भक्तीच्या ताटातील अभद्र वाटी

विवेक मराठी    23-Jul-2018   
Total Views |


 

 

विठूमाऊली ही कोपिष्ट देवता नाही, ती सर्वांना अभय देणारी देवता आहे. मुख्यमंत्री महापुजेला आले नाहीत म्हणून ही देवता त्यांच्यावर काही रागावणार नाही. ज्यांनी भयानक राजकारण करून त्यांना येऊ दिले नाही, त्यांच्यावरही ती रागावणार नाही. कारण, विठाई हे कृष्णाचे रूप आहे, आणि कृष्णाने गीतेत सांगितले की, 'माझे पूजन जो ज्या भावाने करतो त्याला मी तसे फळ देतो.'

पंढरपूर वारीची परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. अनेक राजवटी आल्या आणि गेल्या, पण विठोबाची भक्तीची राजवट अभंग राहिली. ती अभंग ठेवण्याचे काम तुकोबारायांच्या अभंगांनी जसे केले, तसे ज्ञानदेवाच्या ओव्यांनीदेखील केले. नामदेवांच्या रसाळ अभंगांनी विठुमाऊली घरोघर नेली. विठोबाच्या नामसंकिर्तनात अवघा महाराष्ट्र शेकडो वर्षे न्हाऊन निघाला आहे.

दोन्ही कर कटेवरी ठेऊन उभ्या असलेल्या विठोबाने काही न बोलताच, महाराष्ट्र धर्म रुजविला, जागविला आणि त्यासाठी जगण्यास शिकविले, आणि प्रसंगी प्राण अर्पण करण्यास शिकविले. याच विठोबाने स्वराज्याच्या स्वप्नांची सवय मराठी माणसाला लावली. आपण कोणाचे गुलाम व्हायचे नाही, आणि कोणालाही गुलाम करायचे नाही, हा पुरुषार्थ भाव जागविला. शिवाजी महाराजांच्या यशाचे आपण सर्व पोवाडे गातो, परंतु त्यांच्या यशाची पायाभरणी विठोबा चरणी लिन झालेल्या वारकरी संप्रदायाने केली, हा इतिहासदेखील विसरता येत नाही.

महाराष्ट्रात अनेक देवता आणि देवांची मंदिरे असली तरी, महाराष्ट्र म्हणजे विठोबा, विठूरुखमाई, हे समीकरण झालेले आहे. महाराष्ट्रात शासन कोणाचेही येईना का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व महाराष्ट्राचे प्रतिनिधी बनून विठूमाऊलींची आषाढी एकादशीला पूजा करतात. आषाढी एकादशीची यात्रा हा अवघ्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव असतो. पंढरपूरच्या  दिंडीत जातिभेद नसतो, पंथभेद नसतो, पंक्तीभेद नसतो असतो तो फक्त एकात्मभाव. भक्तीरसात सर्वजण एकरस झालेले असतात. हा अद्भुत चमत्कार आहे. यासाठी पंढरपूरची वारी जन्माला आल्यानंतर एकदा तरी करावी, असे म्हटले जाते. या सर्वांचे भावप्रतिनिधी बनून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विठोबाच्या चरणी लीनमस्तक होतात.

यावर्षी तसे घडले नाही. महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासूनची परंपरा भंग झाली. त्याला कारण हे पत्रक आहे. त्याची भाषा कशी आहे बघा..

मुख्यमंत्री महोदय मगच पंढरीत या!

अनेक आंदोलने चिरडणारे हात कुठल्याही परिस्थितीत विठ्ठलाच्या पवित्र मुर्तीस लागू देणार नाही.

आमचा विरोध वारकऱ्यांना नाही तर मुख्यमंत्र्यांना...!

असल्या वांझोटया विरोधांना कुठलाही मुख्यमंत्री कधीही घाबरत नसतो, मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना. धमक्या देणाऱ्यांना वठणीवर आणण्याची अफाट शक्ती राज्याकडे असते. तिचा वापर केव्हा आणि किती करायचा, याचाच फक्त निर्णय मुख्यमंत्र्यांना करायचा असतो. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका लोकहितैशी शासकाला शोभेल असा निर्णय केला. सत्ता असूनही ती न वापरण्याचा आणि पंढरपूरच्या विठूमाऊलीच्या दर्शनास आणि महापूजेस न जाण्याचा निर्णय केला.

पत्रकाची भाषा आक्रमक आहे, आणि हिंसकदेखील आहे. पंढरपुरच्या वारीत गोंधळ घालण्याचा सुप्त डाव त्यातून नक्कीच प्रकट होतो. वारकरी पंढपूरास राजकारणासाठी येत नाहीत. वारीत राजकारण करणे म्हणजे पुरणपोळी आमरसाच्या जेवणात कोंबडीची टांग टाकणे आहे. याला रंगाचा बेरंग म्हणतात. मराठा आरक्षणावरून जे आक्रमक झाले आहेत, त्यांना रंगात रंगलेल्या  श्रीरंगाला बेरंग करण्यात कसलीच लाजलज्जा राहिलेली नाही. मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी सर्व महाराष्ट्रभर फिरत असतात. अशा कोणत्याही ठिकाणी त्यांच्याविरुध्द आंदोलन करता येऊ शकते. त्याला कोणाची परवानगी लागत नाही.

पंढरपूरच निवडण्याचे कारण काय? वारकरी सर्व राजकीय पक्षातील असतात, समाजाच्या सर्व स्तरातील असतात, आणि त्यांच्या दृष्टीने आषाढी एकादशीचा दिवस अत्यंत पवित्र आहे, निर्मळ भावनेने उपवास करण्याचा दिवस आहे. या दिवशी नामसंकिर्तनाशिवाय अन्य काहीही करायचे नसते. तिथे राजकीय घोषणाबाजी कशासाठी? गोंधळ घालून अराजकाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी होता का? जेथे लाखो लोकं एका श्रध्देने गोळा झालेली असतात तिथे गर्दीच्या मानसशास्त्राप्रमाणे काहीही अफवा सोडून पळापळ करायला लावता येऊ  शकते. तसा तर आंदोलनकर्त्यांचा डाव नसावा ना? देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द राजकारण करताना विरोधक कोणत्या स्तराला जातील आणि कोणती पायरी गाठतील, हे महाराष्ट्राने यापूर्वी अनेक वेळा पाहिलेले आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय हुशारी दाखवून विरोधकांचा डाव त्यांच्यावरच उलटविला आहे.

विठूमाऊली ही कोपिष्ट देवता नाही, ती सर्वांना अभय देणारी देवता आहे. मुख्यमंत्री महापुजेला आले नाहीत म्हणून ही देवता त्यांच्यावर काही रागावणार नाही. ज्यांनी भयानक राजकारण करून त्यांना येऊ दिले नाही, त्यांच्यावरही ती रागावणार नाही. कारण, विठाई हे कृष्णाचे रूप आहे, आणि कृष्णाने गीतेत सांगितले की, 'माझे पूजन जो ज्या भावाने करतो त्याला मी तसे फळ देतो.'