मुंबईत उध्दव, अयोध्येत राम...

विवेक मराठी    26-Nov-2018   
Total Views |

1992 साली कारसेवकांनी बाबरी ढाचा जमीनदोस्त करून टाकला. चारशे वर्षांची अपमानाची निशाणी पुसून टाकली. आता त्या जागी छोटेसे का होईना, राम मंदिर आहे. 1986 सालापासून रामजन्मभूमी मुक्तिआंदोलन पेटत गेले आणि 1992 साली त्याचा कळसाध्याय रचला गेला. 1992च्या कारसेवेत शिवसेना नव्हती, ठाकरे परिवारातील कोणीही नव्हते. उध्दव ठाकरे तेव्हा विशी-पंचविशीत असतील. तेथे गेले संघस्वयंसेवक - आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून. शेवटची निरवानिरव करून, आम्ही चाललो आहोत, जिवंत आलो तर आनंद आहे, आणि न आलो, तर रामकार्यासाठी बलिदान झालो असे समजा, या भावनेने कारसेवक गेले. 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत.  तरी सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी  
https://www.facebook.com/VivekSaptahik/ पेज likeकरावे....

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे सहपरिवार अयोध्येला गेले आणि त्यांनी 24-25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले, पूजा केली आणि प्रभू रामचंद्रांविषयीचा आपला श्रध्दाभाव प्रकट केला. बहुतेक सर्व पक्षांचे राजकीय नेते हिंदू असले, तरी अयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन करण्याचे धाडस यापैकी कोणी करीत नाहीत. राहुल गांधी यांना गुजरात निवडणुकीच्या वेळी आपण हिंदू असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि त्यानंतर त्यांनी मंदिर दर्शनाचा सपाटा लावला. पण अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याची त्यांचीदेखील हिंमत नाही. उध्दव ठाकरे यांनी ही हिंमत दाखविली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

कोणताही राजकीय नेता कोणतीही सार्वजनिक कृती राजकारणाच्या लाभाशिवाय करीत नाही. उध्दव ठाकरे यांना रामाच्या दर्शनाची एवढी आस लागली असती, तर जसे सामान्य यात्रेकरू अयोध्येला जातात, दर्शन घेतात आणि परत येतात, तसे त्यांनी केले असते. अयोध्या दर्शनाचा त्यांनी राजकीय कार्यक्रम केला. एकटेच गेले नाहीत, बरोबर महाराष्ट्रातून, मुंबईतून शेकडो शिवसैनिकांना घेऊन गेले. त्यामागचा हेतू शक्तिप्रदर्शनाचा होता. रामाचे दर्शन करताना शक्तिप्रदर्शनाची गरज काय? राम हाच सर्वशक्तिमान आहे. त्याच्यासमोर आणखी कोणती शक्ती दाखविणार?्र

पण ही शक्ती रामाला दाखवायची नव्हती. राम केवळ निमित्तमात्र! म्हटले तर 'घटघट में बसा है राम' असे म्हटले जाते. म्हणून ज्याला मनापासून रामाचे दर्शन घ्यायचे आहे, तो 'आत्मरामाचे' दर्शन करतो. त्याला अयोध्येला जायची गरज नसते. उध्दव ठाकरे गेले, कारण त्यांना भाजपाला आपली शक्ती दाखवायची होती. ही शक्ती त्यांना मुंबईतही दाखविता आली असती, नागपूरला दाखविता आली असती. ते सोडून ते अयोध्येला का गेले?

त्याचेही कारण आहे. हे कारण असे की, अयोध्येतील बालरामाने केंद्रातील भाजपाला सत्तेवर बसविले आहे. भाजपाची मंडळी ते जाणून आहेत आणि शिवसेनेलादेखील हे माहीत आहे. ज्या ठिकाणी हे छोटेसे राम मंदिर आहे, त्या ठिकाणी 1992पर्यंत बाबराने बांधलेली मशीद होती. बाबर हा मोगल, आक्रमक, कडवा इस्लामिक आणि मूर्तिभंजक होता. त्याने हिंदूंना दाबून टाकण्यासाठी अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर जाणूनबुजून पाडले आणि त्या मंदिरांच्या खांबांवरच मशिदीचा घुमट बांधला. औरंगजेबाने काशीत हेच काम केलेले आहे. त्याने महादेवाचे मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधली. या सर्व परकीय इस्लामी आक्रमणाच्या निशाण्या आहेत.


