सूर गवसलेल्या स्वयंसिध्दा

विवेक मराठी    15-Nov-2018   
Total Views |

  

दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळच्या शेतकरी विकास प्रकल्पाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, विशेषत: पत्नींना आधार देणं. 'दीनदयाळ'चे कार्यकर्ते बंधू साडी-चोळी, मिठाई, लक्ष्मीचा फोटो, ओवाळणी म्हणून काही पैसे, एखादी संसारोपयोगी वस्तू घेऊन या ताईकडे येतात. या भेटीतून तिला माहेरपण भेटतं, मायेचा आधार भेटतो. आपण एकटे नाही ही जाणीव तिला खूप मोठी उभारी देऊन जाते. नुसता मानसिक आधार देऊन भावाची जबाबदारी संपत नाही ना... या आपल्या बहिणीला स्वत:च्या पायावर उभं करणं ही खरी जबाबदारी ठरते. 'दीनदयाळ'ने ज्यांच्या आयुष्याला उभारी दिली, अशा काही महिलांच्या गाथा या ठिकाणी मांडत आहे. त्यांना यशोगाथा म्हणावे इतकी त्याची व्यापकता नसेलही, पण एक कोंडी फोडून प्रवाहात येणाऱ्या या महिलांसाठी त्यांच्यातील हा छोटासा बदलही मोठे परिवर्तन ठरत आहे.

 कामाच्या निमित्ताने विदर्भात अनेकदा प्रवास करता आला. विदर्भातला पाहुणचारही नेहमीच आवडतो. पण या भूप्रदेशावर (काही भाग वगळता) असलेल्या दुष्काळाच्या सावटामुळे अनेकदा येथील वातावरण रूक्ष वाटू लागतं. या वेळचा माझा प्रवास हा यवतमाळचा दुसरा प्रवास होता आणि तोही खूप वर्षांनी केला होता. मात्र या वेळचं यवतमाळचं वातावरण थोडं वेगळंच जाणवत होतं. जून-जुलैच्या पावसाने चांगली उपस्थिती लावल्याचं दिसत होतं. रस्त्याच्या दुतर्फा माळरान हिरवंगार झालेलं. तलाव, धरणं पावसाच्या पाण्याने भरली आहेत. वावरात बाया-बापडयांची शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. कुठे जौत नांगरणी करताहेत, कुठे बाया बसून गवत खुरपतायत, कुठे पिकांवर फवारणी सुरू आहे. पऱ्हाडीच्या (कापसाच्या) वीत-दीड विताच्या पिकांनी वावरच्या वावर फुलले आहेत. तूर-सोयाबीनची पिकंही अधूनमधून डोलताहेत, तर कुणा बडया शेतकऱ्याच्या मोठयाच मोठया वावरात ऊसही वाढलाय. ढोरांना चाऱ्याची चंगळ झालीय. सगळयात महत्त्वाचं म्हणजे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. मनात म्हटलं, 'हे वरुणदेवा, या बळीराजावर अशीच कृपा ठेव तुझी!'

विदर्भ-मराठवाडयात असं दृश्य दुर्मीळ असतं. या भागांवर वरुणराजाची दृष्टी कशी राहील हे सांगणं अशक्य आहे. कोरडवाहू शेती ही पूर्णपणे निसर्गाच्या अधीन असते. त्यामुळे या प्रदेशातील शेतकऱ्यांना अतितीव्र दुष्काळ, ओला दुष्काळ, गारपीट असा कोणत्याही रूपात निसर्गाचा तडाखा बसला की मोठं नुकसान सहन करावं लागतं. शेती हेच आपलं कर्म मानून अनेक शेतकरी या कठीण परिस्थितीचा सामना करून अन्नधान्य पिकवतात. पण कधीकधी परिस्थिती हाताबाहेर जाते. कर्ज घेतल्याशिवाय शेती करता येत नाही आणि पुरेसं उत्पन्न नाही म्हणून कर्ज फेडता येत नाही, या दुष्टचक्रात शेतकऱ्याची वाताहत होते. निसर्ग आणि आर्थिक परिस्थिती दोन्हींसमोर तो हतबल होतो. या प्रदेशातील हजारो शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्याने खचून आत्महत्या केल्या. आत्महत्यांचं हे सत्र अद्यापही थांबलेलं नाही. यवतमाळ जिल्हा हा तर शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिला. दर नापिकीत हा माळ शेकडो शेतकऱ्यांना गळफास लावून किंवा विषाचे घोट घेऊन स्वत:चं आयुष्य संपवताना बघतो.

स्वत:चा जीव इतक्या सहजासहजी संपवणं ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. हे शेतकरी प्रचंड मानसिक ताणातून, नैराश्यातून जात असतील एवढंच आपण समजू शकतो. मात्र त्यांच्या जाण्याने त्यांच्या समोरचे सगळे प्रश्न संपतात का? घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबाने या सगळयाचा सामना कसा करावा? उंबरठयाबाहेरचं जगच माहीत नसलेल्या त्या घरातील महिलेने या सगळयातून कसं निभवावं? त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचं काय? कदाचित आपण आत्महत्या केल्यानंतर आपल्या कुटुंबाला सरकारी मदत मिळेल, कर्जमाफी होईल असा विचार करूनच हे शेतकरी बंधू आत्महत्या करत असतील. पण ही सर्व मदत म्हणजे तात्पुरती मलमपट्टी असते. त्यानंतरचं आख्खं आयुष्य त्या महिलेसाठी, त्या परिवारासाठी परीक्षाच असते. ऐन तारुण्यात वैधव्य, पती गेल्यानंतर सासरच्यांची मदत मिळत नाही, माहेरची परिस्थिती ठीक असली तर बरं, अन्यथा तिथेही उपेक्षाच वाटयाला येते. सरकारची मदत मिळण्यातही कागदपत्रांच्या, सातबाऱ्याच्या अडचणी असतात. अशा वेळी कोणी मार्गदर्शन करायला नसेल तर अधिकच कठीण अवस्था. मुला-बाळांच्या भविष्याचं राहो, दोन वेळच्या भाकरीचीही भ्रांत. त्यात अनेकींच्या वाटयाला वृध्द सासू-सासऱ्यांची जबाबदारीही येते. एरव्ही घरादारासाठी राबताना कधीही न थकणारी ही नार या आर्थिक जबाबदाऱ्यांनी कोलमडून पडते. अशा या संपूर्णपणे विषम परिस्थितीत एखाद्या विधवा स्त्रीने घराबाहेर पडून काही करायचा विचार केला, तरी ग्रामीण भागात आजही तिच्याकडे वेगळया नजरेने पाहिलं जातं. या परीक्षेच्या काठीण्यपातळीचा अंदाज त्या बिचाऱ्या महिलांनाही हळूहळू येऊ लागतो. यवतमाळच्या काही महिलांनी मात्र या परीक्षेसाठी स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं उत्तर शोधलं आहे आणि हे उत्तर शोधण्यासाठी त्यांना मदत करत आहे दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ.

दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ हे यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळया प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अपेक्षित अंत्योदयाचं - म्हणजेच समाज परिवर्तनाचं कार्य ही संस्था करत आहे. समाजातील उपेक्षित घटकांपैकी एक असलेल्या पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्याच्या कार्यापासून 1997 साली या मंडळाचा श्रीगणेशा झाला. मागून खाणं, चोरी-मारी करणं, छोटी-मोठी शिकार करून खाणं ही या समाजाची उपजीविका. अस्वच्छता, व्यसनाधीनता, अज्ञान, अंधश्रध्दा असा चोहोबाजूंनी अंधार असलेल्या या समाजाने स्वत:च्या उन्नतीचं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या पारधी विकास प्रकल्पाने या भागातील पारधी समाजाच्या नव्या पिढीला हे स्वप्न दाखवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं. त्यासाठी शिक्षणाचा मार्ग निवडला. आज पारधी समाजाच्या नव्या पिढीला स्वावलंबी, स्वयंपूर्ण बनवून समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यात या प्रकल्पाने मोठे यश मिळवलं आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर आणि अन्य कार्यकर्त्यांचा यात मोलाचा वाटा आहे.

त्यानंतर विदर्भातील आणि त्यातही यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन मंडळाने 2006 साली शेतकरी विकास प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पाचेही सुयोग्य परिणाम आता दिसू लागले आहेत. शेतकरी विकास प्रकल्पासमोर दोन महत्त्वाची उद्दिष्टं होती. एक म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं. यासाठी शेतकऱ्यांसमोरच्या प्रत्येक समस्येचा अभ्यास करून त्यांच्या निवारणासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांचं समुपदेशन करणं, शेतीतील वेगवेगळे प्रयोग, सेंद्रिय शेती, सरकारी योजना यांची माहिती शेतकऱ्यांना देणं, शेतीला जोडधंद्यांचा पर्याय सुचवणं, त्यासाठी शक्य ती मदत करणं अशा माध्यमांतून शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलं जातं.

शेतकरी विकास प्रकल्पाचं दुसरं उद्दिष्ट म्हणजे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार देणं. मात्र संस्थेने त्यासाठी काही निकष लावले आहेत. ज्या कुटुंबात महिलांवरच सगळी जबाबदारी आहे, सासर-माहेर दोन्हीकडचा आधार नाही किंवा घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, घरात लहान मुलं आहेत, अशा कुटुंबांची निवड मदत देण्यासाठी केली जाते.

संस्थेचे सचिव विजय कद्रे सांगतात, ''जिल्ह्यातील गावागावात कुठे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं कळलं की 'दीनदयाळ'चे कार्यकर्ते ते घर शोधून काढत तिथपर्यंत पोहोचतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या दारात जाऊन त्याच्या कुटुंबीयांना मदत देताना सुरुवातीला अनेक अडचणी यायच्या. चोहोबांजूंनी दु:खाचा आणि अविश्वासाचा काळोख अनुभवणाऱ्या त्या विधवेचा आणि तिच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करणं हेच मोठं आव्हान असायचं. हे लोक नक्की आपल्याला मदत करायला आलेत की त्रास द्यायला? आपल्याला मदत करण्यात त्यांचा काय फायदा असेल? त्यामागे काही राजकीय हेतू तर नसेल ना? एक ना एक अनेक शंका.''

पण संघाच्या मुशीत जगलेले हे कार्यकर्ते हार मानत नाहीत. सतत पाठपुरावा करून, त्या महिलेशी, कुटुंबाशी संवाद साधतात. त्या परिवाराच्या अडचणी जाणून घेतात. त्यांच्या दु:खावर फुंकर घालता घालता भाऊ-बहिणीच्या नात्याची गाठ बांधली जाते. ती घट्ट करण्यासाठी मग भाऊबीजेच्या कार्यक्रमाची योजना. 'दीनदयाळ'चे हे बंधू साडी-चोळी, मिठाई, लक्ष्मीचा फोटो, ओवाळणी म्हणून काही पैसे, एखादी संसारोपयोगी वस्तू घेऊन या ताईकडे येतात. या भेटीतून तिला माहेरपण भेटतं, मायेचा आधार मिळतो. आपण एकटे नाही ही जाणीव तिला खूप मोठी उभारी देऊन जाते. नुसता मानसिक आधार देऊन भावाची जबाबदारी संपत नाही ना... या आपल्या बहिणीला स्वत:च्या पायावर उभं करणं ही त्याची खरी जबाबदारी ठरते. कुणाला गाई दे, शेळया दे, कुणाला शेवई मशीन दे, कोणाला घरगुती पीठगिरणी दे, कुणाला शिलाई मशीन किंवा पिको फॉल मशीन दे, जिला एखादं छोटं दुकान सुरू करायचं असेल तर त्यासाठी अर्थसाहाय्य दे. बरं, तिला यापैकी काय करायचंय हे निवडायचं स्वातंत्र्यही दिलं जातं. कारण पुढची मेहनत तिलाच करायची असते.

एकीकडे या ताईला स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं बळ द्यायचं, तर दुसरीकडे तिच्या मुलांच्या शिक्षणाची वाट मोकळी करून त्यांचं भविष्य सुकर करायचं. मंडळाने यवतमाळमध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था केलेली आहे. मुलांसाठी 'विवेकानंद छात्रावास', तर मुलींसाठी 'तेजस्विनी छात्रावास'. दोन्ही वसतिगृहांत मिळून 100-150 मुला-मुलींची निवासाची, भोजनाची व्यवस्था केली जाते. या मुला-मुलींना यवतमाळ शहरातील चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन दिला जातो. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2006पासून दर वर्षी 100 विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार आर्थिक साहाय्य केलंजातं. त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर उत्तर शोधलं जातं. आज अनेक शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी या संधीचं सोनं करत शैक्षणिक यश मिळवलं आहे. हे यश त्यांच्या मातांसाठी अभिमानास्पद आणि नवी उभारी देणारं ठरत आहे.

