गौरव एका योग्याचा

विवेक मराठी    30-Jun-2018
Total Views |

 

डॉ. विश्वासराव मंडलिक 1985 साली आपल्या व्यवसायातून निवृत्ती घेत, त्यांनी योगप्रसाराच्या कार्यास स्वत:च्या आयुष्याचे ध्येय बनविले. आज योगाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील सर्वांत मोठया संस्थांमध्ये योग विद्याधामचे नाव घेतले जाते. केंद्र सरकारकडून 2018 सालासाठी योग विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. मंडलिक यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेणारा हा लेख.

सन 2018 सालच्या योगदिनाचे औचित्य साधून देशभरातच नव्हे, तर जगभरात योगाच्या प्रसाराचे कार्य करणाऱ्या एका अवलियाचा सन्मान पंतप्रधान पुरस्काराने करण्यात आला. दिल्ली येथे पार पडलेल्या सोहळयात पंचवीस लाख रुपये, मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून डॉ. विश्वासराव मंडलिक यांना गौरविण्यात आले. देशभरातून आलेल्या 186 नामांकनांतून या पुरस्कारासाठी डॉ. मंडलिक यांची व्यक्तिगत (राष्ट्रीय) श्रेणीत, तर या वर्षी शंभरी गाठणाऱ्या मुंबईच्या 'द योगा इन्स्टिटयूट'ची संघटना (राष्ट्रीय) श्रेणीत निवड झाली. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे पुरस्कारार्थी निवडीच्या अटी व शर्ती ठरविण्यात आल्या होत्या. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव, परराष्ट्र सचिव, सचिव - आयुष मंत्रालय यांच्या समितीने अर्जांची छाननी करून मंत्रालयाच्या अटींच्या शर्तींच्या अधीन राहून ही निवड केली. संस्थांच्या सध्या केंद्रात असलेल्या सरकारचे योगासारख्या विषयाचे धोरण, शास्त्रीयदृष्टया जगाला असणारी गरज आणि डॉ. मंडलिकांनी केलेल्या कार्यामुळे योगाकडे आकर्षित झालेली पिढी या पार्श्वभूमीवर डॉ. मंडलिक यांनी केलेल्या कार्याचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

1944 साली नाशिकमध्ये विश्वासरावांचा जन्म झाला. सी.ओ.इ.पी.सारख्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी विद्यालयातून विद्युत शाखेत पदवी प्राप्त केल्यानंतर ओघानेच त्यांना व्होल्टास ट्रान्सफॉर्मर्स या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून नोकरी मिळाली. या कंपनीत एक तप काम केल्यानंतर त्यांनी 1978 साली याच क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय नाशकात चालू केला, ज्याचा पुढे पुण्यातही विस्तार झाला. याच वर्षी त्यांनी स्वत:च्या व्यवसायासोबत योग विद्याधाम स्थापन केले व दैनंदिन कामांव्यतिरिक्त सकाळचा आणि सायंकाळचा वेळ योगासाठी देण्यास सुरुवात केली. पुढे 1983 साली योगशिक्षणासाठी त्यांनी योग विद्या गुरुकुल स्थापन केले.

1985 साली आपल्या व्यवसायातून निवृत्ती घेत, त्यांनी योगप्रसाराच्या कार्यास स्वत:च्या आयुष्याचे ध्येय बनविले. आज योगाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील सर्वांत मोठया संस्थांमध्ये योग विद्याधामचे नाव घेतले जाते. एकटया महाराष्ट्रात या संस्थेच्या 160 शाखा असून कर्नाटकात 5, पूर्व भारतात 7 आणि सिंगापूर, इटली, थायलंड, कझाकस्थान, हाँगकाँग, ऑॅस्ट्रेलिया, आयर्लंड या देशांत योग विद्याधामची 15 केंद्रे आहेत. आजवर या केंद्रांतून एकूण 3 लाखांहून अधिक साधकांनी 'योग प्रवेश' अभ्यासक्रमांतर्गत योगाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले असून 20 हजार योग शिक्षक योग विद्याधामने घडविले आहेत, ते जगभरात योगप्रसाराचे कार्य करत आहेत. डॉ. मंडलिकांनी 42 पुस्तके लिहिली असून 300 ऑॅडिओ सीडीजच्या/कॅसेट्सच्या माध्यमातूनही योगाच्या प्रसाराचे काम केले आहे. गेल्या 30 वर्षांपासून सलग प्रकाशित होणाऱ्या 'योग सुगंध' मासिकाचे संपादक म्हणून ते आजही जबाबदारी पार पाडत आहे.

