देवराई -  महत्त्व आणि उपयोग

विवेक मराठी    13-Jun-2018   
Total Views |

आपल्याला लागणारा प्राणवायू आणि अन्न, पाणी तयार करू शकत नाही, या गोष्टींसाठी मानवाला कायमच निसर्गावर अवलंबून राहावं लागणार आहे याची जाणीव ठेवून विकास करावा लागणार आहे. एक समाज म्हणून आपल्याला जर सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर आपण जे काही करतो आहोत त्यात पर्यावरण समतोल राखायचा शिस्तशीर प्रयत्न असेल, एक सर्वमान्य पध्दत असेल जी सगळे रोजच्या जगण्यामध्ये सहज पाळू शकतील, अशा प्रकारच्या संरक्षण आणि संवर्धन उपायांचा विचार करून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक पध्दत आखून घ्यावी लागेल आणि ती पाळावी लागेल.

आपण आतापर्यंतच्या आठ लेखांमधून 'देवराई' या परंपरेविषयी शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती घेतली. जरी ही परंपरा कित्येक शतकं अस्तित्वात असली आणि देशभर पसरलेली असली, तरी गेल्या काही दशकांतील वेगाने घडणाऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे आणि वाढत्या यांत्रिकीकरणानंतर निर्माण झालेल्या माणूस आणि पर्यावरण यातल्या अंतरामुळे या परंपरेवर प्रतिकूल परिणाम व्हायला सुरुवात झाली, हे आपल्या लक्षात येईल.

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोड होत नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढयानपिढया सांभाळल्या जातात. हे देवाचं जंगल आहे, त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांचं संरक्षण केलं जातं. देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांच रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे.

परंतु, केवळ ही आपली परंपरा आहे, आपण परंपरेच्या आधारे लोकसहभागातून इतकी वर्षं हे जंगल, जीवविविधता आणि एकूणच पर्यावरण चांगल्या प्रकारे जपलंय, अशा गैरसमजात राहून त्याचा काहीच फायदा होणार नाही - किंबहुना त्यामुळे बहुसंख्य लोकांमध्ये निर्माण झालेली बेफिकिरी, जाणिवेचा अभाव आणि त्यामुळे वाढत चाललेली निष्क्रियता या गोष्टी वाढत जाऊन 'देवराई'चं आणि पर्यायाने आपलं, कायमस्वरूपी नुकसान होण्याचीच वेळ जवळ येत आहे.

लोकसहभागातून एखादी गोष्ट, परंपरा जपणं यामागे एक विचार असतो. जर एखादी गोष्ट, जिचा कदाचित थेट फायदा होत असल्याचं दिसून येत नाही पण ती टिकणं सर्वांच्याच दूरगामी फायद्यासाठी आवश्यक असतं, तिचं संरक्षण आणि संवर्धन सोप्या पध्दतीने आणि सर्वव्यापी व्हावं अशी इच्छा असेल, तर ती जपण्याची पध्दत ही सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग होणं आवश्यक असतं. त्यामुळे, कोणा एका घटकावर त्याचा भार पडत नाही आणि बहुसंख्य लोक त्या प्रक्रियेत सहभागी असल्याने शाश्वत यश मिळणं शक्य होतं. आणि हीच गोष्ट आपल्या शहाण्या पूर्वजांनी ओळखली, जपली आणि त्याचा परिणाम म्हणजे राखलेल्या देवराया!

 

