शेअरबाजार

विवेक मराठी    17-May-2018
Total Views |

गुंतवणूकदारांना कंपन्यांमधले आपल्या मालकीचे हिस्से (शेअर्स) एकमेकांना विकता यावेत, यासाठी शेअर बाजाराची कल्पना पुढे आली आणि रुजली. शेअर बाजारात दोन प्रकारचे उपबाजार असतात, प्राथमिक बाजारपेठ आणि दुय्यम बाजारपेठ (Primary market आणि Secondary market). कोणतीही कंपनी, व्यवसाय सुरू करताना प्राथमिक बाजारपेठेतून नव्याने भांडवल उभी करते. हे करण्यासाठी ते IPO (Initial Public Offering) करतात. IPOमधून भांडवल उभं राहिलं की ते शेअर्स दुय्यम बाजारपेठेत विकता-विकत घेता येतात.

कोणताही उद्योगधंदा उभा करण्यासाठी आणि चालवण्यासाठी भांडवलाची गरज असते. छोटे उद्योजक स्वतःच्या बचतीतून किंवा कर्ज काढून भांडवल उभं करतात. मात्र मोठा उद्योग उभा करायचा असेल, तर प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडवल उभं करण्याची गरज असते. हे एकट्यादुकट्याच्या आवाक्याबाहेरचं असतं. हे करता येणं शक्य व्हावं, ह्यासाठी जॉइंट स्टॉक कंपन्यांची व्यवस्था निर्माण झाली. ह्या व्यवस्थेमध्ये कंपनीचे प्रवर्तक (promoters) आपल्याला काय उद्योग उभा करायचा आहे याचा प्रस्ताव लोकांसमोर मांडतात आणि त्या उद्योगासाठी भांडवल देण्याचं लोकांना आवाहन करतात. ज्यांना हा प्रस्ताव पटतो आणि प्रवर्तकांवर विश्वास असतो, ते त्या कंपनीच्या भांडवलाचा एक हिस्सा विकत घेतात. अशा शेकडो-लाखो लोकांनी दिलेल्या भांडवलामधून ती कंपनी उद्योगधंदा उभा करते.

 कंपनीच्या भांडवलातला हिस्सा घेतलेले सर्वच जण कंपनीचे आपापल्या हिश्शापुरते मालक असतात. कंपनीच्या उद्योगधंद्यामधून जो काही नफा होतो, त्याचा हिस्सा (लाभांश) प्रत्येक मालकाला वाटला जातो. अर्थात कंपनीला नफा झाला नाही, तर गुंतवणूकदारांना काही लाभांश मिळत नाही. आणि कंपनी बुडली, गुंडाळावी लागली, तर बहुतांश किंवा सर्वच पैसे बुडायचीही शक्यता असते. म्हणजे कोणत्याही कंपनीचं भागभांडवल विकत घेताना, ती कंपनी खूप नफ्यामध्ये चालली तर लाभांशामधून प्रचंड मोठा आणि सततचा परतावा मिळण्याची शक्यता असते आणि कमी पैसे मिळण्याची किंवा पैसे बुडण्याची जोखीमही असते.

 गुंतवणूकदारांना कंपन्यांमधले आपल्या मालकीचे हिस्से (शेअर्स) एकमेकांना विकता यावेत, यासाठी शेअर बाजाराची कल्पना पुढे आली आणि रुजली. शेअर बाजारात दोन प्रकारचे उपबाजार असतात, प्राथमिक बाजारपेठ आणि दुय्यम बाजारपेठ (Primary market आणि Secondary market). कोणतीही कंपनी, व्यवसाय सुरू करताना प्राथमिक बाजारपेठेतून नव्याने भांडवल उभी करते. हे करण्यासाठी ते IPO (Initial Public Offering) करतात. IPOमधून भांडवल उभं राहिलं की ते शेअर्स दुय्यम बाजारपेठेत विकता-विकत घेता येतात. दुय्यम बाजारपेठेमध्ये गुंतवणूकदार एकमेकांशी व्यवहार करत असतात. (त्या व्यवहारांशी जिचे शेअर्स आहेत त्या कंपनीचा काही थेट संबंध नसतो). मात्र, गुंतवणूकदारांना शेअर बाजारातल्या नोंदणीकृत दलालामार्फतच हे व्यवहार करावे लागतात.

 रोजच्या भाषेत जेव्हा आपण ‘शेअर बाजार’ म्हणतो, तेव्हा आपण दुय्यम बाजाराविषयी बोलत असतो. (यापुढे लेखात मीही शेअर बाजार असाच उल्लेख करणार आहे, हे सगळं दुय्यम बाजाराविषयी आहे!)

 शेअर म्हणजे कंपनीच्या मालकीतला हिस्सा हे आपण बघितलंच. त्या हिश्शामुळे कंपनीच्या नफ्यातला लाभांश मिळत राहतो, हेही बघितलं. ज्या कंपन्या जास्त नफा कमावतात, त्या जास्त लाभांश देतात. त्यामुळे अशा कंपन्यांचे शेअर्स अधिकाधिक लोकांना विकत घ्यावेसे वाटतात. त्यांची मागणी वाढते. गुंतवणूकदार ते त्यांच्या दर्शनी किमतीपेक्षा जास्त किमतीने विकत घ्यायला तयार होतात. यामुळे भरपूर नफा कमावणाऱ्या किंवा कमावतील असं वाटणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढत जातात. ह्याच्या बरोबर उलटं चित्र, पुरेसा नफा न कमावणाऱ्या किंवा तोट्यात असलेल्या कंपन्यांच्या बाबतीत होतं. त्यांच्या शेअर्सच्या किमती कमी होत जातात.

 अर्थात कंपन्यांचा नफा-तोटा, त्या देत असलेला लाभांश हा शेअर्सच्या किमती कमी-जास्त होण्यामधला महत्त्वाचा घटक असला, तरी तेवढा एकच घटक नसतो. अर्थव्यवस्थेची एकूण दिशा आणि अवस्था, त्यावर परिणाम करणारी सरकारची धोरणं, नैसर्गिक सुबत्ता किंवा आपत्ती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि युद्धं अशा अनेक अनेक गोष्टींचा शेअर बाजारावर आणि शेअर्सच्या किमतींच्या चढ-उतारावर परिणाम होत असतो.

 ह्या चढ-उतारांचा वापर करून, कोणतेही शेअर्स कमी किमतीला विकत घेणं आणि जास्त किंमतीला विकणं हा पैसे कमावण्याचा एक मार्ग झाला आहे. हा ‘व्यवसाय’ करणाऱ्यांना ट्रेडर किंवा सटोडिया म्हणतात. हा अत्यंत कायदेशीर मार्ग आहे.  व्यवस्थित अभ्यास करून केला, तर बऱ्यापैकी पैसे कमावता येऊ शकतात. (अभ्यास न करता केला तर पैसे बुडूही शकतात).

 मात्र शेअर बाजारात (किंवा कंपन्यांच्या शेअर्समध्ये) गुंतवणूक म्हणून पैसे घालणं आणि ट्रेडिंग करून पैसे कमावणं ह्या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून शेअर बाजाराचा विचार आणि अभ्यास कसा करायचा, याविषयी पुढच्या लेखामध्ये.

  प्रसाद शिरगावकर

facebook.com/prasad.shir