योग विद्या गुरुकुलचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असताना डॉक्टरांनी आजवर पाठदुखी, अंगदुखी, स्पाँडिलायसिस, दमा, डायबेटिस, हृदयरोग, अतिताण, रक्तदाब, पचन विकार, सांधेदुखी, मनोविकार यांसारख्या असंख्य आजारांनी पीडित सुमारे 30 हजार रुग्ण योग चिकित्सा पध्दतीने बरे केले आहेत. आज नाशिकमध्ये योग विद्याधामच्या माध्यमातून 50 व 25 खाटांची दोन उपचार केंद्रे यशस्वीपणे राबविली जात आहेत. वयाच्या पंचाहत्तरीच्या टप्प्यावर पोहोचत असतानाही डॉ. विश्वास मंडलिक देशभर योगाचे महत्त्व सांगण्यासाठी कार्यक्रमांना हजेरी लावतात, व्याख्याने देतात, कार्यशाळा घेतात.

 विविध विद्यापीठांतील डॉक्टरांचे कार्य

  1. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ -

विद्यापीठाच्या योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या रचनेप्रसंगी डॉ. मंडलिक यांची कार्यक्रम सल्लागार समितीच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली होती. या अभ्यासक्रमासाठी त्यांनी 4 पुस्तके लिहिली, ज्यांना विद्यापीठाने मान्यता दिली. विद्यापीठाच्या वरिष्ठ मूल्यमापन समितीतही त्यांनी काम केले. एम.फिल. या अभ्यासक्रमाच्या योग विषयाचे पेपर सेटर म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.

  1. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ -

योग विज्ञान अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट कोर्स व पदविका अभ्यासक्रम यांच्या रचनेत त्यांनी योगतज्ज्ञ म्हणून काम पाहिले. योग प्रवेश, योग परिचय व योग शिक्षक ही त्यांनी लिहिलेली तीन पुस्तके विद्यापीठात मान्यताप्राप्त आहेत.

  1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ -

सर्टिफिकेट कोर्स इन योगा ऍंड नेचारोपॅथी, डिप्लोमा इन योगा ऍंड नेचारोपॅथी, डिग्री कोर्स इन योगा ऍंड नेचारोपॅथी, पोस्ट गॅ्रज्युएशन इन योगा ऍंड नेचारोपॅथी या चार अभ्यासक्रमांची रचना करणाऱ्या समितीचेही डॉक्टर सदस्य होते. ते विद्यापीठाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचेही सदस्य होते.

  1. कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ नागपूर -

या विद्यापीठाने स्टडी ग्रूपच्या सदस्यपदी डॉक्टरांची नेमणूक केली, ज्याच्या माध्यमातून त्यांनी योग विषयातील पदविका, पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना मान्यता दिली.

आंतरराष्ट्रीय योग महोत्सव

डॉ.विश्वास मंडलिकांच्या संकल्पनेतून मागील दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग महोत्सव राबविला जात असून या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवावरील लेखाचा अंतर्भाव िववेकच्या नोव्हेंबर 2017च्या अंकात करण्यात आला होता. त्यातील परदेशी साधकांचे या महोत्सवाबद्दल व योगसाधनेबद्दलचे अनुभव वाचनीय होते. 32 देशांतील 172 साधक या महोत्सवात सहभागी झाले होते. या संख्यात्मक नोंदीवरून महोत्सवाचा आवाका लक्षात येतो. यांपैकी बहुतांश जण आपापल्या देशात योगा शिकविण्याचे काम आधीपासूनच करत आहेत. त्याअर्थी, या कार्यक्रमास 'योगशिक्षकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन' म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

  डॉक्टरांना मिळालेले पुरस्कार व सन्मान

  1. रोविंगमध्ये व बोटिंगमध्ये राष्ट्रीय पदक
  2. प्रतिष्ठित अशी 'सिनियर चॅम्पियनशिप' कॉलेज जीवनात प्राप्त
  3. के.एल. मुनोत अमृत महोत्सव समितीचा जीवनगौरव पुरस्कार 1992 साली पुणे येथे
  4. कैलास मठ नाशिकतर्फे 1993 साली सरस्वती पुरस्कार
  5. रोटरी क्लबचा आदर्श पुरस्कार - 1996
  6. सी न्यूज नाशिकचा नाशिक गौरव सन्मान 2003 साली
  7. परमहंस निराजानंद सरस्वती यांच्यातर्फे 2003 साली योगाचार्य पुरस्कार
  8. पतंजली योग केंद्राचा योग रत्न पुरस्कार - 2005
  9. नाशिक महानगर पालिकेचा लोक कल्याण पुरस्कार योग गौरव पुरस्कार - 2007
  10. एज्युकेशन सोसायटी अंबरनाथतर्फे दधिची पुरस्कार - 2007

 अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणारा पुरस्कार

योगप्रसाराच्या माझ्या कार्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान पुरस्कार जाहीर झाला त्याचा नक्कीच आनंद आहे. आमची संस्था विद्याधाम करत असलेल्या कार्याची सरकारने दखल घेतली असून त्यात आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आम्ही हे कार्य कधीच व्यवसाय म्हणून केले नाही, तर समाजसेवा म्हणून केले होते. याआधी या कामाची कोणत्याही सरकारकडून फारशी दखल घेतली गेली नव्हती. या पुरस्काराने योगाभ्यासाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.

डॉ. विश्वासराव मंडलिक