देवराई – लोकसहभागातून निसर्गसंरक्षण - संवर्धनाचा वारसा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक21-Feb-2018   

 

देवराई हे त्या त्या भागातील मूळ जंगल असतं. बाकीची झाडं तोडली गेली, तरी देवराईमधील झाडं राखली जातात. त्यामुळे, देवराई बघितली की त्या भागातील निसर्गसंपदा कशी होती आणि आहे याचा अंदाज येतो.

लोकसहभागातून जीवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताला परंपरेने एक सुदृढ आणि पुरातन वारसा दिला आहे. एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू ठेवायची असेल, तर ती लोकांच्या जगण्याचा एक भाग झाली पाहिजे, या गोष्टीची जाण आपल्या शहाण्या पूर्वजांना असावी. त्यांनी निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचं संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘देवराई’. 

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोड होत नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचं जंगल आहे, त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांचं संरक्षण केलं जातं.

देवराई नुसती फोटो बघून किंवा वर्णन वाचून कळत नाही. ती प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. कोणत्याही चांगल्या देवराईत शिरल्यावर आपला बाकी जगाशी संपर्क जवळपास तुटतो. आतलं आणि बाहेरचं तापमान, आर्द्रता यात जाणवण्याएवढा फरक अनुभवायला मिळतो. आत शिरल्यावर आपल्याला दिसतात ते उंचच उंच वृक्ष (बरेचदा १०० फुटांहून उंच), त्यावर असणाऱ्या अनेक आकाराच्या वेली (अगदी २ मीटर वेढीच्यासुद्धा), गच्च झाडोरा आणि विविध पक्षी, प्राणी यांचे आवाज आणि बरेचदा दर्शन. कुठे तरी वाहणाऱ्या ओढ्याचा किंवा नदीच्या पाण्याचा आवाज,

 देवराईच्या मध्यावर किंवा एका बाजूला एखादं मंदिर असतं. निसर्गातूनच आलेला देव किंवा देवी असते. ती त्या देवराईची आणि गावाची राखण करते. . बहुतांश देवरायांमध्ये पाण्याचा एक तरी स्रोत असतो.

देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांचं रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे. 

महाराष्ट्राचा विचार केला, तर देवराया पश्चिम घाटाच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसंच सातपुडा डोंगररांगा, यवतमाळ, नांदेड़जवळील आदिवासी भाग, भंडारा, गड़चिरोली वगैरे भाग, जिथे आदिवासी वस्ती आहे त्या भागात देवराया आढळतात. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागात देवरायांची संकल्पना आढळत नाही किंवा त्याबद्दल काही नोंद नाहीये.

आपण जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की ज्या मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भात देवराई ही संकल्पना नाही, तिथे जंगलं कमी आहेत, एकूणच झाडझाडोरा कमी आहे आणि पाण्याचं दुर्भिक्षसुद्धा आहे. म्हणजे, देवराई असलेल्या ठिकाणी पाण्याचे स्रोत चांगले राहतात, किंवा पाण्याचे स्रोत चांगले राहण्यासाठी देवराया राखल्या गेल्या, असंही म्हणता येईल.

माझ्या बघण्यात, जिथे गावाला पाणी केवळ देवराईमुळे मिळतं, तिथे तिथे गावाने देवराई चांगली जपली आहे आणि त्यातून चांगली समृद्धीही मिळाली आहे.

  

अर्थात, केवळ पाणी हेच कारण नाही देवराई राखण्यामागे. देवराई हे त्या त्या भागातील मूळ जंगल असतं. बाकीची झाडं तोडली गेली, तरी देवराईमधील झाडं राखली जातात. त्यामुळे, देवराई बघितली की त्या भागातील निसर्गसंपदा कशी होती आणि आहे याचा अंदाज येतो.

सामाजिक संरक्षण लाभल्याने, अनेक ठिकाणी दुर्मीळ असणाऱ्या प्रजाती - मग त्या झाडांच्या असोत वा प्राणी-पक्ष्यांच्या - देवराईमध्ये चांगल्या नांदताना दिसतात.

आपण जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी नसून केवळ एक भाग आहोत आणि फ़क्त आपणच निसर्गाचं शोषण करतोय (माणसाव्यतिरिक्त इतर कोणताही प्राणी निसर्गाचं शोषण करत नाही.) त्यामुळे जीवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचं संवर्धन आणि संरक्षण ही आपली जबाबदारी आहे, हे ओळखून माणसाने कृती करायला हवी.

देवराई ही संकल्पना नक्की काय आहे आणि जीवविविधता आणि निसर्गसंरक्षण-संवर्धनात त्याचा कसा उपयोग आजही करून घेता येईल, हे आपण पुढील काही भागांमध्ये पाहू या.

डॉ. उमेश मुंडल्ये

9967054460