भाषावाहिनी देवनागरी

विवेक मराठी    17-Nov-2018
Total Views |

***डॉ. संतोष क्षीरसागर***

देवनागरी लिपी साधारण 1000 वर्षे तरी जुनी आहे. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण 194 भाषांसाठीसुध्दा वापरली जाते, हे आपल्याला बहुधा माहीत नाही. मात्र म्हणूनच देवनागरी लिपी अजूनही टिकून आहे. देवनागरी लिपीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हस्ताक्षर आकलनाची नवीन साधने उपलब्ध करून दिली, तर तरुण पिढी देवनागरीसारखी

अजोड लिपी आनंदाने स्वीकारतील.

आपल्या समाजात फार प्राचीन काळापासून ते आजही भाषेचे व बोलीभाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारत हा एक बहुभाषिक देश आहे असे आपण शाळेपासून शिकत आलो आहोत. आपल्या चलनाच्या आताच्या नोटेवर 15 भाषा छापलेल्या दिसतात. पण खरे म्हणजे आज देशात 22 भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे. डॉ. गणेश देवी ह्यांनी नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून आज आपल्या देशात 800हून अधिक भाषा अस्तित्वात आहेत, असे कळते.

देवनागरी अक्षरओळख आणि हस्ताक्षर आकलन

भाषा ही बोलली-ऐकली जाणारी गोष्ट आहे असेच वरवर लक्षात घेतले जाते. मात्र भाषा लिहिणे आणि वाचणे हे केवळ लिपीमुळे शक्य होते, हे आपल्या चटकन लक्षात येत नाही. मूल आईच्या उदरात असल्यापासून त्याच्यावर बोलीभाषेचे संस्कार होत असतात. आपण ऐकून ऐकूनच बोलायला शिकत असतो. त्यामुळे ती एक नैसर्गिक घटना असल्यासारखी आपल्या आयुष्यात रुजते. वयाच्या 5व्या वर्षानंतर आपण लिहायला मुद्दाम शिकतो. सुरुवातीला अक्षरे बघून अक्षरओळख होते आणि ती लिहून ही ओळख मेंदूत घट्ट होते. थोडक्यात काय, लिपी ही मुद्दाम कोणालातरी शिकवावी लागते, बोलीइतक्या सहजेतेने आत्मसात होत नाही. कारण बोललेले ऐकले आणि ऐकलेले बोलले इतक्या दोन ज्ञानेंद्रियांवर लिपीलेखन साध्य होऊ शकत नाही. अक्षरचिन्हे डोळयांनी पाहून त्याच्या उच्चारित ध्वनींची सांगड घालून ती मेंदूत ठसवावी लागतात, तेव्हा कुठे ती आपल्याला वाचता येतात.

अक्षराकार लिहिणे मात्र या सगळयापेक्षा पुढची गोष्ट आहे, ज्यात मानवनिर्मित लेखणी/पेन्सिल/पेन हातात धरून बोटे तशी फिरवावी लागतात. पाहिलेल्या आकारानुरूप मेंदूला तसे आदेश द्यायला लागतात. तेव्हा कुठे आपण लिहायला शिकलो असे म्हणू शकतो. एकूण काय, लिपी लिहिणे या क्रियेत आकाराचे दृश्यस्मरण, त्याच्याशी निगडित असलेल्या उच्चारित ध्वनीचे स्मरण आणि बोटांच्या स्पर्शातून या सर्वांचे एकत्रित आदेश यात तीनपेक्षाही अधिक कर्मेंद्रिये व स्मरण असे एक ज्ञानेंद्रिय कामी येत असतात. आपल्या सगळयांना हे सारे कदाचित आठवतही नाही. तरीही आपण लिहीत आणि वाचीत असतो. मात्र लिपी आत्मसात करायला आपल्या सगळयांना 8 महिने ते 1 वर्ष लागले आहे... आता ते आपल्या लक्षात नाही, कारण आपल्याला त्याची गरज वाटत नाही आणि हे सगळे आपल्याकडून प्रतिक्षिप्त क्रियेसारखे होत राहते.


