल हिंदू हितरक्षक अशी आहे. त्यांना मंदिरात जाण्याची नाटके करावी लागत नाहीत. मोदींच्या हिंदूपणाची नक्कल राहुल गांधी का करीत आहेत? ड़ालडा तूपापेक्षा, साजूक तूप चांगले हे लोकांना समजते. नकली मालापेक्षा अस्सल माल चांगला, हे लोकांना समजण्यासाठी तर करीत नाहीत ना?

मोदींविरुध्द लढण्यासाठी सर्व पक्षांची आघाडी करण्यासाठी राहुल गांधी फारसा पुढाकार घेत नाहीत. पुढाकार घ्यायचा तर थोडे नमते घ्यावे लागते. ज्यांना बरोबर घ्यायचे त्यांना भरपूर वाटा द्यावा लागतो. राहुल गांधी त्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे विरोधी ऐक्य नाही. विरोधी ऐक्य नसल्यामुळे मतांचे विभाजन ठरलेले आहे. मतांचे विभाजन झाले की भाजपाचा विजयही ठरलेला आहे. म्हणून पुढच्या भाजपाच्या विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदी, अमित शहा की राहुल गांधी?