'नको रे मना लोभ हा अंगिकारु'

20 Apr 2018 14:31:00

लोभ हा असा दुर्गुण आहे, जो एकदा मनात रुजला की सदसद्विवेकबुध्दीला झाकोळून टाकतो. लोभीपणाने आंधळा झालेला माणूस नाती-गोती, मैत्री, संवेदनशीलता विसरून जातो. स्वार्थ आणि संपत्ती यापलीकडे त्याला काहीही महत्त्वाचे वाटत नाही. म्हणूनच कदाचित समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात 'नको रे मना लोभ हा अंगिकारु' असे विनवले आहे.

लाभ आणि लोभ या दोन शब्दांत तसे पाहता केवळ एका मात्रेचा फरक आहे, पण अर्थांमध्ये मात्र महदंतर आहे. मी कॉलेजला असताना टॉलस्टाय यांची एक प्रसिध्द कथा माझ्या वाचनात आली होती. तिचे नाव 'माणसाला किती जमिनीची गरज असते?' ही अगदी छोटीशी कथा असली, तरी तिचे तात्पर्य कायम लक्षात ठेवण्यासारखे आहे. एका राजाने एकदा आपल्या नागरिकांसाठी स्पर्धा जाहीर केली की सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत जो जितका धावत जाऊन परत येईल, तेवढी जमीन त्याच्या मालकीची होईल. एक माणूस लोभामुळे दिवसभर धावत राहिला. आणखी मिळवण्याच्या आशेने त्याने सूर्यास्ताकडे लक्ष ठेवले नाही आणि आपल्याला माघारी फिरायचे आहे, हेही तो विसरून गेला. अखेर त्या धावण्यातच तो ऊर फुटून जमिनीवर कोसळला आणि मरण पावला. त्याच्या वाटयाला केवळ साडेतीन हात (देह पुरण्याइतकी) जमीन आली.

खरे तर एका मर्यादेपर्यंत लोभ हासुध्दा प्रगतीला पोषक असतो. आहे त्यात आणखी भर घालण्याची आशा बाळगण्यात काहीच वावगे नाही. विद्यार्थ्याने अधिक गुण मिळवण्याचा लोभ धरायलाच हवा. संसारी माणसाने आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी जास्त चांगल्या पगाराच्या नोकरीचा लोभ ठेवायलाच हवा. व्यापाऱ्याने नफा आणि व्यवसायाचा आवाका वाढवण्याचा लोभ अवश्य ठेवावा. पण तो किती असावा, याचेही प्रमाण मनाशी निश्चित करुन ठेवावे. अन्यथा लोभाचे रूपांतर प्रचंड आसक्तीत झाले, तर मानवाचा दानव व्हायला वेळ लागत नाही. कदाचित म्हणूनच बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेत कळवळून विचारले आहे, 'अरे मानसा मानसा कधी व्हशीन मानूस, लोभापायी झाला मानसाचा रे कानूस' (कानूस म्हणजे राक्षस)

माझ्याबाबत एक सुदैवी गोष्ट घडली. मला आई-वडिलांच्या चांगल्या संस्कारांचे कोंदण लाभले. विशेषत: माझ्या आईने घालून दिलेली शिस्तीची चौकट मी कधीच मोडली नाही अन् त्यामुळे लोभीपणाच्या सापळयातही अडकलो नाही. मला आठवते, कॉलेज जीवनात मी 'कमवा आणि शिका' पध्दतीने पैसे मिळवत होतो. कॉलेजचे तास संपल्यावर उरलेल्या वेळात मी मुंबईच्या उपनगरांत दारोदार फिरून फिनेल, इन्स्टंट मिक्सेस, आइसक्रीम मिक्सेस अशी उत्पादने विकायचो. आम्ही राहायचो कलिन्याला, माझे कॉलेज दादरला, मला फिनेल पुरवणारी कंपनी अंधेरीची आणि मी उत्पादने विकायला जायचो घाटकोपर, मुलुंड, ठाणे अशा लांबवरच्या उपनगरांत. हा उद्योग सुरू केल्यानंतर पैसे साठताच ती पहिली कमाई मी माझ्या आईच्या हातात आणून दिली. आईने माझ्या मेहनतीचे कौतुक केले, पण त्याच वेळी एक इशाराही दिला. ती म्हणाली, ''दादाऽ, एक लक्षात ठेव. घामाने मिळवलेला पैसा घरात सुख-शांती ठेवतो, पण पापाचा पैसा लोकांचे तळतळाट आणि सर्वनाशाची बीजे घेऊन येतो. तू व्यवसाय करताना अतिलोभ बाळगू नकोस आणि ग्राहकांना कधी फसवूही नकोस.'' मी आईचा उपदेश कायम ध्यानात ठेवला आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालत राहिलो. मला त्याची चांगलीच फळे मिळाली.

