वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि मानवकेंद्रित विकास यामुळे शेतीची जमीन, जंगलं कमी आणि विरळ होत चालली आहेत, पाण्याचे स्रोत, वृक्षसंपदा कमी होत चालली आहे. पर्यावरणावर आणि नैसर्गिक स्रोतांवर याचा गंभीर परिणाम होतोय. भरपूर पडणारा पाऊस, भरपूर नैसर्गिक स्रोतांची संपन्नता आणि त्यामुळे आलेली संवर्धनाचे प्रत्यक्ष काही उपाय आणि काम करायची शिथिलता, स्वार्थ, बेदरकारपणा, बेसुमार वृक्षतोड, चुकीचे उपाय यामुळे सध्या आपण पाण्याची टंचाई अनुभवतो आहोत. मनुष्यस्वभाव असा की, “तहान लागली की विहीर खणायची” हा वाक्प्रचार खरा करून दाखवायचा चंग बांधलेला. त्यामुळे, कोणी काम करायचं आणि कोणाचं ऐकायचं हे प्रश्न आहेतच.
जरी सध्या अनेक लोक पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण यासाठी काही उपाय सुचवत असले, तरी त्यातले बरेचसे उपाय मानवाला केंद्रस्थानी मानून चाललेत. त्यामुळे ते सर्वसमावेशक होत नाहीत आणि त्यांचा योग्य परिणाम होत नाहीये. तात्पुरती मलमपट्टी करणं चालू आहे. बहुतेक ठिकाणी ‘संरक्षण दुसऱ्याने करावं, मी उपभोग घेईन’ ही मन:स्थिती दिसतेय. या सर्व पार्श्वभूमीवर जलसंधारण करण्यासाठी उपयोगात येत असलेलं देवराईचं महत्त्व खूप उठून दिसतं.
महाराष्ट्राचा विचार केला, तर देवराया सह्याद्रीच्या घाटाच्या दोन्ही बाजूंच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत, असं दिसतं. तसंच सातपुडा डोंगररांगा, यवतमाळ, नांदेड़जवळील आदिवासी भाग, भंडारा, गड़चिरोली वगैरे भाग, जिथे आदिवासी वस्ती आहे, त्या भागात देवराया आढळतात.
मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागांत देवरायांची संकल्पना आढळत नाही किंवा त्याबद्दल काही नोंद नाहीये. आपण जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की ज्या मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भात देवराई ही संकल्पना नाही, तिथे जंगलं कमी आहेत, एकूणच झाडझाडोरा कमी आहे आणि पाण्याचं दुर्भिक्षसुद्धा आहे. म्हणजे, देवराई असलेल्या ठिकाणी पाण्याचे स्रोत चांगले राहतात, किंवा पाण्याचे स्रोत चांगले राहण्यासाठी देवराया राखल्या गेल्या असंही म्हणता येईल.
बहुतांश देवरायांमध्ये पाण्याचा एक तरी स्रोत असतो. अनेकदा तो झरा असेल, काही ठिकाणी विहीर असेल, तलाव किंवा पुष्करणी असेल, काही वेळेला ओढा असेल, क्वचित नदी असेल, पण बहुसंख्य देवारायांमध्ये असा स्रोत आढळतो. खरं तर असाच निष्कर्ष काढावासा वाटतो की देवराई संकल्पना ही पाण्यासाठीच तयार केली गेली असावी. उत्तम राखलेलं जंगल, त्यात लोकांचा फार कमी वावर आणि चांगल्या जंगलामुळे होणारं जलसंधारण आणि मृद्संधारण. राखलेल्या जंगलातून आणि देवराईमधून काहीही बाहेर न नेण्याची प्रथा असल्याने, साठून तिथेच कुजलेला पालापाचोळा, जुने वृक्ष या आणि इतर गोष्टींमुळे होणारं सेंद्रिय पदार्थाचं विघटन, त्यामुळे वाढलेला मातीचा कस आणि वाढलेली जलधारण क्षमता, जोमाने वाढणाऱ्या वनस्पती आणि या सर्वांमुळे त्या भागात वाढलेलं जमिनीतील पाणी हे दृश्य बहुतांश चांगल्या राखलेल्या देवरायांमध्ये बघायला मिळतं.
