पर्यावरण रक्षणाचा अमृतकुंभ

विवेक मराठी    08-Dec-2018   
Total Views |

वाराणसीमधील म. गांधी काशी विश्वविद्यालय, उत्तर प्रदेश सरकारची पर्यावरण कुंभ आयोजन समिती आणि विज्ञानभारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 1 आणि 2 डिसेंबर 2018 या दोन दिवशी 'पर्यावरण कुंभ' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला देशभरातून 3200पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. दोन दिवस चर्चासत्र आणि तीन दिवस प्रदर्शन असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं.

 कुंभ म्हणजे कलश, ज्याचा संबंध अमृतमंथनाशी आहे. भारतीय प्रथेनुसार, कुंभमेळा म्हणजे वैचारिक आदानप्रदान करण्याचं आणि त्यातून निष्पन्न झालेल्या समाजोपयोगी निर्णयापर्यंत येण्याचं एक व्यासपीठ आहे. कुंभमेळा आता दोनेक महिन्यांवर आला आहे. आत्तापर्यंत, कुंभमेळा म्हटलं की केवळ धार्मिक चर्चा असं गृहीतक होतं. या वेळी वर उल्लेख केलेल्या तीन संस्थांच्या पुढाकाराने कुंभमेळयामध्ये या संकल्पनेचा उपयोग करून युवा, संस्कृती, शिक्षण, पर्यावरण इत्यादी सात विविध क्षेत्रांमध्ये नवीन काय करता येईल आणि त्यात सर्वसामान्य लोकांचा - विशेषत: युवकांचा सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टीने विचार करून त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अशा विविध कुंभ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यातील पहिला कार्यक्रम म्हणजे 'पर्यावरण कुंभ.'   

दोन दिवसांच्या या सत्रामध्ये विविध सरकारी अधिकारी, हवामानतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, विविध ठिकाणी काम करणारे काही प्रतिनिधी आणि या क्षेत्रात काम करणारे आणि करू इच्छिणारे प्रतिनिधी या सर्वांनी भाग घेतला. 'पर्यावरण - भारतीय दृष्टी' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या सत्रांमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी भारतीय दृष्टीकोनातून काय काय करता येईल यावर विविध पैलू विचारात घेऊन चर्चा केली गेली. त्या सर्व कार्यक्रमातील चर्चा आणि अनुभव याबद्दल तयार झालेलं मत म्हणजे हा लेख.

सद्यःस्थितीमध्ये पर्यावरण संरक्षण हा मुद्दा जागतिक स्तरावर एक चिंतेचा विषय बनला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने हवामान बदलाचं संकट समोर उभं राहिलं आहे आणि हे किती गंभीर आहे, याची नक्की व्याप्ती काय, याचे नक्की होणारे परिणाम काय, त्यातील कायमस्वरूपी होणारं नुकसान किती आणि काय, इत्यादी प्रश्नांवर जगभरात एकूणच भीती, गैरसमज आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दिवसेंदिवस जास्तच गंभीर होत चाललेल्या या पर्यावरणीय प्रश्नांची उत्तरं शोधणं हे जगभरातील शहाण्या माणसांचं एक महत्त्वाचं काम आहे. यात जे काही काम चालू आहे, त्यातून येणारे निष्कर्ष असं सांगतात की जर यातून सुरक्षित बाहेर पडायचं असेल, तर तुम्हाला तुमची जीवनशैली पर्यावरणस्नेही ठेवणं गरजेचं आहे.

यासाठी जगभरात विविध ठिकाणी काय काय उपाय चालू आहेत आणि भारतीय दृष्टीने विचार करून आपण यातून काही मार्ग काढून विकास आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये सुवर्णमध्य साधू शकतो का, याबद्दल माहिती मिळवणं आणि आपल्याकडील माहिती आणि अनुभव यावर आधारित कार्यक्रम देणं हा या कार्यक्रमात सहभागी होण्यामागचा माझा उद्देश होता.

विचारमंथन

कोणताही बदल घडवायचा असेल, तर ज्या विचाराने तो बदल घडणार आहे तो विषय समाजातील सर्व स्तरांमध्ये सर्वांना समजेल अशा पध्दतीने पोहोचला पाहिजे, हे लक्षात घेऊन या गोष्टीसाठी धार्मिक परंपरांचा वापर करण्याचा एक अनोखा प्रयत्न या 'पर्यावरण कुंभ'च्या निमित्ताने करण्यात आला. बदलतं पर्यावरण आणि त्याचे होणारे परिणाम, आपल्या विचारांत आवश्यक असलेले बदल करण्याची संधी आणि धार्मिक भावनेचा उपयोग करून घेऊन बदलते सामाजिक विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाकडे बघायला हवं. आपलं बदलत गेलेलं राहणीमान किंवा जीवनशैली, त्या जीवनशैलीचे पर्यावरणातील विविध घटकांवर होणारे दुष्परिणाम, याबाबत असलेली भारतीय आणि जागतिक परिस्थिती, होणारे दुष्परिणाम कमी व्हावेत म्हणून करायचे उपाय, त्यात भारतीय दृष्टीने मिळणारी उत्तरं शोधण्यासाठी करण्याचे प्रयत्न, त्या त्या विषयांतील अधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्तींनी यावर सुचवलेले उपाय इत्यादी गोष्टींवर या दोन दिवसांत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.


