देवराई – संरक्षण आणि संवर्धनासाठी करायचं काय आणि कोणी?

स्रोत: विवेक मराठी    दिनांक02-May-2018   

देवराईवर प्रतिकूल परिणाम घडवायला कारणीभूत असणाऱ्या घटकांबद्दल आपण आधीच्या लेखात माहिती घेतली. त्यात एक गोष्ट लक्षात आली असेल की जसजसा माणूस आणि निसर्ग यांच्यातील थेट संपर्क, सहवास कमी होत चाललाय, तसतसा पर्यावरण संतुलनावर त्याचा परिणाम होताना दिसतोय. आणि या वाढत चाललेल्या अंतरामुळे माणूस जाणते-अजाणतेपणी स्वत:ला विनाशाकडे ढकलतोय. देवराई ही बहुतांशी सामायिक मालकीच्या किंवा सरकारी जमिनीवर असल्याने, कोणत्याही कारणासाठी जागा हवी असेल तर पहिल्यांदा देवराईवर संक्रांत येते. वाढतं शहरीकरण, उद्योगीकरण, नगदी शेती इत्यादी कारणांमध्ये “पैसा” हा घटक “निसर्ग संतुलन” या घटकाला पूर्णपणे निष्प्रभ ठरवतोय, असा अनुभव येतोय.

मग या लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण आणि संतुलन करणाऱ्या आपल्या समृद्ध परंपरेचं भवितव्य काय आणि त्यासाठी “मी” काय करू शकतो, या दोन मुद्द्यांवर लक्षपूर्वक काम केलं तर त्याचा चांगला परिणाम नक्की दिसून येतो. स्थानिक लोकांच्या सहभागातून हे काम केलं, तर यश लवकर, नक्की आणि शाश्वत मिळतं असा माझा अनुभव आहे.

देवराई या संकल्पनेमध्ये लोकसहभागातून रक्षण केलं जातं. ही पिढ्यानपिढ्या यशस्वीपणे चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे जीवविविधता संरक्षण आणि संवर्धन यासाठी या परंपरेचा उपयोग  करून घेतला, तर यश मिळण्याची जास्त शक्यता आहे.

देवराई वाचवली तर मला मिळणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे कोणते आणि तोडली गेली तर होणारं नुकसान काय, या दोन गोष्टींवर लोकांमध्ये जाणीवजागृती केली आणि योग्य, व्यवहारी पर्याय दिले, तर यात निश्चित लोकसहभाग मिळू शकतो.   

देवराईच्या माध्यमातून जीवविविधता जपण्यासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी या गोष्टी करता येतील -

  • स्वयंसेवीसंस्थांच्या साहाय्याने संरक्षण – 

अनेक स्वयंसेवी संस्था प्रत्यक्ष गावात जाऊन त्यांच्या क्षेत्रात काम करत असतात. अशा संस्थांच्या माध्यमातून, त्यांच्या कामाबरोबरच स्थानिक लोकांच्या सहभागाने देवरायांचं संरक्षण आणि संवर्धन करणं शक्य आहे. जोपर्यंत स्थानिक लोक या प्रकारच्या प्रयत्नांत सहभागी होत असतात, तोपर्यंत हे होऊ शकतं. फक्त, हे खूप अवघड आणि वेळखाऊ काम आहे आणि याला संस्थांच्या (म्हणजे कार्यकर्ते आणि निर्णय घेणारे, अशा दोघांच्या) अंगी बरीच सहनशक्ती असायला हवी. ती असेल आणि लोकांना समजावून सांगू शकलो आणि पटवू शकलो, तर अनेक योजना आणि उपाय करून देवराईचं संरक्षण आणि संवर्धन शक्य होतं, हा माझा अनुभव आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ४५ गावांमध्ये स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभाग यातून देवराई संरक्षण आणि संवर्धन यशस्वीपणे केलं जातंय. यामध्ये, तांत्रिक मार्गदर्शन आणि जाणीवजागृती ही कामं संस्था करते आणि प्रत्यक्ष संरक्षण आणि संवर्धन याचं काम गावकरी करतात. यातून खूप चांगले परिणाम बघायला मिळू शकतात.