भाऊबीज

या महिलांना केवळ उपजीविकेचं साधन देऊन संस्थेची जबाबदारी संपत नाही, तर त्यानंतरही प्रत्येक टप्प्यावर हे कार्यकर्ते बंधू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता वाढवण्यासाठी वेळोवेळी त्यांचं समुपदेशन करतात, त्यांना प्रशिक्षण देतात. व्यवसायातील कोणतीही अडचण दूर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. 'दीनदयाळ'ने अंधारात कुढत बसलेल्या अशा अनेक महिलांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे. विविध समाजस्तरातील या महिला आहेत. त्यांच्यापैकी काही आज स्वत: कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत किंवा अशा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग कोणावर ओढवला तर त्यांना मार्गदर्शन करण्याइतक्या त्या सक्षम बनल्या आहेत. 'दीनदयाळ'ने ज्यांच्या आयुष्याला उभारी दिली, अशा काही महिलांच्या गाथा या ठिकाणी मांडत आहे. त्यांना यशोगाथा म्हणावं इतकी त्याची व्यापकता नसेलही, पण एक कोंडी फोडून प्रवाहात येणाऱ्या या महिलांसाठी त्यांच्यातील हा छोटासा बदलही मोठं परिवर्तन ठरत आहे.

सुनीता पेंदोरे

'दीनदयाळ'बरोबरच्या प्रवासात ज्या महिलांना आत्मविश्वासाचा सूर गवसला आहे, त्यांपैकी एक म्हणजे रुंझा गावची सुनीता पेंदोरे. 2013-15 ही तीन वर्षं पूर्णपणे नापिकीची होती. शेतीचं खूप नुकसान झालं होतं. पिकाला हवा तेव्हा पाऊस नसायचा, नाहीतर अवकाळी पावसाने आणखी नुकसान व्हायचं. या नापिकीच्या काळात यवतमाळमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. त्यांपैकी एक सुनीताचे पती मधुकरराव होते.

माहेरच्यांनी भरपूर शेती असलेलं सासर बघून दिलं. सासऱ्यांची 36 एकर शेती होती. मात्र नंतर चारही भावांमध्ये ती वाटून दिली. दर वर्षी शेतात 80-90 क्विंटल कापूस व्हायचा. ज्या वर्षी आत्महत्या झाली, त्या वर्षी 12 क्विंटलही कापूस झाला नाही. कापसाबरोबर 30-35 क्विंटल सोयाबीन व्हायची, तीही दीड क्विंटलच झाली. तुरीचंही पीक नाही आलं. कठीण परीक्षेचा काळ होता तो. 2 जानेवारी 2015 रोजी तिच्या पतीने आत्महत्या केली.

सुनीता सांगते, ''नापिकीच्या 2-3 वर्षांमध्ये पतसंस्थेकडून आम्ही शेतीसाठी घेतलेले कर्जही थकित झालं. 1 लाख 87 हजाराचं कर्ज होतं. त्यामुळे बँक आम्हाला आणखी कर्ज द्यायला तयार होत नव्हती. अशा परिस्थितीत शेती कशी करायची? मला शेती करण्याशिवाय दुसरं काही माहीत नव्हतं. त्या वेळी मोठी मुलगी दहावी पास झाली होती. छोटी मुलगी सातवी पास झाली होती. या मुलींचं शिक्षण कसं करायचं, घरचा खर्च कसा चालवायचा? असे प्रश्न माझ्यासमोर होते. मोठया मुलीची तिच्या वडिलांनीच इंजीनिअरिंगच्या डिप्लोमासाठी ऍडमिशन घेतली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर तिनेच ऍडमिशन रद्द केली.

माहेरी आई-वडील दोघेही माझ्या लहानपणीच वारलेले. त्यामुळे तिथून काही आधार मिळण्याची सोय नव्हती. सासू-सासरेही नव्हते. पती गेल्यानंतर सासरचेही कोणी मदतीला आले नाहीत. दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या संसाराचाच विचार करतो. प्रत्येकाचीच परिस्थिती अगतिकतेची असते. त्यामुळे कोणीच मदतीला पुढे येत नाही. कधी भावांनीही मला आर्थिक मदतीचा हात दिला नाही. मीही अपेक्षा नाही केली. एके दिवशी पुनाजीत भाऊ घरी येऊन भेटले आणि दीनदयाळ संस्थेची माहिती सांगितली. त्यांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. पण संस्थेने मदत केली तरी आपण काय करू शकतो, हा प्रश्न होताच. कर्जामुळे शेती करण्याचा प्रश्नच नव्हता. मी स्टेशनरीचं दुकान चालवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे जोडीने शेतीही करता येईल हा विचार त्यामागे होता.''

सुनीताने संस्थेला तसं सांगितलं. संस्थेने प्रशिक्षण दिलं. दुकानात सामान भरण्यापासून ते दुकानाचं उद्धाटन करण्यापर्यंत संस्थेने सर्व मदत केली. दुकान लावताना सुनीताला खूप मानसिक त्रास झाला. गावातले लोक जागा देत नसल्याने सुरुवातीला तिला तिचा ठेला रस्त्यावर लावावा लागला होता. एसडीओ, जिल्हाधिकारी यांची, तसंच स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांची मदत घ्यावी लागली. ग्रामीण भागात एखादी विधवा महिला स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली तर त्यात सगळे जण अडथळे आणतात. ही बाई कशी काय दुकान लावते? हिच्याकडे इतका पैसा कुठून आला? हिला मदत करणारे लोक कोण आहेत? अशा संशयी दृष्टीने लोक बघू लागतात.

जागेचा प्रश्न सुटल्यानंतर तिने संस्थेच्या मदतीने दुकान सुरू केलं. सुरुवातीला खूपच कमी मिळकत व्हायची. पण सुनीताने हार मानली नाही. दुसऱ्या वर्षी शेत मक्त्याने करायला दिलं आणि त्यातून आलेला पैसाही दुकानात गुंतवला. सरकारकडून 1 लाख रुपये मिळाले होते, त्यातील 75 हजार रुपयेही दुकानासाठी वापरले. आता या दुकानातून दोन्ही मुलींचं शिक्षण, घरखर्च भागवायला मदत होतेय. या वर्षीपासून तिने स्वत:ची शेतीही करायला सुरुवात केलीआहे.

सुरुवातीला हिशोबही समजत नव्हता. मग ती सहा महिन्यांत हिशोब शिकली. कोणता माल शिल्लक आहे, कोणत्या मालाला जास्त मागणी आहे, कोणता माल विकत आणायचा ते हळूहळू तिला कळायला लागलं. त्यातून तिचा व्यावसायिक दृष्टीकोन तयार झाला.

