कप्पेबंद होताना...

विवेक मराठी    02-Nov-2018
Total Views |

 

एकरस समाज हे आपल्या संविधानाचे स्वप्न आहे. आपआपले जात, पंथ, संप्रदाय, धर्म बाजूला ठेवून आपण भारतीय नागरिक झाले पाहिजे, अशी संविधानाची आपल्याकडून अपेक्षा आहे. मात्र गेल्या सत्तर वर्षांत आपण भारतीय होण्यापेक्षा जातीचे होण्याकडे वेगाने प्रवास केला आहे. आपण जातीजातीत कप्पेबंद होताना स्वकेंद्री व्यवहार आणि आपले शत्रू-मित्र भावना जोपासण्यावर दिला जाणारा भर म्हणजे आपल्या सामाजिक जीवनातील जातिकल्लोळ आहे आणि या कल्लोळात आपण आपली खरी ओळख विसरून जात आहोत.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी https://www.facebook.com/VivekSaptahik/
 पेज like करावे.

पला समाज म्हणजे अनेक जातीजमाती, धर्म, संप्रदाय यांचे मिश्रण आहे. प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्टये आहेत. यालाच आपण विविधता असे म्हणतो आणि या विविधतेतून एकात्मतेचा शोध घेत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या एकतेचे, एकात्मतेचे वर्णन करताना 'खोलवर रुजलेली आंतरिक एकता' या शब्दांचा वापर केला होता. याचाच अर्थ असा होतो की आपला समाज बाह्यरूपाने वेगवेगळया प्रतिमांनी आणि आणि प्रतीकांनी सजलेला दिसत असला, तरी आम्ही आंतरिक पातळीवर एका सूत्रात बांधलेले आहोत. एकात्मतेचे हे सूत्र खूपच पुरातन आहे. एकमेकांना जोडून ठेवताना प्रत्येकाची वैशिष्टये जपण्याची 'सिमेंटिंग शक्ती' या सूत्रात आहे असे आपण मानतो. पण मागील काही काळापासून या सूत्राचा ताणाबाणा विसकळीत झाला आहे का? समाजाची एकात्मतेची भावना कमी होत आहे का? आणि जातीच्या अस्मिता, जातीची घट्ट बांधणी यांनी त्याची जागा घेतली आहे का? असे प्रश्न पडण्यासारखीच परिस्थिती आज आपण समाजात पाहत आहोत. त्या परिस्थितीचे आकलन करून घेण्यासाठी काही निवडक घटना पुढे दिल्या आहेत.

  •  डॉ. आंबेडकर विद्यापीठाच्या गुणपत्रिका भगव्या रंगात छापल्या म्हणून आंदोलन झाले. आधी या विद्यापीठातील गुणपत्रिका निळया रंगात छापल्या जात असत.


  •  त्रिपुरा निवडणुकीनंतर पुतळयाच्या विटंबना प्रकरणात मोडतोड झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची पुन्हा उभारणी करताना नव्या पुतळयाला भगवा रंग दिला गेला, दलित समाजाकडून निषेध होताच पुन्हा निळया रंगाचा पुतळा बसवण्यात आला.


  • 'आधुनिक मुसलमानांना सळो की पळो करून सोडणारे संताजी-धनाजी' असा मोदी-शाह यांचा उल्लेख केल्यामुळे लेखकावर टीकेचा भडिमार. संताजी-धनाजी यांचा अपमान झाल्याचा आरोप.


  •  दगडूशेट हलवाई गणपतीची माहिती देणाऱ्या चित्रफितीवर टीका करत सार्वजनिक गणेशोत्सव महात्मा फुल्यांनी सुरू केल्याचा दावा. लोकमान्य टिळक व अन्य मंडळींवर जातीय टीका.


  •  ज्येष्ठ विचारवंत राकेश सिन्हा यांनी अभिवादन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे शुध्दीकरण एका वकील संघटनेने केले.