विविधांगी कार्यक्रम

एक डिसेंबरला सकाळी 10 वाजता प्रदर्शनाचं उद्धाटन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रदर्शन सर्व लोकांसाठी खुलं होतं आणि विनामूल्य होतं. वाराणसीमधील बऱ्याच शाळा-महाविद्यालयांनी याचा फायदा घेतला. 10,000 चौ.मी.पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेल्या या प्रदर्शनात पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांची माहिती देणारी दालनं होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक ऑॅनलाइन स्पर्धा घेतल्या गेल्या. फोटोग्राफी, पोस्टर, पेंटिंग इत्यादी अनेक प्रकारे स्पर्धा घेऊन त्यातून देशभरातून लोकसहभाग मिळवून या विषयाचा प्रसार कसा होईल याचा प्रयत्न केला गेला.

एका आटोपशीर उद्धाटन कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्धाटन करण्यात आलं. पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल याबद्दल त्यांनी उत्तर प्रदेश सरकार काय करू इच्छिते याबाबत मोजक्या शब्दांत सांगितलं आणि चर्चासत्रासाठी वेळ दिला.

बिहारचे राज्यपाल लालजी टंडन हे दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष होते, तर उत्तर प्रदेशचे वनमंत्री दारासिंग चौहान यांच्या भाषणाने दोन दिवसांच्या चर्चासत्राचा समारोप झाला. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह पर्यावरणतज्ज्ञ सुरेश सोनी, उत्तर प्रदेश क्रीडामंत्री नीलकंठ तिवारी, विज्ञान भारतीचे जयंत सहस्रबुध्दे, म. गांधी काशी विश्वविद्यालय कुलपती डॉ. टी.एन. सिंग, रवींद्र जोशी, 'योजक'चे डॉ. गजानन डांगे, आय.आय.टी. मुंबईचे डॉ. शिरीष केदारे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस.पी. गौतम, गौतम बुध्द विद्यापीठाचे कुलपती बी.पी. शर्मा, बनारस हिंदू विश्वविद्यालय माजी कुलपती आणि कृषितज्ज्ञ डॉ. पंजाब सिंग, कृषी अनुसंधान संचालक कल्लू गौतम इत्यादी मान्यवरांचं 'भारतीय दृष्टीने पर्यावरण संरक्षण' या विषयावर मार्गदर्शन झालं.

भारतीय दृष्टीने विचार करताना, सम्यक विचार म्हणून पर्यावरण संरक्षणासाठी 'उपभोगवाद' हा मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला. उपभोगवादावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता, मार्ग, त्याचे परिणाम आणि फायदा या मुद्दयांवर चर्चा केंद्रित झाली होती.

जाणीवजागृती

सध्याच्या काळात जीवनशैलीमुळे वाढत चाललेली कार्बन फूटप्रिंट, वाढत्या नागरीकरणाचे, उपभोगी समाजजीवनाचे होणारे दुष्परिणाम, वाढत चाललेला कचरा आणि त्याचं फसलेलं निर्मूलन, त्यामुळे होणारं हवा, पाणी प्रदूषण, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे  झालेले आणि होत असलेले शेती, माती, पाणी, कीटक, पक्षी आणि माणसं यांच्यावरील दुष्परिणाम, जंगलतोडीमुळे होणारं पर्यावरणाचं नुकसान आणि निसर्गाचा ढळलेला तोल, पाण्याच्या साठयांवर होणारा परिणाम, जंगलवाढीसाठी आवश्यक प्रयत्नांची गरज, पाण्याचं नियोजन करण्याची गरज, सौर ऊर्जा, तिचा सुयोग्य वापर, त्यामुळे कमी होऊ शकणारा नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश अशा विषयांवर चर्चा झाली. निसर्गातील अनेक घडामोडींच्या निरीक्षणातून आपण कसे शिकू शिकतो आणि आडाखे बांधू शकतो आणि त्याचा वापर समाजाच्या उपयोगासाठी कसा करू शकतो, या प्रत्येक मुद्दयावर बदल घडवताना ते कसे असावेत यावर चर्चा केंद्रित झाली होती. स्वत:पासून सुरुवात करून हे बदल समाजात सर्व स्तरांमध्ये कसे प्रसारित होतील यावर विविध मुद्दे मांडून मार्ग आखण्याचा निर्णय झाला. हे सर्व उपाय प्रत्यक्ष करण्याची गरज तर आहे, पण त्याचबरोबर यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असल्याने, समाजाची सतत जाणीवजागृती हे महत्त्वाचं काम आहे हे लक्षात घेऊन समाजजागृतीचे कार्यक्रम सर्व स्तरांमध्ये कसे पोहोचतील यावर प्रामुख्याने भर देण्याचा प्राथमिक निर्णय झाला.