सुनीता आता खंबीर झालीय. ती सांगते, ''सुरुवातीला वाटायचं दुकान चालेल की नाही, पण प्रयत्न केल्यानंतर काहीही अशक्य नाही. दीनदयाळ संस्थेने बहीण म्हणून मला जोडलं आणि कायम मदतीसाठी धावले, त्यामुळे मी माझं माहेरही विसरून गेले. अजूनही आमच्या गावातील लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन संशयीच असतो. माझ्या घरी संस्थेचे किंवा प्रसारमाध्यमातील लोक आले तरी ते संशयाने बघतात. मात्र आता मीही लोक काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कुटुंबाचं भलं कशात आहे याचा विचार करून त्यासाठी प्रयत्न करते. मी आता खंबीरपणे घराबाहेर पडते आणि माझ्यासारख्या ज्या भगिनी आहेत, त्यांना माझे अनुभव सांगते.''

शिक्षणाची आवड असल्याने आणि माहेरी सुशिक्षित पार्श्वभूमी असल्याने सुनीताच्या बोलण्यात प्रमाणभाषेचा आणि इंग्लिश शब्दांचा वापर जाणवण्याइतपत होता. मुलींनाही चांगल्या प्रकारे शिकवून स्वत:च्या पायावर उभं करायची तिची जिद्द आहे. आता मोठी मुलगी रचना तेरावीला आहे, तर दुसरी मीनाक्षी अकरावीला आहे. त्या दोघीही दुकानात जमेल तशी मदत करतात. सुनीताला आता दीनदयाळ संस्थेप्रमाणे संपूर्ण सेंद्रिय शेतीचा प्रयोग करायचा आहे. संस्थेला मदत म्हणून ती तिच्या भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांची माहिती जमवणं, त्यांच्याशी संपर्क साधून संस्थेकडून मिळणाऱ्या मदतीविषयी सांगणं, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्याबाबत मार्गदर्शन करणं अशा जबाबदाऱ्या पार पाडते. कधी कधी जवळपासच्या परिसरातील अशा महिलाच किंवा तिच्या कुटुंबातील लोक समस्या घेऊन सुनीताकडे येतात. ती तिच्या परीने त्यांच्याशी संवाद साधून त्यांना समजावते.

अनसूया नारायण संकुरवार

अनसूयाचं माहेर टेंभी आणि सासर बोरी. सासरी स्वत:ची शेती नव्हती. मजुरी करता करता तिच्या पतीने हळूहळू मक्त्याने शेती करण्यास सुरुवात केली. पदरी दोन्ही मुलीच होत्या. त्यांच्या समाजात मुलीच्या लग्ात भरपूर हुंडा द्यावा लागतो. त्याचं दडपण होतंच. त्यात शेतीत कर्जाचा डोंगर झाला होता. 2005मध्ये अनसूयाच्या पतीने आत्महत्या केली. त्या वेळी मुली लहान होत्या. 2006मध्ये दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे कार्यकर्ते आले. छोटया मुलीला - नवनीताला त्यांच्या छात्रावासात शिक्षणासाठी ठेवण्याविषयी सांगितलं. 'मुलगी जितकी शिकेल तितकं शिकवू. मग तिला नोकरी लावून देऊ' असं सांगितलं. 

 
अनसूया संकुरवार आणि मुलगी नवनीता

2007मध्ये भाऊबीजेच्या कार्यक्रमात संस्थेने अनसूयाला दोन बकऱ्या दिल्या. तेव्हापासून ती बकऱ्या पाळू लागली. आतापर्यंत बकऱ्या विकून तिने एक ते दीड लाख रुपये कमावले. त्यातून मोठया मुलीचं लग्ही लावलं. त्यानंतर संस्थेने शेवयाचं मशीनही दिलं. दर वर्षी उन्हाळयात तिला शेवया करण्याच्या ऑर्डर्स मिळतात. त्यातूनही घरखर्चाला हातभार लागतो. तिच्या या धडपडीची दखल आता इतर लोकही घेऊ लागले आहेत. जळगावमधील संस्कार कलश एकता ग्रूपने तिला 2014मध्ये 'स्वयंसिध्दा' पुरस्काराने गौरवलं होतं.

अनसूयाच्या कहाणीला तिच्या मुलीच्या नवनीताच्या यशाचा पुरवणी अध्यायही आहे. अनसूयाने मोठया मुलीचं अठराव्या वर्षी लग्न लावलं. पण नवनीताला शिकायचं होतं. तिला स्वत:च्या पायावर उभं करायचं आणि मगच लग्न लावायचं, असं तिने ठरवलंय. ज्या वेळी 'दीनदयाळ'च्या कार्यकर्त्यांनी नवनीताला 'छात्रावासात येणार का?' म्हणून विचारलं, त्या वेळी फार काही कळण्याचं तिचं वय नव्हतं. नवनीताला शहरात जाऊन शिकायची उत्सुकता होती. पण ते खरंच आपल्याला नेतील का? अशी शंका तिला होती. पण दुसऱ्या वर्षी तिला खरंच यवतमाळमध्ये 'तेजस्विनी' छात्रावासात नेण्यात आलं. त्या वेळी ती सातवीला होती.

नवनीता तिचा अनुभव सांगते, ''गावचं वातावरण आणि शहरातलं वातावरण यात फरक असतोच. भाषा, मानसिकता सगळयातच वेगळेपण होतं. शिवाय घरापासून लांब जाण्याची पहिलीच वेळ होती. सर्व मुली माझ्यापेक्षा मोठया होत्या. त्यामुळे त्या आपल्याला सांभाळून घेतील की नाही अशी भीती होती. पण सगळयांनीच बहीण म्हणून तिला सांभाळून घेतलं. मग हळूहळू तीही तिथल्या वातावरणात रमून गेली. खेडेगावात शिक्षणाविषयी मुलं, पालक किंवा शिक्षक फारसे गंभीर नसतात. पण शहरात प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या लालसेने येतो, तिथे शिस्त असते. शिक्षकही मनापासून शिकवतात.''

दहावीला नवनीताला 70 टक्के मिळाले. पुढे काय घ्यायचं ते कळत नव्हतं. घरीही कुणी सांगणारं नव्हतं. तिने कॉमर्सला प्रवेश घेतला आणि तिला कॉमर्स खूप आवडू लागलं. अकाउंट्स विषयही खूप आवडीचा होता. यात आपल्याला करिअर करता येईल हे जाणवायला लागलं. तिने जिद्दीने अभ्यास केला. बारावीत 83 टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून दुसरी आली. त्यातून तिचा आत्मविश्वास वाढला. आज नवनीताच्या यशाने तिच्या आईची, गावाची आणि संस्थेचीही मान अभिमानाने उंचावली आहे.