या आहेत प्रसारमाध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून प्रकाशित झालेल्या मागील काही महिन्यांतील देशभरातील घडामोडी. वरवर पाहता या साऱ्याच गोष्टी तात्कालिक स्वरूपाच्या आहेत. त्यांचे बातमीमूल्य खूपच कमी असले, तरी या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचा समाजमनावर मोठया प्रमाणात परिणाम होत असतो आणि हा परिणाम जातीय भावनांना बळकटी देणारा असतो. या साऱ्या घटना आणि त्यावरचे उथळ जातीय प्रकटीकरण कशामुळे होते? त्यासाठी केवळ माध्यमे जबाबदार आहेत का? माणसाच्या मानगुटीवर सोशल मीडिया स्वार झाला आहे का? असे अनेक प्रश्न कोणत्याही विचारी माणसाला पडतील, अशा कालखंडातून आपण मार्गक्रमण करत आहोत. आपण पराकोटीचा जातीय द्वेष अनुभवतो आहोत. या साऱ्यातून आपण आपल्या समाजाला कुठे घेऊन चाललो आहोत? या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे - आपला समाज हा वरवर एक दिसत असला, तरी तो आतून जातभावनेच्या वाळवीने भुसभुशीत केला आहे. परस्पराविषयी संशय आणि स्वजातीबाबत पराकोटीचा अहंकार ही आजच्या आपल्या समाजाची स्थिती आहे. प्रत्येक गोष्टीमागे, घटनेमागे काहीतरी स्वार्थी हेतू असणारच असा ग्रह करून परस्परांशी व्यवहार करण्याची मानसिकता बळावली आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या जातीशी जोडून त्यातून स्वतःचा आणि स्वतःच्या जातीचाच कसा विचार करता येईल, याची होड लागली आहे. याला कुणी अपवाद नाही. सर्वच जाती आणि समाजगट या साथीच्या रोगाचे शिकार होताना दिसत आहेत. आपली अस्मिता, आपली प्रतीके, त्यांचे उदात्तीकरण करताना भूतकाळाची मोडतोड करून आपल्या सोईच्या इतिहासाची मांडणी आणि त्याच्या आधाराने आपण कसे वेगळे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करणे हे आपले आजचे समाजवास्तव आहे. आपल्या समाजात जातभावनेचा असा पराकोटीचा उद्रेक कशामुळे होतो आहे? जातीचा इतिहास, जातीची प्रतीके, जातीची संघटना याकडे आज सर्वसमान्य माणूस का आकर्षित होतो आहे? याचा शोध घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. कारण हा केवळ जातभावनेचा उद्रेक नसून सामाजिक एकात्मतेसमोर दिवसेंदिवस प्रबळ होत जाणारे आव्हान आहे. मानवी मनात सुप्त रूपात असणारी जातभावना अधिक उग्र करण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे, असा आरोप गेले काही दिवस वेगवेगळया पातळयांवरून होताना दिसतो आहे. सोशल मीडियाचा स्वैर वापर करणाऱ्या मंडळींनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.