आजही अनेक देवराया अशा आहेत की गावातल्या विहिरी आटतात, पण गावापेक्षा उंच असलेल्या देवराईमध्ये वर्षभर पाणी मिळतं. कित्येक ठिकाणी संपूर्ण गाव त्या एकाच स्रोतावर अवलंबून असतं.
कोकणात अनेक ठिकाणी देवरायांमध्ये असलेल्या स्रोताचं पाणी गावापर्यंत नेलेलं आढळतं. त्या गावातील लोकांना माहिती असते की जोपर्यंत देवराई आहे तोपर्यंत पाणी मिळणार आहे. त्यामुळे गाव जास्त काळजी घेऊन देवराई संरक्षण करतं. देवराई जर गावापेक्षा उंच ठिकाणी असेल आणि चांगली राखलेली असेल, तर त्या गावातील विहिरी जास्त काळ पाणी देतात असाही अनुभव आहे.
देवराई चांगली राखल्याने, तिथे फारशी वर्दळ नसल्याने आणि पालापाचोळा वगैरे तिथेच राहत असल्याने तिथे पाणी आणि माती उत्तम असतं. जंगल राखल्याने मृद्संधारण आणि जलसंधारण वर्षानुवर्षं होत राहतं. देवराई हा श्रद्धा आणि भावनेचा भाग असल्याने स्थानिक लोकांचा सहभाग असतो आणि त्यामुळे देवराई चांगली जपली जाते. त्यासाठी कुंपण, देखरेख वगैरेची गरज पडत नाही. या गोष्टींवर काही मनुष्यबळ किंवा पैसा खर्च करावा लागत नाही.
अनेक गावांमध्ये, देवराईमधून असलेल्या पाण्याचा स्रोत घडवलेल्या दगडी पाटाने आणि उताराचा वापर करून डोंगरातून गावापर्यंत आणलं गेलंय आणि या पाण्याचा वापर करून गावातील १५०-२०० हेक्टर जमीन बागायतीखाली आणली गेलीय, ज्यातून नारळ, सुपारी, आंबा, फणस, मसाले इत्यादी नगदी पिकं घेतली जात आहेत. काही गावांत भाताचं दुसरं पीक घेतलं जातंय. त्याचप्रमाणे, पिण्याचं पाणीही कोणतीही ऊर्जा खर्च न करता वर्षभर गावाला मिळतंय. आणि हे केवळ देवराई असलेल्या एखाद-दुसऱ्या गावात बघायला मिळतंय असं नाही, तर अशी अनेक उदाहरणं सहज बघायला मिळतात. अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये असा देवराईमधील पाण्याच्या स्रोतांचा उपयोग करून गावाला समृद्धी मिळालेली पाहायला मिळते.
त्यामुळे या देवरायांचा उपयोग जर जलसंधारणासाठी केला, तर स्थालानुरूप उपाय करून, कमी खर्चात, सुयोग्य रितीने जलसंधारण करता येईल. गावामागच्या टेकडीवर किंवा डोंगरावर असलेली देवराई राखायची, तिथलं पाणी पाटाने किंवा पाईपने गावापर्यंत उताराने आणायचं आणि पिण्याचं पाणी आणि बागायतीसाठी, दुसऱ्या पिकासाठी पाणी आणून त्यातून गाव समृद्ध करायचं, अशी सोपी वाटणारी मांडणी. यात लोकसहभाग असल्याने आणि स्थानिक लोकांचा फायदा होत असल्याने हे वर्षानुवर्षं यशस्वीपणे चालू आहे.