देवराई – लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन

विवेक मराठी    29-May-2018   
Total Views |

देवराई ही संकल्पना परत जागवून आपण लोकसहभागातून जैवविविधता, माती, पाणी, हवा या सर्व घटकांच्या दर्जामध्ये सुधारणा करून पर्यावरण संतुलन साधू शकतो. हे करायला खरंतर उशीरच झालाय पण अजूनही वेळ पूर्णपणे गेली नाहीये हातातून.

एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू ठेवायची असेल तर ती लोकांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग झाली पाहिजे या गोष्टीची जाण आपल्या शहाण्या पूर्वजांना असावी. त्यांनी निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचं संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी, इत्यादि गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "देवराई". 

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोड केली जात नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचे जंगल आहे त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांच संरक्षण केलं जातं. देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांच रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे.

पण ही देवराई तिथे किती काळापासून असावी याबद्दल कोणी नक्की काही सांगू शकत नाही. तिथल्या वृक्षांच्या वयावरून याबद्दल केवळ एक अंदाज बांधता येतो.

पण, यात एक आशादायक चित्र सह्याद्रीमध्ये फिरताना हरिश्चंद्र गडाच्या परिसरात समोर आलं. या आहेत वाघ्याच्या देवराया! एका दगडावर वाघाचं चित्र कोरलेलं आहे आणि त्याची पूजा होते आहे अशी स्थानं. आदिवासींमध्ये अशी पद्धत आहे, की प्रत्येक पिढीचा एक वाघ्याचा दगड बसवला जातो. नवीन पिढी, नवीन दगड. साधारणपणे, ३० वर्षांच्या अंतराने नवीन दगड बसवला जातो. म्हणजे, एका पिढीचं अंतर ३० वर्षं धरलं जातं.

आता, यावरून आपण तो वाघ्याचा दगड ज्या देवराईमध्ये आहे त्या देवराईचा किमान कालावधी तरी नक्की सांगू शकतो. या भटकंतीमध्ये मी एका ठिकाणी वाघ्याचे १७ दगड बसवलेले पहिले.

याचा अर्थ, ती देवराई त्या आदिवासी समाजाकडून गेली ५०० वर्षं तरी जपली जाते आहे असं गणित आपण मांडू शकतो. (३० वर्षं x १७ दगड)

 

याचाच अर्थ असा होतो की, आदिवासी भागांमध्ये निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडं, इत्यादि गोष्टींना देव मानून जपायची परंपरा या भागात किमान ५०० वर्ष तरी आहे याची ही नोंद आहे. आणि हे विलक्षण आहे.

जी पर्यावरण साक्षरता आणि प्रत्यक्ष काम करायची तयारी आदिवासी भागांमध्ये सध्या बघायला मिळते आहे, तेवढ्या प्रमाणात आणि तीव्रतेने साक्षर शहरी भागांत बघायला नाही मिळत. शहरांत चर्चेची गुर्हाळं जास्त चालवली जातात. इथे घडणारी प्रत्येक गोष्ट, अगदी पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, जल संवर्धन, इत्यादि, ही मनुष्य केंद्रित आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट करताना, त्यातून मला काय मिळणार आहे यावर आधी भर दिला जातो आणि त्याप्रमाणे काम केलं जातं, मग भले त्या कामाचा काहीही फायदा झाला नाही तरी चालतो लोकांना. बरेचदा हे सर्व मानसिक समाधानासाठी चाललं असतं आणि माणूस स्वत:लाच फसवत असतो असं दिसून येतं.

माझं संशोधन कार्य चालू असल्यापासूनच कोकणात साधारण १९९८ पासून तिथे लोकसहभागातून देवराई संरक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न यशस्वीपणे करणाऱ्या “Applied Environmental Research Foundation” या स्वयंसेवी संस्थेबरोबर मी सुरुवातीच्या काळात काम करत होतो. तिथेही, काम करताना लोकांना या संकल्पनेचं महत्त्व समजावून सांगणं ही पाहिली पायरी होती. आणि मग त्यानंतर, देवराई संरक्षण आणि संवर्धन गावाला आर्थिक फायदा कसा मिळवून देऊ शकतं हे लोकांना सांगणं ही दुसरी पायरी होती. आम्ही लोकांना “देवराई वाचवाल तर आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक फायदे मिळवू शकाल” हे सप्रमाण सांगून त्यांचा सहभाग देवराई संरक्षण आणि संवर्धन यात कसा मिळेल याची खात्री करून घेत होतो. याप्रकारे, त्यावेळी अंदाजे ४५ गावांमध्ये काम चालू होतं.