आपल्या देशात अनेक थोर समाजशास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. त्यांनी आपल्या समाजाच्या स्थिती-गतीचा आणि विकासक्रमाचा सुसंगत अभ्यास केला आहे. श्रीनिवासनसारख्या समाजशास्त्रज्ञाने भारतीय समाजाचा अभ्यास करून सांस्कृतिकरणाचा सिध्दान्त मांडला होता. त्यात त्यांनी असे म्हटले होते की अप्रगत समाजगट प्रगत समाजाचे अनुकरण करतात. या सिध्दान्ताला त्यांनी आधी 'ब्राह्मणीकरणाचा सिध्दान्त' असे नाव दिले होते, नंतर ते बदलून 'सांस्कृतिकरणाचा सिध्दान्त' असे त्याचे नामकरण झाले होते. या सिध्दान्तानुसार शिक्षण, आहार, विहार, प्रथा, भाषा या गोष्टी वरिष्ठ वर्गाकडून कनिष्ठ वर्गाकडे संक्रमित होत असतात. अनुकरण हे या सिध्दान्ताचे मूळ आहे. अनुकरणातून संस्कृती बदलते. जे जे नवे आहे ते स्वीकारणे आणि आपल्या जीवनशैलीत त्याला स्थान देणे  हा मानवी स्वभाव आहे. खरे तर याचा जाती-धर्माशी काहीही संबंध नाही. समाजशास्त्रज्ञ श्रीनिवासन यांच्या सांस्कृतिकरणाचा हा सिध्दान्त आता केवळ मानवसमूहाचा राहिला नाही, तर त्याला 'जात' या समूहातून तपासावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकसंध समाज ही संकल्पना आज मागे पडू लागली असून जातकेंद्रित समाज अशी त्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक जात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना दिसते. हे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रतीकांचा, प्रतिमांचा आणि नव्या शिष्टाचाराचा जन्म होत आहे. आपल्या जातीची वेगळी ओळख तयार करण्यासाठी आपल्या जातीत जन्मलेल्या महापुरुषाचा शोध घेतला जातो... भलेही त्या महापुरुषाचे काम आणि विचार संपूर्ण समाजाला हितकारक असतील, पण त्याकडे कानाडोळा करून त्या महापुरुषाला आपापल्या जातीच्या मखरात बसवून मिरवले जात असते आणि त्या महापुरुषाच्या विचाराचा आपल्या सोईचा तेवढाच भाग जोरकसपणे मांडत अन्य जातींवर टीका करण्यात येते. महापुरुषांना एका एका जातीत बंदिस्त केल्यावर त्याच्या जीवनाचा, इतिहासाचा विपर्यास होणे, अवमूल्यन होणे स्वाभाविक असले, तरी 'जातीसाठी खावी माती' या भूमिकेतून महापुरुषाच्या जातीकरणाचे पुण्यकर्म जोरदारपणे केले जाते आहे. आपापल्या जातीचे ओळख अधिक घट्ट करण्यासाठी 'शुभ प्रभात' किंवा 'राम राम'ऐवजी 'शुभ शिव सकाळ', 'भीमपहाट' आणि शुभरात्रीऐवजी 'शिव रजनी' 'भीम रात्री' अशा नव्या शिष्टाचाराची चलती आहे. सर्वसामान्य माणूस आपल्या परिचयाच असेल तर तो कोणत्याही जातीचा असला, तरी 'राम राम' किंवा नमस्कार म्हणत असे. मात्र आता 'जय परशुराम', 'जय जिजाऊ' 'जय लहूजी', 'जय भीम', 'जय सेवालाल', 'जय बिरोबा' असा वेगवेगळया जातीच्या प्रतिकांचे वर्णन करणाऱ्या शब्दांनी त्याची जागा घेतली आहे. आपला समाज असा विभागला जात असतानाच प्रत्येक गटात कडवेपणाची भावना अधिक घट्ट होताना दिसत आहे. त्या त्या जातीतील महापुरुषांना बंदिस्त केल्यामुळे त्यांच्यावरचा आपल्या जातीचा हक्क दाखवण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. एका जातीच्या महापुरुषाचा अभ्यास आणि त्या अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष मांडण्याचा अधिकार दुसऱ्या जातीत जन्मलेल्या माणसाला नाही. तो असे करत असेल, तर त्यामागे त्याचा काहीतरी छुपा हेतू आहे, स्वार्थ आहे असा समज करून घेण्याची पध्दती आजकालची समाजमान्यता झाली आहे. मी जेव्हा अण्णाभाऊ साठयांच्या जीवनचरित्राची मांडणी करू लागलो, तेव्हा मला अशा अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली होती आणि आजही द्यावी लागत आहेत. जातीची वेगळी ओळख निर्माण करताना जातिअंतर्गत थोडयाफार प्रमाणात दहशतीचा आधार घेतला जातो. काहीही करून जातीची बंधने घट्ट करण्यावर भर दिला जात आहे. जो आपल्या जातीचा नवशिष्टाचार पाळत नाही, त्याच्यावर सर्व जण तुटून पडताना दिसतात. जातिअंतर्गत नव्या अस्पृश्यतेला जन्म दिला जात असला, तरी वरवर ती जात एकसंध आणि बंदिस्त वाटत असते. जातभावनेचा कधी नाही इतका उद्रेक आजच्या काळात झालेला असून हरघडी त्याचा अनुभव येत असतो.