त्या मिटविण्याचा आपला संघर्ष चारशे वर्षांहून अधिक काळाचा आहे. आक्रमणाच्या निशाणीचे एक पाप सोमनाथ येथे सरदार वल्लभभाई पटेल यांनी धुऊन काढले आणि सोमनाथाचे मंदिर पुन्हा बांधले. 1992 साली कारसेवकांनी बाबरी ढाचा जमीनदोस्त करून टाकला. चारशे वर्षांची अपमानाची निशाणी पुसून टाकली. आता त्या जागी छोटेसे का होईना, राम मंदिर आहे. 1986 सालापासून रामजन्मभूमी मुक्तिआंदोलन पेटत गेले आणि 1992 साली त्याचा कळसाध्याय रचला गेला. 1992च्या कारसेवेत शिवसेना नव्हती, ठाकरे परिवारातील कोणीही नव्हते. उध्दव ठाकरे तेव्हा विशी-पंचविशीत असतील. तेथे गेले संघस्वयंसेवक - आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून. शेवटची निरवानिरव करून, आम्ही चाललो आहोत, जिवंत आलो तर आनंद आहे, आणि न आलो, तर रामकार्यासाठी बलिदान झालो असे समजा, या भावनेने कारसेवक गेले. न्यायालयाचा हास्यास्पद आदेश, केंद्र सरकारची अकर्मण्यता याचा कडेलोट होऊन बाबरी ढाचा जमीनदोस्त झाला. त्यात एकही शिवसैनिक नव्हता.

परंतु शिवसेनेने हे श्रेय स्वत:कडे घेतले! याला म्हणतात, राजकारण. भाजपाचे मोठे नेते म्हणाले, ''बाबरी ढाचा आम्ही पाडला नाही.'' ऐन विजयाच्या क्षणी ते कचरले, मागे हटले आणि त्याचे सर्व श्रेय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतले. काहीही न करता, एकाही शिवसैनिकाचे रक्त न सांडता, एकाही शिवसैनिकाला अयोध्येत न पाठविता, ''बाबरी ढाचा आम्ही पाडला'' असे बाळासाहेब म्हणाले. बाबरी ढाचा पाडल्याचा ज्या केसेस चालू आहेत, त्यात एकही शिवसैनिक नाही. आहेत ते विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि भाजपाचे नेते.

अयोध्येतील या रामलल्लाने कुंभकर्णासारख्या झोपलेल्या हिंदू समाजाला खडखडून जागे केले, त्याच्यातील राजकीय चेतना जागी केली. आणि परिणाम असा होत गेला की, बाबरीसाठी भाडोत्री छाती पिटवून घेणारे आणि तिचे श्राध्द घालणारे हिंदू समाजाने लाथाडले आणि भाजपाला सत्तेचा मार्ग मोकळा करून दिला. अगोदर अटलबिहारींचे सरकार आले आणि आता मोदींचे सरकार आहे. अयोध्या आंदोलनातून निर्माण झालेल्या हिंदू राजकीय जागृतीचा हा सर्व परिणाम आहे. शिवसेनेला हे उत्तम समजते.