जिथे देवराई पासून फायदा मिळतो आणि गाव देवराईवर अवलंबून आहे, विशेषत: पाण्यासाठी, तिथे लोक हे सांभाळतात. पण, जिथे अशी परिस्थिती नाही, तिथे देवराई संकटाशी सामना करते आहे. लोकांना तात्कालीक फायद्यांमध्ये जास्त रस निर्माण झालाय, शहरीकरणाच्या अर्धवट संकल्पनांमुळे आहे त्या गोष्टींची किंमत राहिली नाहीये आणि गरज नसलेल्या गोष्टींच्या पाठी माणूस लागलाय, ही वस्तुस्थिती आहे. शहरी, निमशहरी भागांत हे विशेष जाणवतं. आता हे लोण खेड्यांमध्येसुद्धा पोहोचायला लागलं आहे. आणि ही अत्यंत गंभीर बाब झाली आहे.     

पण सुदैवाने, ज्या भागांत अजूनही जंगल आहे आणि वन हक्क कायद्यांतर्गत गावाच्या आजूबाजूच्या जंगलांचे हक्क स्थानिक गावकऱ्यांना दिले गेले आहेत, तिथे मात्र अनेक लोक आणि संस्था विचार करून काम करायला लागले आहेत.

गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुरबाड मधल्या दुर्गापुर गावात "गांव तिथे देवराई" प्रकल्पांतर्गत सामूहिक मालकीच्या जमिनीवर जंगल तयार करण्यासाठी खड्डे करणं,  झाडं लावणं, या गोष्टींच्या मदतीसाठी जाऊन आल्यावर ५ तारखेला जागतिक वन दिनाप्रित्यर्थ "हिरव्या देवाची यात्रा" साजरी करण्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याची संधी मिळाली आणि हा अप्रतिम अनुभव गाठीशी आला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, श्रमिक मुक्ती संघटना, वन निकेतन या संस्थांच्या पुढाकाराने आणि लोकांच्या सहभागातून मुरबाडजवळच्या गावांमधे गेली ५ वर्षं ही यात्रा साजरी केली जाते. यात वन विभाग आणि शहरात राहणारे आणि निसर्ग संवर्धानासाठी काम करणारे लोक मोठ्या प्रमाणावर सामील होतात. मुरबाड तालुक्यात, आपल्या गावात स्वत:चं एक राखीव जंगल हवं म्हणून "गाव तिथे देवराई" या प्रकल्पांतर्गत १२ गावांनी काही सामूहिक मालकीचं क्षेत्र राखीव ठेवून जंगल वाढवायला सुरूवात केली आहे.

असंच काम करायचा प्रयत्न नगर जिल्ह्यातील अकोले भागात काम करणारी लोकपंचायत ही संस्थाही करत आहे. त्या भागात सह्याद्रीच्या काही दुर्गम ठिकाणी असलेल्या गावांमध्ये असलेल्या देवराया जपणं, तोड होत असलेल्या किंवा झालेल्या देवराया वाचवणं, त्यांची राखण करून, गरज तिथे परत हिरवाई वाढवून त्या देवराया परत चांगल्या अवस्थेत आणणं, यासाठी स्थानिक लोकांच्या सहभागातून तिथे आम्ही देवराई संरक्षण आणि संवर्धन करायचा प्रयत्न करत आहोत. या सर्व प्रयत्नांत स्थानिक आदिवासी जनता डोळसपणे आणि उत्साहाने सहभागी होत आहे.

अशा निसर्ग संरक्षण आणि संवर्धन उपाययोजनांमधे लोकसहभाग हा कळीचा मुद्दा असतो. या कामात जेवढे जास्त लोक सहभागी होतील तितके गैरप्रकार कमी आणि जबाबदारीचं आणि कामाचं विकेन्द्रीकरण करणं सोपं असा अनुभव आहे.

पाणी, शेती आणि पर्यावरण या क्षेत्रात काम करताना सर्वसामान्य नागरिक, सरकारी कर्मचारी, स्वयंसेवी संघटना, अनुभवी तज्ञ आणि माध्यमं यांनी एकत्र काम केलं तर यश मिळण्याचं प्रमाण खूप वाढू शकतं.     

अशा गोष्टी बघायला आणि अभ्यासायला मिळाल्या की आपल्या पूर्वजांच्या शहाणपणावर असलेला विश्वास आणखी वृद्धिंगत होतो. देवराई ही संकल्पना परत जागवून आपण लोकसहभागातून जैवविविधता, माती, पाणी, हवा या सर्व घटकांच्या दर्जामध्ये सुधारणा करून पर्यावरण संतुलन साधू शकतो. हे करायला खरंतर उशीरच झालाय पण अजूनही वेळ पूर्णपणे गेली नाहीये हातातून.

चला, एकत्र येऊया, आणि या पारंपारिक पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या संकल्पनेला दृढ करूया. आपलं, आपल्या पुढच्या पिढ्यांचं आणि या वसुंधरेचं भवितव्य सुरक्षित करूया.

डॉ. उमेश मुंडल्ये