व्यापक सामाजिक चर्चा घडवणारा दिवाळी अंक

26 Nov 2018 12:48:00

सा. विवेकचा दिवाळी अंक वाचनीयच नव्हे, तर विचार करायला भाग पाडणारा आहे. यामधील  दिलीप करंबेळकर, रमेश पतंगे व रवींद्र गोळे  यांचे स्वतंत्र विषयावरील लेखांत एक आंतरिक धागा आहे, तो म्हणजे नवा समाज कसा घडवता येईल आणि संविधान त्यासाठी कसे मार्गदर्शक ठरेल, याची तत्त्वदर्शक मांडणी. चांगले विचार कोठूनही येवोत, त्यांची दखल घेत त्यावर व्यापक सामाजिक चर्चा घडवणे निकोप समाजाचे लक्षण आहे, अशा प्रकारची मांडणी संजय सोनवणी या लेखातून केली आहे. 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत.  तरी सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी  
https://www.facebook.com/VivekSaptahik/ पेज like करावे....

साप्ताहिक विवेकचा यंदाचा दीपावली विशेषांक अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. 'सामाजिक तत्त्वज्ञानाचा आधार काय असावा?' ते 'समाज कप्पेबंद का होतो आहे?' यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरील सखोल तत्त्वचर्चा त्यात असल्याने तो वाचकांना अनेकांगांनी विचार करायला भाग पाडतो. दिलीप करंबेळकरांचा 'सांख्य तत्त्वज्ञान, हेगेल व माक्र्स' हा लेख महत्त्वाचा अशासाठी आहे की तो पाश्चात्त्य इहवादी तत्त्वज्ञान व भारतीय अद्वैत व मायावादी तत्त्वज्ञान यातील भेद व त्यामुळे झालेले भारतीयांचे नुकसान यावर चर्चा करत सांख्य तत्त्वज्ञान हे पाश्चात्त्य द्वैतात्मक तत्त्वज्ञानाला कसे पर्याय ठरू शकते, यावर विविधांगी चर्चा या लेखात आहे. त्याची विस्तृत दखल घेत त्यावर चर्चा व्हायला हवी.

देहात्मवादी तंत्रांच्या प्रभावात सांख्य दर्शनाचा जन्म पुरातन काळीच झाला, हे आपण लक्षात घ्यायला हवे. आदिशंकराचार्यही सांख्य दर्शनाला 'कपिलस्य तंत्र:' असे म्हणतात. हे तत्त्वज्ञान सार्वभौम ईश्वरी सत्ता नाकारते. लोकायत तत्त्वज्ञानावरच नव्हे, तर बौध्द व जैन तत्त्वज्ञानावर सांख्यांचा प्रभाव मोठा होता. उदारमतवाद ही पाश्चात्त्यांचीच देणगी नव्हे. राजसत्तांनी उत्पादक व व्यापारी श्रेण्यांना मुक्त व्यापाराची संधी दिली होती. इतकेच काय, नाणी पाडायचे अधिकारही श्रेण्यांना होते. म्हणजे तत्त्वज्ञान फक्त ग्रंथांतच बंदिस्त नव्हते. त्यामुळे भारत उद्योग-व्यापारात अग्रणी राष्ट्र बनला होता हे वास्तव आहे. तंत्रांच्या देहात्मवादामुळे इहलोकवाद अर्थातच होता व त्याचेही प्रतिबिंब आपल्याला मोकळया समाजव्यवस्थेत दिसते. कला, संगीत, नाटय यात प्रातिभ झेप घेतली तर जात होतीच, तसेच विज्ञानाच्याही कल्पना बीजरूपात का होईना, मांडल्या जात होत्या. पण हा प्रवाह थांबला तो समाज क्रमश: इहवादी, उदारमतवादी तत्त्वज्ञान नाकारत परलोकवादी, मायावादी बनत गेल्यामुळे, हे वास्तव आहेच. कोणताही समाज जगण्यासाठी कोणते तत्त्वज्ञान अंगीकारतो, यावर त्या समाजाचे उत्थान किंवा पतन अवलंबून असते. सामाजिक उतरंडीचे व पुरुषप्रधान वैदिक तत्त्वज्ञानही समाजात अकारण भेदाभेदाचे तत्त्वज्ञान रुजू लागल्याने, आठव्या-नवव्या शतकानंतर काय सामाजिक अनवस्था निर्माण झाली, याचे विवेचन करंबेळकरांनी या लेखात केले नसले, तरी त्याचे गांभीर्य आज जाणवण्यासारखे आहे.