वर्ष 1990मध्ये इराक-कुवेत युध्द झाले, तेव्हा संभाव्य बाँब हल्ल्याच्या भीतीने दुबईत खळबळ उडाली. लोकांनी युध्दाच्या चाहुलीने मिळतील त्या वस्तूंचा साठा घरात भरून ठेवायला सुरुवात केली. माझ्या दुकानासमोरची रांग रात्री बारापर्यंतही संपेना. वास्तविक ती स्थिती मला प्रचंड पैसा मिळवायला अनुकूल होती. माझी गोदामे मालाने गच्च भरली होती. ग्राहकांची झुंबड होती आणि वातावरण असे होते, की दुप्पट किंमत मोजूनही ग्राहक वस्तू घ्यायला तयार होते. पण आईने दिलेल्या इशाऱ्यामुळे माझे मन लोभीपणाकडे वळले नाही. मी माल दाबून ठेवणे, काळाबाजार करणे किंवा ग्राहकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेणे असले प्रकार केले नाहीत. वस्तूंची जेवढी किंमत पाकिटावर नमूद केली होती, तितक्यालाच मी विक्री केली आणि त्याच वेळी भारतातून मिळेल तेवढा माल मागवला. या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणजे एरवी सहा महिन्यांत विकला जाणारा माझा माल एकाच महिन्यात विकला गेला आणि मला नेहमीच्या तुलनेत चौपट नफा झाला. याहूनही चांगली गोष्ट म्हणजे दुबईतील ग्राहकांच्या मनात अल अदील या आमच्या व्यवसायाची प्रतिमा उजळली. अल अदील या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ भला माणूस आहे. कंपनीच्या नावाप्रमाणेच आम्ही भली माणसे आहोत, याची दुबईकरांची खात्री पटली. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास अगदी आजही कायम आणि भक्कम आहे.

व्यवसायात मी स्वत:ला हावरटपणापासून चार हात लांब ठेवले असले, तरी लोभी माणसांना फार जवळून बघितले आहे. त्यांच्या आयुष्याची परवड होतानाही पाहिली आहे. एक व्यावसायिक होता, ज्याचा व्यवसाय खरे तर चांगला चालला होता आणि त्याच्याकडे संपत्तीही होती. पण तो पैशासाठी इतका हावरट झाला की चोवीस तास सतत पैशाचाच विचार करायला लागला. कुटुंबाला वेळ देईना, मित्रांमध्ये मिसळेना. हळूहळू या लोभीपणाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांवरही भूल घातली. नवरा वेळ देत नाही म्हटल्यावर पत्नीने शॉपिंग, क्लब, मैत्रिणींबरोबरच्या पाटर्या व पिकनिकमध्ये मन रमवायला सुरुवात केली, तर मुले वडिलांच्या पैशावर ऐश करणारी उडाणटप्पू झाली. लोभीपणापायी आपण काय गमावतोय हेच त्याला समजत नव्हते. तो एकाकी पडत गेला. दुर्दैवाने त्याचे निधनही एकाकीच झाले. त्या क्षणी पत्नीही जवळ नव्हती आणि मुलेसुध्दा.