 

देवनागरी लिपी

कुठल्याही भाषेला लिपी असणे हे त्या समाजाच्या ज्ञानसमृध्दीचे प्रतीक आहे. इंग्लिश भाषेला स्वत:ची लिपी नाही, मात्र मराठीसाठी देवनागरी लिपी आहे आणि मराठी भाषा आणि देवनागरी लिपी साधारण 1000 वर्षे तरी जुनी आहे. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ती अजूनही आपण वापरतो ही एक भूषणास्पद बाब आहे. मात्र देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण 194 भाषांसाठीसुध्दा1 वापरली जाते, हे आपल्याला बहुधा माहीत नाही. मात्र म्हणूनही देवनागरी लिपी अजूनही टिकून आहे.

(1https://scriptsource.org/cms/scripts/page.php?item_id=script_detail&key=Deva)

हिंदी, मराठी, नेपाळी, कोकणी आणि संस्कृत या 5 अधिकृत भाषांसाठी ती वापरली जाते. इतक्या भाषांसाठी देवनागरी वापरली गेली असल्याकारणाने जगाच्या लिपी वापरकर्त्यांच्या यादीत देवनागरीचे स्थान निश्चितच पहिल्या पाचात असले, तर नवल नाही.


लिपीचा उगम नक्की कुठे झाला आणि कधी झाला? याबाबत विद्वानांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहेत. लिपी पाच ते सहा हजार वर्षांपेक्षा जास्त जुनी असावी, असे पुराव्यानिशी सिध्द होऊ शकते. पण उपलब्ध पुराव्यांनुसार या संकल्पनांचा निश्चित काळ सांगणे अजूनही शक्य नाही. भारताबाबत म्हणायचे झाले, तर सिंधू संस्कृतीतली पहिली अक्षरे आपल्याला पाहायला मिळतात. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे मिळालेल्या छापील शिक्क्यांवरील अक्षरांचा उलगडा अजूनही पुरेसा झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या शतकातील ब्राह्मी ही सर्व भारतीय लिप्यांची मातृलिपी आहे, असे अनेक विद्वान मान्य करतात. देवनागरी लिपी ही ब्राह्मीपासून पुढे उदयास आली, असे म्हणण्याइतपत ठोस असे संशोधन झालेले आहे. ब्राह्मीपासून आजच्या देवनागरीची जडणघडण होताना काळानुरूप झालेली 20 ते 25 आकार स्थित्यंतरे आपणास पाहायला मिळतात. 'देवांच्या नगरात वापरली जाणारी म्हणून ती 'देवनागरी' असा त्याचा अर्थ सांगितला जातो. देव म्हणजे विद्वान असा अर्थ घेतल्यास विद्वानांच्या शहरात वापरली जाणारी लिपी असाही एक अर्थ घेतला जातो आणि तसा तो योग्यही आहे. भारत हा जसा प्राचीन बहुभाषिक देश ओळखला जातो, तसा तो बहुलिप्यांचाही देश होता आणि आहे यात काही शंका नाही. जैनांच्या एका पुरातन अशा 'ललित विस्तार' नामक ग्रंथात भारतात वापरल्या जाणाऱ्या 64 लिप्यांचा उल्लेख आहे, त्यांची नावेसुध्दा आहेत, आणि त्यातल्या एका लिपीचे नाव नागरी लिपी आहे. तेच देवनागरीचे पूर्वीचे नाव असावे. मराठीसाठी देवनागरीचा झालेला पहिला वापर श्रवणबेळगोळाच्या बाहुबलीच्या पुतळयाखालील शिलालेखांवर झालेला आजही आपल्याला पाहायला मिळतो. त्याही आधीचा देवनागरीचा एक शिलालेख अलिबागजवळील अक्षी, नागाव या भागात सापडलेला आहे. मात्र श्रवणबेळगोळाच्या लेखातील अक्षरे थोडयाफार फरकाने आजही आपल्याला वाचता येतील इतकी स्पष्ट व मोठी आहेत.