छात्रावासात असताना नवनीतावर राष्ट्र सेवा समितीचे संस्कार झाले. समितीच्या शिस्तबध्द दिनचर्येबरोबरच काही विशेष कॅम्पचाही अनुभव तिने घेतला. त्यात तिचे नेतृत्वगुण बहरू लागले. समितीत ती आता वेगवेगळया जबाबदाऱ्या सांभाळते. आणि छात्रावासातही ती मोठया ताईची भूमिका बजावते. नवीन मुलींना सांभाळून घेते, लहान मुलींची काळजी घेते.

आपल्या भविष्यातील स्वप्नांविषयी नवनीता सांगते, ''आईसाठी आता मीच मुलगी आणि मीच मुलगा आहे. स्वत:च्या पायावर उभं राहून तिला जी काही मदत करणं शक्य असेल ती करायची आहे. त्याशिवाय देशासाठी आपण काही तरी केलं पाहिजे असं मला नेहमीच वाटायचं. पण केवळ सैन्यात जाऊन बॉर्डरवर लढूनच देशाची सेवा करता येते असं नाही. 'दीनदयाळ संस्थे'सारख्या कार्यातूनही देशाची सेवा करता येते. दीनदयाळ संस्था महिलांमध्ये आत्मविश्वास जागवून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. संस्थेच्या माध्यमातून मी काहीही काम केलं, तरी ते एक मोठे समाजकार्य होईल.''

नवनीताचा हा आत्मविश्वास, तिचं यश ही अनसूयाची खरी कमाई आहे.

निर्मला अशोक कोहोचडे

जळका गावची पस्तीशीची निर्मला. पदरी 4 मुली. संस्थेने दिलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पतीच्या पश्चात मुलींची, घरादाराची जबाबदारी खंबीरपणे निभावतेय.

 
 
 
निर्मला कोहोचडे 

घरची पाच एकर शेती होती. त्यावरच उदरनिर्वाह होता. 70 हजारांचं कर्ज होतं. पण दुष्काळात बँकेचं कर्ज थकित राहिलं. व्याज वाढत गेलं. बँकेचे लोक घरी येऊ लागले, पण कर्ज फेडणं शक्य होत नव्हतं. पती काही सांगत नव्हते, पण त्यांना टेन्शन असावं. जानेवारी 2014मध्ये त्यांनी आत्महत्या केली. मुली त्या वेळी लहान होत्या. मोठी सातवीत होती, तर सगळयात छोटी पहिलीत होती. दीनदयाळ संस्थेचे कार्यकर्ते घरी आले.

''कद्रेभाऊंनी त्या वेळी घर खर्चासाठी काही पैसे दिले. नंतर स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी संस्थेने मदत केली. त्यांनी सुरुवातीला शेतीसाठी दहा हजाराची मदत केली. त्यातून मी घरची शेती केली. त्यानंतर शिलाई मशीन दिली. उन्हाळयात शेतीची कामं नसतात तेव्हा मी शिलाईची कामं करते. आता मोठी मुलगी अकरावीला आहे. दुसरी पल्लवी चार वर्षं संस्थेच्या छात्रावासातच शिकत आहे. काहीही अडचण आली तरी पुनाजीत भाऊ आणि दीनदयाळ संस्था मदतीसाठी तत्पर असतात.'' निर्मलाने सांगितलं.

आता तिला जोडधंद्यातूनही बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. 2016मध्ये संस्थेकडून एक गायही मिळाली. तिच्यापासून तीन-चार लीटर दूध मिळतं. दूध किंवा दही, ताक, लोणी काढून विकले तर रोजचे 100-150 रुपये सुटतात. नाहीच तर घरातच उपयोगी होतं आणि दूधदुभत्याचे पैसे वाचतात.

                                                     आधारवडाची खंबीर पारंबी 


पुनाजीत कुळमेथे. यवतमाळमधल्या कोणत्याही गावातील दीनदयाळ संस्थेच्या संपर्कात असणाऱ्या कुटुंबात गेलात, तर तिथे पुनाजीतभाऊ हे नाव वारंवार ऐकायला मिळतंच. (बहुतेकदा पुनाजी असाच उच्चार ऐकायला मिळतो.) ते 2008पासून दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या शेतकरी विकास प्रकल्पासाठी काम करत आहेत. यवतमाळमधील एकूण 15 तालुक्यांमध्ये पुनाजीत समन्वयक म्हणून काम करतात. या कामात त्यांनी स्वत:ला इतकं झोकून दिलंय की या सर्वच तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांची इत्थंभूत माहिती त्यांना असते. आणि या प्रत्येक महिलेसाठी पुनाजीतभाऊ, पुनाजीतदादा मोठा आधार असतो. संस्थेचा केवळ प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात नाही. एखाद वेळेस सख्ख्या भावाला फोन केला तर तो उचलणारदेखील नाही, पण पुनाजीतभाऊंना या बहिणींचा एखादा मिस्ड कॉल जरी दिसला तरी ते लगेच फोन करून, नाही तर प्रत्यक्ष भेट देऊन सगळी चौकशी करणार. या बहिणींसमोर कोणतीही अडचण असली तरी पुनाजीत मदतीसाठी अर्ध्या रात्रीही धाव घेणार. हे काम करताना गावागावात सतत प्रवास करावा लागतो, पण पुनाजीतच्या चेहऱ्यावर उत्साह कायम.

झरी जामणी तालुक्यातील बिरसेपेठ हे पुनाजीतचं मूळ गाव. तेथे वडिलोपार्जित शेती आहे. मात्र संस्थेचं काम करताना तेथून प्रवास करणं गैरसोयीचं होतं. म्हणून पुनाजीत पत्नी आणि मुलीसह पांढरकवडयात स्थायिक झाले.

पुनाजीतचं शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झालंय. संघाचा स्वयंसेवक. संघामध्ये घडलेला सेवाभाव. संघातील वेगवेगळया जबाबदाऱ्या पार पाडत इथपर्यंत पोहोचले. पुनाजीतचे गाव असलेला झरी जामणी तालुका 'कुमारी माता' समस्येमुळे प्रसिध्दीमाध्यमांच्या पटलावर आला. गेली 15-20 वर्षं या समस्येने हा तालुकाग्रस्त आहे. त्याबाबत काम करण्याच्या उद्देशाने पुनाजीत सामाजिक कार्यात उतरला. संस्थेच्या माध्यमातून पुनाजीत या समस्येवरही काम करत आहे.