महाराष्ट्रात शिवसेनेची लढत काँग्रेसशी नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसशीदेखील नाही. तिची मुख्य लढत भाजपाशी आहे. लढाई करायची असेल, तर शत्रूच्या प्रदेशात जाऊन लढाई केली पाहिजे. लोकशाहीत शत्रू असा शब्द वापरणे योग्य नसते. शिवसेनेने आपला कट्टर विरोधक भाजपा याच्या रणांगणात जाऊन आव्हान देण्याचे काम केलेले आहे. भाजपाने मंदिर बांधण्याचे आश्वासन दिलेले आहे, ते गेल्या चार वर्षांत भाजपाने पूर्ण केलेले नाही, म्हणून उध्दव ठाकरे यांनी प्रथम मुंबईच्या दसरा मेळाव्यात 'मंदिर कधी बांधणार?' असा सवाल केला आणि अयोध्येत जाऊन म्हटले की, 'मंदिर वही बनायेंगे, लेकीन तारीख नहीं बतायेंगे।' हे चालणार नाही. आणि खास ठाकरी शैलीत ''मी कुंभकर्णाला जागविण्यासाठी आलो आहे, राजकारण करण्यासाठी नाही'' हे सांगायला ते विसरले नाहीत. पुढे जाऊन ते म्हणाले, ''न्यायालय निर्णय करीत नसेल, तर अध्यादेश काढा आणि मंदिर बांधण्याचा कार्यक्रम घोषित करा.''


राजकारण हे असे असते. उध्दव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रापुरती आहे. मुंबईत तिचा प्रभाव आहे, म्हणून उध्दव आहेत मुंबईचे; राम आहे अयोध्येत, परंतु त्याचा प्रभाव सर्व देशभर आहे. भाजपाला कोंडीत पकडायचे असेल आणि अडचणीत आणायचे असेल, तर मुंबईच्या उध्दवने अयोध्येच्या रामाला साकडे घालणे आवश्यक होते. ते त्याने केले. अध्यादेश काढा हे म्हणणे सोपे आहे, कायदा करा असे म्हणणेदेखील सोपे आहे. परंतु राज्यसभेत कायदा पारित व्हावा लागतो. राज्यसभेत भाजपाचे बहुमत नाही. न्यायालयाला फास्ट टॅ्रकवर सुनावणी करण्याची आवश्यकता वाटत नाही आणि न्यायालयावर तसे दडपण आणता येत नाही. त्यांचा निर्णय करण्यास ते स्वतंत्र आहेत. एनडीएमध्ये इतर अनेक पक्ष आहेत. त्यातील सगळेच मंदिरवादी नाहीत. ते मंदिराचा विषय ऐरणीवर आला की उंदरासारखे कसे पळून जातील, हे सांगता येत नाही. म्हणून उध्दव यांनी कितीही साकडे घातले आणि कितीही शाब्दिक आदळआपट केली, तरी केंद्र सरकार त्यांच्या सांगण्यावरून लगेचच अध्यादेश काढण्याची शक्यता कमी आहे.

तो निघणारच नाही असे समजण्याचेदेखील कारण नाही.  सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ''सरकारने तत्परतेने संसदेत कायदा करावा आणि श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करावा'' असे नागपूर येथील सभेत म्हटले. याच सभेत ते म्हणाले की, ''राम मंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयाला पाऊलच उचलायचे नसेल, तर देशाच्या साऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये 'जस्टिस डीलेड इज जस्टिस डिनाइड' ही जी शिकवण आजवर दिली जात आहे, तीच बंद करावी.'' सरसंघचालकांचे म्हणणे केंद्रातील भाजपा सरकारला गंभीरपणे घ्यावे लागेल. उध्दवजी सांगतात म्हणून कायदा करण्याची शक्यता नाही, परंतु सरसंघचालकांचे मत सहजपणे बाजूला ठेवता येण्यासारखे नाही.