एखाद्या घटनेचा अर्थ कोण कोणत्या जातीचा आहे यावर अवलंबून असतो. त्यामुळे एकच घटना आणि त्याकडे पाहण्याचे दृष्टीकोन खूप वेगवेगळे असू शकतात. त्यातही वरिष्ठ जातीशी संबंधित घटना असेल, तर या जातीय दृष्टीकोनाला आणि व्यवहाराला कसा ऊत येतो, हे आपण जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथील घटनेतून पाहिले आहे. या घटनेतील आरोपी 'जोशी' आहे हे कळताच सुरू झालेला माध्यमातील गदारोळ आणि तो जोशी 'कुडमुडे भटका' आहे हे लक्षात आल्यावर पसरलेली शंातता यामागे जातभावना आणि जातिविद्वेष नव्हता काय? आज आपल्या जातीची अस्मिता जपताना, संघटन करताना समोर कोणीतरी शत्रू उभा केला तर संघटन गतीने होते, हे आपण गेल्या सत्तर वर्षांच्या अनुभवातून शिकलो आहोत. आणि अशा काल्पनिक शत्रू-मित्र संकल्पनेचे बाळकडू आपल्या पुढील पिढयांना देण्याची आपण व्यवस्थाही करून ठेवत आहे. त्यासाठी परस्पराविषयी विखार व्यक्त करणारे साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध होते. इतिहासाची आपल्या सोईची मोडतोड करून तो आजच्या संदर्भात - म्हणजे इतिहासातील चुकांना आजची पिढी जबाबदार आहे असे मानून त्याच्याकडून जाब मागण्याची प्रथाच आपण रूढ केली आहे. आपल्या सोईचा इतिहास ही जातीच्या संघटनेसाठी आवश्यक असणारी बाब आहे, हे लक्षात आल्यामुळे अनेक जातींनी आपल्या मूळ पुरुषाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या शोधामागे जातभावना घट्ट करणे आणि दुसऱ्या जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हीच भूमिका असते.