अशा 3000-3500 वर्षे जुन्या लिप्या असलेल्या देशात जरी आकाराने विविध लिप्या असल्या, तरी ज्यावर त्या आधारित आहेत ती स्वर + व्यंजन पध्दती मात्र एकच आहे व ती अद्याप टिकून आहे, याचे एक कारण म्हणजे आपल्या सर्वच लिप्या मौखिक ध्वनीच्या विश्लेषणावर आधारित आकार चिन्हे आहेत. पाणिनीने केलेल्या संशोधनामुळे त्यामागची मांडणी व शास्त्र आजपर्यंत टिकून आहे, असे म्हणता येईल. लिपीच्या स्वर + व्यंजन पध्दती व्यवस्थापनाचे श्रेय पाणिनीकडे जाते, तसेच ते आजपर्यंत वाहत आलेल्या आपल्या समाजातील वापरकर्त्या असंख्य माणसांना जाते.

देवनागरी लिपीची दृश्याकार व्यवस्था

वरवर पाहता जगातील लिप्यांचे तीन महत्त्वाचे विभाग आपणास पाहायला मिळतात, त्यातील वर्णात्मक (Syllabic/Alphabetic) रोमनसारखी लिपी ही पश्चिमेकडील, पूर्वेकडील चित्रात्मक (Pictographic) चिन्ह लिपी - उदा., कांजी, तर देवनागरी ही फोनेटिक म्हणजे मौखिक ध्वनीवर योजलेली अशी लिपी आहे. मौखिक ध्वनींचे वर्गीकरण स्वर आणि व्यंजने असे करून त्यांच्या परस्पर जोडणीतून आकारांचे असंख्य असे विश्व उभे करण्याची शास्त्रीय व्यवस्था देवनागरीत आहे, हे आजच्या जगातही टिकून राहिलेले असे एक शास्त्रीय तत्त्व आहे. जगातील एकंदरीत भाषा या मुख्यत्वे मौखिक आहेत. त्यामुळे देवनागरीची लिपीव्यवस्था इतर लिप्यांच्या तुलनेत वैशिष्टयपूर्ण व बोलीभाषेला न्याय देणारी आहे असे म्हणावे लागेल. आजवर विद्वानांनी भारतीय लिप्यांना आफ्रिकेतील 'अबुगिडा' (Abugida) या लिपीव्यवस्थेच्या विभागात ठेवले होते. या लिपी विभागाला 'Alpha Syllabary' असेही म्हटले जाते. मात्र आज जगातील लिपी विद्वानांनी त्या विभागाला 'अक्षर प्रकारची लिपीव्यवस्था' असे संबोधून भारतीय लिप्यांना जगात वैशिष्टयपूर्ण स्थान दिले आहे. कारण देवनागरी अक्षराच्या उजवीकडे व डावीकडे, वर व खाली अशी चारही बाजूंना स्वरचिन्हांची जोडणी होते.

 आपल्याला आठवत असेल की लहानपणी शाळेत अक्षरओळख अथवा लिपी शिकताना स्वर आणि व्यंजन यावरच जास्त जोर दिला गेला. खरे तर बाराखडी हा प्रचलित व लोकप्रिय असा हा अशास्त्रीय शब्द आहे, जो 'स्वराखडी'2 असा असायला हवा. स्वराखडी आपण संपूर्ण कधी गिरवलेलीच नाही. 36 व्यंजने व 12 स्वर गिरवलेली आपली पिढी असली, तरी आपण त्याची स्वराखडी - म्हणजे एकूण 432 अक्षरे गिरवत बसलो नव्हतो. याचाच अर्थ आपल्याला स्वराखडीची चिन्हव्यवस्था नीट समजावून एकदा सांगितल्यावर पुढील सर्व आपण आपसूकच करायला लागलो. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या वापरातील देवनागरीत सर्व मिळून 300 जोडाक्षरे आहेत असे जर सांगितले, तर ती आजही आपल्याला सहजी ओळखता व लिहिता येतात यावर कदाचित आपलाही विश्वास बसणार नाही. कारण आपल्याला जोडाक्षरे वेगवेगळी घोटून शिकावी लागली नाहीत. जोडाक्षरात अर्ध्या व्यंजनाकारास पूर्ण व्यंजनाकार लागतो आणि पुढे मग अर्धा व्यंजनाकार + अर्धा व्यंजनाकार + एक व्यंजनाकार अशी संकल्पना आपल्याला वाचनातून पुढे दृढ होत गेल्यानंतर वेगळी पाठ करावी लागली नाहीत. जगातील इतर लिपीव्यवस्थांच्या तुलनेत देवनागरी लिपीच्या वर्णव्यवस्थेचे हे एक मोठेपण आहे.