पृथ्वी फक्त मानवासाठी नाही, तर सर्व जीवांसाठी आहे आणि ही जीवसृष्टी सुरक्षित राहावी, संतुलित राहावी, नैसर्गिक स्रोत सुरक्षित राहावेत, सर्वांनाच त्याचा फायदा घेता यावा या उद्देशाने आपलं काम असावं, हीच सुवर्णमध्य साधणारी भारतीय दृष्टी आहे यावर शिक्कामोर्तब होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाचं यश म्हणजे देशभरातून 3000पेक्षा जास्त लोक यासाठी आले होते. कोणताही गोंधळ न होता, सर्व वेळा पाळून आयोजकांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

अर्थात, यात अनेक गोष्टी राहून गेल्या, ज्या प्रत्यक्षात आल्या असत्या, तर या कार्यक्रमाची परिणामकारकता वाढली असती. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, दोन-तीन अपवाद सोडले तर बाकी चर्चा 'पुस्तकी' किंवा 'तात्त्वि' होत्या. प्रत्यक्ष काम करणाऱ्या काही लोकांना त्यांचे अनुभव आणि विचार मांडायची संधी मिळाली असती, तर त्याचा जास्त उपयोग झाला असता. चांगले विचार कृतीत आणणं कठीण असेल, तर नुसते आदर्श विचार सांगून काहीच घडत नसतं. आज पर्यावरणाची अवस्था अशी का आहे हे जगजाहीर आहेच. त्यावरचे उपायसुध्दा खूप लोकांना माहीत आहेत. प्रश्न आहे तो परिणामकारक, व्यावहारिक उपाययोजना करण्याचा. तिथे गडबड होते आहे. स्वत:ला काहीच करायला लागू नये, पण जगाने मात्र बदलावं असं आपल्यापैकी बहुसंख्यांना मनापासून वाटतं. ही मानसिकता बदलणं ही सर्वात महत्त्वाची, मोठी आणि आवश्यक गोष्ट आहे. विविध पातळयांवर समाजप्रबोधन, जाणीवजागृती होण्यासाठी काम करणं गरजेचं आहे.

 प्रबोधनाची गरज

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, जलसंवर्धन, नियोजन आणि संधारण, जंगलवृध्दी इत्यादी क्षेत्रांत अनेक ठिकाणी लोक प्रत्यक्ष काम करत आहेत. त्यांना लोकसहभाग आणि यश दोन्ही मिळतंय, पण त्याला काही कारणांनी पुरेशी प्रसिध्दी न मिळाल्याने किंवा अन्य काही कारणांनी ते सर्वसामान्य लोकांपुढे न आल्याने त्याचा प्रचार आणि प्रसार होत नाही. पर्यावरणाच्या संतुलनासाठी चांगल्या ठरलेल्या अशा उपाययोजना लोकांपुढे आणणं हासुध्दा प्रबोधनाचाच एक भाग आहे, हे लक्षात घेऊन पावलं उचलली पाहिजेत.

अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून एक फायदा नक्की होत असतो, तो म्हणजे त्या क्षेत्रात काम करणारी मंडळी त्यानिमित्त एकत्र आल्याने देशभरात आपल्या कार्यक्षेत्रात काय चाललंय याबद्दल अधिक माहिती मिळते, काही प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि एक चांगली टीम तयार होते, एक दबावगट तयार होण्याच्या दिशेने सुरुवात होते. अर्थात, ही एक काळजी घेण्याची वेळही आहे, कारण दबावगट झाला की बरेचदा मूळ विषय बाजूला पडण्याची शक्यता निर्माण होते. तेवढं काटेकोरपणे लक्षात ठेवलं, तर मात्र अशा ठिकाणी भेटलेल्या अन्य कार्यकर्त्यांसह काम करून आपली कामाची परिणामकारकता वाढवणं सहज शक्य होतं.

वैचारिक आदानप्रदान होण्यासाठी उपयोगी ठरलेला एक यशस्वी कार्यक्रम असं याचं वर्णन करता येईल. पण प्रत्यक्ष काम केलेल्या लोकांना अनुभव सांगण्याची संधी मिळाली असती, तर शाश्वत यश मिळवण्यासाठी त्याचा उपयोग झाला असता, हेही तितकंच खरं आहे. तत्त्वाची व्यवहाराशी सांगड घातली गेली तर सुवर्णमध्य साधता येतो, हे लक्षात ठेवून असे कार्यक्रम केले गेले तर त्याचा परिणाम आणि फायदा अनेक पटींनी वाढेल, यात काही शंका नाही.

9967054460