जातभावना घट्ट करण्यात त्या त्या जातीतील व्यक्तीचा जितका वाटा असतो, त्यापेक्षाही जास्त वाटा सोशल मीडिया नावाच्या मुक्त चव्हाटयाचा असतो. काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील एका गावात मातंग समाजातील लग्नाची वरात (वर) मारुतीच्या मंदिरात गेला, म्हणून जबर मारहाण झाली. ही घटना सत्य होती, पण त्या घटनेच्या माध्यमातून मातंग समाजाच्या भावना भडकवण्यासाठी आंध्र प्रदेशातील दुसऱ्या एका घटनेच्या चित्रफिती प्रसारित केल्या. परिणामी महाराष्ट्रातील एका छोटया गावातील ही अन्याय-अत्याचाराची घटना संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग बांधवाच्या भावना उत्तेजित करणारी ठरली. अशा अनेक लहान-मोठया घटना विविध जातींमध्ये होत असतात. अशा घटनांमागे बऱ्याच वेळा वैयक्तिक पातळीवरचे हेवेदावे आणि अन्य काही कारणे असतात. प्रत्येक वेळी दोन जाती किंवा दोन समाजगट यांच्यातील वैर किंवा संघर्ष असे चित्र नसते, पण सोशल मीडियातून त्या घटनेला जातिकेंद्रित केले जाते. अन्याय-अत्याचाराची किंवा सामाजिक अपघाताची घटना ही जरी त्या त्या व्यक्तीची असली, तरी ती संपूर्ण जातीची असल्याचा आभास सोशल मीडियावरून निर्माण करणे सोपे जात असते आणि त्यातूनच मग आपापल्या जातीला संघटित करणाऱ्या घोषणा तयार होतात, त्या प्रसारित केल्या जातात. त्यातूनच मग 'एक मराठा, लाख मराठा', 'एक माळी वाघाची डरकाळी', 'एक महार लाख ठार', 'नवे पर्व बहुजन सर्व' अशा अनेक घोषणा आपण वाचतो, पाहतो. या आणि अशा अनेक घोषणा हा त्या त्या जातीच्या एकत्रीकरणाला पूरक असल्या, तरी अप्रत्यक्षपणे त्या समाजाच्या एकात्मतेला चूड लावण्याचेच काम करत असतात. प्रत्येक जातीची स्वतःची खास अशी वैशिष्टये असतात, पण त्या वैशिष्टयाच्या आधाराने संपूर्ण समाजाला तडा जाईल असे वर्तन करणे म्हणजेच जातभावनेचा अहंकार जागवणे आहे. जातभावनेचा हा अहंकार आजच्या काळात पराकोटीला पोहोचला असून त्याला कोणतीही जात अपवाद नाही. प्रत्येक जात आपला जातीचा अहंकार जोपासण्यासाठी काही ना काही निमित्त शोधत असते आणि संधी मिळताच हा जातभावनेचा अहंकार व्यक्त करताना अन्य जातीचे नामोहरण कसे करता येईल याचीही काळजी घेतली जाते. जातिअहंकार आणि त्यातून निर्माण होणारा दुसऱ्या जातीबाबतचा तुच्छतेचा भाव सोशल मीडियावर सरसकटपणे दिसून येत असतो.

जातभावना आणि जातिअहंकार यांचा इतका उद्रेक आताच का झाला? असा अनेकांना प्रश्न पडतो. या एकाच प्रश्नाची अनेक उत्तरे दिली जाऊ शकतात. त्यात आर्थिक समता आणि सामाजिक सन्मान, सुरक्षा हे महत्त्वाचे घटक आहेत. वेगळया भाषेत सांगायचे तर आपल्यावर अन्याय होत आहे आणि या अन्यायाला दुसरी एक जात जबाबदार आहे अशी समाजातील सर्वच जातिगटांनी धारणा करून घेतली आहे. शंभर टक्के सर्व समाजाची ही धारणा नसली, तर काही समाजगटांत मात्र अशी धारणा आहे. यातूनच आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी पुढे येते आणि ती मागणी मान्य करावी म्हणून मातंग समाज रस्त्यावर आंदोलन करतो, तर धनगर समाजाला आपला आरक्षणाचा गट बदलून हवा आहे. मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. अशा प्रकारे अनेक जाती आपल्या आर्थिक उन्नतीचा एकमात्र मार्ग म्हणून आरक्षणाचा आग्रह धरत आहेत. आरक्षण देणे किंवा न देणे ही बाब न्यायालय, संसद यांच्या अखत्यारीतील बाब आहे. या दोन्ही ठिकाणी विषय मांडण्याची, पाठपुरावा करण्याची पध्दती वेगळी असते. रस्त्यावर हिंसक आंदोलने करून या विषयातील उत्तरे मिळणार नाहीत, हे माहीत असतानाही गेल्या चार-पाच वर्षांत बहुतेक सर्वच जातींनी रस्त्यावर उतरून आपल्या जातीचे शक्तिप्रदर्शन केले आहे. या शक्तिप्रदर्शनामागे केवळ सरकारला आपली ताकद दाखवणे एवढाच उद्देश नसून अन्य जातींवर दबाब निर्माण करण्याचाही मनसुबा त्यात होता. त्यामुळे मोर्चाला प्रतिमोर्चा असे चित्र आपण मागील काही वर्षांत पाहिले आहे. सर्वात जास्त साक्षर समजला गेलेल्या ब्राह्मण समाजानेही या मोर्चाच्या धामधुमीत आपलाही एक मोर्चा काढला होता. या साऱ्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर आपल्या लक्षात येईल की आज कोणतीही जात ही जातीय अस्मिता आणि जातभावना यापासून अलिप्त राहिली नाही. एकूणच आपल्या समाजात जातिकल्लोळ सुरू आहे. उन्नतीसाठी आणि विकासाची भूक शमवण्यासाठी जाती सक्रिय होणे, आपल्या न्याय्य हक्कासाठी आग्रही भूमिका मांडणे ही गोष्ट आपण तत्त्वतः मान्य केली, तरी त्या आग्रही भूमिकेला चिकटलेला विखार आणि अहंकार यांचे काय करायचे? हा आपल्यासमोरचा गंभीर प्रश्न आहे.