सध्या, अचानक निर्माण झालेल्या जाणिवेमुळे सर्वसामान्य लोक आणि सरकार हिरवाई वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करतायत. पण, साकल्याने विचार होत नसल्याने असेल कदाचित, सध्या योजले जात असलेले उपाय प्रश्न सोडवण्याऐवजी, प्रश्न गंभीर होण्यासाठी कारण ठरत आहेत. उदा. हिरवाई वाढवण्यासाठी 'वृक्षलागवड' ही योजना आखली गेली. पण त्यात प्रजाती ठरवताना त्या माणसाच्या थेट आर्थिक फायद्याच्या कोणत्या, याचाच विचार झाला आणि पर्यावरण संतुलन हा विषय बाजूलाच राहिला. सध्या अस्तित्वात असलेली मिश्रवनं निरुपयोगी समजून ती तोडून तिथे पैसे देणाऱ्या झाडांची लागवड केली जातेय आणि सरकार विविध सवलती आणि योजनांद्वारे त्याला पाठिंबा देत आहे. यात पर्यावरण संतुलन कुठेच विचारात घेतलं जात नाहीये. फक्त वृक्षलागवड हा काही योग्य आणि पुरेसा उपाय नाही. जर पर्यावरण संवर्धन यशस्वी करायचं असेल, तर केवळ वृक्षलागवड न करता जंगलाचे लहान-मोठे पट्टे किंवा तुकडे तयार करणं आवश्यक आहे. जंगल तयार होताना त्यात फक्त वृक्ष नसतात, तर जमिनीखाली असलेले कंद, जमिनीवर वाढणाऱ्या वेली, गवताचे शेकडो प्रकार, लहान झुडपं, मोठी झुडपं, लहान, मध्यम आणि मोठे वृक्ष, त्यावर वाढणाऱ्या वेली आणि इतर प्रजाती इत्यादी गोष्टी असतात. अशा प्रकारची वाढ होत असताना तिथे साहचर्य असणारं प्राणिजीवन फुलत जातं. हे झालं की त्या भागातील मातीचंही संधारण होतं आणि पाण्याचंही संधारण होतं. फक्त वृक्षलागवड केल्यावर या गोष्टी होत नाहीत. हे लक्षात न घेतल्याने आणि फक्त माणसाला पैसे देणाऱ्या प्रजातींची लागवड केल्याने त्या भागातील जीवविविधता आणखी कमी होत चाललीय.

सध्या वेगात आणि जोशात चालू असलेली जलसंधारणाची अनेक कामंसुध्दा आपल्या पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम घडवत आहेत. ज्या कामांमध्ये मातीची खूप उलथापालथ केली जाते, जमिनीच्या स्वरूपामध्ये आणि चढ-उतारांमध्ये बदल केले जातात, पाण्याच्या स्रोतांच्या नैसर्गिक उतारांमध्ये बदल केले जातात, स्थलानुरूप काम न होता सगळीकडे एकाच प्रकारचे उपाय केले जातात, तिथे आज ना उद्या पर्यावरणाचे खूप गंभीर प्रश्न उद्भवणार आहेत अशी भीती वाटते. केवळ तात्कालिक संभाव्य फायद्याचा विचार करून किंवा अतिउत्साहापोटी किंवा भीतीपोटी अनेक उपायांचं अंधानुकरण केलं जातं आणि त्याचा परिणाम समोर येतो तेव्हा तो बरेचदा कायमस्वरूपी नुकसान हाच असतो, असा अनुभव आहे. कोणत्याही समस्येचं आणि त्याच्या उपायांचं सुलभीकरण करणं आणि सर्वांगीण विचार न करता केवळ तोच प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणं आणि त्यातून अनेक नवीन प्रश्न तयार करणं, ही कामाची होत चाललेली पध्दत हाच सध्या आपल्यापुढचा सर्वात अवघड प्रश्न आहे.