गौंड समाजाच्या पुनाजीतला गौंड आणि मराठी भाषेबरोबरच तेलगू आणि हिंदी भाषाही चांगल्या प्रकारे बोलता येतात. वेगवेगळया समाजांतील महिलांशी संवाद साधताना हे ज्ञान त्याची जमेची बाजू ठरतं.

या कामाविषयीचा अनुभव कथन करताना पुनाजीत सांगतात, ''सुरुवातीला जेव्हा मी या महिलांना भेटायला जात असे, तेव्हा मला त्यांच्या घरातही प्रवेश दिला जात नसे. दरवाजात उभा राहूनच संवाद साधावा लागे. त्यात त्यांचीही काही चूक नसते. कारण समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा असतो. हळूहळू त्यांच्या वेगवेगळया समस्यांमध्ये मी त्यांना सहकार्य करू लागतो, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काही अडचण असेल तर त्यात मार्गदर्शन करतो. भाऊबीजेच्या कार्यक्रमाला भाऊ म्हणून त्यांच्याकडे ओवाळणीसाठी जातो. या सगळयातून त्यांचा माझ्याविषयीचा विश्वास दृढ होतो. या महिलांचा भाऊ आणि मुलांचा मामा हीच माझी ओळख झाली आहे. लोक माझ्याकडेही संशयाने पाहतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी माझं काम करत राहतो. तसंच गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी माझा संबंध असल्याने शक्यतो कोणी प्रत्यक्ष त्रास देत नाहीत.''

सामाजिक काम करणं हे तर लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखंच. मग यात कुटुंबाची साथ कशी असे? असं विचारल्यावर पुनाजीत सांगतात, ''सुरुवातीला घरच्या लोकांना मी काय काम करतोय याची कल्पना नव्हती. मी जेव्हा पत्नीला याबाबत सांगितलं, तेव्हा त्या महिला कशा प्रकारे संघर्ष करत आहेत, हे मी तिला प्रत्यक्ष दाखवलं. अनेक ठिकाणी भाऊबीजेच्या कार्यक्रमासाठी आम्ही दोघेही जातो. या महिला भाऊ म्हणून मला कशा प्रकारे सन्मानाने वागवतात, हे तिने पाहिलं आहे. त्यामुळे या कामात तिचा नेहमीच पाठिंबा असतो. तसंच या महिलाही घरी येत असतात, त्यामुळे बहुतेक सगळयांशी तिचा चांगल्या प्रकारे परिचय आहे. त्या बहिणींना माझं घर हक्काचं माहेर वाटतं.''

दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचा शेतकरी विकास प्रकल्प येथील शेतकऱ्यांसाठी एखाद्या आधारवडाप्रमाणे आहे आणि पुनाजीत या आधारवडाची एक खंबीर पारंबी आहे. अशा अनेक पारंब्या म्हणजे कार्यकर्ते हेदेखील संस्थेचे मोठे यश आहे.

 

 

भारती पवार

भारतीच्या सासरची 8 एकर शेती. घरादाराला शेतीशिवाय दुसरं काहीच माहीत नाही. सासऱ्यांनंतर पती शेती करू लागले. दोन-तीन वर्षं सतत नापिकी झाली. पुरेसं पीकच मिळालं नाही. त्यामुळे घेतलेलं सावकारी कर्ज फेडणं झालं नाही. कर्जबाजारी झाल्याने 21 नोव्हेंबर 2008 रोजी पतीने आत्महत्या केली. तोपर्यंत भारतीवरही घराबाहेर पडून काम करण्याची वेळ कधी आली नव्हती. शेतीतही काही काम केलं नव्हतं. मुलगा तिसरीला आणि मुलगी आंगणवाडीत शिकत होती. सासू-सासऱ्यांचीही जबाबदारी होती. सासरे मानसिक रुग्ण होते, तर सासू अस्थमाची पेशंट होती. माहेरूनही काहीच आधार नव्हता. कारण भारती लहान असतानाच वडील वारलेले. आई मोलमजुरी करणारी. तिघी बहिणी असल्याने भावाचाही आधार नाही.

भारती पवार

आता कसं करायचं, काय करायचं? या विचाराने भारती खचून गेली. त्या वेळी दीनदयाळ संस्थेने पहिली आर्थिक मदत दिली. स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी आटा चक्की दिली. त्याचबरोबर हिंमतही दिली. ''तूच जर अशी हिंमत हरलीस तर तुझ्या मुलांचं, सासू-सासऱ्यांचं कसं होईल? तूच खचलीस तर त्यांचा सांभाळ कोण करील?'' असं समजावून तिच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण केली. सुरुवातीला एक-दोन वर्षं जरा जास्तच त्रास झाला. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ती पिको फॉल लावणं आणि सिंगल फेजची आटा चक्की चालवणं असे व्यवसाय करू लागली. त्यातून आज महिन्याला चार-साडेचार हजार रुपये उत्पन्न मिळतं.

भारती सांगते, ''एका विधवेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन खूपच नकारात्मक असतो आणि दहा वर्षांपूर्वी तो जसा होता, तसाच आजही आहे. पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. मी माझ्या परिवाराचा विचार केला. दीनदयाळ संस्थेमुळे मी खंबीर झाले, माझ्यात जिद्द निर्माण झाली. नऊ वर्षांपूर्वीची माझी आर्थिक परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात खूप फरक आहे. कारण आज मी स्वत:च्या पायावर उभी आहे. कोणासमोर हात पसरण्याची मला गरज नाही.''

भारती संस्थेच्या कामाबरोबरच इतरही अनेक सामाजिक कार्यात पुढे असते. युनिसेफतर्फे आयोजित किशोरींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन, बचत गट, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना मार्गदर्शन अशा उपक्रमांत तिचा सहभाग असतो. त्यामुळे तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. या वर्षीही जागतिक महिला दिनानिमित्त सौ. संजीवनी गाडगे स्मृती प्रतिष्ठान पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला.

वंदना रवींद्र अंकतवार

कधीकाळी बुजरी असणारी वंदना आज इतकी निर्भीडपणे बोलते की तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं. 2005मध्ये पतीने आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं. अपुऱ्या कागदपत्रांमुळे सरकारी मदतीसाठी अपात्र ठरल्याने सरकारकडून केवळ दहा हजाराचीच मदत मिळाली होती.