उध्दव ठाकरे यांनी मंदिरावरून राजकारण सुरू केले आहे आणि राजकारण्याच्या खेळीत मोदी आणि शहा यांनी उध्दवच्या बारशाचे जेवण जेवले आहेत. ते अशा वेळेला ही खेळी खेळतील, ज्या वेळी त्यांचा विरोधी पक्ष काँग्रेस हा परतीचे दोर कापलेल्या खिंडीत सापडलेला असेल. देशभर भाजपाची मुख्य लढत शिवसेनेशी नाही. ही लढत आहे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांशी. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हे सध्या अर्धहिंदू बनण्याच्या मार्गावर आहेत. अयोध्येत राममंदिर झालेच पाहिजे या भूमिकेवर ते आजतरी आलेले नाहीत, कारण त्यांना मुसलमानांची मते पाहिजेत. समजा, उद्या त्यांनी अयोध्येतील मंदिराला पाठिंबा दिलाच, तर भाजपाचे विरोधक म्हणून त्यांची हवा निघून जाते. मंदिराचा कडाडून विरोध करता येत नाही आणि पाठिंबाही देता येत नाही, अशा कैचीत आज काँग्रेस आहे. ही कैची आवळण्याची संधी भाजपा शोधीत राहील. ती कधी मिळेल, हे आताच सांगणे कठीण आहे.

शिवसेनेला अयोध्येतील राम मंदिरास पाठिंबा देण्यास काही जात नाही. त्यामागेदेखील त्यांनी विचारपूर्वक घेतलेली एक भूमिका आहे. गेली चार वर्षे फडणवीस सरकारला सतत शिव्या देण्यात गेली. मोदींनादेखील जमेल तिथे आणि संधी मिळेल तेव्हा टपल्या मारण्याची हौस त्यांनी भागवून घेतलेली आहे. भाजपा सरकारचे विरोधक आम्हीच आहोत, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी नाही, हे दाखवून शिवसेनेने विरोधी पक्षाची जागा व्यापण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत झालेल्या लहान-मोठया निवडणुकांत त्यांना थोडाबहुत फायदा झालेला आहे. नुकसान असे झालेले आहे की लोक विचारतात - 'तुमचे जमत नाही, तर सरकारमधून बाहेर का पडत नाहीत? मंत्र्यांना राजीनामे द्यायला का सांगत नाहीत? भाजपाबरोबर कशाला राहता?' उध्दवकडे याची तर्कसंगत उत्तरे नाहीत.

लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकापाठोपाठ येणार आहेत. शिवसेना एकटी लढली, तर ती आपटी खाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी शिवसेना युती करू शकत नाही. चुकून जर युती केली, तर फजितीची भीती पाठ सोडणार नाही. लोक ते मान्य करणार नाहीत. ते म्हणतील, शिवसेनेत काही अर्थ राहिलेला नाही, काही दम राहिलेला नाही. सत्तेसाठी शिवसेना काहीही करते. भाजपाबरोबर जाण्याशिवाय शिवसेनेसमोर अन्य पर्याय नाही. चार वर्षे शिव्या घातल्या, पाचव्या वर्षी घरोबा कसा करायचा? हा शिवसेनेपुढचा प्रश्न आहे. त्या घरोब्याचा एक आधार आहे 'हिंदुत्व'. तुम्हीही हिंदुत्ववादी, आम्हीही हिंदुत्ववादी. तुम्ही मंदिरवादी, आम्हीही मंदिरवादी. अयोध्येत भव्य राम मंदिर तुम्हालाही हवे आहे, आम्हालाही हवे आहे. मग भांडण कसले? आपण हातमिळवणी करू या.

राजकारण करताना तुटेपर्यंत ताणायचे नसते. सगळे दोर कापायचे नसतात. तडजोडीच्या खिडक्या उघडया ठेवाव्या लागतात. येण्या-जाण्याचे सर्व दरवाजे बंद करून चालत नाही.  राजकारणात टिकून राहण्याचे हे सनातन नियम आहेत. ते देश-काल-परिस्थितीनिरपेक्ष आहेत. म्हणून मुंबईचे उध्दव ठाकरे अयोध्येच्या रामाला साकडे घालून नेमके काय साधू इच्छितात? असा जर प्रश्न कोणी केला, तर त्याचे उत्तर असे आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांना भाजपाशी सन्मानाने युती करायची आहे. आपण असे म्हणू की अयोध्येतील रामाचीदेखील तीच इच्छा आहे आणि ती सुफलसंपन्न होवो, अशी प्रार्थना करू या!

vivekedit@gmail.com