मोहनदासचा महात्मा करणारा अद्भुत प्रवास

विवेक मराठी    04-Jun-2018   
Total Views |

 महात्मा आकाशातून जमिनीवर येत नसतो, जमिनीतून तो अवकाशाला गवसणी घालणारा होतो. 7 जून 1893पर्यंत मोहनदास गांधी एक सामान्य वकीलच होते. वकिलातील असामान्य वकील ते झालेही असते, पण नियतीची इच्छा तशी नव्हती. नियतीने त्यांना दक्षिण आफ्रिकेत खेचून आणले आणि तेथेच सत्याग्रहाचे अस्त्र गांधीजींनी शोधून काढले.

दरबान ते प्रिटोरिया रेल्वेच्या डब्यात मोहनदास करमचंद गांधी नावाचा चोवीस वर्षांचा एक बॅरिस्टर चढला. त्याच्याकडे पहिल्या वर्गाचे तिकीट होते. प्रिटोरियाला तो कोर्टात एक केस लढविण्यासाठी निघाला होता. दादा अब्दुल्ला अॅड कंपनी यांचे वकीलपत्र त्याने घेतले होते. दादा अब्दुल्लाने आपल्या पुतण्यावर मोठी रक्कम देण्याचा दावा लावला होता. पुतण्या त्याला दाद देत नव्हता. दादा अब्दुल्लाने पोरबंदरच्या या तरुण बॅरिस्टर वकिलाला आपली केस घेण्याची विनंती केली आणि त्यासाठी त्याला दक्षिण आफ्रिकेला बोलावले. कोर्टाच्या तारखेला हजर राहण्यासाठी पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले.

या प्रवासात आपल्याला काय सहन करावे लागणार आहे, याची कल्पना तरुण बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधींना नव्हती. आफ्रिकेत पाऊल ठेवल्यापासून एकापाठोपाठ एक अपमानाच्या प्रसंगाला त्याला सामोरे जावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेत आल्यानंतर अब्दुल्ला शेठ यांच्याबरोबर तो दरबानच्या कोर्टात गेला होता. अब्दुल्ला शेजारी तो बसला होता. मॅजिस्ट्रेटची नजर त्याच्याकडे गेली. या तरुण बॅरिस्टरने डोक्याला काठेवाडी फेटा बांधला होता. मॅजेस्टि्रक त्याला म्हणाला, ''डोक्यावरचा हा फेटा काढून टाका.'' कोर्टात काही पारशी बसले होते, त्यांच्या डोक्यावर पारशी टोपी होती. मुसलमान होते, त्यांच्या डोक्यावर मुसलमानी टोपी होती. इंग्रज होते, त्यांच्या डोक्यावर इंग्रजी हॅट होती. यापैकी कोणालाही 'डोक्यावरच्या टोप्या काढा' असे न्यायाधीश म्हणाला नाही, फक्त गांधींना म्हणाला. का? त्याचे कारण ते हिंदू होते. पारशी नव्हते, मुसलमान नव्हते, ख्रिश्चनदेखील नव्हते.

मोहनदास गांधी न्यायाधीशाला म्हणाले, ''मी माझ्या डोक्यावरील पागोटा का काढावा, हे मला समजत नाही. आमच्या देशात डोक्यावरचे पागोटे काढणे अपमानकारक समजले जाते, म्हणून मी काढणार नाही.'' न्यायाधीश दरडावून म्हणाले, ''डोक्यावरचे पागोटे काढा.'' डोक्यावरचे पागोटे काढण्याऐवजी मोहनदास गांधी कोर्टातून उठून बाहेर गेले. त्यांच्या मागोमाग अब्दुल्लादेखील आले. आपल्या वकील मित्राला शांत करत म्हणाले, ''तुम्हाला कल्पना नाही की, गोरे लोक आमचा उल्लेख 'कुली किंवा सामी' असा करतात.'' हे ऐकून मोहनदास गांधी म्हणाले, ''न्यायाधीशाने माझा अपमान केलेला आहे. डोक्यावरचे पागोटे काढण्याचा नियम हा स्वतंत्र माणसाचा अपमान आहे. मी त्याचा निषेध नोंदविणार आहे.'' बॅरिस्टर गांधींनी पत्र लिहिले आणि वर्तमानपत्रांना पाठवून दिले. वृत्तपत्रांनी त्याला प्रसिध्दी दिली आणि त्यावर शेरेबाजी केली की, हा नको असलेला पाहुणा आहे.

