देवराया संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकार, उद्योग, सामान्य जनता आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून अनेक चांगल्या गोष्टी करणं शक्य आहे ज्यामुळे हा प्रयत्न शाश्वत होईल. आपण काही उदाहरणं घेऊन याचा विचार करूया.
कोकणात एका गावात दुर्मिळ औषधी वनस्पती गावाजवळच्या देवराईमध्ये मुबलक आढळते. ज्यांना हे माहित होतं असे बरेच लोक, आयुर्वेदिक औषधं तयार करणारे, ती तयार करणाऱ्या लोकांना कच्चा माल पुरवणारे, लोक तिथे जाऊन ती गोळा करत असत. यावर पूर्वी कोणाचाही निर्बंध नव्हता. त्याचा परिणाम असा झाला की ती वनस्पती झपाट्याने कमी व्हायला लागली. हे आम्ही तिथे अभ्यास करायला लागल्यावर आमच्या लक्षात आल्यावर ही गोष्ट आम्ही गावातील लोकांच्या कानावर घालून त्यांना याचं गांभीर्य पटवून दिल्यावर गावकऱ्यांनी आमच्या सूचनेप्रमाणे एक नियम केला. आम्ही त्या देवराईचे चार काल्पनिक विभाग केले. दरवर्षी फक्त एकाच भागातून वनस्पती गोळा करायची, बाकी तीन भागांना हात लावायचा नाही, असा नियम केला. त्याचा परिणाम असा झाला, की तीन वर्षं मानवी हस्तक्षेप नसल्याने तिथे त्या वनस्पतीची वाढ उत्तम व्हायला लागली. आणि त्यामुळे सर्वच घटकांचा फायदा झाला. अर्थात, ही गोष्ट तिथे शक्य झाली कारण तशी परिस्थिती होती. या प्रकारे, प्रत्येक ठिकाणी तिथली परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे उपाय योजना केली तर फायदे नक्की होतो. फक्त, यासाठी त्या देवराईचा पूर्ण अभ्यास केलं पाहिजे, बलस्थानं पाहून त्यांचा वापर केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्थानिक लोकांचा सहभाग प्रत्यक्ष अंमलबजावणीत असला पाहिजे. या गोष्टी पाळल्या तर असे प्रयत्न यशस्वी होतात, हा आमचा अनुभव आहे.
ज्या देवरायांमध्ये पाण्याचे स्त्रोत आहेत, तिथे संरक्षण आणि संवर्धन तुलनेने खूप सोपं असतं. कारण लोकांची गरज मोठी असते आणि ती केवळ देवराई राखून पूर्ण होत असेल, तर स्वार्थासाठी का होईना, पण राखली जाते. अशा अनेक देवराया आपल्याला आढळतील, ज्यातून मिळणाऱ्या पाण्यासाठी त्या लोकांनी खूप चांगल्या राखल्या आहेत.
हे झालं अस्तित्त्वात असलेल्या देवारायांबाबत. पण असं दिसतं की अनेक ठिकाणी देवराया नष्ट झाल्या आहेत किंवा त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा ठिकाणी, जर स्थानिक लोक आणि गाव पातळीवर काम करणारी एखादी जरी स्वयंसेवी संस्था प्रत्यक्ष संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करायला उत्सुक असेल, तर आहे ती देवराई चांगली करणं किंवा त्या भागात चांगला जंगलाचा तुकडा निवडून तो देवराई म्हणून संरक्षित करणं, असे अनेक उपाय करता येणं शक्य आहे. सध्या, लोकपंचायत संस्थेच्या पुढाकाराने सह्याद्रीमध्ये काही गावांमध्ये आम्ही या दृष्टीने काही देवराया निवडून तिथे हे प्रयत्न चालू केले आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की हे काम कठीण आहे, दीर्घकाळ चालणारं आहे, आणि यात स्थानिक लोकांचा सहभाग अनिवार्य आहे. हे लोकांचे प्रयत्न म्हणून प्रत्यक्षात आले तरच यश मिळू शकतं. बाहेरून जाऊन, फक्त सल्ले देऊन हे काम होणं जवळ जवळ अशक्य आहे, हे लक्षात ठेवलं तर नंतर कोणालाच त्रास होणार नाही.
देवराईच का? –
वनव्यवस्थापन करून देवराईचा उपयोग करून घेऊन जैवविविधतेचं संरक्षण करणं तुलनेने सोपं आहे. यात श्रद्धा हा मोठा मुद्दा आहे, ज्यामुळे हे प्रयत्न व्यापक होतील आणि ते लोकसहभागातून असल्याने आर्थिक दृष्ट्या सुद्धा अडचणीचे होणार नाहीत. त्यामुळे ते जास्त काळ चालत राहतील आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसेल.
या सर्व प्रक्रियेमध्ये कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक लोक सहभाग, आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीवरच सर्व प्रयत्नांचं यश अवलंबून आहे. आपण निसर्गाचा केवळ अत्यंत लहान, परावलंबी भाग आहोत आणि आपण गरजेशिवाय सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती वापरत असतो, त्यामुळे आपल्यावर या सर्व गोष्टी टिकवण्याची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊनआणि ठेवून माणसाने जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. या सर्व प्रयत्नांसाठी देवराई आपल्याला मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडणार आहे.