सत्ता सुख-दु:खाच्या पलीकडील संघ

विवेक मराठी    12-Dec-2018   
Total Views |

 पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांचा कल समोर आल्यानंतर माझ्या एका मित्राने मला प्रश्न विचारला, ''या निकालाचे संघावर कोणते परिणाम होतील?'' मी त्याला तत्काळ उत्तर दिले, ''संघावर याचा शून्य परिणाम होईल.'' माझे उत्तर ऐकून तो क्षणभर स्तंभित झाला. त्याला असे वाटले होते की निवडणुकी निकालाचे संघावर कोणते परिणाम होतील, याचे मी काही विश्लेषण करीन. पण मी तसे काही न केल्याने त्याला आश्चर्य वाटले. पुढे त्याच्याशी आणखी थोडे संभाषण झाले.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की, या माझ्या मित्राच्या मनात मुळात असा प्रश्न निर्माण का झाला? निवडणुकांचा आणि संघाचा काहीही संबंध नसतो, हे त्याला समजत नव्हते का? परंतु अनेक वेळा असे होते की, स्वयंसेवक प्रमाणाबाहेर भाजपाशी असा एकरूप होतो की, त्याला भाजपाचा विजय आपला विजय वाटायला लागतो आणि पराजय आपला पराजय वाटायला लागतो. ही आपलेपणाची भावना जर त्याच्यापुरतीच मर्यादित असेल, तर काही प्रश्न निर्माण होत नाही. परंतु जेव्हा तो आपलेपणाची भावना संघाशी एकरूप होऊन विचार करतो, तेव्हा प्रश्नच प्रश्न निर्माण होतात. मग त्याला असे वाटायला लागते की, भाजपाचा पराभव झाला याचे संघकार्यावर फार वाईट परिणाम होतील... संघकामाला गतिरोध निर्माण होतील... त्याच्या वाढीला मर्यादा येतील.... वगैरे वगैरे.

स्वयंसेवकांनी असा विचार करू नये, म्हणून या संदर्भात आपले सरसंघचालक वेळोवेळी सर्वांना सावध करीत असतात. परंतु खूप वेळ असे होते की, अनेक जण या कानाने ऐकतात आणि त्या कानाने सोडून देतात. त्याचा फारसा गंभीर विचार करीत नाहीत. जेव्हा 'मोदी मोदी' असे फार चालू झाले, तेव्हा सरसंघचालकांनी सांगितले की ''फार 'मोदी मोदी' करू नका.'' जेव्हा 'काँग्रेसमुक्त भारत' ही घोषणा वारंवार दिली जाऊ लागली आणि भाजपाची ही युध्दघोषणा झाली, तेव्हा सरसंघचालक म्हणाले की ''आम्हाला मुक्त भारत नको, युक्त भारत हवा.'' या दोन्ही विचारांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.

मोदी मोदी फार करू नका, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ मोदींचा विरोध असा नाही. मोदीदेखील संघस्वयंसेवक आहेत, आणि ते संघस्वयंसेवकांच्या भावनेतूनच आपले काम करीत आहेत. निष्ठा, समर्पण, प्रामाणिकपणा, देशाचा पहिला विचार या बाबतीत ते आणि आपण सर्व स्वयंसेवक समपातळीवर असतो. संघाचे काम व्यक्तिनिष्ठ काम नाही. एका व्यक्तीवर सर्व जबाबदारी सोपवून मोकळे व्हायचे ही संघाची शिकवण नाही. डॉ. हेडगेवार सांगत असत की, व्यक्तिनिष्ठा हा आपल्या समाजाचा दोष आहे. व्यक्ती नश्वर असते, पण समाज शाश्वत असतो. समाजाचे चिरकालीन मार्गदर्शन करील असे सामर्थ्य कोणत्याही व्यक्तीकडे नसते. म्हणून आपण तत्त्वपूजक झाले पाहिजे. आपल्यामध्ये तत्त्वनिष्ठेची जोपासणी केली पाहिजे.