हा प्रसंग घडल्यानंतर दरबान ते प्रिटोरिया हा रेल्वे प्रवास सुरू होतो. गाडीने दरबान सोडल्यानंतर पुढच्या स्टेशनवर एक गोरा माणूस डब्यात चढला. गांधींना बघून त्याच्या भुवया उंचावल्या. त्याने रेल्वे अधिकाऱ्याला बोलावले आणि म्हणाला, ''या कुलीला येथून पहिल्यांदा बाहेर काढा आणि त्याला त्याच्या जागेवर पाठव. मी काळया माणसाबरोबर प्रवास करणार नाही.'' ''यस सर'' असे रेल्वे अधिकारी म्हणाला. गांधीकडे वळून तो म्हणाला, ''माझ्याबरोबर दुसऱ्या डब्यात चल, सामी.'' गांधी म्हणाले, ''मी मुळीच जाणार नाही. माझ्याकडे फर्स्ट क्लासचे तिकीट आहे आणि या डब्यातून प्रवास करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.''

हा तरुण वकील असा ऐकणार नाही, म्हणून रेल्वे अधिकाऱ्याने पोलीस शिपायाला बोलाविले आणि मोहनदास गांधी यांना त्यांच्या सामानासहित स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले. तारीख होती 7 जून 1893, स्टेशनचे नाव होते, पिटरमॅरिटजबर्ग. बाहेर कडाक्याची थंडी होती. तशा थंडीत कुडकुडत रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये हा तरुण बॅरिस्टर रात्रभर बसून राहिला. झालेल्या अपमानाने तो मुळापासून हादरला गेला होता. गोऱ्यांच्या देशात - म्हणजे इंग्लडमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी त्याने काही वर्षे काढली होती. पण तेथे त्याला अशा अपमानाचा सामना करावा लागला नव्हता.

हा अपमान केवळ शरीराचा अपमान नव्हता, तर शरीरात असणाऱ्या चैतन्याचा अपमान होता. तो सहन करणे या स्वाभिमानी पुरुषाला शक्य नव्हते. पुढे केव्हा तरी महात्मा पदवी मिळाल्यानंतर त्याने लिहिले, ''व्यक्तीला त्याच्या नैसर्गिक स्वातंत्र्यापासून वंचित करणे आणि जीवनाला आवश्यक असणाऱ्या सामान्य गोष्टीदेखील नाकारणे, हे शरीराला भुकेले ठेवण्यापेक्षाही भयानक आहे. शरीरात राहणाऱ्या आत्म्याचे हे कुपोषण आहे.'' रात्रभर झालेल्या अपमानाविषयी विचारांचे काहूर त्याच्या मनात निर्माण झाले. अपमानाचा बदला घेण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली नाही, कारण हा त्याच्या एकटयाचा अपमान नव्हता. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या सर्व भारतीयांचा तो अपमान होता. भारतीय असण्याचा हा अपमान होता. भारताची उज्ज्वल परंपरा, संस्कृती आणि विचारधारा यांचा अपमान होता. अपमान करणारा माणूस गोरा होता. पण तो एकटा नव्हता, तो गोऱ्या समूहाचा भाग होता, गोऱ्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करत होता. अपमानाविरुध्द आवाज उठविणे गरजेचे होते. तो एकटयाने उठून भागणार नव्हते, हा प्रश्न एक मानसिकता विरुध्द दुसरी मानसिकता असा होता. हा संघर्ष कसा लढायचा?

दक्षिण आफ्रिकेत तात्पुरत्या कामासाठी आलेला बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी एका जटिल समस्येच्या चिंतनाच्या अवर्तनात सापडला. डब्यातून त्याला बाहेर फेकून देणाऱ्या तीन गोऱ्यांना याची कल्पनादेखील नव्हती की, आपण मानवी इतिहासाला कलाटणी देणारा एक प्रसंग घडवीत आहोत. त्यांना कल्पना नव्हती की, खटला लढविण्यासाठी आलेला हा तरुण वकील पुढे एकवीस वषर्े दक्षिण आफ्रिकेत राहील. एका शांततामय क्रांतीला तो सुरुवात करील. सत्याग्रह हे नवीन अस्त्र शोधून काढील, सत्य, अहिंसा, या तत्त्वांना एका महान उंचीवर नेऊन ठेवील. सामान्यातील सामान्य माणसातील प्रचंड दैवी ऊर्जा तो जागी करील. माणसाला सर्वाधिक भय मृत्यूचे असते. त्या मृत्यूलाही घाबरायला लावेल, असा निर्भय माणूस हा आपल्या एकटयाच्या ताकदीवर उभा करील. डब्यातील फेकून देणाऱ्या त्या तीन गोऱ्यांना आपण काय करीत आहोत, याची सुतराम कल्पनाही नव्हती.