(2 देवनागरी लिपी : चिन्हाची शास्त्रीय ओळख आणि आरेखन भाषा - मुकुंद गोखले.)

मौखिक ध्वनींवर आधारित देवनागरी लिपीचे महत्त्व इतर लिप्यांच्या तुलनेत थोडक्यात सांगायचे झाले, तर रोमन भाषेचे एक अक्षर एकापेक्षा अधिक उच्चारणांसाठी प्रतीकात्मक रितीने वापरले जाते. उदा., Apple या शब्दात A या चिन्हाचा उच्चार 'ऍ' असा होतो, तर Aeroplane या शब्दात त्याच Aचा उच्चार 'ए' असा होतो. थोडक्यात, देवनागरीत प्रत्येक अक्षरचिन्हाचा स्वतःचा असा एक उच्चार त्याच्या विशिष्ट शब्दातील वापराप्रमाणे बदलत नाही. जसे देवनागरीचे, तसे बहुतांश भारतीय लिप्यांचे आहेच. त्यामुळे स्वरव्यंजन पध्दती हे सर्व भारतीय लिप्यांचे 'मौलिक एकरूप' आहे असे गणपतीशास्त्री हेब्बार3 म्हणतात, ते पटण्यासारखे आहे.

(3 गणपतीशास्त्री हेब्बार - भारतीय लिप्यांचे मौलिक एकरूप, (मोडक आवृत्ती), महाराष्ट्र­ राज्य साहित्य संस्कृती मंडळ.)

मात्र व्यवहारात भारतासारख्या बहुभाषिक देशात व्यवहार सोपे व सुकर व्हावे, म्हणून एकच लिपी सर्व भाषांसाठी थोडयाफार फरकाने वापरता येणे अशक्य नाही. त्यासाठी सुलेखनतज्ज्ञ र.कृ. जोशी यांनी देवनागरीवर आधारित अशी सर्व भारतीय भाषांसाठी 'देशा' नावाची एक लिपी प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात त्यांनी सर्व भारतीय लिप्यांची स्वतःची अशी काही वैशिष्टये व स्वरव्यंजनादी गरजा यांचा विचार केलेला होता. मात्र काही कारणास्तव 'देशा' प्रचलित होऊ शकली नाही. त्यामुळे देवनागरी लिपीच इतर भारतीय भाषांसाठी वापरता येईल काय किंवा कसे, याबाबत विचार करता येऊ शकेल. शास्त्रीयदृष्टया म्हणता असा प्रयत्न अशक्य ठरणारही नाही. मात्र इतर भाषांच्या स्वरव्यंजनादी गरजा ओळखून देवनागरी लिपीत काही चिन्हांची वाढ करावी लागेल. पण हा एकांगी विचारसुध्दा ठरू शकतो.

कारण दृश्यकलात्मकतेच्या दृष्टीने पाहता इतर लिप्यांचे आकार वैशिष्टयपूर्ण आहेत, तसेच इतर लिप्यासुध्दा देवनागरीपेक्षा काही फार आधुनिक नाहीत. त्याही बऱ्यापैकी प्राचीन काळापासून त्या त्या समाजात फार घट्टपणे प्रस्थापित झालेल्या आहेत. इतकेच नव्हे, तर भारतीय लिप्या या त्या त्या राज्यांची, त्या त्या समाजाची एक दृश्यसंस्कृती बनल्या आहेत. त्यामुळे वरकरणी पाहता बरेचसे स्वर व बरीचशी व्यंजने सर्व लिप्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात सारखी जरी असली, तरी त्यांची आकारवैशिष्टये त्या त्या समाजाची एक दृश्य ओळख आहे.