आज सर्वच जाती या राजकीय झाल्या आहेत. राजकीय पक्षांनी विविध जातींना आपापसात वाटून घेतले आहे. ही वाटणी केवळ मतपेढीसाठी नाही, तर या या जाती आमच्याबरोबर आहेत हे दाखवून त्यांना आपल्या सर्वसमावेशकतेचा टेंभा मिरवता येतो. विविध जातींतील संख्याबळाने मोठया असणाऱ्या जाती आपल्याबरोबर ठेवून त्या माध्यमातून सत्तेचा सोपान पार करणे शक्य होत असते, हे राजकारणातील उघड सत्य असल्यामुळे विविध जातींना आपल्याबरोबर ठेवणे ही राजकीय पक्षाची गरज असते. आणि ही गरज पूर्ण व्हायची असेल, तर जाती कायम राहणे आवश्यक असते. विविध जातींच्या जातभावनांना खतपाणी घालण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम राजकीय पक्षाकडून होत असते. विविध जातींना आपल्या गटात ओढण्यासाठी त्या त्या जातीची प्रतीके आणि अस्मिता यांना आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात स्थान देऊन मताचे राजकारण करण्याची प्रथाच आपल्या देशात आहे. केवळ आश्वासने देऊन विविध जातींना झुलवत ठेवण्यात राजकीय पक्ष यशस्वी होत असतात. एकाच जातीतील विविध पक्षाचे कार्यकर्ते हे संपूर्ण जात आपल्यामागे असल्याचा दावा करत असतात आणि आपल्याच जातीतील दुसऱ्या कार्यकर्त्याला प्रतिस्पर्धी मानून जातिअंतर्गत संघर्ष करतात. एकाच जातीतील कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा प्रभाव निर्माण करताना जातीत दुफळी निर्माण करतात. राजकारणासाठी जातीचा वापर करणे आणि आम्ही जातिनिर्मूलनासाठी काम करतो असा विरोधाभास राजकीय क्षेत्रात दिसून येतो. जात हे राजकारणाचे साधन झाल्यामुळे संविधानाला अपेक्षित असणारा जातविरहित समाज हे स्वप्न सत्यात येणे दिवसेंदिवस अवघड होताना दिसत आहे.