मोहनदास करमचंद गांधी यांना घोडागाडीतून पुढचा प्रवास करावा लागला. तिकीट होते, तरीदेखील गोऱ्या कातडीचा कंडक्टर त्यांना म्हणाला, ''हे बॅरिस्टर कुली, गोऱ्या माणसांबरोबर बग्गीत आतमध्ये तुला बसता येणार नाही. तुझ्याकडे तिकीट असो नाही तर आणखी काही असो, घोडागाडी हाकणाऱ्याच्या बाजूला माझे आसन आहे, तेथे तू बस.'' हा अपमान मुकाटयाने सहन करीत मोहनदास गांधी कंडक्टरच्या आसनावर जाऊन बसले. थोडया वेळाने कंडक्टर आला आणि म्हणाला, ''हे सामी येथून उठ, माझ्या पायाशी तरट टाकलेले आहे, त्यावर बस, मला धूम्रपान करायचे आहे.'' गांधींनी त्याला नकार दिला. कंडक्टर संतापला आणि त्याने गांधींना ठोसे लगवायला सुरुवात केली. गांधींनी त्याचा प्रतिकार केला नाही. बग्गीत बसलेल्या इतर गोऱ्या प्रवाशांनी गांधीजींची बाजू घेतली.

प्रवासात या तरुण वकिलाला एकापाठोपाठ एक असे अपमान सहन करावे लागले. तेथे राहणाऱ्या भारतीय लोकांच्या नशिबी असे अपमान रोजचाच विषय होता. 1860 साली इंग्रजांनी भारतातून दक्षिण आफ्रिकेत मजुरी करण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, मध्य प्रदेश येथून लाखोंच्या संख्येत मजूर नेले. 1890च्या सुमारास त्यांची संख्या जवळजवळ वीस लाखांच्या आसपास होती. इंग्रजांनी त्यांना गुलामासारखे वागविले. त्यांच्या कष्टावर उसाची शेती केली, रेल्वेमार्ग टाकले आणि त्यांना खाणीत कामाला लावले. त्यांची संख्या जसजशी वाढू लागली, तसतशी तेथील इंग्रज सरकारने त्यांच्यावर असंख्य बंधने घालायला सुरुवात केली. सर्वच ठिकाणी त्यांना मालमत्ता खरेदी करता येत नसे. त्यांना आखून दिलेल्या प्रदेशातच त्यांना राहावे लागे. ज्या ठिकाणी गोऱ्यांची वस्ती आहे, त्या ठिकाणी त्यांना प्रवास करता येत नसे. रात्री नऊनंतर योग्य त्या कागदपत्रांशिवाय बाहेर जाण्यावर बंदी होती. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांची स्थिती 'मुकी बिचारी कुणी हाका' अशी होती.

या अन्यायाविरुध्द संघर्ष करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. संघर्ष म्हणजे राज्यशक्तीशी लढणे होय. राज्यशक्तीशी लढण्यासाठी शस्त्रबल लागते, संघटनबल लागते आणि तसे नेतृत्व लागते. यापैकी एकही गोष्ट दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांकडे नव्हती. त्यांना गरज होती, नव्या प्रकारच्या शस्त्राची, नव्या प्रकारच्या नेतृत्वाची आणि सर्वस्वी नवीन विचाराची. इंग्लड त्या वेळेला जगातील एकमेव महासत्ता होती. या महासत्तेशी शस्त्राने लढणे नागरिकांना अशक्य होते. इंग्रजांची शस्त्रबलाची शक्ती पाशवी शक्ती होती. या पाशवी शक्तीशी लढण्यासाठी दैवी शक्ती आवश्यक होती. ती निर्माण करण्यासाठीच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. त्यांची आई पुतलाबाई आणि वडील करमचंद यांच्याकडून त्यांना बालवयातच या दैवी शक्तीचे पाठ मिळाले. आई अत्यंत धार्मिक आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी वेगवेगळी व्रते करणारी, अत्यंत शुध्द जीवन जगणारी महान स्त्री होती. वडील सत्यवादी, संस्थानाचे दिवाण असूनही एक पैसाचाही भ्रष्टाचार न करणारे आणि सत्यासाठी वाटेल तो त्रास सहन करणारे होते. मोहनदासवर या सर्वांचा जबरदस्त परिणाम झालेला आहे.