उदाहरणच द्यायचे झाले, तर गेल्या 100 वर्षांत देवनागरी लिपी वापरून मराठी, हिंदी या भाषांमध्ये विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती झालेली आहे. त्या तुलनेत ओरिया लिपीत तितक्या प्रमाणात झाली नाही. ज्या लिपीमध्ये खूप साहित्यनिर्मिती होते, त्यामुळे काही तोटे व काही फायदे अनुभवास येतात, ते म्हणजे देवनागरीत उभी जोडाक्षरे (एकखाली एक लिहिण्याची पध्दत) आज अस्तंगत होताना दिसते, मात्र ओरियामध्ये बहुतांश जोडाक्षर लिहिण्याची पध्दत उभी आहे. तसेच अनुनासिकांचाही वापर, अनुनासिक चिन्हांचा वापर पूर्वीच्या पध्दतीने अजूनही ओरियात आहे, तसा देवनागरीत आज दिसत नाही. त्यामुळे ओरियामधले जुने वळणदार रूप अजूनही शाबूत आहे.

सर्वाधिक वापरातील भारतीय लिपी देवनागरी म्हणून यंत्रारूढ करण्याचे प्रयत्न 1965 साली झाले, कारण तेव्हाच हिंदी ही राष्ट्र शासन व्यवहाराची भाषा म्हणून घोषित करण्यात आली होती. पूर्वी हिंदी भाषेसाठी वापरल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीतील अ, ण, आणि क्ष अशा काही अक्षरांची वळणे व आकार वेगळे होते. मात्र 1965 साली यंत्रारूढ करण्यासाठी ही वेगवेगळी रूपे समायोजित करण्यात आली आणि त्यास 'परिवर्धित देवनागरी' असे नाव देण्यात आले.

देवनागरीसाठी आपण काय करावयास हवे

मात्र आज तंत्रज्ञानात मोठी क्रांती झालेली आहे, ज्यामुळे देवनागरीतील शास्त्रशुध्दतेबरोबरच आकारविविधता संगणक माध्यमाला जपणे शक्य आहे आणि आजचे मराठी युवक मोठया हिरिरीने तसे प्रयोग यशस्वीरित्या4 करत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे (4https://ektype.in/). जसा मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे, ती ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे, तसेच देवनागरी लिपीचा वापर भारतीय लिप्यांसाठी बनविलेल्या इन्स्क्रिप्ट कळफलकाद्वारेच (InScript key boardद्वारेच) होणे गरजेचे आहे. यासाठी शाळेपासून ते महाविद्यालयांपर्यंत अनेकविध स्तरांवर संशोधन व उपयोजन होणे गरजेचे आहे. अगदी बालवयातील देवनागरी लिपी आकलनासंदर्भात संशोधन करीत असताना असे लक्षात आले की एकंदरीतच देवनागरी तर सोडाच, इतर भारतीय लिपी व हस्ताक्षर आकलन याबाबत आपल्या देशात मूलभूत असे संशोधन अद्याप झालेलेच नाही. अर्थात त्यामुळे मला संशोधनास हुरूप आला व संशोधन प्रकल्प पूर्ण करणे शक्यही झाले. मात्र देवनागरी हस्ताक्षर संशोधनास आणखी खूप वाव आहे. तसेच त्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हस्ताक्षर आकलनाची नवीन साधने उपलब्ध होऊ शकतील असे दिसते. येणारी तरुण पिढी ही कोऱ्या पाटीसारखी असल्यामुळे त्यांना लहान वयातच अशी साधने उपलब्ध करून दिल्यास देवनागरीसारखी अजोड लिपी ते आनंदाने स्वीकारतील, ज्यात मोठेपणी इतर भारतीय भाषा बोलण्यास शिकण्याच्या स्तरावर त्यांना वाचिक स्वरूपात आकलन करणे 5 शक्य होईल (5 वाचा 'तमिळ भाषा प्रवेश', 'कन्नड भाषा प्रवेश' - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्र­ राज्य भाषा विभाग प्रकाशित.) असे देवनागरीबाबतचे आशादायक स्वप्न आपण पहिले, तर ते अशक्य नाही.

kshirsagar.santosh@gmail.com