माक्र्स, हेगेल हे वेगळया सामाजिक मनोरचनेतून व व्यवस्थेतून आलेले. त्यांच्यावर ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे हे उघड आहे. पाश्चात्त्य उदारमतवाद व भारतीयांचा तंत्रांतून आलेला सामाजिक व आर्थिक उदारमतवाद यावर सामाजिक मानसिकतेचा व स्वतंत्र तत्त्वज्ञानांचा प्रभाव आहे. आपल्याला पाश्चात्त्य उदारमतवादाची गरज आहे की लयाला गेलेल्या पूर्वीच्या श्रेणी-निगम, कुल या पध्दतींचे आधुनिकीकरण करत नव्या इहवादाची रचना करायची आहे, हे आपल्याला ठरवावे लागेल. मात्र एकाच वेळीस देशी पण परस्परविरोधी तत्त्वधारांना एकच मानून (म्हणजे सांख्य तत्त्वज्ञानाला वैदिक मानण्याची प्रथा आहे, पण ते वास्तव नाही.) सामाजिक गोंधळ मिटणार नाही, उलट तो वाढेल याचाही वाचकांनी विचार केला पाहिजे. करंबेळकरांनी हा लेख लिहून मोलाची कामगिरी केली आहे व त्यावर विविधांगी चर्चा झाली पाहिजे, कारण आम्हाला कोणते सामाजिक तत्त्वज्ञान प्रागतिकतेकडे नेईल हे आम्हाला ठरवावे लागेल.

रमेश पतंगे यांचा 'संविधानातील भारतीय आत्मतत्त्व' हा लेखही त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतीय घटनेचे स्वरूप भारतीय समाजाची मानसिकता व समाजरचना लक्षात घेऊनच, पण इहवादी आणि प्रागतिकतावादी असे बनलेले आहे. पतंगे म्हणतात त्याप्रमाणे, संविधान अपरिवर्तनीय नसून कालसापेक्ष जैविक विकास होण्याची त्याची क्षमता आहे व आजवर ते बदलतही आले आहे. बाबासाहेबांच्या उदारमतवादामुळे संविधानात 'समाजवाद' हा शब्द समाविष्ट केला गेला नव्हता. भविष्यातील पिढयांवर वर्तमानातील विचारप्राबल्य लादण्याच्या ते विरोधात होते, हे भारतीय समाजवाद्यांना सहसा माहीत नसते. पतंगे संविधान मसुदा तयार होत असतानाच्या महत्त्वाच्या चर्चांचा वेध घेत हीसुध्दा चर्चा करतात. पण दुर्दैवाने समाजवाद हा शब्द घटनेत नंतर घुसवला गेला व संकुचित होण्याकडे उदारमतवादी घटनेचा प्रवास झाला, या वास्तवाचीही आपण दखल घेतली पाहिजे. या लेखातील परंपरावादी मत-प्रभावाची वेगळी समीक्षा करता येईल. उदा., भारताचे आत्मतत्त्व वेदकाळापासून नव्हे, तर वेदांच्याही खूप आधी सुरू झालेल्या सिंधुकाळापासुन सुरू होते व तो प्रभाव आजही आहे, इकडे मी लक्ष वेधू इच्छितो.