देश स्वतंत्र झाला, कायद्याने जाती समाप्त झाल्या, तरी गेली सत्तर वर्षे आपल्या देशात जाती का शिल्लक राहिल्या आणि त्या अधिकाधिक घट्ट का होत राहिल्या? याचा विचार करायला हवा. जातिनिर्मूलन की जातभावनाविरहित समाज या दोन संकल्पनांच्या मध्ये आपण फिरत राहिलो आहोत. आपल्याला नक्की काय करायचे आहे? आपल्याला संविधानात सांगितल्याप्रमाणे समताधिष्ठित समाज निर्माण करायचा असेल, तर त्यातील जातभावना पहिली अडचण आहे, हे तेव्हा लक्षात येते. जाती या ज्ञानशाखा आहेत, उत्पादक घटक आहेत, त्यामुळे जाती काल होत्या, आज आहेत आणि उद्याही राहतील. मात्र जातींना चिकटलेली उच्च-नीचतेची भावना आणि त्यातून निर्माण झालेली परस्परांकडे बघण्याची दृष्टी बदलून आपण आपल्या समाजाकडे सकारात्मक म्हणजेच समतेच्या भूमिकेतून बघण्याची गरज आहे. अनेक जातींच्या काही समस्या आहेत, त्यांच्या आशा-आकांक्षाची पूर्तता होण्यास अडचणी आहेत किंवा आजवर खरोखरच त्यांना सामाजिक मागासलेपण अनुभवावे लागले आहे. या साऱ्याच जातिगटांची सहभागाची, सन्मानाची भूक पूर्ण करणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे, तशीच संपूर्ण समाजाचे घटक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. जातीची समाजगटाची आग्रही मागणी मान्य करण्यासाठी 1993 साली गोवारी समाजाने नागपूरला मोर्चा काढला आणि या मोर्चादरम्यान चेंगराचेंगरी होऊन अनेक लोकांचा जीव गेला होता. त्या घटनेनंतर गोवारी समाजाने रस्त्यावरचे आंदोलन केले नाही, पण प्रचंड पाठपुरावा करत आणि न्यायालयातील लढाई लढत गोवारी समाजाने आपल्यावरचा अन्याय दूर केला. गोवारी समाजाने स्वीकारलेला हा मार्ग आज अनेक आंदोलक जाती-जमातींसाठी आदर्श आहे. ज्या गोष्टी केवळ आणि केवळ न्यायालयातील लढाईतून साध्य होणार आहेत, त्यासाठी जातीला रस्तावर उतरवून सामाजिक स्वास्थ्य खराब करणे योग्य नाही. दबावगट तयार करून न्यायालय आपली भूमिका किंवा निर्णय बदलणार नसेल, तर मग विविध जाती-जमाती रस्त्यावर येऊन काय साध्य करतात? 

तर एकूणच हे आपले समाजवास्तव आहे. वरवर आपण एक वाटत असलो, तरी आतून आपण पोखरले आहोत. आपल्या समाजात जाती खूप शतकांपासून आहेत. पण आज आहे तसा जातिकल्लोळ याआधी कधीच नव्हता. पूर्वीच्या काळी एका जातीतील व्यक्ती दुसऱ्या जातीच्या विकासाची, उन्नतीची काळजी करत असे आणि त्यासाठी कार्य करत असते. महात्मा फुले याचे आदर्श उदाहरण आहेत. त्यांचे बहुतेक काम हे वरच्या जातीतील समस्या दूर करण्याचे होते. आज मात्र महात्मा फुले एका जातीची खाजगी मालमत्ता झाली आहे. अन्य सर्व महापुरुषांची अशीच स्थिती आहे. शतखंडित समाजाचे भेसूर वास्तव आपल्यासमोर उभे आहे. या वास्तवातून बाहेर पडून आपण आपल्या समाजाला एकत्वाकडे, समतेकडे कसे नेणार? हा आजचा कळीचा प्रश्न आहे. कारण आपण आपल्या महापुरुषाच्या विचारांचा आधार घेऊन समाजाला पुन्हा एकसंध करायचे म्हटले, तर आता ते शक्य होणार नाही, कारण याआधीच आपण आपल्या सर्व महापुरुषांचा वैचारिक पराभव केला आहे. आपल्या देशातील कोणताही महापुरुष जातीचे समर्थन करत नाही, जातिविद्वेष करत नाही. आपण मात्र महापुरुषांनी जे केले नाही, ते जोरकसपणे करतो. महापुरुषांनी  समता, बंधुता यांचा आग्रह धरला होता. आपण ही दोन्ही तत्त्वे पायदळी तुडवण्यास मागेपुढे पाहणार नाही, इतकी जातीय मानसिकता आपल्या नसानसांत भिनली आहे.

आता हे समाजवास्तव कसे बदलायचे आणि संविधानाला अपेक्षित असणारे समतायुक्त समाजजीवन कसे निर्माण करायचे, हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. त्याचा सामना करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कप्पेबंदपणातून बाहेर पडावे लागणार आहे.

भ्रमणध्वनी : 9594961860