काम करायचे तर ते तत्त्वासाठी करा. कोणत्याही व्यक्तीसाठी करायचे नाही. व्यक्तीसाठी काम केले, तर व्यक्तीचा विजय आपला विजय वाटायला लागतो आणि तिचा पराजय आपला पराजय वाटायला लागतो. व्यक्तीपेक्षा तत्त्व मोठे असते, विचार मोठा असतो. त्या विचाराचे काय झाले? याचे चिंतन सतत करीत राहायला पाहिजे. संघात संघसंस्थापक 'डॉ. हेडगेवार की जय' अशी घोषणा कधीही दिली जात नाही किंवा त्या त्या काळातील सरसंघचालक असतील त्यांचे नाव घेऊन 'ते झिंदाबाद' किंवा 'ते जय' अशी घोषणाही दिली जात नाही. संघात फक्त एकच उद्घोष होतो, तो म्हणजे 'भारत माता की जय', बाकी जयजयकार कोणाचाच नाही.

कोणताही निवडणूक निकालाचा संघकामावर अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम शून्य होत असतो. 1977 साली इंदिरा गांधींचा पराजय झाला आणि 1980 साली त्या पुन्हा निवडून आल्या, या दोन्ही घटनांचे संघकामावरील परिणाम नगण्य आहेत. याचे मुख्य कारण असे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना सत्तानुगामी संघटना नाही. संघ ही स्वायत्त आणि स्वयंशासित संघटना आहे. राज्यसत्तेच्या सर्वाेच्च स्थानी स्वयंसेवक बसल्यामुळे संघशाखांच्या संख्येत वाढ होत नाही आणि संघाला प्रतिकूल असणारी व्यक्ती बसल्यामुळे संघशाखांच्या संख्येत घट होत नाही. संघशाखांचे काम सत्तानिरपेक्ष काम आहे. हे अद्वितीय, अनोखे आणि जगात कुठे असे उदाहरण सापडणार नाही, असे काम आहे.

निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अखिल वर्गासाठी गेलो होतो. कार्यकर्त्यांपुढे मला संविधान हा विषय मांडायचा होता. वेळ दुपारची होती, तोपर्यंत निवडणूक निकालांचे कल काय असणार आहेत, हे स्पष्ट झाले होते. वर्गासाठी आलेले सर्व कार्यकर्ते हे संघस्वयंसेवकच होते. त्यांच्यावर या निकालांचा परिणाम कोणता होता? तर तो शून्य होता. आपण इथे कशासाठी आलो आहोत आणि आपल्याला इथून पुढे कोणते काम करायचे आहे, याच्याच चिंतनात सर्व कार्यकर्ते मग्न होते. मी विषय मांडून झाल्यानंतर कोणीही मला निवडणूक निकालांसंबंधी प्रश्न विचारला नाही. कार्यक्रम संपल्यानंतरही मोकळया वेळेत कोणी काही विचारले नाही. सत्तेपासूनही ही अलिप्तता हीच संघाची फार मोठी शक्ती आहे.


संघाचे कार्य राजसत्तेवर जर अवलंबून असते, तर संघकार्यावर निकालांचे परिणाम नक्कीच झाले असते. राज्यसत्तेकडून संघ छदाम घेत नाही. राज्यसत्तेकडून संघ स्थावर-जंगम मालमत्ता मिळवीत नाही. राज्यसत्तेच्या कोणत्याही पदावर अमुक अमुक संघकार्यकर्त्याची नियुक्ती करा, असे संघ कधी कोणाला सांगत नाही. निवडणुकांचे तिकीट यांना द्या, त्यांना द्या असा संघाचा कधी आग्रह नसतो. सत्तेच्या कोणत्याही अंगाशी संघाशी गुंतवणूक नसल्यामुळे सत्ता आली काय आणि गेली काय, संघकार्य आपल्या गतीने आणि आपल्या पध्दतीने चालू राहते. मध्यंतरी एक राजकीय फंडा म्हणून एकाने पिल्लू सोडून दिले की, मोहनजी भागवतांनी राष्ट्रपती झाले पाहिजे. तो चलाख राजकीय नेता असला, तरी घोर संघ अज्ञानी होता. त्याच्या हे लक्षात आले नाही की, सरसंघचालकपदाची बरोबरी करेल असे कोणतेही पद देशात नाही. राष्ट्रपती देशाचे संवैधानिक प्रमुख आहेत आणि सरसंघचालक हे कोटयवधी स्वयंसेवकांच्या हृदयातील श्रध्देचे स्थान आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही.