 
वंदना अंकतवार

वंदना सांगते, ''सुरुवातीचा काळ इतका कठीण होता की माझ्याही मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. पण मुलांचं कसं होईल या विचाराने तेही करता येत नव्हतं. सतत मानसिक ताणाखाली असायची. एकदा तर दातखिळी बसून शुध्दच हरपली होती. मुलं लहान होती. माहेर राळेगावचं, पण ते त्यांचाच प्रपंच कसाबसा निभावत होते. तरीही वडिलांनी माहेरी परत बोलावलं. पण मी नाही गेले. सासरीच मानाने राहायचं असं ठरवलं.'' या दुर्घटनेनंतर 7-8 वर्षांनी संस्थेने संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली आणि वंदनाला शेवयांचं मशीन दिलं. उन्हाळयात शेवयांची ऑर्डर घेऊन त्यातून वरकमाई करू लागली. हे पैसे ती एका डब्यात साठवून ठेवायची आणि नंतर पोस्टात ठेव म्हणून गुंतवायची. या पैशातून ती थोडं थोडं सोनं घेऊ लागली. त्यातून गुंतवणुकीचा आनंद तिला मिळाला. वंदनाचा मुलगा सातवीपासून बारावीपर्यंत विवेकानंद छात्रावासातच शिकत होता. मुलीलाही संस्थेकडून स्कॉलरशिप मिळाली.

संस्थेविषयीच्या भावना व्यक्त करताना वंदना म्हणते, ''संस्थेचं माझ्या आयुष्यात खूपच महत्त्वाचं स्थान आहे. संस्थेने कधीच आम्हाला उपेक्षिताची वागणूक दिली नाही. आम्हाला सन्मानाने वागवलं जातं. भाऊबीजेला आम्ही संस्थेतील सर्व कार्यकर्त्यांना ओवाळतो. कोणतंही संकट समोर आलं की आम्ही आधी त्यांच्याकडेच धाव घेतो. त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन मिळतंच. पैशांपेक्षाही संस्थेकडून मिळणाऱ्या मानसिक आधाराने सावरलं. थोडा आधी संस्थेशी संबंध आला असता तर लवकर सावरता आलं असतं. कारण जेव्हा संस्थेतील कार्यकर्ते पहिल्यांदा मला भेटले, तेव्हाची परिस्थितीही खूप वाईट होती. त्या वेळी आपल्यात कधी इतकं बळ येईल आणि आपण सक्षम होऊ असं वाटलं नव्हतं. पण मी परिस्थितीला तोंड देत गेले आणि संस्थेची, संस्थेतल्या लोकांची मदत मिळत गेली. आता मी अशा इतर महिलांना मार्गदर्शन करते. कारण जो त्रास मी अनुभवला तो त्यांना भोगावा लागू नये.''

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेली वंदना एकल विद्यालयातही काम करते. आता त्या कामाच्या जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. एकदा एका मासिक वर्गासाठी ती मुलासह गेली होती. तिथे तिच्या मुलाने शाखा लावली, भोजनमंत्र म्हणून दाखवला, तेव्हा सगळयांनाच आश्चर्य वाटलं. वंदनाला मात्र तिच्या मुलाचा अभिमान वाटला. अर्थात त्याच्यावर छात्रावासातच हे सगळे संस्कार झालेले आहेत.

सुनीता गुणवंत जाधव

सुनीताला तिन्ही मुली. लग्ानंतर नवऱ्याबरोबर ती माहेरच्या घराजवळच राहायला लागली. 2004 सालची गोष्ट. सुनीताच्या नवऱ्यावर शेतीसाठी दीड लाख रुपयांचं सावकारी कर्ज झालं होतं. तो त्या तणावातच असायचा. त्यातच तिसऱ्या मुलीचा जन्म झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने आत्महत्या केली. दु:खाचा हा पर्वत कोसळल्यावर सुनीताची अवस्था काय झाली असेल? माहेरच्यांच्या पाठिंब्याने ती कशीबशी सावरली. मजुरी करू लागली. पण तीन मुलींना सांभाळायचं, शिकवायचं तर तेवढयाने भागणार नव्हतं.

 
सुनिता जाधव आणि दोन मुली 

उशिरा का होईना, सुनीताच्या आयुष्यात दीनदयाळ संस्थेचा शेतकरी विकास प्रकल्प आला. तीन-चार वर्षांपूर्वी पुनाजीत भाऊंच्या कानावर गेलं, त्यांनी संस्थेकडून मदत मिळण्यासाठी सुनीताचं नाव घेतलं. दोन-तीन मीटिंग झाल्या. संस्थेचे पदाधिकारीही घरी आले. बरोबर सहा महिन्यांच्या आत एक छोटंसं दुकान उभारण्यासाठी संस्थेकडून वीस हजार रुपयांचा चेक मिळाला. भाऊबीजेची भेटही मिळाली. दुकान उभारून दिलं. सुनीता मजुरी करत होतीच, विद्यार्थ्यांना डबे करून द्यायचं कामही करायची. दुकानामुळे घरखर्चाला हातभार लागला. त्याशिवाय संस्थेने मोठया मुलीला शिक्षणासाठी चार वर्षं स्कॉलरशीप दिली. ती एलएल.बी. करत होती. दुसरी मुलगी बी.एसस्सी. पहिल्या वर्गाला आहे. तिसरी अजून शाळेत आहे. परिस्थितीची जाणीव ठेवून या मुली शिक्षण घेत आहेत. आईला दुकानातही मदत करतात. ज्या मुलींच्या जन्माचं ओझं वाटून सुनीताच्या नवऱ्याने आत्महत्या केली, त्या भविष्यात सुनीताला आधार देण्यासाठी स्वत: समर्थ होत आहेत.

सुनीताने या वर्षी स्वत:ची शेती केली. पण मध्येच पोटाचं दुखणं सुरू झालं, मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. सुमारे 22 टाके पडले. त्यामुळे सध्या तरी तिला जड काम करायला मनाई आहे.

सुनीता मढई

पालगावातील बहुतेक लोकसंख्या ही गौंड समाजाची आहे. सुनीता मढईदेखील गौंड समाजाची आणि पालगाव तिचं माहेर. वयाच्या चौदाव्या वर्षी लग् झालं. 2004मध्ये शेतीसाठी कर्जबाजारी झाल्यामुळे पतीने आत्महत्या केली. त्या वेळी मुलगा 2 वर्षांचा, तर मुलगी वर्षांची होती.

 
सुनीता मढई यांना दीनदयाळ संस्थेने मदत म्हणून बकऱ्या दिल्या

पुनाजीतभाऊंना कळल्यावर ते शोधत आले. तोपर्यंत कोणाकडूनही मदत मिळाली नव्हती. सासरच्यांनी साथ दिली नाही, म्हणून माहेरी आली. सुरुवातीला मोलमजुरी करून पोट भरत होती, पण असुरक्षित वाटायचं, भीती वाटायची. 4 वर्षांपूर्वी दीनदयाळ संस्थेने मदत म्हणून 8 बकऱ्या दिल्या. मुलगा दहावी नापास झाल्यानंतर त्याला बकऱ्या राखायला पाठवू लागली. बकऱ्या विकून 48 हजार रुपये मिळाले. घरकूल योजनेतून घरही बांधलं.