आपण निसर्ग, पर्यावरण आणि त्यातील माणूस सोडून बाकीचे घटक यांच्याकडे किती बेदरकारपणे दुर्लक्ष करतो, याचा अगदी साधा अनुभव म्हणजे पाण्याच्या सर्व स्रोतांबाबत असलेलं आपलं एकूणच वागणं आणि असलेला दृष्टीकोन. नाले (नैसर्गिक), ओढे, तलाव, नद्या या पाण्याच्या स्रोतांकडे आपण कमालीच्या उदासीनतेने पाहत आहोत. वाहणारं पाणी हे केवळ माणसाच्या उपयोगासाठी आहे आणि तो त्याचा वापर हवा तसा, हवा तिथे करू शकतो, त्यात काहीही बदल करू शकतो, हे विचार एवढया सहजपणे आपल्या मनात येतात की त्यात आपल्याला काहीच चुकीचं वाटत नाही. खरं तर पाण्याचा कोणताही स्रोत ही एक स्वतंत्र जीवसंस्था असते, त्याचे घटक असतात, पर्यावरण संतुलन प्रक्रियेत त्या प्रत्येकाचा सहभाग असतो. पण आपण हे सर्व निकालात काढतो आणि पाण्याचे स्रोत म्हणजे 'फक्त माणसाला पाणी पुरवण्याची सोय' याचं दृष्टीकोनातून आपले सगळे उपाय योजतो. दुर्दैवाची गोष्ट ही की ज्या स्रोतांमधून आपण पिण्यासाठी, शेतीसाठी आणि वापरासाठी पाणी घेतो, त्याच स्रोतांमध्ये आपण सांडपाणी सोडतो, कचरा टाकतो आणि त्या स्रोतांना बकाल करून टाकतो. हे दृश्य अगदी गावोगाव दिसतं आणि त्यात फार कोणाला काही वाईट वाटतंय असंही माणसाच्या कृतीतून दिसत नाही. जसजसा विकास, प्रगती होते आहे, तसतसा पर्यावरणाकडे बघण्याचा बहुसंख्य लोकांचा दृष्टीकोन बेफिकिरीचा, अज्ञानपूर्ण आणि कमालीचा स्वार्थी होताना दिसतो आहे. आणि ही माणसासाठी धोक्याची घंटा आहे.

आपण केवळ एक ग्राहक आहोत, कारण आपण आपल्याला लागणारा प्राणवायू आणि अन्न, पाणी तयार करू शकत नाही, या गोष्टींसाठी मानवाला कायमच निसर्गावर अवलंबून राहावं लागणार आहे याची जाणीव ठेवून विकास करावा लागणार आहे. एक समाज म्हणून आपल्याला जर सकारात्मक बदल घडवायचा असेल, आपल्या पुढच्या पिढयांच्या हातात काही चांगल्या गोष्टी द्यायच्या असतील, तर आपण जे काही करतो आहोत त्यात पर्यावरण समतोल राखायचा शिस्तशीर प्रयत्न असेल, एक सर्वमान्य पध्दत असेल जी सगळे (अगदी प्रत्येक सामान्य माणूस) रोजच्या जगण्यामध्ये सहज पाळू शकतील, अशा प्रकारच्या संरक्षण आणि संवर्धन उपायांचा विचार करून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक पध्दत आखून घ्यावी लागेल आणि ती पाळावी लागेल. पर्यावरणस्नेही जीवनपध्दती म्हणजे काही फार जगावेगळी गोष्ट नसून ते आपल्या आणि आपल्या येणाऱ्या पिढयांच्या अस्तित्वासाठी, चांगल्या आणि निरोगी भवितव्यासाठी आवश्यक उपाय आहे, हे लक्षात घेऊन काम करायची गरज आहे, आणि ती सर्वांनाच आहे.

अशी पर्यावरण स्नेही जीवनपध्दती म्हणजे काय, आपल्या रोजच्या जीवनात आपण विकास/प्रगती आणि पर्यावरण संतुलन/संरक्षण/संवर्धन कसं करू शकतो, यासाठी एक आदर्श म्हणून 'देवराई' आपल्याला नेहमीच उपयोगी पडणार आहे. गरज आहे ती प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण संतुलित प्रयत्नांची आणि व्यापक लोकसहभागाची.

या लेखमालेद्वारे 'देवराई' या संकल्पनेबाबत मला वाचकांपर्यंत माहिती पोहोचवता आली, त्याबद्दल अतिशय आनंद झाला आहे. वाचकांनी मोठया संख्येने दूरध्वनी आणि मेसेजद्वारे संपर्क साधून आपल्या अनेक शंकांचं निरसन करून घेतलं आहे आणि ही प्रक्रिया अशीच पुढेही चालूच राहील याची मला खात्री वाटते. दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे आभार आणि ही लेखमाला लिहिण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल 'साप्ताहिक विवेक टीम' आणि विशेषत: अश्विनी मयेकर आणि माझी सहकारी रूपाली देशिंगकर या सर्वांना धन्यवाद!

परत भेटू या, विषय तोच, दृष्टीकोन वेगळा घेऊन!

धन्यवाद!