रवींद्र गोळे यांचा 'कप्पेबंद होताना' हा लेखही आजच्या समाजवास्तवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे आणि अत्यंत संवेदनशीलतेने त्यांनी आपली मांडणी केली आहे. भारतीयांची वाटचाल राष्ट्रीय होण्याऐवजी जातबंद होण्याकडे वेगाने सुरू आहे, जातीय अस्मिता सर्जनात्मक नव्हे, तर काटेरी, विखारी बनत आहेत हे वास्तव त्यांनी प्रखरपणे या लेखात मांडले आहे. किंबहुना सामाजिक तत्त्वज्ञांनी मांडलेल्या 'ट्रिकल डाउन' थिअरीचा नीट विचार न झाल्याने त्याचा संबंध जाती-धर्माशी कसा जोडला गेला, याचे विवेचन त्यांनी श्रीनिवासनसारख्या समाजशास्त्रज्ञाच्या सिध्दान्ताचा आधार घेत केले आहे. जातीय अस्मिता धारदार झाल्याने आता अगदी अभिवादनेही चक्क जात-केंद्रित असतात हेही ते दाखवतात. मलाही रोज किमान दहा वेगळी अभिवादने ऐकावी लागतात व अस्मितांच्या सोसापायी आपली वाटचाल कोणत्या भयावह दिशेने होत आहे, या जाणिवेने अस्वस्थ व्हायला होते. किंबहुना आधुनिक सामाजिक विचारवंतांनीही 'जात म्हणजे नेमके काय?' याची नीट व्याख्याच केली नसल्याने व तेही नकळत कोणत्या ना कोणत्या जातीच्या अस्मितेचे प्रतिनिधी बनण्याच्या धडपडीत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस गहन होत आहे. उच्च-नीचतेची भावना सोडून सर्व जातींकडे समतेच्या दृष्टीने पाहिले पाहिजे हे गोळेंचे म्हणणे खरेच आहे, कारण समाजसंस्कृती व अर्थसंस्कृती घडवण्यात प्रत्येक जातीचे बरोबरीचे योगदान आहे, हे आजचा समाज विसरला आहे. गोळे म्हणतात, 'हे समाजवास्तव कसे बदलायचे आणि संविधानाला अपेक्षित असणारे समतायुक्त समाजजीवन कसे निर्माण करायचे, हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला कप्पेबंदपणातून बाहेर पडावे लागणार आहे.' आणि हेच लेखाचे सार आहे. समाजाला त्यावरही नेटकेपणे आणि गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

या तीन स्वतंत्र लेखांत एक आंतरिक धागा आहे, तो म्हणजे नवा समाज कसा घडवता येईल आणि संविधान त्यासाठी कसे मार्गदर्शक ठरेल, याची तत्त्वदर्शक मांडणी. चांगले विचार कोठूनही येवोत, त्यांची दखल घेत त्यावर व्यापक सामाजिक चर्चा घडवणे निकोप समाजाचे लक्षण आहे. त्या दृष्टीने हा अंक वाचनीयच नव्हे, तर विचार करायला भाग पाडणारा आहे हे नक्कीच!

वाचकांना वैविध्यपूर्ण आनंद देतो

कथा, ललित, लेख, परिसंवाद, स्मरणयात्रा, व्यंगचित्रे आणि कविता या सगळया साहित्यमूल्य असलेल्या बाबींमुळे हा अंक चोखंदळ वाचकांना वैविध्याचा आनंद देतो. डॉ. बाळ फोंडके व सुप्रिया अय्यर यांच्या कथांमधून माणसाच्या बहुरंगी भावविश्वाचे प्रत्ययकारी दर्शन घडते. अंकातल्या लेखांमधून रमेश पतंगे, माधवी भट, दिलीप करंबेळकर, संतोष क्षीरसागर या व इतर मान्यवरांचे विचार संयमाने पण आत्मबलाने व्यक्त झालेले आहेत. रेणू पाचपोरपासून नव्या पिढीच्या गणेश भाकरेपर्यंतच्या सगळयाच कवींच्या कविता माणसाच्या अंतर्मनाचे दर्शन घडवून आणतात. अंकातली स्मरणयात्रा अंकाची श्रीमंती वाढवणारी अन् ललित मनात सतत रेंगाळणारे. वेचक पण वेधक साहित्य अन त्याची बंदिस्त मांडणी हे विवेकच्या दिवाळी अंकाचे वैशिष्टय म्हणावे लागेल.
वाङ्मयीन गुणवत्ता आणि सामाजिक आशयघनता घेऊन आलेला हा दर्जेदार अंक वाचकांच्या हाती ठेवल्याबद्दल तुमचे आणि विवेक परिवाराचे विशेष अभिनंदन आणि शुभेच्छा!

- प्रशांत असनारे
9860991205

 

Powered By Sangraha 9.0