हे पालगाव तसं दुर्गम भागातलं. मुलांना शाळेला जायचं तर 4 कि.मी.वर असलेल्या गोपाळपूरला जावं लागतं. त्यापैकी अडीच कि.मी. अंतर पायी जावं लागतं. पुढे बस असते. एका भाऊबीजेला संस्थेचे कार्यकर्तेच घरी आले होते. तर इतर वेळी भाऊबीजेच्या कार्यक्रमाला किंवा संस्थेचे जे काही उपक्रम असतात त्यासाठी यवतमाळला जाण्यासाठी संस्था गाडी पाठवते.

संगीता लीलाधर गायकवाड

2007चा गुढीपाडव्याचा दुसरा दिवस बोरजई या खेडयातील संगीताच्या आयुष्यात सगळयात वाईट स्मृती घेऊन आला. मोठी दीक्षा पहिली-दुसरीत शिकत होती. तिचा गणिताचा पेपर होता. त्याच दिवशी दीक्षाच्या वडिलांनी विष पिऊन आत्महत्या केली. हा प्रसंग त्या एवढयाशा जिवासाठीही धक्कादायक होता. पण तरीही ती पेपर द्यायला शाळेत गेली. वडिलांचा देह शवविच्छेदन होऊन येईपर्यंत ती घरी पोहोचली होती. त्या नकळत्या वयात या मुलीने तो आघात कसा झेलला असेल देव जाणे! पण आज या मुलीने तिच्या मृत पित्याचं आणि मातेचंही नाव संपूर्ण जिल्ह्यात मोठं केलं. या वर्षी बारावीला 91 टक्के गुण मिळवणाऱ्या दीक्षाचं अभिनंदन करणारे होर्डिंग्ज जागोजागी झळकत होते. या तिच्या यशात मोठा वाटा होता तो दीनदयाळ संस्थेचा आणि तेजस्विनी छात्रावासाचा.

पतीच्या निधनाने निराधार झालेल्या संगीताला त्या वेळी काहीच मार्ग दिसत नव्हता. दोन मुलींबरोबरच वृध्द सासू सासऱ्यांची जबाबदारीही तिच्यावर आली. मोलमजुरी करून तिने दीक्षाला चौथीपर्यंत गावातच शिकवलं. एक दिवस दीनदयाळ संस्थेकडून पुनाजीत, गजानन पडसोडकर आदी कार्यकर्ते तिच्या घरी आले. तिला धीर देत म्हणाले, ''ताई, आम्ही तुझ्या पाठीशी भावासारखे उभे राहू. पाचवीपासून हिच्या शिक्षणाचा सर्व खर्च आम्ही करू.'' पाचवीपासून दीक्षा छात्रावासात राहू लागली. त्या वेळी खोपटयात राहणाऱ्या संगीताच्या घरी वीजसुध्दा नव्हती. संस्थेने सौर ऊर्जेचे दिवे दिले, घर उजळलं. पण उदरनिर्वाहाचं काय? घरची शेती करायची, तर वावर घरापासून खूप लांब. निर्जन भागात. लोकांच्या नजरांची भीती. कोणी गैरफायदा घेतील अशी असुरक्षितता. भाऊबीजेला तिला संस्थेने बोलावलं आणि चार बकऱ्या भेट दिल्या. एक बकरी आजारी पडली होती, म्हणून तिला विकलं. त्याचे 2000 रुपये मिळाले. नंतर दुसरी बकरी घेतली. अशाप्रकारे बकऱ्यांची संख्या वाढत गेली.

छात्रावासात दीक्षावर चांगले संस्कार झाले. मग छोटया निशाच्या शिक्षणाचा प्रश्न आला. पण संस्थेने तिचीही जबाबदारी घेतली. तीही पाचवीपासून छात्रावासात राहू लागली. निशा आता दहावीला आहे. तिच्यासमोर मोठया बहिणीचं उदाहरण आहे.

अशी अनेक उदाहरणं आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये बळ जागवत आहेत. स्त्री कितीही कठीण प्रसंगात हार मानत नाही, हे तिचं वैशिष्टय आहे. तिचा आत्मविश्वास, आत्मभान जागृत केलं, तिच्या पाठीशी ठामपणे कोणी उभं राहिलं तर ती प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढते. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांच्या घटना आपण ऐकतो, वाचतो. पण शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची उदाहरणं क्वचितच ऐकायला मिळतात. तिचा जोडीदार सर्व जबाबदाऱ्या तिच्यावर टाकून हे जग सोडून गेला, तरी घरा-दाराचा, मुला-बाळांचा विचार करून ती मात्र असं पाऊल टाकायला धजावत नाही. अर्थात बळीराजाच्या आत्महत्यांचा प्रश्न गंभीर आहेच. ज्या दिवशी बळीराजाच्या आत्महत्या थांबतील तो दिवस महाराष्ट्रासाठी सर्वात मंगलमय असेल. ते प्रत्यक्षात घडण्यासाठी शासन, दीनदयाळ बहुउद्देशीय संस्थेसारख्या सामाजिक संस्था, कृषी विद्यापीठं, समाज सगळयांना कसून प्रयत्न करावे लागतील. मात्र त्या जोडीला या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पत्नींना जगण्याची हिंमत दिली तरी आपल्या अन्नदात्याचं थोडं तरी ऋण फेडल्यासारखे होईल. या वर्षीचा पाऊस संपता संपता मराठवाडयात दुष्काळ जाहीर करण्यात आला. आगामी दुर्दैवी घटनांची चाहूल देणारं हे वृत्त होतं. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी यवतमाळच्या दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या या प्रयोगाचा मॉडेल म्हणून विचार व्हायला हवा आणि  महाराष्ट्रातील विविध दुष्काळग्रस्त भागात त्याच्या प्रतिकृती व्हायला हव्यात. मात्र त्यासाठी हे कार्य करणाऱ्यांमध्ये सेवाभाव, समर्पण वृत्ती आणि सकारात्मकता हवी. यवतमाळच्या माळावर ही सकारात्मकता हळूहळू रुजू लागली आहे. या स्वयंसिध्दा या रुजवणाच्याच अंकुर आहेत.  

9594961851

विजय कद्रे - सचिव, दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ - ९८९०२१७३८७