हात्मा आकाशातून जमिनीवर येत नसतो, जमिनीतून तो अवकाशाला गवसणी घालणारा होतो. 7 जून 1893पर्यंत मोहनदास गांधी एक सामान्य वकीलच होते. वकिलातील असामान्य वकील ते झालेही असते, पण नियतीची इच्छा तशी नव्हती. नियतीने त्यांना दक्षिण आफ्रिकेत खेचून आणले आणि तेथेच सत्याग्रहाचे अस्त्र गांधीजींनी शोधून काढले. जी केस लढण्यासाठी ते आले होते, ती केस त्यांनी शेठ अब्दुला यांना जिंकून दिली. दोन्ही पक्षांना त्यांनी एकत्र केले आणि आपापसातील वाद सामोपचाराने मिटवावा, असा अ-वकिली सल्ला दिला. ते म्हणाले की, तुम्हा दोघांनाही मान्य होईल, अशा एका ज्येष्ठ माणसाला तुमचा विवादाचा विषय संपवायला सांगा. कोर्टात भांडणाऱ्या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने हा वेगळा सल्ला होता. आश्चर्याची गोष्ट की त्यांनी तो मानला आणि विवाद संपला.

आता मायदेशी परत जाण्याची वेळ आली होती. बॅरिस्टर मोहनदास यांनी भारतात परत जाण्याचे तिकीटही काढले, परंतु त्यांनी भारतात जावे ही नियतीची इच्छा नव्हती. अब्दुला शेठ यांनी आपल्या घरी बॅरिस्टर मोहनदास गांधी यांना निरोप देण्याचा कार्यक्रम ठेवला. त्या दिवसाचे वर्तमानपत्र मोहनदासच्या हाती होते. त्यात एक बातमी अशी होती की नाताल विधिमंडळापुढे भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचे एक विधेयक होते. या विधेयकाचे अर्थ फार वाईट होते. भारतीयांना आपले प्रतिनिधी निवडून पाठविता येणार नव्हते. त्यांचे राजकीय अस्तित्व समाप्त होणार होते. राजकीय अस्तित्व समाप्त झाल्यामुळे नागरिकत्वाच्या हक्कांनादेखील ते मुकणार होते. हे विधेयक आत्मगौरवावरच आघात करणारे होते. बॅरिस्टर मोहनदास गांधी यांच्या ही गोष्ट तत्काळ लक्षात आली. निरोप समारंभासाठी जमलेले सगळे व्यापारी होते. ते फक्त व्यापाराचाच विचार करीत. त्यांना व्यापारातून बाहेर काढून समाज व्यापाराचा विचार करायला गांधीजींना प्रवृत्त केले.

परिणाम एवढाच झाला की, सर्वांनी आग्रह केला की, तुम्ही आता लगेच भारतात जाऊ नका. जगातील हा पहिला निरोप समारंभ असेल, ज्यात निरोप देणाऱ्या व्यक्तीला लोकांनी अमर्याद काळासाठी थांबवून ठेवले. येथून सुरू होतो मोहनदास करमचंद गांधीजींचा महात्मा बनण्याचा प्रवास. या एकवीस वर्षांच्या प्रवासात गांधींना अनेक वेळा सत्याग्रह, अनेक वेळा तुरुंगवास, अनेक वेळा जबरदस्त मारहाण सहन करावी लागली. मोहनदासचा तेवढयाने महात्मा झाला नाही. ज्यांनी मारले, त्यांच्या विरुध्द त्यांनी कधी फिर्याद केली नाही, कोर्टात कधी केस उभी केली नाही, त्यांच्याविषयी मनात वाईट भावना ठेवली नाही, सत्याची कास सोडली नाही. हळूहळू आपल्या जीवनात परिवर्तन करीत आणले. उच्च राहणीकडून साध्या राहणीकडे प्रवास सुरू झाला. जेवणातही अत्यंत साधेपणा आला. पोषाख बदलत गेला. आश्रमाचे जीवन सुरू झाले. इंडियन ओपिनियनच्या माध्यमातून वृत्तपत्रीय लेखन सुरू झाले. भगवद्गीतेचा विचार प्रत्यक्ष जीवनात उतरविणे सुरू झाले. ही एकवीस वर्षांची साधना आहे. तिची सुरुवात पिटरमॅरिजबर्ग स्टेशनच्या प्रसंगाने सुरू झाली. मोहनदासचा महात्मा झाला.

आणि मग आइनस्टाइनला म्हणावे लागले, ''अशा प्रकारच्या हाडामांसाचा माणूस या भूतलावर होऊन गेला, यावर येणाऱ्या पिढया कदाचित विश्वासही ठेवणार नाहीत.''

vivekedit@gmail.cm