पैशाच्या मोहापायी माणूस मित्र, कुटुंब, नाती, आरोग्य यांच्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा दु:खाखेरीज काहीही पदरात पडत नाही. मुंबईत फरसाण बनवणारा एक व्यावसायिक होता. त्याचा नमकीनचा ब्रँड लोकप्रिय आणि प्रसिध्द होता. कोटयवधींची उलाढाल होती आणि सर्व काही चांगले होते. या व्यावसायिकाची बहीण एकदा आर्थिक अडचणीत सापडली. भावाने बहिणीला काहीतरी 15 लाख रुपयांची मदत केली. पुढे तो त्या पैशावरून बहिणीला वारंवार विचारणा करु लागला. बहिणीने ते पैसे स्वत:साठी वापरले नव्हते, तर तिच्या पतीला झालेले कर्ज निवारण्यासाठी खर्च केले होते. ती स्वत:चाच संसार मेटाकुटीने चालवत होती. इकडे भावाचा गैरसमज झाला की तिला आपले पैसे बुडवायचे आहेत म्हणून सबबी सांगत आहे. एक दिवस हा भाऊ बहिणीच्या घरी जाऊन माझे पैसे दे, त्याशिवाय मी जाणार नाही, असे म्हणून हट्ट धरून बसला. बहिणीने परोपरीने सांगितले, की माझ्याकडे सध्या इतके पैसे नाहीत, पण जमेल तशी फेड करेन. तरीही हा ऐकेना. मोठेच भांडण झाले. अखेर वैतागाने बहीण म्हणाली, ''मी जीव देते. मग तर तुझी खात्री पटेल ना?'' इतके बोलून ती थांबली नाही, तर तिने तिरिमिरीत आतल्या खोलीत जाऊन खरोखर गळफास लावून घेतला. बहिणीचा मृतदेह बघताच भाऊ  हादरला आणि त्याला आपली चूक उमगली. त्याला स्वत:च्या कृत्याचा इतका पश्चात्ताप झाला, की त्यानेही भावनेच्या भरात रेल्वे स्टेशनवर जाऊन धावत्या गाडीखाली स्वत:ला झोकून दिले. माणसाने पैशासाठी जवळची नाती तोडू नयेत, ती यासाठीच.

लोभीपणापायी पुष्कळ लोक हातात असलेला चांगला धंदा घालवून बसतात. दुबईत एक पुरवठादार व्यापारी होता. एका मोठया कंपनीला तो झुंबरांसाठी लागणारे क्रिस्टल्स बनवून द्यायचा. कंपनीचा त्याच्यावर अत्यंत विश्वास होता आणि त्यांनी त्याला मोठा व्यवसायही दिला होता. आपणच एकमेव पुरवठादार आहोत, या भावनेतून या माणसाला लोभ सुटला. त्याने बनावट क्रिस्टल्स बनवण्याचा कारखाना पंजाबमध्ये काढला आणि तो डुप्लिकेट माल दुसऱ्या नावाने जगभर विकायला लागला. पण त्याला व्यवसाय देणारी कंपनी बेसावध नव्हती. बाजारात नकली क़ि्रस्टल्सचा पुरवठा होत आहे, हे समजल्यावर त्यांनी पाळेमुळे खणून काढली. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच पुरवठादार हे उद्योग करत आहे, हे कळल्यावर त्यांनी त्याच्यावर एवढे खटले दाखल केले की हा पुरता हैराण झाला. अखेर त्याला जाहीर माफी मागावी लागली, नुकसानभरपाई द्यावी लागली. त्याने कंपनीचे कंत्राट गमावले. शिवाय व्यापारी वर्तुळात त्याचे नाव खराब झाले ते झालेच. येथे मला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारणाऱ्या हावरट माणसाची गोष्ट आठवते. पण या नीतिकथा केवळ सांगण्याच्या नसून शिकण्याच्याही आहेत.

मित्रांनोऽ, मन लोभाच्या आहारी जाऊ द्यायचे नसेल, तर संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील इशारा कायम ध्यानी धरला पाहिजे.

आमिषाचे आसा। गळ गिळी मासा।

फुटोनिया घसा। मरण पावे॥

 (या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)

Powered By Sangraha 9.0