सध्या आदिवासींना वन हक्क मिळाल्यानंतर वन व्यवस्थापन करताना, आहे ते जंगल राखण्यासाठी काही भाग देवराई म्हणून राखणं हा एक नवीन प्रयत्न आणि उपक्रम चालू केलाय मुरबाड आणि अकोले अशा आदिवासीबहुल भागांत. त्यात स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभाग असल्याने सुरुवात तर झालीय चांगली. हे कायम चालू राहणं गरजेचं आहे, तरच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

  • स्थानिकलोकांच्या साहाय्याने संरक्षण – 

सरकारी खाती आणि स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकाराने गावपातळीवर देवराई संरक्षण आणि संवर्धन यासाठी वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेऊन काम करून देवराई वाचवता आणि टिकवता येते, हाही अनुभव आहे. विशेषतः जिथे आदिवासी लोकांना वन हक्क मिळाले आहेत, तिथे या पद्धतीने काम करणं सोपं आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सुमारे १५ गावांमध्ये जंगल वाचवण्याचं काम चालू आहे. या भागात लोकांनी सामायिक मालकीची जंगल असलेली काही जमीन वेगळी करून ती देवराई म्हणून जपायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, ‘पूर्वी देवराई होती, ती तुटली, आता काय करू?’ असं विचारत बसण्यापेक्षा, आहे ते जंगल देवराई म्हणून संरक्षित करायला या आदिवासी गावकऱ्यांनी सुरुवात केली आहे. याचा अर्थ हा की, जिथे लोकांना निसर्ग, पर्यावरण याचं महत्त्व कळतं, आपलं त्यावर अवलंबून असलेलं अस्तित्व कळतं, तिथे ते पुढाकार घेऊन काम करायला सुरुवात करतात. अशा वेळी गरज असते ती तांत्रिक मदतीची आणि जाणकार व्यक्तीने पुढे होऊन मार्गदर्शन करण्याची.

 

  • देवराईभोवतीवृक्ष लागवड करून दैनंदिन वापरासाठी त्याचा वापर करणं – 

जिथे सरपण, औषधी वनस्पती किंवा इतर कारणांसाठी गावकरी देवराईवर आणि जंगलावर अवलंबून असतात, तिथे देवराई संरक्षित करण्यासाठी आम्ही हा उपाय करून त्याचे उत्तम परिणाम अनुभवले आहेत. देवराईच्या बाहेरचा जमिनीचा पट्टा हा “बफर झोन” म्हणून लोकांना आवश्यक झाडांची लागवड करून संरक्षित केला की देवराई आपोआप संरक्षित होते. लोकांच्या वर उल्लेखलेल्या गरजा देवराईमध्ये न जाताच पूर्ण होतात आणि देवराईमध्ये लोकांचा वावर कमी होतो आणि ते देवराईच्या वाढीला पोषक ठरतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, यातून स्थानिक लोकांना काही प्रमाणात अर्थार्जन होत असल्याने आणि गरजा सहज भागत असल्याने, हा संरक्षित पट्टा आणि देवराई या दोन्ही गोष्टी जपल्या जातात.

  • नैसर्गिकरोपवाटिका म्हणून देवराईचा वापर करणं – 

देवराईमध्ये असंही पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर रोपं तयार होतात, पण प्रकाश आणि पाणी यासाठी मोठ्या झाडांशी स्पर्धा करू न शकल्याने ती मरून जातात. ही रोपं तिथून काढून जर बाहेर परत लावून वाढवली, तर फायदा होतो. आपल्याला देशी प्रजातींची तयार रोपं कमी वेळात आणि कमी खर्चात मिळतात आणि देवराईमधील असल्याने ती सशक्त असतात. जंगलातील उघडा पडलेला भाग किंवा रस्ता रुंदीकरण केल्यानंतर दोन्ही बाजूंना लावण्यासाठी या रोपांचा उपयोग करणं फायदेशीर आहे.

  • स्थानिक  देवरायांचा गावातील अर्थाकरणाशी संबंध जोडणं –

जिथे देवराईमुळे वर्षभर मुबलक पाणी मिळतं, तिथे ती वाचवली जातेच. त्याव्यतिरिक्त, देवराया आणि गावातील अर्थकारण यांचं संबंध जोडला गेला तर स्थानिक लोकांना त्या देवराया टिकवून त्यामधून आर्थिक फायदा मिळेल आणि त्या कारणाने यांचं संवर्धन होईल. निसर्ग पर्यटन, पक्षी आणि वृक्ष निरीक्षण यासारख्या पर्यायांचा विचार होणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी काही गावांमध्ये प्रत्यक्षात आल्या आहेत आणि लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनत आहेत. यात तरुणांना जंगलात मार्गदर्शक म्हणून आणि महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पर्यटकांच्या जेवणाची आणि राहण्याची सुविधा पुरवून अर्थार्जन करणं शक्य आहे.


पण या सर्व गोष्टी स्थलानुरूप आहेत आणि ज्या गावात क्रियाशील लोक आहेत, तिथेच शक्य आहेत. त्यामुळे अजूनही बऱ्याच प्रमाणात प्रायोगिक अवस्थेत आहेत आणि त्यावर काम करण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हे नक्की करता येईल.

देवराया संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकार, उद्योग, सामान्य जनता आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून काय करणं शक्य आहे, हे पुढच्या भागात पाहू या.

डॉ. उमेश मुंडल्ये