निवडणूक निकालांचा संघावर काहीही परिणाम झाला नसला, तरी प्रत्येक निवडणुकीवर संघाचा परिणाम होत चालला आहे. काल-परवापर्यंत काँग्रेसचा कोणताही नेता ''मी हिंदू आहे, मला हिंदू असण्याची आस्था आहे, आणि माझे हिंदूपण मी जपणार आहे, मीदेखील गोभक्त आहे, आमची सत्ता आल्यास आम्ही गाईचे रक्षण करू'' असे म्हणण्याचे धाडस करीत नव्हता; पण आज ते जाहीरपणे म्हणू लागले की, ''आम्ही गोशाळा उभारू'', त्यांचे सर्वाेच्च नेते गाजावाजा करून मंदिरात जातात, देवदर्शन करतात, पुजाऱ्याकडून प्रसाद घेतात, तो भक्तिभावाने ग्रहण करतात. शबरीमलासारख्या प्रकरणावर बोलत नाहीत. देशाची संस्कृती, देशाच्या प्राचीन आस्था याविषयी आदरभावाने बोलतात. सामाजिक समरसतेचा व्यवहार दिसावा म्हणून दलितांच्या वस्तीत जातात आणि भोजन करतात. हे सर्व परिवर्तन संघविचाराने घडले आहे.

राजकारण करीत असताना मतांचा विचार करावा लागतो. हे परिवर्तन मतांसाठी झाले आहे, असे म्हणता येईल. परंतु मतांसाठी असे परिवर्तन केले पाहिजे, अशी बुध्दी सुचणे हेही काही कमी नाही. दिल्लीच्या तीन दिवसीय भाषणात एकाने मोहनजींना प्रश्न विचारला की, ''संघाचे प्रचारक तुम्ही भाजपातच का पाठविता?'' मोहनजींनी त्याचे उत्तर दिले की, ''ते मागतात म्हणून पाठवितो. उद्या अन्य पक्षांनी विचारले की त्याचाही विचार करू.'' हे केवळ प्रश्नाला दिलेले उत्तर नाही. हा संघ जगण्याचा भाव आहे. संघाचे प्रारंभापासूनचे म्हणणे आहे, की सगळेच आमचे आहेत. काँग्रेसही आमचीच आहे आणि भाजपादेखील आमचाच आहे. त्यामुळे जे विजयी होतात, ते कोणी परके नसतात. तीदेखील आमचीच माणसे आहेत. संघाला पक्षीय दृष्टीकोन घेऊन काम करता येत नाही आणि संघ तसे करणारदेखील नाही. पंडित दीनदयाळजींना एकदा एकाने प्रश्न विचारला की, ''निवडणुकीत आपले किती जण निवडून येणार?'' पंडितजी म्हणाले, ''निवडून येणारे सर्व आपलेच आहेत.'' पंडितजी संघप्रचारक होते ही यांची संघदृष्टी होती. म्हणून जे निवडून आले ते सर्व आपलेच आहेत, सत्तेवर येणारेदेखील आपलेच आहेत. सत्ता गेली असेल तर त्याचे दु:ख भाजपाला होईल आणि ते त्याचा विचार करतील. संघ सत्ता सुख-दु:खाच्या पलीकडचा आहे.

vivekedit@gmail.com